सवाई गंधर्व महोत्सव २०१५

दिवस पहिला
पहिल्या दिवसाचे कलाकार -
नम्रता गायकवाड (सनई)
सावनी दातार व शिल्पा पुणतांबेकर (गायन)
पं. विश्वनाथ (गायन)
रूपक कुलकर्णी - प्रमोद शेवलीकर (बासरी-व्हायोलिन जुगलबंदी)
पं. राजन-साजन मिश्रा (गायन)

काल महोत्सव सुरु झाला. काही वैशिष्ट्ये - हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवलेली असली तरी यंदा भारतीय बैठकीसहित पूर्ण झाकलेला मांडव आहे. पाऊस आला तरी कार्यक्रम चालू राहील. दुसरे म्हणजे कलाकारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना किमान दीड तास वेळ मिळेल असे वाटते आहे, ज्यामुळे ऐकण्याचा आनंद आणखी वाढेल. ध्वनिव्यवस्था मागल्या वेळेपेक्षा चांगली आहे. बाकी नेहेमीचं वाढतं व्यावसायिकीकरण, सोफ्यांची (यंदा ५०० सोफे आहेत) व खुर्च्यांची वाढलेली संख्या, भारतीय बैठकीची कमी कमी होत जाणारी जागा वगैरे गोष्टी आहेतच. महोत्सव इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी (इंडियन म्याजिक आय)कडे गेल्यापासून याची सुरुवात झाली आणि या घटना आता अपेक्षितच आहेत असे वाटते. वाढत्या महागाईनुसार तिकिटांचे दरही बर्‍यापैकी वाढलेले आहेत. अर्थात हाऊसफुल होणारे सोफे आणि खुर्च्या पहाता, लोकांची खर्च करण्याची क्षमता आणि तयारी दोन्ही वाढल्याचा आनंद आहेच पण यामुळे महोत्सवाचा रीच मर्यादित होईल की काय अशीही शंका वाटते. असो.

कचेरीतून यायला उशीर झाल्याने सनई, सावनी-शिल्पा यांच्या गायनाची सुरुवातीची १०-१५ मिनिटे आणि काही कारणासाठी बाहेर जावे लागल्याने पं. विश्वनाथ यांच्या गायनाचा उत्तरार्ध आणि बासरी-व्हायोलिनचा पूर्वार्ध ऐकावयास मिळाला नाही.

१) सावनी-शिल्पा - या दोघी चुलत भगिनी आहेत. पैकी सावनी दातार या ज्येष्ठ गायिका सौ. शैला दातार यांच्या कन्या होत आणि दोघींचेही शिक्षण सौ. शैला दातार यांच्याचकडे झाले आहे. सौ. शैला दातार या पं. भास्करबुवा बखले यांच्या नातसून आहेत व सध्या त्या व त्यांचे यजमान पुण्यातील पं. बखलेबुवांनी स्थापित केलेल्या भारत गायन समाजाची जबाबदारी सांभाळतात. असो. या गायिकांना सवाईत प्रथमच गायची संधी मिळाली असल्याने पूर्ण तयारी करून आल्याचे लक्षात येतच होते. त्यांनी गायनाची सुरुवात राग मुलतानीने केली. त्यांनी मुलतानीमध्ये विलंबित झुमर्‍यात ख्याल, मध्यलय त्रितालात चीज आणि द्रुत एकतालात तराणा मांडला. उशीरा गेल्याने मला ख्यालातील विलंबित मांडणी कमी ऐकायला मिळाली (गेलो तेव्हा ख्यालातला अंतरा चालू होता). त्यामुळे गायनातले मुलतानीतचे चलन कसे सांभाळले किंवा मांडणी कशी केली, शिस्तबद्ध बढत यावर काही लिहू शकत नाही. पण एकुणात गायन ऐकता या विषयी काही उणे नसावे, कारण त्यांचे एकंदर गायन अत्यंत शिस्तबद्ध वाटले. तानांमध्ये लयीला आड जाणार्‍या ताना खूप छान घेतल्या. आड लयीतून पुन्हा साध्या लयीत येताना काही ठिकाणी थोडा खडखडाट जाणवला, पण दोन्ही भगिनींची लयतालाची जाण चांगली आहे असे लक्षात आले. न्यून काढायचेच झाले तर ताना दाणेदार वाटल्या नाहीत असे म्हणता येईल. यानंतर त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहितांनी (गुनीदास) बांधलेली मारवा रागातली 'हो गुनिजन मिल गावो बजावो' ही द्रुत एकतालातली बंदिश गायली. मूळ बंदिशीतले काही कंगोरे गळ्याच्या सोयीसाठी सपाट केल्यासारखे वाटले. विशेषतः अस्ताईतील एक जागा खर्जात आहे. दोघींचेही गळे खर्जाचे नसल्याने (त्यातल्या त्यात सावनी यांचा आहे) ती जागा षड्जावर ठेवली होती, जे कानाला खटकले. यानंतर त्यांनी समर्थ रामदास रचित श्रीधर फडके यांनी बांधलेला 'ताने स्वर रंगवावा' हा अभंग मांडला. अभंगाला श्री. संदीप कुलकर्णी यांची बासरीची साथ खूपच छान होती. शिवाय फक्त अभंगासाठी श्री. राजेंद्र दूरकर (पखवाज) आणि श्री. माऊली टाकळकर साथीला होते. (वैयक्तिक मतः मूळ चालीतला मुखडाच आकर्षक आहे, अंतर्‍यांच्या चाली ठीक आहेत. शिवाय 'ताने' शब्दावर तान घेता येत असल्यानेच अभंगाचे कौतुक. याचे कारण मूळ अभंग मीटरला फारसा अनुकूल नाही असे असावे). नंतर खास लोकाग्रहास्तव एक नाट्यगीत त्यांनी सादर केले. यंदा स्वयंवर नाटकाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वयंवर नाटकातले 'एकला नयनाला' हे पद आणि त्याची मूळ बंदिश असे दोन्ही त्यांनी सादर केले. त्याबद्दलची कथा आनंद देशमुखांनी निवेदनात सांगितली की मा. कृष्णरावांनी पंजाबातल्या एका भिकार्‍याच्या तोंडी ही बंदिश ऐकली. ती त्यांना इतकी आवडली की त्याला वारंवार पैसे देऊन ते म्हणायला लावली. जेव्हा ती बंदिश मा. कृष्णराव सारखे गुणगुणत होते, तेव्हा भास्करबुवा त्यांना म्हणाले की 'काय सारखं तेच तेच चाललंय. त्यापेक्षा ही चाल नाटकात घाल'. असे ते पद जन्माला आले. ५ मिनिटात बंदिश आणि पदाची रूपरेखा चांगली दाखवली.

काही विशेष जाणवलेल्या गोष्टी - जरी दोघी स्त्रिया असल्या तरी त्यांच्या आवाजाच्या रेंजमध्ये फरक आहे. शिल्पा पुणतांबेकर यांचा आवाज तार सप्तकात अधिक चांगला वाटतो तर सावनी यांचा आवाज मध्य सप्तकात जास्त चांगला वाटतो. या वैशिष्ट्याचा सहगायनात अधिक चांगला उपयोग करून घेता आला असता असे वाटते. त्यांनी आधी साऊंड चेक घेतला होता की नाही माहित नाही पण शिल्पा यांचा आवाज तार सप्तकात काहीसा कर्कश्श वाटत होता. त्याला थोडा बेस दिला असता तर अधिक चांगले वाटू शकले असते. दुसरी आणि कदाचित अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे सहगायनातला जुगलबंदीचा विचार. आपल्या सहकलाकाराचा विचार पुढे नेणे, किंवा सवाल-जवाब पद्धतीने गायन खुलवणे हा प्रकार कमीच दिसला. याचा अर्थ असा नाही की कार्यक्रम विस्कळीत होता. उलट दोघींमधील को-ऑर्डिनेशन फारच उत्तम होते. किंबहुना असे म्हणता येईल की 'देअर वॉज परफेक्ट को-ऑर्डिनेशन बट वेरी लिटल कॉन्फ्लुअन्स'. आणखी एक गोष्ट म्हणजे (कदाचित सवाईत गाण्याचे प्रेशर म्हणा, म्हणून असेल) मांडणीत उत्स्फूर्ततेचा अभाव जाणवला. साधारणतः सर्व कलाकार मोठ्या मंचांवर गाताना रागमांडणीची साधारण रूपरेखा ठरवतातच, त्यात काही वावगे नाही. पण ह्या कार्यक्रमात काही ठिकाणी स्पष्ट कळत होते की आता ही जागा येणार, ही एवढी इतक्या मात्रांची तान येणार वगैरे. कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी सवाईतल्या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमात वापरलेला झुमर्‍यासारखा ताल, जो आजकाल फार ऐकायला मिळत नाही. हे रिस्क टेकिंग आवडले. नाहीतर लोकांची गाडी काही विलंबित एकतालाच्या पुढे जात नाही. बाकी साथसंगत (पेटी- चैतन्य कुंटे, तबला- आठवत नाही) चांगली होती, गाण्यावर आक्रमण करणारी नव्हती.

२) पं. विश्वनाथ - हे किराणा घराण्याचे गायक आहेत. कालच्या दिवसातला सगळ्यात न आवडलेला कार्यक्रम असे याचे वर्णन करावे लागेल. कारणे अनेक आहेत. त्यांनी सुरुवात मारव्याने केली. मारव्यात विलंबित एकतालातला ख्याल, मध्यलयीत त्रिताल (काहुं की रीत कोऊ करे सखी री), आणि द्रुत एकताल असे मांडले. एक तर आधीच्या कलाकाराने एखादा राग रंगवलेला असेल तर सहसा पुढचे कलाकार राग बदलतात (आधी झालेले गाणे पुसून त्याच रागाने त्यावर आपली छाप पाडणारे कलाकार फार विरळा). त्यांनी तसे केले नाही. आधीची सावनी-शिल्पा यांची मारव्यातली बंदिश रंगली होता. त्यावर विलंबित लयीत (तीही किराण्याची अतिविलंबित!) मारवा सुरु केला तो पडलाच. पहिली गोष्ट गाण्यात एनर्जी नव्हती. मारव्यातल्या खर्जातून उठणार्‍या आणि मध्य सप्तकातल्या ऋषभ धैवतावर थांबणार्‍या गमकयुक्त प्रयोगांचा प्रभाव पडला नाही. गाण्यात भावदर्शन तर जवळजवळ नव्हतेच. खरे पाहता भावदर्शनासाठी मारव्याइतका अनुकूल राग दुसरा नव्हे. बुवांचा आवाज चांगला आहे. पण माईक, साऊंड वगैरे सगळे नीट लावून घेतले असते तर आवाज अधिक भरदार वाटून त्याचा तरी अधिक परिणाम झाला असता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मारवा संपल्यावर प्रेक्षकांतून टाळ्या जवळपास नाहीच वाजल्या असे म्हटले तरी चालेल. यानंतरचे गायन मला ऐकायला मिळाले नाही.

३) रुपक कुलकर्णी - प्रमोद शेवलीकर (बासरी-व्हायोलिन जुगलबंदी)
हा कार्यक्रमही अर्धवट ऐकला. रुपक कुलकर्णी हे पं. हरि प्रसाद चौरासियांचे शिष्य आहेत आणि त्यांची तयारी त्यांनी पंडितजींना केलेल्या साथीतून अनेक वेळा ऐकलेली आहे. शेवलीकरांचे वादन मी प्रथमच ऐकले. त्यांनी वादनासाठी 'जोग' राग निवडला होता. कार्यक्रमापूर्वी त्यांनी असा प्रयोग प्रथमच करत असल्याचे सांगितले आणि दोन्ही वाद्यांना अनुकूल असे फार थोडे राग आहेत व म्हणून जोग राग निवडला असेही सांगितले (हे मला नंतर एका मित्रासोबतच्या बोलण्यात समजले). दोन्ही वाद्यांना अनुकूल असे खूप थोडे राग आहेत हे काही फारसे पटले नाही. साथीला तबला आणि पखवाज अशी तालवाद्ये होती. मी पोचलो तेव्हा रुपक तालातली रचना चालू होती. नंतर त्रितालातली एक रचना आणि 'माझे माहेर पंढरी' हा लोकप्रिय अभंग वाजवून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. जुगलबंदीचा विचार जो आधीच्या कार्यक्रमात दिसला नव्हता तो या वादनात दिसला. बासरीच्या तुलनेत व्हायोलिन हे वाद्य नाजूक आवाजाचे वाटते (किंवा साऊंड तसा ठेवला होता, माहित नाही). सबब व्हायोलिनचा प्रभाव तसा कमीच पडला.

मध्ये एका जाणकार व्यक्तींसोबत बोलत असताना सवाईत मांडले जाणारे राग आणि विविधतेचा अभाव यांवर चर्चा झाली. 'प्रथितयश कलाकारही पूरिया धनाश्री, भिमपलास, बागेश्री, बिहाग, यमन, दरबारी, शुद्ध कल्याण याचाच रतीब वर्षानुवर्ष घालत असतात. फार फार तर जोग वगैरे. त्याचाही आता चोथा झाला आहे. खरं तर केदार, कामोद, हमीर वगैरे रंगवण्याच्या अफाट शक्यता असलेले अनेक राग आहेत जे कोणी मांडतच नाही. तालातही कशाळकरबुवा सोडले तर कोणी काही वेगळं करत नाही. सगळे आपले प्लेयिंग टु ग्यालरी मध्येच धन्यता मानतात' अशी अनेक मते व्यक्त झाली. ही मतं जशी काही ऐकली असावीत आणि त्याला छेद द्यायचा असं ठरवलं असावं तद्वत पं. मिश्रा बंधू गायला बसले आणि ओपनिंगलाच राग नंद सुरू केला. Smile

४) पं. राजन-साजन मिश्रा -
राग नंदमध्ये अप्रतीम मींडकाम, मुरक्या, बेहेलावे अशा सर्व अलंकारांनी नटलेले गायन ऐकायला मिळाले. अतिविलंबित लय घेऊनही लयतालाला धरून शिस्तबद्ध बढत करत गायन चालले. त्यांनी विलंबित एकतालात पारंपरिक 'ढूंढा बारे ('बन' असाही पाठभेद आहे) सैंया' ख्याल आणि 'जा जा रे जा कागा' ही मध्यलय त्रितालातली बंदिश मांडली. बुवांच्या गायकीतील पूर्वीची तडफ आणि तान-गमक क्रियेतील वैचित्र्ये जाऊन त्यांची जागा आता जास्त स्वरांच्या कोरीवकामाने घेतली आहे. हा कदाचित वयोमानाचा परिणाम असावा, कारण दोघांचेही गळे आता तितकेसे जलद फिरत नाहीत (गमक मात्र अजूनही तितकीच वजनदार. नादच नाय करायचा!) आणि फिरवायला गेले तर सूर हलतात अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीनुसार त्यांनी गायकीतून मांडला जाणारा विचार बदलला आहे आणि कोरीवकामावर भर दिला आहे. राग नंद झाल्यावर राग कामोद सुरू केला. त्यात विलंबित आडा चौतालात (बहुतेक! नक्की विचारून सांगतो :-P) ख्याल आणि त्रितालातली बंदिश मांडली. नंदनंतर कामोद गाणे अवघड आहे, कारण दोन्ही राग तसे जवळपास आहेत. पण हे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. कामोद गाताना नंद पूर्णपणे पुसला गेला होता आणि कामोदाचे स्वतंत्र अस्तित्व दिसत होते. यानंतर एक भजन गाऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

व्यवस्थापकः हे तपशीलवार आणि अतिशय रसभरीत वार्तांकन अधिक वाचकांपर्यंत पोचावं व त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी म्हणून धागा वेगळा काढत आहोत.

field_vote: 
0
No votes yet

दुसर्‍या दिवसाचे कलाकार -
१. श्रीमती सुचिस्मिता दास - गायन
२. अमजद अली खान - गायन
३. पं. नीलाद्री कुमार - सतार
४. पं. जसराज - गायन

१. श्रीमती सुचिस्मिता दास
श्रीमती दास या कोलकात्याच्या असून पं. अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या आहेत. त्यांनी गायनाची सुरुवात राग शुद्ध सारंगाने केली. साथीला पेटीवर श्री. मिलिंद कुलकर्णी, तबल्यावर संदीप घोष आणि सारंगीवर दिलशाद खान हे होते. बाईंचा आवाज उत्तम आहे, गळ्याची तयारीही चांगली आहे, विशेषतः पं. चक्रवर्ती यांच्याप्रमाणेच सरगम उत्तम करतात. ध्वनिव्यवस्थेसह पर्फॉर्मन्ससाठी लागणार्‍या इतर सर्व घटकांची जाणीवही चांगली आहे. तुलनेने तानक्रिया, बोलबनाव हे प्रकार गाण्यात कमी दिसले. पण हे सर्व असूनही कार्यक्रमाच्या रंगात बाधा आणली ती त्यांनी शुद्ध सारंगच्या वापरलेल्या चलनामुळे. पारंपरिकरीत्या जो शुद्ध सारंग गायला जातो त्यात 'रे म॑ प नी सां' असा आरोह होतो. क्वचित 'रे म॑ प नी, ध सां' असाही आरोह करतात. परंतु श्रीमती दास यांनी 'रे म प, नीध नी, सां' असा आरोह मांडला, जे शुद्ध सारंगाच्या चलनाला धरून नाही. प्रथमतः ही दुसर्‍या एखाद्या रागाचा क्षणिक आविर्भाव निर्माण करण्यासाठी खास घेतलेली जागा आहे असं वाटलं. पण हे जेव्हा सतत व्हायला लागलं तेव्हा चिडचिड झाली. मध्ये मध्ये स्वतंत्रपणे एखादा तुकडा वाजवताना दिलशाद खान आणि मिलिंद कुलकर्णी दोघेही 'रे म॑ प नी सां' वाजवत होते, पण बाई काही शुद्ध धैवत सोडायला तयार नव्हत्या. असो. म्हणजे गाणं गोड लागत होतं, लोकांची वाहवासुद्धा मिळत होती, परंतु ज्यांच्याकडे राग व स्वरांचं थोडंफार का होईना पण ज्ञान आहे, रागशुद्धतेचा आग्रह आहे त्यांची नक्की चिडचिड झाली असणार यात शंका नाही. आपल्या गायनाची सांगता बाईंनी बडे गु़लाम अली खांसाहेबांच्या लोकप्रिय 'याद पिया की आए' या रचनेने केली. त्यात त्यांनी दाखवलेले विविध राग आणि परत मूळ रागात येणे हेसुद्धा उत्तम. बाई ठुमरी चांगली गातात, परंतु ठुमरी गाताना शब्दांचे भान ठेवून, त्यांचा वापर करून भावदर्शन करण्यात कमी पडतात आणि तुलनेने त्यांच्या गुरुभगिनी कौशिकी चक्रवर्ती ठुमरी गाण्यात अधिक वाकबगार आहेत असे वाटते.

२. अमजद अली खान - गायन
अमजद अली खान हे किराना घराण्याच्या संस्थापकांपैकी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्या परंपरेतले तरुण गायक आहेत. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पूरिया धनाश्रीने केली. पूरिया धनाश्रीमध्ये त्यांनी विलंबित एकतालातील ख्याल व द्रुत त्रितालातील बंदिश पेश केली. खास किराना घराण्याच्या पद्धतीला अनुसरून बोलांचा विशेष वापर न करता केवळ आलापांच्या विविध तुकड्यांनी, अतिविलंबित लयीत त्यांनी पूरिया धनाश्रीचे स्वरूप दाखवले. यानंतर त्यांनी ख्यालात केलेली तानक्रिया विशेष उल्लेखनीय होती. विविध पटीतील ताना, तानक्रिया करतानाही लयीचे सांभाळलेले भान या गोष्टी विशेष आवडल्या. खास किरान्याची म्हणावीत अशी वैशिष्ट्ये (आलापांनी स्वरविस्तार, बोलांना आणि विलंबित लयीत तालाला असलेले दुय्यम स्थान, तीनही सप्तकांत चालणारी द्रुत लयीतील तानक्रिया इ.) असलेली गायकी खूप दिवसांनी ऐकावयास मिळाली. यानंतर त्यांनी खास आयोजकांच्या आग्रहास्तव बिहाग रागात एक द्रुत त्रितालातील बंदिश पेश केली. या नंतरचे त्यांचे गायन मला ऐकावयास मिळाले नाही. महाराष्ट्रात जरी किराना गायकी गाणारे लोकप्रिय कलाकार फारसे उरले नसले (सध्या तरी श्री. आनंद भाटे हे एकच नाव डोळ्यांसमोर येतं. पण तेही ओव्हर एक्स्पोजरचे बळी ठरले आहेत आणि सध्या त्यांची गायकी साचेबद्ध वाटू लागली आहे.) तरी अमजद अली खान यांच्यासारख्या कलाकारांच्या हाती किराना गायकीचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. अमजद अली खान यांना तबल्यावर प्रशांत पांडव, सारंगीवर दिलशाद खान आणि पेटीवर अविनाश दिघे यांची साथ होती.

३. पं. नीलाद्री कुमार
मला वाद्य संगीतातील तांत्रिक तपशील समजत नाहीत. त्यामुळे त्यावर विशेष काही लिहिणे योग्य होणार नाही. पं. नीलाद्री यांनी १५ वर्षांनी सवाईत पुनरागमन केले. त्यांनी प्रथम राग शुद्ध कल्याण सादर केला. शुद्ध कल्याणात आलाप-जोड-झाला आणि झपतालातील एक रचना सादर केली. यानंतर मिश्र काफीत अध्धा तालात एक धुन सादर करून त्यांनी आपले वादन संपवले. पं. नीलाद्री कुमार यांनी पारंपरिक सतारीत काही बदल करून त्याचे स्वर जास्त सस्टेन होतील अशा प्रकारची रचना करून घेतली आहे. ज्यामुळे सतारीचा मूळचा गोडवा थोडा कमी होऊन ती थोडी इलेक्ट्रिक गिटारसारखी वाजते (तुलना - उस्ताद विलायत खान यांची सतार जी गोड वाजते, पं. रविशंकरांची सतार जी काहीशी वीणेसारखी वाजते आणि खर्जातील कामाला उपयुक्त असते). पण हे बदल त्यांच्या वादनशैलीला सुसंगत असेच आहेत. वाद्यावर असलेली प्रचंड हुकुमत आणि अतिद्रुत लयीत वादन करण्याचे टेक्निक यांनी त्यांचे वादन खुलते. त्यांना तबला साथ पं. विजय घाटे यांनी केली. दोन्ही वादकांतील ताळमेळ अतिउत्तम होता. न्यून काढायचेच झाले तर शुद्ध कल्याणात केलेला 'पधनी, धपम॑ग' हा स्वरप्रयोग हा खटकला. जरी गोड वाटला तरी तो शास्त्राला धरून नाही. पण हा प्रयोग मर्यादित वेळा केल्याने फार रसभंग झाला नाही. पुन:श्च मुद्दा हाच आहे, की गोड लागतं म्हणून रागापासून दूर जाण्याचं कितपत स्वातंत्र्य कलाकाराने घ्यावं? माहित नाही, मतमतांतरे असू शकतात. एकूण वादन फारच उत्तम झालं आणि सर्व श्रोत्यांनी वादनानंतर त्यांना उभे राहून टाळ्यांची दाद दिली. हा कार्यक्रम कालच्या दिवसातील हायलाईट ठरला हे नक्की.

४. पं. जसराज -
मागल्या वर्षीच्या एकूण फियास्कोनंतर यंदाचा त्यांचा कार्यक्रम म्हणजे सुखद आश्चर्याचा धक्का होता. मुख्य म्हणजे बुवांची तब्येत ठीक दिसत होती. आवाजही उत्तम लागला होता. रतन मोहन शर्मा वगैरे नेहेमीची गँग साथीला होतीच. त्यांनी राग कौशी कानडा सादर केला. कौशी कानड्यात त्यांनी 'राजन के राजा रामचंद्र' हा विलंबित एकतालातील पारंपरिक ख्याल आणि द्रुत त्रितालातील 'का न करत न मोसो बतिया' ही बंदिश मांडली. बंदिश नुकतीच नवीन रचलेली होती असेही त्यांनी सांगितले. मालकंस आणि दरबारी हे दोन्ही भारदस्त राग असूनही त्यांचं काँबिनेशन असलेला कौशी कानडा हा अत्यंत कोमल प्रकृतीचा राग आहे आणि भावदर्शनासाठी अतिशय अनुकूल आहे. भावपूर्ण स्वरलगाव ही तर पं. जसराजांची खासियत असल्याने कौशी कानडा मस्तच रंगला. यानंतर त्यांनी खास लोकाग्रहास्तव 'ओम नमो भगवते' हे लोकप्रिय भजन सादर करून कार्यक्रमाची आणि दिवसाची सांगता केली. वयाच्या ८६व्या वर्षी (जानेवारीत ८७वं लागेल म्हणतात) एवढ्या चांगल्या प्रकारे गाऊ शकणे हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे. पं. जसराज यांना दीर्घायुष्यासाठी आणि अशाच प्रकारे संगीताची सेवा करत राहाण्यासाठी शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद! नीलाद्री कुमार यांचं वादन उत्तम झाल्याचं अनेकांकडून ऐकलं.

आज प्रवीण गोडखिंडींची बासरी आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

निलाद्रीकुमार यांची सतार ऐकायची इच्छा असूनही जायला जमले नाही. वृत्तांताबद्द्ल धन्यवाद.

तिसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमाचा काही भाग मिळाला. भारती-प्रताप(गायन), गोडखिंडी(बासरी)-अडियार(तबला) व राजेंद्र गंगाणी(कथक) यांचे कार्यक्रम संस्मरणीय झाले. दुर्दैवाने कशाळकर यांच्या कार्यक्रमाला थांबणे शक्य नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप दिवसांनी प्रतिसाद देतोय त्याबद्दल क्षमस्व. मी वर 'का न करत न मोसो बतिया' असे पं. जसराज यांच्या बंदिशीचे शब्द लिहिले आहेत. ते बहुधा 'कान्हा करत न मोसो बतिया' असे असावेत. माझ्या ऐकण्यात चूक झाली असावी. कारण दोन वेळा 'न' वापरण्याचं लॉजिक विचार करता समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शनिवार - पैकी श्रीमती भारती प्रताप, प्रवीण गोडखिंडी (उत्तरार्ध) आणि राजेंद्र गंगाणी (नृत्य) ही कार्यक्रम ऐकायला मिळाले नाहीत.
१. पं. रघुनंदन पणशीकर -
यांनी भूप रागात विलंबित तीनतालात 'प्रथम सुर साधे' हा ख्याल व त्यांच्या गुरु किशोरी आमोणकरांची लोकप्रिय 'सहेला रे' ही बंदिश मांडली. यानंतर त्यांनी खास लोकाग्रहास्तव 'पद्मनाभा नारायणा' हा तुकोबांचा अभंग सादर करून आपला कार्यक्रम संपवला. भूप हा वरकरणी सोपा वाटणारा राग असला तरी गंभीर प्रकृतीचा व विस्ताराला अवघड आहे, तसेच त्यात निसरड्या जागाही भरपूर आहेत. पं. पणशीकरांनी आपल्या खास जयपूर शैलीत भूप मांडला. फारशी विलंबित नसलेली लय (किरानावाल्यांच्या हिशोबात तर फारच जलद), खास भूपात दिसणारे स्वरांचे लहान लहान पण तरीही गोड वाटणारे आकृतीबंध आणि मुख्य म्हणजे स्वरांची आस कुठेही न तुटू देता पूर्ण भरलेली तालाची आवर्तनं यामुळे भूप मस्त रंगला. निकोप आणि मंद्र पंचम ते तार पंचमापर्यंत सहज फिरणारा आवाज, रागाची शुद्ध स्वरूपातील मांडणी यामुळे बुवांचे गायन नेहेमीच श्रवणीय असते. 'पद्मनाभा नारायणा' हा अभंग मध्यम ग्रामात असल्याने (मध्यमाला षड्ज मानून गाणे) आणि रंगवून गायल्यामुळे कार्यक्रम एका उंचीवर संपला. यानंतर सुदैवाने श्री. गोडखिंडी यांचे बासरीवादन असल्याने फरक पडला नाही. पुन्हा जर गायनच असते तर पुढच्या कलाकाराला रंग जमवणे अवघड गेले असते. याबद्दलचे एक चांगले उदाहरण म्हणजे महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी श्रीमती सुचिस्मिता दास यांनी मध्यमातली 'याद पिया की आए' ही ठुमरी गायली. ठुमरी रंगल्याने पुढचे अमजद अली यांचे गाणे कितपत रंगेल याबद्दल शंका होती. निवेदकांनी ते 'पूरिया धनाश्री' गाणारेत असं सांगितल्यावर शंका अधिकच गडद झाली. परंतु त्यांनी चाणाक्षपणे मध्य सप्तकातील निषादावर सम असलेल्या ख्यालाने सुरुवात केल्याने मध्यमातील ठुमरीचा प्रभाव चटकन पुसला गेला. अर्थात हे त्यांनी ठरवून केले की योगायोगाने झाले हे माहिती नाही. पण आपल्या रंगलेल्या गायनाचा प्रभाव लोकांवर रहावा यासाठी मध्यमातील रचनेने शेवट करणे ही एक कॉमन युक्ती आहे जी बरेच कलाकार वापरतात. एकदा अशा ट्रॅपमधे पं. जसराज अडकल्याचेही सवाईमध्ये पाहाण्यात आलेले आहे. मला आधीचा कलाकार कोण होता ते आठवत नाही, पण बुवांनी बहुधा मंद्र-मध्य सप्तकात प्रधान विस्तार असलेला जयजयवंतीचा ख्याल काढला होता. आधीचे गायन मध्यमात संपल्याने तो जयजयवंती अर्धा तास झाला तरी रंगायला तयार नव्हता. अंतर्‍याचा उठाव सुरु झाल्यावर कुठे त्याचा प्रभाव दिसू लागला, आणि तोही केवळ गाणारे पं. जसराज होते म्हणून.

२. श्री. प्रवीण गोडखिंडी -
श्री. गोडखिंडी जरी बासरीवादक असले तरी त्यांची तालीम किराना घराण्याची, गायकी अंगाची आहे. परंतु ते केवळ गायकी अंगाने वादन न करता गायकी व तंतकारी अशा मिश्र पद्धतीने बासरीवादन करतात. वेगळ्या शैलीचे त्यांचे बासरीवादन ऐकणे ही एक आनंदाची गोष्ट असते. बादवे, त्यांचा एक फ्यूजन बँडही आहे, ज्यात ते शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेमातील प्रसिद्ध रचना शास्त्रीय संगीताप्रमाणे विस्तार करून वगैरे वाजवतात. तोही प्रयोग त्याच्या वेगळेपणामुळे ऐकण्यासारखा असतो. असो. त्यांनी विलंबित एकतालात मारु बिहागातील एक ख्याल व मध्यलय त्रितालात 'जागूं मैं सारी रैना' ही प्रसिद्ध बंदिश सादर केली. विलंबित एकतालात गायकी पद्धतीचे वादन व त्याला दिलेली तंतकारी अंगाची जोड यामुळे मारु बिहाग रंगला. त्यातही विशेष म्हणजे तंतकारी अंगाने चालणारी लयकारी, विविध तिहाया यामुळे शब्द नसतानाही केवळ वाद्यावर मांडलेली ख्यालसदृश रचना श्रवणीय ठरली (शिवाय काही शिकताही आले). त्यांना तबल्यावर श्री. आडियार यांनी साथ केली. नंतरचा कार्यक्रम ऐकायला मिळाला नाही.

३. पं. उल्हास कशाळकर -
सगळे आधीचे कलाकार झाल्यावर बुवांना गायला एकच तास मिळाला. त्यात त्यांनी राग जोगकंसमध्ये विलंबित एकतालात 'सुघर वर पाया' हा ख्याल व 'पीर परायी' ही त्रितालातील बंदिश मांडली. जोगकंस हा पं. जगन्नाथबुवा पुरोहितांनी निर्माण केलेला अर्वाचीन राग आहे. चंद्रकंस व जोग यांचे मिश्रण असलेला हा राग अतिशय श्रुतिमनोहर आणि विस्ताराला अनुकूल आहे. गंमत म्हणजे बदल म्हणून यंदा बुवांचं गाणं विलंबित एकतालात तर इतर कलाकारांचे झुमरे आणि आडा चौताल ऐकायला मिळाले. ग्वाल्हेर-आग्रा घराण्याची दमदार गायकी, ख्यालाच्या संपूर्ण बोलांनी भरलेली तालाची आवर्तने (ख्यालाचे एक दोन शब्द घेऊन त्याला लटकून विस्तार करणे हा त्याचा उलट आणि वैतागवाणा प्रकार), खडा पण तरीही धारदार स्वरलगाव, स्वरांना गदगदून काढलेली वजनदार गमके आणि बेहेलावे, विलक्षण दमसासाच्या बोल-ताना आणि ताना, कुठेही न रेंगाळता केलेला रागविस्तार, तानांमध्येही सांभाळलेले रागाचे वक्र चलन, ताना घेताना तार सप्तकांत जाऊन पुन्हा चपळाईने थेट मध्य सप्तकातील स्वरांवर येणे आणि तान पुढे चालवणे अशी वैशिष्ट्ये लिहावी तेवढी थोडी आहेत. असो. जोगकंस झाल्यावर बुवांनी अडाणा रागातील 'आयी रे कर्करा' ही पारंपरिक बंदिश सादर केली. शेवटी श्रीनिवास जोशींच्या फर्माईशीवरून 'जमुना के तीर' ही दीपचंदी तालातली लोकप्रिय भैरवी गाऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची आणि दिवसाची सांगता केली. भैरवीतही तालाच्या केलेल्या छोट्या छोट्या खोड्या (पण भैरवीचा एकूण आब आणि भाव सांभाळून) आणि दाखवलेले स्वरवैचित्र्य याच्यामुळे दिवसाची सांगता एका उच्च बिंदूवर झाली. बुवांना पेटीवर श्री. सुधीर नायक आणि तबल्यावर पं. सुरेश तळवलकर यांनी साथ केली. बाकी मी बुवांचे जेवढे कार्यक्रम ऐकले आहेत, त्या प्रत्येकात त्यांना पं. तळवलकरांची तबलासाथ होती. एखाद्या कलाकाराचं गाणं समर्पक साथीमुळे कसं खुलतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कशाळकरबुवा आणि पं. तळवलकर असे सांगता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या कलाकाराचं गाणं समर्पक साथीमुळे कसं खुलतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कशाळकरबुवा आणि पं. तळवलकर असे सांगता येईल.

हे वाक्य श्री. आडियार-गोडखिंडी यांच्याबाबतीतही लागू आहे, असं मला वाटतं.

कशाळकर यांचा कार्यकम मिळाला नाही याचे अत्यंत वाईट वाटते.

कार्यक्र्मत, ज्यांना ताल जाणून घेण्यात अधिक रुची आहे, अशांकरता एक संकेतस्थळ सागितलं होतं ते आठवतयं का तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कार्यक्र्मत, ज्यांना ताल जाणून घेण्यात अधिक रुची आहे, अशांकरता एक संकेतस्थळ सागितलं होतं ते आठवतयं का तुम्हाला?

कार्यक्रम अर्धवट ऐकला. त्यामुळे मारु बिहागानंतर काही सांगितलं वगैरे असेल तर माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सत्रातील कलाकार
१. श्री. शौनक अभिषेकी
२. पं. ध्रुव घोष
३. सौ. मालिनी राजुरकर

पैकी श्री. शौनक अभिषेकी यांचे गायन ऐकावयास मिळाले नाही. मागे एकदा त्यांच्या कार्यक्रमाला गेलो असताना सभात्याग करायची वेळ आली होती, त्यामुळे याचे दु:ख वाटले नाही.

१. पं. ध्रुव घोष -
गायकी अंगाने सारंगी वादन करणारे अनेक लोक आहेत. परंतु गायकी अधिक तंतकारी अंगाने वादन करणारे पं. घोष हे पहिलेच. (पुढील माहिती स्वतः पं. घोष यांनी कार्यक्रमात सांगितली) असे नव्हे की पूर्वीच्या काळी तंतअंगाने सारंगी वाजवलीच जात नसे. परंतु सारंगी जशी ख्यालगायकीच्या प्रभावाखाली आली, तसे ख्यालगायकीतील विलंबित लयीत केला जाणारा स्वरपरिपोष, सारंगीची नैसर्गिकरीत्या असलेली गळ्यासारखे स्वर-मींड इत्यादी काढण्याची क्षमता आणि सारंगीच्या याच क्षमतेमुळे तिची ख्यालगायकीला पोषक ठरणारी साथ यामुळे सारंगियेही गायकी अंगाच्या वादनाकडे वळले. पूर्वी सारंगीला 'सारंग वीणा' असेही नाव होते आणि पूर्वीचे बीनकारच सारंगी वाजवत. सबब सारंगी ही तंतकारी अंगानेच वाजवली जात असे (पं. घोष यांनी सांगितलेली माहिती संपली). एका अर्थी पं. घोष यांना सारंगीतीवादनातील तंत अंगाचे पुनरज्जीवक असेही म्हणतात. पं. ध्रुव घोष हे उस्ताद बुंदू खान या प्रसिद्ध सारंगियांच्या शिष्यपरंपरेतील आहेत आणि त्या शैलीत वादन करतात. त्यांनी सर्वप्रथम राग मियाँ की तोडी सादर केला. तोडीमध्ये एक ख्याल आणि एक त्रितालातील बंदिश त्यांनी सादर केली. पं. घोष हे १० वर्षे शास्त्रीय गायनही शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांनी बंदिशी गाऊनही दाखवल्या, ज्यामुळे सारंगीतून काढलेल्या जागांची उपज कशी आहे ते समजायला मदतच झाली. बादवे पंडितजींचा आवाज काहीसा पै. उस्ताद सुलतान खान यांच्यासारखा आहे हे जाता जाता नमूद करावसे वाटते. सारंगीवर द्रुत लयीत 'झाला' पद्धतीने वादन करण्याचे तंत्र प्रथमच ऐकायला मिळाले. वादन संपल्यावर 'ये कुछ रास्ते उस्ताद बुंदू खाँसाहब ने बनाए है| उन्ही रास्तोंपर हम चल रहे हैं और आप को भी दिखा रहे हैं|' या शब्दात त्यांनी आपल्या परंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त केली जी लोकांना विशेष भावली. यानंतर त्यांनी जोगिया रागातील 'पिया मिलन की आस' ही पं. भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेली ठुमरी वाजवली आणि आपला कार्यक्रम संपवला. त्यांना तबल्याच्या साथीला कोण होते आता आठवत नाही. बहुतेक श्री. रामदास पळसुले असावेत. एक खटकलेली गोष्ट म्हणजे श्री. अभिषेकी आठ ते पावणे दहा एवढ्या वेळ गायल्यामुळे पं. घोष यांना वादनासाठी जेमतेम १ तास मिळाला. अन्यथा त्यांचे वादन अजून १५-२० मिनिटे ऐकता आले असते.

२. सौ. मालिनी राजुरकर -
वेगवेगळे राग, अनेक चिजा, थोडीशी टप्प्याच्या अंगाची छोट्या छोट्या तुकड्यांनी चालणारी लयकारी, भावपूर्ण गायन या वैशिष्ट्यांमुळे अस्सल ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेतले मालिनीताईंचे गाणे ऐकणे ही नेहेमीच विशेष आनंदाची गोष्ट असते. यंदा सकाळच्या सत्रात शेवटचा कार्यक्रम असल्याने त्यांच्यावर सुदैवाने वेळेचे बंधन नव्हते त्यामुळे त्याही दिलखुलासपणे गायल्या. मालिनीताईंनी प्रथम राग चारुकेशी सादर केला. चारुकेशीमध्ये तिलवाड्यातला ख्याल आणि त्रितालातील एक चीज मांडली. या वेळी गायनात नेहेमीचा आक्रमकपणा न जाणवता एक वेगळीच भावपूर्णता आणि मार्दव जाणवत होते. आता हा आक्रमकतेचा अभाव जाणूनबुजून ठेवला होता की गळा साथ देत नसल्याने तसे झाले होते हे ठाऊक नाही (सध्या थंडीचे दिवस असूनही पुण्यात हवा फार काही चांगली नाही. घशाच्या तक्रारींची संख्या वाढलेली दिसतेय. मांडवातही आजूबाजूला सतत लोक खोकत होते). पण जे काही चाललं होतं ते कानाला गोड लागत होतं हे महत्वाचं. चारुकेशी रागानंतर त्यांनी गौड सारंग रागात एक मध्यलय त्रितालातील बंदिश सादर केली. सगळ्यात कहर आणि कदाचित दिवसाचा परमोच्च बिंदू गाठला तो त्यांच्या भैरवीने. भैरवीत त्यांनी मध्यलय त्रितालातील 'पनघट पे जल भरन जी मैं कैसी जाऊं' ही बंदिश सादर केली. मूळ बंदिश अतिशय गोड आहे आणि मालिनीताईंनी तिला अधिकच सुंदर बनवून पेश केली आणि कार्यक्रमाची व सत्राची सांगता केली. श्रोत्यांकडून आलेल्या टप्प्याच्या फर्माईशीला विनम्र पणे नकार देत त्यांनी 'आज टप्पा-तराणा वर्ज्य आहे. त्यांचा मुहूर्त नाही. दुपारच्या मैफिलीला टप्पा नको वाटतो. शिवाय तुम्ही नेहेमी टप्पा ऐकता, यंदा दुसरं काहीतरी ऐकलंत. पुढच्या वेळी हवं तर २ टप्पे म्हणीन' असे सांगून कार्यक्रम संपवला.
(मी त्या भैरवीचं रेकॉर्डिंग शोधतोय. कृपया कोणाला मिळाल्यास कळवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रविवार संध्याकाळ एकुणातच धावपळीत गेली त्यामुळे बहुतांश कार्यक्रम ऐकता आले नाहीत याचे दु:ख आहे. या सत्रातील कलाकार पुढीलप्रमाणे -

१. पद्मा देशपांडे - गायन
२. भारती वैशंपायन - गायन
३. उपेंद्र भट - गायन
४. शुभा मुद्गल - गायन
५. सुरेश वाडकर - गायन
६. मंजू मेहता व पार्थो सारथी - सतार व सरोद सहवादन/जुगलबंदी
७. प्रभा अत्रे - गायन

१. पद्मा देशपांडे -
पद्माताई हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या आहेत. तसेच त्यांची दुसरी ओळख म्हणजे सवाई गंधर्व पं. रामभाऊ कुंदगोळकरांची नातसून अशीही आहे. यंदा त्यांनी ६५व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. पद्माताईंचे श्वशुर व सवाई गंधर्व महोत्सवात महत्वाचा सहभाग असलेले कै.डॉ. वसंतराव उर्फ नानासाहेब देशपांडे यांची यंदा जन्मशताब्दी आहे. त्यामुळे पद्माताईंच्या या वर्षीच्या कार्यक्रमाला विशेष महत्व होते. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात मधुवंती रागाने केली. मधुवंती रागात त्यांनी विलंबित एकतालात ख्याल, त्रितालातील चीज आणि एक तराणा पेश केला. गोड सानुनासिक आवाज, गळ्याची सहज फिरत, लय-तालावर हुकूमत यांमुळे त्यांचे गायन खुलते. किराना घराण्याची गायकी गात असूनही त्यांचे गाणे प्रकर्षाने लयप्रधान आहे हे विशेष. किरान्याची बाकी वैशिष्ट्ये जसे की आलापप्रधान मांडणी, जलद तानक्रिया इ. वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसतातच. मधुवंतीनंतर त्यांनी श्री व बसंत रागांचे मिश्रण असलेला 'श्रीबसंत' हा स्वनिर्मित राग गायला. पद्माताईंनी हा राग त्यांचे श्वशुर कै. डॉ. वसंतराव उर्फ नानासाहेब देशपांडे (म्हणूनही श्री'बसंत' नावाचे औचित्य) यांना अर्पण केला असल्याचे सांगितले. या रागात त्यांनी मध्यलय त्रितालातील एक बंदिश सादर केली. १० मिनिटाच्या बंदिशीत रागाचे पूर्ण स्वरूप कळणे अवघड असले तरी बहुतांश बसंतच दिसत होता आणि अवरोहात 'प (रे)' या संगतीतून (रे कोमल आहे. अक्षराचा पाय कसा मोडायचा? विशेषतः काना मत्रा वेलांटी दिलेल्या अक्षराचा? बाकी स्वरलेखन जमतेय, कोमल रे आणि कोमल नी लिहिता येत नाहीये) श्री रागाचे अस्तित्व दिसत होते. खरे तर बसंत व श्री एवढे जवळचे राग आहेत की त्यांच्या मिश्रणाने झालेल्या रागात एका रागातून दुसर्‍या रागात जायला असंख्य वाटा असू शकतात व त्यातूनच एखादे पूर्ण युनिक स्वरूप तयार होऊ शकते. पण तसे दिसले नाही. अर्थात हा माझ्या मूळच्या मर्यादित आणि १० मिनिटांत ऐकून होणार्‍या आणखीन मर्यादित आकलनाचाही दोष असू शकतो. यानंतर त्यांनी 'सावन की रुत आयी रे सजनिया' हे सावनगीत सादर करून आपला कार्यक्रम संपवला. सावनगीतात दाखवलेले जागांचे वैविध्य विशेष छान होते. त्यांना पेटीवर डॉ. अरविंद थत्ते व तबल्यावर श्री. पांडुरंग मुखडे यांनी साथ केली.

२. भारती वैशंपायन -
कोल्हापूरच्या निवासी असलेल्या सौ. वैशंपायन या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका व पं. निवृत्तीबुवा सरनाईकांच्या शिष्या आहेत (त्यांना जयपूर घराण्याच्या इतरही बर्‍याच गायकांचे मार्गदर्शन मिळाले आहे, पण सगळ्यांची नावं मला आठवत नाहीयेत). त्यांचा या महोत्सवात हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात गौड सारंग रागाने केली. त्यात त्यांनी विलंबित त्रितालातील ख्याल, मध्यलयीत 'पियु पल न लागी मोरी अखियां' ही पारंपरिक बंदिश व द्रुत एकतालातील तराणा मांडला. नंतर त्यांनी 'पूर्वी अंगाचा मालावी' (हा खास जयपूर घराण्याचा टच. असले काहीतरी अनवट राग त्याच घराण्यात गातात.) या रागातील एक बंदिश पेश केली. 'रवि मी' या नाट्यपदाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. स्वच्छ व वजनदार आवाज, जयपूर घराण्याच्या पद्धतीने लयप्रधान गाणे यामुळे त्यांचे गायन रंगले. फक्त एका तासात १ मुख्य रागातील ख्याल-चीज-तराणा, मग अजून एक राग आणि एक नाट्यगीत एवढं सगळं मांडण्यामागचं लॉजिक मात्र समजलं नाही. तसं पाहिलं तर गौड सारंग आणि मालावीच त्यांना अजून रंगवता आला असता. कारण हे दोन्ही राग आटोपते घेतल्यासारखे वाटले. त्यांना पेटीवर श्रीराम हसबनीस तर तबल्यावर केदार वैशंपायन यांनी साथ केली.

३. सुरेश वाडकर -
हे पतियाला घराण्याचे गायक आहेत व पं. जियालाल बसंत यांचे शिष्य आहेत (म्हणजे एके काळी होते. आता शास्त्रीय संगीताशी काही संबंध राहिला आहे असे दिसले नाही). अनेक वर्षांपूर्वी 'सूरसिंगार' स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर पं. भीमसेन जोशींनी त्यांना सांगितलं होतं की 'सुरेश, यंदा तू सवाईत गायचंस'. तेव्हा ते जमलं नाही. पण म्हणून आता त्यांना शास्त्रीय गायनासाठी बोलवायचं कारण समजलं नाही. गायनाबद्दल काय लिहिणे? अनेक गोष्टी आहेत - बुवांनी यमन गायला, विलंबित त्रितालातील ख्यालाचे शब्द काय होते कळलं नाही, बुवा तालात हुकत होते, ४-४ आवर्तनं समेवर येत नव्हते (तबला साथ करणारे भरत कामत आविर्भावांनी 'सम आली, सम आली' असं दाखवत असतानाही), काही वेळा सम चुकले, वगैरे. तरीही त्याच त्या स्वरावटींचं कंटाळवाणं दळण सुमारे अर्धा तास चाललं होतं. त्रितालातील बंदिश सुरु झाल्यावर त्यांना जरा गल्ली सापडल्यासारखं वाटलं. हा सगळा खेळ पाऊणेक तास चालला असावा. आता मागच्याच वर्षी ते सवाईत गाणार होते. महोत्सव पावसाने वाहून गेल्याने त्यांना जमलं नाही. ठीक आहे, मग यंदा गाणार आहात असं कळल्यावर रियाज करायला काय झालं होतं वर्षंभर? ते ही तुम्ही रीतसर शास्त्रीय शिकला आहात हे ध्यानात घेतलं तर मग हा प्रकार अक्षम्य ठरतो. असो. नंतर त्यांनी एक ठुमरी पेश केली. ठुमरीत अध्धा वगैरे लाईटचे ताल सुरु झाल्यावर जरा बुवा होमपिचवर आल्यासारखे वाटले. नंतर दोन भजनं गायले. भजनं म्हणजे काय घरचीच विकेट, फुल्ल फटकेबाजी केली आणि कार्यक्रम संपवला. पेपरात श्रोते स्वराभिषेकात चिंब वगैरे काय काय छापून आलं होतं. माझी अवस्था मात्र त्या दळणामुळे पिठाने माखलेल्या गिरणीवाल्यासारखी झाली होती.

असो. यंदा कुठलाही टीपी न करता जेवढं शक्य होईल तेवढं सवाई ऐकून वृत्तांत लिहायचा असं ठरवलं होतं. पण शेवटी संयम सुटून दोस्त आणि खादाडीत नंतरचा मंजू मेहता आणि पार्थो सारथी हा कार्यक्रम वाहून गेला. पण त्यांनी चारुकेशी चांगला वाजवला. सोमवारी सकाळी लवकर उठून कचेरीत जायचे असल्याने प्रभा अत्रेंच्या गाण्याला थांबता आलं नाही. अशा रीतीने माझ्यासाठी सवाई गंधर्व २०१५ संपन्न झाला. इति लेखनसीमा वगैरे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

मागे एकदा (२००८?) पद्मा देशपांडेंचं गायन ऐकून (त्यांना स्वरसाथ द्यायला बसलेल्या) त्यांच्या सूनबैच बरं गातात असा शेरा शेजारच्या एका खऊट म्हतार्‍याने मारला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पद्मा देशपांड्यांचा आवाज लागण्यावर बरंच काही अवलंबून असतं. बाकी परवा चांगला लागला होता आवाज. कसं आहे, की असे पूर्वीच्या गाणार्‍या बायकांसारखे सानुनासिक आवाज, उच्चार वगैरे आजकाल ऐकायला मिळत नाहीत. आजकाल माइकच्या तंत्राने गाणार्‍या सोफिस्टिकेटेड आवाजाच्या गायक-गायिकांमध्ये त्यांचा आवाज त्याच्या वेगळेपणाने उठून दिसतो. त्यांचं गाणं माईकशिवाय कधी ऐकून बघा, फरक समजून येईल. बाकी म्हातारबा बोलून चालून खऊट असल्याने त्यांचे काय मनावर घ्यायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम वार्तांकन. पट्टीचे कानसेन आहात Smile
शुभा मुद्गलांचे गायन कोणी ऐकले का?
मला त्यांचा आवाज भयंकरच आवडतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शुभा मुद्गल यांचे गायन ऐकता आले नाही. शेवटची एक स्वरचित ठुमरी गायल्या त्यातली १० मिनिटं तेवढी पदरात पडली. पण फक्त त्याबद्दल काय लिहायचे म्हणून जास्त लिहिले नाही. रचना बाकी छानच होती. तबल्यावर नेहेमीप्रमाणे अनीश प्रधान होते. साथसंगतही उत्तम होती. ठुमरीआधी बाई श्यामकल्याण गायल्या असे कळाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, भटोबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

आपली लिहिण्याची शैली तर अप्रतिम आहेच पण शास्त्रीय संगीताचे आपले ज्ञान पाहून भारावून गेलो. सुरेश वाडकरांच्या क्लासिकलचे डिसेक्शन वाचून गडबडा लोळलो.
मैफल ऐकावी तर तुमच्या सारख्या जाणकारां समवेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असंच म्हणतो. पुण्यामुंबईत होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांबद्दल नियमितपणे लेखन केलेलं वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहेच.

त्याव बरोबर आवडत्या चिजा अश्याच रसिकपणाने उलगडवून दाखवणारे रसग्रहणात्मक लेखनाची लेखमालिकाही सुचवतो. सगळंच लिहा, लगेच लिहा वगैरे म्हणणे नाही पण या संबंधातले लिहिणे या महोत्सवानंतर थांबवू नकात. छान लिहिताय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद. प्रयत्न करायला हरकत नाही. बघूया कसं जमेल ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सूचनेबद्दल ऋला अनुमोदन. भटोबा, तुम्हाला आवडलेले गायक-वादक, त्यांच्या आवडलेल्या चीजा उलगडून सांगणारं लेखन कराच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पा़कणीकरांचं कॅलेंडर कसंय यावेळेस? आता कुठे मिळेल? कुठे दुकान, काही फोन नंबर, काही माहित्ये का कोणाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रे् रे् नी् नि् नि् रे्ं रे्ं नी्ं नी्ं नि्ं नि्ं

कॅापी पेस्ट करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनापासून धन्यवाद. कॉपी पेस्ट करायला हरकत नाही, पण टंकायचे कसे हेसुद्धा सांगितलेत तर अजून बरे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी इंग्रजी>>मराठी टंकत नाही.थेट देवनागरी कळफलक toggle करून लिहितो तरी तो हिंदी आहे आणि काही अक्षरे त्यात टंकता येतच नाहीत ती उदा०

= सञ्चय / ऑफिस / वाङमय /
[] [][][][][]
©© ©© ©©
©© ©© ©©

"नोट्समध्ये" लेखन सहायक या फोल्डरात ठेवली आहेत ती कॅापी पेस्ट करतो.कोमल ध रे नी टंकून दिली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रे॒ ग॒ ध॒ नी॒

म॑

हे टंकण्यासाठी नेहेमीचा 'गमभन'चा कीबोर्ड वापरला. आणि कोमल (U0952), तीव्र (U0951) दाखवण्यासाठी या दुव्यावर युनिकोडचा देवनागरी ब्लॉक आहे. तिथून कोमल-तीव्र दाखवण्याच्या रेघा चोप्य-पस्ते केल्या. मी बोलनागरी कीबोर्ड वापरून देवनागरी टंकते, पण त्यातही स्वतःसाठी स्वरलेखनाची सोय केलेली नाहीये; पण करता येईल.

(जमेल तेव्हा ड्रूपाल अपपग्रेड करण्याचा विचार आहे. त्यात देवनागरी टंकनाची सोय करताना भारतीय स्वरलेखनाची सोय करून ठेवली पाहिजे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम व्रुत्तांत! धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नसलं तरी ही चर्चा वाचनीय वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्याच्या निमित्ताने ३-४ वर्षांपूर्वीच्या सवाईतल्या दोन गोष्टी आठवल्या.

शिवकुमार शर्मांनी वाजवायला सुरुवात करण्यापूर्वी विनंती केली होती की, देवाच्या दयेनी काही चांगलं वाजवून गेलो तर कृपया टाळ्या वाजवू नका, फक्त अनुभवा.
हल्ली पब्लिकला गायन-वादन चालू असताना मधेच टाळ्यांचा कडकडाट करुन दाद देण्याची जी भिकारडी सवय लागत आहे ती फक्त मलाच खटकत नाहीये हे कळून फार आनंद झाला होता.

आणि जसराजांना गातागाता समोरच्या गर्दीत फोनवर बोलताना एक माणूस दिसला. त्यांनी आलापी करतानाच, 'आम्ही गाताना प्लिज फोन बन्द ठेवा' असे काहीतरी शब्द घालून गायले आणि हशा मिळवला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली पब्लिकला गायन-वादन चालू असताना मधेच टाळ्यांचा कडकडाट करुन दाद देण्याची जी भिकारडी सवय लागत आहे

काहीसा असहमत. शिव कुमार शर्मांची मते काहीही असू देत, पण एखादी जागा आवडताच कलाकाराला उत्स्फूर्त दाद देणे हीच आपली संस्कृती आहे. कारण कितीही तयारीचा कलाकार असला तरी आपल्याकडील संगीताची मैफिल (शास्त्रीय, उपशास्त्रीय, भजन, गझल, कव्वाली वगैरे) ही बहुतांशी उत्स्फूर्त, काहीशी 'त्या त्या वेळी जे सुचेल, जी जागा गळ्यातून निघेल ती निघेल', अशा प्रकारची मांडणी असते. किंबहुना त्यामुळेच आपल्या उत्स्फूर्त सादरीकरणाला मिळालेल्या अशा प्रकारच्या इंटरॅक्टिव्ह प्रोत्साहनाने कलाकारांमध्ये अधिक उत्साह निर्माण होऊन मैफिलीला रंग चढतो असा अनुभव आहे. याउलट पाश्चात्य संगीतात पूर्ण कार्यक्रम झाल्यावर कलाकारांना आन्कोर दिला जातो. याचे कारण बहुधा पाश्चात्य संगीतात आधी ठरलेले (लिहिलेले?) संगीत वाजवले जाते किंवा पूर्ण रचनाच्या रचना लोकांना आधीच माहित असू शकतात असे असावे. पाश्चात्य क्लासिकल संगीतातील जाणकार यावर कदाचित अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते.

आता आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर पूर्वीच्या लहान लहान, निवडक श्रोत्यांच्या उपस्थितीत (दरबार, मंदिरे वगैरे) होणार्‍या मैफिलींची जागा आता खुल्या आवारात, मोठ्या प्रेक्षागृहांत होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांनी घेतली आहे. अशा ठिकाणी दूरवर/मागच्या रांगांत बसलेल्या श्रोत्यांची दाद कलाकारापर्यंत पोहोचणं अशक्यच. त्यामुळे लोक टाळ्या वाजवून आपली दाद / पसंती व्यक्त करतात. अहो, जिथे अजूनही पहिल्या रांगेत बसलेल्या श्रोत्यांनी दाद दिल्यास गवई/वादक खुलतात असा अनुभव येतो, तिथे टाळ्या वाजवून दाद देण्यात कसली आलीये चूक? अर्थात्, अशा टाळ्या वाजवून चालणार्‍या कौतुकाचा अतिरेक चूक आहे हे ही तितकेच खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दाद द्यावीच. त्याबद्दल दुमत नाही. पण कशी, किती आणि कुठे, याचं तारतम्य पाळलं जात नाही हे आहेच. उत्सफूर्तपणाचं म्हणताय ते १००% खरंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की कलाकार तल्लीन होऊन काही करत असेल तर त्याला त्यातून बाहेर काढलं जाईल असं - श्रोते म्हणून (आयोजक किंवा साथीदार घड्याळ वगैरे दाखवतात ते निराळं Wink ) - काही करू नका. टाळ्यांचा कडकडाट हीच तंद्री मोडतो असं माझं ठाम मत आहे.

मध्यंतरी लोकसत्ताच्या कार्यक्रमात शर्मांचा 'ताकाहिरो' नावाचा शिष्य सुंदर कलाकुसर करत असताना लोकांनी असाच उच्छाद मांडला होता. एकदा कौशिकीबाईं बागेश्री गाताना लोक असेच जागोजागी टाळ्या पिटायला लागले आणि बाई ज्या चेकाळल्या... आधीच त्या अ‍ॅग्रेसिव्ह गातात त्यात बघायला नको.. अहो 'बागेश्री' गाताय, जSSरा त्याला साजेसं गा, असं सांगावं वाटलं...
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलीकडेच मी कुमार गंधर्वांची एक जुनी आणि कोणाच्यातरी घरात चाललेलीऊर्ण 'इन्फॉर्मल' मैफल यूटयूबवर ऐकत होतो. त्यामध्ये कुमार गंधर्व मधून मधून गाण्याचे शब्द श्रोत्यांना स्पष्ट करून आणि समजावून सांगत होते असे पाहिले.

असेहि वाचलेले आहे की जुन्या गायकांना समोर बसलेले श्रोते जर चौकोनी चेहरा ठेवून ढिम्म बसून राहिले तर आवडत नसे. त्यांनी मधूनमधून खुल्या दिलाने आपली पसंती दर्शवावी असे त्यांना वटत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कलाकार तल्लीन होऊन काही करत असेल तर त्याला त्यातून बाहेर काढलं जाईल असं - श्रोते म्हणून (आयोजक किंवा साथीदार घड्याळ वगैरे दाखवतात ते निराळं (डोळा मारत) ) - काही करू नका.

वर म्हणल्याप्रमाणे टाळ्यांचा अतिरेक नकोच. पण बाकी घड्याळ दाखवणं काही वेळेला आवश्यक ठरतं. एकदा मुकुल शिवपुत्र यांची मैफिल पुण्यात टिळक स्मारकला सुरू होती. ९ वाजता सुरु झालेले मुकुलजी रात्रीचा १ वाजला तरी थांबायचं नावच घेईनात. १२-१२:३० वाजता अर्ध्याहून अधिक प्रेक्षागृह रिकामं झालं तरी हे सुरुच. शेवटी १ वाजता टिळक स्मारकवाल्यांनीच सरळ पडदा पाडला, ध्वनिक्षेपक बंद केला आणि कार्यक्रम संपवला. नशीब टिस्मावाल्यांनी ते गात असलेली रचना संपेपर्यंत थांबायचं सौजन्य तरी दाखवलं. तरी आतून मुकुलजींचा आवाज आलाच की 'अरे भैरवी म्हणायची राहिलीये अजून...' वगैरे. अर्थात मैफिल पैसावसूल होती याबद्दल वादच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा कौशिकीबाईं बागेश्री गाताना लोक असेच जागोजागी टाळ्या पिटायला लागले आणि बाई ज्या चेकाळल्या...

हे वाक्य विशेष आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी केवळ कानसेन जमातीमधला आहे. त्यामुळे धागालेखकांसारख्या तज्ज्ञांना जाणवणारे बारकावे आम्हास कळतहि नाहीत पण त्यांबद्दल वाचायला आवडते.

धागालेखकाने संगीतातील श्रुति (२२ का २४), भारतीय संगीतातील 'मेलडी' विरुद्ध पाश्चात्य संगीतातील 'हार्मनी', घराण्यांची वैशिष्टये, ध्रुपद म्हणजे काय आणि ख्याल म्हणजे काय, ठुमरी-दादरा-टप्पा इत्यादींमधील फरक अशा विषयांवर लिखाण केले तर आम्हास आवडेल आणि आमच्या सामान्य ज्ञानातहि भर पडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला लिखाण करायला आवडेलही. पण या सर्व विषयांवर जालावर आधीच बरंच साहित्य उपलब्ध आहे. मी त्यात काय वेगळं लिहिणार असा प्रश्न पडतो आणि लिहिणं राहून जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोप्या/ रसाळ मराठीत आहे? कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जालावर असू दे हो. पण ऐसीवर लिहा ना तुम्ही. सिनेप्रिक्षान अनेक लोकं लिहायची, पण मार्मिकचे 'शुद्धनिषाद' ची सर कोणाला होती ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर घाटावरच्या भटांनी विविध गायना/वादनांच्या केलेल्या पंचनाम्यातलं आम्हाला काहीएक घंटा कळलं नाही.
पण भटोबांशी भारतीय शास्त्रीय संगीतावर पंगा घ्यायचा नाही ही एक आम्ही स्वानुभवाने आमच्या मनाशी बांधलेली खूणगाठ!
तरी ह्या लेखानिमित्ताने भटोबांच्या त्या खमंग लेखनशैलीला पुन:प्रत्यय आला.
आमच्यासारख्यांसाठी हे ही नसे थोडके!!!
हे जर असंच मस्त लिहिणार असतील तर अजून चार बुवा/बाया/वाजंत्रीवाल्यांना ओरडायला लावण्यासाठी काय जी वर्गणी बसेल ती द्यायला आम्ही तयार आहोत!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0