माइंड द मॅटर

शहरभर झाली आहेत माणसं.
शहरभर झालेल्या पदार्थांइतकीच.
बेचव, निर्जीव, जिंकून घेतलेली, वापरली जाणारी.
पदार्थाचे गुणधर्म असणारी माणसं.
घनरूपातून द्रवरूपात जाणारी माणसं.
वस्तूंच्या अनिमिष अस्तित्वासारखीच अनिमिष जगणारी माणसं.
प्रत्येक अॅक्शनला जास्तच इक्वल आणि ऑपोझिट रिअॅक्शन देणारी माणसं.
बाह्यबलाशिवाय न हलणारी माणसं.
आंतरिक सत्य अणू-रेणूंसारखं अदृश्य ठेवणारी माणसं.
पॉलिथिनसारखी अमर माणसं.
फळाच्या सालीसारखी बायोडिग्रेडेबल माणसं.
सुट्या सुट्या मूलद्रव्यांनी बनलेली, आपल्या जागी ठाम उभी असणारी माणसं.
मज्जासंस्थेचे अक्षांश-रेखांश अंगभर वागवणारी माणसं.
खनिज सापडावं तसं अचानक सापडणारी माणसं.
उकरून काढावी लागणारी माणसं.
डोंगरावर पसरेल्या दगडांसारखी माणसं.
उष्ण अनुभवानं प्रसरण पावून समतेचा प्रचार करणारी आणि शीत अनुभवानं आकुंचित होऊन पेंटहाऊस बांधणारी माणसं.
पृथ्वीच्या पोटात राहणारी माणसं.
परजीवी प्रकाशात चमकणारी चंद्रासारखी माणसं.
स्वतःच प्रकाश असणारी आणि स्वतःच स्वतःला जाळून घेणारी सूर्यासारखी माणसं.
फॉसिल्ससारखी विखुरलेली माणसं.
वाळवंटातल्या वाळूसारखी एकत्र एकत्र माणसं.
जवळच्याच पण वेगळ्या घटकपदार्थात मिसळताना खळखळ करणारी माणसं.
पदार्थांनी बनलेली, पदार्थमय माणसं.

मला प्रश्न पडतोय - Is the mind all matter? Or all the matter has mind?

field_vote: 
0
No votes yet