वळीव!

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

वळीव!

- अभयसिंह जाधव

बुडणारा सूर्य सवाष्ण बाईच्या कपाळी असणाऱ्या कुकवागत दिसत हुता. वर काळ्या ढगांनी दाटी केली हुती. घरला येणाऱ्या गुरांच्या कळपावाणी अगदी संथगतिनं ढग खालतीकडं चालले हुते. मावळतीकडनं येणारा रस्ता थेट पारापाशी येऊन वळसा घ्यायचा आणि गावात दिसंनासा हुयाचा. पारावर बसून अण्णा एसटीची वाट बघत हुते. सव्वासहा व्हायला आले तरी अजून सहाच्या गाडीचा काय पत्ता नव्हता. त्या एसटीनं पाव्हना येणार हुता. शेतात गेलेली मानसं दमून भागून परतत हुती. कोण जरा पारावर टेकून तंबाखू सोडत हुती, शिळोप्याच्या गप्पा हाणत हुती. आज वळवाचा पाऊस पडणार म्हणून अवकाळी पावसाला शिव्या घालत हुती, कुणाच्या शेतात चिक्कू हुता, तर कुणाच्या खळ्यात ज्वारी पडली हुती. बाजूच्या शिरपा नाव्ह्याच्या दुकानात जोरजोरात गाणी लावली हुती, बाहेर गाडीला टेकून दोन-चार पोरं खिदळत हुती. अण्णांची नजर मात्र समोर खिळलेली!! असाच रानातनं कडबा घेऊन पका यील असं त्यांच्या मनात आल. पोटात ढवळल्यावानी झालं. पाठीला रग लागली म्हणून त्यांनी पाय खाली सोडलं आणि तंबाखू मळायला घेतली. आता समोर वाटंकडं नजर लावायला त्याचं मन धजंना.

जोराचा वारा सुटला म्हणून वाळत टाकलेली कापडं काढायला राणी बाहेर आली. कापडं गोळा करताना राणीच्या अंगावर एक थेंब पडला, पाऊस येतोय का काय, म्हणून राणीनं कापडं गोळा केली आणि ती मागं वाळत टाकलेली वाकळ काढायला पळाली. तिजं मन तिज्याफुडं पळत हुतं. पावसाच्या एका थेंबानं ते पार मागल्या पावसाळ्यात गेलं हुतं, आणि त्या आठवनीनं तिचं हातपाय गळालं. मागं वाकळ काढताना तिला लांबवर रानात वावटळ उठलेली दिसली, ही वावटळ अशीच यावी न मला तीज्यासंगं घेऊन जावी, असं राणीच्या मनात आलं. वाकळ हातात घेऊन राणी तशीच वावटळीकडं बघत राहिली. आता वारं अजून जोरात वाहायला लागलेलं, एवढ्यात फोन वाजला. आत येऊन तिनं मोबाईल कानाला लावला. समोरन कोण तरी म्हणालं, "अण्णा, बस गावात आलीये, तुम्ही कुठं आहात?" राणीला काय बोलावं कळलं नाय. "अण्णा, थांबलेत पारावर, फोन घरात इसरून गेलेत", असं म्हणून तिनं फोन कट केला. बाहेर एक नजर टाकून तिनं चहाच आधन चढवलं, पर तिच्या मनात अजून पाऊस रिपरिपत हुता. बाहेर जाऊन तिनं मोठ्या आवाजात टीव्ही लावला तवा कुठं तिला जरा बरं वाटलं.
वारं चांगलच सुटलं हुतं, पारावरच्या वडासंग सुं...सुं..सुं...करत सुरपारंब्या खेळत हुतं. एवढ्यात रस्त्याला एसटीचे दोन दिवं दिसलं आणि अण्णा पारावरनं उतरून फुडं झाले. एसटीमधनं शेरात बाजाराला गेलेल्या परटाच्या म्हाताऱ्या उतरल्या आणि त्यांच्यामागनं कानात ऐकायचं अडकवलेला एक तरुण. ह्योच पाव्हना म्हणून अण्णांनी त्याला हेरला आणि ते पुढे झाले. "अण्णा, मी फोन केला होता, बसला उशीर झाला वाटतं, आत्ता त्या आज्जी बोलत होत्या?" तो अण्णांजवळ येत म्हणाला, अण्णांनी बॅगसाठी हात पुढे केले पण त्यानं दिली नाही, "ठीके, फार ओझं नाहीये. "व्हय, सहाला येती गाडी, आता अंधार पडायला लागला म्हणजे बघा की", अण्णा गल्लीत शिरताशिरता म्हणाले.

प्रवासानं ऋतुराज पुरता दमला होता. बसमध्ये ८ तास बसून त्याची हाडं पार खिळखिळी झाली होती. अण्णांच्या मागोमाग तो त्यांच्या घरी आला, आणि 'पोचलो एकदाचे' म्हणून त्यानं सुस्कारा सोडला. अण्णांचं घर त्याला आवडलं. टुमदार कौलारू घर होतं. समोर छोटंसं अंगण होतं, थोडी फुलझाडं होती, त्यांची नीट निगराणी राखली गेली नाहीये हे मात्र लक्षात येत होतं. त्यानं बाहेरच्या कट्ट्यावर त्याचं सामान ठेवलं आणि आंघोळीसाठी विचारलं. अण्णा त्याला घरात घेऊन गेले. हॉलमध्ये एक जुनाट सोफा, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या आणि टीव्ही असं जुजबी सामान होतं. घर तसं टापटीप होतं पण घराला मरगळ आल्यासारखी झाली होती. टीव्ही चालू होता, मात्र बघत कोणीच नव्हतं. मध्ये दोन खोल्या आणि मागे किचन अशी घराची मांडणी होती. घराच्या मागे बाथरूम होतं; जाताना त्याला किचनमध्ये एक स्त्री पाठमोरी बसलेली दिसली. ती चहाचं भांडं उतरवत होती. चहा मिळणार या कल्पनेनं त्याला बरं वाटलं आणि तो बाथरूममध्ये घुसला.
ऋतुराजला आंघोळ करून फ्रेश वाटत होतं पण अंगातला थकवा अजून गेला नव्हता. त्याची खोली तशी लहान होती, पण नेटकी होती. एका बाजूला गादीची वळकटी, आणि चटई, एक छोटं टेबल, त्यावर पाण्याचा तांब्या आणि एक लाकडी खुर्ची, बास! खिडकीतून आत्ता काही दिसत नव्हतं, पण समोर मोकळं ग्राऊंड किंवा शेत असावं असा अंदाज त्यानं लावला. त्याला एकंदरीत व्यवस्था आवडली. एवढ्यात अण्णांनी चहा प्यायला बोलावलं. तो बाहेर आला. "सगळं व्यवस्थित हाय नव्हं?" अण्णांनी विचारलं.
त्यानं हसून मान डोलावली.
"मी दिवसभर तिकडे मंदिरातच असणारे, फक्त झोपायला येईन", सोप्यात बसत तो उत्तरला.
अण्णाही त्याच्या शेजारी बसले. "आणि दोपारचं जेवण?"
तो जरा गोंधळला, "मंदिर जवळच आहे म्हणताय ना, येत जाईन, तुमचं कसं असतं?"
"मी असतोय शेतात, तिकडंच जेवतो आम्ही." अण्णा उद्गारले.
"बेस्ट, मी पण तिकडेच येत जाईन."

एवढ्यात त्याला समोरून ती स्त्री चहा घेऊन येताना दिसली. ती अंधारात असल्यामुळे तिचा चेहरा काही दिसत नव्हता पण तिच्या चालण्यावरून ती अण्णांची बायको नसावी असा अंदाज त्यानं बांधला. त्याच्या डोक्यावरच एक पिवळा बल्ब जळत होता. ती दारातून बाहेर आली तसा तिचा चेहरा उजेडात आला आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. शेलका बांधा, सावळा वर्ण, कपाळावर भुरभुरणारे दाट केस, सरळ नाक आणि पातळ ओठ! चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिपका मारल्यासारखं त्याला झालं. तिचे डोळे मात्र त्याला एकदम वेगळे वाटले, सुकलेले, हरवलेले! तिनं स्लोमोशनमध्ये येऊन त्याच्यासमोर चहा ठेवला, सोबत बिस्कीटं होती. तिनं त्याच्याकडे नजर वर करून बघितलंही नाही. आल्या पावली ती परत गेली. एवढा वेळ आपण तिच्याकडेच बघत होतो हे अण्णांना कळलं असेल या जाणिवेनं तो ओशाळला. "नुसती बिस्कीटं चालतील नव्हं? म्हणलं तासभरानं जेवायचं हाय तर...",
"नाही, नाही, काहीच अडचण नाही." त्यानं चहाचा कप उचलला.
अण्णा त्याला त्याच्याबद्दल विचारू लागले, त्याच्या काकांबद्दल विचारू लागले, तो उत्तरं देत होता. पण तिचा चेहरा काही त्याच्या डोळ्यांसमोरून हलायला तयार नव्हता. त्यानं चहा पिऊन संपवला, आणि त्याला समोर भिंतीवर एका तरुणाचा फोटो दिसला. त्या फोटोला हार घातलेला होता. त्यानं अण्णांकडे बघितलं.
"ल्योक माझा, मागल्या पावसाळ्यात गेला", असं म्हणून अण्णा चहाचे कप घेऊन आत गेले.

खिडकीतनं टिपूर चांदणं राणीच्या हातवरुन सांडलं हुतं. मगाशी जमलेलं ढग कुठल्या कुठं पळालं हुतं, पर तिज्या मनात इचाराच्या ढगांनी दाटी केली हुती. सांच्याला चुचकारून गुरांना घराकडं घेऊन यावं, तशी ती मनाला आवरत हुती, पण तिचं मनबी द्वाड!! आगाव वासरावानी चौफेर उधळत हुतं. आजच असं का हुतय हे तिला कळत हुतं. मगाशी बाहेर आवाज आला म्हणून ती चटदिशी बाहेर आली, तर समोरनं अण्णा आणि पाव्हना आत आले. खरतर तेजा आवाज ऐकूनच 'ह्यो कसा दिसत असंल' असा प्रश्न तिज्या मनात आलेला, पर तेला बघून तिला काय तर येगळंच वाटलं. म्हणजी गार पाण्याचा हाबका तोंडावर मारल्यागत! तेजे कपडे न केस इस्कटलेले, चेहऱ्यावर धूळ बसली हुती, पर तेजं देखणेपण काय लपत नव्हतं. त्यो आत आला न त्यानं तेंच घर बघितलं, त्याच्या डोळ्यांकडे बघून तिला आणखीनच कसतरी झाल, डोळं बोलक हुतं पर तेंचा थांग लागत नव्हता; नदीच्या पोटातल्या डव्हावाणी!

गावच्या नदीत एक डव्ह हुता. पका तिला गमतीनं म्हणायचा, "असा सूर मारून पार तळाला जातो बघ एक दिवस!"
तिनं कशापाय म्हणून इचारल्यावर म्हणायचा, "तिथं तळाला खजिना हाय म्हनत्यात, दागिनं, अंगठ्या! त्ये बाहेर काढून आमच्या राणीला पेश करतो की."
तिला बरं वाटायचं. पकाची आठवण आली तसं तिनं डोळं गच्च मिटून घेतलं. कूस बदलली. गेल्या दोन-तीन महिन्यांत तिला एवढ्या तीव्रतेनं त्याची आठवण आली नव्हती. त्यो दिसभर रानात काम करायचा, तेज्या अंगाला एक रानवट वास याचा. तिला त्यो वास लई आवडायचा, रातीला तिला जवळ वडली, की त्याच्या छातीत डोकं घुसळत ती वास मनात साठवायची. त्या वासानं तिला पेटून उठल्यागत व्हायचं. आज तसंच होत हुतं.

पूर्वेकडनं येणारी नदी गावाला वळसा घालून खाली दक्षिणेला वाहत जायची. नदीला बारमाही पाणी असायचं, नदी जिथं वळसा घालायची तिथंच ते मंदिर होतं. शंकराचं मंदिर! पूर्वाभिमुखी! आत्ताबी सूर्याची किरणं सभामंडपात रेंगाळत हुती. हिकडच्या बाजूला गावातल्या लोकांची रानं हुती म्हणून लई वर्दळ नसायची. गावच्या गुरवाकडं मंदिराची परंपरागत गुरवकी हुती, पण मंदिराच्या उत्पन्नातनं भागायचं नाय म्हणून ते शेती करायचे. सदा गुरव तसा ढिला माणूस, तेज्याकडं बघूनबी ते जाणवायचं. रोज सकाळी येऊन गाभारा धुतला न पिंडाला बेल घातली की त्यो दुसऱ्या दिवशीच उगवायचा. आत्ताबी त्यो परत जातच हुता एवढ्यात अण्णा पाव्हण्याला घेऊन आले. एवढ्या लांबनं कोण तरी आपलं मंदिर बघायला आलंय, हेजा गुरवाला जरा धक्काच बसला. पाव्हण्यानं त्याला माहिती विचारली, पर त्याला लई काय माहीत नव्हतं. तेज्या बाला माहीत हुतं, पर तेज्या बाला जाऊन आता दोन वर्षं झाली हुती. पाहुणा मग लई काय न बोलता मंदिरात गेला. सदा गुरव बाहेर थांबलेल्या अण्णांकडं आला. एक गुटख्याची पुडी तोंडात टाकून त्यानं अण्णांना प्रश्न केला, "कुठला म्हणायचा पाव्हना?"
"पुण्यास्नं आलेत, आपल्या वळखीचे एक साहेब आहेत, पुतण्या हाय तेंचा."
सदा तेंच्या शेजारी उकिडवा बसला, "काय तेज्या आयला, गावातली मानसं कधी फिरकत न्हाईत, आणि पुण्याचा पाव्हना आलाय. पण करणार काय नेमकं?" सदानं पिंक टाकत विचारलं. मंदिराच्या आवारात ती उडाली, पण त्याच त्याला सोयरसुतक नव्हतं.
अण्णांनी त्याच्याकडं नजर टाकली, "अभ्यास करणार, कुणी बांधलं, कधी बांधलं, तेजी बांधणी कशी हाय असं."
गुरवानं एकदा आत वाकून बघितलं, एका खांबापाशी पाव्हना कायतर बघत हुबा हुता. सदा हसून म्हणाला, "कुनाचं काय तर कुनाचं काय. जाऊदे..."
एवढ्यात पाव्हना बाहेर आला. तेला बघूनच कळत हुतं की त्यो लई खुश हाय म्हणून. येताच उत्साहानं तेनं सांगितलं, "अण्णा, काकांनी म्हणजे आय मीन तुम्ही सांगितलं ते बरोबरे बरं का. तुमच्या मंदिराला दोन सभामंडप आहेत, आणि दोन वेगवेगळ्या काळांत बांधले गेलेत. आतलं बांधकाम साधारण बाराव्या शतकातलं वाटतंय आणि बाहेरचं सोळाव्या किंवा सतराव्या. काका, तुम्हाला याविषयी काही माहिती आहे का?"
गुरवानं जरा इचार केला, हेला सांगू का नको म्हणून. तेज्या मनात आलं पण त्यो काय बोलला नाय. अण्णा म्हणाले, "मग मी येऊ का? शेतावर जाईन म्हणतोय, तुम्हाला वाटा नीट कळल्या नव्हं, शेताची न घरला जायची. दोपारला तिकडच येतंय नव्हं?"
पाव्हना आत जातच बोलला, "मला काय आता भूक लागेल असं वाटत नाही, लागली तर नक्की येतो. म्हणजे येतो, गंमत करत होतो."
अण्णा विजार झटकून उठले. गुरव जरा घुटमळला, मग त्यो बी अण्णांच्या माग चालू लागला. जाताजाता तेनं अण्णांना सवाल केला, "अण्णा, एक इचारू का? नाय म्हणजी..."
अण्णांनी नजरेनच इचार म्हणून सांगितलं.
"घरात तरणीताठी, इधवा सून असताना ह्यो पाव्हना..."
'हेच इचारशील माहीत हुतं,' अश्या नजरेनं अण्णांनी त्याच्याकडं बघितलं, "सदा, चोराच्या मनात चांदणं म्हनत्यात ते उगी नाय बघ." सदाच्या मुस्काडीत मारल्यावानी झाल. तो गुमान चालता झाला.

ऋतुराजला काय करू न काय नको असं झालं होतं. त्याच्या काकांनी या दोन सभामंडप असलेल्या मंदिराविषयी सांगितलं ते ऐकूनच तो एक्साईट झाला होता. त्यानं विचार केला, फार तर काय होईल? तसं काही नसेल तर एखादा दिवस थांबून परत येऊ, पण खरंच असं असेल तर? कुठून सुरुवात करू, असं त्याला झालं होतं. गाभारा आणि आतला छोटा सभामंडप यांची रचना जुनी होती. पण गाभाऱ्यात पण काही गोष्टी वेगळ्या असल्याचं त्याला जाणवलं होतं. त्याला या गोष्टींची आवड असली तरी त्याचा अनुभव आणि अभ्यास त्यामानानं कमी होता, आणि एकट्यानं यायची त्याची पहिलीच वेळ! त्यामुळे नेटवरून रेफरन्सेस शोधणं, लागलं तर तांदळे सरांना फोन करून विचारणं, असं करत त्याला पुढे जावं लागणार होतं. पण त्याची तयारी होती, वाटलंच तर तो दोन आठवडे थांबायलाही तयार होता. पण याची पूर्ण माहिती घेऊनच तो माघारी जाणार होता. थांबायची कल्पना आणि अण्णांच्या सुनेचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर एकत्रच आला. तिच्यामुळे आपण थांबतोय का काय, असाही प्रश्न त्याच्या मनात आला. मग त्याला वाईटही वाटलं, ज्या माणसानं त्याच्या घरात आपल्याला जागा दिली…, "जाऊ दे, ती एवढी सुंदर आहे त्याला मी काय करणार? यांच्या हट्टानं ते तिचं लग्न परत लावत नसणार, गावातली लोकं चुत्या असतात." असं म्हणून त्यानं तिचा विचार झटकला आणि तो गाभाऱ्यात घुसला.

"काय करायला?" इजीनं कापड दगडावर आपटत विचारलं.
"देवळाचा अभ्यास करायला," अण्णांचा सदरा पिळून बारडीत टाकत राणी उत्तरली.
"ए बया, आम्ही आपलं अभ्यास झालं नाय की देवळात जायचो, ए बाबा पास कर म्हणून देवाला गूळ लावायचो, आणि देवळाचा अभ्यास? शान्या टाळक्याचाच हाय की!!"
राणीला हसू आलं. बाजूला धुनं धूत बसलेल्या दोन बायकाबी हसल्या. इजीच काम निवांत असायचं, धुनं किती का असंना, नदीवर ती तासभर थांबायची म्हंजी थांबायचीच. राणी सुरुवातीला नदीवर याला बावरायची, उगंच बायका कायतरी बोलतील, चेष्टा करतील म्हणून ती जरा मागनंच यायची. अश्यावेळी तिला इजी हमखास नदीवर घावायची. मग हळू हळू त्यांची वळख झाली. इजीला कोणतर ऐकायला पायजे असायचं आणि राणी मुळातच कमी बोलणारी! त्यांची चांगली गट्टी जमली. एक दिवस तर सगळ्या बायका गेल्यावर इजी तिला म्हणली, "ये माज्या मागनं."

इजी काठाकाठानं चालत हुती, समोर बांबूचं गचपण हुतं, राणीला कळंना ती कुठं घेऊन चाललीयं ते. इजी गचपणात घुसली आणि बघता बघता दिसनाशी झाली, राणी भांबावली. ती बी गचपणात गेली, तर इजी समोर दिसंना. राणीला कळंना, आत्ता हुती न आत्ता कुठं गेली म्हणून. एवढ्यात कुणीतरी तिज्या अंगावर पाणी उडवलं, बघते तर इजी पाण्यात पवत हुती. राणीला धक्काच बसला. इजीनं ती पाण्यात उतरावी म्हणून लई इनवन्या केल्या. राणीला बी इच्छा होत हुती पर घरला कसं जायचं म्हणून ती कचरत हुती, मग इजीनं तिला गंमत सांगितली. बांबूचं गचपण नदीला लागून असलं तरी तिथं जरा जागा हुती, आणि बांबूमुळं कुणाला काय कळायचं नाय. इजीनं ही जागा शोधून काढली हुती. होय-नाय करत राणीबी पाण्यात उतरली, मस्त डुंबली न मग आवरून घरला गेली. तवापासनं त्या दोघींची गट्टी लई घट्ट झाली, त्या दोघी सोडून अजून कुणालाबी ह्याबद्दल माहीत नव्हतं. राणीनं जरा घाबरत घाबरत पकाला सांगितलं, तर तेला भारीच वाटलं हुतं. त्यो म्हणलावता, "दिसत नाय नव्हं कुणाला? मग झालं तर, पवा तेला काय हुतंय!" आत्ता पण धुनं आवरून राणी त्या गचपनाकडं डोळं लावून बसली हुती.
"काय गं? जायचं काय?" इजीच्या आवाजानं राणी भानावर आली. बाकीच्या दोघी आता निघून गेल्या हुत्या. इजीचं अजून चालूच हुतं.
"नको बया, कामं पडलीत, आवर की लवकर."
इजीनं पुढचं धुनं धुयाला घेतलं. धुनं बडवतच ती बोलली, "मी आवरून काय करायचं, त्यो वाद्या हाय घरात! त्यो गेल्याबिगर मी न्हाई जात." इजी चिडली की तिजा आवाज जरा चिरका व्हायचा. आत्ताबी तसंच झालं.
राणीला काय बोलायचं कळलं नाय, ती आपली नखानं खालची वाळू उकरत बसून राह्यली.
इजीनं विषय बदलला, "व्हय गं, कसा हाय पाव्हना?"
राणीनं नजरंनंच 'कसा म्हणजी?' असं विचारलं.
"म्हणजी देखणा हाय का? कसा दिसतो? तुला तर क नाय सगळं इस्कटून सांगाय लागतंय बघ."
पायाला मुंग्या आल्या म्हनून राणी उठून उभी राह्यली, "मला नाय ठाव! आवर, चटकं बसायला लागलं."
"ठाव नाय का सांगायचं नाय? सांगितलंस म्हणून पकाभावजी सपनात यिऊन जाब इचारतील व्हय?" इजी जरा हसतच बोलली.
"इजे, आवरतीस का जाऊ मी? अजून सैपाक राहिलाय माझा."
इजी म्हणली, "हो तू म्होरं, आज पवायचं मन हाय माझं."
राणीनं तिची बारडी घेतली आणि ती वाटेला लागली. इजीनं जरी पवायचं कारण दिलं असलं तरी ते खरं कारण नाय हे तिलाबी माहीत हुतं, पर उगं तिनं विषय वाढवला नाय. इजीमुळे एवढा येळ तिनं मनात दाबून ठेवलेला पाव्हण्याचा इशय परत वर आला. तिनं झटकायला बघितलं तर तसंबी हुईना. नदीकाठची पायवाट मंदिराम्होरनंच उतरून घराकडं जायची. ती जसजशी मंदिरापाशी आली तशी तिची धडधड वाढली. तिनं थांबून खोचलेली साडी नीट केली, पदरानं घाम पुसला. मंदिराकडं बघायची तिची तीव्र इच्छा झाली पण तसं न करता झपकन बारडी उचलली आणि ती चालायला लागली. चटचट पावलं उचलत ती मंदिरासमोरनं चालती झाली. मंडपात बाहेरच्या बाजूला उभं राहून कोणतरी आपल्याकडं बघतंय असं तिच्या मनाला वाटून गेलं. मंदिर जरा उंचावर हुतं, आत हूब राहील की म्होरन खाली गेलेली वाट पार गल्लीच्या तोंडापातुर दिसायची. ती जरा गडबडीतच वाट उतरून आली. "एवढा वेळ त्याची नजर आपली पाठीवरच असलं काय?" ह्यो विचार तिच्या मनात आला न तिजं तिलाच कसंतरी झाल. ती वळून घराकडं गेली. मान खाली घालून ती अंगणात आली तसा तिच्या कानावर आवाज आला, "राणी, अंगावर काटा का म्हणून फुललाय गं?" उंबऱ्यात मिसरी घासत बसलेल्या बजाबाईनं तिला सवाल केला.
"काय माहीत बया?" असं म्हणून राणी माग कापड वाळत घालायला चालती झाली. तिजा श्वास फुलला हुता. पर आपल्या मनात काय चाललंय हेजा वास जरी बजाबाईला लागला तरी ती काय करंल ह्या इचारानंच तिजं मन शहारलं. कितीबी झटकलं तरी त्यो तिथं हूबं राहून आपल्याकडं बघत हुता का? हे काय तिज्या मनातनं जाईना. ती देखणी हाय आणि रस्त्यावरनं चालायला लागली की चारचौघंजन तिज्याकडं मान वळवून बघत्यात हेची तिला जाण हुती. पर म्हणून मुद्दाम तोऱ्यात चालणाऱ्यांतली ती नव्हती. मुळात या गोष्टीची जाणीव हुईपर्यंत तिजं लग्न झालं हुतं. पका तिज्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष!! वर्षभराच्या संसारात तेनं जीव उधळून तिज्यावर प्रेम केलं. अण्णांनीबी पोटच्या लेकीगत तिला संभाळलं, दृष्ट लागावी असा तिजा संसार चालू असताना पकाचं हे असं झालं हुतं. दुसरं लगीन कर, म्हणून सगळ्यांचं सांगून झालं, पर तिजं मन तयार नव्हतं. आणि, आपण गेलो की अण्णांना बघायला कोण न्हाय हेजी तिला पुरती जाणीव हुती. ह्या तंद्रीत कापडं दोरीवर कधी टाकून झाली हे तिजं तिला समजलं नाय. अजून भाकऱ्या थापायच्या हुत्या, शेतावर जेवान घेऊन जायचं हुतं. बिगीनं ती आत आली. सैपाकघराकडं जाताना तिची नजर आपसूक आरश्याकडं वळली. मागल्या टायमाला तिनं आरश्यात कधी बघितलं हुतं, तिजं तिला आठवत नव्हतं. तिजं रूपडं अजून तसंच हुतं, डोळं मात्र सुकल्यागत दिसत हुतं. उद्यापास्नं नीट आवरत जाऊ, असं तिज्या मनात आलं. ह्यो इचार झटकून ती आत गेली, पण भुंग्यावानी हे तिच्या डोक्यात घोंगावत ऱ्हायलं.

अण्णा आज सकाळसकाळीच रानात गेलं हुतं. ज्वारी मळणीला आलेली, तेज्या जुळणीत आण्णा हुतं. पाव्हना येऊन आता चार दिस झालेलं, त्यो रुळला हुता. त्यो आपला सकाळी आवरून मंदिरात जायचा ते पार सांच्यालाच यायचा; तसा तेजा न राणीचा संबंध यायचाच नाय. जेवण आवडलं तर त्यो नक्की सांगायचा. त्यो आजूबाजूला असला की राणीला सैरभैर झाल्यागत व्हायचं. त्याला वाढताना बी तिजं नीट लक्ष नसायचं. मनाचा ठाव सुटल्यागत व्हायचं, तिनं कितीबी अडवायचा प्रयत्न केला तरी मन तिजं ऐकायचं नाय. आत्ता नुकताच त्याला चहा देऊन ती आत आली हुती, बजाबाईच्या सुनेनं कुरड्या करायला बोलवलं हुतं. त्यासाठी ती शेवगा शोधत हुती. माळ्यावर कुठतरी शेवगा हुता.

आता माळ्यावर चढायचं म्हणजी बी पंचायत हुती. बाहेर पाव्हना हुता, पण तेला कसं सांगायचं हे राणीला कळलं नाय. तिनं खालनंच एका काठीनं ढोसून बघितलं, नेमका कशात ठेवलाय हे तिलाबी आठवत नव्हतं. एवढ्यात मागनं आवाज आला, "कप इथे ठेवतो."
राणीनं मागं वळून बघितलं नाय, "हां असुदे."
तो बाहेर गेल्याचा आवाज आला नाय. मग जरा थांबून परत त्यानं इचारलं, "तुम्हाला मदत पाहिजे का?"
राणी जरा घुटमळली. तसा त्योच फुडं झाला. त्यो आपल्या जवळ येऊन थांबलाय हे राणीला जाणवलं. घरात ती दोघंच हुती. ते बी सैपाकघरात! तिजी धडधड वाढली.
"काय काढायचं आहे?" त्यानं वर बघत विचारलं.
राणी आता मागं फिरली, त्यो हातभर अंतरावरच हुबा हुता, त्याला जरा घाम फुटला हुता. त्यानं कसलातर सेंटबी मारला हुता बहुतेक, तेजा वास तिच्या नाकात शिरला.
"शेवगा काढायचा हुता." छातीतली धडधड आवाजात उमटली का काय म्हणून तिला भ्या वाटलं. त्याला शेवगा म्हणजे काय हे कळलं नाही हे तिज्या लक्षात आलं. मग जरा हसतच ती म्हणली, "ते चकल्या, कुरड्या पाडतात माहित्ये का? ते… शेवगा. तुम्ही काय म्हणता तेला?" तिच्या तोंडातन प्रश्न निसटला.
त्यो हसून पुढं झाला, "चकल्या पाडायचा सोऱ्या." असं म्हणून त्यानं वर हात करून माळ्यावरची पिशवी काढली. तिज्या हातात दिली, हातात देताना तो आपला हात पकडेल काय असं तिला वाटलं. तो पिशवी हातात देऊन बाजूला झाला. ती त्याच्याकडं बघून उगंच हसली आन शेवगा धुवायला बाहेर पळाली. तिजा श्वास फुलला हुता, त्याला कायतर म्हणलं पायजे असं तिज्या मनात आलं पण काय म्हणायचं तिला कळलं नाय. तेज्या डोळ्यांत बघायची तिला भ्या वाटायची, नजरंला नजर भिडली न मग… ह्या इचारातच तिनं शेवगा धुतला न ती बाहेर निघाली. त्यो नुकताच बाहेर पडला हुता, तिनं दाराला कडी लावली. मग थांबून पाठमोऱ्या त्याच्याकडं बघून ती म्हणली, "थ्यांक यु, बरका" आणि वळून चालती झाली.

त्यो हसला असणार हे तिनं ताडलं, तेज्या अंगाचा वास अजुनबी तिच्या मनात हुता. त्याच धुंदीत चालत निघाली असताना तिला अण्णांचा आवाज आला न ती थांबली. संभादादाच्या सोप्यात आण्णा बसलं हुतं. समोर दादांचा तान्हा नातू खेळत हुता, चांगलच बाळंस धरलं हुतं तेनं. नुकताच वर्षाचा झालेला! बोबडं बोबडं बोलायचा आणि हालतडुलत चालायचा, नुकताच चालायला शिकला हुता म्हणा. अण्णा त्याला बोलवत हुते, त्यांनी त्याला आवाज काढून दाखवले. तेजं खेळनं दाखवलं, तसा त्यो उठून अण्णांच्या दिशेनं गेला. त्यांच्या समोरच त्यो धडपडणार एवढ्यात अण्णांनी त्याला वरच्या वर धरला न छातीशी घेतला. त्याचे मटाटा मुके घेतले. राणीच्या काळजात चर्र झालं. अण्णा त्याची मया करण्यात दंग झालं, ते पोर खिदळंत हुतं न चटकंं राणीला बसत हुतं. तिजीबी नजर त्या पोरावर खिळलेली!
एवढ्यात दादांनी हाक मारली न ती भानावर आली, "राणी, यी की गं!"
अण्णांनी आता वळून राणीकडंं बघितलं. राणीनं नजर चोरली. अण्णांना कळलं काय झालंय ते.
"नाय, कुरड्या करायच्या आहेत मामींच्याकडं, जाते." असं म्हणून राणी वाटंला लागली. आतनं दाटून येत हुतं पण असं बाहेर असताना ते डोळ्यांत येऊ नये म्हणून ती निकरानं चालू लागली. तरीबी तापलेल्या भुईवर तिच्या डोळ्यातनं पाणी पडलंच. पडलं तसं उडूनबी गेलं. पर रानीचं तसं नव्हतं! एक धागा उसवला म्हणून तो तोडायला जावा न सगळंच उसवून जावं असं तिज्या मनाच झालं हुतं.

ती कवा पोचली न तिनं कवा कुरड्या घालायला घेतल्या हे कायबी तिज्या ध्येनात नव्हत. ह्या येळात पका येऊन तिज्या मनात पिंगा घालून गेला हुता, तिज्या बापूंनी बाळंतपणाला कवा येणार, म्हणून तिला इचारलं हुतं, आन अण्णांनी सुपारी कातरत नातवंडांना मांडीवर खेळवायची गोष्ट केली हुती. असं काय झालं की तिजं मन सगळीकडं फिरून एकाच ठिकाणी येऊन थांबायचं, आणि आत्ता ते तिथं जाऊ नये म्हणून राणी धडपडत हुती, पण तिज ऐकलं ते मन कसलं! "जरा बघून नीट गोल-गोल घाल की, राणी, ए" मिश्रीच बोट तोंडात घालत बजाबाई खेकसली. राणीनं बघितलं तर तिच्या एकटीच्या कुरड्या जरा इस्कटल्यावानी दिसत हुत्या. रेखा, म्हणजी बजाबाईची सून मान खाली घालून नीट एकसारख्या कुरड्या घालत हुती. "व्हय मामी. शेवग्याचच काय की बघा", असं म्हणून राणी आता नीट कुरड्या घालायला लागली.

बजाबाई तिची चुलत सासू हुती, तिखट डोळ्यांची न त्यापेक्षा तिखट जिभंची बाई! तिज्या सुनेची, सूनच काय लेकांची बी तिज्याम्होरं बोलायची बिशाद नव्हती. बजाबाई तशी खमकी बाई! अण्णांचा चुलत भाऊ, म्हणजी तिजा नवरा रानात एक दिवस काम करताना चक्कर येऊन पडला न दवाखान्यात नेऊपर्यंत गेला. मागं तरणी बायको न दोन बारकी पोर! बजाबाईनं कंबर कसली. रातीचा दिस करून पोरांना वाढवलं, शिकवलं, दोघांचीबी लग्नं लावून दिली. राणीला ह्या गोष्टीच कौतुक वाटायचं पर तिला ती आवडायची नाही. तिज्या बोलण्यात कायम कुजकटपणा जाणवायचा. इजी म्हणायची, "नवरा गेल्यावर बाकीचं सगळं संभाळलं तरी तेजाच परिणाम हाय ह्यो. म्हणून अश्या कडवट झाल्या बघ."
राणी न रेखानं कुरड्या घालून संपवल्या. राणी जायला निघाली तशी रेखा म्हणली, "सरबत करते, दोन घोट पिऊन जा."
"तर तर, फुफाट्याच रानात काम करून दमलासा नव्हं? सरबत प्याला पायजे." बजाबाई करवादली.
रेखा गुमान आत आली, तिच्यामाग मग रानीबी आत गेली. "जरा म्हणून बसलेलं बघवत नाय बघ, म्हातारीला!! सारख आपलं ती मिश्री घासायची न नावं ठेवायची. बरं बोलायची म्हणून सोय नाय."
राणी काय बोलली नाय. अजुनबी तिज्या डोक्यातनं मगासचा विषय गेला नव्हता. ती तशीच भिंतीला टेकून खाली बसली. डोळं जमिनीकडं लागलेलं! रेखानं लिंबू चिरून सरबताच्या तांब्यात पिळलं. मग ते ढवळतच तिनं विषय काढला, "राणी, माझा एक चुलतभाऊ हाय, माहित्ये का तुला? शिक्षक हाय त्यो."
राणीला विषय कुठं जाणार हेजी कल्पना आली, रेखानं बी जरा अंदाज घेतला न ती सरबत द्यायला बाहेर गेली. राणीनं सरबताचं दोन घोट घेतलं. नाय म्हणलं तरी उनानं ती कावली हुती. तिला जरा बरं वाटलं.
एवढ्यात रेखानं आत येऊन परत त्योच विषय काढला, "त्यो परवा आला हुता, तुझ्याबद्दल इचारत हुता?"
राणीनं सरबत पिऊन पेला खाली ठेवला. "जिवाला गार वाटलं बग जरा." राणीनं विषय बदलला.
"राणी, असं किती दिस चालायचं गं? पोरगं चांगलं हाय, माझा भाऊ म्हणून नाय सांगत तुला, पदराला पदर जुळतोय. अण्णा भेटलेत बग. आणि आम्ही कुणी काय सुचवलं बी नव्हतं, पकाभावजींचा विषय निघाला आणि जाता जाता त्योच माझ्या कानावर घालून गेला हे."
राणी तशीच बसून राहिली. रेखान बी पुढं इशय वाढवला नाय.
मग राणी फाटकन म्हणली, "काय करूच वाटत नाय गं, परत संसार हूबा करायचा म्हंजी..."
रेखानं पेलं विसळायला घेतले. "आता हुणार की गं, पर तेवढंच धरून बसलीस तर कसं हुईल? बरं पोटाला पोरबाळ असतं तर जीव तरी रमला असता. तसंबी नाय काय!"
राणीनं खाडकन मान वरून तिज्याकडं बघितलं. तिला कायतर म्हणायचं हुतं पर तिजं शब्द घशातंच अडकलं, "अण्णा.." एवढंच ती कसंबसं बोलू शकली.
"अण्णांचं काय तवा? मस्त लेक हाय, एवढा चांगला जावई हाय ते सांभाळतील. तेंच राहील, हितं आम्ही नाय व्हय. रोजच्या दोन भाकऱ्या थापायला काय जड जातंय व्हय मला? आणि तेंनीबी म्हनतेतच की तुला लगीन कर म्हणून."
ह्यावर राणीकडं उत्तर नव्हतं.
एवढ्यात बाहेरनं बजाबाईचा आवाज ऐकू आला, "ह्यो पेला कोण आमचा बा घिऊन जाणार काय?"
रेखा बाहेर जाता जाता चटकन म्हणली, "आता सरबताला नाव ठेवत्यात, बघ हां."
आणि बजाबाईचा आवाज आलाच, "आं...सरबत करती म्हण, लिंबू हुता का त्यात? नको तिथं इचार करायचा."
तशा परिस्थितीत पण राणीला हसू फुटलं.
रेखा जाऊन पेला घेऊन आली, "लई हाय म्हातारी, बाराबोड्याची! उठल्यापास्नं झोपेपर्यंत निस्ती इवळत असती." रेखा जाऊन तिज्या तिज्या कामाला लागली.
राणीनं समोर नजर टाकली, म्होरल्या दारात बसलेली म्हातारी दिसत हुती. आता उनाच्या झळा लागत हुत्या.
तशी जमिनीला रेटा दिऊन म्हातारी उठली, "आई, आई, आई, गं, देवा इठ्ठला पांडुरंगा! गेली गं कंबर, गेली!" म्हातारी इवळतच आत आली. राणी तशीच तिज्याकडं बघत बसून राह्यली.

अण्णांनी पाव्हन्यासंगं चा पिला. पाव्हना त्यांना सदा गुरवाच्या चुलत्याबद्दल विचारत हुता. आधी देवळाची गुरवकी तेज्याकडं हुती, पर त्यांच्यात वाद झालं अन फुडं तेजा चुलता गाव सोडून गेला. तेज्या चुलत्याला देवळाची माहिती हुती, आणि पाव्हण्याला तेला जाऊन भेटून याचं हुतं. अण्णांनी त्याला पत्ता सांगितला, ‘जमलं तर त्याच्या पोराचा नंबर मिळतोय का बघतो’ असंंबी सांगितलं. पाव्हना खुश होऊन गेला. अण्णांना तेजं कौतुक वाटायचं. मन लावून काम करायचा त्यो! बाकी कसल्या भानगडीत पडायचा नाय. राणी सकाळधरनं अंगणात कायतर करत हुती. अण्णांनी आवरून टॉवेल डोक्याला गुंडाळला. आरश्याम्होरं आता नवीन पावडरचा डबा आला हुता. एवढे दिस गायब असणारी राणीची फणी बी तिथं हुती. ती जरा नीट राहायला लागलीये हे अण्णांच्या लक्षात आलं हुतं. आता ह्यो कशाचा परिणाम हाय, हे न कळण्याइतकं अण्णा दुधखुळं नव्हतं, पर ह्या निमित्तानं का हुईना तिजं मन रमतंय म्हणून त्यांना बरं वाटलं. अण्णांनी बाहेर बघितलं, तर राणी फुलझाडांना बघत हुती, पार वाळलेली झाडं तिनं उपसून टाकली हुती. बाकीच्यांना पाणी घातलं हुतं. अण्णांना आश्चर्य वाटलं. मागल्या पावसाळ्यानंतर त्यांनी तिकडं लक्षच दिलं नव्हतं. पकानंच कुठनं कुठनं रोप आणून लावली हुती, बकुळ, मोगरा, एक प्राजक्ताचं बी झाड हुतं. सणासुदीला बायका तेजी फुलं घेऊन गजरं माळायच्या. प्राजक्ताचं झाड फुलांनी बहरलेलं असलं की अख्खं घर निस्तं घमघमायचं. पर पका गेला न दोघांनाबी सूद राह्यली नाय, मग ह्या झाडांची काय कथा! आत्ता राणी त्या झाडाला पाणी घालत हुती, ते बी पार वाळलं हुतं, पर अजून तगून हुतं. अण्णांच्या मनात आलं विषय काढावा का नको? कालच बजाबाईच्या घरला ते मळणीसाठी ट्रॅक्टर सांगायला गेले हुते. तवा रेखानं हळूच त्यांच्या कानावर इशय घातला हुता. स्थळ खरंच चांगलं हुतं. पण राणीला आधी सांगूनबी ती काय बोलली नाय हेजा अर्थ तिज्या मनात नाय हे स्पष्ट हुतं. अण्णा जरा घुटमळले. "जगंल का ओ अण्णा?" राणीनं इचारलं. राणी प्राजक्ताच्या झाडाबद्दल इचारतं हुती. अण्णांनी 'होय' म्हणून मान डोलवली. दुपारच्याला रानात ती जेवण घेऊन आली की बोलू असं त्यांनी ठरवलं आणि ते बाहेर पडले.

अण्णा जगंल म्हणले हेजं राणीला बरं वाटलं. खरं तर आपण आधीच लक्ष द्याला पायजे हुतं असं तिज्या मनात आलं. ह्या पकाच्या आठवणी हुत्या, त्या तरी आपण नीट जपायला पायजे हुत्या. मन पार करपून गेलं असताना ह्या झाडांकडं बघावंबी वाटलं नव्हतं. तिला धुनं धुयाला जायचं हुतं. तिनं लगबगीनं कपडे घेतले, मग तिच्या धेनात आलं की सकाळी आपण पाव्हण्याला बी कापडं काढून ठेवायला सांगितलेत. खरं तर पाव्हना आला तवा तेजं त्योच कपडे धुयाचा, पार शर्ट, पँट सगळंच! मग तिज्या लक्षात आलं की तेला नीट धुता येत नाय, तेला तशी सवयच नाय म्हणून! तिनं अण्णांना सांगितल्यावर अण्णांनी त्याला आग्रह केला, तवा कुठं जाऊन त्यो शर्ट धुयाला देऊ लागला. तिनं मागं जाऊन बारडीतनं तेजा शर्ट घेतला. तिज्या मनात काय आलं कुणास ठाऊक? तिनं त्यो नाकाशी धरून त्याचा वास घेतला. "ए बया, कुणी बघितलं तर?" तिज्या मनात आलं आणि चटका बसल्यागत तिनं हिकडं तिकडं बघितलं. आजूबाजूला कुणीच नव्हतं. परत एकदा वास घेऊन बघायची तिजी तीव्र इच्छा झाली. तिनं ती दाबली, आणि उरलेली कापडं घेतली. तरी शर्ट टाकताना तिनं हळूच एकदा नाकाजवळ नेलाच!

"अवो, हितं मला तुम्ही धड काय सांगत नाय, आणि लेकीच्या घरला जाऊन राहणार व्हय. व्वा र वा!!" राणीनं अण्णांना बजावून सांगितलं आणि ती गोठ्यात शिरली. ह्यावर अण्णांकडं काय उत्तर नव्हतं.
अण्णांनी ती रानात आल्या आल्याच रेखाच्या भावाचा विषय काढला हुता. तिनं त्यो धुडकावून लावला.
"आता गं बया, गप गीळ की. तुला आणि काय धाड भरल्या?" राणी आत करडी गयीवर कावत हुती. करडी धडपडली, तसं अण्णा उठून हुबं राहिले. "तिला खोंड दावला पायजे, म्हणून करती ती तशी. ये बाहेर तू."
राणी बाहेर आली. मग अण्णांकडं येऊन म्हणाली, "आधी तुम्ही तुमच्यासाठी एक पोरगी बघा न करा लगीन! मग करती मी बी."
तिनं असा विषय तोडल्यावर अण्णा फुड काय बोलले नाहीत. ते तसंच झाडाबुडी पाव्हण्याची वाट बघत बसले, आज त्याला वाईचा वेळच झाला हुता.
"तुम्हाला वाढू का? ते खातील आल्यावर."
अण्णांनी नाय म्हणून मान डोलवली.
"हीच, आपल्याफुडं जगाचा इचार करायचा कायम!" असं म्हणून राणीनं त्यांना वाढायला घेतलं.
एवढ्यात पाव्हना आलाच, उन्हाचा चालून आल्यानं त्याचा चेहरा लाल झाला हुता. त्यो आला तसा राणीचा आवाज खाली आला. ती मुकाट्यानं दोघांनांबी वाढू लागली. हात-पाय धुताधुता तेनं अण्णांना सांगितलं, "अण्णा सॉरी, आज उशीर झाला. पण आज एक गोष्ट कळली मला." तो जेवायला बसला. एवढ्या उन्हातनं आला असला तरी बारक्या पोराला कायतर नवीन घावल्यागत त्यो बोलत हुता. त्यो बोलायला लागला की अण्णा लक्ष देऊन ऐकायचे. तसं रोजच दुपारी त्यो कायतर सांगायचा, पर आज उत्साह दांडगा हुता. अशा वेळी राणी अण्णांच्या आडोश्याला बसून तेज्याकडं बगायची, असं बोलताना तेजे डोळे चमकायचे ते तिला भारी वाटायचं. आज त्यो गाभाऱ्याबद्दल कायतरी सांगत हुता.
तेनं कायतर शोधलं हुतं म्हणे, "अण्णा, मला वाटतच होतं, पण आज कन्फर्म झालं बघा. तिकडे पिंडीची स्थापना नंतर करण्यात आलीये ना, आधी तिथे दुसरी मूर्ती होती, खरं ना?"
अण्णा जरा थांबले. तेंनी राणीकडं बघितलं आणि ते उत्तरले, "व्हय, त्यादिवशी सदानं तुम्हाला सांगायचं टाळलं."
त्याला लई आनंद झाला.
राणीला कळलं नाय ह्यात एवढा आनंद हुण्यासारख काय हाय ते. पर अण्णांना भाजी वाढत ती म्हणली, "म्हणून ते देवूळ बाटलेलं हाय म्हणत्यात, एकाच देवळात दोन येगळे देव असं कुठं असतंय का?" हे बोलताना तिनं अण्णांकडे रोखून पाहिलं. तिला नेमकं काय म्हणायचं हाय हे अण्णांना कळून चुकलं, तो मात्र शांत झाला. ती असं काही तरी बोलेल हे त्याला अपेक्षित नव्हतं. त्याच्याकडे यावर उत्तर होतं, पण आपण बोललो तर तिला काय वाटेल याचा विचार करून तो गप्प झाला.

उकाडा मरणाचा वाढला हुता. वळवाचं ढग याचं आणि वाकुल्या दाखवून निघून जायचं. अंग घामानं निस्तं निथळून निघायचं, अंगातली कापडं पार वल्लीचिंब हून जायची. बापय माणसांना तरी बरं हुतं, ती उघड्यानंच सावलीला पडायची. बायांची मात्र अवस्था वाईट झाली हुती. अजून दहा वाजायला आलं हुतं तवरच उन्हाची धग जाणवत हुती. इजी बाजूला बसली हुती, राणी कापडं धूत हुती. इजीला बारडी नीट उचलता येत नव्हती, तवाच राणीला कळलं की कायतर झालंय म्हणून. तिज्या हातावर मारल्याचे वन हुते. डावा हात जोरात पिरगळल्यामूळ ठणकत हुता. कोपरापाशी काळानिळा पडला हुता. राणीनं तिला गुमान बाजूला बसायला सांगितलं, आणि तिनं तिजीबी बारडी धुवायला घेतली. आज इजीबी गप हुती. राणीला हे माहीत हुतं. एरवी तोंडाचा पट्टा सोडणारी इजी, असं काय झालं की गप गप असायची. राणीच्या मनात बी निस्ता खैंदूळ चालला हुता. पाव्हना येऊन आता आठवडा उलटून गेलेला! ह्या आठवड्यात तिजं जग पार उलथपालथ झालेलं! जरा म्हणून चित्त थाऱ्यावर नव्हतं, बरं करावं काय ते कळत बी नव्हतं. राणी परत केस इंचरायला लागली न पावडर लावायला लागली हे बजाबाईच्या नजरेतन सुटलं नव्हतं. तोंडावर काय म्हणली नसली तरी राणी असताना तिनं रेखाला टोमणा मारला हुता. पाव्हना बी नजरानजर झाली की उगं गालातल्या गालात हसल्यागत करायचा. तेजी नजर आपला पाठलाग करती हे राणीनं हेरलं हुतं, तेला असं पकडलं की त्यो नजर चोरायचा न राणीचं मन पिसागत हलकं व्हायचं, पर तेवढ्यापुरतंच! मग दिसभर पकाचा चेहरा डोळ्यांम्होर येऊन तिज्या मनाला कुरतडत ऱ्हायचा. अशात कालपासन तिला पाळी आली हुती. मग तर बोलायची सोय नव्हती. पर ही बोलणार तरी कुणाला? आज ह्यो विषय आडून आडून का हुईना इजीसंग बोलायचा असं ठरवून राणी आली हुती, पर इजीचं हे असं झालेलं! इजी मान खाली घालून काटकीनं दगडावर रेघा मारत बसलेली. राणीला कळलं आता बोलून काय उपेग नाय ते. राणीचा कापडं धुयाचा तेवढाच आवाज येत हुता, तापलेलं नदीचं पानीबी गपगुमान वाहत चाललेलं! उन्हाचा तडाखाच असं हुता की बाहेर चिटपाखरूबी दिसत नव्हतं. इजीची कापडं धुवायची म्हणून दोघीच मागं थांबलेल्या!
"मी भाऊकडं जाऊन येती.", इजी अचानक बोलली.
राणीनं दचकून मागं बघितलं तर इजी उठून हुबी राहिली हुती. "आत्ता? असंच? आणि तेंना सांगायचं?"
इजीनं दुसऱ्या हातानं तिजी बारडी उचलली. "मरना का त्यो भाड्या! पोरांना घेऊन जाते, दुपारच्या एष्टीनं!" ईजीचा आवाज चिरका झाला हुता.
आता हिला सांगून काय उपेग नाय हे राणीनं ताडलं आणि तिजी तिजी बारडी उचलली. दोगी गुमान घराकडची वाट चालू लागल्या. आज राणी मुद्दाम देवळाम्होरनं गेली नाय, इजीच्या मागनं तीबी गावातल्या वाटंनं चालली हुती. एवढ्यात डाव्या हाताला बांबूच गचपण लागलं, तशी राणी जरा घुटमळली.

पवत पवत राणी पार नदीच्या मध्येपातुर आली हुती, पाण्याला चांगलीच वढ हुती. पर वाहत्या पाण्यात कस पवायचं हे तिला तिज्या बापूंनी शिकवलं हुतं. राणीला एकदम गार गार वाटत हुतं. सगळं हलकं झालंय, न ती सगळ्याच्या वर तरंगायला लागली असं! एवढ्यात कुणीतरी पाण्यात सूर मारला, तिनं बघितलं तर त्यो पका हुता. सपासप पाणी कापत त्यो तिज्यापाशी आला, "राने, आनू काय खजिना?" असं म्हणून त्यानं बुडी घेतली. त्यो तिज्या पाठीकडनं वर आला, राणीला हसू आलं. तेजा चेहरा पाण्यानं तकाकत हुता. पकानं परत एकदा बुडी घेतली न एवढा वेळ मोकळं असणारं आभाळ काळवंडलं. धो धो पाऊस बसरू लागला. नदीच्या पोटात शिरलेला पका काय बाहेर आला नाय. राणीनं हंबरडा फोडला.

नदी न्हील तिकडं राणी वाहत जाऊ लागली, तिला सूद म्हणून उरली नाय. वाहात वाहात ती कुठंतरी येऊन अडकली. तिनं बघितलं तर ती एका मोठ्ठ्या दगडाला थटली हुती. तिनं वर बघितलं तर चहूबाजूंनी अंधारल्यागत झालं हुतं, ती एका हिरीत हुती. हिरीतलं शेवाळलेलं पाणी घानत हुतं. तिज्या अंगाला सगळी घाण लागली हुती, ती हातपाय मारायला लागली, तसं ती घाण तिज्या नाकातोंडात जायला लागली, ती गुदमरायला लागली, वर जोरात आवाज झाला न राणी दचकून जागी झाली. ती घामानं पार भिजली हुती. तवर परत गडगडलं, ह्याच आवाजानं आपल्याला जाग आली हे राणीनं ताडलं. पडलेल्या स्वप्नानं ती भांबावून गेली. ती स्वप्न एवढं खरं हुतं की त्या हिरीतल्या पाण्याची चव अजून आपल्या घशात हाय असं तिला वाटल. असलं स्वप्न तिला पहिल्यांदा पडलं नव्हतं, पर मागं पडलं तेला लई दिस झालं हुतं. परत आवाज झाला तशी ती उठली, काल धुतलेल्या चादरी अजून बाहेरच हुत्या. पाउस याच्या आधी त्या काढाव्या लागणार हुत्या. ती तशीच फुडं झाली, वाटंतच पाव्हण्याची खोली हुती. कितीबी नाय म्हणालं तरी तिजी नजर तिकडं गेलीच न ती दारातच गपकन थांबली. पाव्हन्याच दार उघडं हुतं. पडदा निस्ता सरकवल्यागत केला हुता, न आत पाव्हना उघडाच पडलेला! अंगावर फक्त चड्डी हुती, ती मंतरल्यागत त्याच्याकडं बघत हुबी राहिली. तिजी नजर तेज्या उघड्या अंगावरनं फिराय लागली. फिरत फिरत खाली सरकाय लागली. तेनं हाय अस्सं येऊन आपल्याला घट्ट मिठीत घ्यावं असं तिज्या मनात आलं. तिच्या अंगात जाळ उठला. तेनं खरच मिठीत घेतलं तर, ह्या कल्पनेनं अंगावर सरसरून काटा आला. एवढ्यात परत ढग गडगडलं आणि पाव्हण्याला जाग आली. राणी तशीच हुबी हुती, तेज्याकडं बघत. एका सेकंदापुरतीच तेंची नजरानजर झाली न इंगळ्या डसल्यागत राणी हालली. आता काय उपेग नव्हता, आग्या मव्हाच्या पोळ्याला तीन दगुड हाणला हुता. माश्या उठल्या हुत्या. तिला कळायच्या आत तिज्या मनाला माश्या डसायला लागल्या. तिला बेजार करायला लागल्या, तिजं मन कुरतडायला लागल्या. ती कापडं तशीच टाकून मागं न्हाणीत पळाली. जाऊन नळ चालू केला न ती तशीच नळाखाली बसली. गारकिच्च पाण्यानं तिला हुडहुडी भरली, पण माश्या डसायच्या काय कमी झाल्या नव्हत्या. ती कितीतरी वेळ तशीच नळाखाली बसून हुती. कितीतरी वेळ.

झोप नीट न झाल्यानं रानीचं डोकं ठणकत हुतं. त्यात पहाटेचा प्रकार काही केल्या तिज्या मनातनं जात नव्हता. तेनं बघितलं तरी आपण तिथंच हुबं हुतो, हे आठवून तिजं लाजंन पाणी पाणी होत हुतं. येताळागत हे सगळं तिज्या मानगुटीवर बसलं हुतं, तिला काय करून देत नव्हतं. मगाशी एकदा दूध उतू गेलं हुतं, अत्ताबी तिजं नीट लक्ष लागत नव्हतं. तिनं सरळ उलथनं चुलीत घातलं आणि तापलेल्या उलथन्यानं मनगटाच्या अलीकडं चटका दिला. जळक्या कातड्याचा वास आला न तिला जोरानं बोंब ठोकू वाटली. तिनं पदराचा बोळा तोंडात कोंबला. अख्ख्या अंगाचा भडका उडाल्यागत वाटत हुतं, मात्र आता डोक्यातली भणभण थांबली हुती, न अख्ख्या डोक्यात कळ पसरली हुती. तिला घेरी आल्यागत झालं म्हणून ती तशीच मटकन खाली बसली.

अण्णांचा जीव निस्ता वरखाली होत हुता. तेंच्या डोक्यात मळणीची गणित चाल्लेली, म्हणून मगाशी राणी चहा घेऊन आली तवा त्यांचं लक्ष तिज्या हाताकडं गेलं नाय. पाव्हण्यानं इचारलं म्हणून बघितलं तर तिज्या हातावर एक टरटरीत फोड आलेला! अण्णांनी चहाचा कप तसाच खाली ठेवला. तेंचा जीव पार घाबरा झाला. "काय नाय, बंब भाजला," म्हणून राणी सांगत हुती पण अण्णा ऐकायला तयार नव्हते. फोड बऱ्यापैकी मोठा हुता. पाव्हण्यानं मलम आणून दिला. तेंनी ते तिज्या हातावर लावलं न लगोलग तिला घेऊन ते बाहेर पडले, संगं पाव्हना बी हुता. अण्णा तिला घेऊन सरळ डॉक्टरकडं गेलं. डॉक्टर नुकताच आला हुता. अण्णा आणि राणी आत गेले न पाव्हना बाहेरच थांबला. त्यो बी चुळबुळत हुता. तिला चुकून भाजलं नाहीये असं त्याला वाटतं हुतं, पण ती असं कशाला.....आणि तेज्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

अण्णांनी मळणीची सगळी यवस्था आधीच लावून ठेवली हुती, खळ्यात ज्वारी पडून हुती. अजून मळणी फुडं ढकलली तर पावसाचा धोका हुता. पर रेखा न राणीनं त्यांची समजूत घातली तवा कुठं ते तयार झालं. दोन दिवस अण्णा, पाव्हना आणि राणी तीघबी रेखाकडंच जेवायला हुती. अण्णांनी तिला नीट बरं हुईपर्यंत चुलीपाशी जाऊ बी नकोस असं दरडावून सांगितलं हुतं. भावनेच्या भरात आपण काय करून बसलो हे राणीला कळलं हुतं, आणि आता तर तिला अजून अपराधी वाटत हुतं. पावण्याच्या चेहऱ्यावरलं हसू पार मावळलं हुतं, त्यो आता घुम्यागत असायचा. अण्णांच्या संग बी जेवढ्यास तेवढं बोलायचा. देवळात त्यो आता अजून जास्त वेळ थांबत हुता आणि राणीकडं तर त्यो मान वर करूनबी बघत नव्हता. जणू तेला बरोब्बर कळलं हुतं की तिनं असं का केलं ते. पर, तिला काय लागलं तर त्यो मदत करायचा.

आता पू निघून गेला हुता. डॉक्टरनं औषधंबी दिली हुती. परवा रातच्याला तिच्या हातावरची पट्टी सुटली हुती, तर अण्णांच्या सांगन्यावरनं त्यानं पट्टी केली हुती, ती बी एकदम डॉक्टरसारखीच!! बाहेर झाडांना पाणी घालताना तिज्या डोक्यात हे सगळं चालू हुतं. आज पाव्हना गुरवाच्या चुलत्याला भेटायला म्हणून शहरात गेला हुता. ‘तेज्यासंग आपण बोलाव का', असं तिज्या मनात याचं, पर काय बोलावं न कसं बोलावं हे तिला कळायचं नाय. पाणी घालून तिनं झाडांकडं बघितलं, आता तेंना जरा टवटवी आल्यागत वाटतं हुती. खरं तर, पकाच्या आठवणी आता धूसर झालेल्या! आधी जसं व्हायचं तसं आता होत नव्हतं. पाव्हना आल्यानं ही गोष्ट तिला अजूनच नीट कळली हुती, म्हणूनच का काय तिला असं अपराधी वाटत हुतं. तिला एक गोष्ट कळून चुकलेली, मागचं धरून बसून काय हुणार नाय. तिला स्वप्नाची आठवण झाली, हिरीतल्या स्वप्नाची! एवढ्यात कसल्यातरी आवाजानं ती भानावर आली. पाव्हना आला हुता, तो न थांबताच आत गेला. ती पण त्याच्या मागोमाग आत गेली. हातपाय धुवून तो बाहेर सोप्यावर आला, ती पण पाणी घेऊन आली.
"चा ठिऊ का?" तिनं इचारलं.
"नाही नको. मी घेतला होता. मी जाईन आता. या तुमच्या गोळ्या, तिकडून आणायच्या होत्या." असं म्हणून त्यानं गोळ्याचं पाकीट सरकवलं.
"बसा, सरबत करते." असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न बघता ती आत गेली.
तो तसाच चुळबुळत बसून राहिला. ती त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी सरबत घेऊन बाहेर आली.
त्यानं ग्लास उचलला पण नजर खालीच होती.
"तुम्हाला पायजे ती माहिती मिळाली का?" तिनं पाव्हण्याला सवाल केला.
तो जरा गोंधळला, मग बोलता झाला, "हां. म्हणजे सगळी नाही पण मिळाली. आधी त्या मंदिरात मूर्तीच नव्हती, बरेच वर्षं! पडीक होतं ते मंदिर. मग तुमच्या गावातल्या एकाला दृष्टांत झाला न त्यानं तिथे पिंडीची स्थापना केली. आणि, तो पुढचा सभामंडप, डागडुजी हे सगळं तेव्हाच झालंय." त्यानं सरबत संपवून पेला तिच्या पुढ्यात ठेवला.
तो जायला म्हणून उठला. ती पण पेले घेऊ आत निघाली.
तो थांबला न मग बोलला, "म्हणजे असं नाहीये की एक मूर्ती काढून तिथे दुसरी ठेवलीये. तरीही ते मंदिर बाटलेलं म्हणायचं का?" ह्या प्रश्नासरशी त्यानं तिच्या डोळ्यांत बघितलं.
तिला काय बोलाव कळलं नाही, त्यानं असा प्रश्न का विचारला तेही तिला कळलं नाही. ती काही बोलणार इतक्यात तो वळून निघून गेला. त्याचा प्रश्न मात्र तो तिच्याकडं सोडून गेला.

चार दिवसांसाठी गेलेली इजी आठ दिवस राहून परत आली. आली तवा ती खुलली हुती, तिला राणीच्या भाजण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आज दोघी मिळून लई दिवसांनी पवायला आल्या हुत्या, राणीनं तिला सगळं सांगितलं, सगळं! कायबी मनात न ठेवता. पवून दोघीजणी काठावर बसल्या हुत्या. दमल्या असल्या तरी मन कस गार झालं हुतं, राणीला बोलल्यामुळं हलकं वाटत हुतं. इजीनं तिला बोलून दिलं हुतं, सगळं ऐकून घेतलं हुतं. जरा वेळ थांबून इजी म्हणली, "ही जागा कशी घावली ते कधी सांगितलं नाय नव्ह मी?"
"क्च!" राणीनं मान उडवली.
"सुरवातीला हेंनी मारायचे तवा लई वंगाळ वाटायचं, एकदा तर मारत बाहेर आणली, आईबाचा उद्धार केला. गणा अजून ल्हान हुता. तशीच डोस्क्यात राग घिऊन नदीवर आले, मग बारडी तिथंच टाकून वाट फुटंल तिकडं चालत सुटले. हितं आले, हितं कुनीबी नव्हतं. पायाला दगड बांधून नदीत उडी घ्याची असं ठरवलं. हितं बुडख्यात अडकलेल्या चिंधीनं एक दगुड बांधला न मारली उडी! पण उडी मारल्यावर अवसान गळालं बग माजं. जोरात हात मारलं, पायाला हिसडं दिलं. ती चिंधी फाडली न दगुड दिला सोडून! मग पवत बसली हुती, किती वेळ कुणाला ठाव! बाहेर आले तर मोकळं झाल्यागत वाटलं. मनात इचार आला, "त्यो भाड्या असं करतोय म्हणून मी का बाई मरू? तेजं काय का हुईना, आपल्या लेकाकडं बघून दिस काढू."" इजी बोलायची थांबली.
राणीनं तिज्या हातावर हात ठेवला.
"पर राणी, तरीबी गावं काय म्हणंल, लोकं काय म्हणतील म्हणून मार खातच बसली बघ मी. आता नाय खाणार, भाऊ म्हणला पोराला घेऊन ये हिकडं. कायतर काम करून, कष्ट करून वाढवीन तेला. पण ह्या भाड्याला अंगाला हात लावू देणार नाय."
राणीला हे ऐकून बरं वाटलं, ती काय बोलली नाय पण तिनं हसून इजीकडं बघितलं.
"जा, जा." इजी म्हणली, "आन तू? तिथंबी नदी हाय, तिथ पवायला नको का कोण माझ्यासंगं? तिथला पोरगा बघू का?" राणी परत हसली. इजीच्या मागं गचपनातनं लांबवर महादेवाच्या मंदिराचा झेंडा दिसत हुता.
"इजे, म्हादेवाच मंदिर खरंच बाटलेलं हाय का गं?"
"ए बया ही काय मधीच." इजी गोंधळली.
"सांग तर!" राणीनं लावूनच धरलं.
"क्च कुठलं काय? त्या सदा गुरवाच्या चुलत्याकडं हुती आधी गुरवकी! तेंचं कायतर वाजलं न ती सदाच्या बाकडं आली, तवा गाव सोडून जायच्या आधी त्यो हे गावात उठवून गेला. आधी निसतंच मंदिर हुतं म्हणं, देवच नव्हता आत. आता असं कुठं असतं का? मंदिराला देवाशिवाय न देवाला मंदिराशिवाय किंमत हाय का?"
राणीचे डोळं चमकलं. तिला तेज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हुतं.
"अशी का हसलीस?", इजीनं इचारलं.
"काय नाय."
"पाव्हन्याचं कायतर हाय न ह्यात?" इजीनं अंदाज लावला.
"त्यो हेज्यासाठी त्या गुरवाच्या चुलत्याला भेटून आला. तुलाच भेटवायला पायजे हुतं." राणी परत हसत म्हणली.
"तर तर, तू कुठली भेटवत्यास तेला." इजीनं डोळा घातला.
राणीला अजून हसू फुटलं.

पाऊस येतोय का काय असं रोजच वाटायचं, पण आज नक्की पडणार असं दिसत होतं. आज जास्तच उकडत होतं म्हणून ऋतुराज बाहेर येऊन बसला. त्याचं डॉक्युमेंटेशन करून झालं होतं. फोटोपण हवे तसे मिळाले होते. उद्या निघणार म्हणून त्यानं अण्णांना आज सकाळीच सांगितलं होतं. एवढ्यात त्याला लांबून राणी येताना दिसली, तिला पाहून तो जरा सरसावून बसला. ती आली तशी थेट मंदिरातच आली. आज ती वेगळी भासत होती. पण त्यानं तिच्याकडं फारसं नीट बघितलं नाही. ती त्याच्याकडं बगून हसली आणि घंटी वाजवून आत गाभाऱ्यात गेली. कदाचित नमस्कार करत होती, ते करून ती बाहेर आली. तो जरा अवघडला होता, पण ती अशी अचानक मंदिरात का आली ते त्याला कळलं नव्हतं. "रोजच्या वाटेवरच देवूळ, पर आत आले नव्हते, तुमच्यामुळं आले." असं म्हणून हसून तिनं त्याच्याकडं बघितलं. तो ही हसला. बाहेर आता वारं सुटलं होत, ढग गडगडत होते. दोघांनाही काय बोलावं कळालं नाही. ती तशीच उभी होती, त्याच्याकडे बघत. "पाऊस पडतोय वाटतं..." तो बाहेर बघत बोलला.
"पडूदे एकदाचा! कवाधरन अडलाय, हुंदे मोकळा." असं म्हणून ती बाहेर पडली.
एव्हाना धूळ उडायला सुरुवात झाली होती. ती तशीच पुढे झाली, तो तिच्याकडेच बघत राहिला.
मग अचानक ती वळली आणि म्हणाली, "आज लवकर या घरला. उद्या जाणार म्हणून अण्णांनी खास बेत करायला लावलाय. येशिला नव्हं?"
त्याला हे अगदीच अनपेक्षित होत. तो गडबडला, त्यानं फक्त मान डोलवली आणि ती मनमोकळं हसली. तिचे डोळे लकाकेलेले त्यानं पहिल्यांदा पाहिले, एवढं सुंदर काहीतरी गेल्या खूप दिवसांत बघितल्याचं त्याच्या लक्षात नव्हतं.
ती तशीच वळून निघून गेली, एव्हाना धुळीचे लोट उडायला सुरुवात झालेली! ती त्या धुळीमध्ये जणू गायब झाली. पावसाचा एक थेंब त्याच्या गालावर पडला आणि तो भानावर आला. बघता बघता अंधारून आलं, आणि अक्षरक्षः पाऊस कोसळू लागला. ती म्हणाली तसाच कोसळत होता पाऊस! जणू खूप दिवसांपासून तो अडलेला असावा. तिनं घरात पाऊल ठेवलं आणि पावसानं जोर धरला.

मातीचा वास समदीकडं घुमू लागला, पावसाच्या धारा छपरांवर तडतड वाजू लागल्या. राणी तशीच सोप्यात हुबी राहिली, पावसाकडं बघत. मातीचा वास तिनं छातीत भरून घेतला. सगळीकडं पाण्याचे वघूळ वाहू लागलं, झाडं डुलाय लागली. आडलेलं आभाळ बरसत हुतं, मोकळं होत हुतं. सगळं गार गार वाटत हुतं, एवढे दिस तापलेली भुई न्हात हुती. झाडांवर न पानांवर बसलेलं मातीचं थर धुवून निघत हुतं. बारकी पोरं चेकाळली हुती, पावसात नाचत हुती. पाव्हण्याला मोकळं हुणार आभाळ मगासच्या राणीच्या चेहऱ्यागत भासत हुतं. राणीची नजर अडकली हुती, अंगणातल्या फुलझाडांवर!! तेंना नव्या कळ्या उमलल्या हुत्या.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान आहे कथा. ओघ आहे, उपमा सुरेख आहेत. नवीन काही शब्द कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप खुप आवडली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पहा काही उदाहरणे,
"बुडणारा सूर्य सवाष्ण बाईच्या कपाळी असणाऱ्या कुकवागत दिसत हुता. वर काळ्या ढगांनी दाटी केली हुती. घरला येणाऱ्या गुरांच्या कळपावाणी अगदी संथगतिनं ढग खालतीकडं चालले.
घर तसं टापटीप होतं पण घराला मरगळ आल्यासारखी झाली होती. टीव्ही चालू होता, मात्र बघत कोणीच नव्हतं.
तिचे डोळे मात्र त्याला एकदम वेगळे वाटले, सुकलेले, हरवलेले! तिनं स्लोमोशनमध्ये येऊन त्याच्यासमोर चहा ठेवला,

खिडकीतनं टिपूर चांदणं राणीच्या हातवरुन सांडलं हुतं. मगाशी जमलेलं ढग कुठल्या कुठं पळालं हुतं, पर तिज्या मनात इचाराच्या ढगांनी दाटी केली हुती.
सांच्याला चुचकारून गुरांना घराकडं घेऊन यावं, तशी ती मनाला आवरत हुती, पण तिचं मनबी द्वाड!! आगाव वासरावानी चौफेर उधळत हुतं.
पर तेला बघून तिला काय तर येगळंच वाटलं. म्हणजी गार पाण्याचा हाबका तोंडावर मारल्यागत!
डोळं बोलक हुतं पर तेंचा थांग लागत नव्हता; नदीच्या पोटातल्या डव्हावाणी!
आत्ताबी सूर्याची किरणं सभामंडपात रेंगाळत हुती."
काय भाषा ! सहज सुंदर ! कथेतील व्यक्तिमत्वाशी तन्मयता साधणारी. असे लेखन क्वचितच वाचायला मिळते. म्हणून संपादकांंचे आभार मानायला पाहिजेत.
ती नायिका आणि तिचा भावनाकल्लोळ महत्वाचा. बाकीची पात्रे निव्वळ मांडणीसाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करेक्ट या उपमांनी कथेला वेगळाच बाज आणला आहे. तुम्ही म्हणता तसा नायिकेचा भावनाकल्लोळ अत्यंत समर्पक रीत्या समोर येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा आणि 'घरटं' कथा वाचून मला आपण कधीही एवढ्या निरागस नव्हतो ह्याची जाणीव झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यापूर्वीही ग्रामीण वातावरणातल्या खूप कथा, कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्यापेक्षा वेगळी वाटली. आता काळ बदलला आहे त्याचे संदर्भ चपखलपणे कथेत येतात.शब्दसंपदेतही भर घालणारी कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋतुराजचा दृष्टिकोन आणि राणीचा दृष्टिकोन वेगळा करण्यासाठी निवेदकाची भाषा बदलण्याची लकब वेगळीच आहे, कल्पक आहे. (साधारणपणे अन्य कथांतले तिऱ्हाईत निवेदक कमीअधिक तटस्थ असतात, पण इथे अक्षरशः वेगळे दृष्टिकोन आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रदर्शी लेखन. एकेक वाक्य पुनःपुन्हा घोळवून घोळवून वाचून पाहिलं. आक्षी रानातून अधमुरी वरबाडलेली करवंदं चघळत चघळत पांदावरनं निवांत घरला यावं आस्सं झालं पघा! लैच झ्याक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0