कवि बिल्हणकृत 'चौरपञ्चाशिका'

चौरपञ्चाशिका

कवि बिल्हणकृत 'चौरपञ्चाशिका'

- अरविंद कोल्हटकर

११व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या 'बिल्हण' ह्या काश्मीरी कवीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या 'चौरपंचाशिका' ह्या कमीअधिक ५० श्लोकांच्या काव्यामागची कथा अशी आहे. काव्याचा कर्ता एका राजकन्येचा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना तरुण शिक्षक आणि त्याची शिष्या हे परस्परांवर अनुरक्त झाले आणि कवि गुप्ततेने रात्री आपल्या प्रियशिष्येच्या सहवासामध्ये प्रणयक्रीडा करण्यात घालवू लागला. अनेक रात्री ही गोष्ट गुप्त राहिली पण अखेरीस राजाच्या कानावर ही गोष्ट पडली. संतप्त राजाने अपराधी कवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्याला वधस्थानाकडे नेले जात असतांना आपल्या प्रियेसह काढलेल्या अन्र्क प्रसंगांचे त्याला स्मरण झाले आणि 'अद्यापि' अशा शब्दाचा वापर करीत त्याने हे ५० श्लोक रचले. त्या काव्याचे हे काहीसे स्वैर भाषान्तर आहे.


अद्यापि तां कनकचम्पकदामगौरीं फुल्लारविन्दवदनां तनुलोमराजीम् ।
सुप्तोत्थितां मदनविह्वललालसाङ्गीं विद्यां प्रमादगलितामिव चिन्तयामि ॥ १ ॥

सोनचाफ्याच्या हारासारखी गौर, कमलमुखी, अंगअंगाने मोहरलेली, रतिसुखामुळे मदालस, प्रमादाने विस्मृति झालेल्या विद्येसारखी जागी होत असलेली अशी ती अद्यापि माझ्या नेत्रांपुढे उभी आहे.


अद्यापि तां शशिमुखीं नवयौवनाढयां पीनस्तनीं पुनरहं यदि गौरकान्तिम् ।
पश्यामि मन्मथशरानलपीडिताङ्गीं गात्राणि संप्रति करोमि सुशीतलानि ॥ २ ॥

चन्द्रमुखी, नवतारुण्याने मुसमुसणारी, स्तनभाराने ओथंबलेली, मदनबाणांनी विद्ध झालेली अशी ती गौरांगी अद्यापि जेव्हा माझ्या नेत्रांपुढे उभी राहते तेव्हा माझ्या शरीरावर आनंदाची शिरशिरी येते.


अद्यापि तां यदि पुनः कमलायताक्षीं पश्यामि पीवरपयोधरभारखिन्नाम् ।
संपीडय बाहुयुगलेन पिबामि वक्त्रमुन्मत्तवन्मधुकरः कमलं यथेष्टम् ॥ ३ ॥

कमलनयना आणि स्तनभारामुळे स्तोकनम्रा अशी ती अद्यापि माझ्यासमोर उभी राहील तर अधीर भ्रमराने कमलाचे तसे तिला बाहुपाशामध्ये घेऊन मी तिच्या मुखाचे यथेष्ट चुंबन घेईन.


अद्यापि तां निधुवनक्लमनिःसहाङ्गीमापाण्डुगण्डपतितालककुन्तलालिम् ।
प्रच्छन्नपापकृतमन्तरमावहन्तीं कण्ठावसक्तमृदुबाहुलतां स्मरामि ॥ ४ ॥

रतिश्रमाने श्रान्त, सुटल्या केसांचा संभार गालाभोवती, जणू कोठल्यातरी पापाचे ओझे उरात बाळगल्यासारखे माझ्या गळ्याभोवती नाजूक हातांचा विळखा घातलेली अशी ती मला अजूनहि स्मरते.


अद्यापि तां सुरतजागरघूर्णमानतिर्यग्वलत्तरलतारकमावहन्तीम्।
शृङ्गारसारकमलाकरराजहंसीं व्रीडाविनम्रवदनामुषसि स्मरामि ॥ ५ ॥

सुरतक्रीडेमध्ये गेलेल्या रात्री मजकडे तिरके कटाक्ष टाकणाया नेत्रांची, शृंगाराच्या कमलसरोवरातील राजहंसीच, आणि रात्र संपतांना लज्जेमुळे अधोवदन झालेली अशी ती मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तां यदि पुनः श्रवणायताक्षीं पश्यामि दीर्घविरहज्वरिताङ्गयष्टिम् ।
अङ्गैरहं समुपगुह्य ततोऽतिगाढं नोन्मीलयामि नयने न च तां त्यजामि ॥ ६ ॥

दीर्घ विरहाने जिचे शरीर पोळले आहे अशी ती विशालाक्षी जर मला पुन: दिसेल तर आपल्या बाहूंच्या घट्ट विळख्यामध्ये तिला घेऊन मी तिच्याकडे डोळ्याची पापणी न मिटता पहात राहीन आणि तिला कधीहि सोडणार नाही.


अद्यापि तां सुरतताण्डवसूत्रधारीं पूर्णेन्दुसुन्दरमुखीं मदविह्वलाङ्गीम् ।
तन्वीं विशालजघनस्तनभारनम्रां व्यालोलकुन्तलकलापवतीं स्मरामि ॥ ७ ॥

रतिक्रीडेच्या तांडवाची नायिका, पूर्णचन्द्रासारखे मुख असलेली, कामज्वराने विह्वलशरीर, पृथु नितंब आणि स्तनांच्या भाराने स्तोकनम्र, विस्कटलेल्या केशकलापाची अशी ती मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तां मसृणचन्दनपङ्कमिश्रकस्तूरिकापरिमलोत्थविसर्पिगन्धाम् ।
अन्योन्यचञ्चुपुटचुम्बनखञ्जरीतयुग्माभिरामनयनां शयने स्मरामि ॥ ८ ॥

माझ्या शय्येवर पहुडलेली, चन्दन आणि कस्तूरी ह्यांच्या मिश्र सुवासाने सुवासित, आणि परस्परांना चोचींनी चुंबन देणार्‍या धोबीपक्ष्याच्या युगलाप्रमाणे नयनरम्य अशी ती मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तां निधुवने मधुपानरक्तां लीलाधरां कृशतनुं चपलायताक्षीम् ।
काश्मीरपङ्कमृगनाभिकृताङ्गरागां कर्पूरपूगपरिपूर्णमुखीं स्मरामि ॥ ९ ॥

रतिक्रीडेमध्ये मद्यपान केलेली, खेळकर ओठांची, तन्वी, चंचलनयना, केशरकस्तूरिकांच्या गन्धाने सुगन्धित, आणि कापूरयुक्त तांबूलाने पूर्णमुख अशी ती मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तत्कनकगौरकृताङ्गरागं प्रस्वेदबिन्दुविततं वदनं प्रियायाः ।
अन्ते स्मरामि रतिखेदविलोलनेत्रं राहूपरागपरिमुक्तमिवेन्दुबिम्बम् ॥ १० ॥

केशराने विभूषित आणि घर्मबिन्दूंनी डंवरलेले, रतिखेदामुळे डोळे मिटलेले असे माझ्या प्रियेचे वदन मला अद्यापि स्मरते, जसे काही राहूच्या पाशातून मुक्त असे चन्द्रबिम्बच!


अद्यापि तन्मनसि संपरिवर्तते मे रात्रौ मयि क्षुतवति क्षितिपालपुत्र्या ।
जीवेति मङ्गलवचः परिहृत्य कोपात्कर्णे कृतं कनकपत्रमनालपन्त्या ॥ ११ ॥

अद्यापि माझ्या स्मृतीत आहे तो प्रसंग - एका रात्री मला शिंक आली तेव्हा अशुभ टाळणारे 'तुला दीर्घायुष्य लाभो' असे मंगल वचन न उच्चारता अमंगलापासून रक्षण करणारा ताईत राजकन्येने पुन: कानावर बसविला.


अद्यापि तत्कनककुण्डलघृष्टगण्डमास्यं स्मरामि विपरीतरताभियोगे ।
आन्दोलनश्रमजलस्फुटसान्द्रबिन्दु मुक्ताफलप्रकरविच्छुरितं प्रियायाः ॥ १२ ॥

विपरीत रताच्या एका प्रसंगी तिची सुवर्णकुंडले तिच्या गालांना घासत होती, रताच्या प्रयत्नांमुळे तिला आलेल्या घर्मबिंदूंनी तिचे मुख मोत्यांनी लगडल्यासारखे भासत होते. तो प्रसंग मला अद्यापि स्मृतीमध्ये आहे.


अद्यापि तत्प्रणयभङ्गुरदृष्टिपातं तस्याः स्मरामि रतिविभ्रमगात्रभङ्गम् ।
वस्त्राञ्चलेन परिधर्षिपयोधरान्तं दन्तच्छदं दशनखण्डनमण्डनं च ॥ १३ ॥

प्रणयक्रीडेतील तिचा चोरटा दृष्टिक्षेप, वक्र शरीर, स्तनाग्रे दर्शविणारा पदर, माझ्या दातांमुळे झालेल्या व्रणांनी शोभणारा तिचा ओठ - हे सर्व मला अद्यापि स्मरते.


अद्याप्यशोकनवपल्लवरक्तहस्तां मुक्ताफलप्रचयचुम्बितचूचुकाग्राम् ।
अन्तः स्मितोच्छ्वसितपाण्डुरगण्डभित्तिं तां वल्लभामलसहंसगतिं स्मरामि ॥ १४ ॥

अशोकाच्या नव्या पालवीसारखे तिचे रक्तहस्त, मौक्तिकमालांनी चुंबिली जाणारी तिची चूचुके, तिचे हसणारे गाल, तिची हंसासारखी चाल - माझ्या वल्लभेची अशी रूपे मला अद्यापि स्मरतात.


अद्यापि तत्कनकरेणुघनोरुदेशे न्यस्तं स्मरामि नखरक्षतलक्ष्म तस्याः ।
आकृष्टहेमरुचिराम्बरमुत्थिताया लज्जावशात्करधृतं च ततो व्रजन्त्याः ॥ १५ ॥

तिच्या सुवर्णरेणूंप्रमाणे गौर मांडीवर मी उठविलेल्या नखक्षतांच्या खुणा, रतिक्रीडेनंतर तेथून उठून जातांना लज्जेने तिने हातांनी धरलेले आणि मी ओढलेले सोनसळी वस्त्र हे अद्यापि मला स्मरते.


अद्यापि तां विधृतकज्जललोलनेत्रां प्रोत्फुल्लपुष्पनिकराकुलकेशपाशाम् ।
सिन्दूरसंलुलितमौक्तिकदन्तकान्तिमाबद्धहेमकटकां रहसि स्मरामि ॥ १६ ॥

काजळभरल्या नेत्रांची, केसांमध्ये फुललेल्या फुलांचे गजरे माळलेली, मोत्यासारख्या दातांना तांबूलरसाचा तांबडा रंग लागलेली, हातांमध्ये सुवर्णकंकणे ल्यालेली, अशा आमच्या एकान्तातील तिच्या अनेक प्रतिमा मला अद्यापि स्मरणात आहेत.


अद्यापि तां गलितबन्धनकेशपाशां स्रस्तस्रजं स्मितसुधामधुराधरौष्ठीम् ।
पीनोन्नतस्तनयुगोपरिचारुचुम्बन्मुक्तावलीं रहसि लोलदृशं स्मरामि ॥ १७ ॥

तिच्या वेणीचा बंध सुटलेला आहे, गळ्यातील हार विस्कटलेला आहे, स्मित हेच अमृत, त्याने तिचे ओठ मधुर झाले आहेत, तिच्या उन्नतस्तनयुगावर त्यांना हलकेच स्पर्श करणारी मुक्तामाला आहे, अशी ती चंचलनयना मी आता एकटा असतांना मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तां धवलवेश्मनि रत्नदीपमालामयूखपटलैर्दलितान्धकारे ।
प्राप्तोद्यमे रहसि संमुखदर्शनोत्थां लज्जाभयार्तनयनामनुचिन्तयामि ॥ १८ ॥

मला अद्यापि स्मरते ती एकान्ताची वेळ. तो शुभ्र प्रासाद, रत्नदीपमालांच्या किरणांनी झळाळून नष्ट केलेला अंधकार, अशा वेळी मला समोरून पाहण्याच्या हेतूने तिने उठायचा प्रयत्न केला आणि मी जागा आहे असे कळल्यावर तिच्या नेत्रांमध्ये लज्जा आणि भीति मला एकत्र दिसले.


अद्यापि तां विरहवह्निनिपीडिताङ्गीं तन्वीं कुरङ्गनयनां सुरतैकपात्रीम् ।
नानाविचित्रकृतमण्डनमावहन्तीं तां राजहंसगमनां सुदतीं स्मरामि ॥ १९ ॥

विरहाग्नीने अंगअंगानी तप्त अशी ती हरिणाक्षी माझ्या रतिक्रीडेचे एकमेव ध्येय होते, नानाविध आभूषणांनी सजलेली अशी ती राजहंसाच्या चालीची शिखरिदशना मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तां विहसितां कुचभारनम्रां मुक्ताकलापधवलीकृतकण्ठदेशाम् ।
तत्केलिमन्दरगिरौ कुसुमायुधस्य कान्तां स्मरामि रुचिरोज्ज्वलपुष्पकेतुम् ॥ २० ॥

ओठांवर किंचित् स्मित खेळणारी, कुचभाराने काहीशी नमलेली, कण्ठाभोवती शुभ्र मोत्यांचे दागिने ल्यायलेली, कामदेवाच्या मंदिरातील सुंदर आणि उत्फुल्ल असे पुष्पच जणू, अशी ती माझ्या अद्यापि स्मरणात आहे.


अद्यापि चाटुशतदुर्ललितोचितार्थं तस्याः स्मरामि सुरतक्लमविह्वलायाः ।
अव्यक्तनिःस्वनितकातरकथ्यमानसंकीर्णवर्णरुचिरं वचनं प्रियायाः ॥ २१ ॥

सुरतक्लान्त अशी ती मला अनेक गोड शब्दांनी तिला जाणवणारे सुख सांगायचा प्रयत्न करीत होती, लज्जेने कातर असे तिचे अस्फुट शब्द अद्यापि माझ्या कानांमध्ये गुंजत आहेत.


अद्यापि तां सुरतजागरमीलिताक्षीं स्रस्ताङ्गयष्टिगलितांशुककेशपाशाम् ।
शृङ्गारवारिरुहकाननराजहंसीं जन्मान्तरे निधुवनेऽप्यनुचिन्तयामि ॥ २२ ॥

आमच्या रतिक्रीडेमध्ये तिचे नेत्र मिटलेले आहेत, तिचे शरीर, वस्त्र आणि केशपाश गळलेला आहे, शृंगाररूपी कमलवनातील राजहंसीच अशी ती मला पुढच्या जन्मातहि आठवेल.


अद्यापि तां प्रणयिनीं मृगशावकाक्षीं पीयूषपुर्णकुचकुम्भयुगं वहन्तीम् ।
पश्याम्यहं यदि पुनर्दिवसावसाने स्वर्गापवर्गनरराजसुखं त्यजामि ॥ २३ ॥

अमृतपूर्ण असे कुचकुम्भ वाहणारी प्रणयिनी मृगनयना मला ह्या दिवसाच्या अखेरीस जर पुन: भेटेल तर अद्यापि त्या सुखासाठी मी स्वर्ग, पुनर्जन्मापासून मुक्ति आणि पृथ्वीवरील राज्यसुख ह्यांचा त्याग करेन.


अद्यापि तां क्षितितले वरकामिनीनां सर्वाङ्गसुन्दरतया प्रथमैकरेखाम् ।
शृङ्गारनाटकरसोत्तमपानपात्रं कान्तां स्मरामि कुसुमायुधबाणखिन्नाम् ॥ २४ ॥

पृथ्वीतलावरची सर्वांगसौदर्यामध्ये सुंदर स्त्री, रतिनाटयरसपानास सर्वांमध्ये उत्तम पात्र अशा मदनाच्या बाणांनी विद्ध माझ्या प्रियेला मी अद्यापि स्मरतो.


अद्यापि तां स्तिमितवस्त्रमिवाङ्गलग्नां प्रौढप्रतापमदनानलतप्तदेहाम् ।
बालामनाथशरणामनुकम्पनीयां प्राणाधिकां क्षणमहं न हि विस्मरामि ॥ २५ ॥

ओल्या वस्त्राप्रमाणे मला बिलगलेली, संतप्त मदनाग्नीने जाळलेली, रक्षणहीन, दयनीय अशी ती बाला मला प्राणांहून अधिक प्रिय आहे. अद्यापि मी तिला क्षणभरहि विसरत नाही.


अद्यापि तां प्रथमतो वरसुन्दरीणां स्नेहैकपात्रघटितामवनीशपुत्रीम् ।
तापो जना विरहजः सुकुमारगात्र्या: सोढुं न शक्यत इति प्रतिचिन्तयामि ॥ २६ ॥

अद्यापि मी जेव्हा सुंदर स्त्रियांचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम मला दिसते माझ्या प्रेमस्पर्शासाठीच निर्माण झालेली ती राजकन्या. लोकहो, त्या कोमलांगीच्या विरहाचा ताप मला सहन करता येणार नाही.


अद्यापि विस्मयकरीं त्रिदशान्विहाय बुद्धिर्बलाच्चलति मे किमहं करोमि ।
जानन्नपि प्रतिमुहूर्तमिहान्तकाले कान्तेति वल्लभतरेति ममेति धीराः ॥ २७ ॥

लोकहो, मी काय करू? मला समजत असूनहि अद्यापि ह्या अन्तकालामध्ये परलोकाचा विचार सोडून क्षणोक्षणी माझे मन हट्टाने तिच्याकडे धावत आहे आणि 'हे मत्प्रिये, प्रियतमे' असे आक्रन्दत आहे.


अद्यापि तां गमनमित्युदितं मदीयं श्रुत्वैव भीरुहरिणीमिव चञ्चलाक्षीम् ।
वाचःस्खलद्विगलदश्रुजलाकुलाक्षीं संचिन्तयामि गुरुशोकविनम्रवक्त्राम् ॥ २८ ॥

अद्यापि मला आठवते की माझे तिच्यापासून दूर जाणे निश्चित आहे असे ऐकल्यावर त्या चपलनयनेची स्थिति घाबरलेल्या हरिणीची झाली. तिची वाचा अडखळू लागली, नेत्र ओघळणार्‍या अश्रूंनी भरून आले आणि तिचे शरीर शोकनम्र झाले.


अद्यापि जातु निपुणं यतता मयापि दृष्टं दृशा जगति जातिविधे वधूनाम् ।
सौन्दर्यनिर्जितरतिद्विजराजकान्तेः कान्ताननस्य सदृशं वदनं गुणैर्न ॥ २९ ॥

सुंदर स्त्रियांनी भरलेल्या ह्या जगाकडे मी प्रयत्नाने पाहिले तरी अद्यापि आपल्या सौदर्याने रति आणि चन्द्राच्या तेजाला जिंकणार्‍या माझ्या कान्तेच्या मुखाशी गुणांमध्ये तुलना करण्यायोग्य कोणीहि मला आढळत नाही.


अद्यापि तां क्षणवियोगविषोपमेयां सङ्गे पुनर्बहुतराममृताभिषेकाम् ।
मज्जीवधारणकरीं मदनात्सतन्द्रां किं ब्रह्मकेशवहरै: सुदतीं स्मरामि ॥ ३० ॥

तिचा क्षणभराचा विरह विषसमान आणि सहवास अमृताभिषेक वाटतो. माझ्या जीवनाचा आधार असलेली ती शिखरिदशना मदालसा अद्यापि माझ्या नेत्रांसमोर आहे. मला तीच हवी, ब्रह्मा-विष्णु-महेश मला कशाला हवेत?


अद्यापि राजगृहतो मयि नीयमाने दुर्वारभीषणकरैर्यमदूतकल्पैः।
किं किं तया बहुविधं न कृतं मदर्थे वक्तुं न पार्यत इति व्यथते मनो मे ॥ ३१ ॥

यमदूतांसारखे कठोर रक्षक मला राजप्रासादामधून ओढून नेत असतांना मला वाचविण्यासाठी तिने काय काय केले नाही? ते सांगणे शक्य नाही. अद्यापि माझ्या मनात ते घर करून आहे.


अद्यापि मे निशि दिवा हृदयं दुनोति पूर्णेन्दुसुन्दरमुखं मम वल्लभायाः ।
लावण्यनिर्जितरति क्षतिकामदर्पं भूयः पुरः प्रतिपदं न विलोक्यते यत् ॥ ३२ ॥

ह्यानंतर पावलोपावली माझ्या प्रियतमेचे पूर्ण चन्द्रासारखे सुंदर, लावण्याने रतीला जिंकणारे आणि मदनाचे दर्पहरण करणारे असे मुख पुन: पाहू शकणार नाही हा विचार अद्यापि अहोरात्र माझे हृदय दु:खी करीत आहे.


अद्यापि तामवहितां मनसा चलेन संचिन्तयामि युवतीं मम जीविताशाम् ।
नान्योपभुक्तनवयौवनभारसारां जन्मान्तरेऽपि मम सैव गतिर्यथा स्यात् ॥ ३३ ॥

माझ्या जगण्याचे कारण अशा त्या युवतीचे विश्रब्ध मनाने मी अद्यापि चिन्तन करीत आहे. दुसर्‍या कोणाकडून अनुपभुक्त असे यौवन हे जिचे सर्वस्व आहे ती पुढच्या जन्मातहि माझीच असो!


अद्यापि तद्वदनपङ्कजगन्धलुब्धभ्राम्यद्विरेफचयचुम्बितगण्डयुग्मम् ।
लीलावधूतकरपल्लवकङ्कणानां क्वाणो विमूर्च्छति मनः सुतरां मदीयम् ॥ ३४ ॥

अद्यापि तिच्या मुखकमलगंधाने लुब्ध अशा भुंग्याप्रमाणे तिच्या गालांसभोवार घुटमळणारे माझे मन तिच्या हातातील कंकणांच्या किणकिणीच्या आठवणीमुळे मूर्छित होत आहे.


अद्यापि सा नखपदं स्तनमण्डले यद्दत्तं मयाऽस्यमधुपानविमोहितेन ।
उद्भिन्नरोमपुलकैर्बहुभि: प्रयत्नाज्जागर्ति रक्षति विलोकयति स्मरामि ॥ ३५ ॥

अधररसपानाने मोहित झालेल्या मी तिच्या स्तनमंडलावर जे नखक्षत उठविले त्याला ती मिटू देत नाही आणि प्रयत्नाने जागी रहात त्याच्याकडे रोमांचित अवस्थेमध्ये पाहात राहते हे अद्यापि मला जाणवत आहे.


अद्यापि कोपविमुखीकृतगन्तुकामा नोक्तं वचः प्रतिददाति यदैव वक्त्रम्।
चुम्बामि रोदिमि भृशं पतितोऽस्मि पादे दासस्तव प्रियतमे भज मां स्मरामि ॥ ३६ ॥

प्रणयकलहामध्ये रुसून निघून जायला निघाल्याचे दाखविणारी अशी ती प्रश्नाला प्रतिउत्तर देत नाही, तेव्हा मी तिच्या मुखाचे चुंबन घेतो, विलाप करतो आणि वारंवार पाया पडतो हे मला अद्यापि आठवते.


अद्यापि धावति मनः किमहं करोमि सार्धं सखीभिरपि वासगृहे सुकान्ते ।
कान्ताङ्गसंगपरिहासविचित्रनृत्ये क्रीडाभिराम इति यातु मदीयकालः ॥ ३७ ॥

मी काय करू? माझे मन अद्यापि इच्छा करीत आहे की इष्टसखी आसपास असतांना सजवलेल्या आणि क्रीडायोग्य अशा शयनगृहामध्ये कान्तेच्या सहवासात विनोद आणि नृत्यामध्ये काल घालवावा.


अद्यापि तां जगति वर्णयितुं न कोऽपि शक्नोत्यदृष्टसदृशप्रतिरूपलक्ष्मीम् ।
दृष्टं तया तु सदृशं खलु येन रूपं शक्तो भवेदपि स एव नरो न चान्यः ॥ ३८ ॥

तिला सदृश अशा लक्ष्मीला ज्याने अद्यापि पाहिलेले नाही असा कोणीहि तिचे वर्णन करू शकणार नाही. तिला सदृश असे रूप ज्याने पाहिलेले आहे तोच केवळ तिला वर्णू शकेल, अन्य कोणी नाही.


अद्याप्यहं न खलु वेद्मि किमीशपत्नी सा वा शची सुरपतेरथ कृष्णलक्ष्मी ।
धात्रैव किं नु जगतः परिमोहनाय सा निर्मिता युवतिरत्नदिदृक्षया वा ॥ ३९ ॥

अद्यापि मला हे समजत नाही की ही शंकराची पार्वती, इन्द्राची शची अथवा कृष्णाची राधा तर नाही? विधात्याने हिला जगाला मोहविण्यासाठी वा नारीरत्न कसे असते ते पाहण्यासाठी तर निर्माण केले नसावे ना?


अद्यापि तां नयनकज्जलमिश्रमश्रुविश्रान्तकर्णयुगलं दधतीं विरुष्टाम्।
कान्तां स्मरामि घनपीनपयोधराढयां श्यामामनल्पगुणगौरवशोभमानाम् ॥ ४० ॥

प्रणयकलहामध्ये ती रागावली म्हणजे तिच्या नयनातील अश्रूंमध्ये तिची कर्णभूषणे भिजून चिंब होतात. पुष्ट स्तनभाराचा गर्व करणार्‍या, अनेक गुणांमुळे शोभायमान अशा त्या श्यामलतनु प्रियतमेची मी अद्यापि आठवण काढतो.


अद्यापि निर्मलशरच्छशिगौरकान्ति चेतो मुनेरपि हरेत् किमुतास्मदीयम् ।
वक्त्रं सुधामयमहं यदि तत्प्रपद्ये चुम्बाम्यहं न विरहो व्यथते मनो मे ॥ ४१ ॥

शुभ्र अशा शारदीय चन्द्रबिंबासारखी कान्ति असलेले तिचे सुधामुख ऋषिमुनींचेहि मन हरण करते तेथे आमच्या सारख्यांचे काय? अद्यापि मी त्याचे मनोमन चुम्बन घेतो आणि विरहवेदना मजपासून दूर पळते.


अद्यापि तत्कमलरेणुसुगन्धि वक्त्रं तत्प्रेमवारि मकरध्वजतापहारि ।
प्राप्नोम्यहं यदि पुनः सुरतैकतीर्थं प्राणांस्त्यजामि नितरां तदवाप्तिहेतो: ॥ ४२ ॥

कमलकेसरांसारखे सुगन्धी असे तिचे मुख आणि मदनतापाचे हरण करणारी अधरसुधा ह्या रतिक्रीडेचे एकमेव ध्येय अशा जर मला पुन: मिळाल्या तर अद्यापि त्या लाभासाठी प्राणत्याग करण्यास मी सज्ज आहे.


अद्यापि तां जगति सुन्दरिलक्षपूर्णे अन्यान्यपीवरगुणाधिकसंप्रसन्ने ।
अन्याभिरप्युपमितुं न मया च शक्यं रूपं तदीयमिति मे हृदये वितर्क: ॥ ४३ ॥

जगामध्ये अन्य लक्षावधि सुन्दरी असल्या आणि त्या एकाहून एक अधिक अशा गुणांनी युक्त असल्या तरी तिच्या रूपाची तुलना अन्य कोणा सुन्दरीबरोबर करणे मला अद्यापि शक्य दिसत नाही.


अद्यापि तां नृपतिशेखरराजपुत्रीं संपूर्णयौवनमदालसघूर्णनेत्रीम् ।
गन्धर्वयक्षसुरकिन्नरनागकन्यां स्वर्गादहो निपतितामिव चिन्तयामि ॥ ४४ ॥

भरलेल्या यौवनामुळे मदालस नेत्रांची अशी ती श्रेष्ठ नृपतीची पुत्री जणू गन्धर्व, यक्ष, देव, किन्नर, नाग अशा दैवी जन्माची स्वर्गातून उतरली आहे असे मला अद्यापि भासते.


अद्यापि तां प्रणयिनीं कृशवेदिमध्यामुत्तु्ङ्गसंभृतसुधास्तनकुम्भयुग्माम् ।
नानाविचित्रकृतमण्डनमण्डिताङ्गीं सुप्तोत्थितां निशि दिवा न हि विस्मरामि ॥ ४५ ॥

कृशकटि, सुधारसाने भरलेल्या कुंभांप्रमाणे उत्तुंग स्तन धारण करणारी, शोभनीय मण्डनांनी अलंकृत, प्रणयनिद्रेतून जागी झालेली अशी ती अद्यापि रात्रंदिन माझ्या नेत्रांपुढून हलत नाही.


अद्यापि तां कनककान्तिमदालसाङ्गीं व्रीडोत्सुकां मदनभीतिविकम्पमानाम्।
अङ्गाङ्गसङ्गपरिचुम्बनजातमोहां मज्ज्जीवनौषधिमिव प्रमदां स्मरामि ॥ ४६ ॥

सुवर्णकांति आणि मदालस शरीराची, लज्जावनत आणि तरीहि प्रणयोत्सुक आणि कंपित देहाची, अंगप्रत्यंगांचे चुंबन घेण्याचा मोह धरणारी, माझ्या आयुष्याचे अमृतच अशी ती प्रमदा मला अद्यापि स्मरते.


अद्यापि तत्सुरतकेलिनिरस्त्रयुद्धं बन्धोपबन्धपतनोत्थितशून्यहस्तम् ।
दन्तौष्ठपीडननखक्षतरक्तसिक्तं तस्या स्मरामि रतिबन्धुरनिष्ठुरत्वम् ॥ ४७ ॥

तिच्यासह सुरतक्रीडेच्या युद्धामध्ये आलिंगनांचे विळखे, दातांनी ओठांचे चावे, नखांचे वळ असे तिचे रतिक्रीडेतील निष्ठुरत्व मला अद्यापि स्मरते.


अद्याप्यहं वरवधूसुरतोपभोगं जीवामि नान्यविधिना क्षणमन्तरेण ।
तद् भ्रातरो मरणमेव हि दुःखशान्त्यै विज्ञापयामि भवतस्त्वरितं लुनीध्वम् ॥ ४८ ॥

अद्यापि मी त्या वरांगनेच्या सुरतक्रीडेच्या आठवणींवर जगत आहे. दुसर्‍या कोणत्याहि मार्गाने मला क्षणभरहि जगायचे नाही. माझ्या बांधवांनो, मरणानेच माझ्या दु:खाची शान्ति होईल. तुम्हाला विनवितो की त्याचा लवकर अन्त करा.


अद्यापि नोज्झति हरः किल कालकूटं कूर्मो बिभर्ति धरणीं खलु पृष्ठभागे ।
अम्भोनिधिर्वहति दुःसहवडवाग्निमङ्गीकृतं सुकृतिनः परिपालयन्ति ॥ ४९ ॥

शंकर अद्यापि कालकूटाचे धारण करून आहे, कूर्म अद्यापि धरतीला पाठीवर वागवत आहे, सागर आपल्या अंतरंगातील वडवानल अद्यापि सहन करीत आहे. पुण्यात्मे अंगावर घेतलेले कार्य पूर्णत्वास नेतात.

***

तळटीप : प्रस्तुत लेखकाच्या इच्छेनुसार या लेखात शुद्धलेखनाचे नवे नियम पाळण्यात आलेले नाहीत.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

यमदूतांसारखे कठोर रक्षक मला राजप्रासादामधून ओढून नेत असतांना मला वाचविण्यासाठी तिने काय काय केले नाही? ते सांगणे शक्य नाही. अद्यापि माझ्या मनात ते घर करून आहे.

.

शंकर अद्यापि कालकूटाचे धारण करून आहे, कूर्म अद्यापि धरतीला पाठीवर वागवत आहे, सागर आपल्या अंतरंगातील वडवानल अद्यापि सहन करीत आहे. पुण्यात्मे अंगावर घेतलेले कार्य पूर्णत्वास नेतात.

हे दोन श्लोक फार आवडले.
______
एवढ्या अवघड काव्याचे इतक्या रसाळ शब्दात भाषांतर करण्याच्या श्रमांबद्दल, कोल्हटकरांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे दर्जेदार अभिजात सुरेख अनुवाद झालेला आहे.
सरांचं संस्कृत मराठी दोन्ही भाषेवरील प्रभुत्व वाचतांना पदोपदी जाणवत.
परीश्रमपुर्वक सिद्ध केलेला अनुवाद.
बाकी ही तळटीप काय ते काही कळल नाही

तळटीप : प्रस्तुत लेखकाच्या इच्छेनुसार या लेखात शुद्धलेखनाचे नवे नियम पाळण्यात आलेले नाहीत.

कोल्हटकरजी शुद्धलेखनाचे नियम नाकारतील हे काय कळल नाही. म्हणजे जुने नियम वापरतील व नवे नाकारतील याच अर्थ तुमचे कुठे तरी गंभीर आक्षेप नव्या नियमांविषयी असणार असे वाटते.
ते काय जर कळले तर आनंद होइल व ते का आहेत याच कुतुहल आहेच.
आणि हो तो "राजतरंगिणी" वाला तो "कल्हण" तो ही काश्मीरचाच ना ? तो ही श्रुंगारीक लिहीतो हा ही
नाव गमतीदार वाटतात कल्हण बिल्हण
काश्मीरात एक लल्ला पण होती नग्न संत
काश्मीर सर्वात जास्त लिबरल प्लेस होती का भारतातली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हुश्श!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुवाद सहजसुंदर इत्यादी. काव्यातला भावही सुंदरच. पण वाचक म्हणून माझी मर्यादाच आहे. ती एक उर्दू कवींच्या कल्पनेतली कठोरहृदयी माशूका आणि संस्कृत कवींच्या कल्पनेतली पुष्ट-कोमल प्रेयसी - मला त्यांचा कंटाळाच येतो. स्वारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रथमच या काव्याचा डीटेल आणि संपूर्ण अनुवाद वाचनात आला. त्याबद्दल अतिशयानेक धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वधस्तंभाकडे जाताना सुचलेली कडवी. तरी (अथवा ऐकूनच) देहदंडाची शिक्षा राजाने लवकरात लवकर पूर्ण केली असेल.

"आढ्य" (चुकलेले "आढय"), "संपीड्य" (चुकलेले "संपीडय"), वगैरे, ठिकाणी टंकनदोषामुळे मूळ कवीचे वृत्तही खराब होते. ("संपीडय" मध्ये अनर्थही होतो.) अशा ठिकाणी सुधार करण्यास भाषांतरकाराचा किंतू नसावा, संपादकांनी त्यांना विचारून बघावे.

संदर्भ म्हणून हे भाषांतर राहील. (म्हणून संस्कृतातील टंकनदोषसुधारांची विनंती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणाला हे जाणवेल असे वाटले नव्हते पण तुमच्या ध्यानात आले आहे म्हणून खुलासा करतो.

मी हे सर्व टंकन प्रथम बराहपॅडमध्ये करतो आणि तेथून ते येथे कॉपी-पेस्ट करतो. पहिल्या बराहपॅडच्या टंकनामध्ये 'आढ्य' असे टंकन करता येते पण पायमोडका 'ढ्' आणि त्यापुढे 'य' असे पहायला मला जरा विचित्र वाटते. याउलट 'ढ' पूर्ण करून पुढे 'य' चे टंकन केले तर परिणाम 'ढय' असे दिसते आणि तो परिणाम - मला तरी - योग्य तडजोड वाटतो. ते दिसायला मला तरी बरे वाटते म्हणून मी तसे केले आहे.

ज्याला 'आढ्य' आणि 'आढय' मधील अंतराचा सूक्ष्म फरक दिसेल त्याच्या दृष्टीने ते चूकच आहे हे मान्य आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अद्यापि' हा शब्द कुठे वाचला कि आता हे काव्य आठवेल. आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री'मध्ये चौरपंचाशिकेचा उल्लेख आहे, तेव्हापासून हे प्रकरण जाणण्याची उत्सुकता होती. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0