दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना

'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध करून देणं. नुसती नाही, चकटफू. हे एका प्रकारे पायंडा पाडणारं, इतर अंकांना काही निर्णय घ्यायला भाग पाडणारंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. दिवाळी संपते न संपते, तोच त्यांचा अंक ऑनलाईन आलेला आहे.

साधना, दिवाळी २०१५

यंदाचं त्यांचं मुखपृष्ठ मात्र मला तितकं आकर्षक वाटलं नाही. पण अनुक्रमणिकेनं त्याची दणदणीत भरपाई केली.

कुरुंदकरांचा सॉक्रेटीस आणि विचारस्वातंत्र्य या विषयावरचा लेख, विचारवंतांनी कसं वागावं, या विषयावरच्या रोमिला थापर यांच्या या मुलाखतीचा अनुवाद, पुरस्कारवापसीबद्दलच्या रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा अनुवाद आणि नयनतारा सहगल यांनी चर्चिल महाविद्यालयात २०११ साली केलेल्या भाषणाचा अनुवाद (साहित्यिक आणि राजकारण) - असे चार खणखणीत आणि पूर्वप्रकाशित लेख या अंकात आहेत. काहीएक भूमिका घेताना, एखाद्या विषयाचा आढावा घेताना, समग्रतेचा आग्रह धरताना, विषयाच्या शक्य तितक्या सगळ्या बाजू प्रकाशात याव्यात यासाठी असे जुने लेख पुन्हा प्रकाशित करणं (भाषांतरित वा मूळ भाषेत) हे कमीपणाचं वा लबाडीचं तर नाहीच; पण काही वेळा अतिशय समर्पक असू शकतं हे सिद्ध करणारी ही निवड आहे. 'ऐसी अक्षरे'च्या नव्वदोत्तरी विशेषांकाबाबतच्या ताज्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर हे फारच लखलखीतपणे जाणवलं.

हे सगळेच लेख वाचावेच असे आहेत, हे सांगणे न लगे.

डॉ. अभय बंग यांचा गांधी कुटीवरचा लेख मात्र मला अजिबात आवडला नाही. तो चक्क भक्तिपर असा आहे. एकीकडे बदलत्या धक्कादायक विचारानंही अस्वस्थ होणार्‍या ग्रीक गणराज्याचं कौतुक आणि एकीकडे गांधीजींच्या कुटीचा देव्हारा करणारा हा लेख. कुछ जम्या नही. खुद्द गांधींनाही हा लेख कितपत आवडला असता, याबद्दल मला मेजर शंका आहे.

या अंकातले खरे स्टार लेख दोन आहेत. एक म्हणजे लक्ष्मीकांत देशमुखांचा खेळ आणि स्त्रीवाद या विषयावरचा लेख. बिली जिन किंग या अमेरिकन टेनिसपटूनं स्त्रीवादाची धुरा खांद्यावर घेत बॉबी रिग्जचा पराभव केला. बॉबीची आधीची बेताल वक्तव्यं लक्षात घेता (“मी बिलीला हरवून स्त्रीवाद चार पावलं मागे नेऊन ठेवीन.” हे सर्वांत सौम्य विधान) त्याला हरवणं बिलीमधल्या स्त्रीकरता अत्यावश्यक होतं. ते तिनं मोठ्या झोकात केलं. दुसरी द्युती चांद ही भारतीय धावपटू. एखादी व्यक्ती स्त्री की पुरुष हे ठरवण्यासाठी केली जाणारी लैंगिकता चाचणी किती अशास्त्रीय, अनावश्यक आणि अपमानास्पद आहे हे दाखवण्यासाठी तिनं खेळाच्या सुप्रीम कोर्टात त्या चाचणीविरुद्ध दाद मागितली. ती नुसती जिंकली नाही, तिनं ही चाचणीच रद्दबातल ठरवली. हा स्त्रियांच्या दृष्टीनं विलक्षण विजय आहे. या दोन उदाहरणांचा आढावा देशमुखांनी विस्तारानं घेतला आहे. या दोन उदाहरणांच्या दरम्यान त्यांच्याइतक्या नशीबवान न ठरलेल्या आणि / किंवा वेगळ्या कारणांनी प्रकाशझोतात आलेल्या स्त्री खेळाडूंबद्दल ते बोलतात. खेळाडूंमधली टेस्टारेरॉनची पातळी, तिचा क्षमतेशी जोडला जाणारा संबंध, टेस्टाटेरॉनच्या पातळीमुळे वा गुणसूत्रांच्या गोंधळामुळे संदिग्ध ठरणारं लिंग, त्याचे खेळाडूंच्या स्पर्धात्मक आणि सामाजिक आयुष्यावर होणारे परिणाम अशा अनेक अंगांना स्पर्श करणारा हा लेख आहे. तो वाचताना मला एकीकडे ज्ञानदा देशपांडेच्या 'बृहत्कथे'वरचा हा लेख आठवत होता, तर दुसरीकडे एका होमोक्युरिअस व्यक्तीचं मित्राला उद्देशून लिहिलेले एक कथात्मक पत्र आठवत होतं - ज्यात खेळ - क्रीडाप्रकार आणि त्याचा लिंगभावाशी असलेला संबंध या गोष्टीबद्दल अतिशय रोचक असे विचार लेखक माडतो.

दुसरा अतिशय रंजक लेख विनय हर्डीकर यांचा - त्यांच्या बहुभाषापटुत्वाबद्दलचा. विनय हर्डीकरांचा साधनेच्याच दोन-तीन वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकातला लेख चांगलाच लक्षात होता (साधनेसारख्या नियतकालिकातही माझा पूर्वेतिहास माझ्या आजच्या भूमिकेच्या आड येऊ शकतो काय, असा खेदजनक प्रश्न विचारणारा 'पाचा उत्तराची कहाणी' हा लेख केवळ भारी होता. 'साधने'च्या वेबसाइटवर २०१० च्या दिवाळी अंकात तो मिळेल). त्यामुळे त्यांचा लेख उत्साहानं उघडला. त्यानं अपेक्षाभंग केला नाही. ज्ञानप्रबोधिनीपासून ते इंडियन एक्स्प्रेससाठी केलेली फिरती पत्रकारिता अशा भल्या मोठ्या पटावर हर्डीकरांचे किस्से रंगतात. “एकदा आमच्या पलीकडच्या वाड्यातले माझ्याच वयाचे दोन भाऊ एकमेकाला अशा शिव्या देत होते की, शुद्ध शाकाहारी माणसाच्या जिभेला मटण-प्लेट पाहून पाणी सुटावं, तसं मला झालं होतं!” हे त्यांचं मासलेवाईक वाक्य काय, किंवा हर्डीकरांना कन्नड येतं हे कळल्यावर एका धोरणी राजकारण्यानं त्यांची मागच्या गाडीत केलेली सावध रवानगी काय - सगळाच टोटल म्याडनेस आहे! "संस्कृत या माझ्या मैत्रिणीवर तर स्वतंत्र लेखच लिहिला पाहिजे," हे त्यांनी केलेलं सूतोवाच प्रत्यक्षात उतरावं, इतकीच प्रार्थना.

अतुल देऊळगावकरांचा 'द हिंदू'च्या व्यंगचित्रकारांबद्दलचा लेख आणि बी. केशरशिवम या सरकारी अधिकार्‍यानं गुजरातेतल्या दलितांना त्यांची हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, हेही वाचण्यासारखे लेख आहेत.

बाकी अंकात अनिल अवचट (बिहारचा दुष्काळ) आहेत, गोविंद तळवलकर (रवींद्रनाथांनी घेतलेली मुसोलिनीची भेट) आहेत, अरुण टिकेकर (ऍंग्लो इंडियन कादंबरीकार) आहेत. पण त्यांत फारसं अनपेक्षित, थोरबीर काही नाही.

कथा-कवितांची संपूर्ण अनुपस्थिती आणि काहीसं सौम्य - आशावादी - समजूतदार संपादकीय या लक्ष वेधून घेणार्‍या गोष्टी.

***

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

व्वा! आभार!
लगेच वाचायला सुरूवात केली आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

> या अंकातले खरे स्टार लेख दोन आहेत. एक म्हणजे लक्ष्मीकांत देशमुखांचा खेळ आणि स्त्रीवाद या विषयावरचा लेख. बिली जिन किंग या अमेरिकन टेनिसपटूनं स्त्रीवादाची धुरा खांद्यावर घेत बॉबी रिग्जचा पराभव केला. बॉबीची आधीची बेताल वक्तव्यं लक्षात घेता … त्याला हरवणं बिलीमधल्या स्त्रीकरता अत्यावश्यक होतं. ते तिनं मोठ्या झोकात केलं.

या सगळ्यात काहीतरी वैचारिक गफलत होते आहे (मेभुंची मी म्हणत नाही, पण देशमुखांची). एकतर टेनिसमध्ये अनिश्चिती खूपच असते. (तशी ती सगळ्यांच खेळांत असते, पण टेनिसच्या विवक्षित स्कोरिंग सिस्टिममुळे ती चांगलीच बोकाळते.) तेव्हा अमुक दिवशी अ जिंकला की ब, एवढ्याचवरून त्यांमध्ये श्रेष्ठ कोण हे निश्चित ठरवता येत नाही. जगातले सध्याचे बिनीचे खेळाडू- जोकोविच, फेडरर, सेरेना, शरापोव्हा वगैरे - दर महिन्या-दोन महिन्यांतून एकदा तरी त्यांच्यापेक्षा कमकुवत समजल्या जाणाऱ्या प्रतिस्पर्ध्याकडून हरतात. आणि म्हणूनच असल्या मॅचेसना काहीतरी प्रचंड प्रतीकात्मक महत्त्व देणं आणि स्त्री-पुरुष तुल्यबळ आहेत की नाहीत अशा चर्चा त्याआधारे करणं यात शहाणपणा नाही.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कधी कधी केवळ आधीच्या वातावरणनिर्मितीमुळे काही गोष्टी जिंकणं हरणं प्रतिष्ठेचं होऊन बसतं. तशातला भाग असावा. एरवी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. 'परदेस'मधल्या कबड्डी सामन्याइतका पोरकट प्रकार वाटू शकतो खरा. मूळ लेख वाचून पाहा. कदाचित माझ्या आकलनातली गफलतही असू शकेल.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मूळ लेख अजूनही वाचलेला नाही.

टेनिसबद्दल - सध्या फिटनेस, आहार, व्यायाम यांच्यामुळे खेळाचं स्वरुप बदललेलं आहे. तिशी पार केलेले खेळाडूही पहिल्या चार स्थानांमध्ये आहेत. बिली जीन किंगने बॉबी रिग्जला १९७३ साली हरवलं, तेव्हा टेनिस एवढं फिटनेस फ्रीक नसावं.

आज यू.एस. ओपनमध्ये स्त्री-पुरुषांना समान मानधन मिळतं. (सध्या हे मुद्दाम लिहावं लागतं.) स्त्रियांचं टेनिसही अतिशय स्पर्धात्मक झालेलं आहे. सध्याची पहिल्या क्रमांकाची खेळाडू सरीना विल्यम्स आणि पहिल्या आठ-दहांत असणारा अँडी मरे यांच्यात सामना व्हावा अशा काही गोष्टी सुरू होत्या. तेव्हा सरीना म्हणाली होती, "खेळायला मजा येईल, मला एकतरी गुण मिळवता येईल का नाही याबद्दल शंका आहे. पण खेळून बघायला काय हरकत आहे!"

मुद्दा हा की आता स्त्री टेनिसपटू स्त्री-पुरुष सामन्यांबद्दल विनोद करू शकतात; तेव्हा बिली जीन किंगला 'लढावं' लागलं होतं.

टेनिसमधील बॅटल ऑफ द सेक्सेस

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतरः
टेनिसमध्ये समान मानधन पटत नाही. आयोजकांनी दबावाला बळी पडून समान मानधन दिलेलं असावं. पुरुषांच्या टेनिसची एंटरटेनमेंट वॅल्यू खूप जास्तं आहे स्त्रीयांच्या टेनिसपेक्षा. शिवाय स्त्रीया फक्त तीन सेटच्या मॅचेस खेळतात. पुरूष पाच सेटच्या. हा मोठा फरक आहेच.

इथे यावर्षीच्या युएस ओपेनच्या फायनल्सच्या तिकिटांचे सेकंडरी मार्केटमधले दर आहेत. स्त्रीयांच्या फायनलचा अ‍ॅव्हरेज दर ८०७ तर पुरुषांच्या फायनलचा दर ९२६ आहे. हेही जेव्हा सेरेना इतिहास घडवणार अशी लोकांची खात्री होती तेव्हा.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असं नाही ब्वॉ. पूर्ण माहिती पाहिजे. उदाहरणार्थ जाहिरातींचे दर किती होते, जाहिरातींमधून आणि तिकिटांमधून किती उत्पन्न मिळालं. प्रत्यक्षात 'स्कर्ट फॅक्टर'मुळे फरक पडतो असं कानावर येत राहतं तेव्हा तर असे सगळे आकडे पाहिजेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जाहिरातींचे दर हे ही योग्य मोजमाप ठरेल पण ते शोधण्याचा पेशन्स नाही. ब्लॅकच्या तिकिटांचा दर हेही विश्वासार्ह मोजमाप आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

साधनेशी खूप जुना अन कौटुंबिक संबंध आहे.
अंकाची ओळख सशक्त झाली आहे.
धन्यवाद!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

साधनेशी आणि सेवादलाशी खूप जुना संबंध आहे . साधनाचे सगळेच अंक वाचनीय असतात .

वाचतोय. ही इंस्टंट परीक्षणे म्हणजे वाचण्यासाठी कमी वेळ असलेल्यांवर केलेले मोठे उपकारच आहेत.

काय ताई! दोनच अंक! का भाव खाताय? लिवा की बिगीबिगी! Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण,

'ऐसी अक्षरे'च्या नव्वदोत्तरी विशेषांकाबाबतच्या ताज्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर हे फारच लखलखीतपणे जाणवलं.

हे वाक्य वॉज अनकॉल्ड फॉर!
झाली ती कुरबूर नव्हती, स्पष्ट विरोध होता.
साधनेचा पूर्वीचा स्टॅन्डर्ड आता राहिला नाही म्हणतात. म्हणतात असं लिहितोय कारण यदुनाथकाका हयात होते तोवर दरवर्षी आठवणीने दिवाळी अंक पाठवायचे, त्यांच्यानंतर ते झालं नाही. म्हणून विश्वसनीय लोक म्हणतात ते म्हणायचं!
ते काहीहीही असलं तरी 'साधना' हा काही प्रकाशनाचा मानदंड नाही. त्यापलीकडेही एक फार मोठं विश्व आहे.
आणि त्या विश्वातले नियम पाहिले तर पूर्वप्रकाशित साहित्य आपल्या विशेष अंकात पुनःप्रकाशित करणं हे (रीडर डायजेस्ट, नवनीत वगैरे डायजेस्ट नियतकालिकं सोडल्यास) अनुचितच आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर, स्वस्तुतीचा दोष घेऊनही म्हणेन की, मराठी आणि इंग्रजी भाषांत प्रस्तुत लेखकाने प्रकाशन केलेलं आहे, अनेक संपादकमंडळावर वागणूकही केलेली आहे. तेंव्हा काय योग्य आणि काय नाही याची जाणीव ऐसीच्या आदरणीय संपादकमंडळाइतकीच प्रस्तुत सभासदालाही आहे.
त्यामुळे तेंव्हा विरोध केला, पुन्हाही करीन.
जे अनुचित ते अनुचितच!
मी हा विषय मागेच सोडला होता पण तुम्ही कारण नसतां वरील वाक्य लिहीलंत म्हणून हे लिहायची गरज पडली.
असो.

आपल्या विशेष अंकात पुनःप्रकाशित करणं हे (रीडर डायजेस्ट, नवनीत वगैरे डायजेस्ट नियतकालिकं सोडल्यास) अनुचितच आहे.

हे एक तुमचे मत आहे तेव्हा त्याचा आदर आहेच.
पण त्यामागची कारणमिमांसा कळेल का? जर लेखकाची परवानगी घेऊन असे लेखन छापले असेल तर नक्की काय अनुचित आहे?

==

मी हा विषय मागेच सोडला होता पण तुम्ही कारण नसतां वरील वाक्य लिहीलंत म्हणून हे लिहायची गरज पडली.

आणि दुसरी गंमत अशी की हे लेखन तो विषय ताजा असताना नोव्हेंबरमध्येच केलेलं आहे. तुम्ही ते आता वाचल्याने ही टिपणी आता केलीये असे वाटले असावे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे एक तुमचे मत आहे तेव्हा त्याचा आदर आहेच.

तुम्ही, ऋषिकेष, हे या संस्थळावरचे पहिलेच संपादक आहांत की ज्यांनी हे स्पष्ट लिहिलं आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

पण त्यामागची कारणमिमांसा कळेल का? जर लेखकाची परवानगी घेऊन असे लेखन छापले असेल तर नक्की काय अनुचित आहे?

कारणमीमांसा सागतो: एखाद्या जाणकाराचे एखाद्या विषयावरचे विचार पब्लिश करायचे असतील तर त्या जाणकाराला एक नवीन लेख लिहिण्याची विनंती करणं हे काही कठिण नाही. आणिक ती व्यक्ती जर त्या विषयाची खरोखर जाणकार असेल तर तिला तिच्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा अजून एक लेख लिहिणं हेही काही कठीण नाही. हो की नाही?
पण ते न करता, माझी ही जुनीच पेंड घ्या असं त्या जाणकाराने सांगणं (जर तसं खरोखर झालं असल्यास) आणि संचालकांनीही काही स्वाभिमान न दाखवता ती पेंड स्वीकारणं ह्यात कुठेतरी आमच्यासारख्या सामान्य वाचक/सभासदांशी प्रतारणा आहे असं मला मनापासून वाटतं. किंबहुना आम्ही हे जे काही करतोय ते सगळ्या वाचकांनी/सभासदांनी निमूटपणे स्वीकारावं हा उर्मटपणाही जाणवतोय....

पुनःप्रकाशित साहित्य कधीकधी प्रकाशित करणं हा नाईलाज असतो. ऐसीवर भा. रा. भागवतांवरचा अंक निघाला, त्यावर मी तक्रार केली का? केली असल्यास दृष्टीला आणून दे!
तेंव्हा कुठं पुनःप्रकाशित साहित्य उचित आहे आणि कुठे नाही याची संपादकमंडळाखेरीज अन्य सभासदांनाही जाणीव आहे याची कृपया आठवण असू द्यावी.
परंतू दिवाळी अंक म्हणून जाहीर करायचा आणि मग त्यात हे असं द्यायचं याला माझा विरोध आहे. इतकंच.

पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे मी हा विषय एकदा विरोध करून सोडून दिला होता (कारण शेवटी संपादक तुम्ही मंडळी, तुम्हाला जे हवं तेच तुम्ही करणार हे मला माहिती आहे!! मराठी संस्थळांवर मी आज काही नवीन आलेलो नाही!!!!) पण लोकसत्तातल्या आर्टिकलामध्ये आणि पुन्हा इथे हा विरोध म्हणजे काही क्षुल्लक कुरबूर होती असं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी हा आजचा प्रतिसाद दिला...

संपादकमंडळाच्या ह्या भूमिकेचा मेघना आणि राजेश घासकडवी यांनीच हिरिरीने पुरस्कार केलेला आहे. चिंजंनी एकदाच प्रतिसाद दिला आहे आणि तू देखील एकदाच असेच प्रश्न विचारून त्यावर मी प्रतिसाद दिल्यावर तू गायब राहिलेला आहेस. बिचार्‍या अदितीने या विवादात भागच घेतलेला नाही (स्मार्ट गर्ल, कारण तिने बहुदा आंतरराष्र्टीय प्रकाशन पद्धतीमध्ये भाग घेतलेला असावा!!)

सारांश काय की या विषयावर मला जे काही म्हणायचंय ते माझ्या मते मी पुरेसं स्पष्टं केलेलं आहे. अजाणत्याला जाणतं करता येतं पण सोंग घेऊन झोपलेल्या जाणत्याला जागं करता येत नाही. तेंव्हा याउप्पर तुला जर काही प्रश्न असतील तर ते व्यनि किंवा खव मध्ये घेऊ. त्याचबरोबर हे ही स्पष्ट करू इच्छितो की आजवर जी काही माझी भूमिका होती ती मी ऐसी अक्षरे या संस्थळाच्या अंतर्गतच मांडली आहे आणि मी माझी या संस्थळाशी असलेली निष्ठा मी पाळलेली आहे. बट नाऊ कन्सिडरिंग रिपोर्ट्स फ्रॉम अदर पब्लिकेशन्स, ऑल द बेटस आर ऑफ!

>> एखाद्या जाणकाराचे एखाद्या विषयावरचे विचार पब्लिश करायचे असतील तर त्या जाणकाराला एक नवीन लेख लिहिण्याची विनंती करणं हे काही कठिण नाही. आणिक ती व्यक्ती जर त्या विषयाची खरोखर जाणकार असेल तर तिला तिच्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा अजून एक लेख लिहिणं हेही काही कठीण नाही. हो की नाही?
पण ते न करता, माझी ही जुनीच पेंड घ्या असं त्या जाणकाराने सांगणं (जर तसं खरोखर झालं असल्यास) आणि संचालकांनीही काही स्वाभिमान न दाखवता ती पेंड स्वीकारणं <<

अंकाविषयीच्या तुमच्या मतांचा आदर आहेच, पण घडलेल्या घटनांविषयीची जी शक्यता ह्या वरच्या विधानांमध्ये व्यक्त झाली आहे त्याविषयीचं हे छोटं स्पष्टीकरण - अंकाच्या थीमसाठी रोचक वाटलेले पूर्वी अन्यत्र प्रकाशित झालेले काही लेख सापडले; ते अंकात पुनर्प्रकाशित करण्याच्याच हेतूनं विचारणा केली; आणि लेखकांनी त्यासाठी परवानगीही दिली - असा प्रत्यक्षातला घटनाक्रम आहे. म्हणजे असे लेख पुनर्प्रकाशित करणं हेतुपुरस्सर होतं; अपघात किंवा नाइलाज म्हणून ते झालं नाही. त्यामागची कारणं अनेक होती. त्यात शिरण्याची इथे गरज नाही; मात्र, 'जुनी पेंड' आणि 'स्वाभिमान' वगैरेंविषयी काही शक्यतांचा वर उल्लेख झाला म्हणून हे स्पष्टीकरण देणं भाग पडलं. असो.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||