नायजेरियन गुन्हेगाराचा शोध अथवा युरोपियन वसाहतवादाचे परिणाम

"ही बातमी वाचली का? कुख्यात नायजेरियन गुन्हेगार अनुआ चिचेबे फरार - शोध चालू - माहिती देणाऱ्यास दहा लाखाचे इनाम," मह्या एका दमात बोलला.
"काय स्मगलर वगैरे आहे काय भेंजो?" मी विचारलं.

"नाय रे. नायजेरियन लाॅटरी फ्राॅड करतो. पण जरा माहिती काढून मेल पाठवतो म्हणे, खरे वाटतील असे."

"म्हणजे, तुमचे काका इंजिनिअर फ्रेडरिक हळदणकर यांचा घानामध्ये मृत्यू झाला आणि तुम्हाला इस्टेट ठेवलीय असले नाहीत?" मी टाळीसाठी हात पुढे केला, पण मह्या गंभीरपणे कायतरी विचार करत होता. अशा वेळेला जरा थांबलं की मग तो विचारांची जुळवाजुळव करून बोलू लागतो.

"तर फरार नायजेरियन माणूस कुठे लपणार? मुंबईच्या बाहेर जाणं उत्तम. आता मीरा रोडला जायची शक्यता जास्त हे पोलीसांना माहीतीये हे त्याला माहीतीये. मग त्याऐवजी इकडे ठाण्यात येऊन लपला तर?"

"पाॅसिबल आहे भेंजो. पण एवढ्या मोठ्या शहरात कुठे शोधायचा?"

"ते शेरलाॅक बघतोस ना तू? ते काय म्हणतात, बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स. गावभर भटकत बसणाऱ्या पोरांना पैसे देऊन माहिती काढतो ना होम्स? आपणपण तसंच करूया!"

मग अंडीब्रेड विकणारे, भोंगा इडलीवाले, कुल्फीवाले अशा लोकांशी आम्ही काॅन्टॅक्ट केला आणि त्यांना माहिती काढायला सांगितली.

"भेंजो, योगायोगाने आपले सगळे हस्तक खाणं विकणारेच आहेत," मह्या म्हणाला.

"ढेकर स्ट्रीट इरेग्युलर्स!" मी म्हणालो, आणि या वेळेला मात्र मह्याने लगेच टाळी दिली.

दोन दिवसांतच खबर आली की बाळकुमच्या एका लहान हाॅटेलात एक गेस्ट आलाय आणि तो खोलीबाहेर बिलकुल पडत नाही. "द गेम इज ऑन," बोलत मह्यानी बाईक काढली, आणि आम्ही लगेच तिथे गेलो. "बोलण्याचं माझ्यावर सोड," मह्या हेल्मेटची काच वर करून बोलला.

हाॅटेलच्या काऊंटरवर एक प्लॅस्टिकच्या रोबोसारखा दिसणारा माणूस बसला होता. मह्या त्याला म्हणाला, "मी म्युन्सीपाल्टीकडून आलोय. तुमच्या फायर एक्स्टिन्ग्विशरचं इन्स्पेक्शन करायला. रिसिटी दाखवा."

प्लॅस्टिकच्या माणसानी कुठूनतरी फाईल काढली, आणि मह्यानी ती वरवर बघितली. मधेमधे "सीओटूवाला घेतलात हे उत्तम" वगैरे डायलाॅग तो टाकतच होता.
"हे ठीक आहे. आता गेस्ट रजिस्टर दाखवा," मह्याने हुकूम सोडला. रजिस्टरची दोनतीन पानं बघून त्यानी बंद केलं. "ठीक आहे. येतो मी," तो म्हणाला.
"साहेब, रिपोर्ट?" प्लॅस्टिकच्या माणसानी विचारलं.

"रबर स्टॅम्प आणायचा राहिला. हा येईल थोड्या वेळात आणि रिपोर्ट देईल," एवढं बोलून मह्यानी कलटी मारली.

"रजिस्टरमधे एकच फाॅरेन गेस्ट आहे. तोच असणार. नाव वेगळं आहे, पण त्याचे काय चारपाच पासपोर्ट असणार. नॅशनॅलिटी तीच आहे पण साल्यानी स्पेलिंग चुकवलंय," मह्या जाम एक्साईट झाला होता. "चल परबकाकांकडे जाऊ, पीएसआय आहेत ते."

मग आम्ही परबकाकांकडे गेलो आणि त्यांना सगळं सांगितलं. "ठीक आहे, मी स्वतः लगेच जातो," काका म्हणाले, "तुम्ही आलात तरी चालेल पण गल्लीत थांबा. हाॅटेलात येऊ नका."

आम्ही वाट बघत थांबलो. जरा वेळानी हाॅटेलातनं आरडाओरडा ऐकू आला. मग परबकाकांनी मह्याला फोन केला आणि आम्हांला आत बोलावलं. समोरच्या एका काटकुळ्या माणसाकडे बोट दाखवून घाम पुसत ते म्हणाले, "अरे हा नो इंग्लिश नो इंग्लिश एवढंच बोलतोय. तू इटालियन शिकलास ना; त्यात बोलतोय का हा?"

"नो इटालियन. फ्रेंच, फ्रेंच," तो बोलला.

मग मह्यानी ज्यां पाॅलला (तोच, हाॅटेल सागर डिलक्समधला तोतया फ्रेंच शेफ बनलेला कॅनडियन एक्स्ट्रा अॅक्टर) फोन लावला आणि त्या माणसाला दिला. पाचसात मिनिटं बोलणं झाल्यावर त्यानी फोन मह्याला दिला आणि ज्यां पाॅलनी खुलासा केला.

तो माणूस होतकरू लेखक होता. भारतात टूरिस्ट म्हणून आला होता पण पैसे फार खर्च होतात म्हणून कंप्लेन केल्यावर एका भारतीय मित्रानी त्याला बाळकुमच्या त्या हाॅटेलात आणून सोडलं होतं. परतीच्या फ्लाईटच्या दिवसापर्यंत तो खोलीत बसून त्याची कादंबरी लिहीत होता. त्याला इंग्लिश खरंच येत नव्हतं कारण तो नायजेरियाचा नव्हता; तर नायजर देशाचा - निजेरिएन - होता.

त्या लेखकाला ज्यां पाॅलमार्फत सगळं सांगितलं तर तो हसला आणि परत गेल्यावर याची स्टोरी फ्रेंचमधे लिहील असं म्हणाला. परबकाका आमच्यावर जरा उखडले होते पण काय बोलले नाहीत. आम्ही परतपरत साॅरी म्हटलं आणि बाहेर आलो.

"भेंजो जरा घोळ झाला पण तू एक गोष्ट मानली पाहिजेस," मह्या म्हणाला, "त्या स्ट्रेसमधेपण मी नॅशनॅलिटीचं स्पेलिंग नीट बघितलं. आता Nigerian माहितीय आणि Nigerien माहीत नाही यात माझी काय चूक?"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नॅशनॅलिटी तीच आहे पण साल्यानी स्पेलिंग चुकवलंय," मह्या जाम एक्साईट झाला होता

यू गेव्ह इट हिअर. पण कथा नेहमीप्रमाणे आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0