परंपरा आणि नव्या जाणीवा ("पेड्डामानिषी"च्या निमित्ताने )

या संकेतस्थळावर कालपरवाच झालेल्या पेड्डामनिषी किंवा "हाफ सारी" समारंभाच्या चर्चेने अनेक मुद्दे-प्रतिमुद्दे पुढे आले. विषयाशी संबंधित बर्‍याचशा मुद्द्यांचा परामर्ष त्या धाग्यावरच घेतला गेला आहे. तरी या निमित्ताने काही अधिक खोलवरचे मुद्दे पुढे येतात असं वाटलं म्हणून हा नवा धागा.

एकंदर चर्चा वाचल्यानंतर दोन प्रमुख मुद्दे समोर आले असं वाटलं.

१. "हाफ सारी" समारंभासारख्या गोष्टी ज्या रीतीने साजर्‍या होतात त्यामुळे पौगंडावस्थेतल्या या मुलींच्या मनात प्रसंगी कानकोंडलेपणाची भावना उद्भवू शकते. हा मुद्दा आधुनिक काळातल्या परिस्थितीबद्दल लागू होतो. आक्षेप चार लोकांनी एकत्र येणे, उत्सव साजरा करणे , आनंद व्यक्त करणे किंवा धार्मिक स्वरूपाचा समारंभ करणे असा नाही. अमेरिकेसारख्या ठिकाणी "स्वीट सिक्स्टीन" स्वरूपाच्या पार्टीज होतातच. आक्षेप ज्या रीतीने समारंभ साजरा होतो आहे त्याच्याशी संबंधित आहे. मुलगी एका सिंहासनवजा ठिकाणी केंद्रस्थानी बसते, तिने पारंपरिक पोषाख घातलेला असतो, तिला इतर स्त्रिया हळदीकुंकू लावतात इत्यादि इत्यादिंमधे त्या मुलीला "आपण समूहा पैकीच एक आहोत" या स्वरूपाच्या संदेशाच्या विरोधी संदेश मिळण्याची शक्यता आहे.

२. दुसरा असा मतप्रवाह दिसला की एकंदर परंपरागत रितीने साजर्‍या होणार्‍या अशा सोहोळ्यांमधे आपल्या संस्कृतीमधली प्रगल्भता दिसते. पुरातन काळापासून अनेक शतके कदाचित स्त्रियांच्या समाजातल्या स्थानाबद्दल , एकंदर स्त्रीविषयक धार्मिक रुढींबद्दल बरीच टीका करता येईलही, परंतु याप्रकारच्या सोहळ्यामधे , नक्कीच काहीतरी शहाणपण आहे. ते असं की, एरवी शुचितेच्या संकल्पनांमधे स्त्रियांच्या ऋतुमती होण्याबद्दलची चर्चा वर्ज्य असली तरी या अशा समारंभामधून वयात आलेल्या मुलींना आपल्यातल्या या बदलांचं भान यावं आणि या संबंधीच्या सामूहिक जाणीवेशी त्याना जोडता यावं, हा उद्देश यात सफल होतो.

उपरोल्लेखित मुद्दे निदान सकृद्दर्शनी तरी परस्परविरोधी वाटत आहेत. सत्य या दोन बाजूंपैकी एकीकडेच आहे की याच्या अधेमधे कुठेतरी ?

मी या निष्कर्षांप्रत येतो की, एकंदर परंपरांना समजून घेणं , त्यांना साजरं करताना म्हणा किंवा पाळताना म्हणा, कालानुरूप बदल घडणं याला पर्याय नाही. Throw out the baby with the bath water या इंग्रजी म्हणीप्रमाणे , परंपरांना नाकारताना त्यातला चांगला भाग नाकारणं वाईट॑च.

मला जर पौगंडावस्थेतली मुलगी असेल आणि मला अशा स्वरूपाचा समारंभ ठेवायचा असेल तर मी काय करेन ? मुळात समारंभ ठेवेन का ? असे प्रश्न मनात आले. माझ्यामते बहुदा मी एखादी पार्टी ठेवेन. (खंडीभर पार्ट्या होतात, त्यात आणखी एक. ) माझ्या धर्मविषयक कल्पना लक्षांत घेता, मी हळदीकुंकू ,"हाफ सारी" नेसणे आणि सिंहासनावर बसवणे व इतर धार्मिक विधी करणे हे टाळेन. मात्र माझ्या मुलीच्या मित्रमैत्रिणींना बोलावेन. त्यांचे आवडते खेळ, त्यांच्या आवडत्या ठिकाणी त्यांना नेणे वगैरे करेन. ( मी धार्मिक असतो तरी कदाचित मुलीला देवळात नेऊन आणले असते; मात्र तिच्या आनंदाकरता, तिला तिच्या आवडत्या गोष्टी आणि मित्रमैत्रिणींचा लाभ मिळेल हे पाहिले असते. ) सर्वात महत्त्वाचं म्हणजे , तिचे हे दिवस यायच्या आधीच मी , माझी पत्नीने या सर्व गोष्टींबद्दल बोलून, अशा प्रसंगी काय होते, काय काळजी घ्यावी याची सांगोपांग चर्चा तिच्याशी केली असती.

असो. निराळा धागा काढण्यासारखे मी या धाग्यात वेगळे किंवा महत्त्वाचे लिहिले आहे की नाही याबद्दल शंका आहे. नेहेमीप्रमाणेच , इतरांच्या अभिप्रायांनंतरच याबद्द्ल अधिक चांगला प्रकाश पडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आधुनिक युगाच्या वडसावलीत आलो म्हणून पूर्वीच्या गावाकडील चिंचेखालील गारवा त्याज्य मानणे केव्हाही चूकच. परंपरा चांगल्या की वाईट यावर मंथन करताना संस्कृतीमधील सरसकट "फेकून द्या ते पलिते" असेही काही असू नये. मूळात मानवप्राणी हा रोबो नव्हे हे मान्य व्हावे आणि ते झाल्यास मग दोन वेळेचे जेवण, कपडेलत्ता, सुखाची नोकरी, बॅन्केचे गलेलठ्ठ आकड्यांनी भरलेले पासबुक याशिवायही आपल्याकडे 'घर' नावाची एक इन्स्टिट्यूट आहे आणि तिच्या चांगल्या अशा काहीतरी (अगदीच आदर्श नसल्यातरी) परंपरा आहे त्या तशाच जपणे अगत्याचे आहे असे वाटणे म्हणजे आपल्या हळव्यापणाचे ते एक लक्षण आहे. रत्नागिरीहून डालड्याच्या डब्यातील तुळशीवृंदावन टोरोन्टोला घेऊन जाणारी ओळखीपैकी एक स्त्री माझ्या पाहाण्यात आली, तेव्हा मुलगा तिच्या त्या कृतीला नाक मुरडीत नसला तरी काहीशा थट्टेच्या सूरात हसत होता. पण त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे मला जाणवले होते. सूनबाई शांत दिसल्या. त्या मुलीने गावात माहेरी तुळशीला पाणी घातले असेल वा नसेल पण नक्की परदेशात सासूने मुद्दाम आणलेली ती तुळस ती नक्की जपेल. म्हटले तर ही श्रद्धा म्हटले तर परंपरा. मला वाटते परंपरेचा हा भाग चांगलाच, मग तो कुठल्याही मातीत रुजला तरी हरकत नसावी.

पण म्हणून सर्वच परंपरा जशाच्या तशा चालूच राहाव्यात असेही मी म्हणणार नाही. बाप मेल्यावर तिसर्‍या दिवशी रक्षाविसर्जनानंतर नदीकाठी मुलाचे डोके भादरून टाकले जाते. काय अर्थ असतो या उग्र केस कापण्याच्या पद्धतीमागे ? कुणीही पटेल असे उत्तर देत नाही. 'आहे तशी परंपरा' असा एक तुकडा पृच्छकासमोर टाकला जातो. अतिशय दाट आणि सुरेख केस असलेल्या दहा वर्षाच्या मुलाचे अशा विधीचेवेळी श्मश्रू करीत असतानाचे भीषण चित्र माझ्या डोळ्यासमोर आताही तरंगत आहे. भीषण शब्दाचे प्रयोजन एवढ्यासाठी की त्या मुलाच्या नाजूक डोक्याला, त्वचेला असह्य वेदना होत होत्या त्या वस्तार्‍याच्या, त्यात जरी पंचगंगेचा तो तीर असला तरी उन मी म्हणत होते आणि तसल्या उन्हात ते नको वाटणारे केशकर्तन. असेल ही देखील संस्कृतीतील परंपरा, पण म्हणून ती आजच्या युगात जशीच्यातशी स्वीकारलीच पाहिजे असा काही दंडक नाही.

ज्या परंपरेपासून उपस्थितांना, पैपाहुण्यांना, प्रत्यक्ष उत्सवमूर्तीला काही प्रमाणात आनंद मिळत असेल तर त्या परंपरा रोजच्या जीवनघडीपासून काहीसे अलग या नात्याने स्वीकारल्यास दोन्ही पक्षी समाधान निर्माण होईल. श्री.मुक्तसुनीत यानी छेडलेला हा विषय जरी पेड्डामानिषीचा दुसरा भाग असला तरी त्याची पूरके आणि विभागणी अन्य परंपरांच्या धाग्यांनाही लागू होतीलच. हाफ सारी म्हटले काय, पुष्पमती वा ऋतुमती म्हटले काय, मुलीचे वयात येणे आईवडिलांना तो एक निखळ आनंदाचाच भाग वाटणार हे सत्यच आणि मग त्या अनुषंगाने गोडधोड करून ती आठवण आल्हाददायक करावी असे परंपरेत म्हटले असेल तर ती करावी असे मी मत मांडेन. 'ऋण काढून सण साजरे' करण्याची वृत्ती आजही आपल्या समाजात चालत आली आहे (हाही परंपरेचाच अटळ असा भाग) तर मग 'पुष्पमती सायंकाळ' ही तत्सम किरणांनी रंगली तर त्याचे सार आनंददायीच असेल. चिनी परंपरेत मुलीच्या वयात येण्याच्या प्रसंगाला "हेअरपीनिंग" म्हटले जाते, तो प्रसंग तर गल्लीत खास कानठळ्या बसविल्या जाणार्‍या चिनी फटाक्यांच्या दणदणाटाने आजही साजरा केला जातो. मला वाटते ज्यू 'बार मिट्झ्वॉ' देखील याच परंपरेतील आहे.

ऋतुस्नात झालेल्या मुलीला त्या रात्री चंद्रदर्शन देण्याचा एक प्रघात आहे. त्याच्या मागील संकेत मोठा भावूक असाच आहे. पुढे येऊ घातलेला गर्भ नेहमी चंद्रासारखाच शीतल राहावा अशी त्यामागील एक भावना असल्याने पुढे ती मुलगी आई झाल्यावर आपल्या बाळाला चंद्राकडे बोट दाखवून 'चंदामामा बघ' असे का म्हणत असते याचाही उलगडा होतो. सुंदरच आहे. पूर्वकालीन संकेतात याचे उगम आहेत. त्यांचे उल्लेख अशा लोककथा जतन कराव्यात असासाठीही असतात.

परंपरांची हीच महती.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिला इतर स्त्रिया हळदीकुंकू लावतात इत्यादि इत्यादिंमधे त्या मुलीला "आपण समूहा पैकीच एक आहोत" या स्वरूपाच्या संदेशाच्या विरोधी संदेश मिळण्याची शक्यता आहे.

तिला इतर स्त्रिया हळदीकुंकू लावणे शक्यच नाही. मूळ लेखही तसे म्हणत नाही. मूळ लेखात तिला हात न लावता कुंकू प्रदान केले जाते असे म्हटले आहे. अस्पृश्यता ही काही जाती आणि स्त्रियांच्या बाबत राहिली आहे आणि ती नष्ट व्हावी असे माझे मत आहे. (मूळ चर्चेत हा मुद्दा एकालाही ठळक करावासा वाटला नाही याचे मला वैषम्य वाटते.) आणखी थोडी खोलवर चौकशी केली तर कळेल की काही समाजांत या दिवसांत मुलींना आंघोळ करायला देत नाहीत कारण त्या इतरांबरोबर बाथरूम शेअर करतील आणि स्पर्श होईल या भीतीने.

बाकी, उत्सव साजरा करण्याचे विविध प्रकार असतात. जसे वाढदिवशी मुलांना मोठे झाल्याबद्दल ओवाळणे तसेच या दिवशी करणे, गोडधोड करणे, मुलीच्या मित्रमैत्रिणी किंवा जवळचे नातेवाईक यांना बोलावून ते साजरा करणे, पार्टी, सहल वगैरे आयोजित करणे असे अनेक प्रकार करता येतील.

मूळ चर्चेत लावलेला माझा प्रतिसाद येथे पुन्हा चिकटवते.

या उत्सवातून मुलीला दिलासा मिळू शकतो असे अनेकांनी म्हटले आहे पण अगदी तसेच होत असेल का? होत असेलही किंवा नसेलही. कदाचित यावेळी तिला घरातील मोठ्या बायका तिने या दिवसांत कसे इतरांना शिवू नये, लांब रहावे, वेगळे बसावे, देवाधर्माच्या कार्यात भाग घेऊ नये किंवा अशा दिवसांत तिची मासिक पाळी आल्यास देवाधर्माचा नियम चुकून त्याचं खापर तिच्या माथी फोडलं जाऊ शकेल अशी सुचवणीही करत असतील. अशा उत्सवांना धार्मिक स्वरूप असेल तर आपण सर्व धार्मिक विधी पाळण्यात कसर करत नाही हे दाखवण्यात बायकांचे प्रमाण मोठे असावे.

अशा प्रसंगांचे स्वरूप बदलायला हवे असे मला आवर्जून वाटते. १३-१४ वर्षांच्या मुली अगदीच लहान नसतात. त्यांच्यापेक्षा लहान वयांच्या मुलांना त्यांच्या वाढदिवशी कोणाला बोलवायचे हे विचारले जाते तर मग अशावेळी मुलींना विचारून त्यांना हा दिवस कसा साजरा करायचा ते का विचारू नये? या दिवशी काही वेगळे घडत नाही हे सांगताना या मुलींना -

 1. त्यांच्या घरातील थोड्या मोठ्या मुलींना, बहिणींना किंवा मैत्रिणींना बोलवून दिवस साजरा करणे. उत्सवाचे निमित्त माहित असल्याने मुली आपले अनुभव शेअर करतील. हे करताना मुलीला आवडणार्‍या किंवा कम्फर्टेबल वाटेल अशा घरातील मोठ्या बायांनाही बोलावता येईल. जसे, आजी, आत्या, मामी, काकी.
 2. त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवावा. यात चित्रपट, पार्टी, जेवण इ. करता येईल
 3. या दिवसांत स्वच्छता, रोज आंघोळ वगैरे गोष्टींचे आरोग्यविषयक महत्त्व त्यांना पटवून देणे. कदाचित डॉक्टरला सल्ल्यासाठी भेटवून आणणे.
 4. विविध खेळांत त्यांना कसा भाग घेता येईल हे पटवणे. उदा. पोहायला घेऊन जाणे. या दिवसांत पोहताना कोणती साधने वापरावी हे समजावणे.
 5. मुलींना घेऊन आवर्जून देवळात जावे. (हे नास्तिकांना लागू होईल असे नाही परंतु विवेकी आस्तिकांनी तरी करावे.) मुलीच्या हातून तिच्या आयुष्यात झालेल्या महत्त्वाच्या या वाढीमुळे जर देवाला फुल वाहण्याची, पूजा करण्याची इच्छा असेल तर ते करू द्यावे.

या खेरीजही इतर गोष्टींनी त्यांना कम्फर्टेबल करता येईल. त्यासाठी हाफ सारी, सिंहासने आणि गर्दीची गरज असेलच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिला इतर स्त्रिया हळदीकुंकू लावतात इत्यादि इत्यादिंमधे त्या मुलीला "आपण समूहा पैकीच एक आहोत" या स्वरूपाच्या संदेशाच्या विरोधी संदेश मिळण्याची शक्यता आहे.

मुलीला अस्पर्श ठेवणं, घरातील व्यवहारातून तसंच धार्मिक कार्यातून वगळणं इ. मधून मिळणारा संदेश विरोधीच असतो. बर्‍याच घरांमध्ये मुलीच्या ऋतुदर्शनानंतर होणारे बदल म्हणजे त्या मुलीवर बंधनं, निदान आता अमूक करायचं नाही - तमूक वागायचं नाही याशिवाय दुसरं काही सकारात्मक नसतंच. "आपण समूहा पैकीच एक आहोत" हा संदेश देण्यासाठी, ऋतुपूर्व आयुष्यात मुलगी ज्या गोष्टींचा आनंद घेऊ शकत असे त्या गोष्टी अजूनही कशा शक्य आहेत हे पालकांनी तिला दाखवून देणं आवश्यक आहे.

अति अवांतर:
जुन्या काळी बघितलेला अशाच विषयावरचा 'माया'हा सुंदर पण भीषण चित्रपट आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहराजादशी सहमत.
अश्या कोणत्याच कार्यक्रमातून मुलीला "आपण समूहापैकीच एक आहोत" असा संदेश मिळत नाही. उलट अचानक आपण आतापर्यंत सगळ्यांमध्ये ज्या मोकळेपणाने वागत होतो तसे आता वागायला नको असाच तिचा समज होवू शकतो. आपण समूहापैकीच एक आहोत, जे होतंय ते काहितरी भयानक, जगावेगळं नाही हे पटवायला घरातील आई, मोठी बहिण किंवा नात्यातील जवळच्या स्त्रियांनी वेळोवेळी दिलेली माहिती पुरेशी असते.

अवांतरः माझ्या शाळेत एक अशी मुलगी होती जिला ऋतुदर्शनानंतर तिच्या आईने मुलांशी बोलायला बंदी घातली होती. कालपर्यंत मुला-मुलींसोबत सारख्याच भावनेने वावरणार्‍या त्या मैत्रिणीवर घरातून आलेल्या अश्या बंधनाचे कारण (त्या वेळी) तिला, आम्हाला आणि तिच्या अचानक दूर केलेल्या मित्रांना अनाकलनिय होते.

स्त्रियांकरता हे जग वाटते तितके चांगले नाही हे मान्य आणि त्याकरता मुलींना परपुरुषांसोबत मर्यादेत वागण्याचे सुरक्षीततेचे धडे देणे ही योग्यच आहे. परंतु त्याकरता त्यांना मुलांसोबत/पुरुषांसोबत सामान्य व्यवहारही न करू देणे टोकाचे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

पेड्डामानषी समारंभामध्ये मुलीला साडी नेसावी लागते. कालपरवा फ्रॉक्/स्कर्ट मध्ये अल्लड पणे बागडणार्‍या मुलीला साडी नेसल्यावर नक्कीच अकाली प्रौढत्व आल्यासारखे वाटत असावे. हीच जबाबदारीची जाणीव आता पुढे आयुष्यभर जोपासायची आहे हे यातून तिच्यावर ठसविले जात असावे. अर्थात हा संदेश एका दिवसात जाणार नसतो. पावसाचे पाणी जसे मातीत हळूहळू मुरते तसा हा संदेश हा तिच्या कोवळ्या मनावर अहर्निश ठसवायचा असतो.

दुसरी गोष्ट या काळात आवश्यक असणारी विश्रांती. अन्य कामांना रजा देऊन तिला ५ दिवस का काही दिवस एका खोलीमध्ये बसविले जाते यामधून, विश्रांतीचा मुद्दा अधोरेखीत होत असावा.

_______________________________

राहता राहीले माझ्या मुलीकरता तुम्ही हा कार्यक्रम कराल का? तर माझ्या मुलीच्या आजी-आत्या-मामी-मावशी अशा जवळच्या २-४ स्त्रिया, मुलीच्या समवयस्क मैत्रिणी जमवून हा आनंद साजरा करावयास मला आवडेल. देवळात नेऊन आणेन.
_______________________________
अवांतर - नवरात्रीच्या काळात ९ कुमारीका पूजतात. लहानपणी दर वर्षी मी समोर भाटीयांकडे या पूजेकरता माझ्या ८ मैत्रिणींसमवेत जात असे. आमचे पाय धुवून पायावर लाल कुंकवाचे स्वस्तिक काढून, पाटावर बसवून अतिशय चविष्ट मिष्टान्न दिले जात असे. तेव्हा एकत्र खाण्याचे खूप अप्रूप वाटत असे बाकी काही म्हणजे काही कळत नसे.
मामा कडे मी पूजा (अष्टोपचारी) करावयास शिकले. मग प्राजक्ताची फुले गोळा करणे ते देवांना आंघोळ, अष्ट्गंध, उदबत्ती, स्तोत्रे सर्व मी मामीकडून शिकले.
आता जेव्हा हे वरील प्रसंग आठवतात तेव्हा खूप प्रसन्न वाटते, काहीतरी स्पेशल आणि अर्थपूर्ण केले, आपण कोणीतरी स्पेशल होतो असे वाटते. जी ५ मिनीटे मन भूतकाळात फिरून येते, त्याने बॅटरी रिचार्ज होते. सांगायचा मुद्दा हा की - अशा रुढी , तेव्हा अर्थहीन वाटणार्‍या क्रिया पुढे खूप आनंद देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका विशिष्ट विषयावरून झालेल्या चर्चेतून "सत्य या दोन बाजूंपैकी एकीकडेच आहे की याच्या अधेमधे कुठेतरी ?" हा मोठा आवाका असणारा प्रश्न पडणं मला महत्त्वाचं वाटतं. धागाप्रवर्तकाला "निराळा धागा काढण्यासारखे मी या धाग्यात वेगळे किंवा महत्त्वाचे लिहिले आहे की नाही याबद्दल शंका आहे." असं वाटत असेल तरी माझं मत थोडं निराळं आहे. असे प्रश्न पडावेत आणि त्यावर जरूर चर्चा व्हावी. आपले विचार स्पष्ट होण्यासाठी अनेकांची मतमतांतरं असावीत असं मला वाटतं.

काही वर्षांसाठी परदेशात जाताना मी दोन बॅगा भरून सामान नेलं तरी मला ते कमीच वाटलं. पासपोर्ट, प्लास्टीक मनी आणि प्रवासात वाचायला पुस्तक एवढ्या मर्यादित सामानावर कोणी आनंदात निघेल. परंपरांच्या बॅगेजबद्दलही मला असंच काहीसं वाटतं. फक्त फरक असा आहे की मी परंपरांच्या बाबतीत कमीतकमी बॅगेज सांभाळणार्‍यांमधली आहे. परंपरा कशासाठी असा प्रश्न पडतो; आपल्या आनंदासाठी परंपरा का आपण परंपरेसाठी? आजूबाजूला ख्रिसमस साजरा करणारे लोकं असताना आपण दिवाळीला पणत्या का लावायच्या असा प्रश्न मला अनेकदा पडला. आपणहून काही करण्यापेक्षा चार लोकांच्या आनंदात सामील होण्याचा स्वभाव असल्यामुळे भारतात असेन तर दिवाळी, ख्रिस्ती परंपरा असणार्‍या देशात असेन तर ख्रिसमस अशा सगळ्या परंपरांचा मी आनंदही लुटला.

'पेड्डामानिषी'सारख्या प्रथांबद्दल मला थोडी अढी आहे खरी. पण ती वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरीज, अशा समाजात एकाच वेळी साजर्‍या न होणार्‍या प्रत्येक समारंभाबद्दल आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमधे भारत जिंकल्याचा आनंद उत्स्फूर्तपणे साजरा होणं मला जास्त आवडतं. आजच्या काळात पेड्डामानिषी किंवा मुंज काहीही म्हणा, जात, लिंगसापेक्षता असणार्‍या समारंभांना कितपत महत्त्व द्यावं? निदान शहरी भागांमधे, शिक्षित घरांमधे असे प्रकार पाहिले की त्याबद्दल विचार व्हावा असं मनापासून वाटतं.

प्रियाली आणि शहराजाद यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी, मुलींचं बालपण हिरावून घेऊ नये, त्यांच्यावर जबाबदारीचं ओझं टाकू नये याच्याशी सहमत आहे. मुलग्यांना असा काही 'त्रास' नसतो याचं सगळ्यात जास्त तेव्हा वाईट वाटलं जेव्हा कोणा-कोणाकडून ऐकलं की या चार दिवसांत मुली, बायकांना अस्पर्श समजतात आणि त्या सुद्धा स्वतःला त्या काळात अपवित्र समजतात.

सारीकाच्या अवांतरासंदर्भातः एकेकाळी मलाही ओळखीचे लोकं जेवायला बोलवायचे, गिफ्ट्स द्यायचे ते आवडायचं. पण भावाला का बोलावत नाहीत याचं वाईट वाटायचं. काही मित्रांच्या घरी जेवणाच्या वेळेला असल्यामुळे जेवणही व्हायचं. त्याला सव्वापाच, सव्वाअकरा रूपये दक्षिणा मिळायची पण मला मिळायची नाही. मला त्याचंही वाईट वाटायचं. आणि आता मी लग्न केल्यावर पुन्हा त्या घरांमधे मला सव्वापाच, सव्वाअकरा रूपये मिळायला लागले (आता कदाचित साडेअकरा असतील!). एखादा माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे तर त्याची जात, वय, लग्न यामुळे! मला स्वतःला हे कालबाह्य वाटतं; मित्रांच्या आजी-आजोबांशी वाद घालावेसे वाटत नाहीत पण माझ्या वयाचे लोकं, म्हातार्‍यांचं दडपण नसताना असं करतात तेव्हा वाईट जरूर वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>महत्त्वाचा का आहे तर त्याची जात, वय, लग्न यामुळे! मला स्वतःला हे कालबाह्य वाटतं;
अदितीशी सहमत.

तसेच हा वयात येण्याचा विधी/ सोहळा सुद्धा कालबाह्य आहे असे मला वाटते. जेव्हा ह्या प्रथा सुरू झाल्या तेव्हा स्त्रीची सुपीकता महत्त्वाची होती. आता ती तेव्हढी नाही. शिवाय मुलगी बाराव्या वर्षी ऋतुमती झाली तरी अठराव्या वर्षापर्यंत तिला लैंगिक संबंध ठेवण्याची (कायद्याने) परवानगी नाही. (की सोळाव्या?) त्या दृष्टीने पाश्चात्य जगातले स्वीट सिक्स्टीन काळाला धरून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मला जर पौगंडावस्थेतली मुलगी असेल आणि मला अशा स्वरूपाचा समारंभ ठेवायचा असेल तर मी काय करेन ? मुळात समारंभ ठेवेन का ? असे प्रश्न मनात आले.

असा समारंभ महाराष्ट्रात सामान्यतः असतो का? असल्यास ऐकिवात / पाहण्यात नाही. मग हे असे समारंभ साजरे करून नवी रुढी / परंपरा निर्माण करायची आहे का? (अशा प्रकारचा समारंभ केल्यास त्यात सहभागी होणार्‍या इतर स्त्रियांनाही ठाऊक हवे की नक्की काय करायचे असते Lol

अन करायचीच असेल नवी रुढी तयार, तर देवळात जाऊन येण्या सोबतच, येताना तुमच्या स्त्रीरोगचिकित्सकेकडे जाऊन मुलीला याबाबतची 'अधिकृत' शरीरशास्त्रीय माहीती मिळेल असे बघा. या काळात शारिरिक स्वच्छता कशी पाळावी, कापडाची 'घडी' घेण्याऐवजी सॅनिपॅडच का वापरावे. वापरलेल्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी? (कागदात गुंडाळून कचर्‍याच्या टोपलीत टाकणे. फ्लश करू नये) इ. गोष्टी शिकविणे जास्त महत्वाचे वाटते. सुरूवातीच्या काळात अनियमित वाटली तरी नंतर ती नियमित होते म्हणजे कशी? किती प्रमाणातली पोटदुखी 'नॉर्मल'? किती रक्तस्त्राव/दुखणे हे 'अ‍ॅबनॉर्मल' अन डॉ. कडे जाण्याच्या लायकीचे?

अवांतर.
लहानपणी काही घरगुती कार्यक्रमाचे निमित्ताने एकत्र जमलेल्या सर्व काका/काकू कंपनीत सोयिस्कर रित्या 'शिवायचे नाही' सबब सांगून प्रत्येक वेळी स्वयंपाक पाणी इ. कामातून सूट मिळवून आराम करणार्‍या एका काकूची आठवण झाली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

असा समारंभ महाराष्ट्रात सामान्यतः असतो का? असल्यास ऐकिवात / पाहण्यात नाही

महाराष्ट्रात आधीच्या पिढीत काही समाजांत/ कुटुंबांत 'न्हाण' येण्याचा समारंभ असे. मुलीला साडी नेसवून म़खरात बसवणे वगैरे गोष्टी ऐपत आणि हौशीनुसार केल्या जात. घरोघरून त्या मुलीसाठी गोडाधोडाची वाढणं येत.कमल पाध्ये यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या ताईच्या 'नहाण' येण्याच्या प्रसंगाचं वर्णन आहे. त्यांच्या स्वतःच्य वेळी असा कार्यक्रम झाला नाही. ह्याचं कारण, त्यांच्या ताईचं लग्न लहान वयात झालं होतं. ऋतुदर्शन झालं ते लग्नानंतर. कमलबाईंच्या बाबतीत, लग्न न झालेली न्हातीधुती मुलगी घरी असणं ही गोष्ट समारंभपूर्वक जाहीर करण्याजोगी मानली गेली नव्हती.
महाराष्ट्रातल्या काही भटक्या, ग्रामीण तसंच गावकुसाबाहेरच्या गणल्या गेलेल्या समाजांतही ह्या घटनेशी संबंधित प्रथा आढळतात. शहरांमध्ये समारंभ करण्याची पद्ध्त माझ्या मर्यादित अनुभवात नाही. तरी घरगुती स्वरूपच्या काही प्रथा असू शकतील असं वाटतं.

बाकी तुम्ही उल्लेख केलेल्या आरोग्यशास्त्रीय माहिती इ शी सहमत. कितीतरी वेळा लहान मुलीच काय, मोठ्या बायकाही ह्यासंबंधात डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळतात.
त्याच्बरोबर स्वतःच्या बदलत्या शरीराविषयी सकारत्मक दृष्टीकोन बाळगायला शिकवणंही महत्त्वाचं असतं. मुलांमधला वावर बंद करण्यापेक्षा निकोप लैंगिक दृष्टिकोन निर्माण करणं मला जास्त श्रेयस्कर वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0