विनोद दुआके साथः गंगेची साफसफाई

विनोद दुवाविनोद दुवा हे मुक्त वृत्तपत्रकार असून आजकाल ‘दि वायर’साठी दर आठवड्याला ‘जन मन धन की बात’ नावाचा कार्यक्रम सादर करत असतात. आपल्या देशाच्या राजकीय व सामाजिक घडामोडीवरील त्यांची टीका-टिप्पणी नक्कीच उद्बोधक असते.
एपीसोड 240 मधील त्यांच्याच शब्दातील संपादित आशय ऐसी अक्षरेच्या वाचकांपर्यंत पोचवावे म्हणून हा प्रयत्न.

नमस्कार,

एक गोष्ट स्पष्ट होत आहे की आताच्या आपल्या शासन व्यवस्थेनी चार वर्षे वाया घालवली. चांगले काम करून दाखवण्याची चांगली संधी गमावली. त्यांना अपेक्षित असलेले स्पष्ट बहुमत आहे, 19 राज्यात त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे, शिवाय आपल्याला हवे त्या लोकांची मोक्याच्या ठिकाणी बसवण्याची मुभा आहे. हे सर्व असूनसुद्धा (पूर्वीच्या भ्रष्ट शासनाच्या तुलनेत) एक चांगली संधी या शासनाने गमावली आहे. हे शेवटचे वर्ष आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारकडून हिशोब मागण्याची ही वेळ आहे. प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी गेली चार वर्षे वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याची ही वेळ आहे. आमचे त्यांच्याशी कुठलेही वैरत्व नाही. नाराजी नाही. ज्या प्रकारे कर संकलन अधिकारी उत्पन्नाच्या स्रोताचा हिशोब मागतो, ते, 10 हजार असो वा एक लाख, कुठून आले, कसे खर्च केले अशी पूछताछ करू शकतो, तशाच प्रकारे एक नागरिक म्हणून आपल्याला आपण निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारणे हा आपला मूलभूत हक्क आहे. व एक कर्तव्यही आहे. आम्ही कर रूपात भरत असलेल्या पैशाचे काय केले?

चार वर्षापूर्वी 24 एप्रिल 2014 रोजी एका जाहीर सभेत नरेंद्र मोदी - अजून ते प्रधान सेवक झाले नव्हते – यांनी आपल्या भावपूर्ण भाषणात गंगामाई, एका पुत्राच्या प्रतीक्षेत आहे, जो तिचे शुद्धीकरण करेल असे विधान केले होते. परंतु चार वर्षे झाली, अजूनही गंगामाई स्वच्छ झाली नाही. परंतु त्यासाठी केलेल्या पैशाच्या तरतुदीचा, साफसफाईवर केलेल्या खर्चाचा लेखाजोखा मी मागत आहे.

या शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या 195 प्रकल्पासाठी मार्च 2018 पर्यंत 26101 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील फक्त 4254 कोटी रुपयेच आतापर्यंत खर्च झाले आहेत. म्हणजे केवळ 20 टक्के! या नदीच्या साफसफाईच्या कामासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लीडींग अँड फायनान्स या खाजगी कंपनीला कंत्राट दिलेले आहे. त्यांच्या अहवालात गंगानदीवरील 93 घाटांपैकी अनेक घाटांचे स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे नमूद केले आहे. परंतु बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीतील केमिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक पी के मिश्रा यांच्या मते या कंपनीने गंगेच्या खोलात जावून स्वच्छता केली नसून फक्त दाखवण्यापुरती कॉस्मेटिक बदल केले आहेत. लहान सहान कामे पूर्ण झाली असतील, परंतु घाट स्वच्छ ठेवणे म्हणजे गंगानदी स्वच्छ केले आहे असे होत नाही.

गंगानदीची समस्या फार वेगळी आहे. या संबंधात राष्ट्रीय हरित आयोगानेसुद्धा उत्तर प्रदेशच्या सरकारला वेळोवेळी धारेवर धरलेले आहे. 2016 साली गंगानदीच्या साफसफाईच्यासंबंधी टिप्पणी करताना राष्ट्रीय हरित आयोगाने गंगानदीत मृत शरीरांची विल्हेवाट लावली जाणे हे एक कारण असू शकते, असे विधान केले होते. नदीकाठच्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हिंदू धार्मिक पद्धतीप्रमाणे लग्न न झालेल्या कुमारिका वा लहान मुलं मृत झाल्यास त्यांच्या मृत शरीराला अग्नी न देता नदीत फेकल्या जातात, हेही एक कारण असू शकते. नदीकाठचे दवाखाने नातलगांनी ताबा न घेतलेल्या बेवारशी प्रेतांची विल्हेवाटसुद्धा या नदीत फेकून करतात. यांचा प्रतिवाद करताना उत्तर प्रदेशचे पोल्यूशन कंट्रोल बोर्डचे मुख्यस्थ एकही प्रेत नदीत फेकले जात नाहीत, फक्त घाटावर अस्थीविसर्जन केले जाते व तेही कढल्या जात आहेत असे सांगत आहेत. परंतु स्थानिक लोक या प्रतिवादाशी सहमत नाहीत.

वाराणसी शहरातून दर दिवशी 321.5 मिलियन लिटर्स एवढे घाण पाणी भुयारी गटारातून वाहते. त्यापैकी येथील मैला शुद्धीकरण प्लँटमधून 101.8 मिलियन लिटर्स पाणी शुद्ध करून शेती कामासाठी वापरले जाते. बाकी सर्व घाण पाणी गंगानदीत सोडले जात आहे. वरुणा व असी या नदीद्वारे हे घाण पाणी गंगेत जाते. वाराणसी हे नावसुद्धा या नदीवरून पडले आहे. या शहराला बनारस या नावानेसुद्धा ओळखले जाते. यापूर्वी या शहराला काशीसुद्धा म्हणत असत. या शहरातील अनेक मैला पाणी शुद्धीकरण प्लँट्स राजीव गांधीच्या शासनाच्या वेळी मंजूर झाले होते. आता हे प्लँट्स जुने झालेले आहेत. त्यांचे तंत्रज्ञान जुने आहे. येथील कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नाही. शिवाय विजेच्या तुटवड्यामुळे प्लँट्स पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. विजेच्या तुटवड्याबद्दलच्या टिप्पणीशी पूर्वांचल वीज बोर्ड सहमत नाही.

वाराणसीतील घाण पाणी वाहून नेणारी भुयारी गटार यंत्रणा ब्रिटिशांच्या काळातील 1917 सालची असून शंभर वर्षे जुनी आहे. भुयारी पाइप्स मोडकळीस आलेली आहेत. मानवी आणि प्राण्यांची विष्टासुद्दा या पाइप्समधून नदीत जात असावे. पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारातील अशुद्ध पाण्याबरोबर गंगेत जात असावे. जपानच्या एक इंटरनॅशनल कंपनीकडून अत्याधुनिक शुद्धीकरण प्लँट विकत घेतले जात आहे. या सर्वांच्या तपशिलात जायचे कारण नाही.

मला एवढेच सांगायचे आहे की गंगानदीच्या शुद्धीकरणासाठीचे पैसे खर्च झाले नाहीत. चार वर्षे झाले तरी अजूनही काम रेंगाळत आहे. 20 हजार कोटीपैकी फक्त चार हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. 65पैकी 24 प्रकल्पावर हे पैसे खर्च झालेले आहेत. परंतु हे प्रकल्प फारच फुटकळ असून नदीच्या काठावरील घाटांची डागडुजी वा नदीच्या तोंडावरील साफसफाई किंवा नदीच्या पृष्ठभागावर साचलेल्या बाटल्या, निर्माल्य, हार तुराई इत्यादींच्या विल्हेवाटीची कामे पूर्ण झाली असावीत. परंतु मूळ गंगानदीची अजूनही साफसफाई झाली नाही. 11 राज्यातून वाहत येणाऱ्या या नदीत रोज 12000 मिलियन लिटर्स अशुद्ध पाणी मिसळते. या नदीच्या जवळ पास केवळ 4000 मिलियन लिटर्स क्षमता असलेल्या अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण यंत्रणा आहे. त्यापैकी फक्त 1000 मिलियन लिटर्स पाण्याचे शुद्धीकरण होत आहे. बाकी सर्व घाण पाणी नदीतून वाहत जाते. जेथे खरोखरच समस्या आहे त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्याचा विचार केला जात नाही. कानपूर शहरातील चामड्याच्या उद्योगामूळे होणारे जल प्रदूषण, नदीकाठावरील इतर उद्योगामूळे होत असलेले जल प्रदूषण इत्यादीबद्दल काही उपाय योजनांचा गंभीरपणे विचार झालेला दिसत नाही.

राजीव गांधीच्या कालखंडात सुरु झालेला हा प्रकल्प मोदींच्या कालखंडात अजून त्याच अवस्थेत आहे. गंगामाई मला खुणावते आहे, माझ्यासारख्या पुत्राच्या शोधात आहे, असली अभिनिवेशपूर्ण भाषणं गंगेला शुद्ध करत नाहीत. वाराणसी तर प्रधानसेवकाचा मतदार संघ आहे. अलीकडेच जगातील अत्यंत प्रदूषित असलेल्या 20 शहरांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या 20 पैकी 14 शहरं भारतातील, त्यातही उत्तर भारतातील शहरं आहेत. त्या यादीत वाराणसीचासुद्धा समावेश आहे. वाराणसीला जपानमधील क्योटोसारखे शहर बनवण्याची स्वप्नं दाखवले जात होते. क्योटो नसले तरी चालेल, परंतु जी काही आश्वासनं दिली होती ती तरी पूर्ण करावेत. चार वर्ष संपली. अजून एक वर्ष शिल्लक आहे. या एका वर्षात आपण किती परिवर्तन आणू शकता याची कल्पना मला नाही व त्याचा अंदाजही करत येत नाही.

उमा भारतीने गंगेचे शुद्धीकरण न झाल्यास आत्मसमर्पण करणार असे विधान एका भाषणाच्या वेळी केले होते. तशी वेळ तिच्यावर येणार नाही, अशी आशा करू या.

आभारः द वायर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यासंबधात Indian Express मधील बातमी वाचनीय आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक गोष्ट स्पष्ट होत आहे की आताच्या आपल्या शासन व्यवस्थेनी चार वर्षे वाया घालवली. चांगले काम करून दाखवण्याची चांगली संधी गमावली.

भंकस विधान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नानावटी नाना विनोदी लेख आणून त्यांची भाषांतरे डकवत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0