श्रीविठ्ठलः एक महासमन्वय
रा. चिं. ढेरे गेले. त्यांना मी कधी पाहिले नव्हते, भेटले नव्हते किंवा भेट घ्यायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. पण त्यांच्या लिखाणातून मी त्यांना इतकी उराउरी भेटले होते, की त्यांना मी फार जवळून ओळखत होते असे वाटते. संशोधन कसे करावे आणि ते कसे सादर करावे याचे धडे त्यांच्या लिखाणातून मिळत राहतात. अतिशय काटेकोर संशोधनपद्धती वापरून संशोधन करणारा, शोधाच्या नव्या वाटा, नवी साधने शोधणारा आणि ते संशोधन ललित भाषेत मांडणारा एक प्रकांड विद्वान म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटतो, तशी आपुलकीही. कारण त्यांचे संशोधनपर लिखाण पोटार्थी नाही, रुक्ष नाही, बढतीच्या मिषाने केलेले नाही. ते फार जिव्हाळ्याने लिहिलेले आहे. पुन्हा शोधवस्तूविषयी जिव्हाळा असला, तरी संशोधन वस्तुनिष्ठ आहे. श्रीविठ्ठल: एक महासमन्वय हे त्यांचे पुस्तक वाचून तर मी त्यांच्या प्रेमातच पडले. (प्रकाशक - पद्मगंधा; या पुस्तकाचा Anne Feldhaus यांनी केलेला इंग्रजी अनुवादही आता प्रसिद्ध झाला आहे. प्रकाशक - oup.) समीक्षा या सदरात लिहीत आहे, तरी मी लिहीत आहे, ती समीक्षा नाही. श्रीविठ्ठल हे पुस्तक वाचताना जो अवर्णनीय आनंद मला मिळाला, त्या आनंदाला कुपीत पकडून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. रुक्ष शब्दांत सांगायचे, तर हा त्या पुस्तकाचा (मला समजलेला) सारांश आहे. पुस्तकातील सगळे मुद्दे यात येणार नाहीत, कारण मला व्यक्तिशः ज्यात जास्त रस वाटला, तेवढेच मी टिपून ठेवले होते.
विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानले जाते. विष्णू या शब्दाचा अपभ्रंश विठू अशी धारणा पूर्वी होती. पण विठ्ठल हा मूळचा गोपजनांचा म्हणजे आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रातील गवळी-धनगरांचा आदिम देव होता, विष्णूचा अवतार हे रूप त्याला नंतर मिळाले असा सिद्धांत ढेर्यांनी या पुस्तकात मांडला आहे. बहुजनांच्या दैवतांना जेव्हा लोकप्रियता मिळते, तेव्हा अभिजनांचे नेते त्या दैवतांचे उन्नयन करण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. बहुजनांतही प्रतिष्ठाप्राप्तीसाठी अभिजनांचं अनुकरण करण्याची प्रवृत्ती असते. याला ढेर्यांनी उन्नयनप्रक्रिया म्हटले आहे. विठ्ठलाचे सध्याचे रूप अशा 'उन्नयनप्रक्रिये'तून घडले आहे, अनेक दैवते व पंथांच्या समन्वयातून बनले आहे, असे या पुस्तकातील प्रतिपादनाचे सार सांगता येईल.
वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची महती गाणारी स्थलपुराणे उपलब्ध आहेत, पण ती भरताड असल्यामुळे अभ्यासकांनी अशा पुस्तकांकडे लक्ष दिले नव्हते. ढेर्यांनी मात्र स्थलपुराणांसारख्या ग्रंथांचे सांस्कृतिक अभ्यासातील महत्त्व ओळखून पंढरपूरचे स्थलपुराण हे विठ्ठलाच्या संदर्भातील संशोधनाचे आद्य (सर्वात जुने) साधन आहे, हे दाखवून दिले आहे. विठ्ठलाच्या 'वैष्णवीकरणात' आणि पंढरपूर क्षेत्राच्या पावित्र्यसंभाराच्या उभारणीत 'पांडुरंगमहात्म्य' या स्थलपुराणाचा मोठा वाटा होता.
विठू सावळा आहे, मग त्याला पांडुरंग हे नाव कसे? ढेर्यांच्या मते, पांडुरंग हे आधी केवळ क्षेत्राचे नाव होते - पंडरगे (पंढरी) या कन्नड ग्रामनावाचे संस्कृत (अपभ्रष्ट) रूप पांडुरंग. पुढे तेच नाव त्या क्षेत्रीच्या देवाला मिळाले. पुंडलीक हे नावही पंडरगे या नावाचे एक प्रकारचे संस्कृतीकरण आहे. या नावाच्या स्पष्टीकरणासाठी पुंडलिकाची कथा रचली गेली, आणि या पौराणिक कथेच्या आधारे विठ्ठलाचे नवे रूप उभे राहिले.
विठ्ठलु 'कानडाउ' आहे, त्याचे मूळ निश्चितपणे दक्षिणेकडे आहे. विठ्ठल आणि वेंकटेश या दोन्ही देवांत बरीच साम्ये आहेत. (उदा. घोंगडीची आवड, कटीवर हात, बायका रुसणे व निघून जाणे, शंखचक्र धारण न करणे इ.) हे दोन्ही देव सध्या वेगवेगळ्या रूपांनी वेगवेगळ्या स्थानी नांदत असले, तरी ते दोघेही एकाच लोकदैवताचे उन्नयन होऊन निर्माण झाले आहेत. हे मूळ लोकदैवत कोणते? तर गवळी-धनगरांचे 'विठ्ठल-बीरप्पा' हे जोडदेव. बीरप्पा (विरोबा) हे मुख्य दैवत, तर विठ्ठल हा सहयोगी देव. दक्षिणेतील लिंगायतांच्या प्रभावामुळे या बीरप्पाचे रूपांतर अनेक ठिकाणी वीरभद्र या शैव दैवतात झाले. जेव्हा गवळी-धनगर लिंगायत झाले, तेव्हा त्यांचे मूळ दैवत बीरप्पा याला लिंगायत्/शैव पंथात सामावून घेण्यासाठी बीरप्पाला वीरभद्र या शैव दैवताचे रूप देण्यात आले. तिरुमलैचा वेंकटेश (बालाजी) हाही एके काळी शैव मानला जात होता. पुढे रामानुजचार्यांनी या मूर्तीला वैष्णव ठरवले. पण बाहूला सापाचा वेढा, हातात शिवलिंग ही वेंकटेशाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये ती शैव असल्याचे दर्शवतात. विठ्ठल-बीरप्पा जोडदेवांतील बीरप्पा कधी शैव (वीरभद्र), तर कधी वैष्णव (वेंकटेश) रूपात पूजिला गेला.
पंढरीचा विठोबाही विष्णू/कृष्णरूप पावण्याआधी शैव रूपात पूजिला जाई. विठ्ठलाच्या काही क्षेत्रांत त्याच्या शैवीकरणाची प्रक्रिया घडलेली दिसते. कालांतराने विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाले. लीळाचरित्रातील एका कथेत विठ्ठलाला गाई-चोर म्हटले आहे. गाई चोरल्यावर झालेल्या युद्धात मरण पावला, म्हणून त्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारला असा उल्लेख लीळाचरित्रात आहे. इथे विठ्ठल हा क्षुद्र देव आहे. महानुभवांचे आराध्य दैवत कृष्ण याच्याशी विठ्ठलाचे ऐक्य कल्पिलेले नाही.
पंढरपूरला आजही पुंडलिकाच्या मंदिरात लिंग आहे. म्हणजेच, पुंडलिक हा शिव स्वरूपात पूजिला जातो. हे कसे? ढेर्यांचे उत्तर असे, की जेव्हा पंढरपुरात विष्णू/कृष्णरूप विठ्ठलाचे महत्त्व वाढले, तेव्हा पुंडरीकेश्वर या शिवस्थानाचे वैष्णवीकरण होऊन त्याला विठ्ठलाच्या परिवारात स्थान मिळाले. दृश्यतः शिव असणारा पुंडरीकेश्वर हाच विठ्ठलभक्त पुंडलिक आहे, असे मानले जाऊ लागले. संतपरंपरेतही विठ्ठलात हरि-हर ऐक्य पाहिले गेले आहे. एवढेच काय, संतांनी विठ्ठलालाच विष्णूचा नववा अवतार - बुद्धही मानले आहे. विठ्ठल हाच बुद्ध असल्याची कल्पना अनेक चित्रा-शिल्पांतूनही दिसून येते. एकेकाळी महाराष्ट्रात प्रचंड बौद्ध प्रभाव होता, आणि पुढे बौद्ध धर्म इतर संप्रदायांत लय पावला असावा असे मत ढेर्यांनी मांडले आहे. बाविसावा जैन तीर्थंकर नेमिनाथ याच्याशी विठ्ठलाचे ऐक्य कल्पून विठ्ठलाशी नाते जोडण्याचा प्रयत्न जैनांनीही केला, पण अयशस्वी ठरला. श्रीरामभक्त रामदासांचेही विठ्ठलावर प्रेम होते.
शास्त्री-पंडित अगोदर विठ्ठल-विन्मुख होते, पण विठ्ठलाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांनाही विठ्ठलाचा स्वीकार करणे भाग पडले. त्यासाठी अनेक महात्म्ये, स्तोत्रे, विठ्ठलगीता, पोथ्यांची निर्मिती झाली. विठ्ठल व पंढरपुरासंबंधी कर्मकांडे, विधींची निर्मिती झाली. वेदांतील मंत्रांचा विठ्ठलपर अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला. हे संतांच्या विचारांशी विसंगत होते. विठ्ठलाचे भक्त असलेल्या संतांनी हेतुपूर्वक मराठीत म्हणजे लोकांच्या भाषेत साहित्य निर्माण केले होते, शास्त्री-पंडितांनी या ग्रंथांचे संस्कृतात भाषांतर केले.
असा विठ्ठल बहुरूप आहे. विविध पंथातील दैवतांच्या समन्वयातून सिद्ध झाला आहे.
माझा व्यक्तिगतरीत्या देवावर विश्वास नाही. पण समाज बहुसंख्येने, शतकानुशतके देवश्रद्ध आहे. धर्म, दैवते, श्रद्धा यांनी आपल्या संस्कृतीचा मोठा भाग व्यापलेला आहे. अगदी आपल्या भाषेचा विचार करतानाही त्यावरील धर्माचा प्रभाव नजरेआड करता येत नाही. त्यामुळे समाजाचा अभ्यास, विचार करताना धर्माचा, दैवतांचा, समाजाच्या श्रद्धास्थानांचा विचार करावाच लागतो. या भावनेतून मी ढेर्यांची पुस्तके वाचली. पण त्यातून मला 'एका विशिष्ट देवासंबंधी माहिती' किंवा 'संस्कृतीतील काही घटकांची माहिती' यापलीकडे बरेच काही मिळाले. गाणी ऐकताना एखादा रंगून जातो, तशा प्रतीचा आनंद मिळाला.
ढेर्यांच्या संशोधन व लिखाणातील शास्त्रशुद्धता, तटस्थता आणि ओलावा एक शतांश जरी मी माझ्या कामात उतरवू शकले, तरी बरे!
प्रतिक्रिया
चांगली आणि थोडक्यात माहिती
चांगली आणि थोडक्यात माहिती आली आहे पुस्तकाची.
रिव्ह्यूबद्दल धन्यवाद. हे
रिव्ह्यूबद्दल धन्यवाद. हे पुस्तक नै वाचले, खंडोबावाले वाचले आहे. त्याचीही स्टाईल आवडली. हेही वाचले पाहिजे.
जाता जाता:
याच्याशी मी नक्कीच सहमत आहे. पण ही सहमती निव्वळ चार पुस्तके वाचून आलेली आहे. या मांडणीच्या मुळाशी कधी गेलो नसल्याने एक सवाल असा येतो की ह्या उन्नयनप्रक्रियेची प्रथम मांडणी कोण केली? आणि भारतात केली की भारताबाहेर केली? आयदर वे, याचा/ची पहिला उद्गाता/उद्गात्री कोण?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Sanskritization
सामाजिक बाबतीत खालच्या जाती वरच्यांचे अनुकरण करतात ह्याला Sanskritization म्हणतात. ढेरे ह्यांचे 'उन्नयन' असेच दिसते. Sanskritization ही समाजशास्त्रीय संकल्पना प्रथम प्रा. एम. एस. श्रीनिवास ह्यांनी ओळखली असे दिसते.
ही संकल्पना त्यांनी प्रथम आपल्या 'Religion and Society among the Coorgs of South India' नावाच्या १९५२ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये मांडली. त्यामध्ये पान ३० वर ही संकल्पना सारांशरूपाने अशी दिली आहे:
The caste system is far from a rigid system in which the position of each component caste is fixed for all time. Movement has always been possible, and especially so in the middle regions of the hierarchy. A low caste was able, in a generation or two, to rise to a higher position in the hierarchy by adopting vegetarianism and teetotalism, and by Sanskritizing its ritual and pantheon. In short, it took over, as far as possible, the customs, rites, and beliefs of the Brahmins, and the adoption of the Brahminic way of life by a low caste seems to have been frequent, though theoretically forbidden. This process has been called "San-skritization" in this book, in preference to "Brahminization," as certain Vedic rites are confined to the Brahmins and the two other "twice-born" castes.
श्रीनिवास ह्यांनीच लिहिलेली ह्यावरील एक टिप्पणी येथे पाहता येईल.
श्रीनिवास ह्यांच्या प्रतिपादनानुसार प्रत्येक वेळी हे 'उन्नयन' ब्राह्मणीकरणाच्या दिशेनेच जाते असे नाही. त्या त्या वेळी समाजात वर्चस्व असलेल्या गटांच्या दिशेने त्याच्या खालच्या गटांचे 'उन्नयन' चालू असते.
श्रीनिवास ह्यांचे हे निवेदन अगदी नेमके आहे हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासावरून दिसते. पेशवाई गेली आणि इंग्रज आले. त्यानंतर केवळ २० वर्षांमध्ये कँडीच्या पाठशाळेमध्ये इंग्रजी शिकायची स्पर्धा पुण्यातील ब्राह्मणांमध्येच सुरू झाली. मेकॉलेच्या मिनटनुसार एतद्देशीय भाषांना उत्तेजन देऊन त्या भाषांमध्ये युरोपीय ज्ञान यावे अशी अपेक्षा वर्तवली होती. प्रत्यक्षामध्ये पाठशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मराठीची विशेष आस्था नव्हती पण इंग्रजीला खास मागणी होती. ही परिस्थिति उलट करण्यासाठी आणि मराठी शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक आकर्षण वाटावे म्हणून खास शिष्यवृत्त्याहि देऊ करण्यात आल्या होत्या. तरीहि परिस्थिति बदलली नाही. हे अजूनहि चालू आहे. आजच्या दिवसात खेडोपाड्यातूनहि मुलांना प्रथमपासून इंग्रजीच शिकवण्याची अनैसर्गिक रीत अधिकाधिक मूळ धरत आहे.
आपल्या सामाजिक व्यवहारातील अशा 'उन्नयना'चे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचे बदलते लग्नसोहळे असे मी म्हणेन. ४०-५० वर्षांपूर्वीची कमी खर्चाची, सुटसुटीत आणि एक दिवसाची -सकाळ ते संध्याकाळवाली - लग्ने मला आठवतात. गेल्या २० वर्षांमध्ये ती गुप्त झाली आहेत. 'हम आपके है कौन' ह्या चित्रपटावरून महाराष्ट्राला उत्तर हिंदुस्थानामध्ये सधन कुटुंबामध्ये विवाहसोहळे कसे असतात हे पाहण्यास मिळाले आणि त्याचे अनुकरण - गायन, मेहंदी, बारात, डोक्यावर फेटे बांधणे, शेरवाण्या, जिजाजींचे बूट लपविणे इत्यादीसकट - आपल्याकडे येऊन पोहोचले. आपल्याकडचे ब्राह्मण, कुलीन मराठे असे सर्व वरचे वर्ग ह्या अनुकरणात सहभागी आहेत.
तपशिलांशी पूर्ण सहमत. तदुपरि
तपशिलांशी पूर्ण सहमत. तदुपरि मांडणीच्या संदर्भाकरिताही अनेक आभार! पेपर वाचून पाहतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला हे "संस्कृतायझेशन"
मला हे "संस्कृतायझेशन" ढेऱ्यांच्या उन्नयनापेक्षा वेगळं वाटतं आहे. उन्नयनामध्ये अभिजनांनी / 'वरच्या' जातींनी बहुजनांच्या / खालच्या जातीच्या दैवतांना - काहीतरी स्टोऱ्या बनवून - सामावून घेणे. म्हणजे एका अर्थाने वरच्यांनी खालच्यांचं अनुकरण करणे.
संस्कृतायझेशन बरोब्बर उलटं आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी
मलाही अगदी हेच वाटले होते.
या दोन प्रक्रिया वेगळ्या आहेत आणि त्या मागचे राजकीय-सामाजिक हेतूही वेगवेगळे आहेत. बहुजनांतल्या एखाद्या दैवताचे/नेत्याचे/प्रथेचे महत्त्व वाढते आहे हे बघून अभिजनांनी त्याला हायजॅक करणे हा उन्नयनाचा एक प्रकार.
बुद्धावतार
जो लोकप्रिय असेल त्याला आपलेसे करण्याची प्रवृत्ती सार्वकालिक आहे. वैदिकांनी अवैदिक गोतमाला आपले मानून त्याला विष्णूचा नऊवा अवतार करून टाकणे हा त्यातलाच प्रकार. ह्यातले राजकारण असे की अशा नेत्याला मानणारा फार मोठा लोकसमूह आपल्याकडे वळवता येतो. याची प्रचीती आपल्याला आजही येतेच.
जा.जा. : श्री विठ्ठल एक महासमन्वय हे पुस्तक वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेकदा वाचले. प्रत्येक वेळी भाषेतली आपुलकी (रसाळपणा नाही म्हणता येणार, कीर्तनातले गोडवायुक्त पाल्हाळही नाही.) आणि प्रतिपादनातला सहजपणा अधिकाधिक प्रतीत होत गेला. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास दक्खन पठारी संस्कृतीशी समरसता साधल्याशिवाय माहाराष्ट्री संस्कृतीची समग्रता समजणे कठिण. इतिहासाचा मागोवा घेताना केवळ लिखित पुराव्यांवर अवलंबून राहाण्याच्या गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या प्रथेला धर्मानंद कोसंबींनी वेगळे वळण दिले. लोकधारा, लोकपरंपरा यांचा माग काढत सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बहुजनवादी म्हणून कम्यूनिस्ट हा शिक्का त्यांच्यावर बसला खरा, आणि तो थोडाफार खराही होता; पण आज ती वेगळी वाट हाच संस्कृतीच्या इतिहासाचा राजमार्ग बनला आहे. भाषाशास्त्र, पुरातत्त्व, जेनेटिक्स, रसायनशास्त्र, हवामानशास्त्र अशी अनेक नवी आयुधे आता दिमतीस घेऊन अनेक देशीपरदेशी विद्वान बहुजनपरंपरा तपासून त्यांचे मूळ आणि अर्थ शोधण्यात मग्न आहेत. द. ग. गोडसे, दुर्गाबाई भागवत यांनीही या अंगाने लिहिले आहे.
रा.चिं. ढेरे म्हणजे सहृदयता, आत्मीयता आणि अभिनिवेशहीनता. मूर्तिभंजनाचा घणाघाती आवेश नाही की कोणत्याही मताची, इझ्मची पताका खांद्यावर घेऊन त्यानुसार लिहिणे नाही. श्रद्धावर्धन नाही की भंजनही नाही. कोणताही चष्मा चढवणे नाही. किंवा उलट, शक्य झाले ते सगळेच चष्मे एकावर एक चढवून त्यांनी त्यांतून आरपार पाहिले. प्रत्येक चष्म्यातून त्या चष्म्याच्या क्षमतेनुसार वक्रीभूत, परिवर्तित होत होत गाळीव उरलेले असे ज्ञानकिरण त्यांनी ग्रहण केले. प्रचंड वाचन, अथक भ्रमंती. थोडा थोडका नाही, चाळीस हजार पुस्तकांचा संग्रह. (संदर्भः लोकसत्ता) खराखुरा ज्ञानयोगी.
खूप मोठे हरपलेपण जाणवते आहे.
उन्नयनप्रक्रियेची प्रथम
ठाऊक नाही, पण हा प्रश्न वाचल्यावर मलाही श्रीनिवास यांनी मांडलेल्या Sanskritization ची आठवण झाली.
मला वाटते उन्नयनप्रक्रियेत दोन्हीचा समावेश आहे - अभिजनांनी लोकदैवतांना हायजॅक करणे + बहुजनांनी प्रतिष्ठेच्या आशेने हायजॅकिंग स्वीकारणे व अभिजनांच्या कर्मकांडांचे अनुसरण करणे.
भारतीय संदर्भात उन्नयन म्हणजे संस्कृतीकरण व वैदिकीकरण असे ढेर्यांनी म्हटले आहे. हे पुस्तक माझ्याजवळ नाही, पण ढेर्यांनी वापरलेल्या 'संस्कृतीकरण' या संकल्पनेचा अर्थ काहीसा वेगळा असावा, असे वाटते (लोकदैवतावर संस्कृत भाषेत ग्रंथ रचले जाणे वगैरे).
यावरून अल्लोपनिषदाची आठवण झाली. काय बरे होते ते? अस्मलां इलल्ले मित्रावरुणा दिव्यानिधत्ते.......अल्लाम् इलल्लेतिलल्लः
साईबाबांच्या मंदिरात काकड
साईबाबांच्या मंदिरात काकड आरती आणि सोवळ्यातला पुजारी असणे म्हणजे संस्कृतीकरण
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गणपती
गणपती हे दुसरे उदाहरण.
गणपतीच्या बाबतीत तर दोनदा
गणपतीच्या बाबतीत तर दोनदा उलटसुलट प्रवास होऊन एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एकेकाळचा हा 'गणनायक', अवैदिकांचे दैवत. त्याचा प्रवास कडक सोवळ्यात षोडशोपचाराने पूजले जाण्यापर्यंत झाला आणि आज पुन्हा तो बहुजनांचा, त्यांच्या बेभान हर्षोल्लासाचा प्रतीकस्वरूप असा देव बनला आहे.
आणि विघ्नकर्त्याचा विघ्नहर्ता झाल्यावर पुन्हा विघ्नकर्ता जरी नाही झाला तरी लोकांच्या बेपर्वा आणि बेभान वागण्यामुळे उत्सवाचे अकरा दिवस अनेकांना संकटाचे वाटू लागले आहेत. त्या अर्थाने तो संकटकर्ता ठरू लागला आहे.
विष्णू या शब्दाचा अपभ्रंश
ढेरे यांचे लिखाण फार वाचलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह बायस नाही ..
पण वरील तर्कांना शास्त्रशुद्ध संशोधन म्हणणे जीवावर येते.
उपयोग?
हे निष्कर्ष काढण्यासाठी राचिंनी काय संशोधन केलं ते तुम्ही वाचलेलं नाही असा निष्कर्ष तुमच्याच वरच्या विधानावरून काढता येतो. मग ढेरे यांची वरची उद्धृत विधानं शास्त्रशुद्ध संशोधनावर आधारित आहेत हे म्हणणं तुमच्या जीवावर येत असेल तर त्याचा तुमच्या वाचकांना नक्की काही उपयोग आहे असं म्हणणं त्यांच्याही जीवावरच येत असावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्याचा तुमच्या वाचकांना माझे
माझे वाचक अशी काही एंटीटी अस्तित्वात नाहिये
बाकी लेखिका ढेरे यांच्या मोठ्या फॅन व वाचक आहेत .. व त्यांनी वरील लेखन हे त्या पुस्तकाचे सार आहे असे म्हटले आहे.. त्यावरून मला ते केवळ तर्क आहेत असं वाटतं.. त्यामागच्या संशोधनाबद्दल काही उल्लेख नसल्याने.. तो उल्लेख असता तर कदाचित वेगळं मत झालं असतं..
अहो सप्रे, न वाचलेल्या किंवा
अहो सप्रे, न वाचलेल्या किंवा अर्धवट वाचलेल्या किंवा वाचूनही न आठवणाऱ्या माहितीवर आधारित समीक्षा करण्याचा अधिकार फक्त समीक्षकांनाच असतो. इतरांनी ते केल्यास त्याचा वाचकांना उपयोग नसतो. इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळू नये म्हणजे

- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मराठीतील भरपूर 'ऐतिहासिक' लेखन हे पूर्णपणे सिद्धांतात्मक असते...
पूर्णपणे सहमत... त्याच्यासारखे एक दुसरे उदाहरण देतो.... द ग गोडसेंचे 'मस्तानी' हे माझे अतिशय आवडते पुस्तक आहे...पण दुर्दैवाने ते जवळजवळ पूर्णपणे सिद्धांतात्मक (speculative) आहे...
माझा आणि गोडशांचा थोडा पत्रव्यवहार होता...मी तसे त्यांना बोलून पण दाखवले....रागावले ते माझ्यावर!...
मराठीतील भरपूर 'ऐतिहासिक' लेखन हे पूर्णपणे सिद्धांतात्मक असते....त्यातील बरेच मी विकत घेऊन प्रेमाने वाचतो...मी ते उधृत सुद्धा करतो...पण मी ते कधीही इतिहास मानत नाही...
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
निष्कर्षाची प्रत
एक सर्वसाधारण विधान म्हणून हे ठीक आहे. मात्र, माझा प्रश्न वेगळा आणि अधिक लेखक-पुस्तकविशिष्ट होता : ढेरे यांचं उपरोल्लेखित लिखाण वाचून त्यातल्या संशोधनाच्या अभावाविषयीचं मत जर बनवलं नसेल, तर त्या मताला एक वाचक म्हणून मी किती ग्राह्य मानावं? वेगळ्या शब्दांत, 'देशस्थ गबाळे असतात, ढेरे देशस्थ होते, म्हणजे त्यांच्या संशोधनाला शिस्त नसणार' असं कुणी तरी म्हटलं तर त्याला किती किंमत द्यावी?
(डिसक्लेमर : ढेरे देशस्थ असायलाच हवेत असा आग्रह नाही. नसायलाच हवेत असाही नाही. बेशिस्त असायलाच हवेत असाही नाही. शिस्तशीर असायलाच हवेत असाही नाही. मुद्दा एवढ्यावरून निष्कर्ष काढण्याचा आहे.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कदाचित वस्तुस्थिती, कदाचित बरोबर, अटकळ, सिद्धांतात्मक...
"विष्णू या शब्दाचा अपभ्रंश विठू अशी धारणा पूर्वी होती
पंडरगे (पंढरी) या कन्नड ग्रामनावाचे संस्कृत (अपभ्रष्ट) रूप पांडुरंग
दृश्यतः शिव असणारा पुंडरीकेश्वर हाच विठ्ठलभक्त पुंडलिक आहे
शास्त्री-पंडित अगोदर विठ्ठल-विन्मुख होते, पण विठ्ठलाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांनाही विठ्ठलाचा स्वीकार करणे भाग पडले."
माझ्या मते:
१> "विष्णू या शब्दाचा अपभ्रंश विठू अशी धारणा पूर्वी होती"= कदाचित वस्तुस्थिती
२> "पंडरगे (पंढरी) या कन्नड ग्रामनावाचे संस्कृत (अपभ्रष्ट) रूप पांडुरंग"= कदाचित बरोबर
३> "दृश्यतः शिव असणारा पुंडरीकेश्वर हाच विठ्ठलभक्त पुंडलिक आहे"= अटकळ
४> "शास्त्री-पंडित अगोदर विठ्ठल-विन्मुख होते, पण विठ्ठलाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांनाही विठ्ठलाचा स्वीकार करणे भाग पडले"= सिद्धांतात्मक
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
सिद्धांतात्मक म्हणजे speculative नव्हे.
'सिद्धान्त' ह्या शब्दाच्या अर्थाचे अनेक पदर आहेत. मोनियर विल्यम्स कोशानुसार त्यापैकी एक पदर म्हणजे
"...established end, final end or aim or purpose, demonstrated conclusion of an argument (or the 4th member of a syllogism following on the refutation of the pUrva-pakSa q.v.), settled opinion or doctrine, dogma , axiom, received or admitted truth."
'Speculation' ह्याला आपटे इंग्लिश-संस्कृत कोशामध्ये समानार्थी शब्द 'विचार, विमर्श, विकल्प, परिकल्पना' असे सुचविले आहेत.
माझ्या नोंदी पुरते तर ते नक्कीच जवळचे शब्द आहेत...
"dogma, settled opinion or doctrine" हे वाचुन तर मला वाटते की माझ्या नोंदी पुरते तर ते नक्कीच जवळचे शब्द आहेत.......पण ते नसेल, तर अर्थ सिद्धांतात्मक and/or speculative असा घ्यावा...e.g. settled-opinionated/ doctrinal/ dogmatic and/or speculative
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
अनभ्यस्त शेरेमारी
आधी चार्वी ह्यांचा छोटा लेख त्यांच्याच शब्दांमध्ये अशा स्वरूपाचा आहे:
<वाचताना जो अवर्णनीय आनंद मला मिळाला, त्या आनंदाला कुपीत पकडून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. रुक्ष शब्दांत सांगायचे, तर हा त्या पुस्तकाचा (मला समजलेला) सारांश आहे. पुस्तकातील सगळे मुद्दे यात येणार नाहीत, कारण मला व्यक्तिशः ज्यात जास्त रस वाटला, तेवढेच मी टिपून ठेवले होते.>
हा अधिककरून 'आनंद कुपीत पकडायचा प्रयत्न आहे', पुस्तकातील सगळे मुद्दे त्यात नाहीत. हे स्पष्ट विधान वाचूनहि सप्रे ढेर्यांचा लिखाणाचा सारांश असा देतातः
<विष्णू या शब्दाचा अपभ्रंश विठू अशी धारणा पूर्वी होती
पंडरगे (पंढरी) या कन्नड ग्रामनावाचे संस्कृत (अपभ्रष्ट) रूप पांडुरंग
दृश्यतः शिव असणारा पुंडरीकेश्वर हाच विठ्ठलभक्त पुंडलिक आहे
शास्त्री-पंडित अगोदर विठ्ठल-विन्मुख होते, पण विठ्ठलाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांनाही विठ्ठलाचा स्वीकार करणे भाग पडले>
आणि त्यावरून ठरवतातः
<ढेरे यांचे लिखाण फार वाचलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह बायस नाही ..
पण वरील तर्कांना शास्त्रशुद्ध संशोधन म्हणणे जीवावर येते.>
आता गंमत पहा. चार्वी ह्यांच्या लेखातली, सलग न येणारी, चार वाक्ये सप्रे उचलतात आणि ती जणू सलग आहेत असे दर्शवून उद्धृत करतात. ती सलग नाहीत असे दर्शविणारे काहीहि ते लिहीत नाहीत. साहजिकच सकृद्दर्शनी कठोर, मर्मज्ञ आणि मूर्तिभंजक टीकाकार असल्याचे अलीकवैदग्ध्य - माझा आवडता शब्द - त्यांना चिकटते आणि तेहि कसे, तर आपण ढेरे ह्यांचे लिखाण फार वाचलेले नाही असे त्यांनीच प्रांजळपणे मान्य केल्यावर! सगळीच मौज आहे!
मला असे वाटते की असली निराधार आणि अनभ्यस्त विधाने फेकण्याअगोदर सप्रे ह्यांनी ढेर्यांचे लिखाण वाचावे आणि मगच ते शास्त्रशुद्ध संशोधन आहे की नाही ह्याचा साधार निर्णय करण्यास बसावे.
निराधार आणि अनभ्यस्त विधाने
वर सरळ लिहिलेले आहे की वरील लेखावरून झालेले मत आहे. त्याची तुमच्या मताशी सहमती नसेलही.
वरील लेखिकेच्या लिखाणात संशोधनाचा काहिही उल्लेख नसल्याने हेही म्हटलय.
ती विधाने म्हणजे ढेरे यांच्या लिखाणाचा सारांश हा तुम्ही ओढून ताणून काढलेला अर्थ आहे.
लेखिकेने ढेरे यांचे संशोधन व लिखाणातील शास्त्रशुद्धपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे असे म्हटले आहे. सहाजिकच वरील लेखातील काही उल्लेखात ते आढळते का हे पहावेसे वाटते. मी उल्लेखलेली वाक्ये सलग न येणारी म्हणून त्यात संशोधन अथवा शास्त्रशुद्धपणा दिसणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर सलग येणारी वाक्ये निवडून त्यात येणारे संशोधनाचे अथवा शास्त्रशुद्धपणाचे योग्य उदाहरण दाखवून द्यावे. अगदी लेखात नसेल तर त्याबाहेरील तुमच्या अभासपूर्ण व्यासंगातून तुम्हाला एखादे उदाहरण देणे कठीण नसावे. माझ्यासारख्याने एखादे विधान फेकलेच तर आपल्या अभ्यासाने योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न व्हावा. ज्यायोगे ढेरे यांचे साहीत्य वाचण्याचा इंटरेस्ट निर्माण होइल. नुसतेच अभ्यास वाढवा/वाचन वाढवा अशा उपदेशाने आपल्या अभ्यासाचा आम्हाला काय फायदा
फेका किती फेकाल दो करांनी
तुम्हाला अनभ्यस्त विधान फेकण्याचा हक्क हवा आहे. इथवर ठीक. वर इतरांनी त्याला झोडू नये असंही वाटतं? कमाल आहे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माझ्या मताला बिनधास्त
माझ्या मताला बिनधास्त फेकाफेकी म्हणा.. पण संशोधन अथवा शास्त्रशुद्धपणाही कोणाला दाखवता येइपर्यंत त्या झोड उठवण्यालाही तेवढीच किंमत रहाते.
शुभेच्छा
तो ढेरे यांनी पुस्तकात दाखवला आहे असा दावा इतर लोक करत आहेत. त्याची शहानिशा न करता, किंवा साधं गूगलही न करता तुम्हाला कुणी तरी सगळं आयतं इथे आणून द्यावं अशी तुमची अपेक्षा दिसते. त्यासाठी शुभेच्छा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अहो पुस्तकात सगळच आहे हो.. मग
अहो पुस्तकात सगळच आहे हो.. मग इथे येउन चर्चेचा काय फायदा. इथे येउन एखादे मत मांडले की त्यावर येणार्या शंका/कुशंकाना उत्तरे मिळायला काय हरकत आहे. माझा अभ्यास वगैरे विषयापेक्षा तुम्हाला झेपत असेल तर उत्तर द्या. बाकी कुणाला कसलं उत्तर आयतं हवय वगैरे प्रत्येकाला ठरवू द्या.
किमान औचित्य तरी...
लेखातली सुरुवात आणि शेवटाची काही वाक्यं -
१. लेख समीक्षात्मक आहे, पुस्तक-परिचय करून देणारा नाही. समीक्षेत कलाकृतीबद्दल (लेख, पुस्तक, चित्रपट, कविता, चित्र, इ) लिहिणारीचं म्हणणं काय आहे हे लिहिलं, बोललं जातं; कलाकृतीचं वर्णन केलं जात नाही.
२. शंका-कुशंकांना उत्तरं द्यायला साधारणपणे आंजावर आढेवेढे घेतले जात नाहीत. पण पुस्तक वाचून मग शंका काढल्या तर उत्तरं द्यायला लोक तयार असतात. अभ्यास न करता 'पेपर खूप कठीण होता' ह्यासाठी लोकांनी किती वेळ काढायचा?
मला हा लेख महत्त्वाचा वाटला. मीसुद्धा ढेऱ्यांचं लेखन वाचलेलं नाही. मला ह्या विषयातच रस नाही, असं आत्तापर्यंत वाटत होतं. चार्वीने माझं मत बदललं. नास्तिक आणि माणसांपासून लांब पळणाऱ्या व्यक्तीने ढेऱ्यांचं लेखन का वाचावं, ह्याचं उत्तर लेखात आहे. माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंका-कुशंकांना उत्तरं द्यायला
याविषयात शास्त्रशुद्ध म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते लिखिकेने खाली एका प्रतिसादात मांडलय. माझ्या अभ्यासाचा बाउ न करता. त्यामुळे ज्यांना खरच काही चर्चा करायची आहे ते करतायत. ज्यांना नक्की प्रश्न समजला नाही त्यांनी उत्तर देण्याऐवजी उगाच भावना दुखावून घेतल्या.
यात ढेरे यांच्याविषती कुठलेही अपशब्द अथवा अवमानकारक उल्लेख नसल्याने आपण औचित्याचा मुद्दा काढल्याचे आश्चर्य वाटले.
अत्यंत सहमत आहे!
अत्यंत सहमत आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
औचित्य, आवश्यकता वगैरे
माझं व्यक्तिगत मत : जर एखाद्या विषयातलं फार काही कळत नसेल, आणि ज्ञानवृद्धी करावीशी वाटत असेल, तर लगोलग आपल्या मताची पिंक टाकण्याऐवजी थोडा नम्रपणा अंगी बाळगून पृच्छा करणं औचित्याला धरून होतं. ज्यांना गंभीर चर्चा करायची असते त्यातले काही जण ती करतात, तर काही जण अनावश्यक शेरेबाजीला कंटाळून गप्प बसतात; चर्चा होवो न होवो, जे अनावश्यक शेरेबाजी करतात त्यांची कृती समर्थनीय ठरते असं म्हणणं धाडसाचं ठरेल. माझ्या बाजूनं लेखनसीमा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जर एखाद्या विषयातलं फार काही
हे पुस्तक वाचलेले नाही यावरून एवढा निष्कर्श कसा काढू शकता?
लेखिकेन तिचे मत माझ्या शंकेवर दिलय तेवढ मला पुरेसं आहे..
तुम्ही उगाच मुद्दा समजून घेण्याआधी अनावश्यक /शेरेबाजी/ फेकाफेकी/ पिंक/उद्धटपणा/अनुचित ठरवून आपल्या नाजूक भावना दुखावून घेताय !!
काव्यशास्त्रविनोद
इथे लेखिकेच्या पुस्तकपरिचयावरून 'ढेरेंच्या तर्कांना संशोधन मानणं जिवावर येतं' ह्या निष्कर्षाप्रत तुम्ही पोहोचलात तसेच.
आणि मी माझं मत अद्यापही खुलं ठेवतो आहे. तुम्ही ह्या विषयात ह्या धाग्यावर अद्यापपर्यंत जे काही लिहिलं आहे त्यावरून जाता तुम्हाला ह्या विषयात काही कळतं अशा निष्कर्षाप्रत मला तरी पोहोचता आलेलं नाही. मात्र, ह्यापुढे तुम्ही आपलं ज्ञान दाखवू शकलात तर मला आनंदच होईल.
माझ्या भावना दुखावलेल्या नाहीत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
'ढेरेंच्या तर्कांना संशोधन
माझा शास्त्रशुद्ध या शब्दाकडे पहाण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक शास्त्रशुद्ध या दिशेने होता त्या अर्थाने हे संशोधन शास्त्रशुद्ध असु शकत नाही त्यामुळे तो निष्कर्श चुकीचा ठरत नाहिये. सामाजिक शास्त्रानुसार शास्त्रशुद्ध्पणा एवढा काटेकोर असु शकत नाही असे खालील चर्चेत दिसून येते.
त्यामुळे तुमच्या निष्कर्शाचा आधार तो नसून
'हा कोण ढेरे यांच्या लेखनावर संशय घेणारा??' या माझ्याकडे बघण्याच्या नजरेत आहे हे स्पष्ट दिसतय.. भावना दुखावलेल्याचेच द्योतक आहे..
मूलभूत
आणि सामाजिक शास्त्रांविषयीच्या काही मूलभूत गोष्टीच ज्याला माहीत नसतील त्याला ह्या विषयातलं फार काही कळतं अशा निष्कर्षाप्रत पोहोचणं माझ्यासारख्याला कठीण जातं. त्यामुळे तुम्ही भावना दुखावून घेऊ नका ही विनंती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सामाजिक शास्त्रांविषयीच्या
शब्दांच्या वापरातील क्लॅरीफिकेशन मिळवणे याचा अर्थ सामाजिक शास्त्रातले काही मूलभूत ज्ञान नाही असे धरणे यातही 'या विषयात याला बोलण्याचा अधिकार काय' असाच दृष्टीकोन दिसून येतो...
ठीक. लेखनसीमा.
ठीक. लेखनसीमा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आभार जंतू.
आभार जंतू.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शास्त्रशुद्ध संशोधन!
* श्रीविठ्ठल हा एक लठ्ठ ग्रंथोबा आहे, त्यातील सगळे मुद्दे इथे उतरवून काढणं शक्य नाही, त्याची गरजही नाही. ते पुस्तक मजजवळ नाही, त्यामुळे तुम्ही निर्दिष्ट केलेले सिद्धान्त ('तर्क') नेमक्या कुठल्या पुराव्यांवरून सिद्ध केलेले आहेत, हे मी याक्षणी सांगू शकत नाही. पण स्कंदपुराणातील पांडुरंगमहात्म्य हे स्थलपुराण, अजून काही महात्म्ये, विठ्ठलगीता, स्तोत्रे व इतर संस्कृत ग्रंथ, पंढरपूर व विठ्ठल यांविषयी प्रचलित असणार्या कथा व प्रथा, अनेक पौराणिक ग्रंथ व पुराणे, माढे येथील विठ्ठलमूर्ती आणि इतर काही मूर्तींच्या स्वरूपाचा अभ्यास, आंध्र व कर्नाटकातील धार्मिक परंपरा, दैवते व प्रथा, भाषिक पुरावे, वीरगळ, महाराष्ट्रातील इतर धर्मपंथांचा इतिहास, शिल्पे व चित्रे, संतकवींचे साहित्य अशा विविध प्रकारच्या पुराव्यांचा भक्कम आधार ढेरे यांच्या या संशोधनाला आहे. त्यामुळे त्यांनी केलेली विधाने हे हवेत मारलेले तीर नाहीत.
* अमुक अमुक कारणांमुळे १८५७चा उठाव झाला असे आपण म्हणतो, तेव्हा काही पुराव्यांच्या आधारे काढलेला तो तर्कच असतो. आपल्याला ते प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. १८५७च्या उठावाला कारणीभूत ठरलेल्या सगळ्या गोष्टी परत घडल्या, तरी उठाव होईलच असे नाही. मग इतिहास हा विषय अशास्त्रीय आहे का? तर नाही. 'शास्त्रा'ची व्याख्याच मुळी पद्धतशीरपणे गोळा केलेली ज्ञानसंपदा अशी आहे. ढेरे यांचे संशोधन शास्त्रशुद्ध या अर्थी आहे, की निरीक्षण करणे, हायपोथिसीस मांडणे, त्याला पुष्टी देणारे व त्याविरुद्ध असे दोन्ही प्रकारचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करून हायपोथिसीस ताडून बघणे व तो चुकीचा निघाल्यास निकालात काढणे या गोष्टी त्यात पद्धतशीरपणे केलेल्या आहेत.
* सामाजिक शास्त्रांच्या संदर्भात 'शास्त्रशुद्ध संशोधन' याचा अर्थ causal explanation (कार्यकारणभाव शोधणे) असाच होईल असे नाही. बर्याच सामाजिक शास्त्रांचा कल causal explanation पेक्षाही सामाजिक घटना, रचना, प्रक्रिया समजून घेणे व त्यांचा अर्थ लावणे/ उलगडणे याकडे असतो. वरील लेखात ज्या प्रकारच्या संशोधनाचा उल्लेख आहे, ते संशोधन सांस्कृतिक प्रतीकांचा अर्थ समजून घेणे अशा प्रकारचे आहे.
History is nothing but gossip about the past...
Gore Vidal: "Everybody likes a bit of gossip to some point, as long as it’s gossip with some point to it. That’s why I like history. History is nothing but gossip about the past, with the hope that it might be true."
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
कोट से कोट जलाते चलो...
"Fools ignore complexity. Pragmatists suffer it. Some can avoid it. Geniuses remove it." - Alan Perlis
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बर्याच सामाजिक शास्त्रांचा
अधोरेखित भागाबद्दलही causal explanation देण्याचा प्रयत्न असला पाहिजे ना?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अधोरेखित भागाबद्दलही causal
अधोरेखित भागाबद्दलही causal explanation देण्याचा प्रयत्न असला पाहिजे ना?
नाही. causal explanation ही शास्त्राभ्यासाची एक पद्धत झाली. सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ती पुरेशी नाही.
१) नैसर्गिक शास्त्रे 'का' घडते याचे उत्तर शोधतील, तर सामाजिक शास्त्रे 'कसे' घडले ते समजून घेतील. समजा एखाद्या क्रांतीत किंवा युद्धात दहा घटना एकामागोमाग एक घडल्या, व परिणामी अकरावी घटना घडली, इतपत दाखवून देता येते पण या दहा घटना अकराव्या घटनेचे कारण आहेत हे सिद्ध करता येत नाही. causal explanation मध्ये ट या कारणामुळे फ हे कार्य घडले असे म्हटले, की जिथे ट तिथे फ असा निष्कर्ष निघतो. असे नियम बनवणे सामाजिक शास्त्रांत शक्य नाही, कारण त्यात मानवी हस्तक्षेप असतो, व माणसे एकाच परिस्थितीत वेगवेगळी वागतात.
२) अर्थ लावणे, समजून घेणे: विशिष्ट समाजाची विशिष्ट मूल्ये, कल्पना, प्रतीके, भाषा असतात. अनेकदा त्यांच्या चष्म्यातून माणसाला बाह्य जगाचे आकलन होत असते. सामाजिक शास्त्रे हा मानवी अनुभव (lived experience) समजून घेत असतात. याला hermeneutic understanding म्हणतात. ही शास्त्राभ्यासाची आणखी एक पद्धत आहे.
नेमक्या कुठल्या पुराव्यांवरून
ठीक आहे.
ऐतिहासिक/ सामाजिक संशोधनासंदर्भात शास्त्रशुद्ध हा शब्द वापरल्याने उत्सुकता निर्माण झाली होती एवढच. तेवढच या लेखात शोधायचा प्रयत्न होता. बाकी हा जिव्हाळ्याचा विषय अजिबात नव्हे.
ऐतिहासिक/ सामाजिक
खरे तर "शास्त्र" हा शब्द सायन्स ह्या अर्थानी वापरायचा सामाजिक, आर्थिक सो कॉल्ड शास्त्रांबाबत हा ही प्रश्नच आहे.
मला एक आवडलेली शास्त्राची डेफिनिशन आठवत नाहीये पण त्यातल्या ३-४ पॅरॅमिटर मधे सामाजिक आणि आर्थिक शास्त्रे कीती बसतात ते बघणे रोचक आहे.
शास्त्रा पेक्षा अभ्यास शब्द योग्य वाटतो.
डेटा अॅनालिसिस - हायपोथिसिस
डेटा अॅनालिसिस - हायपोथिसिस - टेस्ट ऑफ हायपोथिसिस - सर्व्हायव्हल ऑर डिस्कार्डिंग ऑफ हायपोथिसिस
या मार्गाने केलेला अभ्यास शास्त्र या पदवीस पात्र व्हावा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नाही, फक्त इतकेच नाही. १.
नाही, फक्त इतकेच नाही. १. शास्त्र म्हणजे कोणीही प्रयोग केले तरी रीझल्ट तोच. २. कितीही वेळा प्रयोग केला तरी रीझल्ट तोच.
आणि तिसरे महत्वाचे म्हणजे प्रेडीक्शन, जे बरोबर यायला पाहिजे.
असेच अजुन एकदोने पॉईंट. हे जमले तर शास्त्र.
होय अगदी हेच वाचले आहे.
होय अगदी हेच वाचले आहे. स्थलनिरपेक्ष, कालनिरपेक्ष, व्यक्तीनिरपेक्ष.
>>१. शास्त्र म्हणजे कोणीही
>>१. शास्त्र म्हणजे कोणीही प्रयोग केले तरी रीझल्ट तोच. २. कितीही वेळा प्रयोग केला तरी रीझल्ट तोच.
हे शुद्ध शास्त्राला लागू पडेल. पण हा निकष रिजिडली लावला तर मॉडर्न मेडिसिनसुद्धा अ'शास्त्री'य ठरेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे शुद्ध शास्त्राला लागू
एकतर क्लिनिकल ट्रायल्स पुन्हा पुन्हा केल्या तर रीसल्ट सारखेच यायला पाहिजेत. आणि येतात.
आणि मेडीसीन च्या बाबतीत, प्रयोगाच्या सर्व कंडीशन्स सारख्या नसतात ( उदा ज्यांच्यावर प्रयोग केला जातोय त्या व्यक्ती, त्यांचे वंश, सवयी वगैरे वगैरे ), त्यामुळे तोच प्रयोग तसाच्या तसा रीपीट केला असे म्हणता येणार नाही.
पण "क्ष ४.५८३६ वर्जन" जीवाणुं वर "य" प्रतिजैवक काम करते, हे पुन्हा पुन्हा प्रयोग केले तरी सिद्ध करता येते.
---------
राही तै म्हणतात तसे, निश्कर्ष म्हणजे शास्त्र नसुन ते निष्कर्श कसे काढायचे त्याब्द्दल चे "अभ्यास, प्रयोग, कार्यकारण भाव, सिद्धता कशी करायची" ह्याचे नियम म्हणजे शास्त्र.
हे ठीक
श्री. थत्ते यांचे हे (डेटा अॅनॅलिसिस वगैरे) विधान ठीक वाटते. मला वाटते हा थोडा गोंधळ शास्त्र हा शब्द विज्ञान (सायन्स) या अर्थी घेतल्याने होतो आहे. मराठीत शास्त्र शब्दाला अनेक छटा आहेत. वेदशास्त्र, शास्त्री-पंडित, शास्त्राभ्यास(...नको व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. इ.)वगैरे शब्दांतून तो स्पष्ट होतो. 'विज्ञान' या शब्दातला काटेकोर अर्थ इथे अभिप्रेत नाही. एखादी गोष्ट करण्याची अनुभवसिद्ध आणि (पुन्हा वर श्री.थत्ते यांनी दिलेल्या पायर्यांवर तावून सुलाखून घेतलेली) पद्धत म्हणजे शास्त्र एव्हढा अर्थ या संदर्भात पुरेसा आहे. नाही तर काव्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नाट्यशास्त्र, समाजशास्त्र, मूर्तिशास्त्र असे शब्द रूढ झाले नसते. तंत्र आणि शास्त्र हे दोन्ही शब्द मराठीत थोडे सैलसर वापरले जातात. खरे तर सैलसरही नाही, कारण शास्त्र हा विज्ञान या अर्थी बव्हंशी वापरला जात नाही. परिपूर्ण अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे शास्त्र असे म्हणता येईल.
#संशोधनात्मक लिखाण करणारे
#संशोधनात्मक लिखाण करणारे कधीच अर्धवट पुराव्यावर निर्णय देणारं वाक्य लिहित नाहीत.असं असण्याची शक्यता टाळता येत नाही अशा छापाची वाक्यं लिहितात.लेखन थोडं आधारित स्वरुपाचा असेल तर तसा उल्लेख करतात.
# पुराणात वगैरे शिवाला महादेव म्हटलं आहे अर्थात तो विश्वाची चिंता करणार डोळे मिटून आणि इतर दैवतं त्या महादेवाला पुजणार हे पटणारं आहे. त्यामुळे रामाने शिवाचे पुजन करणे ,विष्णूच्या अवताराने शिव म्हणणे ठीक आहे.त्यात उन्नयन देवाचे नाही तर भाविकांचे आहे.
त्या गवळी समाजास त्यांना पटणारे दैवत आवडणे स्वाभाविक आहे आणि त्यांची गरज भागवते.बालवाडीतल्या मुलांना गम्मत गाणी शिकवणारी शिक्षिका पुरेशी असते पिएचडीवाल्याची गरज नसते तसं
बालवाडीतली अडचण
बालवाडीतल्या विधानाशी पहिल्या विधानाची तुलना करता एक मूलभूत अडचण दिसते. गवळी समाजाची गरज विठ्ठलानं भागते ह्याच्याशी बालवाडी मुलं-शिक्षिकेची तुलना करण्यात गवळी समाजाला आणि म्हणून त्यांच्या दैवताला हीन ठरवलं जातं. वरचा जो उन्नयनाचा मुद्दा आहे तो त्याच्या अगदी उलट आहे. एक दैवत म्हणून विठ्ठलाला इतकी काही बहुजनमान्यता मिळाली, की अभिजनांना त्याची दखल घेणं भाग पडलं - 'आपले' पुष्कळसे भक्त 'त्यांच्या' देवाला भजू लागले म्हणून. मार्केट कॅप्चर केलेल्या प्रतिस्पर्धी प्रॉडक्टची जशी 'अॅक्विझिशन' करतात, तसं विठ्ठलालाच मग अभिजनांनी 'अक्वायर' केलं. त्यामुळे बालवाडी शिक्षिका - पीएचडी उदाहरणात अडचण आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
महाराष्ट्रातील गवळी-धनगरांचा
हे खरंच नविन संशोधन आहे का? इज्ञंट इट टू ऑब्व्हीअस? माझ्या मते जगभर हे घडले आहे आणि सध्याही घडत असणार.
उन्नयन म्हणा किंवा संस्कृतायझेशन म्हणा, टॅगींगच्या इतक्या खोलात जाण्याची आवड्/इच्छा नाही.
----------
ह्यात कोणाला दुखवायचा, टिका करायचा हेतू नाही.
सर्वसाधारण विधान ते विशिष्ट विधान
हे जगभर कितीही घडलं असलं तरीही गवळी-धनगरांचा विठ्ठल हे एक विशिष्ट दैवत आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत असं विधान जबाबदारीनं करण्यासाठी मागे विठ्ठलाविषयीच्या विशिष्ट संशोधनाची गरज असते. I thought that was obvious.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे एक आणि ...
Obvious हा शब्द शास्त्रीय परिभाषेत फारसा बसत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इज्ञंट इट टू ऑब्व्हीअस?
विठ्ठल मंदिराला असलेला बडव्यांचा वेढा, विठ्ठलाला 'उराउरी' भेटू न देण्याची सद्य प्रथा, मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह करण्याची गरज भासणे, विठ्ठलावर रचलेले संस्कृत ग्रंथ उपलब्ध असणे, विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे ही समजूत सर्वमान्य असणे या वर्तमान काळातील वस्तुस्थितीवरून विठ्ठल हा उच्चवर्गाचा देव असल्याचे भासते. त्यामुळे विठ्ठल हा एक लोकदेव होता, हे मांडणे ऑब्व्हीअस नव्हते. त्यामुळे ढेरे यांचे प्रस्तुत लिखाण बरेच वादग्रस्त ठरले, बडव्यांना अप्रिय ठरले.
लेख आवडला.ढेरे यांचे हे
लेख आवडला.
ढेरे यांचे हे पुस्तक वाचलेले नाही.
पण ह्या निमित्ताने शं. गो. तुळपुळे यांनी भिल्लम पाचवा ह्याच्या कारकिर्दीत शोधला गेलेला लेख आठवला.
तुळपुळे यांना शके ११११ चा एक शिलालेख विठ्ठलाच्या पश्चिम द्वारासमोरील सार्वजनिक मुतारीच्या पायरीच्या दगडावर मिळाला. सध्या ह्या शिलालेखाची शिळा डायरेक्टर ऑफ अर्काइव्ह्ज यांच्या मुंबई येथील कचेरीत ठेवलेली आहे.
शिलालेखाचे वाचन असे.
सालवण सुरि ११११ सौ-
म्ये दिव | सुक्रे सम-
स्तचक्रवर्ति | मा -
हाजनिं | देवपरि -
वारे | मुद्रहस्तेहि अवघावें ला विठ -
लदेउनायकें || ए -
हि अवघावें लान
मडु ऐसा | कोठारीं
वाढसि जें | जा ती वी -
चंद्रु || हे क -
वणई न ठावें | स-
प्त | मुख्य संप्रति |
कवणु अतिसो देई तेआ-
सी विठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि |
--| कर्म |
आशय-
शालिवाहन सौर शक ११११ सौम्य संवत्सरी, शुक्रवारी समस्तचक्रवर्ति (पाचवा भिल्लम), महाजन, देवपरिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ (लान मडु) स्थापिले. ते कोठारांतून वाढवावे. चंद्र जात विचारतो हे कोणासही ठाऊक नाही. (त्याप्रमाणे हे देऊळ लहान असले तरी त्याचा प्रतिपाळ सर्वांनी करावा. सांप्रत देवळाचे मुख्य सात जण आहेत.. जो कोणी ह्या देवळास पिडा देईल (अतिसो) तो धात्रुद्रोही.
ह्याचा नंतरचा दुसरा शिलालेख येतो तो पंढरपूरचा प्रसिद्ध असा ८४ चा शिलालेख. हा शिलालेख शके ११९५ साली कोरला गेला जो ह्या मंदिराच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त होता म्हणूनच त्याचे नाव चौर्याऐंशीचा शिलालेख असे पडले. हा लेख रामदेवराव व त्याचा श्रीकरणाधिप हेमाद्रीपण्डित याने कोरविला. रामदेरायाने लान मडुची वाढ करुन मंदिराचा जीर्णोद्धार केला.
शके ४३८ च्या एका ताम्रपटात पाण्डरंगपल्ली, जयदिठ्ठ व पंडराद्रिशेन असे काही शब्द डॉ. ग. ह. खरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. शिवाय भागवदधर्म त्याही आधीपासून प्रचलित होताच.
संदर्भ आणि कै.ढेरे
'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' हे पुस्तक लिहिताना जितके संदर्भ रा. चिं ढेरे यांना उपलब्ध होते तितक्या सर्वांचा समावेश या पुस्तकात केला गेलेला आहे. पाचव्या भिल्लमाच्या कारकीर्दीतल्या तसेच ८४च्या शिलालेखाचे संदर्भ आणि परामर्श या पुस्तकात आहे. पुस्तकाचा आवाका फारच मोठा आणि सखोल आहे.
लेख
अतिशय आवडला. हे पुस्तक आता मिळवून-वाचलेच-पाहिजे-यादीत गेले आहे.
विठ्ठलाची मूर्ती ( आताची )
विठ्ठलाची मूर्ती ( आताची ) फार जुनी आणि कर्नाटकातून ( बहुतेक हम्पीच्या विठ्ठल मंदिरातून )आणली हे मला फार पटले कारण
१) दगडातलं साम्य,
२) उन्नयन कोणी केलं असेल तर देवपणाचं झालं तरी मूर्ती तीच ठेवली.डोक्यावर गवळी लोक घालतात ती कापडी टोपी आहे.मुकुट नाही.गवळी लोक काठी खांद्यावर आडवी धरतात तसे न करता ते हात काठी वगळून कुठे ठेवायचे तर मूर्तीकाराने ते कमरेवर ठेवून प्रश्न सोडवला.
३) पायाखालची वीट गवळी समाजाशी संबंध जोडू शकत नाही अथवा शंकर/विष्णू या मोठ्या देवांशी. अजून एक समाज यास देव मानत होता तो कुंभार समाज.
४) कानात माशाच्या आकाराची कुंडले घातली म्हणजे महादेव कोळी लोकांचाही देव असेल.
कुंभार्+कोळी+गवळी
पुस्तक आणि लेख दोन्ही आवडले
ढेरे यांचे विठ्ठल एक महासमन्वय आणि लोकदेवतांचे विश्व ही दोन्ही पुस्तके संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लेखही आवडला.
आजच इंटरनॅशनल-बुकगंगाला गेलो
आजच इंटरनॅशनल-बुकगंगाला गेलो होतो. श्रीविठ्ठल ची खोक्यातून बाहेर निघणारी नुकतीच आलेली चळत पाहिली. माझ्याच समोर ६ खपली. बरं वाटलं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शास्त्र, विज्ञान व्याख्या
राही, थत्ते, अनु राव, सप्रे या सर्वांना एकत्रित प्रतिसाद:
शास्त्र या शब्दाच्या व्याख्येबाबत आपले विचार वेगवेगळे आहेत. शास्त्र हा शब्द मी systematic body of knowledge या अर्थी वापरला. इंग्रजीत science हा शब्द अशाच अर्थी वापरलेला वाचला-ऐकला आहे. रसायनशास्त्र, पदार्थशास्त्र वगैरेंना नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्रे म्हणतात, तर राज्यशास्त्र, इतिहास वगैरेंना सामाजिक किंवा मानवी शास्त्रे म्हणतात. थत्ते यांनी दिलेली व्याख्या दोन्ही प्रकारच्या शास्त्रांना लागू होते व मलाही तेच अपेक्षित होते. अनु राव यांनी यांनी शास्त्रत्वाचे जे निकष दिले आहेत, त्या विचारसरणीला positivism म्हटले जाते, व सामाजिक शास्त्रे बहुतांश वेळा हे निकष पूर्ण करू शकत नाहीत. मग त्यांना 'शास्त्र' का म्हणायचे, तर त्यात पद्धतशीरपणे माहिती संकलन व विश्लेषण होते, म्हणून.
अवीट
अतिशय सुंदर पुस्तक आहे. ढेर्यांचे लिखाण मला थ्रिलींग वाटते. अजिबात उथळपणा नाही आणि लालित्याभावाचा रुक्षपणा तर नाहीच नाही.
मूळ विठ्ठ्लमूर्तीच्या शोधाविषयीचा लेख तर खिळवून ठेवणारा थ्रिलर आहे. गेले काही दिवस झपाटल्यासारखे गेले.
ढेर्यांच्या पुस्तकांशिवाय माझी "वाचलेच पाहिजे" ही यादी पूर्णच होऊ शकत नाही. त्यांना आदरांजली.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.