आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

संकल्पना

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

- संजीव खांडेकर

जॉर्ज ग्रॉश विदूषक
माझ्या एका तरुण मित्राने 'विनोदा'वर एक छोटासा लेख लिहून दे, असे सुमारे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा मला सांगितले तेव्हापासून मी गांगरून गेलो आहे. त्याचा फोन ठेवला आणि माझ्या डोळ्यांसमोर माझ्या अत्यंत आवडत्या चित्रकाराचे - जॉर्ज ग्रॉश या जर्मन 'दादा' चळवळीच्या एका अध्वर्यूचे - त्याने त्याच्या उत्तरवयात काढलेले (फोटो मोन्टाझ) चित्र डोळ्यासमोर आहे. ते एका अर्थाने सेल्फ पोर्ट्रेट आहे. त्याचे शीर्षक 'मायसेल्फ अ‍ॅन्ड न्यू यॉर्क सिटी' असे किंवा 'क्लाऊन फ्रॉम न्यू यॉर्क' असे आहे. जॉर्ज ग्रॉश हा मार्क्सिस्ट ‘दादा’ होता. जर्मनीत ऐन नाझी पक्षाच्या विजयी घोडदौडीच्या काळात तो कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य होता व शेवटपर्यंत राहिला. अमेरिकेत १९५७मध्ये त्याने हा व अशा अन्य फोटो मोन्टाझची कामे केली. या चित्रात न्यू यॉर्कच्या झगमगत्या 'सिटीस्केप'ची रात्र पार्श्वभूमीवर ठेवून, तो स्वत: एका ड्रॅग क्वीनचा पोशाख (स्त्रीचा अर्धनग्न पोशाख) अंगावर चढवून, खोटे खोटे स्तन छातीवर बसवून व हातात एक 'फोर रोझेस' व्हिस्कीची बाटली घेऊन टेचात उभा/उभी आहे. मुख्य म्हणजे या चित्रातील ड्रॅग क्वीनच्या नाकावर एक भले मोठे विदूषकाचे नाक लावण्यात आले आहे. पारंपरिक विदूषकी नाक व रंगवलेले विदूषकी डोळे घेऊन हा/ही विदूषक ड्रॅग क्वीन, न्यू यॉर्कच्या रात्रीला पाठीमागे घेऊन उभा/उभी आहे. मला प्रश्न पडला की, विनोदाचे प्रतीक असलेला गमतीदार विदूषक इतका गंभीर असू शकतो काय? सहज हसवणारा किंवा चॅप्लिनच्या 'सिटी लाईट'मधील शेवटच्या दृश्यात रडवणारा सुलभ विदूषक इतका दुर्बोध असू शकतो? जी अॅब्सर्डीटी केवळ तरल कवितेची, नाटक किंवा दृश्य कलाकृतींची मक्तेदारी मानली जाते; ती अॅब्सर्डीटी, संदिग्धता किंवा अनिश्चितता विदूषकी विनोदाच्या चेहर्‍यावर उमटू शकते? असे अनेक प्रश्‍न माझ्या मनात गर्दी करू लागले; आणि आपण विनोद गांभीर्याने पाहिलाच नाही याची खंत वाटली. विनोद मुख्यत: एक कथा असते. कथेचे सगळे गुण विनोदात असतात. कधी तो एखाद्या विस्तृत कथनामधून उलगडत जातो, तर कधी एखाद्या वाक्यात कवितेएवढाच परिणामकारक ठरतो. कधी एखादा शब्द, कधी एखादा चिन्ह आपल्याला गुदगुल्या करून जाते. कधी विनोद एखाद्या (व्यंग)चित्राचे रूप घेऊन दृश्य स्वरूपातच हसवतो. जणू ते चित्रच भृगुवल्लीचा 'वाक्यजातिस्फोट' बनावा तसे कधी त्याचे विदूषकी चाळे आपल्याला हसून हसून गडबडा लोळायला लावतात, तर कधी एखादा अपघात किंवा तर्कविसंगत घटना गोत्वव्यंजनव्यर्थता, किंवा एखादेवेळी विप्रलंभ शृंगारवर्णनसुद्धा पुनुरुक्ती व विकल्पी शब्द योजल्यामुळे आपल्याला हसायला पुरेशी असते. (केळीच्या सालावरून घसरलेली व्यक्ती, डोक्यावर शिटलेला कावळा इत्यादी) विनोदामध्ये लपलेले व्यंग किंवा लपवलेले व्यंग बाहेर पडते. विनोदामुळे आनंद किंवा दु:ख, साक्षात्कार किंवा समज, राग किंवा लोभ अशा परस्परविरोधी भावना एकाच वेळी प्रगटू शकतात. विनोदाला अंत नसतो, इतका तो पैलूदार असतो. "… हासनीयस्य कक्षादिसंस्पर्शः कुहनावहः इत्यादयो विभावाः स्युरनुभावास्तु नेत्रयोः। कपोलयोरोष्ठयोश्च स्पन्दो दृष्ट्योर्विकासनम्। अत्यन्तमीलनं किंचित्कुञ्चनं पार्श्वपीडनम्।… प्रस्वेदमुखरागाद्या यस्याथ व्यभिचारिणः। स्वप्नोऽवहित्थमालस्यनिद्रातन्द्रादयोऽपरे। एते स्मितादिभेदेषु यथायोगं व्यवस्थिताः ॥" -- संगीत रत्नाकर
तो मानवी प्रतिभेचा, तसा बर्‍यापैकी न समजलेला एक मोठा प्रदेश आहे; याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

माणूस विनोद का करतो, हा प्रश्‍न माणूस कविता का लिहितो, गाणे का गातो, चित्र का काढतो या प्रश्‍नांपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. माझ्या मते विनोद हा मानवाच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासात लैंगिक निवडप्रक्रियेतील साधनविस्तारात उलगडत गेलेला एक महत्त्वाचा दुवा असावा.

लहानपणी आमच्या खेळण्याच्या ग्रुपमध्ये एक काळा कुळकुळीत मुलगा यायचा. त्याच्या मानाने आम्ही तांबूस तर काही मित्र अगदी गोरेपान होते. तो येताना दिसला की कुणीतरी 'काळ्या' आला बघ, असे म्हणे आणि आमच्यापैकी बरेचजण, बहुधा सगळेच जण फिदीफिदी हसत असत. त्याचा चेहरा मात्र रडवेला होत असे. 'काळ्या आला बघ' हे वाक्य विनोदी होते काय? आणि नसले तर आमच्या हसण्याचे कारण विनोद नसून दुसरेच होते काय? की हेटाळणी, वर्णद्वेष, वंशद्वेष, जातिद्वेष हाही विनोदाचाच एक अवतार असतो काय?

या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल काय? प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटलपासून ते अगदी आधुनिकतेच्या काही तत्त्वचिंतकांच्या मते या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी आहे. आपले हास्य हे आपल्यातील श्रेष्ठत्वाच्या, वरिष्ठपणाच्या, प्राबल्याच्या भावनेतून निर्माण होते, असेच त्यांना वाटत होते; किंबहुना विनोदाच्या तत्त्वसिद्धांताचा हा पाया मानण्याचाच प्रघात आहे. मी गावाकडून मुंबईला येताना माझे हसू होऊ नये, म्हणून मला वडलांनी नवे कपडे व इतकेच काय बूटदेखील घेऊन दिले होते. मुलीचे सासरी हसू होऊ नये म्हणून तिचे आई-बाप काय-काय दिव्ये करतात. इथपासून एखाद्याच्या व्यक्तिगत न्यूनत्वावर किंवा त्यातूनच एखाद्या समाजाच्या न्यूनत्वावर भाष्य करून उरलेला 'वरिष्ठ', 'सवर्ण', 'श्रीमंत', 'वरच्या जातीतला', 'गोरा', 'नाकेला' वगैरे वगैरे विशेषणांनी युक्त समाज, दुसर्‍या समाजाच्या काळेपणावर किंवा गरिबीवर, सामान्य प्रतीवर किंवा प्रकारावर, जातीवर किंवा भाषेवर हसत असतो व आपल्याला कायम हसता यावे यासाठीचे जगण्यावागण्याचे नियम तयार करतो, त्यांचे राजकारण करतो हे इथे वेगळे सांगायची गरज नाही. प्लेटो किंवा अ‍ॅरिस्टॉटलने तशी मांडणीही केलेली नाही.

डार्विनने गुदगुल्यांचा स्पर्श व विनोदाची (किंवा हास्याची) निर्मिती याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. अ‍ॅडम फिलिप्सचे On Kissing, Tickling, and Being Bored: Psychoanalytic Essays on the Unexamined Life हे पुस्तकही आपल्या सर्वांच्या माहितीचे आहे. डार्विनने केलेल्या गुदगुल्यांच्या अभ्यासात, हास्यात किती प्रकारच्या वेगवेगळ्या आविष्कारांचे दर्शन होऊ शकते याचे तर वर्णन आहेच; परंतु स्पर्शाने हास्यच काय, पण अश्रूदेखील ओघळतात याचीही निरीक्षणे आहेत. आपल्याकडे कित्येक शतके आधी "कक्षादिसंस्पर्शः कुहनावहः" किंवा "प्रस्वेदमुखरागाद्या यस्याथ व्यभिचारिणः" अशी शारीरशास्त्रीय वर्णने लिहून ठेवणारे, किंवा शब्दांचे स्थूल व सूक्ष्म स्वरूप, त्यांचा परस्परसंबंध, शब्दापासून कळून येणाऱ्या अर्थाचे स्वरूप, शब्द व अर्थ यांच्या संबंधाचे स्वरूप, वाक्यस्वरूप, वाक्यार्थ, समासार्थ, धात्वर्थ, उपसर्ग, निपातार्थ, शब्दसाधुत्व, असाधुत्व, शक्‍ती, लक्षणा, व्यञ्‍जना, द्योतना, तात्पर्य, प्रमाणविचार इत्यादी अनेक विषयांची भाषाशास्त्रीय मांडणी तपासून विनोद वा हास्यरसाचा उद्भव आणि विस्तार शोधणारे ऋषी-मुनी यांचा उल्लेख आवश्यक असूनही माझ्या तुटपुंज्या अभ्यासामूळे व अपुऱ्या व्यासंगामुळे शक्य नाही याचा खेद वाटतो.

हास्याची एक वेगळीच मूस व बांधणी आहे व ती प्राणीजगतात सर्वत्र आढळते. माणसाचे हसणे वा रडणे अर्थातच जटिल भाव व कृतीसमुच्चायांचा परिणाम आहे. विनोद/जोक किंवा विदूषकीपणा हे हास्याच्या उद्भव पैलूंपैकी एक आहेत. मात्र डार्विनने विनोदाच्या निर्मितीत 'शारीर' जाणिवांना स्थान देऊन, त्याच्या लैंगिक निवडप्रक्रियेच्या सिद्धांताला एक नवे परिमाण दिले एवढी नोंद आपण घेऊ.

श्रेष्ठत्वसिद्धांताचा विचार थोडा मागे नेला तर आणखी एका महत्त्वाच्या मानवी भाषाआविष्काराची आठवण होते. तो आविष्कार म्हणजे शिवीगाळ करणे. फ्रॉईडच्या मते, मानवी इतिहासात जेव्हा शस्त्राची जागा शिवीने घेतली त्या क्षणापासून मानवी समाजाच्या 'सांस्कृतिकीकरणा'ला सुरुवात झाली. शिवी ही मनुष्याच्या सुसंस्कृतपणाची पहिली खूण होती! कारण रागाने शस्त्र चालवून एखाद्याला भोसकण्यापेक्षा, शिवी देऊन रागाचे निराकरण करता येते हे माणसाला समजले. शिव्यांचा अभ्यास म्हणूनच आपल्याला, आपल्या सांस्कृतिक राजकारणाचा पर्दाफाश करण्यासाठी उपयोगी पडतो. सहज चाळा म्हणून आपण देत असलेल्या वा आपल्या कानावर पडत असलेल्या शिव्या तपासल्या तर त्या मुख्यत: पुरुषप्रधान वर्चस्व दर्शवणार्‍या संस्कृतीतील, नैतिक-अनैतिक मूल्यवस्थेवर भाष्य करणार्‍या, पुरुषी सुखाच्या व वैषम्याच्या, पुरुषी वृत्तीला बळकटी व महत्त्व देणार्‍या, व स्त्रियांना हीन व हलके ठरवणार्‍या अशाच आहेत. वर्णव्यवस्थेत स्त्री ही अन्य कोणत्याही जातीपेक्षा हीन व कमी दर्जाची का व कशी ठरवली गेली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला शिव्यांचा शब्दकोश.

शिवी हा जर सांस्कृतिकीकरणाचा पाया असेल, तर मग विनोद ही त्याच पायावर उभी राहिलेली पहिलीवहिली वीट म्हणावी लागेल. शिवी जशी कालपरत्वे व समाजपरत्वे बदलत गेली, तशीच विनोदाचीही वाटचाल आपल्याला प्लेटोपासून अठराव्या शतकातील हॉबच्या विनोदसिद्धांतापर्यंत बदलत जाताना दिसते. आपल्याकडे व्हॉट्सॅपवर फिरणारे 'नवराबायको'चे म्हणून जे काही जोक्स चालतात, ते अशा पुरुषी शिव्यांचेच मध्यमवर्गीय रूपांतर असते. शिव्या माहीत असणे, नवनव्या शिव्या माहीत असणे आणि त्या देणे या दोन्ही गोष्टी पुरुषी प्रदर्शनाचा भाग असतात. स्नायूंचा आणि शिव्यांचा पीळ, आकार व उठाव, नराच्या मादी मिळवण्याच्या स्पर्धेतील साधन बनते. साहजिकच शिवीतून उगम पावलेला विनोद लैंगिक निवडप्रक्रियेच्या गुंत्यातील एक महत्त्वाचा धागा बनू शकतो.

प्लेटो आदींचा प्राबल्यभावनेतून निर्माण होणार्‍या हास्याचा सिद्धांत, डार्विनची गुदगुली व फ्रॉईडची शिवी एकत्र केली तर या तिन्ही रसायनांची मिळून 'लैंगिक निवड'प्रक्रियेची एक आकर्षक पाककृती तयार होऊ शकेल, असे मला वाटते. बायकांना हसवणे, बायका जमल्या की आपल्या हजरजबाबी स्वभावाचे दर्शन घडवणे, अशा समारंभात जोक सांगणे, कित्येकदा तर पातळी सोडून एकट्या बाईला लैंगिक जोक सांगणे, या सर्व क्रिया अशा पाककृतीच्याच वेगवेगळ्या आवृत्त्या असतात.

हर्बर्ट स्पेन्सरने एकोणिसाव्या शतकात विनोदाचे मर्म उलगडून सांगताना 'रिलिफ' किंवा शमनाचा सिद्धांत मांडला. मुख्यत: फ्रॉईडच्या 'जोक्स अ‍ॅन्ड देअर रिलेशन टू द अन्कॉन्शस' (१९०५) या पुस्तकात केलेल्या विवेचनावर तो आधारित होता. फ्रॉईडच्या विवेचनाचे दोन मुख्य भाग आहेत. पैकी पहिला म्हणजे जोक हे दुसरे तिसरे काही नसून अबोधाचे म्हणजेच, दाबलेल्या इच्छांचेच रूप असते; व दुसरे म्हणजे अशा दाबलेल्या इच्छा दाबून ठेवण्यासाठी शरीर/मनाची जेवढी शक्ती खर्च होईल, त्याच्या कितीतरी कमी प्रमाणात शक्ती वापरून, अशा अबोधाचे विनोदात किंवा हास्यात रूपांतर करून दाबलेल्या इच्छा मुक्त होऊ शकतात.

विनोद ही कमालीची गुंतागुंतीची भाषिक रचना आहे. विनोदात प्राबल्यभावना असते, व्यंग असते, तुच्छता असते, आत्मपरीक्षण असते, तात्त्विक चिंतन असते, प्रबोधन असते, उपहास असतो, राग व लोभ असतो; त्यामुळेच कदाचित लुडविग विटगेनस्टाईनसारख्या तत्त्वचिंतकाने 'सारा तत्त्वविचारच विनोद, चुटके व जोक्स यांच्या निवेदनातून मांडता येईल' असा विश्‍वास व्यक्त केला होता. सॅम्युअल कांट एका ठिकाणी म्हणतो, "मानवी जाणिवांचा ताण-तणाव सैल करण्याचे काम एका विनोदाने होते."

फ्रान्सिस हचसनचे 'रिफ्लेक्शन्स अपॉन लाफ्टर' हे पुस्तक १७५० साली लिहिले गेले. या पुस्तकात कदाचित पहिल्यांदा विनोदाचा 'विसंगती' सिद्धांत मांडण्यात आला. पाठोपाठ कांट, शोपेनहॉवर, किकेगार्थ यांनी या विसंगती वा (जीवनातील) विसंगतीचे पहिले दर्शन किंवा विश्‍लेषण म्हणजे विनोद होय, असे स्पष्ट विधान केले.

पाश्‍चिमात्य विचारवंतांत तत्त्वज्ञानाची स्वतंत्र शाखा म्हणून विनोदाचा अभ्यास करण्याची निकड अगदी सोळाव्या शतकापासून आजपर्यंत दिसून येते. आपल्याकडे गेल्या हजार-बाराशे वर्षांत असा अभ्यास झाल्याचे मलातरी दिसत नाही. माझे स्वत:चेच उदाहरण द्यायचे झाल्यास, माझ्या व्यक्तिगत वाचनालयात सायमन क्रिचलेचे 'ऑन ह्युमर' हे पुस्तक सोडल्यास एकही पुस्तक विनोद या विषयावर नाही. तिकडे मात्र अगदी देकार्तपासून डार्विनपर्यंत, कांटपासून झिझेकपर्यंत, फ्रॉईडपासून देरिदापर्यंत अगदी प्रत्येक महत्त्वाच्या तत्त्वचिंतकाने आपले विनोदचिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देकार्त, डार्विन यांनी विनोद व हास्यनिर्मिती यांचा शरीरसंबंध, हास्य व स्मित यांमधील 'बायॉलॉजिकल' भेद, रतिसुख ते रुदन असा आविष्कारप्रवास तपासला; तर कांट, झिझेक यांनी आध्यात्मिक ते राजकीय चिंतनाचा अभ्यास करण्याचे साधन म्हणून विनोदाकडे पाहिले. कांटचे हास्य आणि इंद्रियकंपनाचा अनुभव हे सुप्रसिद्ध वचन केंद्रस्थानी ठेवून झिझेकने विनोदाला आपल्या विवेचनात मध्यवर्ती स्थान दिले. झिझेकच्या निवडक तात्त्विक, राजकीय व लैंगिक विनोदांचे एक छोटेखानी पुस्तकच नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

आपल्याकडेही संस्कृत नाटकात, विशेषत: (पाली नाटकातूनही काही वेळा) विदूषकाचे पात्र हे नाटकासाठी आवश्यक मानले गेले आहे. राजेरजवाड्यांच्या पदरचे दोन-पाच, किमान एखाद-दुसरा विदूषक, हा त्यांच्या दरबाराचा एक अविभाज्य भाग होता. प्रधान, अमात्य, सेनापती व विदूषक ही राजाच्या जवळच्या वर्तुळातील महत्त्वाची स्थाने होती. विदूषकाला मूर्खासारखे बोलण्याचे, वेडपट व विसंगत प्रश्‍न विचारण्याचे स्वातंत्र्य असे. विदूषकाचे, त्याच्या 'चाळ्यांना' अभय दिलेले खास स्थान होते. काही उदाहरणे अशीही आहेत की विदूषकाच्या बोलण्याचा राग येऊन, त्याला देहान्ताची वा कारावासाची शिक्षाही मिळाली आहे. राजकीय खलबतखान्याचा, विदूषक हा एक अविभाज्य परंतु स्वैर सहभागी सदस्य असे. दुसरीकडे ‘शब्दसागर’ कोशामध्ये विदूषक या शब्दाचे जे अर्थ दिले आहेत, तेही महत्त्वाचे आहेत. विदूषक म्हणजे 'विषयी', 'कामुक', लंपट' किंवा कामक्रियेची यथासांग माहिती असणारा. विदूषक म्हणजे मनोरंजन करणारा, नकलाकार, हसवणारा, विनोदी गोष्टी रंगवणारा, विचित्र पोशाख करणारा. ‘साहित्यदर्पण’ कोशानुसार विदूषक आपल्या खास कौशल्याने दोन व्यक्तींमध्ये भांडणे लावून स्वत:चा स्वार्थ साधत असे. विदूषक हा श्रृंगाररसाचा सहाय्यक आणि 'मानिनी' नायिकेला वश करण्यात कुशल होता. विदूषक हा चार नायकप्रकारांतील एक मानला गेला आहे; जो कौतुक, परिहास, विनोद यांच्या साहाय्याने नायिकेच्या मनात कामोत्तेजना निर्माण करू शकत असे. विदूषकाला काही साहित्यिकांनी 'निंदक' व म्हणून 'खल' मानले आहे; काही कोशांनी त्याला भांड, तर काहींनी भ्रष्ट व दूषित धंदा करणारा गैर मानले आहे. नारद हे विदूषकाचेच एक रूप मानले जाते.

वसंतक असो वा नंदन, वा मृच्छकटिकातील मैत्रेय त्याच्या चारित्रिक दृढता, संवेदनशीलता, व्यंगातून आणलेली आक्रमकता या गुणांचा उपयोग करून 'राजसत्ता समर्थित शिकार' स्थळांच्या विरोधात समाजोन्मुख संघर्ष करणारा म्हणून विदूषक प्रसिद्ध आहे. भाण किंवा भांड हे आपल्या व्यंग व श्‍लेषप्रचुर, व मूर्ख वाटावेत असे भाषण करून अभिजात परंपरातील रूढीच्या बंधनांना आव्हान देताना दिसतात. वक्रोक्ती हा विदूषकाचा एक खास गुण मानला गेला आहे. केरळी कुटियाट्टम विदूषक सत्तेच्या कुकर्मांना, राजनीतीतील कुटिल कारस्थानांना, ब्राह्मणवादाला व धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या परस्परहितसंबंधाना आपल्या विनोदाचे लक्ष्य बनवतो. कानावर पानाचा विडा खोचून रंगमंचावर प्रवेश करणार्‍या विदूषकाच्या पानाच्या विड्याचा अर्थ होता, की तो राजदंडापासून मुक्त आहे. त्याला बोलण्याचे अभय आहे. किंबहुना केरळी नाट्यपरंपरेत विदूषकाला 'जनतेचा प्रतिनिधी' मानण्याची पद्धत होती असेही उल्लेख माझ्या वाचनात आहेत. कनार्टकी 'अडासोग्', नेपाळातील 'भाषाधूर्त समागमी', माळव्यातील 'शेरभार खाँ', 'भागवती कोनंगी', रासलीलेतील 'मनसुखा', मिथिलेचा 'निपटा', हिमाचलचा 'करियाला बिहारी' 'लबार' 'चितकबरा' किंवा 'धिकला' असे अक्षरशः असंख्य विदूषक चौदा पंधराव्या शतकापर्यंत भारतीय रंगमंचावर, साहित्याच्या पटलावर चमकताना आपल्याला दिसतात. याचा अर्थ असा की आपल्याकडे किमान दोन हजार वर्षांची विदूषक व विनोद नावाची एक समृद्ध परंपरा मूर्त व अमूर्त अशा दोन्ही स्वरूपांत सिद्ध झालेली होती. आणि जर आपण हे सर्व विदूषक, त्यांच्या भूमिका व त्यांचे 'चाळे' एकत्र केले तर पाश्‍चात्य परंपरेत विनोदावर झालेल्या कामाइतकेच महत्त्वाचे काम येथील प्रतिभेने आपल्या साहित्य व सांस्कृतिक कलाकृतीत करून ठेवले आहे हे लक्षात यावे. कांट, डार्विन, फ्रॉईड किंवा अन्य तत्त्व व मानस विचारवंतांना आपल्या विदूषकांचा इतिहास माहीत असता तर कदाचित त्यांचे सिद्धांत अधिक प्रगल्भ झाले असते याची माझ्या मनात शंका नाही. ग्रीक-रोमन नाट्यपरंपरेपासून शेक्सपेरियन नाटकांपर्यंतही आपल्याला विदूषकाच्या प्रतिमा सापडू शकतात. युरोपियन सांस्कृतिक पटलावर 'क्लाऊन' ही प्रतिमा निश्‍चितच महत्त्वाची आहे. 'क्लाऊन' ते 'स्टॅन्डअप कॉमेडी' हा त्यांचा प्रवास निश्‍चितच एका महत्त्वाच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगल्भतेची उंची दाखवतो. आजही 'क्लाऊन' या अस्तंगत होणार्‍या परंपरेतील शेवटचे तारे निखळत असताना त्यांच्यावर 'इकॉनॉमिस्ट'पासून 'द गार्डियन'पर्यंत अशा सर्व क्षेत्रातील नियतकालिकांमध्ये लिहिले जाणारे मृत्युलेख वाचणे म्हणजे समाजातील dissentची, विरोधी आवाजाची व बंडखोरीची जागा स्वायत्त ठेवण्यामध्ये विदूषक व विनोद यांचा केवढा मोठा हातभार आहे याची कल्पना येते. विटगेनस्टाईनची समाजात समान विनोदबुद्धी नसण्याची खंत व आपल्याकडे व आटत गेलेला विनोद याची चर्चा आपण जागा व वेळ मिळाल्यास पुढे करणार आहोत. मेरी डग्लसचे 'विनोद आणि विधी' किंवा विनोद आणि कर्मकांडे असा तुलनात्मक अभ्यास मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यासही तितकाच व कसा महत्त्वाचा ठरतो हेही पहायला हवे परंतु जागेअभावी ते शक्य नाही.

भारतीय विनोदशास्त्रातील विदूषकाचे जे रूप आपल्याकडे सापडते त्यालाच जवळपास थोड्याफार फरकाने सायमन क्रिचली 'True Joke' किंवा खरा विनोद म्हणतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे 'True Joke' ची कल्पना ट्रेव्हर ग्रिफिथची. त्याने १९७६मध्ये लिहिलेल्या 'कॉमेडियन' या निबंधात मांडलेली. खरा कॉमेडियन - विदूषक, सोंगाड्या - विनोद'वीर'च असतो. तो शूर असतो. धाडसी असतो. त्याचे प्रेक्षक जे पहायला घाबरतात ते तो पाहतो, त्याच्या प्रेक्षकांना जे व्यक्त करण्याची भीती वाटते तो ते व्यक्त करतो आणि तो जे पाहतो ते एक सामाजिक सत्य असते. लोकांच्या खऱ्या परिस्थितीचे ते दर्शन असते. लोकांना ज्या गोष्टींची, ज्या माणसांची, ज्या वर्गाची भीती किंवा दडपण वाटते, ते ते तो पाहतो. लोकांना काय हवे ते त्याला समजते. एखाद्या जोकमुळे, विनोदामुळे 'टेन्शन रिलिज' होते, तणाव सैल होतो हे जरी खरे असले तरी 'खरा विनोद' केवळ ताण सैल करण्यापुरते मर्यादित काम करत नाही तर 'खरा विनोद, खरा विदूषक सर्व सामान्यांची स्वातंत्र्याची इच्छा आणि आकांक्षा मुक्त करतो. - खर्‍या विनोदाचे कार्य (सामाजिक व राजकीय) परिस्थितीमध्ये बदल घडवणे हेच असते' असे ग्रिफिथ लिहितो तेव्हा मार्क्सच्या 'तत्त्वचिंतक विश्‍वाचे गूढ रूप उलगडून दाखवतो, पण खरा प्रश्‍न हे विश्‍वच बदलण्याचा आहे' या ऐतिहासिक विधानाचीच आठवण येते.
खरा विनोद अचानक एखाद्या स्फोटक निर्मितीसारखा, जे ओळखीचे आहे त्याचे अनोळखीपणात रूपांतर करतो, सर्वसामान्य गोष्टीला असामान्यत्व बहाल करतो, आणि आपण एखाद्या शारीर क्षणिक सुखाच्या अतीवक्षणी जसे स्वाभाविकपणे कण्हतो किंवा किंचाळतो तसे हसू लागतो! विनोदामुळे वास्तवाचे जे अतिवास्तवीकरण होते - surreslisation होते त्या अद्भूत अनुभवामुळेच कदाचित आन्द्रे ब्रेताँने 'I' humour noir' असे म्हणून 'गडद काळ्या' विनोदाला डार्क किंवा ब्लॅक ह्यूमरला कवटाळले असावे.

विनोदाच्या वास्तव बदलण्याच्या शक्तीमुळेच त्याला सामाजिक चळवळींच्या प्रस्थापितांना आव्हान देण्याच्या कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान मिळालेले दिसून येते. प्रसिद्ध स्त्रीवादी विनोद, 'एका बाथरूमची फरशी बसवायला किती पुरुष लागतील?' असो किंवा ग्राफिटी घोषणामधील भिंतीवर रंगवलेली 'हास्य-हसण्याचा खळाळता आवाजच (शेवटी) तुम्हांला (सत्ताधारी वर्गाला) जमिनीत गाडून टाकेल', घोषणा असो. अशा कितीतरी उदाहरणांतून, ते सुप्रसिद्ध 'सम्राटाचे नवीन कपडे'सारख्या सम्राटाला नागडे दाखविण्याच्या प्रसंगातून विनोदाच्या माध्यमातून सत्तेच्या बोथट माजोरीपणावर आणि स्वत:च्या भीतीवर हसण्याची, सत्तेचा व स्वत:चा उपहास करण्याची संधी प्राप्त होते.

याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक विनोद असा क्रांतीकार व जग बदलण्यासाठीच अवतरतो. किंबहुना जे कवितेचे किंवा साहित्याचे, कलेचे किंवा कलाकार, कवी, साहित्यिकाचे तेच विनोदाचे किंवा विदूषकाचे. जे जे खास लोकप्रिय म्हणून, सर्वोत्तम म्हणून गणले जातात अशांपैकी बरेचसे मुख्यत: प्रतिगामी किंवा प्रतिक्रियावादी (reactionary) विनोद व विदूषक असतात. समाजात ज्या व्यवस्थेला, तत्त्वांना वा विचारांना बहुसंख्यांची मान्यता आहे, जे नैतिक मानण्याची प्रथा आहे, ज्या चालीरीती रूजल्या आहेत त्यांना बळकट करण्याचे कामच असे व बहुसंख्य विनोद सतत करीत असतात.

आपल्याकडे चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे ते दादा कोंडके, बेर्डे किंवा आर. के. लक्ष्मण ते अगदी अलीकडच्या काही प्रसिद्ध व्यंगचित्रकारापर्यंत अनेकांचे प्रसिद्ध विनोद तपासले तर त्यांनी समाजस्थिती बदलू न देण्याच्या प्रक्रियेला कशी मदत केली आहे हेच दिसून येईल. याचा अर्थ त्यांची विनोदबुद्धी व प्रतिभा यांना कमी लेखण्याचा माझा प्रयत्न नाही; त्यांनी हसविण्याचे व मुख्यत: मध्यमवर्गीय हालअपेष्टांचे चित्रण व व्यंग यांच्या मर्मावर निश्‍चितच बोट ठेवले, प्रस्थापित राजकीय 'दृश्य' व 'माहीत असलेल्या' (familiar) रचनेवर भाष्यही केले परंतु त्यांच्या असंख्य चुटक्यांतून किंवा व्यंगचित्रांतून समाजबदलाची एकही रेषा ते फार लांब ओढू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे समाजातील प्रस्थापित मुद्द्यांची मदत व आधार घेऊन गोडसे-आपटे नियतकालिके ते ठाकरे काका-पुतणे अशासारख्यांची लोकप्रिय असलेली व्यंगचित्रे मुख्यत: समाजातील भाषा व धर्म यावर आधारित भेदाभेद, सेक्युलर विचारांना विरोध, स्त्रियांना दुय्यम दर्जा, व हिंसा, गांधी-नेहरूंच्या अहिंसात्मक आंदोलनांची चेष्टा, आदी अनेक प्रतिगामी गोष्टींचे प्रतिक्रियावादी राजकारणात रूपांतर करण्यासाठीच उपयोगी पडली आहेत, इतकेच नव्हे तर त्यामुळे समाजातील एकात्मतेला तडे जावून, हिंसात्मक मार्गांना उघड बळ प्राप्त झाले आहे हे आपण अनुभवले आहे व आहोत. आज व्हॉट्सॅपवरून फिरणार्‍या जवळपास ९९% विनोदांचे स्वरूप केवळ बाष्कळच नव्हे, तर समाजातील प्रस्थापित तत्त्वांना बळकटी देण्याचे व दुही-दुफळीचा विचार मांडण्याचेच असते, हे खरे नाही काय? मोदी व शहा यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावर झालेल्या उदयानंतर अशा व विशेषत: हलकट जोक्सना जे उधाण आले आहे त्याची कारणमीमांसा करण्यासाठी एका स्वतंत्र लेखनाचीच गरज आहे.

खरा विनोद (सामाजिक) परिस्थिती बदलण्याचे काम करतो, तो आपल्याला आपल्याबद्दल, आपण कोण आहोत, कोठे व कसे रहात आहोत याची जाणीव करून देतो. आपल्याकडे असा खरा विनोद आकुंचित होत आहे काय? गंगेद्रनाथ टागोरांच्या मुशीतून तयार झालेला व प्रस्थापितांच्या 'भद्र' दांभिकतेवर हसणारा, त्यावर कोरडे ओढणारा विनोद आटत चालला आहे काय, हा खरा प्रश्‍न आहे. विनोदाचा दर्जा, स्वरूप व त्याची मूर्खपणाची सीमा ओलांडण्याची शक्ती यांवर केवळ त्याच्या निर्मात्यांच्याच नव्हे तर त्या त्या समाजात असलेला स्वातंत्र्य, समता, बंधूभाव यांच्या दर्जावर, स्वरूपावर व क्षमतेवर प्रकाश पडतो. आपल्या समाजात 'खरा' विनोद कितपत निर्माण होतो, वा का निर्माण होत नाही याची धुरिणानी चिंता वाहिली पाहिजे.

'द न्यू यॉर्कर' किंवा 'द ओनिअन'सारखे उत्तर आधुनिक, एक तरी नियतकालिक आपल्याकडे आहे काय? पावेल कुझुन्सीसारखा एक तरी व्यंगचित्रकार आपण निर्माण करू शकलो आहोत काय? जॉन स्टुअर्स, बिल मार, डेनिस मिलर, समँथा बी, डेव्हिड क्रॉस, जेनित गारोफालो… अशांसारखा एखादा तरी 'कॉमेडियन' आपल्या निर्लज्जतेची परिसीमा गाठलेल्या समाजाला व त्याचे नेतृत्व करणार्‍या पक्षाला प्रश्‍न विचारून 'हास्याच्या गडगडात चिणून' टाकण्याची मनीषा धरू शकतो काय? आपली विनोदाची व विदूषकाची खंडित झालेली परंपरा कशी साधायची हा प्रश्‍न आपल्याला पडू नये आणि तरीही आपल्या व्हॉट्सॅपवर सतत हास्याचे कारंजे उडावे यातच आपली विदूषक कोलांटी किती खूजी आणि अशक्त आहे याची कल्पना येते.

'द न्यू यॉर्कर' किंवा 'द ओनिअन' किंवा अशाच अन्य काही नियतकालिकांतून जी विनोदचित्रे प्रसिद्ध होतात, सेक्सपासून समलिंगी संबंधांपर्यत, राजकारणापासून कला-साहित्य, चित्रकलेपर्यंत, भष्ट्राचारापासून व्यभिचारापर्यंत, तत्त्वज्ञानापासून गणित आणि पदार्थविज्ञान, वैद्यकीय किंवा अंतराळविज्ञानापर्यंत, स्त्रीमुक्तीपासून वर्ण व वंशवादापर्यंत, मार्क्सवादापासून नव भांडवलशाहीपर्यंत, किंवा यंत्रमानवापासून जनुकीय बदलापर्यंत अशा असंख्य विषयांवर अशा नियतकालिकांतून जे विनोद प्रसिद्ध होतात वा व्यंगचित्रे काढली जातात त्यांतून एका क्षणात एखादा जाडजूड ग्रंथ वाचून जे हाती लागणार नाही, तेवढे मिळाल्याचा साक्षात्कार होतो. कित्येकदा सकाळी असे एखादे नियतकालिक उघडून तासन्‌तास एकटेच हसत असताना आध्यात्मिक आनंदाचा आस्वाद घेता येतो याची प्रचिती मी अनेकदा घेतली आहे. योगाची आणि भोगाची दोन्ही दालने उघडली जातात. आपल्या एवढ्या अवाढव्य देशात व ज्या देशाला विदूषकाची समृद्ध परंपरा लाभली आहे त्या देशात विनोदाचा एक बुडबुडा उमटू नये, एखादा तरंग उठू नये ही केवढी मोठी शोकांतिका आहे.

याचे एक व मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात आपल्याकडे झालेली मुस्कटदाबी हेच आहे. 'प्रतिष्ठेला धक्का बसतो' 'धर्माची वा रूढींचा अपमान होतो' किंवा अशाच भावानांचा भडका उडवणारी भाषणे व संमेलने, मेळावे व मोर्चे काढून आपण आपल्याच स्वातंत्र्याची एकेक दारे बंद करत चाललो आहोत. मोदी, शहा, साधू-साध्वी, भागवत, तोगाडिया किंवा रामदेव बाबा ते श्री श्री श्री यांच्यासारख्या अनेकांच्या प्रत्येक भाषणात आपणांतील एका विदूषकाचा खून केला जातो हे सत्य आपण निर्भयपणे कधी मांडणार यावर आपल्या विनोदतैलबुद्धीचा विकास अवलंबून आहे.

येथे मी मुद्दामच 'द न्यू यॉर्कर' या नियतकालिकाच्या मुखपृष्ठांची काही चित्रे आपल्यासाठी एक प्रयोग करून पाहावा म्हणून देत आहे. ट्रंपच्या अजब आणि खूनशी, वांशिक व धार्मिक, वर्ण आणि अतिश्रीमंत गोर्‍या राजकारणावर भाष्य करणारी ही चित्रे आहेत. या चित्रात ट्रंपच्या जागी मोदी, अमितशहा, योगी किंवा असेच कुणी कुणी केवळ कल्पना म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यापैकी अनेकांना भीती वाटेल. प्रत्यक्ष चित्र काढणे दूर वा विनोद करणे त्याहून दूर. पंतप्रधानांची बेदिली केली म्हणून अटक होणे ही गोष्ट आपल्याकडे नवी नाही. महापुरूष वा देवदेवता यांच्याकडे तर साधा वक्रोक्त कटाक्ष टाकणे म्हणजे लिंचिंग जमावाच्या मारहाणीलाच निमंत्रण देणे हेही नित्याचे झाले आहे. सारा समाजच खूनशी व आंधळा, संवेदनाहीन व अमानुष बनत चालला आहे.

३० जुलै न्यू यॉर्कर २७ ऑगस्ट २०१७ न्यू यॉर्कर मुखपृष्ठ
'द न्यू यॉर्कर'ची निवडक मुखपृष्ठे. उजवीकडे बॅरी ब्लिटचे 'अॅट द वील'

हा लेख लिहीत असतानाच टिव्हीवर शशी थरूर यांच्या 'शंकराच्या पिंडीवरच्या विंचवाला हातही लावता येत नाही व वहाणेने ठेचताही येत नाही.' या सहा वर्षांपूर्वीच्या व्यंगविनोदी विधानावर आपल्या केंद्रीय मंत्र्यांची, रविशंकर प्रसाद यांची 'आमच्या धार्मिक भावनांशी खेळू नये' अशी आक्रमक प्रतिक्रिया व त्यावरची चर्चा असा एकूणच 'आनंदी आनंद गडे' कार्यक्रम चालू आहे. या वातावरणात कोणता विदूषक आपली निमूळती टोपी डोक्यावर चढवायला धजावेल? छप्पन इंची छाती पाहून किंवा रामदेवबाबाचे किंवा आणि कुठला योगी-संत-साध्वी-महंताचे प्रयोग किंवा त्यांच्या विक्रीचे पसारे बघून जॉर्ज ग्रॉशने ड्रॅग क्वीन काढली असती काय किंवा जॉन हार्टफिल्डने त्याच्या व्यक्तिरेखांना बॅन्डेजमध्ये गुंडाळले असते काय किंवा बेरी ब्लिटसारख्याने 'अ‍ॅट द व्हील'सारख्या चित्रात (वरच्या, 'द न्यू यॉर्कर' मुखपृष्ठांमधले उजवीकडचे चित्र) ट्रंपऐवजी मोदींना मोटारीच्या चालकाच्या जागी बसवले असते काय, एवढ्याच व अशाच प्रश्‍नांपुरते हे प्रश्‍न मर्यादित महत्त्वाचे नाहीत तर असा कुणी प्रयत्न केलाच असता तर त्याची काय अवस्था येथील समाजाने केली असती हा प्रश्‍न जास्त महत्त्वाचा आहे. आपली अवस्था पाळीव कुत्र्यांपासून रानटी कुत्र्यांपर्यंत झपाट्याने कशी घसरली हा प्रश्‍न जास्त महत्त्वाचा आहे.

शेवटी मला आवडणार्‍या दोन व्यंगचित्रकारांच्या चित्रांच्या लिंक्स येथे मी मुद्दाम देत आहे; त्या अवश्य पाहाव्या.


पावेल कुचिन्स्की पावेल कुचिन्स्की
पावेल कुचिन्स्की

 रोजेलिओ नरान्हो  रोजेलिओ नरान्हो  रोजेलिओ नरान्हो
 रोजेलिओ नरान्हो  रोजेलिओ नरान्हो

त्याचबरोबर झिझेकच्या पुस्तकातील एक विनोद आपल्या सर्वांसाठी, माझ्यासकट सर्वांसाठी जसाच्या तसा लिहित आहे. त्याचे मराठी भाषांतर केले तर कुणी सनातनी माझ्यावर अश्‍लीलतेचा खटला भरेल म्हणून मूळ इंग्रजीत जसा आहे तसाच देत आहे :
In the good old days of really existing socialism, a joke was popular among the dissidents - a joke to illustrate the futility of their protests.

"In 15th century Russia occupied by Mongols a farmer and his wife walk along a dusty country road. A Mongol warrior on a horse stops at their sight and tells the farmer that he will now rape his wife. He then adds, "But since there is lot of dust on the ground, you should hold my testicles while I am raping your wife, so they will not get dirty." After the Mongol finishes his job and drives away the farmer starts to laugh and jump with joy. The surprised wife asks him, "How can you jumping with joy when I was brutally raped?" The farmer answers, "But I got him, I did not hold them all the time, his balls are full of dust."

आपल्याकडील विनोदाची आणि विरोधाची, प्रतिभेची आणि चळवळीची अवस्था त्या शेतकर्‍याच्या (आनंदी) अवस्थेपासून वेगळी आहे काय? झिझेक म्हणतो, "We have hitherto only dirtied with dust the balls of those in power. The point is, to cut them off." आपल्या विदूषकासमोर आव्हान फार मोठे आहे, आणि हसण्याचा व टाळ्यांचा प्रिरेकॉर्डेड विनोद ऐकवण्याचा व ऐकण्याची सवय झालेल्या समाजात हे आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet