दारिद्र्य: भाषेचे आणि भाषिक समाजाचे
मराठी ही एक प्रगत भाषा आहे असे मानले जाते. (ती अभिजात भाषा आहे की नाही यावर माझा पास). मराठीभाषिक समाज दहा कोटींच्या घरात आहे आणि जगाच्या सर्व भागांत तो पोचलेला आहे.
एखाद्या 'प्रगत' भाषेमध्ये, रोजच्या आयुष्यातील काही महत्वाच्या संकल्पनांसाठी जर शब्दच अस्तित्वात नसले, तर? विशेषतः लिंगासारख्या मूलभूत विषयाशी संबंधित संकल्पनांसाठी?
काही उदाहरणे: (माझ्या माहितीप्रमाणे. या निरीक्षणांत चुका असल्यास त्या दुरुस्त करेन)
१. महापुरुष, पुरुषोत्तम, युगपुरुष, वास्तुपुरुष, महात्मा, देवमाणूस, नटसम्राट आणि तत्सम शब्द मराठीत सर्रास वापरात आहेत. पण तश्याच प्रकारच्या स्त्रीवाचक शब्दांचा मराठीत दुष्काळ आहे. ते एक तर नव्याने बनवावे लागतात, किंवा बहुतकरून तो अर्थ व्यक्त करण्यासाठी मग थोर इ. विशेषणे "स्त्री" या शब्दाच्या मागे योजावी लागतात.
२. Sex आणि gender यांतील फरक ठळकपणे दाखविणारे शब्द मराठीत प्रचलित नाहीत.
३. लैंगिक प्रवृत्तींशी संबंधित अचूक आणि अर्थवाही शब्द मराठीत उपलब्ध नाहीत. "समलिंगी" चा मूळ अर्थ "समान किंवा त्याच लिंगाचे". पण "समान लिंगाच्या व्यक्तींकडे प्रणयाकर्षित होणाऱ्या व्यक्ती" किंवा "समान लिंगाच्या व्यक्तींशी संभोग करणाऱ्या व्यक्ती" या संकल्पनांसाठी मराठीत अचूक शब्द नाहीत. त्यासाठी "समलिंगी" हाच शब्द वापरला जातो. त्यातही "समलिंगी" पुरुषांबाबत थोडेतरी बोलले/लिहिले जाते. "समलिंगी" स्त्रियांबद्दल तेवढेही नाहीच. भाषेने इथेच मर्यादा गाठली, तर मग LGBTQ+ वगैरे बारकाव्यांचा तर आनंदीआनंदच.
आणखीही उदाहरणे देता येतील.
मराठी भाषेच्या या मर्यादा गंभीर आहेत. आणि 'मागणी तसा पुरवठा' या नियमानुसार असे म्हणावे लागेल, की मराठीभाषिक समाज ह्या कल्पनांबद्दलच उदासीन आहे, किंवा वरील कल्पनांना मराठी समाजात अनुल्लेखाने मारले जात आहे. त्यांना मराठीभाषिक समाजात प्राधान्य नाही. त्या दडपल्या जात आहेत की काय अशी शंका घेण्यासही वाव आहे. स्त्रिया आणि "समलिंगी" लोकांची यामुळे कुचंबणा होत असण्याचा धोका संभवतो. यांत कार्यकारणभाव आहे काय, आणि असल्यास तो कोणत्या दिशेने (कारण कोणते आणि कार्य कोणते) आहे?
इंग्रजीमधील तांत्रिक किंवा पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याचा उत्साह काही मराठीभाषिक दाखवतात. माझ्या अनुभवानुसार हे लोक बहुतकरून मध्यमवयीन (खरेतर वृद्ध), मध्यमवर्गीय, अभिजन (साधारणतः ब्राह्मण) असतात. त्यातही पुरुष बहुसंख्य. असे मराठी प्रतिशब्द संस्कृतशी कुस्ती करून बनवले जातात (कारण ते संस्कृतमध्येही नसतातच!). पण मराठीतील उपरोल्लेखित लिंगविषयक शब्दांचे दारिद्र्य दूर करण्यास त्यांच्या "अजेंड्यामध्ये" प्राधान्य दिसत नाही. हे मुद्दाम होते असे मी ह्मणणार नाही, पण हे लक्षणीय आहे असे मला वाटते.
मराठी भाषेतील या 'शाब्दिक वाळवंटांबद्दल' आपणांस काय वाटते? त्यांचे निर्मूलन कसे करावे, आणि मुद्दलात करावेच का? की शक्य तिथे सरळ इंग्रजी शब्दांचाच वापर करावा?
थोड्याफार फरकाने इतर भारतीय भाषांतही हीच परिस्थिती असावी असा माझा अंदाज आहे (हिंदीव्यतिरिक्त इतर भारतीय भाषांचा मला अनुभव नाही). पण आपल्या माहितीनुसार इतर भारतीय भाषांत असे शब्द रुजले आहेत काय? त्यातून मराठीसाठी उपयोगाचे काही निघू शकेल काय?
-------------------------------------------------------------------
जाताजाता: नव्या लिखाणासाठी "ऐसी" वर सध्या उपलब्ध असलेल्या categories (मौजमजा, ललित, इत्यादि) पैकी कुठल्या category त हा लेख टाकावा ते न समजल्यामुळे सध्यापुरता तो "समीक्षा" या category त टाकला आहे. इतर कोणती category यासाठी योग्य होईल याबद्दल संपादकांनी सल्ला द्यावा.
प्रतिक्रिया
मराठीचे pidginisation पिजिनीकरण
मराठी ही एक प्रगत भाषा आहे असे मानले जाते. ह्या पहिल्या वाक्याबद्दलच मला शंका आहे. मराठीचे pidginisation पिजिनीकरण रोजच्या रोज वाढत आहे. उदाहरणार्थ टीवीवरील जाहिरातींमधील मराठी ऐका. अन्य भाषेपुढे इतक्या सहजपणे मान टाकणाऱ्या भाषेला प्रगत भाषा असे का मानावे?
सहमत
जाहिरातींच्या मराठी कॅाप्या वाचून/ऐकून अंगावर शहाराच येतो. मूळ इंग्रजी मजकुराचे गूगल ट्रान्स्लेट मारले तरी आजकाल इतके हिडीस भाषांतर होणार नाही. जाहिरात कंपन्यांतील (किंवा बहुधा त्यांच्या कंत्राटी कंपन्यांमधील) आंग्लाळलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून भारतीय भाषांतरे करून घेत असावेत. आणि जाहिरातींसाठी प्रचंड बजेट् असणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातींतही दुर्दैवाने हे पहायला मिळते.
एक गमतीची आठवण : हिंदुस्तान लीव्हर मध्ये नोकरी करत असताना माझा एक बंगाली सहकारी लक्स साबणाचा ब्रॅंड मॅनेजर होता. नवीन जाहिरातींतील इंग्रजी मजकूर पक्का ठरल्यावर तो पुढच्या प्रक्रियेसाठी (ज्यात भारतीय भाषांमध्ये कॅापी लिहिणे अंतर्भूत असे) जाहिरात कंपनीकडे सुपुर्द करण्यापूर्वी, बंगालीतील कॅापी मात्र तो स्वत: लिहीत असे. (बंगालीतील भाषांतर ते गाढवपणे करतात असे त्याचे मत होते!). मी त्याला ह्मणालो, की मराठी भाषांतरेही अत्यंत वाईट होतात. तेंव्हा एका महत्त्वाच्या कॅापीचे मराठी भाषांतर त्याने माझ्याकडून करवून घेतले होते!
त्यावेळी क्वचित एखादा ब्रॅंड मॅनेजर मराठी असे, पण ते मराठी कॅापी स्वत: लिहिण्याच्या फंदात पडत नसत.
असो.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
…
तेदेखील (एक वेळ) परवडले, परंतु, मूळ हिंदी कॉपीची मराठी भाषांतरे त्याहूनही भयंकर असतात (‘रिन… थोडीशी!’), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
एक प्रश्न: मुळात इंग्रजीत किंवा हिंदीत मास्टर कॉपी (हा शब्द आजकाल वर्ज्य आहे, असे ऐकून आहे. असो.) बनवून त्याची(च) प्रादेशिक भाषांतून भाषांतरे करण्याच्या आचरटपणामागील लॉजिक समजत नाही. मुळात प्रत्येक भाषेत स्वतंत्र कॉपी (स्थानिक गरजांप्रमाणे) का बनवू नये? कदाचित मुंबईतल्या/दिल्लीतल्या एखाद्या मोठ्या जाहिरातकंपनीस हे (स्टाफिंगवरील मर्यादांमुळे, वगैरे) हे शक्य नसेलही. परंतु, मुळात मुंबईतल्या/दिल्लीतल्या एकाच कंपनीने अखिल भारताकरिता तमाम भारतीय भाषांतून जाहिराती का बनवाव्यात? पंचवीसतीस छोट्या, प्रादेशिक कंपन्यांना त्यात्या प्रादेशिक भाषांतून स्वतंत्र कॉप्या बनविण्याची कंत्राटे का देऊ नयेत? तेवढेच स्थानिक धंद्यांना उत्तेजन! (शिवाय, प्रत्येक स्थानिक कंपनीचा खर्च त्या मानाने खूपच कमी असणार; चूभूद्याघ्या.) शेवटी, प्रादेशिक ग्राहकांकडे माल खपविणे हेच जर उद्दिष्ट असेल, तर (अशा वन-साइझ-फिट्स-ऑल जाहिरातींतून) त्या प्रादेशिक ग्राहकांच्या भाषेची मोडतोड करून नक्की कोणास नि काय फायदा होतो?
(हे झाले जाहिरातींतल्या भाषांबद्दल. त्याव्यतिरिक्त, शहरी विरुद्ध ग्रामीण किंवा तत्सम विभिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमींकरिता एकच जाहिरात कशी चालेल, हाही प्रश्न उद्भवतोच. परंतु, तो स्वतंत्र मुद्दा आहे.)
धागाविषय रोचक आहे!
काही टिप्पण्या/ओपन थॉट्स:
एकंदरीत, अगदी अद्यतन काळ वगळता, स्त्रियांचे सामाजिक महत्त्व हे पुरुषप्रधान व्यवस्थेत दुय्यम असणे सनातन आहे, ही बाब लक्षात घेता, यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही नसावे.
तरीसुद्धा, जेथे अगदीच गरज पडली, किंवा तशीच वेळ आली, तेथे अशा प्रकारचे शब्द अजिबातच बनवले गेले नाहीत, असेही नाही. जसे, विदुषी. किंवा, पंडिता. किंवा, साध्वी. (अशी उदाहरणे त्या मानाने पुष्कळच कमी आहेत, जवळजवळ नगण्य आहेत, हे अर्थात मान्य आहे. फक्त, नगण्य असली, तरी शून्य नव्हेत, एवढेच सुचवायचे आहे.)
दुसरे म्हणजे, हे केवळ मराठीच्याच बाबतीत होत असावे, असेही नाही; हे बहुधा वैश्विक असावे. (पुरुषप्रधान संस्कृती ही महाराष्ट्राची खासियत खाशी नसावी.) इंग्रजीतसुद्धा, chairmanची जागा chairpersonने किंवा (निदान अमेरिकनमध्ये तरी – ब्रिटिश इंग्रजीबद्दल कल्पना नाही.) waiter/waitressची जागा (जेंडर-न्यूट्रल) serverने घ्यायला, झालेच तर manager ही संज्ञा जेंडर-न्यूट्रल व्हायला, गेला बाजार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा उत्तरार्ध तरी उजाडलाच!
Which brings me to my next point: आपण उल्लेखिलेल्या पुरुषवाचक संज्ञांकरिता समांतर स्त्रीवाचक संज्ञांची गरज नेमकी काय आहे? त्याऐवजी, त्या प्रत्येक संज्ञेकरिता प्रत्येकी एकच, जेंडर-न्यूट्रल संज्ञा (जसे, chairmanच्या ठिकाणी chairperson, किंवा, waiter/waitressऐवजी server, त्याप्रमाणे) वापरता येणार नाही काय? किंवा, त्याहीपुढे जाऊन, नवीन पर्यायी जेंडर-न्यूट्रल संज्ञा योजण्याऐवजी, तूर्तास वापरात असलेल्या पुरुषसूचक संज्ञेचीच व्याख्या ओव्हरलोड करून, तीच (पुरुषसूचक) संज्ञा जेंडर-न्यूट्रल पद्धतीने (जसे, आजमितीस manager ही संज्ञा ज्या पद्धतीने वापरतो, तद्वत) वापरता येणार नाही काय?
महात्मा, देवमाणूस यांच्या बाबतीत असे करण्यात फारशी अडचण येऊ नये. ‘श्रीमती अमूकअमूक महात्मा आहेत’ हे विधान, किंवा त्यातील श्रीमती अमूकअमूक यांचा ‘महात्मा अमूकअमूक’ असा उल्लेख (assuming अमूकअमूक हे संबंधित व्यक्तीचे आडनाव आहे, पाळण्यातले नाव नव्हे. किंवा, फॉर्दॅट्मॅटर, आडनाव नसून पाळण्यातले नाव असले, तरीही.) या दोन्ही गोष्टी मराठीत खपून जाण्यात निदान आजमितीस तरी फारशी अडचण येऊ नये. तसेच, स्त्रियादेखील ‘माणूस’ कॅटेगरीत मोडतात, ही बाब लक्षात घेता, ‘अमकीतमकी देवमाणूस आहे हो!’, हे वाक्य कोणास खटकू नये. (त्याकरिता तिची ‘देवनार’ करण्याची यत्किंचितही आवश्यकता नाही.)
फार कशाला, ‘अमकीतमकी नटसम्राट आहे’ हे विधानसुद्धा कोणास वावगे वाटण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.
हं, आता, ‘एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमूकअमूक नावाची एक महापुरुष या पृथ्वीतलावर होऊन गेली’, किंवा ‘तिच्यासारखी पुरुषोत्तम होणे नाही’, यांसारखी वाक्ये, कदाचित ऐकणाऱ्याच्या कानास किंचित चमत्कारिक वाटू शकतील खरी, परंतु ती सुरुवातीस. कालांतराने त्यांचीही सवय होऊन जाईल. (भारताच्या संवैधानिक सर्वोच्चपदाकरिता ‘राष्ट्रपती’ ही संज्ञा योजण्यात आली खरी, आणि ती अनेक वर्षे विनाअडथळा चालली. फार कशाला, कालांतराने त्या पदावर एक स्त्री विराजमान झाल्यावरसुद्धा ती संज्ञा तशीच वापरली जात राहिली; त्यात कोणालाही काहीही वावगे किंवा चमत्कारिकही वाटले नाही, किंवा त्याऐवजी ‘राष्ट्रपत्नी’ अशी (किंवा अन्य कोणती) पर्यायी शब्दयोजना करण्याची गरजही भासली नाही वा दुर्बुद्धीही झाली नाही. नशीब. अर्थात, तशी गरजही नव्हती.)
या मुद्द्यावर माझा पास.
हा मला वाटते सर्वात रोचक मुद्दा आहे.
बोले तो, हे (बोले तो, उपरोल्लेखित LGBTQ+ कॅटेगरीत मोडणारे सर्वच) व्यक्तिविशेष महाराष्ट्रसमाजात, झालेच तर हिंदुसमाजात, फार कशाला, जगातल्या कोठल्याही समाजात, पूर्वापार अस्तित्वात असणार, नि त्यांचे अस्तित्व सर्वज्ञात असणार. हे व्यक्तिविशेष वा या लैंगिक वृत्ती हा विसाव्या/एकविसाव्या शतकातील आविष्कार खासा नव्हे. आणि, महाराष्ट्रसमाजात हे व्यक्तिविशेष एवढ्यातच बाहेरून आणले गेले (नव्याने introduce केले गेले), अशातलीही काही गोष्ट नसावी.
मग मराठी भाषेतच या बारकाव्यांकरिता संज्ञा उपलब्ध का नसाव्यात बरे?
एक समांतर उदाहरण येथे विचारात घेता येईल. (उदाहरण चपखल बसतेच, असा माझा दावा नाही. केवळ एक शक्यता म्हणून विचारात घेता यावे, इतकेच.)
‘मद्याच्या विक्रीचा धंदा करणारा व्यापारी’ अशा अर्थाने ‘कलाल’ असा एक शब्द पार टिळकआगरकरांचा जमान्यापर्यंत सर्रास प्रचलित होता. आजमितीस तो सामान्य वापरात आढळत नाही. (निदान, मी तरी इतक्यात तसा तो ऐकलेला वा वाचलेला नाही; चूभूद्याघ्या.) इतकेच नव्हे, तर त्याऐवजी दुसरी कोठली नवीन मराठी संज्ञासुद्धा माझ्या ऐकण्यात वा वाचनात आलेली नाही.
आता, हा शब्द नेमका कधी लुप्त झाला, हे सांगणे कठीण आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात या शब्दाने दर्शविला जाणारा हा धंदा/व्यापार (निदान महाराष्ट्रात तरी) लुप्त झालेला नाही (पूर्णांशाने तर नाहीच नाही!), एवढे निश्चित.
त्याचप्रमाणे, कदाचित या सर्व व्यक्तिविशेषांकरिता विशिष्ट संज्ञा कधीकाळी मराठीच्या कोठल्यातरी आद्यावतारात अस्तित्वात असू शकतील काय? (मला कल्पना नाही. हे माझे प्रतिपादन नसून माझा सवाल आहे. या संदर्भात काही माहिती मिळू शकल्यास ती वाचायला आवडेल.) कदाचित, कालौघात होणाऱ्या सामाजिक स्थित्यंतरांच्या रेट्यांत, शिष्टसंमततेच्या बदलत्या संकल्पनांतून (मग भले त्या संकल्पना परकीयांच्या प्रभावातून असोत वा स्वयंस्फूर्त असोत), पुढे कधीतरी हे शब्द वा त्यामागील संकल्पना या संभाषणाकरिता वा लिखितव्यवहाराकरिता अशिष्टसंमत म्हणून निषिद्ध ठरून, अवापरात जाऊन लोप पावल्या असाव्यात काय? (याचा अर्थ हे व्यक्तिविशेष वा या लैंगिक वृत्ती मध्यंतरी समाजातून लोप पावल्या, असा अर्थातच नव्हे.)
(‘हे शासन जो भंग करी, तेहाची माय गाढवे *विजे’ यासारखा मजकूर खुल्लमखुल्ला, सचित्र, तथा जाहीर प्रकटनांतून ज्या भाषेतून एके काळी सर्रास होत असे, त्या भाषेत या सर्व बारकाव्यांकरिता विशिष्ट, चपखल संज्ञा कधीच अस्तित्वात नव्हत्या, हे पटत नाही. कसून शोध घेतला पाहिजे.)
या कॅटेगरीतील लोक बोले तो ज्यांचा उल्लेख आम्ही ‘सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर कडकडून चावलेले लोक’ असा करतो, ते. निरुद्योगी खुळचटांचा (सावरकर इन्कलूडेड!) वायझेड (माझ्यासारख्या मराठी-अमेरिकनाने ‘वायझी’ म्हटले पाहिजे खरे तर; परंतु, म्हणणार नाही!) उपद्व्याप आहे सारा!
अर्थात! या मंडळींना (अगदी क्वचित्प्रसंगी आपल्या फँटश्यांमध्ये वगळता) सामाजिक समस्यांच्या अर्थपूर्ण निवारणाकरिता प्रयत्नांत स्वारस्य तसेही कधी होते?
वाळवंट आहे, आणि त्याचे निर्मूलन हे केवळ इष्टच नव्हे, तर आवश्यक आहे, हे ओघाने आले. कसे म्हणाल, तर येनकेनप्रकारेण, हेच त्याला उत्तर आहे.
मला वाटते, या संकल्पनांकरिता मराठीत कधी काळी काही चपखल संज्ञा होत्या काय, हे प्रथम शोधून काढावे. तशा चपखल संज्ञा मराठीत कधी काळी अस्तित्वात असल्यास, त्यांचे पुनरुज्जीवन केल्यास त्या आजमितीस लोकांना कितपत समजतील नि कितपत रुजतील, याचा अंदाज घेऊन प्रथम त्यांना प्राधान्य द्यावे; नपक्षी (बोले तो, अशा संज्ञा अस्तित्वात नसल्यास, किंवा असूनसुद्धा आजमितीस लोकांना त्या समजण्याची वा त्या जनमानसात रुजण्याची फारशी अपेक्षा नसल्यास), इंग्रजीतून वा मराठीभाषकांचा ज्यांच्याशी थोडाफार संबंध येऊ शकतो, अशा समकालीन देशी वा विदेशी भाषांतून जशाच्या तशा वा अपभ्रष्ट रूपात/मराठीकरण करून (बोले तो, technique हा शब्द हिंदीत जेणेकरुन ‘तकनीक’ असा वापरला जातो, आणि त्यावरून त्याची ‘तकनीकी’ वगैरे रूपे जेणेकरुन होतात, किंवा, bore या इंग्रजी शब्दावरून boredomकरिता ‘बोरियत’ असा उर्दू शब्द जेणेकरुन बनतो, तद्वत.) उचलावीत.
अन्यथा, सावरकरी मार्ग आहेच, परंतु, तो फारसा उपयोगाचा नाही. उगाच आपली खाज म्हणून चोखाळायचा, झाले.
असो चालायचेच.
॥ कुंभारू कुलालू । कोणी
नवनाथ स्तुतीमध्ये हा शब्द आलेला आहे. पण त्याचा नक्की अर्थ माहीत नाही. 'कलाल' या शब्दाच्या जवळ जात असल्याने येथे उल्लेख केला.
प्रतिक्रिया आवडली.
‘न’बा, तुमची निरीक्षणे मार्मिक आहेत. धन्यवाद.
“कलाल” हा शब्द माझ्या समजुतीप्रमाणे “दारू गाळणारा” यासाठी वापरत असावेत. पूर्वीच्या काळी तेच लोक दारू विकतही असणार. पुढे दारू (अधिकृतपणे) गाळणारे आणि ती प्रत्यक्ष उपभोक्त्यांना विकणारे लोक वेगळे झाले. पुढे मोठ्या कंपन्या दारू गाळू लागल्या. छोट्या प्रमाणावर दारू गाळणे बेकायदा झाले, त्यामुळे “कलाल” भूमिगत झाले. त्यामुळे तो शब्द मागे पडला असावा.
माझ्या वाचनात आलेल्या जुन्या मराठी साहित्यात (उदा. “माझा उत्तरेकडील प्रवास”) LGBTQ+ शी समांतर शब्द फारसे दिसले नाहीत. “स्त्रैण”, “हिजडा” व्यतिरिक्त. तुकारामाच्या गाथेत रोकठोक लिंगविषयक शब्द पुष्कळ आहेत (“*वे आपुली आई” असे थेट विठ्ठलाबद्दलही ह्मटलेले आहे!) पण LGBTQ+ शब्द मला दिसले नाहीत. अर्थातच माझे वाचन फारच मर्यादित आहे. पण इतरांच्या वाचनात ते आले असल्यास तसे शब्द समजून घ्यायला आवडेल.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
त्यामुळे “कलाल” भूमिगत झाले
माझ्या गावचे सगळे कलाल आजही दारूगाळपाच्या, बिअर आणि वाईन शॉपीच्या धंद्यात आहेत. अतिझिंगलेल्या नागमोडी चालणाऱ्यांना आजही 'कलालाकडं गेल्तास काय' असं विचारलं जातं. त्यामुळे हा शब्द पारच विस्मृतीत गेलेला नाही.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मत दर्जा हिन च असणार तरी वाचा
मुळात भाषेचे उद्येश च संवाद साधणे हा आहे.
अगदी खाना खुणा, हाव,भाव,विविध आवाज येथून सुरू झालेला प्रवास मूळ अक्षर निर्माण होवून लीहण्या पर्यंत पोचला.
लेखन करण्याचा उध्येष पण संवाद साधने च आहे
भाषेचा हा मूळ उद्येष अजून पण तोच आहे त्या मध्ये बदल झालेला नाही ना पुढे होईल .
फक्त भाषा बदलत जातील.
पण बाकी परिणाम पण भाषेचे आहेत.
भाषा ही अस्मिता जागृत करते.एक भाषिक लोकांची अस्मिता भाषा निर्माण करते.
महाराष्ट्रात मध्ये ज्याला मराठी ची अस्मिता असते तोच व्यक्ती दिल्ली मध्ये गेला की ती अस्मिता नष्ट होते मग तिथे हिंदी स्वतःच बोलली जाते.
संवाद साधणे हे महत्वाचे असते.
अस्मिता आली की ही भाषा श्रेष्ठ ही कनिष्ठ हे ओघाने आलेच.
नवीन गोष्टी निर्माण होतात ज्या पहिल्या अस्तित्वात नसतात त्या मुळे त्यांच्या साठी शब्द नसतात.
जेव्हा नवीन निर्माण होते त्या प्रमाणे त्या गोष्टींना ओळख देण्यासाठी शब्द पण तयार होतात.
काही ना तर शब्दात ओळख देता येत नाही तिथे शब्द समूह वापरले जातात.
हे सर्व च भाषेत होते.
पण ह्या नवीन वस्तू, किंवा नवीन भावना समाजाला किती महत्वाच्या वाटतात त्या वर त्यांच्या साठी खास शब्द निर्माण होणे depend असते.
Gender साठी विविध शब्द असावेत असे समाजाला वाटत नसेल तर नवीन शब्द निर्माण होण्याची शक्यता पण कमी असते
एकाच शब्दात सर्व gender समाविष्ट केले जातात.(जे समाजाने स्वीकारले नाहीत ते gender)
तयार करा की योग्य शब्द !
या लेखात ज्या ज्या ईतर भाषेतुन आलेल्या संज्ञांसाठी शब्द मराठी भाषेत नाही असे जर वाटत असेल तर ते बनवायला काय हरकत आहे ? असे शन्द बनले नाहीत याचे प्रमुख कारण आपण मूळ इंग्रजी शब्द वापरण्याला प्राधान्य दिले. आणि आता ते रुढ झाल्याने आपण ते फ़ारसा विचार न करता सर्रास वापरतो. जरा प्रय्त्नं केले तर असे शब्द बनवतात आणि ते रुढ पण होतात.
लेखात सावरकरी मार्गाबद्दल जरासा हेटाळणीपूर्वक उल्लेख आहे. पण जेंव्हा मेयर या शब्दाला प्रतिशब्द उपलब्ध नव्हता तेंव्हा सावरकरांनीच महापौर हा शब्द प्रचलित केला. आणि आज तोच वापरला जातो. असा प्रयत्नं होणे गरजेचे आहे.
दुसरे असे की जेंव्हा अश्या काही गोष्टी भाषेत संमिलीत कराव्या लागतात तेंव्हा मूळ शब्दांचे देशीकरण किंवा मूळ शब्द थोडेसे मराठीकरणाची प्र्क्रिया करुन वापरले तर वाईत नाही.
शास्त्रीय गोष्टींबद्दल आपल्या कडे सगळ्या गोष्टींना प्रतिशब्द नाहीत ही वस्तूस्थिती आहे. पण त्याचे कारण शिक्षणाचे सरकारीकरण झाल्यावर क्लिष्ट प्रतिशब्द आणले गेले. आणि ईतर कोणी त्यांना सोपे पर्याय सूचवले नाहीत. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली. एकुण जरुरी संपल्यावर ते शब्द विसरण्यातच लोकांना धन्य वाटायला लागले.
हे झाले परभाषेतुन आलेल्या संकल्पना, गोष्टींबद्दल. पण मराठी वाहिन्या आणि वर्तमान पत्रांतुन रोज मराठी शब्दांची मोड तोड होत असते. उगीचच अर्थहीन मराठी रुढ होतात.
एक उदाहरण आहे : स्पष्टता . इंग्रजी ’क्लॅरिटी ’ ला प्रतिशब्द म्हणुन हा वापरला जातो. पण माझ्या मते मराठी/हिंदी मधे असा कुठलाच शब्द नाही.
स्पष्टीकरण हा शब्द आहे. पण याला चांगले प्रतिशब्द आहेत पण ते लोकांना वापरण्य़ात रस वाटत नाही.
भाषा का भाषिक?
मतांबद्दल माझं काही मत नाही. पण निरीक्षणांबद्दल काही मत.
मराठीत काही नामं नाहीत याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही. 'न'बांनी त्याबद्दल पुरेसं लिहिलेलं आहेच. मला त्रास होतो तो मराठी भाषिकांचा; त्यातही स्वतःला पुरोगामी, उदारमतवादी वगैरे म्हणवणाऱ्या लोकांचा. अशांपैकी काही लोकांचे लेख ऐसीवर प्रकाशनासाठीही येतात, काही प्रकाशित होतात.
यांतल्या भाषेत सामान्य व्यक्ती पुरुषच असते, अशा प्रकारे भाषावापर असतो. याबद्दल संपादक आणि/किंवा मुद्रितशोधक म्हणून सुधारणा सुचवावी तर त्यावर "प्रमाण भाषा अशीच आहे; ती तुला बदलायची आहे का" छापाची उत्तरं उदारमतवादी वा पुरोगामी समजल्या जाणाऱ्या लोकांकडून मिळतात. एरवी खालच्या जातींतले, कष्टकरी, नाही-रे वर्गातल्या लोकांच्या बाजूनं बोलणाऱ्या लोकांना हे प्रश्न, आक्षेप दखलपात्र आहेत असं वाटतही नाही. हे असे अनुभव किती तरी वर्षं घेऊन झाले आहेत. वर त्यावर काही म्हणावं तर त्याबद्दल कामं बोलणारीच्या गळ्यातच पडतात - म्हणजे पुरुष जबाबदारी टाकून 'इदं न मम' म्हणायला मोकळे.
हे सगळं लिहिलंय ते भकास भाषा वापरणाऱ्या फेसबुकी वा टीव्हीय लोकांचं वर्णन नाही. एरवी मुद्रितशोधनं, संपादनं करणाऱ्या, भाषेबद्दल प्रेमानं चर्चा करणाऱ्या लोकांचं वर्णन आहे.
मला वाटत नाही ही भाषेची अडचण आहे. मराठी भाषिकच कोते असतील तर भाषा कशी बदलणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कढ
प्रेम, आस्था, तळमळ, मग उदासीनता, आणि नैराश्य या सगळ्या कलांतून जाऊन मी आता दुर्लक्ष या कलेत स्थिरावलो आहे.
मराठी माध्यमात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं, माझं कुटुंब मराठी बोलतं या माझ्या हाताबाहेरच्या गोष्टींमुळे कढ काढण्याइतपत माझ्यात भाषेबद्दल आत्मीयता तयार झाली. सध्या सलील वाघ ज्या पोटतिडीकेने मराठी भाषिक व्यवहारांबद्दल बोलत असतो तशी मनस्थिती मी गेली काही वर्षे बाळगली आणि शेवटी 'जाऊ दे सोड' म्हणून शांत झालो.
मराठी खपली काय, सुधारली काय, बदलली काय, सगळंच इतकं गुंतागुंतीचे आणि मल्टिप्रवाही आहे की ते उकलत बसून त्यावर रवंथ करणे मला अशक्य आहे.
जाता जाता : भारतीय भाषांबद्दल : लिंगाचे भाषिक परिणाम आणि समाजधारणांचा भाषिक लिंगांवर वर होणारा परिणाम यावर एक छोटेखानी पण मस्त व्हिडीओ पाहिला. तो शेअर करत आहे - सामायिक करत आहे - किंवा देत आहे
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
भाषे ची मजा तीचे पूर्ण ज्ञान असल्या वर च मिळते
एक सत्तर वर्ष पूर्वीचे मराठी शब्द आताच्या पिढीला समजतील का?
जुन्या मराठी गाण्यांचा त्यांना अर्थ तरी समजेल का हीच खरी चिंता.
"मी मुक्त मोरीनी बाई चांदण्यात न्याहाते."
ह्या वाक्यातील नाहते ह्या शब्दाचा अर्थ तरी आज
च्या पिढीला माहीत असेल का.
" जान चली जाये तो जिया नहीं जाय जिया जाये तो फिर जिया नहीं जाय."
ह्या मध्ये प्रत्येक जिया चा अर्थ वेगळा आहे.
ज्याला हिंदी चे सखोल ज्ञान आहे तोच ह्या ओळीचे सौंदर्य समजू शकतो.
मराठी भाषा ही संस्कृतोद्भव
मराठी भाषा ही संस्कृतोद्भव आहे असे समजले जाते. तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू शकत नाहीये?
अभिजात भाषा असण्यासाठी कोणते निकष आहेत?
प्रगत भाषा ती, जी नविन संकल्पनांना सामवून घेऊ शकते, आणि काळाबरोबर बदलत जाते. मला वाटते मराठी भाषा ही सर्वदृष्टीने संपन्न आहे. मराठीचे वापरकर्ते जर चूकीच्या पद्धतीने तिचा वापर करत असतील तर तो भाषेचा दोष नाही.
भाषेची तुलना करायची तर समाज रचनेची देखिल दखल घेणे जरूरीचे आहे. त्यामुळे दुसऱ्या भाषेत असणाऱ्या शब्दांचे समान अर्थी शब्द मराठीत नाहीत म्हणून ती अप्रगत असे मानण्याचे कारण नाही. जुन्या काळात जे अस्तित्वातच नव्हते, त्या करता मराठी शब्द नसणे यात नवल नाही. पण नविन चपखल शब्द शोधून, त्याचा वापर करून ते रूढ करण्या करता भरपूर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसे फारसे घडताना दिसत नाही हे मात्र खरे. हल्लीच्या वेगवान काळात, जे सोयिस्कर आहे, ते स्विकारणे हा धर्म झालेला आहे. जे शब्द माहिती आहेत, वापरात आहेत त्याला प्रतिशब्द शोधण्याचे आणि ते वापरण्याचे कष्ट कुणी घेताना दिसत नाही, यात काही दुमत नाही.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
अभिजात भाषा
"मराठी भाषा ही संस्कृतोद्भव आहे असे समजले जाते."
दुसऱ्या भाषेतून उद्भवणारी भाषा अभिजात कशी होऊ शकेल? अभिजात भाषा "स्वयंभू" असायला नको का? किंबहुना, जर एक भाषा दुसरीतून शब्द घेत असेल तर ती दुसरी भाषा अभिजात असण्याची शक्यता असते. पहिली नव्हे!
मुद्दलात "अभिजात भाषा" (classical language) ही कल्पनाच आपण पाश्चात्यांकडून आयात केलेली आहे. त्या व्याख्येनुसार, जागतिक पातळीवर फक्त खालील भाषा अभिजात मानल्या जाऊ शकतात:
चिनी,
लॅटिन,
ग्रीक,
संस्कृत आणि
अरेबिक
माझ्या समजुतीनुसार:
१. भारतापुरते पहायचे तर संस्कृतव्यतिरिक्त पाली आणि तमिळ या भाषा अभिजात मानता येतील.
२. कन्नड, मल्याळम आणि उड़िया (ओरिया) या भाषांना शास्त्रबाह्य (राजकीय) कारणांसाठी अभिजात भाषांचा दर्जा भारत सरकारने दिला. पण निदान त्या भाषांमधील सर्वात जुने साहित्य इ. स. १००० पूर्वीचे तरी आहे. मराठीतील सर्वात जुने उपलब्ध साहित्य त्यापेक्षा बरेच अर्वाचीन आहे. मराठीस तो दर्जा दिला तर इतर अनेक प्रांतांच्या भाषांनाही तो द्यावा लागेल, मग त्या अभिनामाचे काही महत्त्वच उरणार नाही!
३. आणि सद्यस्थितीत खरे म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारकडून मिळण्याचा एकमेव फायदा ह्मणजे भाषेच्या विकासासाठी निधी मिळतो हा आहे. केंद्र सरकारकडे फद्या नाही, आणि निधी मिळालाच तर तो कोणत्या पद्धतीने वापरला जाणार हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या मोहिमेचे सूत्रधार त्या निधीचे संभाव्य लाभार्थीच आहेत असे मला वाटते.
४. सध्याच्या इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, आणि जॅपनीज इत्यादि, आणि आपल्या जवळच्या हिंदी, उर्दू आदि भाषा सुद्धा अभिजात बिल्कुल मानल्या जात नाहीत, आणि त्यावाचून त्यांचे काहीही अडत नाही!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
प्रश्न
मुद्दा रोचक आहे. परंतु मग त्याच टोकनाने जर जायचे झाले, तर मग संस्कृत तरी ‘अभिजात’ (व्हॉटेव्हर दॅट मे मीन) कशी?
मुद्दा समजला नाही.
तुलनेने अर्वाचीन संस्कृत आणि ऋग्वेदकालीन संस्कृत यांतला भेद तुह्मी अधोरेखित करत आहात का?
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
हो, किंवा त्याहीपेक्षा कदाचित…
…all the way up to (the theorized) PIE, वगैरे?
स्वयंभू शब्द चुकला
समजले. धन्यवाद.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
मराठी अभिजात भाषा
ह्या विषयाला अनुसरून 'भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ' हा लेख मी २०१२ साली येथेच लिहिला होता. तोहि पुन: पाहण्यात यावा.
लेख आवडला
तुमचा लेख, त्यातील संदर्भ आणि लेखावरील प्रतिक्रिया वाचून बरेच प्रबोधन झाले. धन्यवाद!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
थोर स्त्रिया, LGBTQ
"जुन्या काळात जे अस्तित्वातच नव्हते, त्या करता मराठी शब्द नसणे यात नवल नाही."
थोर स्त्रिया आणि LGBTQ+ लोक जुन्या काळी अस्तित्वातच नव्हते असे आपणांस ह्मणायचे आहे का?
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
३०० वर्षाहून अधिक मागे
३०० वर्षाहून अधिक मागे लिहीलेल्या 'शिवलीलामृत' ग्रंथामध्ये २ पात्रे गे/ट्रान्स सेक्श्युअल् दाखवलेली आहेत. उल्लेख आहे. म्हणजे पुरुष, स्त्री चे कपडे घालून, पुरुषाकडे शरीरसुखाची मागणी करतो वगैरे. आता त्याला गे म्हणतात की ट्रान्स सेक्श्युअल की अन्य काही माहीत नाही. माहीत नाही म्हणजे - जेंडर युनिकॉर्न - https://www.courts.ca.gov/documents/BTB25-5I-01.pdf फार क्लिष्ट आहे. माझा, त्याचा अभ्यास नाही.
ग्लोरिया स्टायनम उवाच
(स्ट्रेट) पुरुषांनी काहीही केलं की ते थोर असतं, माहीत नाही का तुम्हाला?
If Men Could Menstruate
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होय या लेखाबद्दल पहील्यांदा
होय या लेखाबद्दल पहील्यांदा तुझ्याकडुन ऐकलं/वाचलं. नंतर खूप वर्षांनी लेख ॲक्च्युअल पुस्तकात वाचावयास मिळाला. आवडला.
विज्ञान च्या सर्व शाखेतील
शिक्षण हे फक्त मराठी मध्ये देण्यास मराठी सक्षम हवी
आधुनिक विज्ञान च कोणताही ही विषय मराठी मध्ये शिकवता आला पाहिजे.
LGBT हा काही ज्वलंत प्रश्न नाही.
लोक अजून राई चे तेल स्वीकारत नाहीत तिरस्कार करतात.
LGBT कुठे स्वीकारणार .
लोकांना जबरदस्ती नी तुम्ही हे स्विकराच असे सांगणे हा फालतू पणा आहे.
पुरुषांना पण विनय असतो आणि त्यांचा पण विनयभंग होतो
कोणी पुरुषाने दुसऱ्या पुरुषाला चुकीचा स्पर्श केला, त्याला सेक्स साठी उत्तेजीत करण्याचा प्रयत्न केले तर हा गंभीर गुन्हा असावा आणि त्या साठी मरे पर्यंत फाशी ही शिक्षा असावी.
पुरुष काही बेवारस नाही.
नाही मला असे म्हणायचे नाही.
नाही मला असे म्हणायचे नाही.
थोर स्त्रिया या करता मराठीत शब्द आहेत. महापुरुष ला समानार्थी महान नारी किंवा नारीरत्न असे काही म्हणता येते.
आदरणीय, सन्माननीय, तीर्थरूप आदी शब्द स्त्री, पुरूष दोहोंकरता वापरता येतात्.
मराठी मधे आदीमाया, विदुषी, पंडिता हे शब्द आहेत.
विद्वान शब्द स्रीयांकरता वापरता येऊ शकतो.
'समलिंगी संबध असणारी व्यक्ती' असा शब्द समुचय वापरला जातो. तो अर्थाच्या दृष्टीने जास्त अचूक आहे.
तसेच उभयलिंगी सबंध असणारी व्यक्ती असा शब्द समुचय आहे.
एकच एक सुटसुटीत शब्द नाही (किंवा माहिती नाही) हे खरे आहे. पण मराठी शब्द योजना जास्त अचूक आहे.
पूर्वीच्या काळी, राणी महालामधे खोजे तैनातीत असत तर तमाशात नाचे असत. अजूनही काही शब्द आहेतच की...
सांगायचा मुद्दा म्हणजे, मराठी भाषेत LGBTQ+ साठी शब्द योजना आहेत, आणि जास्त अचूक आहेत. ज्या देशात खजुराहो, वात्स्यायन आणि कामसूत्र, आहेत -- तिथे या संबधीत शब्दांची वानवा नाही. परंतु प्रचलीत जे आहे तेच स्वीकारायची मानवी वृत्ती आहे, त्या मूळे मराठी शब्द वापरले जात नाहीत इतकेच.
माहिती नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
अस्तित्वात नसलेल्या गोष्टी म्हणजे अधुनिक वैद्न्यानिक शोधातून अस्तित्वात आलेल्या, किवा भारत देशाच्या बाहेरून आलेल्या. त्या साठी नविन मराठी शब्द योजना केली गेली पाहिजे, ते अशक्य किंवा कठीण नाही.
अभिजात म्हणजे स्वयंभू हे माहिती नव्हते.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही.
मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. किंवा असे म्हणूया कि भाषिक तज्ज्ञांचा एक मोठा गट तसे मानत नाही. मराठी भाषा इतर दक्षिणी प्राकृत भाषेतून निर्माण झाली आणि त्या भांषांबरोबर विकसित होत राहिली. पूढे या सगळ्या भाषांच्या सम्मचयातून संस्कृत निर्माण झाली. संस्कृत याचा अर्थच संस्करण केलेली (edited ) असा होतो. अर्थात त्या वेळी मराठी किंवा इतर दक्षिणी भाषा या आत्ता सारख्या नव्हत्या. त्यांचे रूप वेगळे होते. मग परत कधीतरी उलटा प्रवाह येऊनसंस्कृत मधील अनेक शब्द मराठीत आले. आपण साधारण हजार वर्षांचा कालावधी बघत आहोत.
भाषा एका रेषेत (in linear manner) विकसित होत नाहीत. त्या एकमेकांकडून शिकत मोठया होतात. माझ्या मते ज्या भाषेचा शिकण्याचा आवाका आणि इच्छा अधिक, आणि जी जेत्यांची भाषा तिचे दिवस चांगले असतात. कोण कुठून उद्भवली हे अभिजाततेचा निकष होऊ शकत नाही
खात्री वाटत नाही
संस्कृत ह्मणजे cultivated हे खरे, पण तो अर्थ शब्दश: घेता येईल का, किंवा त्या भाषेच्या जननप्रक्रियेचे यथार्थ वर्णन करणारा शब्द ह्मणून वापरतां येईल का, याबद्दल मला शंका वाटते. तसे ह्मणायचे तर लॅटिन, ग्रीक याही “संस्कृत” मानावयास हव्यात. तेंव्हा “संस्कृत” हे विशेषण किंवा भाववाचक नाम नव्हे, तर विशेषनाम आहे असे गृहीत धरून पुढे जाऊया. ऋग्वेदकालीन संस्कृत ही खात्रीलायकरित्या, वायव्येकडून जंबुद्वीपात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेल्या लोकसमूहाची भाषा होती, आणि तिचे मूळ PIE होते, हे आजकाल निर्विवाद मानले जाते - त्यासंबंधीचे शास्त्रीय पुरावे बळकट आहेत. तुह्मी ह्मणता तशी दक्षिणी प्राकृत आणि तत्सम पुरातन जंबुद्वीपीय भाषांतून संस्कृत जन्मली हे खरे असेल, तर the burden of proof will be enormous. आणि माझ्या वाचनात तरी तसे सबळ पुरावे आलेले नाहीत. तुह्माला ते उपलब्ध असतील, तर जरूर कळवा. धन्यवाद.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
प्रमाण मराठी?
सतत ह-मणजे वाचून वाचून आता डोळ्यांना त्रास व्हायला लागला आहे. बाकीची भाषा वगैरे असो, किमान माझ्यासारख्या लोकांवर कमी अत्याचार म्हणून तरी हमणून, हमणजे वगैरे लिहिणं बंद कराल तर बरं होईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
ब्राह्मण ब्रह्म जाणतो. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण.
ब्रह्मदेशातल्या ब्राह्मणाच्या ब्रह्मांडात ब्रह्मघोटाळा. ब्राह्मीतील ब्रह्मज्ञान. ब्रह्मास्त्र.
(हा वाय्हातपणा आहे यात गुय्ह असे काहीच नाही. मला जे असय्ह होते ते निममबाय्ह ठरवून अग्राय्ह करावे काय?)
जाहीर करण्यात येते की संपादक
जाहीर करण्यात येते की संपादक महोदया, आदरणीय मा. ना. अदितीतैंच्या विनंतीस मान देऊन “ह्म” हे जोडाक्षर यापुढे “म्ह” असे लिहिण्यात येईल!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
पहिल्यांदा घाईघाईत ढोबळ आणि
पहिल्यांदा घाईघाईत ढोबळ आणि थोडीशी चुकीची माहिती लिहिल्याबद्दल क्षमस्व. ऑफिसच्या कामाच्या वेळी दुसरे काम काढून लिहीत बसले की असे होते. काहीच धड होत नाही. असो.
मला असे वाटते इथे दोन मुद्दे वादग्रस्त वाटत आहेत. १) संस्कृत कशी निर्माण झाली? २) मराठी कशी निर्माण झाली? मी काही या विषयात तज्ज्ञ नाही. हा माझा आवडीचा विषय आहे म्हणून वाचं करते. त्यामुळे मला जी माहिती आहे ती इथे मांडते. मला आणि माझ्या माहितीला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
संस्कृत कशी निर्माण झाली हा मुद्दा गेल्या दोन दशकात पुन्हा चर्चिला जातो आहे. माचीवरच्या बुधा म्हणतात तसे संस्कृत PIE (Proto Indo- European) आहे असे बहुतेक तज्ञ मानतात. पण मुळात PIE हे एक भाषा नव्हती. तो एक भाषा समूह होता. यात संस्कृत सह अनेक प्राकृत भाषा होत्या. वैदिक संस्कृत हे एक बोली भाषा होती. तिला त्या वेळी वैदिक संस्कृत असे नावही नव्हते. इतर भाषा भगिनींकडून शब्द व्याकरण यांची देवाण घेवाण करून अभिजात संस्कृत तयार झाली. त्यामुळे संस्कृत या विशेष नामातच ती कशी तयार झाली याचा दाखला आहे. विकिपेडियाला बोलावणे घातले तर हे वाचायला पण मिळते: Prākṛta literally means "natural", as opposed to saṃskṛta, which literally means "constructed" or "refined".[4] Prakrits were considered the regional spoken (informal) languages of people, and Sanskrit was considered the standardized (formal) language used for literary, official and religious purposes.
साधारण वैदिक संस्कृत कालखंड (1500-500 BCE), अभिजात संस्कृत कालखंड (200 CE to 1300 CE). वैदिक संस्कृतच्या भाषा भगिनींचे अनेक दाखले सापडतात. उदाहरणार्थ पैशाची. या भाषा पुढे प्राकृत म्हणून गणल्या गेल्या. त्यामुळे दक्षिणी प्राकृत भाषा हा माझा संदर्भ बरोबर नाही. एकूण प्राकृत भाषा असे लिहिले पाहिजे.
आता अभिजात संस्कृत भाषा अभिजात कशी झाली हे एक political process आहे. मुळात हे भाषाच लिखित कशी झाली ही पण एक political process आहे. पण तो वेगळा मुद्दा.
दुसरा मुद्दा म्हणजे मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे का? साधारणपणे १९२० ते १९५० च्या सुमारासचे संशोधन मराठी भाषा संस्कृत मधून निर्माण झाली या विचाराने घडले. ब्राह्मणांना हा सोयीचा आणि अभिमानाचा वाटणारा मुद्दा असल्यामुळे ते अभिजात जनमताच्या पचनी पडले. पण १९८०च्या दशकात मराठी भाईचे इतर प्राकृत भाषेत आणि इतर द्राविडी भाषांत मूळ शोधणारे संशोधन झाले. विश्वनाथ खैर्यांनी त्यांच्या 'मराठी भाषेचे मूळ' या ग्रंथात मराठी भाषेचे तामिळ आणि इतर द्राविडी भाषांबरोबरचे organic नाते दाखवले. काहींनी मराठी हि creolization आणि pidginization ची देण आहे हे दाखवले. तुळपुळ्यांनी मराठी भाषेची आई खरे तर या प्रदेशात रूढअसलेली अपभ्रंश भाषा आहे असे म्हटले आहे (Apabhramsha language, literary language of the final phase of the Middle Indo-Aryan languages. When the Prakrit languages were formalized by literary use, their variations came to be known as Apabhramsha. Despite this close relationship, scholars generally treat Apabhramsha and the nonliterary Prakrits separately. Source: https://www.britannica.com ).
मी जे मुद्दे मांडले त्यावरचे काही नवीन संशोधन इथे आहे. विश्वनाथ खैरे आणि डॉ. तुळपुळे वाचावेतच.
KULKARNI-JOSHI, S. (2012). LANGUAGE CONTACT AND THE PIDGIN ORIGIN OF MARATHI: ANOTHER LOOK AT ARGUMENTS AND EVIDENCE. Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 72/73, 353–366. http://www.jstor.org/stable/43610712
KULKARNI-JOSHI, S. (2015). TOWARDS EXPLAINING THE DRAVIDIAN ELEMENT IN MARATHI. Bulletin of the Deccan College Research Institute, 75, 173–184. http://www.jstor.org/stable/26264734
Junghare, I. (2009). SYNTACTIC CONVERGENCE: MARATHI AND DRAVIDIAN.
पहिल्यांदा घाईघाईत ढोबळ आणि
पहिल्यांदा घाईघाईत ढोबळ आणि थोडीशी चुकीची माहिती लिहिल्याबद्दल क्षमस्व. ऑफिसच्या कामाच्या वेळी दुसरे काम काढून लिहीत बसले की असे होते. काहीच धड होत नाही. असो.
मला असे वाटते इथे दोन मुद्दे वादग्रस्त वाटत आहेत. १) संस्कृत कशी निर्माण झाली? २) मराठी कशी निर्माण झाली? मी काही या विषयात तज्ज्ञ नाही. हा माझा आवडीचा विषय आहे म्हणून वाचं करते. त्यामुळे मला जी माहिती आहे ती इथे मांडते. मला आणि माझ्या माहितीला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
संस्कृत कशी निर्माण झाली हा मुद्दा गेल्या दोन दशकात पुन्हा चर्चिला जातो आहे. माचीवरच्या बुधा म्हणतात तसे संस्कृत PIE (Proto Indo- European) आहे असे बहुतेक तज्ञ मानतात. पण मुळात PIE हे एक भाषा नव्हती. तो एक भाषा समूह होता. यात संस्कृत सह अनेक प्राकृत भाषा होत्या. वैदिक संस्कृत हे एक बोली भाषा होती. तिला त्या वेळी वैदिक संस्कृत असे नावही नव्हते. इतर भाषा भगिनींकडून शब्द व्याकरण यांची देवाण घेवाण करून अभिजात संस्कृत तयार झाली. त्यामुळे संस्कृत या विशेष नामातच ती कशी तयार झाली याचा दाखला आहे. विकिपेडियाला बोलावणे घातले तर हे वाचायला पण मिळते: Prākṛta literally means "natural", as opposed to saṃskṛta, which literally means "constructed" or "refined".[4] Prakrits were considered the regional spoken (informal) languages of people, and Sanskrit was considered the standardized (formal) language used for literary, official and religious purposes.
साधारण वैदिक संस्कृत कालखंड (1500-500 BCE), अभिजात संस्कृत कालखंड (200 CE to 1300 CE). वैदिक संस्कृतच्या भाषा भगिनींचे अनेक दाखले सापडतात. उदाहरणार्थ पैशाची. या भाषा पुढे प्राकृत म्हणून गणल्या गेल्या. त्यामुळे दक्षिणी प्राकृत भाषा हा माझा संदर्भ बरोबर नाही. एकूण प्राकृत भाषा असे लिहिले पाहिजे.
आता अभिजात संस्कृत भाषा अभिजात कशी झाली हे एक political process आहे. मुळात हे भाषाच लिखित कशी झाली ही पण एक political process आहे. पण तो वेगळा मुद्दा.
दुसरा मुद्दा म्हणजे मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे का? साधारणपणे १९२० ते १९५० च्या सुमारासचे संशोधन मराठी भाषा संस्कृत मधून निर्माण झाली या विचाराने घडले. ब्राह्मणांना हा सोयीचा आणि अभिमानाचा वाटणारा मुद्दा असल्यामुळे ते अभिजात जनमताच्या पचनी पडले. पण १९८०च्या दशकात मराठी भाईचे इतर प्राकृत भाषेत आणि इतर द्राविडी भाषांत मूळ शोधणारे संशोधन झाले. विश्वनाथ खैर्यांनी त्यांच्या 'मराठी भाषेचे मूळ' या ग्रंथात मराठी भाषेचे तामिळ आणि इतर द्राविडी भाषांबरोबरचे organic नाते दाखवले. काहींनी मराठी हि creolization आणि pidginization ची देण आहे हे दाखवले. तुळपुळ्यांनी मराठी भाषेची आई खरे तर या प्रदेशात रूढअसलेली अपभ्रंश भाषा आहे असे म्हटले आहे (Apabhramsha language, literary language of the final phase of the Middle Indo-Aryan languages. When the Prakrit languages were formalized by literary use, their variations came to be known as Apabhramsha. Despite this close relationship, scholars generally treat Apabhramsha and the nonliterary Prakrits separately. Source: https://www.britannica.com ).
मी जे मुद्दे मांडले त्यावरचे काही नवीन संशोधन इथे आहे. विश्वनाथ खैरे आणि डॉ. तुळपुळे वाचावेतच.
KULKARNI-JOSHI, S. (2012). LANGUAGE CONTACT AND THE PIDGIN ORIGIN OF MARATHI: ANOTHER LOOK AT ARGUMENTS AND EVIDENCE. Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 72/73, 353–366. http://www.jstor.org/stable/43610712
KULKARNI-JOSHI, S. (2015). TOWARDS EXPLAINING THE DRAVIDIAN ELEMENT IN MARATHI. Bulletin of the Deccan College Research Institute, 75, 173–184. http://www.jstor.org/stable/26264734
Junghare, I. (2009). SYNTACTIC CONVERGENCE: MARATHI AND DRAVIDIAN.
भाषेचे मूळ
पहिल्यांदा घाईघाईत ढोबळ आणि थोडीशी चुकीची माहिती लिहिल्याबद्दल क्षमस्व. ऑफिसच्या कामाच्या वेळी दुसरे काम काढून लिहीत बसले की असे होते. काहीच धड होत नाही. असो.
मला असे वाटते इथे दोन मुद्दे वादग्रस्त वाटत आहेत. १) संस्कृत कशी निर्माण झाली? २) मराठी कशी निर्माण झाली? मी काही या विषयात तज्ज्ञ नाही. हा माझा आवडीचा विषय आहे म्हणून वाचं करते. त्यामुळे मला जी माहिती आहे ती इथे मांडते. मला आणि माझ्या माहितीला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
संस्कृत कशी निर्माण झाली हा मुद्दा गेल्या दोन दशकात पुन्हा चर्चिला जातो आहे. माचीवरच्या बुधा म्हणतात तसे संस्कृत PIE (Proto Indo- European) आहे असे बहुतेक तज्ञ मानतात. पण मुळात PIE हे एक भाषा नव्हती. तो एक भाषा समूह होता. यात संस्कृत सह अनेक प्राकृत भाषा होत्या. वैदिक संस्कृत हे एक बोली भाषा होती. तिला त्या वेळी वैदिक संस्कृत असे नावही नव्हते. इतर भाषा भगिनींकडून शब्द व्याकरण यांची देवाण घेवाण करून अभिजात संस्कृत तयार झाली. त्यामुळे संस्कृत या विशेष नामातच ती कशी तयार झाली याचा दाखला आहे. विकिपेडियाला बोलावणे घातले तर हे वाचायला पण मिळते: Prākṛta literally means "natural", as opposed to saṃskṛta, which literally means "constructed" or "refined".[4] Prakrits were considered the regional spoken (informal) languages of people, and Sanskrit was considered the standardized (formal) language used for literary, official and religious purposes.
साधारण वैदिक संस्कृत कालखंड (1500-500 BCE), अभिजात संस्कृत कालखंड (200 CE to 1300 CE). वैदिक संस्कृतच्या भाषा भगिनींचे अनेक दाखले सापडतात. उदाहरणार्थ पैशाची. या भाषा पुढे प्राकृत म्हणून गणल्या गेल्या. त्यामुळे दक्षिणी प्राकृत भाषा हा माझा संदर्भ बरोबर नाही. एकूण प्राकृत भाषा असे लिहिले पाहिजे.
आता अभिजात संस्कृत भाषा अभिजात कशी झाली हे एक political process आहे. मुळात हे भाषाच लिखित कशी झाली ही पण एक political process आहे. पण तो वेगळा मुद्दा.
दुसरा मुद्दा म्हणजे मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे का? साधारणपणे १९२० ते १९५० च्या सुमारासचे संशोधन मराठी भाषा संस्कृत मधून निर्माण झाली या विचाराने घडले. ब्राह्मणांना हा सोयीचा आणि अभिमानाचा वाटणारा मुद्दा असल्यामुळे ते अभिजात जनमताच्या पचनी पडले. पण १९८०च्या दशकात मराठी भाईचे इतर प्राकृत भाषेत आणि इतर द्राविडी भाषांत मूळ शोधणारे संशोधन झाले. विश्वनाथ खैर्यांनी त्यांच्या 'मराठी भाषेचे मूळ' या ग्रंथात मराठी भाषेचे तामिळ आणि इतर द्राविडी भाषांबरोबरचे organic नाते दाखवले. काहींनी मराठी हि creolization आणि pidginization ची देण आहे हे दाखवले. तुळपुळ्यांनी मराठी भाषेची आई खरे तर या प्रदेशात रूढअसलेली अपभ्रंश भाषा आहे असे म्हटले आहे (Apabhramsha language, literary language of the final phase of the Middle Indo-Aryan languages. When the Prakrit languages were formalized by literary use, their variations came to be known as Apabhramsha. Despite this close relationship, scholars generally treat Apabhramsha and the nonliterary Prakrits separately. Source: https://www.britannica.com ).
मी जे मुद्दे मांडले त्यावरचे काही नवीन संशोधन इथे आहे. विश्वनाथ खैरे आणि डॉ. तुळपुळे वाचावेतच.
KULKARNI-JOSHI, S. (2012). LANGUAGE CONTACT AND THE PIDGIN ORIGIN OF MARATHI: ANOTHER LOOK AT ARGUMENTS AND EVIDENCE. Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 72/73, 353–366. http://www.jstor.org/stable/43610712
KULKARNI-JOSHI, S. (2015). TOWARDS EXPLAINING THE DRAVIDIAN ELEMENT IN MARATHI. Bulletin of the Deccan College Research Institute, 75, 173–184. http://www.jstor.org/stable/26264734
Junghare, I. (2009). SYNTACTIC CONVERGENCE: MARATHI AND DRAVIDIAN.
मराठी भाषा इतर दक्षिणी
मराठी भाषा इतर दक्षिणी प्राकृत भाषेतून निर्माण झाली आणि त्या भांषांबरोबर विकसित होत राहिली. पूढे या सगळ्या भाषांच्या सम्मचयातून संस्कृत निर्माण झाली
संस्कृत भाषेतील ग्रंथरचना, काव्य इत्यादी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. मराठी भाषेत इतक्या प्राचिन काळातील ग्रंथ, साहित्य अस्तित्वात आहे का?
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
आपण केलेली निरीक्षणे चांगली आहेत.
तुम्ही मांडलेली निरीक्षणे अफलातून आहेत. बरेच शब्द पुरुष या अक्षरसमूहाला परस्परपूरक आहेत. स्त्री या शब्दासाठी अक्षरसमुह तयार करावे लागतात हेही मान्य. मात्र याला भाषेची मर्यादा म्हणत येणार नाही. कोणतीही भाषा कधीच पूर्णत: समृद्ध नसते. बरेचसे शब्द इकडून तिकडून येऊन भर घालत असतात. कदाचित आपण पुरुषप्रधान संस्कृतीत रुतलेलो असल्याने असे शब्द रुळले असावेत असे मला वाटते. कारण आपण आपली कुटुंबसंस्था 'उद्धारासाठी पुरुष पाहिजे आणि वंश वाढवण्यासाठी स्त्री पाहिजे' याभोवतीच गुंडाळलेली आहे. त्यामुळे साहित्यातले शब्द असो किंवा बोलीभाषेतील हे असे शब्द अंगवळणी पडले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये आपण वापरत असलेले इतर भाषेतील शब्द खूप आहे. इंग्रजी शब्द तर खूप आहेत आणि प्रतिमराठी शब्द कमी.
मराठी भाषेचा आग्रह धरणारे बहुतेक 'अभिजन' असतात हे निरीक्षण म्हणून चांगले असले तरी असे दाखवणारे (किंवा दिखावा करणारे) बहुतेक 'अभिजन' असतात असे म्हणणे संयुक्तिक वाटते. आपण नेहमी राजकीय अनास्था बद्दल भरभरून बोलतो मात्र सांस्कृतिक अनास्था आणि भाषिक अनास्था पण तेवढ्याच जबाबदार आहेत. कारण बहुतेक आस्था फक्त जातपातधर्माशी निगडीत असल्या तर राजकीय पटलावर येतात.
मातृभाषेतून शिक्षण घेणे हा वरवरचा मुद्दा आहे. आजूबाजूचे वातावरण पण तसे मराठीमय होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात तसे वातावरण आता मिळणे शक्य नाही. उदाहरण सांगतो आपण मराठी लोक क्रिकेटचे समालोचन ( मराठीत कॉमेंटरी) मराठीतून ऐकतो का? का नाही ऐकत? मी हैदराबादला होतो तेव्हा एक तेलुगू मित्र तेलुगू भाषेतून कॉमेंट्री असलेल्या वाहिनीवर सामान्य पाहत असे. दूसरा एक तमिळ भाषिक होता तो तमिळ भाषेतील वाहिनीवरील सामान्य बघत होता. मला लहान असताना आठवते की माझे आजोबा रेडियो वर मराठीतून कॉमेंट्री ऐकत होते. कोणतीही भाषा जेवढी जास्त तुमच्या बोलण्यात, ऐकण्यात येते, वाचण्यात येते, रोजचे व्यवहार त्याच भाषेतून होत असतील तर बरेचसे मूळ भाषेतील शब्द रुळतात. तेच शब्द नंतर प्रचलित होतात. मराठी भाषा अभिजात आहे वगैरे बोलण्यासाठी ठीक. सप्रमाण सिद्ध करणे जिकरीचे आणि बऱ्याच कसोट्यातून जाणारे आहे.
मराठी व्याकरणात शब्दसिद्धी आणि त्याचे प्रकार फक्त परिक्षेपूरते मर्यादित राहिले आहे.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
(सवांतर)
आमच्या लहानपणी/हायस्कूलीय वयात बाळ ज. पंडित, झालेच तर आणखी एक कोणी प्रोफेसर करमरकर म्हणून होते, ते एक, आकाशवाणीवर मराठीतून क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन अत्यंत उत्तम प्रकारे करत. मराठी श्रोत्यांमध्ये अत्यंत लोकप्रियसुद्धा होते. (गेले ते दिवस!)
आता, मला वाटते, त्या दर्जाचे समालोचक बहुधा मिळत नसावेत. (कालाय तस्मै नमः।) कदाचित, पैदाही होत नसावेत. (ही अर्थात आमची सामाजिक त्रुटी.) किंवा, कदाचित, बजेटरी कन्स्ट्रेंट्समुळे म्हणा, किंवा अन्य (राजकीय किंवा इतर) कारणांमुळे म्हणा, आकाशवाणीने प्रादेशिक भाषांतील समालोचक ठेवणे बंद केले असावे. (उगाच हेडकौंट (=खाणारी तोंडे) कशाला वाढवा, वगैरे. आले केंद्रसरकारच्या मना, तेथे कोणाचे चालेना! आणि, केंद्रसरकारच्या मनात कधी काय येईल, कोण जाणे. असो; अधिक अवांतरात शिरत नाही.)
(तसेही, मराठी समालोचन हा प्रकार, जेव्हा कसोटी सामने भारतात असत, तेव्हाच असायचा, असे काहीसे आठवते. (कदाचित, फक्त महाराष्ट्रातील (पक्षी: मुंबईतील) कसोटी सामन्यांपुरतेच असावे का? नक्की आठवत नाही.) आकाशवाणी पदरचे पैसे खर्च करून बाळ ज. पंडितांना किंवा प्रोफेसर करमरकरांना इंग्लंडास नाहीतर न्यूझीलंडास पाठवीत नसावी. इंग्रजी तथा हिंदी समालोचकांचा (सुशील दोषी, झालेच तर मुरली मनोहर मंजुल, हे हिंदीतील उत्कृष्ट समालोचक होते, असे आठवते.) मात्र तांडाच्या तांडा सर्वत्र जात असे. असो चालायचेच.)
एकूण काय तर ...
मराठीला सावत्र असल्याची वागणूक सगळीकडेच मिळते.
अजून एक उदाहरण सांगतो. मराठी नाटक परंपरा वगैरे आपण फार कौतुकाने बोलतो. आज मुंबईत गुजराती नाटकाला जेवढे आर्थिक पाठबळ मिळते सुरुवातीचे काही प्रयोग करण्यासाठी तसे मराठी नाटकांना मिळते का? (काही अपवाद सोडले तर) मराठी सिनेमा बाबतीत पण हेच दिसते. (आपण दर्जा हा विषय सध्यातरी गौण धरुयात)
तसेच मराठी पुस्तक वगैरे पण नेहमी काटकसरीने चालत असतात. आपल्याकडे मराठी पुस्तके छापताना पहिल्या आवृत्तीत किती प्रती असतात? हजार दोन हजार कसेबसे. तेच दक्षिणी राज्यातील भाषेत बघा. विशेषत: मल्याळम आणि तमिळ भाषेतील पुस्तके आणि मासिके तिकडील तमिळ आणि मल्याळी माणसे फार मोठ्या प्रमाणातविकत घेऊन वाचतात तसे मराठी पुस्तके आणि मासिकांच्या बाबतीत होते का? मनोरमा सर्वाधिक खपचे मासिक आहे असे वाचले होते.
मराठी भाषेविषयक जी आंतरिक ओढ असायला पाहिजे तिच्यात आपण मराठी माणसे कमी पडतो. माचीवरील बुध म्हणतात तसे काही अभिजन (माझ्या मते सुखवस्तू आणि दीखावूपणा करणारे अभिजन) लोकांचा आग्रह असतो मराठीच्या बाबतीत. हल्ली ते सोशलमेडिया वर मराठी मराठी करणारे टोळके पण वाढलेत.
माझ्या मते अजून एक सांस्कृतिक अंधश्रद्धा बहुतेक मराठी माणसे पाळतात. ति म्हणजे "प्रमाण मराठी भाषा" त्यातल्या त्यात "पुणेरी प्रमाण मराठी भाषा". माझ्या मते लिहिली जाणारी भाषा आणि बोलली जाणारी भाषा असे दोनच प्रकार पाहिजेत. महाराष्ट्रात त्या त्या विभागात बोलीभाषा प्रमाण खूप मोठे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भाषेचा टोन पण वेगळा वाटतो ऐकताना. मग हे असे असताना 'प्रमाण' मराठी भाषा वगैरे कसे चालेल? (वैचारिक दारिद्र्य म्हणतात ते हेच असावे)
भौगोलिक दृष्ट्या उत्तरेपासून जवळ असल्याने महाराष्ट्रात आपण हिन्दी ला अनन्यसाधारण महत्व देतो.
सारांश काय तर .. मराठी भाषेला सावत्र पणाची वागणूक सगळीकडूनच मिळते वेळोवेळी. म्हणजे उपेक्षा ही ठरलेलीच.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
मराठी जावू द्या
ज्या इंग्रजी भाषेला जागतिक भाषा म्हणतात ती व्याकरण शुद्ध किती लोक लिहतात किंवा व्याकरण शुद्ध किती लोक बोलतात.
त्या मानाने मराठी बरीच व्याकरण शुद्ध लिहली जाते आणि बोलली पण जाते.
शुद्धलेखन आणि व्याकरण
शुद्धलेखन आणि व्याकरणाचे तुम्हीही जरा मनावर घ्या की राव!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
Pidgin Marathi
वर माझ्या सुरवातीच्या प्रतिसादामध्ये मी ज्या पिजिनीकरणाचा उल्लेख केला होता त्याचे हे ताजे आणि बटबटीत उदाहरण पहा. हे मला म.टा.वर् मिळाले:
"मिथिला पालकरची ग्लोइंग आणि स्मूद स्कीन तरुणाई मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला सुद्धा मिथिला पालकर सारखी ग्लोइंग आणि स्मूद स्किन हवी असेल तर तुम्ही काही खास पद्धती वापरून पाहू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्ही स्टीम घ्या, ज्यामुळे पोर्स ओपन होऊन आतील सगळी डस्ट बाहेर येईल. केवळ आपल्या चेह-यालाच नाही तर आपल्या बॅकला सुद्धा स्क्रब करत राहा. यामुळे डेड स्कीन रिमूव्ह होऊन स्कीन अधिक जास्त स्मूद बनते. सोबतच यामुळे स्किन वर होणारी ऐक्नेची समस्या देखील दूर होते. स्किनवर मॉइस्चराइजर लावणे कधीच विसरू नये. बॉडीचे इतर पार्टसना सुद्धा याच प्रकारे मॉइस्चराइज्ड ठेवणे गरजेचे आहे.
(वाचा :- DIY Hair Mask : उगाच नाही साउथ इंडियन मुलींच्या केसांवर संपूर्ण भारत फिदा, घरच्या घरीच केसांवरच घेतात इतकी मेहनत!)"
धेडिंग्रजी मराठी, अर्थात रिकामपणाचे उद्योग
Mithila Palkar’s tejahpunja and tuktukit tvacha is admired by the youth. If you wish to acquire a tejahpunja and tuktukit tvacha just like Mithila’s, then you may avail yourself of a special procedure. First, you should expose yourself to some vaaf, so that the chhidre will fall ughadi and all the dormant dhool inside will come out. You should keep doing ghasaghashi not only on your path but also on your face. This will cause your meleli tvacha to become suti and then vegali, so that your jivant tvacha becomes more tuktukit. This will also solve the problem of tarunyapitika on your tvacha. You should never forget to apply aardratavardhak malam on your tvacha. Similarly, it is also essential to keep other avayav of your anga aardra.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
रिकामपणाची निरीक्षणं
>>>and all the dormant dhool inside will come out.
इथे मूळ मजकुरात कुठे निद्रिस्त धूळ म्हंटलेलं नाही.
मग तुम्ही डॉरमन्ट का म्हणाला? आणि धूळ डॉरमन्ट तेव्हाच असेल जेव्हा ती कधीतरी ऍक्टिव्ह असेल! हैं ना?
>>You should keep doing ghasaghashi not only on your path but also on your face.
इथे मूळ मजकुरात फक्त चेहरा घासू नका, पाठही घासा असं म्हंटलेलं आहे. आणि ते लॉजिकली बरोबर आहे.
कारण आपली आपली पाठ घासणं अवघड असतं म्हणून बुजऱ्या स्त्रिया फक्त चेहराच घासण्यात समाधान मानतात. त्यामुळे त्यांची पाठ अकाली म्हातारी होते.
(आमचाही रिकामटेकडेपणा)
भाषांतरकर्त्याट्रान्सलेटरचे व्हॅल्यू-ॲडिशन?चूक! डॉर्मंट असण्याकरिता भूतकाळात ॲक्टिव असणे अजिबात आवश्यक नाही. फक्त, (१) वर्तमानकाळात ॲक्टिव असणे उपयोगाचे नाही, आणि, (२) भविष्यकाळात (शक्यतो विदाउट अ वॉर्निंग, परंतु नॉट नेसेसरिली) ॲक्टिव होण्याचे केवळ पोटेन्शियल (याकरिता ‘विभव’ असा मराठी प्रतिशब्द आहे खरा, परंतु तो क्यॅयच्यॅ-क्यॅय असल्याकारणाने येथे टाळला. असो.) असले पाहिजे, प्रॉमिस (पुन्हा, ‘वचन’ हा प्रतिशब्द जवळपास त्याच कारणाकरिता टाळला.) असली पाहिजे. (भविष्यकाळातसुद्धा ॲक्टिव झालेच पाहिजे, असा आग्रह नाही. फक्त, वेळ पडली, तर ॲक्टिव होता आले पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. तीसुद्धा, ‘टाइम विल टेल’ तत्त्वावर.)
(‘स्लीपर सेल’चे उदाहरण घ्या. दुनियेतले असे कितीसे स्लीपर सेल प्रत्यक्षात ॲक्टिव झालेले तुम्हाला व्यक्तिशः ठाऊक आहेत?)
आणि हो! ‘हैं ना’ नव्हे. ‘है ना’. (अनुस्वार नको.) दोन्ही पर्याय स्टँडअलोन तत्त्वावर आपापल्या जागी व्याकरणदृष्ट्या शुद्धच आहेत, परंतु, त्यांचे अर्थ किंचित वेगवेगळे आहेत. (अनेकवचन विरुद्ध एकवचन.) प्रस्तुत संदर्भात विनाअनुस्वारवाला पर्यायच बरोबर आहे.
गुड क्याच!
उपसंपादकाट्रान्सलेटरच्या डुलक्या! दुसरे काय?असेल ब्वॉ. आपल्याला काय, अनेक स्त्रियांच्या पाठींचा अनुभव नाही. (आपला सँपल साइझ खूपच लहान आहे.) सबब, आपला पास. I bow before superior knowledge.
असो चालायचेच.
@जयदीप चिपलकट्टी
@जयदीप चिपलकट्टी:
तुम्ही कधी ‘Google Translate’ किंवा ‘translate.google.com’ यांपैकी कोणता डुआयडी वापरूनसुद्धा लिखाण करता काय?
(शैली ओळखीची वाटते.)
प्रताधिकार?
सदर मजकुराचं जनन तुम्हीच केलंत का आणखी कुणाकडून उधारीवर आणलंत?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माया पंडित
'मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या'च्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाने नुकतेच काही कार्यक्रम आयोजित केले होते. त्यापैकी प्रा. माया पंडित यांच्या भाषणाचा विषय तुमच्या धाग्याशी संबंधित वाटला म्हणून देत आहे -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद!
प्रा. पंडित यांचे भाषण आवडले.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
धेडिंग्रजी हा
न्यू वर्ड Maraठी लँग्वेज मध्ये आणल्याबद्दल तुमचे धन्यवाद
फक्तं आपण चिंता व्यक्त करत आहे.
मराठी मध्ये कॉम्प्युटर वर टाईप करण्यासाठी मराठी की बोर्ड पण भारतीय नागरिक नी तयार केला नाही असे ऐकण्यात आहे
सर्व भाषेचे कोणत्या ही भाषेत भाषांतर करण्याचे काम पण भारतातील कोणत्याच व्यक्ती नी केले नाही.
Google ती सुविधा पुरवते.
आपल्या कडे कार्यावर विश्वास नाही फक्त चिंता व्यक्त करायची.
मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व हातभार लावू शकतात.
फक्त चिंता व्यक्त करून,आपल्याच भाषेला नाव ठेवून काही होणार नाही.
मी मुंबई मध्ये राहतो आणि सर्रास मराठी च बोलतो.
ते पण ठरवून.
अगदीच गरज असली तर बाकी भाषा.
काही अडत नाही.
सर्वांना मराठी समजते आपल्यात च न्यून गंड आहे.