दानिश सिद्दिकी
एखाद्या व्यक्तीचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख करण्यासाठी नेमके कोणते मापदंड लागतात? तुमची व त्या व्यक्तीची कित्येक वर्षांची ओळख हा मापदंड मैत्री सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही. कित्येक वर्षं एकमेकांना ओळखत असूनही दोन व्यक्ती कधी मित्र होऊ शकत नाहीत. तर काही वेळा एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. दानिश सिद्दिकीचा माझा अनुभव असाच म्हणता येईल. त्या एका अनुभवामुळे दानिशला मी माझा जवळचा मित्र म्हणू शकतो. त्यामुळे हा लेख मी दानिश सिद्दिकी नावाचा एक महान मित्र गमावल्याच्या दुःखातून लिहीत आहे.
दानिशचं काम मी गेली कित्येक वर्षांपासून पहात आलोय. त्याच्या कामापासून प्रेरणा घेत आलोय. परंतु त्याला मित्र म्हणवून घेण्यासाठी एक प्रसंग मला इथं लिहिलाच पाहिजे. कारण त्यातून दानिश हे काय रसायन होतं हे लक्षात येईल. दानिश अफगाणिस्तानमध्ये मृत्युमुखी पडला त्यापूर्वी, म्हणजे साधारण दीड महिन्यापूर्वी, मे महिन्याच्या अखेरीस एक दिवस मला दानिशचा मेसेज आला. तो वाचून मी आनंदाने व कृतज्ञतेच्या भावनेने शहारून गेलो होतो. तो संदेश असा होता -
प्रिय इंद्रजित,
आशा करतो की तू व तुझं कुटुंब उत्तम आहे. अपघाताने का होईना मी तुझ्या कामापर्यंत पोहोचलो व ते काम पहाणं हे माझ्यासाठी ब्लेसींग होतं. मी कित्येक वेळ तुझं काम पहाण्यात घालवला. तू तुझ्या परिसरावरचं केलेलं डॉक्युमेंटेशन पहाणं हे फार सुखदायक आहे. तुझी मुलं निसर्गाच्या सानिध्यात उत्तमोत्तम गोष्टी शिकत मोठी होत आहेत. हे सर्व काम पहाणं हा माझ्यासाठी थेरपीसारखा अनुभव होता. विशेषतः दुःखद घटनांचं छायाचित्रण करून आल्यावर तुझं काम पहाणं हे मला मानसिक शांतता देऊन गेलं. तुझी काळजी घे व माझ्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.
दानिश.
दानिश हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. गेल्या शंभरहून अधिक वर्षांमध्ये हा मान कोणत्याही भारतीय फोटोग्राफरला मिळाला नाही. तो जे काम करत होता ते अतिशय आव्हानात्मक होतं. त्या कामापुढे इतर कोणत्याही फोटोग्राफी जॉनरची तुलना करता येणार नाही. जे काम करताना जीव जाऊ शकतो त्यापेक्षा मोठं आव्हानात्मक काम कोणतं असू शकतं! परंतु हे करत असतानाही दानिशसारखा माणून माझ्यासारख्या आडगावात राहून, सुखवस्तू आयुष्य जगत काम करणाऱ्या फोटोग्राफरचं कौतुक करायला जराही कचरला नाही. स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून माझ्यासारख्या फोटोग्राफरला असा मेसेज पाठवताना त्याच्यात कोणताही अहंभाव नव्हता. आणि यातून दानिश किती संवेदनशील माणूस होता याची कल्पना आपल्याला येऊ शकते.
दानिश अर्थशास्त्र शिकला होता. सोबत मास कम्युनिकेशची पदवी घेऊन तो फोटोजर्नलिझममध्ये आला. रॉयटर्ससारख्या नामांकित एजन्सीमध्ये तो मुख्य फोटोग्राफर होता. रोहींज्या निर्वासितांचे त्याचे फोटो प्रचंड गाजले. त्यासाठी त्याला पुलित्झरही मिळालं.


त्याचबरोबर नेपाळ भूकंप व नुकत्याच झालेल्या दिल्ली दंगलीचे फोटो त्याने काढले.



दिल्लीतील नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने

दिल्लीतील शेतकरी निदर्शने
कोवीड लॉकडाऊननंतर स्थलांतरित कामगारांनी त्यांच्या घरी केलेला परतीचा प्रवास त्याने डॉक्युमेंट केला.

कोवीड महासाथीची अत्यंत प्रभावी छायाचित्रं त्याने काढली. सरकार जेव्हा मृत्यूचे आकडे लपवत होतं तेव्हा वस्तुस्थिती काय आहे हे दानिशच्या छायाचित्रांमुळे जगाला कळलं.

वडिलांच्या मृत्यूनंतर आईचे सांत्वन करणारी मुले


ड्रोन कॅमेराचा अत्यंत प्रभावी वापर करत त्याने ढिगाने जळणाऱ्या चिता जगासमोर आणल्या.
पण हे सर्व करत असताना त्याने या प्रभावित लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कधीही गदा येऊ दिली नाही. त्याचा कॅमेरा एखाद्या घटनेमुळे प्रभावित लोकांपासून कायम एक अंतर राखत आला. एका मुलाखतीत त्याने या सर्व कामावर सुंदर भाष्य केलं होतं. तो म्हणाला की चांगला फोटोजर्नलिस्ट तो असतो की ज्याला माहीत असतं की आपण हे फोटो का काढतोय. सामान्य माणसाला न्याय देण्याचं व वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचं काम माझ्या फोटोंनी करायला हवं असं मला वाटतं. अर्थात हे सर्व छायाचित्रित करणं हे वरकरणी जितकं सोप्पं वाटतं तितकं ते नाही. त्यासाठी प्रचंड मानसिक किंमत मोजावी लागते. रोहींज्या निर्वासितांची चित्र काढताना त्याला रोहींज्यांमध्ये त्याची स्वतःची बायका मुलं दिसायची. हे सर्व छायाचित्रित करताना मानसिक संतुलन बिघडू न देण्याचं आव्हानही होतं. तरीही ‘मी ही छायाचित्रं का काढतो?’ हा प्रश्न स्वतःला विचारत तो काम करत राहिला.

इराक
या सर्व घटनांचे प्रभावी छायाचित्र घेण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टींची गरज आहे असं जेव्हा त्याला एका मुलाखतीत विचारलं गेलं, तेव्हा तो अगदी सहजपणे म्हणाला की पहिली गरज असते ती तिथं आपण उपस्थित असण्याची. मला नेहमी प्रश्न पडतो की अशी कोणती उर्जा व प्रेरणा दानिशकडे होती की तो प्रत्येक वेळी अशा घटनांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून उपस्थित होता?
प्रसंगी त्याला आपल्या कुटुंब व मित्रमंडळींसोबतच्या सहवासाचा बळी द्यावा लागला. प्रत्येक वेळी घरातून बाहेर पडताना तो त्याच्या कुटुंबाला ‘योग्य ती काळजी घेईन’ हे आश्वासन देऊन बाहेर पडत होता. पण हे बाहेर पडणं वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नव्हतं. कोणत्याही क्षणी आपल्याला जीव गमवावा लागू शकतो हे त्याला माहीत होतं. पण तरीही तो बाहेर पडला. याचं उत्तर परत तेच असावं. त्याला माहीत होतं की तो हे काम का करतोय. हे सर्व काम करत असताना त्याने सामान्य माणसाशी त्याची असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. या सर्व कामापासून अत्यंत वेगळंही काम त्याने केलं. मुंबईत काही थिएटरमध्ये काही गाजलेले हिंदी सिनेमे सतत दाखवले जातात. विशेषतः प्रेमकथा असलेले सिनेमे. हे सिनेमे पहायला येणारे प्रेक्षक त्याने फोटोग्राफ केले. या तरूण प्रेक्षकांचा भाबडा रोमँटिसिझम त्याने छायाचित्रांमध्ये पकडायचा प्रयत्न केला. हिंसा, दुःख यांचं छायाचित्रण करत असताना त्याने त्याच्या मनातील हा प्रेमळ कोपराही जिवंत ठेवला होता.

मराठा मंदिर येथे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पाहणारे प्रेक्षक
दानिशच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर जाऊन काही लोकांनी अत्यंत वाईट प्रतिक्रियाही दिल्या. विशेषतः कोवीड महामारीत शेकडो चिता जळत असलेल्या त्याच्या छायाचित्रांमुळे काहींच्या भावना दुखावल्या. परंतु अशा टिप्पणी करत असलेल्या लोकांना फोटोजर्नालिस्टबद्दल व त्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल काहीच माहीत नसतं. दानिशने पुलित्झर मिळाल्यावर एका मुलाखतीत चांगलं भाष्य केलं होतं. तो म्हणाला की या घटना दुर्देवी असतात. परंतु फोटोग्राफरपेक्षाही मी एक हिस्टॉरियन आहे. या घटना चांगल्या की वाईट हे शोधण्यापेक्षा जे समोर दिसतंय ते इतिहासाचा भाग म्हणून संवेदनशीलपणे डॉक्युमेंट करणं ही माझी जबाबदारी आहे. व ती मी नेहमी पार पाडेन.
युद्धभूमी व विविध दुर्देवी घटनांचं छायाचित्रण करणाऱ्या फोटोग्राफर्सना कालांतराने अत्यंत मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येक छायाचित्रकारांना नैराश्य येतं. केविन कार्टरसारख्या छायाचित्रकाराने आत्महत्याही केली. कित्येकांना तरूण वयात आपला जीव गमवावा लागला. रॉबर्ट कापासारखा महान फोटोग्राफर वयाच्या चाळिशीत भूसुरूंगावर पाय पडल्यामुळे मृत्युमुखी पडला. अशा मृत्यूसोबत कित्येक स्वप्नंही मृत्युमुखी पडतात. जगभर विविध कारणांनी माणसं मृत्युमुखी पडतात. परंतु दानिशसारखे फोटोग्राफर त्यांच्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही हे क्षेत्र निवडतात. हे काम करण्यामागील त्यांच्या प्रेरणा समजून घेणं आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी अशक्य आहे असं मला वाटतं. दानिशच्या रूपाने आपण एक महान फोटोग्राफर गमावला. जगातील प्रत्येकाला याचं दुःख झालं पाहिजे. कारण दानिश हा देश, धर्म यांच्या सीमारेषेपलीकडचा माणूस होता. व इतिहास त्याला नेहमी लक्षात ठेवेल.
--
इंद्रजित खांबे
सर्व छायाचित्रे प्रताधिकाराधीन.
.
अनेक दिवसांनी इतकं खरं, सोपं आणि सुंदर काही वाचायला मिळालं. यातले काही फोटो आधी बघितले होते. पण तुमच्या लेखनामुळे ते अजून प्रभावी वाटतायत.
छान लेख. तुमच्या कामाबद्दल पण लिहा
लेख खूप आवडला. सिद्दिकींना तुमच्या ज्या कामाचं कौतुक वाटलं, त्या कामाबद्दलही कृपया लिहा, तुम्ही काढलेल्या फोटोंसहित.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
फार छान लेख आहे! अनेक आभार!
फार छान लेख आहे! अनेक आभार!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
फार चांगला व समयोचित लेख.
फार चांगला व समयोचित लेख.
.
लेख खूप आवडला. अनेक आभार. दानिश सिद्दिकींना आदरांजली.
दानिशच्या स्मृतींना विनम्र
दानिशच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
भक्तोन्माद
दानिशच्या कामाविषयी फार माहिती नव्हती पण त्यांच्या मृत्यूनंतर
सोशल मीडिया वरचा एकंदर भक्तोन्माद वाचून ही व्यक्ती नक्की चांगलं काम करणारी असणार असं वाटलं. हा लेख वाचून चुणूक कळली आणि ते अकाली गेल्याची हळहळ वाटली.
संवेदनशील लिखाण.
लेख आवडला.
दानिश सिद्दीकी यांचे काही फोटो हादरवून सोडत असत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कोणताही फोटो पाहून जेव्हा बघणाऱ्या नजरेला फोटोतला कंटेट आणि इंटेंट इमोशनली जागरूक करत असेल तर तो फोटो आणि तो काढणारा फोटोग्राफर कमालीचे उच्च असतात. सोबत त्या फोटोसोबत कोणतीही इनसाईड स्टोरी जर तुम्हाला बेचैन करत असेल तर तर मग तुमच्यातील माणूस अजून जागा आहे हे नक्की. दानीश कडील कलात्मक दृष्टी रॉयटर्स ने पुरेपूर हेरली होती. त्यामुळे पत्रकारितेच्या नव्या जमान्यात शब्दबंबाळ बातम्यांपेक्षा अशी हेलावून टाकणारे फोटोज् अग्रलेख किंवा व्यंगचित्रांसारखेच सरस असत. रॉयटर्सच्या बातम्या खूप जणांना अपील होत ते बातमी वाचण्याआधी निरखून पाहिलेल्या फोटोमुळे. बऱ्याच भारतीयांना कलाकारांना जातपातधर्म आणि विचासरणीच्या चष्म्यातून बघायची सवय लागली आहे. बहुतांश भारतीयांचा एक समज रूढ झालेला असतो की जागतिक इव्हेंट्स वर व्यक्त होणाऱ्या कलाकृती म्हणजे कोणाचीतरी नाचक्की झाली पाहिजे यासाठीच असतात. तसही या आधी भारतातील शोषितांच्या, गरीबांच्या हृदयद्रावक परिस्थितीचे भांडवल करून अप्पलपोटी लोकांनी टिमकी वाजवली आहेच. सध्या ह्यावर चर्चा नकोत.
दानिश सिद्दीकीच्या निधनानंतर वाचनात आलेल्या बातमीने अंगावर शहारा आला होता. क्रूरतेच्या टिपेचा कळस तो काय असावा ह्याचे मुर्तीमंत उदाहरण.
(तपशीलासाठी बातमी-१, बातमी-२ वाचा.)
मुळात धार्मिक कट्टरतेच्या आधारावर जगणाऱ्या संघटनांना माणूसकी म्हणजे काय माहिती नसते. अमेरिकन सैन्य माघारी जायला लागल्यापासून तालीबानी संघटना चेकाळल्या आहेत संपुर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी.
त्यापुर्वी अफगाणिस्तानात भौगोलिक फायद्यासाठी इंग्रजांनी, नंतर रशियाने आता अमेरिकेने आंतरराष्ट्रीय भाईगिरी करायचा प्रयत्न सर्वश्रुतच आहे. अशा युद्धाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दानिश सिद्दीकी सारख्या अस्सल देशी फोटोग्राफरचा मृत्यू होतो हे वाचल्यावर वाईट वाटतं. हतबलता सर्वात कामचुकार असते.
दानिशच्या मृत्यूनंतर जे भडकभगवे पोष्टी टाकत होते त्यावरून एकूण दानिशचे काम भल्या भल्या प्रस्थापितांना हादरवणारे होते हे लक्षात येते. आपल्याकडचे भडकडगवे आणि लालकडवे एकाच लायकीचे आहेत. कोणाला वंदु नये कोणाला निंदू नये.
दानिश सिद्दिकीला भावपूर्ण आदरांजली.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
https://121clicks.com
https://121clicks.com/articlesreviews/danish-siddiqui-photography-ted-talk
“It’s more important for a photographer to have very good shoes than to have a very good camera.” - Master Photographer Sebastião Salgado
Danish Siddiqi
Francois Gautier, a French journalist writes: "tragic death but he always put his Muslim identity before journalistic impartiality. His pro-Rohingya, anti-Hindu and hatred of Narendra Modi is well known. The media who is mourning his death never mourned the death of 2 sadhus in Palghar." We must remember that he may have been an acclaimed photographer but he was killed by the Taliban and not by any Indian.
Francois Gautier
बस नाम ही काफी है
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मुस्लिम कट्टर वादी संघटना
मुस्लिम कट्टर वादी संघटना तालिबान नी दानिश ची क्रूर हत्या केली पण पोस्ट लीहणाऱ्या व्यक्ती नी ते सांगायचे टाळलं.
स्पष्ट बोलायला शिका .
फक्त दुःख व्यक्त करून फायदा नाही.
मुळ मुद्दा काय आहे ते तरी बघा
मुळ मुद्दा काय आहे ते तरी बघा आधी.
का गेला. कशामुळे गेला हा मुद्दा नाही आहे इथे.
उलट्या काळजाचे प्रतिसाद....
वरचे काही प्रतिसाद वाचून सुन्न झालो. उलट्या काळजाचे लोक समाजात पुष्कळ आहेत पण ऐसीचे काही सदस्य तशा दृष्टिकोनातून लिहिताना पाहून वाईट वाटले. "मरणांतानि वैराणि" हे त्यांचाच लाडका हिंदू धर्म सांगतो, पण त्याचीही काहींना फिकीर दिसत नाही....
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!