खाणं...चरणं...हादडणं...
डोक्यात खाण्याबद्दल जे काही येतय ते लिहून काढावं म्हणतोय.
.
.
"तुझा आहार चांगलाय हां" अशी कमेंट/तारिफ(की टॉण्ट/टोमणा?) अजून एकदा ऐकायला मिळाला. कुणासोबत पंगतीला/बुफेला वगैरे बसणं झालं की अधूनमधून अशा कमेंटा मिळतातच. तरी मागील आठेक वर्षे बी एम आय बावीसेकच्या घरात आहे. वेगळा असा व्यायाम/पोहणं/जॉगिंग असंही काही करणं जमत नाही. जवळजवळ पूर्ण बंद. दिसायला जरी असं दिसत असलं की एकूणात मी बरच हादडतोय; तरी माझे खाण्याचे तसे बर्रेच नखरे आहेत. पण एकूणात काहीतरी बरोबर(किंवा निदान ठीकठाक) सुरु असणार. म्हटलं आठवून पहावं.
.
.
मला ताजं,ओलं नारळ आवडतं. दोन तीन आठवड्यात जाता येता नारळ फोडायचा आणि मस्तपैकी ताजा नारळ तसाच खायचा. किंवा चटणी वगैरे किंवा पोहे वगैरे इतर कशावरही भुरभुरुन.अर्ध्या दिवसात एक नारळ ह्या स्पीडनं मी नारळ कैकदा संपवलाय इतकं मला नारळ आवडतं. फोडल्यावरचं ते गोडसर पाणी तृप्त करुन जातं. एकावेळी अनेक धान्यं पोटात ढकलणं जमत नाही. म्हणजे भातही आवडतोच; पण पोळी भाजी वरण असेल खाण्यात तर वेगळा भात खावासा वाटत नाही. भात खाल्ला तर त्या दिवशी मी फुल्ल सौथ इंडियन स्टाइल नुसताच भात हाणतो. तेव्हा त्या भोजनापुरता भाकरी, पोळी, पराठे ह्यांच्या वाटेला जात नाही. म्हणजे ताक भात, वरण भात, ओली चटणी आणि भात, कोरडी चटणी-भात , भाजी-भात. चांगला पोटभर खातो. माझा मुख्य आहार भाकरी आहे. बहुतांश वेळेस ज्वारीची भाकरी असते. थंडीच्या दिवसात वगैरे बाजरीही असते. का कुणास ठाउक मिरची-तिखट अजिबातच सोसवत नाही. फार फार कमी तिखट खातो.कित्येकदा अदरवाइज सपक म्हटलं जाइल असं खाणं असतं. माझ्या घरचं वरण हे सैलसर, वाहत जाणारं नसतं. घट्ट वरण असतं. ते एकावेळी वाट्या-दोन वाट्या घट्ट वरण खायला मजा येते. इतरांसारखच तुरीच्या डाळीचं वरण असलं, तरी लंचला पिठलं भाकरी खूपदा होते. बेसन(म्हंजे चणा डाळ) पोटात जाते. उडीद वडे आवडतात. नुसतीच तुपाच्या वाटीभर उडीद रात्रभर भिजवत ठेवून खायलाही आवडते अधून मधून. खरं तर भिजवत ठेवून खाणं हा प्रकारच प्रच्चंड आवडतो; कारण मुळात खायची आवड असली तरी स्वयंपाकाची आवड नाहिये. दरवेळी आपल्या नखर्यांसाठी दुसर्यास ताप देणेही नको वाटते. स्वतःच काहीतरी भिजायला टाकायचं आणि नंतर गट्टम करायचं हे आवडतं. मग ते तुपाच्या वाटीभर उडीद असोत, वाटीभर हिरवे मूग नैतर मटकी असोत किंवा नखभर मेथ्या असोत.
आहारातून हल्ल्ली दूध ऑल्मोस्ट हद्दपार झालेलं असलं तरी आत्ताआत्तापर्यंत दुग्धजन्य पदार्थ प्रच्चंड खायचो. घरी दूधवाले मामा येणं फार पूर्वीच बंद झालं असलं तरी बाजारातून दूध आणून पित असे. अर्ध्या लिटारची पिशवी आणायची; तापवायची आणि तसच आख्खं पिशवीभर दूध साखर वगैरे काहीच न घालता पिउन टाकायचं. घसा वगैरे बरा रहावा म्हणून पावसाळ्यात गरम दूध आणि हळद रात्री पित असे. जाता येता हाताला जी जुडी लागेल ती चरत बसणे ही अजून एक आवड. कोथिंबिर असू दे नैतर पुदिना, किंवा अगदि कडिपत्ता आणि तुळसही. जाता येता हे समोर दिसत राहतात तेव्हा दोन-चार पानं ,दोन-चार पानं असं चरणं सुरुच असतं; कैकदा स्वतःच्याही नकळत. विशेषतः कोथिंबिरीची आख्खी जुडी कैकदा नुसतीच संपवली आहे. फळं खाण्यासाठी आणी त्यांचं खासम खास मार्केट वगैरे शोधण्यासाठी विशेष कष्ट घ्यावेसे वाटत नाहित. जाता येता डाळिंब केळी संत्रं मोसंबी सफरचंद पेरु पपई वगैरे किंवा सीझन नुसार टरबूज आंबा जांभूळ करवंद द्राक्षं खाणं होतच. लिंबू विशेष प्रिय. दिवसभरात एखादं आख्खं लिंबू पिळलेलं.... पोटात जात असावच. वरणावर वगैरे टाकून घेतो किंवा क्वचित जेवण झाल्यावर लिंबू पेल्यात पिळून घेतो. त्यावर त्या लिंबाच्या रसाइतकच...म्हणजे अगदि थोडं पाणी टाकायचं आणि ते आंबट्ट प्रकरण तसच साखर मीठ वगैरे न घालता पिउन टाकायचं. ग्लासाला लागलेला उरलेला लिंबाचा रस संपावा म्हणून अजून दोन-तीन वेळेस ओ़ंजळभर पाणी त्यात टाकत पेला हलवत हलवत पाणी पिउन टाकायचं; मजा येते. एरव्हीही उन्हाळ्यात वगैरे आख्खं लिंबू लहान गडू भरुन पाण्यात टाकतो आणि किंचित मीठ टाकून तसच पितो--साखरेशिवाय.
.
.
हलवाई-मिठाईची दुकानं विशेष प्रिय होती. लै हादडत असे पूर्वी. पण नंतर नंतर रस वाटेनासा झाला. त्यात पुन्हा अधिकाधिक दूध मिळवण्यासाठी गाई म्हशींसोबत जे काही केलं जातं ते ऐकून वाचून दूध व दुग्धजन्य पदार्थ नकोसे वाटू लागले. हळूहळू सुटत गेले. मिठाईही त्यातलीच. मात्र त्यापूर्वी काका हलवाई, चितळे, प्रदीप वगैरेंपैकी कोणाकडे काय काय चांगलं मिळतं त्याचा तुलनात्मक अभ्यास वगैरे करायला मजा यायची. एकच पदार्थ ह्या सगळ्यांकडून थोडा थोडा आणून खाउन पहायचा. अशी बर्र्याच पदार्थांची तुलना केली. मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी हे त्यातल्या त्यात विशेष आवडत. रसगुल्ला, गुलाबजाम ह्यातल्या कोणत्याही प्रकारात काही रस वाटला नाही.(कुणी पानात वाढला तर आवर्जून संपवत असे; पण स्वतःहून खाण्यात रस नसायचा.) श्रीखंड आम्रखंड जीव की प्राण. ढोकळे आवडत नसत. अगदि क्वचित कचोरी समोसे खाइ. पण अगदि क्वचितच. वर्षभरात एखादा वगैरे. त्यातही गोल चेंडूसारखी गरगरीत बंदिस्त "गोल कचोरी" विशेष प्रिय.सुरळीच्या वड्या आवडतात; बाखरवडीही आवडते. काका हलवाईची बाखरवडी चितळ्यांहून अधिक आवडते. लहान बकरवड्यांपेक्षा मोठ्या वड्या आवडतात. जाता येता भाजलेले शेंगदाणे खायला मजा वाटते. फुटाणे आवडतात. पिवळे फुटाणे व काळे फुटाणे--दोन्ही आवडतात. सालीसकट खातो फुटाणे. आंबे आणि कैर्याही सालीसकट खातो. प्रवासात असेन तर बस ज्या ठिकाणी थांबते तिथे बटाटा वडा, मिसळ वगैरे पदार्थच तेवढे काय ते मिळतात. ते आवडत नाहित. प्रवासात जाताना सोबत राजगिरा लाडूचा एखादा पुडा आणि सोबत केळी पेरु वगैरे घेउन जातो. प्रवासात तेवढच खातो. कुठे इडली वगैरे मिळाली तर तीही खातो. उडीद वडे कधीच सोडत नाही. ताजा, गरम प्लेन दोसा, किंवा प्लेन उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत स्वर्गीय आनंद देतो.
.
.
दारु सिगारेटचे सेवन करत नाही.पान खायला आवडते. नेहमीचे टपरीवरचे कलकत्ता मीठा मसाला , मघई वगैरे गोग्गोड पाने ठीकच; पण सणासुदीला घरी जो "विडा" लावतात -तो साधासाच असला तरी आवडतो. किम्वा नुसतीच विड्याची हिरवी पाने जातायेता चावून खायला आवडतात.(कोथिंबीरीसारखच). मी चटण्या जरा जास्तच खातो असा आरोप माझ्यावर आहे. म्हणजे साधारणतः अर्धी किंवा एक वाटी चटणी हादडणं होतच. त्यात आवड-निवड फारशी नाही. जे हाताला लागेल ते; हाताला लागेल तितकं ; जमेल तितक्या आनंदानं खातो. पानात अन्न टाकत नाही. कुटलेली शेंगदाणा चटणी, पुदिना, नारळ वगैरे ओल्या चटण्या, जवस कारळ, डांगर ,पूड चटणी वगैरे स्टाइल कोरड्या चटण्या, किंवा पाण्यात कालवलेलं मेतकूट हे नुसतं चमचा-चमचाभर का खायचं ते कळत नाही. वाटीभरुन बचकाभर खाल्ल्याशिवाय मजा वाटत नाही. सुकामेवा हाताला लागला तर तोही अस्साच एकदम होलसेलमध्ये भरभरुन हादडतो पण किमतीकडे बघून मग जरा आवरतं घ्यावं वाटतं. सुका मेव्यात ठराविक पाचसात जिन्नसच आवडीचे. बदाम, अक्रोड, जर्दाळू, मनुका, खारिक्,खजूर हे विशेष आवडतात. पिस्ता - काजू हे लै आवडत पण ते खाउन उष्णता वाढायचा त्रास व्हायला लागल्यानं शक्यतो टाळतो. तोंड वगैरे यायचं. मला चहा विशेष आवडत नाही. पण भरपूर पिणं होतं. कारण सारखं कुणाला तरी सोबत द्यायची म्हणून चहाच्या टपरीवर चहा घ्यावा लागतो.
.
.
हल्ली लेमन टी, ग्रीन टी, आवळा चहा वगैरे प्रकार ऐकण्यात आले. जेवढ्या वेळेस पिउन पाहिले; ते आवडले. पण नियमित पिणं वगैरे होत नाही. संधी मिळते तेव्हा भरपूर पिउन घेतो. पण साखर घालूनच पितो त्याचा कडवटपणा सोसवत नाही. पण कारलं, मेथ्याचे दाणे ह्याचा कडवटपणा का कुणास ठाउक सोसवतो. आरामात खातो. मेथ्या भिजवलेल्या रुपात; मेथीची ताजी हिरवी जुडी असेल तर बहुतांशी न शिजवताच खातो. तशीच ती हिरवी पानं त्यावर अगदि किंचित तेल, किंचित मीठ आणी इलुशी काळ्या मिर्याची पूड टाकून खायला आवडतं. सिझन असेल तेव्हा भाकरी सोबत कांद्याची हिरवीगार पात तशीच खायला आवडते. पात आणायची. कापायची, लहान तुकडे करायचे.थोडस्सं तेल; किंचित मीठ(कधी कधी बदल म्हणून काळं मीठ) भुरभुरून घ्यायचं तसच खायचं भाकरीसोबत. मजाय. अनामिकरावांसारखच आम्हीही त्याला कांद्याच्या पातीचा घोळाणा म्हणतो. तसाच मेथीच्या पानांचाही घोळाणा चवदार.
पालक, लाल माठ, हिरवा माठ्,चुका ...बर्याशचा गोष्टी क्वचित कच्च्या व बहुतांश वेळेस भरडा भाजी म्हणून किंवा डाळीच्या पिठासोबत केलेल्या पातळ भाजीसोबत खायला आवडतं. वांग्याचं भरीत, कद्दूची भाजी विशेष प्रिय. लाल भोपळाही चालतो; पण विशेष रस नाही. त्याची कोशिंबीर का काहीतरी खिसून करतात; ते आवडतं.
जाता येता काकडी, गाजर , बीटरुट, कधीमधी टोमॅटो खाणं पोटाला स्थिर ठेवतं प्रत्यक्ष ताट हातात पडेपर्यंत. गाजर,काकडी,खोबरं, फुटाणे,शेंगदाणे वगैरे निर्माण करुन देवाने माणसावर अनंत उपकार केलेले आहेत.
.
.
तंदुर रोटी अजिबातच आवडत नाही. आपल्याकडाच्या धपाट्यासारखी दिसणारी व तशीच चवीला लागणारी खास 'पंजाबी मिस्सी रोटी' आवडते. खर्याखुर्या अस्सल पंजाबी ठिकाणी मिळतेही. पण अशी एकूण ठिकाणं कमीच. छोले भटुरे आवडतात. पण अगदि थोडेसे खातो. वर्षभरात एखादवेळेस्,तेही एखादा भटुरा वगैरे अशी फ्रिक्वेन्सी आहे. कढी चावल, राजमा चावल आवडतात. दे दणादण हाणतो. व्हेज बिर्याणी हा ओव्हररेटेड प्रकार आहे असं मत आहे. अगदि दिल्लीतल्या सुप्रसिद्ध करिम्स नामक फूड चेनमधली पेश्शल बिर्याणीही खाउन झाली. पुण्यातल्या आंध्रा मेस , हैद्राबादी हाउस वगैरे ठिकाणच्याही खाउन झाल्या. पण ठीकठाक वाटल्या. म्हणजे चांगल्या आहेत; नाही असं नाही; पण इतका लौकिक का; ते मात्र समजलं नाही. म्हणजे कुणी पानात वाढला तर खातोच अवश्य; पण त्याचं इतकं का स्तोम आहे; ते ठिकठिकाणच्या बिर्याणी खाउनही समजलेलं नाही. त्यापेक्षा व्हेज पुलाव, किंवा अगदि साधीसरळ दालखिचडी शिम्पल जीरा राइस सुद्धा जास्त आवडतो. कालपरवा कुणीतरी (बहुतेक गवि )म्हणाले तसं आंबेमोहराचा भात, त्यावर साधं वरण (किम्वा काळ्या मसाल्याचं वरण) आणि तूप लिंबू-- अहाहा. व्हेज पुलाव सर्वोत्तम.
.
.
आल्या-लसणाची पेस्ट हल्ली सगळीकडेच वापरली जाते म्हणे. पण मला त्याच्या वासानं कससच होतं. गंमत म्हण्जे कच्चं ताजं खरोखरीचं लसूण फोडणीत असेल किंवा ताजं लसूण आणि किसलेलं आलं कुणी वापरलं स्वयंपाकात तर मात्र त्याचं काही वाटत नाही. उलट कैकदा मीच वरणात आलं किसून घालून चवीनं खातो. थाई फूड मध्ये "तोम खा" नावाचं सूप असतं. भन्नाट प्रकार. नारळाच्या दुधात बनवलेला. त्यातही इतर चविष्ट झणझणीत घटकांसोबतच कच्चं ताजं आलं घातलेल असतं. तेही आवडिनं,चवीचवीनं खातो. त्यातल्या अद्रकचा ,आल्याचा वैताग वाटत नाही. घशाचा वगैरे त्रास होत असेल तर एखादेवेळेस भाजलेला लसूणही खातो थोडाफार न कुरकुरता. लसणाची फोडणीही खूपदा खाणं होतं.
.
.
भेळ, रगडा पॅटिस, पाणीपुरी ,दहीपुरी,शेवपुरी ,आवडतात पण ठराविक ठिकाणचेच. कल्याण , देल्ही चाट वगैरे इकडे प्रसिद्ध ब्रांड्स आहेत. तेवढेच काय ते खातो. घरी केलेली पाणीपुरी जीव की प्राण. ती पात्तळ शेव असते ना ती नुसतीच चिमुट चिमुट खायची. व्वॉव!
.
.
आता काही कॉमन आणि लोकप्रिय पदार्थांबद्दल. हे खूपशा लोकांना न पटण्यासारखं आहे; पण लिहायचच आहे म्हटलं तर सगळच लिहून काढावं.
बेकरीतल्या बहुतांश वस्तू आवडत नाहित. पाव-ब्रेड-बन तर अजिबातच नाहित. त्यातल्या त्यात कराची बेकरी, न्यू पून बेकरी वगैरे मध्ये जे जाड चविष्ट बिस्किटं मिळतात; ते थोडेफार खाउ शकतो. चहासोबत पारले जी पासून ते इतर कोणतेही गोड बिस्किट खायला नको वाटतात. चहाची सगळी चव चाल्ली जाते. चहासोबत बिस्किट खाल्लेच तर मोनॅको वगैरे खारट बिस्किट भारी वाटतात. बाहेरच्या देशात केक-रस्क म्हणतात तो जिन्नस किंवा आपल्याकडे बंद पाकिटात मिळतो तो "टोस्ट" नावाचा प्रकार त्यातल्या त्यात सुसह्य वाटतो. पाव-ब्रेड खाल्ल्यावर पोटात जड-जड असं कैतरी विचित्र आणि नकोसं वाटतं. पोटाला झेपत नाहित. मिसळ पाव तसाही विशेष प्रिय नाही. कधी खायची वेळ आलीच; तर नुसतीच मिसळ खातो. पाव घेत नाही. खाताना अर्थातच भरपूर लिंबू पिळून घेतो. वडा पाव बद्दल तेच. वडा पाव आवडत नाही. कधी खावा लागलच तर नुसताच बटाटा वडा खातो. पावभाजीमधली भाजी चविष्ट लागते. ती भाकरी किंवा पोळीसोबत खायला आवडतं. पावभाजी सोबतही शक्यतो पाव खात नाहिच!
समोसा कचोरीमध्ये रस वाटत नाही. क्वचित खायची वेळ आली तर कसाबसा खातो. शक्यतो टाळायचं पाहतो.
पावभाजी ,वडापाव, मिसळपाव ह्यांचं इतकं कौतुक का आहे ते समजत नाही. मुळात "मराठी" पदार्थ म्हणून ह्यांचा लौकिक का असावा ? हे कैकदा "मराठी पारंपरिक पदार्थ" किंवा "मराठी सांस्कृतिक प्रतीकं" म्हणून का मिरवले जात असावेत. आपले वाडवडील काही शेकडो हजारो वर्ष हेच पदार्थ खात होते का ? ह्या हवेत हे सहज उगवून येणारं सर्वोत्तम अन्न आहे का ? पारंपरिक पदार्थ म्हटल्यावर त्या मातीत रुजलेला प्रकार निवडायला हवा ना ? जसं पंजाबात पराठे , रोटी वगैरे. किंवा आपल्याकडे पिठलं भाकरी, पुरणपोळी, किंवा अगदि श्रीखंड, बाकरवडी , अळूची भाजी वगैरे. माझं अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. त्यामुळं ही यादी चौफेर वावर असणारे अजूनच वाढवू शकतात नक्कीच. म्हणजे तांबडा पांढरा रस्सा वगैरे. किंवा खान्देशातला कळणा, मिरज -सांगली का इस्लामपूर जवळचे मळीचे वांगे व त्याचं पेश्शल मसाल्यांसोबतचं भरीत वगैरे.
.
.
भाकरीसोबत कच्चा कांदा... बुक्की मारुन फोडायचा आणि सोबतीला भाजलेले शेंगदाणे.उन्हाळ्यात एकवेळच जेवण हे आणी इतकच. हिवाळ्यात बचकाभर सुकामेव्याचा बोकाणा कोंबायचा तोंडात. तोच नाष्टा. कधी मधी जाता येता कडुनिंबाचं झाड दिसलं तर दोन चार पानं तोडून धुवून खायची.तेच कडिपत्त्याचं. टाकायचं जरासं तोंडात. क्वचित जाता येता आंब्याची झाडं दिसली नि त्याला कोवळी लहान पानं आलेली असली, तर तीही खातो एखाद दोन. पेरुच्या झाडाची , अगदि अशोकाच्या झाडाचीही इलुशी कोवळी पानंही खातो. बरं वाटतं.
.
.
खाणं... माझं आवडतं.
--मनोबा
Taxonomy upgrade extras
"मनोबाचे खाद्यजीवन"
"मनोबाचे खाद्यजीवन" आवडले.
प्रांजळपणा, प्रामाणिकपणा भावला.
जाता येता हाताला जी जुडी लागेल ती चरत बसणे ही अजून एक आवड. कोथिंबिर असू दे नैतर पुदिना, किंवा अगदि कडिपत्ता आणि तुळसही.
कमाल आहे बाबा तुझी कढीलिंब कसा खातोस? :( तुळस छानच. तुळशीचं रोप आहे का तुमच्याकडे?
स्वतःच काहीतरी भिजायला टाकायचं आणि नंतर गट्टम करायचं हे आवडतं. मग ते तुपाच्या वाटीभर उडीद असोत, वाटीभर हिरवे मूग नैतर मटकी असोत किंवा नखभर मेथ्या असोत.
चांगली सवय आहे की. मुख्य म्हणजे हेतू किती विशुद्ध आहे की कोणाला आपला त्रास नको, अपलं आपण मॅनेज करावं.
लिंबू विशेष प्रिय. दिवसभरात एखादं आख्खं लिंबू पिळलेलं.... पोटात जात असावच. वरणावर वगैरे टाकून घेतो किंवा क्वचित जेवण झाल्यावर लिंबू पेल्यात पिळून घेतो. त्यावर त्या लिंबाच्या रसाइतकच...म्हणजे अगदि थोडं पाणी टाकायचं आणि ते आंबट्ट प्रकरण तसच साकह्र मीठ वगैरे न घालता पिउन टाकायचं. ग्लासाला लागलेला उरलेला लिंबाचा रस संपावा म्हणून अजून दोन-तीन वेळेस ओ़ंजळभर पाणी त्यात टाकत पेला हलवत हलवत पाणी पिउन टाकायचं; मजा येते. एरव्हीही उन्हाळ्यात वगैरे आख्खं लिंबू लहान गडू भरुन पाण्यात टाकतो आणि किंचित मीठ टाकून तसच पितो--साखरेशिवाय.
लिंबू फार खातोयस. पण चांगलय सी व्हायटॅमिन मिळतं. सी व्हायटॅमिनच्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्त येणे आदि विकार संभवतात. तसेच सी व्हायटॅमिन, रोगप्रतिकारक्षमता वाढवते.
त्यात पुन्हा दुधासाठी जे काही केलं जातं ते ऐकून वाचून दूध व दुग्धजन्य पदार्थ नकोसे वाटू लागले.
संवेदनशील आहेस.
प्रवासात जाताना सोबत राजगिरा लाडूचा एखादा पुडा आणि सोबत केळी पेरु वगैरे घेउन जातो. प्रवासात तेवढच खातो. कुठे इडली वगैरे मिळाली तर तीही खातो. उडीद वडे कधीच सोडत नाही. ताजा, गरम प्लेन दोसा, किंवा प्लेन उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत स्वर्गीय आनंद देतो.
सॉलिड चांगली सवय आहे. ते स्टँडवरचे तेलकट अन शिळे पदार्थ खाण्यापेक्षा चांगले की. शिकायला हवं तुझ्याकडून.
मी चटण्या जरा जास्तच खातो असा आरोप माझ्यावर आहे. म्हणजे साधारणतः अर्धी किंवा एक वाटी चटणी हादडणं होतच. त्यात आवड-निवड फारशी नाही. जे हाताला लागेल ते; हाताला लागेल तितकं ; जमेल तितक्या आनंदानं खातो. पानात अन्न टाकत नाही. कुटलेली शेंगदाणा चटणी, पुदिना, नारळ वगैरे ओल्या चटण्या, जवस कारळ, डांगर वगैरे स्टाइल कोरड्या चटण्या, किंवा पाण्यात कालवलेलं मेतकूट हे नुसतं चमचा-चमचाभर का खायचं ते कळत नाही. वाटीभरुन बचकाभर खाल्ल्याशिवाय मजा वाटत नाही.
हाहाहा डिट्टो. ते तोंडीलावणंच जेवण होऊन जातं :)
_____
सर्व बायकांना ही समस्या येते का ते माहीत नाही पण माहेरी खादाड असलेल्या काही बायकांना येत असावी ;) मला तरी आली. म्हणजे ना माहेरी खाताना संकोच वाटायचा नाही, माझ्याकरता आवर्जुन ठेवले जायचे, मला लाडाने दिले जायचे हे सगळं सासरी च्यायला एकदमच १८० डिग्रीतून फिरतं :(. आता लग्नाला १८ वर्षं झाली आहेत, मुलगी काही वर्षात सासरी जाईल, पण तरीही मी त्या बदलाला सरावले नाहीये. पुरुषांचं बरं असतं सगळं घर त्यांच्या भोवती नाचतं. त्याला द्या, त्याला वाढा, त्याला आवडलं का? अर्थात या सर्व बदलाचा कणभरही दुष्परीणाम माझ्या प्रकृतीवर झाला नाही हे मला पाहून कोणालाही सहज कळून येईल. पण लग्नानंतरच्या अनेक बदलांपैकी, हा बदल मोठा असतो.
_______
माहेरी नॉनव्हेज वर्षाकाठी २ दा होत असेल, सासरी व्हेज जेवण वर्षाकाठी २ दा होई. हा बदल माझ्याकरता प्रचंड होता. आई सर्व प्रकारच्या कोशिंबिरी, चटण्या, मसालेभात, वडे, इडल्या, डोरे, केक, हंडवा सग्गळं बनवायची. सायन्स्ला गेलो या नावाखाली आळशीपणे ते काही शिकले नाही. पुढे सासरी आई (सासूबाई) मटण, चिकन, पाया, खेकडे, मासे, कालवण, तळलेलं, सुके मासे, बोंबिला, घोळ्,पापलेट्,मोरी पासून शिंपल्यांपर्यंत सर्व करायच्या/करतात. त्यांच्या हाताखाली मग शिकायला मिळालं. म्हणजे सूनेची कामं - मुख्य कांदे चिरणे ;), वरची साफसफाई, निवडून /चिरुन देणे वगैरे करता करता , आईंचं पाहून शिकले. तरी भानोळी,रवळी हजारदा पाहूनही कॉन्फिडन्स असा नाही तो नाहीच.
.
कालच आईंनी मोदक केले. मला वाटलं यात काय किती सोप्पं आहे, मग याला सर्व बायका व्याप का म्हणतात? पण स्वतः हाताने गोळा एकसारखा चपटा करायला गेले अन घाम फुटला, मग कळ्या येइनात, कळ्या करकचून चिमटे घेऊन काढल्या (खरं तर हलक्या हाताने काढायच्या असतात) पण नंतर वळवत वळवत, मिळवत मिळवत, मोदकाची शेंडी काढता येईना. :) .... तेव्हा कळलं खरच व्यापाचे काम आहे. फोटो टाकण्याची संधी दवडत नाही.
.
हे पहा, मोदकाचा गोळा थापताना करताना आई आणि फोटोपुरता एखादा मोदक करुन शो ऑफ करताना मी ;)-
(मी काढलेला आईंचा फोटो मस्त आलाय याउलट आधीच ध्यान अन त्यात कोणीही अक्षरक्षः कोणीही मन लावून फोटो काढत नाही ही रड आहे!! असोच.)
.
.
लेखरुपात आणलात आता सर्वजण
लेखरुपात आणलात आता सर्वजण मनातलं पोटातलं प्रामाणिकपणे सांगतील. आमचं आता वय झालं पहिल्यासारखी भूक लागत नाही जेवल्यावर.पुर्वी कधी जेवल्यावरही अरे अजून तू जेवायचा आहेस ना म्हटल्यावर पुन्हा निमुटपणे जेवत असे.आता प्रामाणिकपणे आताच जेवलो म्हटतो.
प्रतिसाद खूप छान आहेत.शुची फोटो मस्त.हौस दिसते आहे जीवनातला आनंद लुटण्याची.पटकन काढलेल्या फोटोत जे भाव येतात ते फोटोला तैयार होऊन बसल्यावर कधीच येत नाहीत.
लेखकाच्या लेखनावर त्याच्या जगण्याचा प्रभाव पडतो तसाच काय खातो याचाही पडतो.
आवडला चविष्ट लेख . तेवढं 'ते
आवडला चविष्ट लेख . तेवढं 'ते नारळ' होतं, त्याच्या करवंटीचा तुकडा दाताखाली आल्यासारखं झालं खरं. माझ्या आईकडे घरी नारळाच्या वरवर खवलेल्या मुलायम खोबर्६याला चुन (चविष्ट मधला 'च', मैने तुझे चुन लिया मधला चु नाही) म्हणायचे. म्हणजे मोदकात घालायचं ते गुळ खोबरं नव्हे तर गुळचुन. हेच घालून सातकापे घावन व्हायचे किंवा पातोळेही. गुळपोहे हा एक सोपा प्रकार. थोडं तुप आणि गुळ पातळ होईल एवढंच गरम करायचं त्यात साधे पोहे धुवून घालायचे. वर हे चुन मिसळायचं. वा सोप्प आणि मस्त. मी सुद्धा खाल्लं नाहीय बरेच वर्षात. आईकडे नरकचतुर्दशीला वेगवेगळे पोहेच मुख्य. कोबीचे पोहे, गुळ पोहे, काकडी घातलेले पोहे आणि दही पोहे.
कोरड्या चटणीत कढीपत्त्याची चटणी हा एक छान प्रकार. कढीपत्ता नुसता खाण्यापेक्षा तर उत्तमच. पण कढीपत्याची आणि कडूनिंबाची पानं नुसती खाउ शकतोस म्हणजे _/\_
नुसतं मीठ घातलेलं लिंबूपाणी हे माझ्या मुलीचं आणि नवर्^याचं आवडतं पेय. मुलीला नर्सरीत वैगेरे असताना शाळेतून लिंबू सरबतात साखरही घालतात हे ग्यान मिळालं. आणि ते किती विचित्र लागतं हे वेडीवाकडी तोंड करत तिने सांगीतलं होतं.
NRI PIO आणि इतरांनो , एक शंकाय
भारतातल्या किंवा महाराष्ट्रिय घरांबद्दल थोडाबहुत तरी अंदाज करता येतो. पण बाहेरच्या देशात राहणार्या आणि इथली मुळं असलेल्या मंडळींचा नाष्टा काय असतो ? म्हंजे.... जे काही महिन्यांपुरतेच ऑनसाइट गेलेले आहेत, त्यांनी सोबत थोडाबहुत कच्चा शिधा नेलेला पाहण्यात आहे. ( म्हंजे जाड पोहे, पातळ पोहे , चिवडा वगैरे) पण जे त्याहून अधिक काळासाठी गेलेत, किंवा ऑल्मोस्ट स्थायिकच झालेत, त्यांची आहारपद्धती काय आहे ? तुम्ही त्या देशात अगदि नवीन असतानाच्या काळात आहार काय असे ? विद्यार्थी म्हणून गेले असतील तर टिपिकल हॉस्टेल लाइफ असावी , असा अंदाज, तिथे उपलब्ध पर्याय मुदलातच कमी. पण त्यानंतर तुमचा आहार काय काय राहिला आहे ? स्थिर स्थावर झाल्यावर त्यात काही बदल झालेत का ?
इथे माझ्या आसपास नाश्त्यासाठी पोहे , उपमा , इडली, मेदुवडा , डोसा , उत्तप्पा , नाचणी लापशी , सिरिल्स , ओट , दूध , उकडलेली अंडी , आम्लेट क्वचित वडापाव मिसळ पराठे सॅण्डविच असे पदार्थ सर्वसाधारणपणे दिसतात लोकांच्या खाण्यात. तिकडे काय काय असतं ? "हल्ली सगळीकडे सगळं मिळतं, आणि आपापल्या देशांच्या अन्नाबद्दल तितकीशी दुर्मिळता राहिली नाही, अप्राप्यता राहिलेली नाही " , हे खरच. मोठमोठ्या सुपर मार्केट , मॉल्स वगैरेमध्ये देशोदेशीचे प्रमुख घटक पदार्थ मिळणं सामान्य बाब झालिये, हेही खरं. ( म्हंजे युरोप अमेरिका अरब देशांत वगैरे भारतीय मसाले , हळद, भाजहळद, बासहळद,, फ्रोझन चपाती वगैरे मिळताना दिसतात ) पण हे मोठ्या शहरांचं झालं. प्रगत देशांतही मेट्रो शहरे आणि लहान गावे ह्यात फरक असेलच की. तिथे लहान गावांतही भारतीय जिन्नस मिळतात का ? आणि मुख्य म्हंजे हे मिळत असले, तरी तुमच्या सध्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत ? जिन्नस बाजारात उपलब्ध आहेत, हे ठिकच्चे, पण तुमच्या त्या कितपत वापरात आहेत? तुमच्या सवयी बदलल्यात का ?
अजून एक म्हणजे तुमचं मुख्य खाणं काये ? लंच व डिनर साधारणपणे काय असतो ? पोळी भाजी भात ळी वरण कोशिम्बिर असं खाता की त्याची जागा इतर पदार्थांनी घेतलिये ? की कधी कधी खाण्यात पोळी भाजी भात वरण कोशिम्बिर असते आणि एरव्ही इतर काही ? ह्या इतर काही मध्ये काय काय येतं ?
सण समारंभास काय तुम्ही लोक काय करता ? म्हणजे भारतीय सण समारंभास हौस म्हणून ,सहज बदल म्हणून क्वचित एखादेवेळेस इथले पदार्थ केले जात असतील असं वाटतं. ( म्हंजे गुढी पाडव्यास वाटलेली डाळ, दसरा दिवाळी गणपतीला श्रीखंड पुरणपोळी वगैरे )
पण तुमच्या आसपासच्या स्थानिकांचे सण - उत्सव असतात गुड फ्रायडे नाताळ वगैरे, तेव्हा स्थानिकांच्या खान पान पद्धतीसारखं तुम्ही काही बनवता का?
ते कसं शिकलात बनवायला ? ( "बनवणे" ह्या शब्दाबद्दल पुरंदरे ताईंची क्षमा मागतो. )
तुम्ही काही नवीन पदार्थ तिथे गेल्यानंतरच खाल्लेत पहिल्यांदा असं झालय का ? कोणत्या आहेत त्या डिशेस ?
तुम्ही शाळेत असतानाच्या दिवसात तुमचा जो नाश्ता असे त्यामध्ये आणि आज जो नाश्ता आहे, त्यात काही फरक पडला आहे का ? काय / कितपत पडला आहे ?
अवांतर --
स्वतःचा धागा पुन्हा वर काढण्यात मला शून्य रस आहे. पण खाण्याबद्दलच्या ज्या गप्पा आहेत, ज्या सवयींच्या नोंदी आहेत, त्या सगळ्या एका ठिकाणी सापडाव्यात आणी तेवढ्यासाठी नव्यानं धागा काढू नये, ह्या उद्द्देशानं हा प्रतिसाद देतो आहे. प्रतिसाद इथे सुसंगत ठरेलसं वाटलं .
माझ्याबद्दल --
बाहेरच्या देशात प्रथमच गेलो होतो तेव्हा आपल्या शाकाहारी गोड गोबर्या बाळाचं कसं काय होणार ही लैच चिंता होती घरच्यांना.पण कसलं काय. बाळ काही महिन्यांनी परत आलं ते चांगलं टुण्टुणीत होतं. पंधरा एक किलो वजन आठेक महिन्यांत वाढवून आल्तं. बाहेर होतो तेव्हा मुळात अजिबात हाल झाले नाहित हाण्याचे. बाम्ग्लादेशी- पाकिस्तानी आणि भारतीय ( पंजाबी) लोक भरपूर संख्येनं असलेल्या भागात रहायला होतो. नियमित दालखिचडी खाणे होइ पोटभर. झालच तर सतत विविध फळे चरणं सुरु असे. त्यामुळे कधी काही हाल झाले नाहित. शिवाय स्वतः शाकाहारी असलो तरी मला कशाचे फारसे काही विशेष वाटत नसे. प्रसंगी पाकी लोकांकडून चिकन बिर्याणी आणुन त्यातले चिकन बाजूला काधून शांतपणउरलेलेला भात मी खाल्लेलाय. त्यामुळे हाल बिल कै नै. चांगला मजेत होतो.
शिवाय तिथल्या उत्पन्नाच्या मानाने सुकामेवा वगैरेही स्वस्त होते. ते दणक्यात खात असे.
आहार खरोखरच चांगला आहे. मुख्य
आहार खरोखरच चांगला आहे. मुख्य म्हणजे जंक फूड खूपच कमी खातोस तुलनेत. कढीलिंब , उडदाची डाळ आणि मेथी दाणे कच्चे खाऊ शकतो याबद्दल अभिनंदन.
बिर्याणीबाबत माझं वैयक्तिक मत असं आहे की बिर्याणी ही नॉनव्हेजच भारी लागते आणि ती मुळात नॉनव्हेजच आहे. व्हेज बिर्याणी नावाचा प्रकार मुळात अस्तित्वातच नाहीये. तो नंतर सोय म्हणून तयार करण्यात आलाय.
लेख्
लेख अगदी, नीट वाचला. नारळाचं जाऊ दे, एक गोष्ट लक्षांत आली, ती म्हणजे लिंबाचे सेवन. माझे आजोबा म्हणत, जो रोज एक लिंबु पोटांत घेईल, त्याला कधीही पोटाचे विकार होणार नाहीत. तसेच, मेथी, कढिलिंब, कोथिंबिर खाल्याने तुमचे पोटाचे आरोग्य उत्तम रहात असावे. त्यांत भरीला, पाव, बिस्किटे हे पोटाचे शत्रु आहेत, त्यापासून तुम्ही लांब रहाता. आयुष्मान व्हाल.
पावभाजी ,वडापाव, मिसळपाव
पावभाजी ,वडापाव, मिसळपाव ह्यांचं इतकं कौतुक का आहे ते समजत नाही. मुळात "मराठी" पदार्थ म्हणून ह्यांचा लौकिक का असावा ? हे कैकदा "मराठी पारंपरिक पदार्थ" किंवा "मराठी सांस्कृतिक प्रतीकं" म्हणून का मिरवले जात असावेत. आपले वाडवडील काही शेकडो हजारो वर्ष हेच पदार्थ खात होते का ? ह्या हवेत हे सहज उगवून येणारं सर्वोत्तम अन्न आहे का ?
मनोबा निदान कन्सिस्टंट आहे. रेफरन्स - http://aisiakshare.com/node/6999
"मनोबाचे खाद्यजीवन"
"मनोबाचे खाद्यजीवन" आवडले.
प्रांजळपणा, प्रामाणिकपणा भावला.
पण,
काय कानडी बायकू केलं काय रे तू?
"तो" नारळ! अरे आपल्या संस्कृतीत ब्राम्हण समजतात त्याला!!! त्याचं हे असं कशाला करतोस?
:)
(तुला ते नपुंसकलिंगीच ठेवायचं असेल तर त्याला 'खोबरं' हा शब्द आहे रे)