सौदा - भाग १
लेखनप्रकारः गूढकथा
* एका सुप्रसिद्ध इंग्रजी कथेवरून ही कथा बेतलेली आहे. हे भाषांतर नव्हे. लिहिता लिहिता गोष्ट त्या कथेकडे झुकू लागली म्हणून त्या कथेच्या दिशेनेच लिहिली. ज्यांच्या डोक्यात मूळ कथा येईल त्यांनी थोडा धीर धरावा. या कथेच्या शेवटी मूळ कथेला श्रेय देण्यात येईलच.
.
.
.
"झालीस का गं तयार?" निलिमाताईंनी अनघाला हाक दिली.
बेडरूममध्ये अनघा आपल्याच विचारांत गढली होती. भारतात परतून दोन महिने झाले होते. आज विक्रम परतायचा होता. चार वर्षांपूर्वी त्यांची अमेरिकेत भेट होते काय, सहा महिन्यांत लग्न आणि आता अचानक अमेरिका सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय, भारतात विक्रमला मिळणारी गलेल्लठ्ठ पगाराची नवी नोकरी, ऑफिसकडून शिवाजीपार्कजवळ मिळणारा प्रशस्त फ्लॅट... आयुष्याचा झपाटा इतक्यावरच थांबला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी अनघा पुढे येऊन घर वगैरे सेट करायला निघाली तेव्हा तिला पुढे येणार्या गोड बातमीची जाणीवही नव्हती परंतु हा नव्या घराचा गुण म्हणायला हवा. या घरात आल्यावर आठवड्या दोन आठवड्यातच येणार्या बाळाची चाहूल लागली होती.
तिने फोनवर विक्रमला कळवलं तेव्हा तो आनंदाने म्हणाला, "सांगितलं होतं ना ज्योतिषाने की नवी नोकरी, गाडी, घर, नवा पाहुणा सर्व येते आहे पुढल्या वर्षात असं. मला वाटतं मी योग्य तोच निर्णय घेतला. आता सर्व मनासारखं होईल... अगं म्हणजे होऊ लागलं आहे असंच म्हणूया. मी येतोच आहे परवा. कधी भेटतोय तुला असं झालंय."
विक्रमचं सर्व अनघाला पसंत होतं; हे एक ज्योतिषी प्रकरण सोडून. हुशार होता, कर्तबगार होता, धाडसी होता पण प्रारब्ध, दैव, नशीब या गोष्टींवर नको तेवढा विश्वास ठेवणारा होता. धाडसी असला तरी अमेरिका सोडून यायचा निर्णय घेतला तेव्हा तो मनातून काहीसा धास्तावला होता आणि ते साहजिकही होतं. त्याला माहित होतं की ज्योतिष वगैरेवर अनघाचा अजिबात विश्वास नाही; त्यामुळे तिला न सांगताच तो गुपचूप ज्योतिषाकडे जाऊन आला होता. येताना सोबत एक कसलासा ताईतही घेऊन आला होता. घरी आल्यावर लगेच त्याने तो आपल्या गळ्यात घातला होता. त्यानंतर थोडे दिवस तो गप्पगप्पच असे. अनघालाही ते जाणवलं होतं. तिने खोदून विचारल्यावर आपला निर्णय बिचकतच अनघाच्या कानावर घातला पण त्याच्या नशिबाने अनघाने त्याच्या निर्णयाला होकार दिला. काहीतरी जिंकल्यासारखा आनंद झाला होता त्याला. 'सर्व काही ठरल्यासारखं जमून येतंय. पुढेही सर्व जमून येईल असं मानू.' असं म्हणाला होता.
"अगं, काय विचारत्ये मी? झालीस का तयार?" निलिमाताई बेडरूममध्ये येत म्हणाल्या आणि अनघाचा चेहरा पाहून चपापल्या. "बरं नाही का वाटत तुला? तू घरीच आराम करतेस का? काय होतंय?"
"काही नाही गं आई. मळमळल्यासारखं होत होतं. जेवलेलं सगळं वर येतंय की काय असं वाटलं. डॉक्टर म्हणाल्या होत्या ना की पहिले तीन-चार महिने असं होणं कॉमन आहे असं. मी येत्येय एअरपोर्टला. बरी आहे मी. किती दिवसांनी विक्रम भेटणार आहे. मी गेले नाही तर नाराज होईल ना! पण अगं, कंगवा शोधत होते. कालपासून कुठे गायब झाला आहे कोणजाणे. इथेच होता, आता मिळत नाहीये." अनघा तोंडावर हसू आणून म्हणाली.
विक्रम परतल्यावर आठवड्याभरात निलिमाताई परत गेल्या. तशाही त्या तात्पुरत्या अनघाच्या सोबतीला आल्या होत्या पण त्यांचा जीव दिल्लीला अनघाच्या बाबांत अडकला होता. त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत असेल याची चिंता त्यांना लागली होती. आता विक्रम परतल्याने त्या दोघांच्या संसारात त्या काय करणार होत्या म्हणा.
चार वर्षांपूर्वी अनघाने विक्रमशी लग्न करण्याचा निर्णय घरी कळवला तेव्हा अनघाचे आई-बाबा थोडे नाराज झाले होते. विक्रमचे आई वडील तो कॉलेजला असतानाच अपघातात गेले होते. काकांनी कर्तव्य म्हणून त्याचा काही वर्षे सांभाळ केला होता. नंतर शिक्षणासाठी म्हणून विक्रम अमेरिकेला गेला आणि तिथेच रमला. पुढे एकत्र नोकरी करताना त्याची ओळख अनघाशी झाली आणि तिथेच त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यावेळी निलिमाताई आणि आनंदराव; अनघाचे बाबा थोडे धास्तावले होते. विक्रम अनघापेक्षा चांगला ८ वर्षांनी मोठा होता. वयातला फरकही आनंदरावांना नापसंत होता. पण लग्नासाठी ते अमेरिकेला गेले, विक्रमशी भेट झाली आणि त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या. देवाधर्मावर अनघाचा अजिबात विश्वास नव्हता पण विक्रम सर्व सांभाळणारा आहे हे पाहून निलिमाताईंना तो जास्तच आवडला. या मंदीच्या काळात विक्रमची नोकरीत फार ओढाताण होत होती तेव्हा त्याने भारतात परतण्याबद्दल आपल्या सासूसासर्यां चा सल्लाही घेतला होता. विक्रमला अचानक इतकी मोठ्या पदाची नोकरी मिळाली होती की सासूसासरे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि आता तर नातवाच्या चाहूलीने निलिमाताई आणि आनंदराव दोघेही हरखले होते. अनघाला सातवा लागला की निलिमाताई परत यायच्या होत्या आणि नातवाला बघायला आनंदरावही... आता मात्र त्यांना दिल्लीला घरी परतणं भाग होतं. तसं अडीअडचणीला अनघाच्या शेजारचं परांजपे कुटुंब अगदी तत्पर होतं. परांजपेमामींची आणि अनघाची चांगली मैत्री जमली होती आणि घरही मुंबईला अगदी मोक्याच्या जागी होतं. काळजीचं काही कारणच नव्हतं...
दादरच्या कॅडल रोडवर, म्हणजेच आताच्या वीर सावरकर मार्गावर सूर्यवंशी हॉल लागतो. तिथे अगदी जवळच्याच गल्लीत समुद्राच्या जवळ मल्हार नावाची सात मजली इमारत आहे. तशी जुनी इमारत आहे. ४०-४५ वर्षे तरी झाली असतील तिला पण भक्कम आहे आणि आतले फ्लॅट अगदी प्रशस्त. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर विक्रमला ऑफिसचा फ्लॅट मिळाला होता. मजल्यावर तीनच फ्लॅट होते. एका फ्लॅटमध्ये परांजपे कुटुंब राहत होते तर दुसर्यात राहणार्या होत्या दिलनवाझ दस्तुर; या गेल्या वर्षीच राहायला आल्या होत्या. सुमारे सत्तरीची ही बाई एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्याकडे मालपाणी भरपूर असावं असा अनघाचा अंदाज होता. परांजपेकाकांचा स्वत:चा व्यवसाय होता. तेही नवराबायको ६०-६५ चे असावेत.
विक्रम परतल्यापासून नव्या नोकरीत गर्क झाला होता. काही दिवस फार घाईघाईने निघून गेले. ऑफिसची गाडीही एव्हाना आली होती. अनघाची तब्येत मात्र थोडी मलूल होती. जेवण फारसं जात नव्हतं. काही खाल्लं तर उलटून पडत होतं. डॉक्टरांचा सल्ला घेतलेला होताच, काळजीचं काही कारण नव्हतं. तिला पुढल्या आठवड्यात सोनोग्राफीसाठी जायचं होतं, नेमकं त्याच दिवशी विक्रमला कामानिमित्त बंगलोरला जायचं होतं. परांजपेमामी सोबतीला येणार होत्या पण अनघा थोडीशी हिरमुसली होती.
“अगं काय अनघा! तू स्वत: प्रोफेशनल कॉर्पोरेट जगात काम केलं आहेस. नवी नोकरी आहे. अजून सर्व सेट व्हायचं आहे. समजून घे ना प्लीज. दोन दिवसांचा प्रश्न आहे. हा मी गेलो आणि आलो!” विक्रम समजावण्याच्या सुरात म्हणाला, “चल आपण गाडी घेऊन शिवाजीपार्कला जाऊ. एक राउंड मारू, तुला डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की फिरा-चाला म्हणून... चल बघू.” विक्रमने बळेच अनघाला उठवून तयार केलं.
घराबाहेर पडताना अनघाला कॉफी टेबलवर एक पुस्तक दिसलं. “ए विक्रम, हे कुठलं नवीन पुस्तक आणलंस रे?” तिने सहज विचारलं.
“अगं मित्तलसरांचं आहे. मी मुद्दाम वाचायला मागून घेतलं. आपला बॉस कसली पुस्तकं वाचतो ते माहित असावं.” विक्रमने घर लॉक करत म्हटलं.
शिवाजीपार्कच्या लोकांनी भरलेल्या खेळीमेळीच्या वातावरणात अनघा आपला रुसवा विसरून गेली. विक्रमही तिला नव्या नोकरीच्या गोष्टी सांगत होता, मुलं क्रिकेट खेळताना गलका करत होती, पेन्शनर म्हातार्यांच्या गप्पा रंगल्या होत्या, काही तरुण जोडपी मन रमवायला आली होती, मध्येच भेळवाल्याची हाक ऐकू येत होती; अनघाला अगदी प्रसन्न वाटलं.
फेरफटका झाल्यावर दोघे गाडीपाशी परत आले. विक्रमने गाडी अनलॉक केली आणि तो झटकन आत शिरला. अनघाला मात्र सावरून आत शिरायला किंचित वेळ लागला आणि शिरता शिरता कोणीतरी तिच्या दंडाला स्पर्श केल्याची जाणीव तिला झाली. तिने वळून पाहिलं तर एक साठी बासष्टीची वृद्ध बाई हात पसरून याचना करत होती. अनघाने तिच्याकडे निरखून पाहिलं. त्या बाईच्या अंगावर साधे सुती कपडे होते, जुने होते पण मळकट नव्हते. केस तेल लावून घट्ट बांधले होते. गळ्यात काळा पोत होता. ते मंगळसूत्र होतं की काय ते चट्कन लक्षात येत नव्हतं. बाई दिसायला साधारण होती पण तिच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती. ’अरेरे! बाई बर्या घरातली दिसते. काय तरी प्रसंग येतात एकेकावर.’ अनघाच्या मनात विचार आला.
“दे... दे ना! देतेस ना” ती बाई पुटपुटली तशी अनघा भानावर आली. तिने दहाची नोट काढली आणि त्या बाईच्या हातात कोंबली आणि ती आत जाऊन बसली.
“काय गं कोण होतं?” गाडी सुरू करत विक्रमने विचारलं.
“अरे.. भिकारीण होती रे...” त्या बाईला भिकारीण म्हणताना अनघाच्या जिवावर येत होतं पण तिने हात पसरून केलेली याचना तिला भिकारीणच ठरवत होतं. गाडीच्या साइड मिरर मधून अनघाने पुन्हा एकवार त्या बाईकडे बघण्याचा प्रयत्न केला आणि ती अधिकच गोंधळात पडली. आरशातून तिला मागे ती बाई दिसत होती. दिलेल्या दहाच्या नोटेला चुरगळून भिरकावून देताना...
रात्री झोपताना अनघाला त्या बाईची आठवण झाली. ’काय विचित्र बाई होती, हात पसरून उभी होती आणि दहाची नोट दिली तर तिने ती भिरकावून दिली. भिकार्यांचेही चोचले फार वाढले आहेत हल्ली.’ त्या विचारांतच तिचा डोळा लागला. दुसर्या दिवशी संपूर्ण सकाळ विक्रमच्या गडबडीत आणि घरातलं आवरण्यातच निघून गेली. मध्येच परांजपेमामी डोकावून गेल्या. नेहमीप्रमाणे पालेभाज्यांचा हिरवागार रस घेऊन आल्या होत्या. अनघाला तो रस अजिबात आवडत नसे पण मामी इतक्या प्रेमाने घेऊन येत की नाही सांगणं तिला शक्य नव्हतं.
दुपारी दोन घास खाल्ल्यावर अनघा बेडरूममध्ये पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती. वाचता वाचता कधीतरी तिचा डोळा लागला. दुपारचे साडेतीन वाजत आले असावे. कशानेतरी अनघाची झोप मोडली. तिने डोळे किलकिले केले, हात ताणून आळस दिला आणि स्वत:ला सावरत ती उठू लागली. अचानक पलंगाच्या पायाशी कोणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं म्हणून तिने नजर वळवली.
पलंगाच्या पायथ्याशी ती कालची बाई हात पसरून उभी होती... “दे ना, देशील ना?”
(क्रमशः)
प्रतिक्रिया
"रोचक." पुढच्या भागाची वाट
"रोचक."
पुढच्या भागाची वाट पहाते आहे. तुझ्या कथा वाचून डोळ्यासमोर चित्र येतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान सुरुवात
पुढचा भाग लवकर येऊद्या.
मस्त
पहिला भाग पार्श्वभूमी, गूढाला झालेली सुरूवात यामुळे छान रंगला आहे. पुढच्या भागाची वाट पाहतो.
झकास
झकास.तुमच्या कथा वाचून थोडी सुशीची आठवण येते.
अवान्तर - बाकी २ भागात एवढी उत्कन्ठावर्धक कथा लिहिण म्हणजे तद्दन दूरदर्शनाइझ्ड वाटत
२?
२ भागांत? नाही हं! तद्दन दूरदर्शनाइझ्ड म्हटल्याने बहुतेक ६ ते ७ भागांत लिहीन म्हणते.
अवांतर - मला फक्त जपानी खाण्याचा पदार्थ सुशी माहित आहे आणि तोच आवडतो.
झीटाईज्ड झाली असती तर
झीटाईज्ड झाली असती तर पन्नास-शंभर आले असते. पण प्रियाली बर्या लेखकांतली दिसते त्यामुळे ती दूरदर्शनाइझ्ड ६-७ भागांत कथा नीट फुलवेल अशी आशा आहे. (पळा आता)
एक नोंद: प्रतिसादांमधील शब्द याच धाग्यातल्या इतर प्रतिसादांमधून उचलले आहेत.
एक अतिअवांतर नोंदः काही सुशी-प्रेमी विदेशी मित्र मला जोशीऐवजी सुशी म्हणून चिडवण्याचा क्षीण प्रयत्न करतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वाचतोय...
वाचतोय...
मस्त!
सुरूवात छान झाली आहे आणि बरोब्बर उत्सुकता लावून भाग संपवलाय.
पुढचा भाग वाचल्याशिवाय चैन पडणारच नाहिये...
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
उत्कंठावर्धक
उत्कंठावर्धक, सुरेख धक्कातंत्र. -- ताईताचा सौदा असावा असा एक आपला अंदाज. -- पुढचा भाग लवकर यावा.
-हा शब्दप्रयोग खटकला. 'हा गेलो आणि हा आलो' किंवा 'असा गेलो आणि असा आलो' हवे होते. चु.भू. द्या. घ्या.
बरं
बरं! सुधारणा करून टाकते. प्रतिसादासाठी धन्यवाद.
भयकथासंग्रह
आपला एक भयकथासंग्रह नक्कीच होईल आता - असा विचार मनात आला.
मस्त
पुढे काय होईल याची उत्सुकता लागलीय
.
मस्त
वाचतोय. लवकर येऊ द्या पुढचे.
रोचक सुरवात. वाचतोय.
रोचक सुरवात.
वाचतोय.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा
उत्कंठापूर्ण
सदरची कथा एका इंग्रजी कथेवर बेतलेली आहे असे जरी सुरुवातीचे डिक्लेरेशन सांगत असले तरी प्रत्यक्ष कथेचा बाज आणि कालक्रमणा अस्सल महाराष्ट्रीयन वाटते. फक्त दहाची नोट चुरगाळून टाकणार्या त्या म्हातार्या स्त्री पात्रामुळे 'फायनल डेस्टिनेशन' च्या एका भागातील 'हाय वे' वरील तत्सम प्रसंग नजरेसमोर आला, इतकेच.
कथेची मांडणी उत्कंठापूर्ण आहे हे तर स्पष्टच दिसत्ये, त्यामुळे वर सर्वच प्रतिसादकांनी म्हटल्याप्रमाणे 'पुढील भागाच्या प्रतिक्षेत' आहे.
अशोक पाटील
अशी बाई
पाटीलसाहेब, अशी बाई प्रत्यक्ष माझ्या नजरेस पुण्याला पडली होती. तिच्याकडे पाहून माझ्या मातोश्रींना गदगदून आले की 'बाई बर्या घरची दिसते पण ही अशी परिस्थिती का यावी तिच्यावर?' गंमत म्हणजे मी तिला दहा नाही तर वीस रुपयांची नोट द्यावी असे मातोश्रींनी सुचवले. त्याप्रमाणे मी ती दिली तर ही बाई "वीस रुपये काय देतेस. बर्या घरची दिसतेस. ५०-१०० तरी दे.' असा हट्ट करू लागली आणि मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला.
तोच प्रसंग बदलून मी कथेसाठी वापरला.
प्रतिसादासाठी धन्यवाद.
---------
खरे म्हणजे आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादांचे याच प्रतिसादात धन्यवाद देते. पुढील भाग लवकरच टाकते.
वाचते आहे.
वाचते आहे.
उत्कंठावर्धक
सहजसुंदर आणि ओघवती झालेली आहे. रस्त्यात सहज घडणारा प्रसंग गूढपणाचं वातावरण निर्माण करतो आणि शेवटी ते गडद होतं.
दुसरा भाग सावकाशीने वाचेन...
आरामात वाचा.
ही गोष्ट लिहिताना मागे तुमच्याशी झालेला संवाद आठवत होता. माझे म्हणणे होते की नेटावर मोठी गोष्ट चालत नाही कारण लोक इतके भाग वाचत नाहीत. तुमचे म्हणणे होते असे करणे अयोग्य आहे कारण त्यामुळे गोष्ट फुलवता येत असेल तरी फुलवली जात नाही...म्हणून यावेळेस मोठी गोष्ट लिहिण्याचे ठरवले. गोष्टीचा आवाका वाढवत नेणे आणि तरीही बंदिस्त ठेवणे ही कठीण गोष्ट वाटली. तरीही, शेवटी गुंडाळावी असेच डोक्यात येत राहिले.
असो. हा एक प्रयोग आहे. अन्यथा इतकी मोठी गोष्ट लिहून पाहिली नव्हती.
धन्यवाद!