उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ३
आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्होडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. यासगळ्यात पदार्थ बनवणार्याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच या धाग्याची कल्पना सुचली.
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहितरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवां ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच.
अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाहि तर पिण्याबद्दलही आहे
भाग २ बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी, तेथील सारीका यांच्या प्रतिसादाचे रुपांतर, नव्या भागात करत आहोत:
======================
"फेमस डेव्हज" मध्ये गेलो. भली मोठ्ठी "ऑल अमेरीकन फूड" प्लॅटर मागवली. बटाट्याचे काप, कोलस्लॉ, फ्राईड बीन्स, मक्याचा पाव, पोर्क्-रीब्ज, पुलड पोर्क, तळलेली कोंबडी व हलक्या लोण्याबरोबर उकडलेली कणसे असा जय्यत मेन्यू होता. रीब्ज मला आवडत नाहीत पण घरातले इतर सगळे तुटून पडतात. इतक्या लठ्ठ (फॅटी) अन तरीही कोवळ्या व ज्यूसी रीब्ज पहील्यांदाच पाहील्या. १२ रीब्जचा स्टॅक येतो. हे रेस्टॉरंट रीब्जकरताच प्रसिद्ध आहे.
डेव्हज चे सिग्नेचर "विलबर्स रिव्हेंज" सॉस निव्वळ अप्रतिम आहे. खूप तिखट आहे, जास्त खाता येत नाही. विलबर हे "शार्लॉट्स वेब" मधील प्रसिद्ध डुक्कर. आपण पोर्क खातो म्हणून तिखट सॉसने विल्बर आपल्यावर सूड उगवतो अशी काहीशी मजेशीर धारणा या सॉसच्या नावामागे असावी.
बेक्ड पोर्टबेला मश्रुम्स, खांडवी आणि सांज्याच्या पोळ्या
या विकांताला घरी बेक्ड पोर्टबेला मश्रुम्स आणि त्याच मश्रुम्सची मसाला-ग्रेवी असलेला रस्सासुद्धा केला होता. दोन्ही अप्रतिम लागत होते. नेहमीच्या बटण मश्रुम्सपेक्षा हे अधिक चिवट व आकाराने चांगले वाटीसारखे मोठे असल्याने नीट मॅरिनेट करून बेक केल्यावर खत्तरनाक लागतात. या विकांताला हेच स्टफ्ड (खोबरे, चीज, डाळींबदाणे, टोमॅटो पेस्टो, आलं-लसुण-दही-हळदीचं बाहेरून मॅरिनेशन) प्रकाराने करायचा विचार आहे.
शिवाय आडवड्यात खांडवी आणि सांज्याच्या पोळ्या बर्याच दिवसांनी पोटभर हादडल्या!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बेक्ड मश्रुम्स मॅरिनेट करायला
बेक्ड मश्रुम्स मॅरिनेट करायला काय वापरले? स्टफ्ड मश्रुम्स साठी आलं-लसुण-दही-हळदीचं बाहेरून मॅरिनेशन असं लिहिलय, तेच वापरले होते का आणखी कोणते मसाले? काय तापमानाला बेक केले, का ब्रॉइल केले?
मी ग्रिल+बेक ऑप्शन वापरून
मी ग्रिल+बेक ऑप्शन वापरून ग्रीलसदृश बेक केले म्हणता यावे. माझ्या मायक्रोवेव्हमध्ये या ऑप्शनला तापमान सेट करता येत नाही फक्त H-1 H-2 असे दोन ऑप्शन्स दिसतात मी H-1 निवडून १०-१२ मिनिटे बेक केले होते.
मॅरिनेशनसाठी लसूण, मिरे, हळद, दहि, ताजे बेझिल चुरून, किंचित रोजमेरी असे मिसळले होते. त्यानंतर खातेवेळी प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार मीठ/चाट मसाला/सँडवीच मसाला (तयार मिळतो)/तसेच कोणतेही मीठ न घालता खाल्ले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लोणावळ्याच्या धुवांधार वादळी
लोणावळ्याच्या धुवांधार वादळी पावसात तिथली पेश्शल मका भजी..कांदा लसूण मसाला-लाल चटणी.. (शिवाय चीझ भजी आणि कांदा भजी यांचाही फडशा पाडला गेला. चहासोबत.) यावेळी हाडापर्यंत गोठवणारा थंड आणि झोडपणारा पाऊस आला होता. भिजून पुरते सुरकुतायला झाले.
श्री. दत्त स्नॅक्स
श्री. दत्त स्नॅक्स, खालापूर - मिसळपाव. दत्त स्नॅक्स ही जागा एकूणच उत्तम आहे चवीसाठी. साबुदाणा वडा आणि खिचडी लाजवाब.
दत्त दत्त!
दत्त दत्त!
दत्ताचा वडा
दत्ताची मिसळःअ
दत्ताची खिचडी
छ्या! एक्सप्रेसवे झाल्यापासून बरेच वर्षात जाणे झालेले नाही
काय जीवघेणी आठवण करून दिलीत हो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठाणे - पोखरण रोड नं.२ वर "धूम
ठाणे - पोखरण रोड नं.२ वर "धूम मचा दे" अशा अत्रंग नावाचे एक पानशॉप (बर्यापैकी मोठे पानभंडार) आहे. तिथले मीठापान अफलातून आहे. परवाच ही अशी पानं लावताना पाहून मोह पडला, म्हणून सहज खाल्ले आणि आता चटकच लागली संपूर्ण फ्यामिलीला..
तुळजापुर
तुळजापुरला गेल की खास सामिष भोजन ठरलेल .पंरपरागत पद्धतीने मटण ,ज्वारीची भाकरी मिळते . हे सगळ मिळत ते पण जर्मनच्या थाळीत .
खाऊन र्तुप्त
वाहवा, वाहवा, पंरपरागत
वाहवा, वाहवा,
पंरपरागत पद्धतीने मटण? म्हणजे कंदुरीचं की खास मराठा खानावळीचं?
खानावळ
तिथे खानावळी नाहित फारश्या .पुजारीच घरगुती बनवतात .फक्त माणस किमान 5 -10असावी
:ओ
पुजारी सामिष भोजन बनवतात? नेमकं कुठे?
राधिका
तुळजापुर
तुळजापुर जि:उस्मानाबाद
येथे देवीचे पुजारी/पा ळीकर / बडवे हे मराठा समाजाचे असल्याने सामिष चालते . सामिष भोजनाचा नैवेद्य मंदिरात ही जातो .
क्रमश :
क्रेशेंतीनी-मोर्तादेल्ला
बोलोन्यात क्रेशेंतीनी आणि सोबत मोर्तादेल्ला खाल्लं. क्रेशेंतीनी हे तळलेले ब्रेड असतात- भारतीय जिभेला न आवडले तर नवल वाटेल (बेळगावच्या आसपास मिळणार्या बन्सची आठवण झाली ते खाताना). मोर्तादेल्ला आधी कधी खाल्लं तेव्हा खूप आवडलेलं नव्हतं पण ह्या काँबिनेशन मध्ये एकदम आवडलं !
गोगलगाय आवल्डी!!!
बोर्श्त नामक युक्रेनियन सुप
इस्कर्गॉट [गोगलगय] इन गार्लिक बटर सॉस - मस्तच असते. ज्यांना मश्रुम आवडते त्यांना ही डिश आवडावी. फ्रेंच डिश आहे म्हणतात मग रशियन हटिलात कशी असे मी विचारले नाही उगा कोणी पुतीन, रासपुतीन भडकला असता.
एक मासा खाल्ला तो फार खास नव्हता, काहीतरी हर्ब्स व टोमॅटो अशी पेस्ट होती त्यात उकडला होता. नाव लक्षात राहीले नाही ओबोलान नामक युक्रेनियन व्हाईट बिअरच्या दुसर्या बाटलीचा लुफ्त लुटला जात होता.
गोगलगायी भारी दिसत आहेत.
गोगलगायी भारी दिसत आहेत. ताटलीशेजारी गोगलगाय ओपनर आहे का? बाहेरचे कवच फोडावे लागते का?
तपशील
तो 'ओपनर' नसून, खाताना गोगलगाय पकडून ठेवण्याचा चिमटा आहे. सोबत एक छोटा काटादेखील (फोर्क) आहे.
एका हातात त्या चिमट्याने गोगलगायीचे कवच पकडून ठेवायचे, आणि दुसर्या हाताने तो छोटासा काटा वापरून गोगलगायीचे मांस त्यातून उकरून काढावयाचे, आणि मटकावयाचे. (कवच फोडावे लागत नाही.)
एकंदरीत रोचक प्रकार. आयुष्यात एकदा तरी खाऊन पाहण्यासारखा.
(मात्र, एकदाच. फार फार तर दोनदा. हा प्रकार वारंवार खाणे खिशाच्या आरोग्यास घातक ठरू शकते.)
(अवांतरः 'इस्कर्गॉट' नव्हे. 'एस्कार्गो'. (चूभूद्याघ्या.))
तपशीलवार माहिती बद्द्ल
तपशीलवार माहिती बद्द्ल धन्यवाद. पहिल्यांदा लॉबस्टर खायची वेळ आली तेव्हा आडकित्ता टाइप उपकरण घेऊन जी झटापट करावी लागली होती ते आठवून कवचधारी प्राणी खायचा धसकाच घेतला आहे. गोगलगायी खाणं त्यामानानी सोपं वाटतय. एकदा जरी खायच्या म्हटलं तरी धष्टपुष्ट खिसा पाहूनच गोगलगायी खाण्याबद्दल ठरवेन.
फुटुवा लै भारी
फोटो आवडले. तोंपासु. तुम्ही काढलेत का?
बाय द वे, ते प्रिटी वूमनमध्ये ज्यूलिआच्या आडकित्त्यातून उडून कॅच होते ती हीच गोगोल-गाय नाय का हो?
बिर्यानी
घरच्याघरी बिर्यानी करून खाल्ली. कृती वाचून मला बिर्यानी अवघड आणि खूप व्यापाची वाटायची त्यापेक्षा कराताना खूपच सोपी/कमी कटकटीची वाटली- 'दम' वगैरे व्यवस्थित द्यायचा तर दोन तास तरी लागणार करायला. पण त्यात बराचसा वेळ नुसता थांबायचाच आहे. इथे कोणी अनुभवी बिर्यानी बनवणारे असतील तर टिप्स,अनुभव वाचायला आवडतील.
भेकर
आजच भेकराचं मटण खायला मिळालं. याला बर्यापैकी उग्र वास होता, पण ज्युसी होतं.
यानिमित्ताने मी मागील एका प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तिच्या विकीपेजवर जावं, तिथे उजवीकडील वरच्या कोपर्यातील चौकोनात त्या प्रजातीची ही माहिती दिलेली असते. तरीही एखाद्या प्रजातीचे प्राणी/पक्षी इतरत्र टिकून असले तरी भारतातून नष्ट होत असतील तर ते कसे कळेल, पोचिंगचा हंगाम कोणता हे कसे कळेल असे प्रश्न उरतातच.
राधिका
इतालियानो.
खूप दिवसांनी भेटलेल्या स्नेह्यांच्या स्वागताप्रित्यर्थ बनविलेल्या शाकाहारी इतालियन मेजवानीचे काही फोटू. यात मुख्य पास्ताचा फोटो घेण्याचा विसरले (बहुतेक तोपर्यंत बहुधा 'कियांती क्लासिको' जास्त झाली होती
सुरवातीला ब्रुस्केटा / ब्रुशेटा
पालक - रिकोटा न्यॉक्की
तिरामिसू
रिकोटा न्योकी कधी खाल्ली नाही
रिकोटा न्योकी कधी खाल्ली नाही पण पाहून तोंपासु
जीवघेणा प्रकार आहे हा! रुची,
जीवघेणा प्रकार आहे हा!
रुची, याचीही शिकवणी होऊच द्या, विषेशतः तिरामिसूसाठी! माझा आतापर्यंत खाल्लेल्यापैकी सर्वात आवडत्या डेझर्टसपैकी एक! प्रचंड आवडतो!
घरी बनवायचा प्रयत्नही केला होता, ठिकठाकच झाला होता पण "ती" मजा नव्हती. आता तुमची रेसिपी (तिनही पदार्थांची) एकदा (वेगवेगळ्या धाग्यांत) येऊच द्या!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तिरामिसु अप्रतिम दिसतेय.
तिरामिसु अप्रतिम दिसतेय. माझे सगळ्यात आवडते डेझर्ट! सुदौवाने बायकोला हे अप्रतिम करता येते, पण पोटाचा व्यास वाढतोय म्हणून घरी जरा कमीच होते!
-अनामिक
मस्त !
१. कियांती !! ;;)
२. न्योक्की सोबतचा सॉस कसा बनविलात ?
न्योक्की सॉस.
मला या प्रकारच्या न्योक्कीबरोबर सॉस आवडत नाही. मी फक्त त्यावर ताजं कढवलेलं तूप भरपूर घालून वाढते.
आँ!
अहो पण बेत इटालियन होता म्हणालात नं!!
-Nile
म्हणजेच ब्राऊन बटर.
अहो, पाश्चात्य जगात त्यालाच ब्राऊन बटर सॉस म्हणतात!
क्लॅरिफाईड!
for butter as well as for the doubter
व्हाईट्फिश लिव्हर
काल "मॅडेलिन आयलंड" वर गेलो होतो. पहील्यांदा "व्हाईट्फिश लिव्हर" खाल्ले. प्रचंड आवडले. काय रुचकर लागतात ती लिव्हर्स (= यकृत?). माशाचे यकृत एवढे टमटमीत असेल तर मासे नक्कीच धष्टपुष्ट असणार. आंजावरुन हा फोटो मिळाला.
http://www.flickr.com/photos/rabidscottsman/7160830077/
सुरळीच्या वड्या घरच्या घरी
सुरळीच्या वड्या घरच्या घरी
मोहरीची फोडणी
वरून मोहरीची फोडणी नाही दिसत ती ? की फक्त आत सारणातच घालता ?
चतुर तुम्ही, फोडणी सारणातच
चतुर तुम्ही, फोडणी सारणातच संपली, नविन करुन घालेपर्यंत खाणार्यांना वेळ नव्हता त्यामुळे बिना-फोडणीची वडी फोटोत आली.
सेविचे आणि ऑयस्टर्स्
अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर रेहोबोथ, अॅसटीग् आणि हेन्लोपेन् या समुद्रकिनार्यांवर जाणे झाले. त्यामुळे जलचर खाणे आले.
--
'सेविचे' हा पेरू देशातून आलेला प्रकार. ताज्या माश्याचे छोटे तुकडे हे लिंबू, आले, कोथिंबीर यांच्या मिश्रणात कच्चेच मुरवतात.
नुसते तुकडे उचलून खायचे. अतिशय ताजे मासे असतील तरच हा प्रकार मस्त लागतो.
--
ऑयस्टर्स (मराठीत - कालंव) हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला. एका ताटलीत बर्फ आणि पाण्याच्या मिश्रणावर हे शिंपले आणि त्यातले ते गुलगुलीत जीव पुढ्यात आल्यावर मि. बीन्सचा फ्रेंच रेस्तराँमधील प्रसंग आठवून अंगातून एक शिरशिरी येऊन गेली :).
सोबत किंचित तिखट सॉस आणि मिरे-लिंबू दिलेले असल्याने थोडे हायसे वाटले.
तो जीव शिंपल्याला केवळ एका स्नायूने बांधलेला असतो, तो प्रथम हलकेच काट्याने शिंपल्यातच अलग करायचा.
मग सॉस्, मिरे, लिंबू त्या गुलगुलीत जीवावर शिंपडून शिंपला ओठास लावून डोके मागे नेत गट्टम् करायचा. चावत - चघळत बसणे वगैरे करायचे नसते. फक्त किंचित वेळ तोंडात ठेवून एकदम गट्टम्.
त्याची स्वतःची चव अशी काही फारशी कळली नाही. गारेगार असेल तरच चांगले लागेल असे वाटले. पण पुन्हा मागवायला हरकत नाही असे ठरविण्याइतपत प्रकरण आवडले !
अमुकराव, प्रकर्ण बहुत रोचक
अमुकराव, प्रकर्ण बहुत रोचक दिस्तंय. पण गिळगिळीत काही खाण्याबद्दल पूर्वग्रह असल्याने कधी ट्राय करेन की नाही माहिती नाही.
बाकी नुकताच माकुलं ऊर्फ स्क्विड खाण्याचा योग आला. कैतरी असेच मिळेल असे वाटले होते तस्मात फ्राय मागवला तर चक्क रिंगा आल्या. स्क्विडची रचना पाहता त्या रिंगा कशा बनल्या असतील ते काही केल्या कळेना.मग विचार करणे बंद करून हादडले. काहीसा उग्र वाटणारा वास होता आणि चावायला जरा जास्त लागले. तरी नॉट बॅड.
खाण्याचे ठिकाण: हाटेल मासेमारी, टिळक रोड, पुणे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पूर्वग्रह सारून ट्राय करायचा
पूर्वग्रह सारून ट्राय करायचा प्रयत्न कर असे सुचवेन.
मला एकूणातच सी-फूड अत्यंत आवडतेच, त्यात हे असले विविध प्रकार म्हंजे पर्वणीच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माकुलं = कालामारी
स्क्वीडचे हाटलांतले अधिक प्रचलित नांव 'कालामारी' असे आहे. मी त्या तळलेल्या कालामारी बांगड्या खाल्या आहेत. तुम्ही म्हणता तसे उग्र वास अआणि थोड्या चिवट होत्याच. त्यामुळे पसंतीस आल्या नाहीत.
माकुल्याचे डोके ओढून काढून बाकीचे साफ केलेले शरीर म्हणजे एक पोकळ नळीच असते. त्या नळीचे काप केले की झाल्या बांगड्या.
संपूर्ण साफसफाई इथे पाहायला मिळेल.
अच्छा तसंय होय? आत्ता लक्षात
अच्छा तसंय होय? आत्ता लक्षात आलं , धन्यवाद अमुकराव
@ऋषिकेशः नक्की ट्राय करतो!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विकांताला केसवसुमारांच्या
विकांताला केसवसुमारांच्या रेसिपीनुसार (दुवा शोधुन देईन) स्पॅनिश ऑमलेट केले होते ते खाल्ले. चवीला, दिसायला अतिशय चांगले झाले होते (स्वतःची पाठ थोपटणारी स्मायली असे काय हो? तुर्तास :-B ही चालवून घ्यावी
(फोटो येऊ घातला आहे )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्पॅनिश ऑम्लेट्
पॅनमधले ते जड ऑम्लेट् हवेत उडवून परत पॅनमध्ये उलट्या बाजूवर झेलले असलेत तर आमच्याकडून पाठ थोपटून मिळेल ;).
अस्सल स्पानियार्ड उलथनं वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत. अपना पॅन जगन्नाथ !
(अरे हो ! धनंजय यांच्या या चित्राची उकल आत्ता झाली ! )
रेशिपी
आम्ही त्याहून 'इस्मार्ट' आहोत (केसुंची कृपा)
ओव्हन मध्ये केले होते
हा घ्या रेशिपीचा दुवा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'अॅपल पाय'
विकांताला 'अॅपल पाय' चा प्रयोग झाला. फार मोठ्या आकाराचा बेस मला लाटता येत नसल्याने पाऊण पोलपाटाइतका बेस लाटून, 'पाय'ला करंजीचा आकार दिला होता.
मात्र पाय अतिशय खुसखुशीत व कव्हर मस्तच जमले होते. आतील सफरचंदाचा पोतही जमून गेला होता. मात्र सफरचंदे किंचित आंबट लागत होती गोडवा वाढण्यासाठी अजून काही टाकतात का? (मी फक्त सफरचंदाचे कापच स्टफ केले होते) पुढच्या वेळी केळी + खोबरे असे पाय करणार आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वा वा गुरु.. "पाय"च धरले
वा वा गुरु..
"पाय"च धरले पाहिजेत तुमचे..!!
गोडीचा पायगुण
आवडीनुसार पिठीसाखर, गुळाची पूड किंवा 'डेमेरारा शुगर' घालता येते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मी उदरभरणाचे सर्व धागे वाचले
मी उदरभरणाचे सर्व धागे वाचले नाहीत, त्यामुळे यावर आधीच चर्चा झाली असल्यास क्षमस्व.
काल पुण्यात लक्ष्मी रोड वर "जनसेवा" बंद पाहिले. मावशीने नंतर सांगितले की ते अलिकडेच कायमचे बंद झाले. ऐकून वाइट वाटले. बंद होण्यास कारण काय होते कोणाला माहित आहे का?
आणि हे रेस्टॉरंट बद्दल नाही, पण आज नीलायम टॉकीज शेजारचे "पाथफाइंडर" पुस्तकांचे दुकानही "काही अनिवार्य कारणांमुळे" बंद असलेले पाहिले. हे कायमचे का थोड्याच दिवसांसाठी, या बद्दल ही कोणाला माहिती आहे का?
ऑन टॉपिक: आज कर्वे रोडवर "दुर्गा कॅफे"त मस्त पोहे आणि कोल्ड कॉफी घेतली. काल कुमठेकर रस्त्यावरच्या स्वीट होम मधे बटाटावडा-चटणी. म्म्म्म्म्म्म्म्म.
जनसेवा बंद???????????? एकदाच
जनसेवा बंद????????????
एकदाच गेलो होतो पण चव लै आवडली होती. औघड आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जनसेवा
जनसेवा बंद होऊन काही काळ लोटला. लक्ष्मी रस्त्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी स्वस्तात घरगुती चवीचे खाद्यपदार्थ देणं पुरेसं फायदेशीर राहिलं नसावं असा अंदाज आहे. तिथे येणारं गिर्हाईक जास्त पैसे काही देणार नाही आणि पदार्थ मात्र त्याच चवीचे मागणार. गेल्या काही वर्षांत अन्नधान्याच्या किमती पुष्कळ वाढल्यामुळे हा तिढा सुटणं कठीण झालं असावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पाथफाइंडर
खरंय. लक्ष्मी रस्त्याच्या बदलत्या फॅशन्स बरोबर तिथे येणार्या खवैय्यांच्या आवडी-निवडी ही बदलल्या असतीलच. पण खरेदी झाल्यावर नीट बसून थोडेफार खायला-प्यायला लक्ष्मी रस्त्याच्या त्या भागात ते एक चांगले ऑप्शन होते. नाहीतर तुळशीबागेतले "अगत्य" किंवा कुमठेकर रस्त्यावरचे स्वीट होम.
या धाग्यात फार अवांतर होत नसेल तरः पाथफाइंडार ही कायमचेच बंद झाले आहे असेच आज ऐकले. या मागे काय कारण होते या बद्दल माहिती आहे का?
जे आवडते सर्वांना...
बुकगंगा-फ्लिपकार्ट वगैरेच असावेत. बंद होण्याआधी काही दिवस खरेदीदार कमी झाल्याचं जाणवत होतं. त्यांचा ग्राहकवर्ग उच्च मध्यमवर्गीय दिसे. तो मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदीकडे वळला असावा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भगत ताराचंद हाही एक ऑप्शन
भगत ताराचंद हाही एक ऑप्शन चांगला आहे आणि अजून सुरू आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भगत ताराचंद मधे जेवणावळ आहे,
भगत ताराचंद मधे जेवणावळ आहे, सटरफटर खाता येत नाही. स्वीट होमचा वरचा भाग बंद झाला होता, खालचा फक्त चालु होता, सद्य परिस्थिती माहिती नाही. तसंही स्वीट-होम, जनसेवा ही खास उद्धट लोकांनी सामान्यांसाठी चालवलेली रेस्टारंटे आहेत.
पाथफाइंडर मुळात जरा आडबाजूला होतं, तिथे जाणं म्हणजे वेशीबाहेरच्या मारुतीला जाण्यासारखं होतं.
कुमठेकर रोडवर 'चैतन्य' ठीक आहे, किंवा तुळशीबागेतलं 'अगत्य', कुंटे चौकातून रमणबागेत जाताना पत्र्या मारुतीच्या जवळच बेडेकर मिसळ आहे, किंवा लक्ष्मी रोडवर गणू शिंदे आईस्क्रीमवाला आहे.
बाकी ठीक, पण पाथफाइंडर मुळात
बाकी ठीक, पण
ही टिपिकल ओल्डस्कूल पुणेरी प्रतिक्रिया वाचून मजा वाटली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भगत ताराचंद मधे जेवणावळ आहे,
हाहाहा, अगदी सहमत!! मला भगत ताराचंद कायकी आवडले नाही.
मी बिबवेवाडीहून जात असे, त्यामुळे मला पाथफाइंडर सोईचं पडे. त्यांचे लहान मुलांचे सेक्शन मस्त होते. साधना वगैरे अगदीच गाव पार करून पलिकडे गेल्यासारखं होतं. तरी शनिवार वाड्यापर्यंत एक सरळ बस आहे म्हणा, तिचा फायदा घ्यायला हवा. कुणी "अक्षरधारा" सुचवलं, त्याचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. कसं आहे काही कल्पना आहे?
गणू शिंदे आइस्क्रीम चांगलेच आहे. मला मिसळचे फारसे आकर्षण नाही, पण पत्र्यामारुती चौकातली भेळ आवडते. कुंटे चौकातला डावणगेरे दोसाही बरा असतो. अगत्य चांगले आहेच; चैतन्यला भेट द्यायला हवी.
कुणी "अक्षरधारा" सुचवलं,
हा बहुदा बाजीराव रोडच्या आचार्य अत्रे सभागृहात लागतो तो प्रदर्शन-कम-दुकान प्रकार आहे, लोकप्रिय साहित्यातील बरीचशी पुस्तके एका भेटीत पाहिल्याची स्मरत आहेत.
"अक्षरधारा" हे अतिशय सुंदर
"अक्षरधारा" हे अतिशय सुंदर 'पुस्तकांचे दालन' आहे. छोट्याश्याच जागेत पण खूप छान मांडणी आणि 'इंटेरियर' केलं आहे. अत्रे सभागृह ही वेगळी जागा आहे आणि अत्रे सभागृहाच्या समोर अक्षरधारा आहे. अक्षरधारा नुसतेच पुस्तकांचे दुकान नसुन त्यांचे खूप चांगले उपक्रम देखील असतात, जसे - पुस्तकांचे प्रकाशन, लेखकांशी चर्चा/संवाद घडवून आणणे ई. ई. कामे अक्षरधारा खूप उत्साहाने करते. सोनाली कुलकर्णी (व्हाईट लीली) अक्षरधाराची 'ब्रँड अम्बेसिडर' आहे
जमल्यास 'अक्षरधारा' ला जरूर भेट द्या!!!
अक्षरधारा
अक्षरधारा हा चांगला पर्याय आहे. मुलांच्या विभागाबद्दल बोलण्याची मात्र माझी पात्रता नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पाथफाइंडर!!!
मी पुण्यात असतांना पाथफाइंडरला बरेच वेळा जायचो. अगदि आडबाजूला असले तरी (सारसबागला गणपतीचे दर्शन घ्यायचे मग इथे यायचे!). मराठी पुस्तकांसाठी नीट बसुन पुस्तके चाळता येतील असे ते पुण्यातले (माझ्या माहितीप्रमाणे) एकमात्र दालन होते. तिथुन बरीच खरेदि केलेली आहे. पण सवलत देतांना मात्र कुरकूर करायचे. १०% ट्क्क्याच्या वर नाहि.
त्याचवेळी जाणवले होते की "price war" मधे हे दालन टिकणार नाहि. कारण रसिक/ज्ञानगंगा वाले १०-३०% सवलत द्यायचे, तेव्हा अतिरिक्त सोयींसाठी "सामान्य" ग्राहकाने जास्त पैसे मोजावे हे समीकरण (स्पर्धात्मक दृष्ट्या) थोडे चुकिचे वाटले. वर म्हटल्याप्रमाने उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी (एकदा जब्बार पटेल तिथे दिसले होते!) हे समीकरण ठिक होते पण फक्त त्यांच्या जोरावर (मराठी) पुस्तंकांचे दालन चालवणे धाडसी होते. असो. बंद पडल्याचे ऐकुन वाईट वाटलेच. असो. काळाच्या ओघात हे सगळे चालायचेच!
सध्या तर बुकगंगा हा एक उत्तम पर्याय आहे. आणी मुख्य म्हणजे एक मराठी माणुसच ह्या उपक्रमामागे आहे ह्याचा आनंद वाटतो.
पिझ्झा
विकांताला पिझ्झा केला होता. आता बेस उत्तम जमू लागले आहेत.
पिझ्झा करताना चीझ वितळते आनि मग घट्ट होते काहिसे भाज्लेही जाते मात्र त्यामुळे पिझ्झा कोरडा रहातो. (खाली जो सॉस-बेस असतो तोही कोरडा होतो).
बाहेरचा (विकतचा) पिझ्झा मात्र दमट - सॉस ओला - असतो, चीज वितळलेले असते, ते कसे जमत असावे? कोणाला काही कल्पना?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आर्द्रता
ह्याचा अर्थ भट्टीत आर्द्रता कमी पडते आहे. उपाय (एकाहून अधिक एकाच वेळीसुद्धा वापरून पाहता येतील) -
१. कन्व्हेक्शन भट्टी असली तर कन्व्हेक्शन वापरून पाहा.
२. तापमान थोडं कमी ठेवून पाहा.
३. भट्टीत एखाद्या छोट्या वाटीत पाणी ठेवून पाहा.
४. पिझ्झा भाजला जात असताना अधूनमधून भट्टीत पाणी स्प्रे करा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आभार!
१. क्नव्हेक्शनच वापरतो.
२. तापमान वेगवेगळ्या स्तरावर ठेऊन बघितले आहे
३. ट्राय कितपत करता येईल शंका आहे मायक्रोवेव्ह मध्ये तशी वेगळी जागा नाही
४. हे ट्राय करतो
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आणखी एक उपाय
भरपूर पाणी असलेली एखादी भाजी भट्टीत पिझ्झासोबत ठेवून पाहा. उदाहरणार्थ टोमॅटो, अळंब्या. नंतर अर्थात पिझ्झाबरोबर खाता येईल ते वेगळंच. मात्र, भाजीला जे पाणी सुटेल ते सांडणार नाही ह्याची काळजी घ्यायला लागेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आताच रुचीची पिझ्झा पाककृती
आताच रुचीची पिझ्झा पाककृती वाचली. त्यावरुन असेच हवेत तीर मारतेय
सॉस बेससाठीचा सॉस जास्त प्रमाणात लावला किँवा जास्त पातळ ठेवला तर चालेल वाटतय.
स्मरणरंजन (किंवा नव्वदीच्या दशकातल्या भयाण आठवणी)
भारतीय वाणसामानाची खरेदी झाल्यावर फार भूक लागली होती म्हणून अचानक 'लाजवाब' नावाच्या एका स्थानिक भारतीय रेस्टॉरंटमधे काही विचार न करता घुसलो. मेन्यूकार्डावर 'पनीर नगीना' आणि 'तिलमिल झिंगा' वगैरे पदार्थ पाहून विचार बदलावा की काय असे वाटत होते पण स्वयंपाकघरातून येणारे वास आणि लागलेली भूक यांच्या गणितामुळे थांबलो. मागवलेले चिकन, पनीर वगैरे पदार्थ अपेक्षेप्रमाणेच अतिशय तेल सुटलेले आणि मसालेदार होते पण चवी एखाद्या चांगल्या धाब्यावरच्या जेवणाची आठवण करून देणार्या होत्या. पदार्थांचे वास, रंग, हात साबणाने धुतल्यावरही हातावर राहिलेला केशरी रंग वगैरे गोष्टी पार भूतकाळात घेऊन गेल्या. यासगळ्याबरोबरच तिथे लावलेली गाणी तर अगदीच नव्वदीच्या दशकातल्या आठवणी उकरून गेली. आशिकीतल्या "धीरे धीरेसे मेरी जिंदगीमे आओना..." पासून सुरवात होऊन ते "मैने प्यार तुम्हीसे किया है" वगैरे वगैरे भीषण सुरावटींनी आम्हाला अगदी घेरून टाकले. बाहेर पडल्यावर आपण भारतात नाही आहोत हे जाणविल्याने आणि गाडीच्या आरशात पाहिल्यावर आपण नव्वदीच्या दशकात नाही आहोत हे उमगल्याने आम्ही वास्तवात परतलो.
स्मरणाचा उत्सव जागवून...
पैसा, करिअर, उच्च स्तर ह्या अस्थिर भौतिक गोष्टींच्या मागे हात धुवून लागलो तरी हे मूळचं 'रंग दे बसंती' अस्तर मात्र कुठलाच परदेशी साबण धुवून टाकू शकत नाही! परतताना कॅमरीत 'चिठ्ठी आयी है' ऐकावं, घरी येऊन सकळ मुक्तपीठांवर ह्या साबणचमकदार वाक्याने सुरू होणारं अस्फुट स्फुट टाकावं आणि मग निवांतपणे त्यावरच्या हृदयंगम प्रतिक्रिया वाचाव्यात - म्हणजे ही एनारायांची नव्वदोत्तर अनुभूती पूर्णत्वास जाते
एनारायांची नव्वदोत्तर
हे सगळ्यात जास्ती आवडलं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पर्याय
त्याऐवजी, खास देशातून आयात केलेला (नि हात धुण्याच्याच लायकीचा) 'लाइफबॉय' वापरला, तर उपयोग होईल काय? नाही म्हणजे, जिथे 'मैल में छुपे कीटाणुओंको धो डालू' शकतो, तेथे कदाचित 'रंग दे बसंती' अस्तर धुवून टाकू शकणार नाही काय?
हल्ली कोठे व काय खाल्ले
आज सकाळी घरी उकडलेले अंडे खाल्ले.
पुन्हा खाईन तेव्हा फोटो* काढून अवश्य डकवीन.
==================================================================
* अंड्याचा.
वा!
वा!
फोटो व्यतिरिक्त ते अंडे कोणत्या जीवाचे होते? कोंबडीचे असल्यास ते उकडल्यावर अधिकची चव यावी म्हणून त्यावर काही भरभुरले का? काय भुरभुरले? पिवळे बलक खाल्ले का? नसल्यास त्याचे काय केले? अंड्यांना सर्व्ह करतेवेळी (सजवले असल्यास) कसे सजवले होते? सोबतीला कोणते पेय होते? श्रावणमासात खाल्लेल्या अंड्यांची चव वेगळी लागते का? इत्यादीवरही प्रकाश टाकता येईल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋ +१
.. सहमत..
..शिवाय ही पाककृती (तिच्यामधे.. स्वतः नव्हे) अंडे न घालता कशी करता येईल हेही सांगता येईल..
हवा
आज सकाळी हपिसात येताना खिडकीत बसून हवा खाल्ली.
पुन्हा खाईन तेव्हा फोटो* काढून अवश्य डकवीन.
==================================================================
* हवेचा
चला! पुढल्या पाक्षिक
चला! पुढल्या पाक्षिक स्पर्धेचा विषय "हवा" ठेवावा असे सुचवतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गेले कैक दिवस रोज दुपारच्या
गेले कैक दिवस रोज दुपारच्या जेवणासाठी रेड्डीज् आन्ध्रा मेस इथे जातो आहे. १ भाजी, १ चटणी, पालक घातलेली डाळ, २ चपात्या, आणि सांबार, रसम आणि दही विथ राईस. चपाती सोडल्यास सर्व आयटम अनलिमिटेड. सर्व मिळून ७०/- ला पडते प्रकरण. सोबत काही उत्तर भारतीयही तितकेच दाबून हाणत असतात. व्हॅल्यू फॉर मनी जबरी आहे. कधीमधी सांबार गंडते, रसम बंगळूरू-हैड्रबॅड-मॅड्रस च्या तोडीचे नसते. पण सांबारातल्या दुधीभोपळ्याच्या फोडी हा तिथल्या चवीचा उत्कर्षबिंदू आहे. पुण्यात राहून सौथची बर्यापैकी मजा मिळते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुठेशी आहे ते सांग की
कुठेशी आहे ते सांग की मेल्या.
बाकी ऑन द सेम लाईन्स, आंध्रा नव्हे पण तामिळ अत्युत्कृष्ट आणि पोटभरीच्या खाण्यासाठी तंबी (स्पेलिंगनुसार थंबी) हे हाटेल चांदिवली गावठाण, चांदिवली फिल्म स्टुडिओपासून सुमारे दोनशे मीटर्स अंतरावर मुंबई येथे आहे. रस्समपासून ते सर्व प्रकारच्या भातांपर्यंत सर्वकाही टेसदार आणि बर्यापैकी वरिजिनल. आठवड्यातल्या प्रत्येक दिवसाची एक स्पेशालिटी (पॅकेज). थाळी सिस्टीमही हवी असल्यास आहेच.
http://www.zomato.com/mumbai/thambi-chandivali
शिवाय यांचीच शाखा कुर्ला, माटुंगा आणि घाटकोपरलाही आहे असं दिसतं.
वा सहीच! मुंबैला आलो की हे
वा सहीच! मुंबैला आलो की हे ट्राय करण्यात येईल.
मी म्हणालो ते रेड्डिज मेस मगरपट्ट्यातल्या डीशी ऊर्फ डेष्टिनेशन शेंट्रात आहे. तिकडे २-३ आहेत, त्यापैकी मी जातो ते माँजिनीज च्या लाईन मध्ये आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद्स..
...घे तुला "माहितीपूर्ण" दिली...!!
बाकी पुण्यात अस्सल मटणाच्या (किंवा मटणाच्या अस्सल) अशा काही खानावळी आहेत असं फार वर्षांपासून कोणाकोणाकडून ऐकलं आहे. पण प्रत्यक्ष कधी सापडली नाही. कोणाला नेमका पत्ता ठाऊक असेल एखाद्या जुन्याश्या खानावळीचा तर कळवणे. समुद्र, कोल्हापूर , सुगरण अशा नावांची नेहमीची नॉनव्हेज हॉटेल्स नव्हे. खानावळी.. (मटणरस्सा, गरमागरम भाकरी किंवा मजबूत आकारच्या चपात्या - पोळ्या नव्हेत - अन कांदा अशा मोजक्या पदार्थांनी पुरता ऑर्केस्ट्रा सजवणारी)
ऐला, एकदम कोल्लापूर ष्टैल?
ऐला, एकदम कोल्लापूर ष्टैल? विचारून शोधून पाहतो, मी अर्थात हे कधी ऐकलंही नाही म्हणा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सदाशिव पेठेत मटण
भरत नाट्य मंदिराकडून टिळक स्मारक मंदिराकडे जाणारा बोळ पाहा. तिथे अशा काही खाणावळी आहेत. शिवाय आवारे लंच होम प्रसिद्ध आहे - कुमठेकर रस्त्याच्या लकडी पूल बाजूकडून शनिपाराकडे चालू लागलात तर उजवीकडे लागतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्या बोळात तर साधीसुधी
त्या बोळात तर साधीसुधी हाटेलेच लै आहेत. दर्जाबद्दल अर्थातच कल्पना इल्ले. पण मालवणच्या कालवणात एकदा गेले पाहिजे. आवरे लंच होमची खूणही लक्षात ठेवल्या गेली आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बरोबर
आणि अलका टॉकीझकडून पेठेत जाणाऱ्या रस्त्याकडे पण काही आहेत.. नावं आठवत नाहीयेत पण नेहमीचाच अड्डा होता तिकडे...
अलकाला डबडे (नावासकट डब केलेले शिणेमे, पृथ्वीका सर्वनाश ष्टैल) पाहून तिकडेच खाऊन भटकंती करायचो.
अजून थोडं पश्चिम महाराष्ट्रात आलात तर साताऱ्यात मराठा बहार म्हणून उत्तम खानावळ आहे, दणकट चपात्या आणि गर्दीची वेळ सोडल्यास कडक भाकरी !!! व्हेज मध्ये काय आहे असं प्रश्न विचारल्यास मालक, ज्याला फक्त भूतदया म्हणता येईल अशी एक नजर टाकतो.. कोल्हापूर हायवे वर लागणाऱ्या कणसे धाब्याचे बरेच मंडळी फ्यान आहेत पण मला तिथले विशेष आवडले नाही. (कदाचित वातावरणामुळे असेल, रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकलं नाहीये अजून. एक ट्राय बंता है.). वरच्या रस्त्यावर हॉटेल मानस आणि सुर्वे प्युअर नॉनव्हेज पण चांगली आहेत.
शंका
यास 'माज' म्हणावे, किंवा कसे?
उत्तम माहिती. बादवे खुद्द
उत्तम माहिती. बादवे खुद्द कोल्लापुरात पद्मा गेस्ट हाऊस नामक हाटेलातले मटन ताट लै जब्री लागते-तांबडा अन पांढरा हे दोन्ही रस्से उत्तम. मटनाची गिरवीसुद्धा खासच-यद्यपि मटनाचे तुकडे फार थोर नसत लागले तरी-कदाचित चिकन उत्तम लागत असेल. हे हाटेल मेन कोल्लापुरात एका थेटरजवळ आहे-बहुतेक उर्मिला/पद्मा असे काहीसे नाव आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आहा!
कोल्हापुर फॅन बघुन बहुत आनंदु जाहला, कोल्हापुरातल्या त्या चौकात पाच थेटर आहेत. रोयाल, शाहू, पद्मा, प्रभात आणि अयोध्या. मिरजकर तिकटी कडून खाली बिन्दुचौक आणि अजून खाली आलो की समोरच पद्मा दिसतंय. पद्माच्या खालीच एक हॉटेल होते (बहुदा सम्राट) त्यात मासा लई लई जबरी मिळालेला.
पद्माची अजून एक ब्र्याञ्च आहे. कोल्हापुरातील अजून काही आवडती म्हणजे हॉटेल ओपल,
"शेतकरी" धाबा फुले वाडी रोडला
"रवितेज" शाहू ब्यांकेजवळ (मिरजकर तिकटी)
"दौलत" लेटेस्ट तालीम जवळ (नाव आहे हे पण तालमीचे , अन याच्या जवळची न्यु हायस्कुल माझी शाळा!)
"नक्षत्र" जकात नाक्याजवळ
"नुपूर" स्टेशन रोडला
नवी बाजु शेठ, माज कसला हो त्यात. उगाच गझल,कव्वलीवाल्याला भावगीत म्हणायला सांगीतल्यासारखं होतंय ते म्हणुन.
जबरी सजेशन्स! यांपैकी मी ओपल
जबरी सजेशन्स! यांपैकी मी ओपल ला लै वर्षांपूर्वी एकदा गेलेलो आहे. बाकीचे ट्राय करायला पाहिजे. एवढ्यात गेलो कोल्लापुरात तं नक्की करतो ट्राय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मराठा बहार!
म्हणजे पोवई नाक्यावरचे का? त्याचे नाव पुर्वी "मराठा लंच होम" असे होते का?
इथे १९९८-१९९९ मधे ८-१० वेळा जेवलो आहे. जेवण एकदम झकास (१+++++++) आणि मालक एकदम अगत्यशील होते. मटण थाळी मधे मटण रस्सा, भाकरी, एक वाटी चरबी टाकलेला झणझणीत रस्सा आणि मटण पुलावा मिळायचा. आमच्यात एखादा दुसरा शाकाहारी असायाचा त्याला खास मटकी रस्सा मिळायाचा तो पण लय भारी असायचा!
व्हय, पवै नाक्याचंच!
आत मध्ये "अरविंद राजा लंच हॉल" लिहिलंय. अन् आशा भोसले अन् उदयनराजे बरोबर मालक उभा आहे असे फोटो लावलेत.
जुनं नाव मला नाय सांगता यायचं. नवीन नाहीये इतकं नक्की सांगू शकतो.
हॉटेल नागपुर
पेरुगेट कडुन टिळक रस्त्याकडे जातांना उजव्या बाजुला लागते. एकदम झकास आहे. मर्यादित प्रकार असतात आणि ते पण लवकर संपतात. जागा इतकी छोटि आहे कि भिंतीकडे तोंड करुन बसावे लागते. पण चव अप्रतिम आहे.
समोरच "रस्सा - जस्सा पाहिजे तस्सा" आणि "मालवणच कालवण" आहे. ठिकठिक आहेत.
मॉडर्न कॅफे, शिवाजीनगर, पुणे
मॉडर्न कॅफे, शिवाजीनगर, पुणे इथे नीर दोसा आणि चटणी-सांबार, अॅज नाष्टा. चटणी हा उत्कर्षबिंदू म्हणावा लागेल. खोबरे-चिंच-मिरची इ. घटक असलेली लालसर रंगाची चटणी, आंबटपणा आणि तिखटपणा या दोन्ही चवींचे परस्पर प्रमाण अगदी नेमके असल्यामुळे जबरी मजा आली- दोन प्लेटी भरून नीर डोसे हादडल्या गेले. साला तोपर्यंत मॉडर्न क्याफेत हा आयटम मिळतो याचा आम्हाला पत्त्यापण नव्हता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एथ्निक किचन
अलीकडेच कालिना मार्केट, सांताक्रुज येथील एथ्निक किचन येथे जाऊन आलो. तेथे चायनीज पदार्थांखेरीज काही मराठी पदार्थ मिळतात. त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासींचे पदार्थ मिळतील असा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात तेथे तांबडा रस्सा, सावजी चिकन, सागुती आणि काही कोकणी आणि काही आग्री पदार्थ मिळतात. सागुती चांगली होती, अस्सल होती का ते सांगता येणार नाही. सावजी चिकन मात्र अस्सल नागपुरी सावजी पाककृतीच्या जवळ जाणारी होती असे आमच्यातल्या एका नागपुरी मित्राचे मत पडले. याखेरीज तिथे मिळणारा खर्डा निव्वळ अप्रतिम, मस्त तिखटजाळ होता.
सुवैशिष्ट्ये:
१. तेथे तांदळाच्या आणि बाजरी की नाचणीच्या भाकर्या मिळतात.
२. किंमती तशा बर्या आहेत, माणशी १६० रु. इतके बिल झाले.
३. तेथे केवळ हलाल चिकन मिळते, त्यामुळे तशी अट असलेल्यांना तेथे नेता येते.
दुर्वैशिष्ट्ये:
१. तेथे मटण अजिबात ठेवत नाहीत, त्यामुळे केवळ मटण खाणार अशी अट असलेल्यांना तेथे नेता येत नाही. (हो, अशीही अट असते.)
२. भात कैच्याकै महाग आहे.
३. आम्ही बांबू शूट्स घातलेले चायनीज सूप मोठ्या आनंदाने ऑर्डर करायला गेलो, तर त्यांच्याकडे बांबू शूट्सच नव्हते. काही मासे नसल्याने, माशांचे काही पदार्थही घेता आले नाहीत. शिवाय जे मासे उपलब्ध होते, त्यांचे पदार्थ महाग होते.
एकुणात अनुभव तसा चांगला होता. आग्री पदार्थ खायला परत वेगळे जाऊच.
राधिका
घरगुती मणिपुरी जेवण
काही दिवसांपुर्वी एका मणिपुरी जोडप्याकडे जेवण्याचा योग आला. त्यांनी आम्हाला खास त्यांच्या जमातीच्या पद्धतीचं जेवण खाऊ घातलं. वाफवलेल्या शेंगा (कसल्या ते माहीत नाही), बटाटे घालून केलेलं बीफ, बांबू शूट्स घालून केलेलं पोर्क (हे भन्नाट होतं) आणि भात होता. सोबत तोंडीलावणं म्हणून एक प्रकार केला होता तो असा: नरी नावाचा सुकवून फर्मेंट केलेला मासा हा सुकवलेल्या लाल मिरचीच्या तुकड्यांसोबत कुटला आणि त्यात मीठ आणि बारीक चिरलेली ताजी मेथी घातली. याला मेलामे का काहीतरी म्हणतात. या पदार्थात नरी+मिरची हे मिश्रण कॉन्स्टंट असतं आणि त्याच्यासोबत कोणतीही हिरवी पालेभाजी मिसळली जाते. मला हा पदार्थ मेथीमुळे आवडला नाही. त्याच्याजागी दुसरी कोणतीतरी भाजी घालून पुन्हा चाखायला आवडेल.
राधिका
वाचलात
त्याच बरोबर ते त्यांचं बांबुचं लोणचं खाल्लं नाहित म्हणून खूश आहात. फेसलेल्या मोहरीने कसा (आणि जास्तीत जास्त किती) डोक्यात करंट जातो हे पहायचं असेल तर आसामी/मणिपूरी बांबुचं लोणचं खावं
बाकी नरी (स्पेलिंगने ngari) मासे म्हंजे 'फर्मेंटेड थोडक्यात कुजवलेले' मासे हा मणिपूरि मथ्याहारात बेस असतो (माझ्यामते हा सुकवून फर्मेंट नव्हे तर नुसता फर्मेंट केलेला भयंकर वासाचा मासा असतो). नुसत्या 'नरीगारात' गेलात त्या वासाने नाकाचे केस जळणे म्हंजे काय याचे प्रात्यक्षिक मिळाले असते
मात्र मलाही बटाटे घालून केलेलं बीफ मणिपूरी पद्धतीचं(ही) आवडतं.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खाल्लंय खाल्लंय
बांबूचं लोणचं खाल्लंय. माझ्या आसामी मैत्रिणीने खास माझ्यासाठी बाटलीभर बनवून आणलं होतं. पण पक्क्या ईशान्यपदार्थखाऊ मंडळींचं म्हणणं पडलं की मला फार तिखट खाववणार नाही असं वाटून ते कमी तिखट केलं असावं. त्यामुळे तिखटपणाची मजा काही अनुभवता आली नाही आणि त्या लोणच्यातल्या बांबूचा वासही आवडला नाही. नंतर पोर्क+बांबू खाताना पोर्कच्या वासामुळे बांबूचा वास तेवढा आला नसावा. लोणचं आवडायला त्या वासाची सवय व्हावी लागेल बहुधा.
नरीबद्दलच्या माहितीसाठी खूप धन्यवाद. मेलामे माझ्यादेखतच बनवण्यात आले होते. तेव्हा कोणीतरी मासे घेऊन ते कुटतंय याचं फार अप्रूप वाटलं होतं. पण तेव्हा समोर दिसलेला मासा सुका वाटत होता.
आणखी कोणकोणत्या प्रकारचं खायला मिळालंय? बाकी मुंबईत त्या प्रदेशातले खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे तुम्हाला ठाऊक असल्यास मज पामरीवर कृपा करून जरूर सांगा.
राधिका
राधिका
इशान्येसारखंच फक्त वेगळा
इशान्येसारखंच फक्त वेगळा वास+फ्लेवर असलेलं उडीया पद्धतीचं बीफ खाल्लंय. अर्थात हे खाणं मित्र/मैत्रिणींच्या घरी झालंय त्यामुळे मुंबईत/पुण्यात हे कुठे मिळतं याचं उत्तर तुमच्याइतकंच मलाही मिळालेले आवडेल
बाकी मंगळूरी बीफ खाल्लं नसलं तरी त्यांचा इतर मांसाहार मस्त ओलं खोबरं, भिजली डाळ वगैरे घातलेलं असल्यान्ये तिथल्या पद्धतीचं खाऊन बघायचंय.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ङारी
मणिपूरीमधे ङा म्हणजे मासा. हो, क ख ग घ ङ मधला ङ, त्याला काना ङा.
माझी बायको मणिपूरी आहे म्हणून मला माहित आहे. बांबू शूट ताजे कोवळे असते तेव्हा भारी लागते. त्याला मरिनेट करतात तेव्हा त्याचा वास सहन होत नाही. त्यामानाने ङारीचा (नरीचा नाही) वास तितका नसतो.
'तसा' मी शाकाहारी आहे म्हणून माझ्या चवींच्या जजमेंटमधे बायस असेल. म्हणून टाळत आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अच्छा
माहितीबद्दल धन्यवाद.
बाकी एवढे भारी पदार्थ घरी शिजण्याची शक्यता असताना शाकाहारी असणे म्हणजे कठीण आहे (कृ. हलके घ्यावे.)
राधिका
नैवेद्य
लग्नाच्या ७ वर्षांनी देखिल आमच्या घरची आहारपद्धती काय आहे हे नीट तय झालेले नाही आहे. माझे आई वडील असताना, वर्षातले १०-१५ दिवस, घरात काहीच मांसाहारी 'बनू शकत नाही.' मी शाकाहारी म्हणण्यापेक्षा भूतदयावादी आहे आणि पर्याय नसेल तरच 'खायला आणि दिसायला सोपे असलेले' मासे किंवा चिकन खातो. अर्थात इकडे पर्याय असतोच पण तिकडे नसतोच. मणिपूरचे मैतेई लोक स्वतःला शाकाहारी समजतात. तिथली कोणतीही आज्जी चिकन खात नाही, कधी खाल्लेले नसते. अलिकडची पिढी बिघडली आहे हे वेगळे सांगणे न लगे. पण मासे ते शाकाहारी मानतात. प्रत्येक घरासमोर एक मास्यांचे डबके असते.
मी मासे धरून काही मांसाहारी खात नाही, हे कळले असल्याने मणिपूरी भाज्यांचे जे शाकाहारी व्हर्जन आहे त्यातला थोडा हिस्सा ते ङारी घालण्यापूर्वी माझ्यासाठी देवाच्या नैवेद्यासारखा काढून ठेवतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अमनोरा मॉल, पुणे येथे
अमनोरा मॉल, पुणे येथे "झांबार" नामक सौथिंडियन हाटेलात जाणे झाले. यावेळेस नॉनव्हेज ट्राय करू असा बेत होता. रु. ३३३/- ला नॉनव्हेज अनलिमिटेड थाळी. भात, सांबार, रसम, तोंडल्याची भाजी, खीर, केशरी भात यांसोबत ड्राय चिकन आणि मटन करी असा बेत. केरळा परोट्टाही त्यातच येतो. स्टार्टर म्हणून तो टिपिकल पापड-तोही मस्त. सर्व टेष्टी लैच जबर्या. ड्राय चिकन विशेषतः अत्यंत म्हंजे अतिशयच आवडले.
सोबत रेग्युलर इडली-डोसा-आप्पम इ. मेनूही आहेच. इडिआप्पम आणि तशाच अगम्य नावांच्या अनेक फिश डिशेसही लै आहेत. जरा हाय एंड आहे पण चव एकदम वर्थ इट. व्हेज थाळी अनलिमिटेड आहे रु. २२२/- ला.
दक्षिणायन व सौथ इंडीजच्या जोडीला पुण्यात अजून एका ऑथेंटिक सौथिंडियन हाटेलाचा शोध लागल्यामुळे उत्तम वाटले. पुन्हा नक्की जाणारे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हॉटेल साईनाथ / बुवाची मिसळ, लोणावळा
दोन आठवड्यापुर्वी पुण्यात गेलो होतो तेव्हा एक दिवस काढुन लोणावळ्याला भट्कुन आलो. "मनशक्ती"ची मिसळ खायचा बेत होता. पण एकदोन रिक्षावाल्यांना विचारता त्यांनी दगडोबाची उर्फ बुवाची उर्फ हॉटेल साईनाथची मिसळ रेकेमेंण्ड केली. तेव्हा तिथे कुच केले. लोणावळ्याकडुन खंडाळ्याकडे जात असतांना हॉटेल फरियाझ ला जिथे उजवीकडे वळतात तोच रस्ता घ्यायचा, पण फरियाझला न थांबता थोडे पुढे निघायचे. हमरस्त्यापासुन साधारण पणे अर्धा-पाउण कि.मी. आता आहे.
इथे साधी/मिडीयम्/तिखट मिसळ मिळते. मी मिडीयम मिसळ आणि तर्रीवाला रस्सा मागवला होता. मंडळी भट्कुन भट्कुन खुप भुक लागली होती त्यामुळे समोर आलेल्या मिसळीचा फोटो काढणे राहुन गेले. इथे मिसळी बरोबर मिरचीचा ठेचा/खर्डा देतात. रस्सा मस्त मसालेदार/तिखट होता त्यात खर्डा. पुछो मत!!! एकदम जन्नत!!!
नंतर आत मधे जाउन फोटो काढले.
१. तेव्हा मावशींना बघुन सगळा माल घरगुती असल्याची खात्री पटली आणि चवीचे रहस्य उलगडले!!!
२. तर्रीवाला रस्सा कातील होता!!
३. चला मंडळी मिसळ खायला!! याच फोटोत लिंबुंच्या बाजुला एका डब्यात खर्डा आहे.
नक्की चव घेउन बघा!
वाह.. क्या बात है.. नक्की
वाह.. क्या बात है.. नक्की जाणारच आता तिथे.
बाकी "मनशक्ती"ची मिसळ हा एक प्रचंड मनोरंजक भाग होता. महा झणझणीत मिसळ. माझ्यामते प्रचंड आग आग होणारी मिसळ ही खाण्यात तेवढीशी मजा येत नाही. झटका हवा पण पुढचा घास खाताच येऊ नये इतकं, विशेषतः मागूनही झणझणत राहील असं दु:खदायक तिखटही असू नये.
या मनःशक्ती (त्यांचा उच्चार मनशक्ती असा आहे वाटतं) मिसळीसोबत त्यांनी एक फॉर्म दिला होता. त्यात खातानाचा आपला अनुभव तपशीलवार रकान्यांच्या स्वरुपात पेनाने भरुन द्यायचा होता. हा नेहमीचाच प्रकार आहे की त्यावेळी चालू असलेला एखादा प्रयोग होता याची कल्पना नाही. पुन्हा खाण्याची इच्छा न उरल्याने पुन्हा पहायला गेलो नाही. या ठिकाणी कायमस्वरुपी प्रदर्शन कम गॅलरीच्या स्वरुपात मेंदूच्या विविध आकृत्या आणि "सायंटिफिक" पद्धतीने मांडलेली मज्जा मज्जा होती.
सर्वसमावेशक शुभेच्छा.
This comment has been moved here.