Skip to main content

अवकाळी पावसाची आगाऊ आज्ञापत्रे

हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक

हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव

हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव

हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे

हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् दरडस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे

शॉडेनफ्रॉयडा (Schadenfreude) : परदुःख शीतल

आपल्या जवळपास कुठेही एखादी छोटी-मोठी दुःखद घटना घडलेली कळल्यास आपल्यातील बहुतेक जणांना विषाद वाटतो. अगदीच जवळचे मित्र, नातेवाईक, परिचित असल्यास दुःखही वाटत असेल. अपघातात वा नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असल्यास थोडी फार हळहळ वाटेल. (परंतु शत्रु म्हणून आपण अगोदरच ठरविलेले असल्यास चार शिवी देत उत्सव साजरा करण्यासही आपण मागे पुढे पाहणार नाही.) त्या घटनेत ज्यांच्यावर दुःख कोसळले असेल त्यांच्याबद्दल सहानुभूती, करुणा, दया वाटणे स्वाभाविक असते. परंतु अगदी खोल मनात जाहीरपणे उच्चारता न येणारे कुठेतरी समाधानही वाटत असते, हे नाकारण्यात अर्थ नाही.

रिसेप्शन

रिसेप्शन
मी ऑफिसातून घरी परत आलो होतो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो.
“भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.”
मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते.
“हे वाघमारे म्हणजे...”
“आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला. “आमच्यात अशी आडनावे नसतात.”
“माझेही वाघमारे नावाचे कोणी नातेवाईक नाहीत.”

Time Machine.

अविनाश हार्डीकर! हा माझा जीवश्चकंठश्च मित्र. बालपणापासून. त्याच्या नावातही जादू आहे. म्हणजे असं पहा. हार्डीकर! मधला हार्डीचा संबंध थेट केम्ब्रिजच्या गणिती हार्डी शी तर हार्डीकर! मधला हार्दिक पांड्या तर तुम्हाला माहीत” असणारच. पण हार्डीकर! मधली हार मात्र त्याने कधीही मानली नाही. कर म्हणजे करच असा त्याचा बाणा होता. तो स्वतःचे नाव उद्गारवाचक चिन्हांसकट लिहित असे आणि दुसऱ्यानीही तसच लिहावे असा त्याचा आग्रह असे. कुणी जर त्याला “अरे हार्डीकर” म्हणून ओरडूनही हाक मारली तर ती त्याला ऐकू जात नसे, पण तेच जर कुणी त्याला मुंबईच्या कोलाहालात हळुवार “अरे हार्डीकर!” असे संबोधले तर लगेच ऐकू जाणार. असो.

‘अडॉलेसन्स’ - किशोरवयीन मनांचं अपरिचित जग

समाज म्हणून आपल्याला किशोरवयीन मुलांची मानसिकता समजून घेणं आता अधिक महत्त्वाचं आहे. ‘अडॉलेसन्स’सारख्या मालिकांमुळे हा संवाद अधिक सुकर होऊ शकतो.

निघा निघा चिऊताई

निघा निघा चिऊताई 
सारीकडे काँक्रीटले 
दाणा पाणी हरवले 
शहरी ह्या

विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी 
डोळ्यावर झोप कशी 
अजूनही

उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे 
अखेरचे

झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी 
येईल का मग कोणी 
बाळाला ह्या

बाळाचे मी घेता नाव 
जागी झाली चिऊताई 
बाळासकट ती जाई 
कायमची!

अभ्यासोनी मग

"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले

"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"

असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना

आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?

अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
आता Grok हाती | असताना !

जे जे कृ बु सांगे | ठोकतो मी तेच
अधे मधे ठेच | लागेना का

वायफळ मळे | पिकवू अमाप
काळाची झडप | येवो सुखे

भारतीय विद्यार्थ्याचे अमेरिकेत उच्चशिक्षण..

परवा एका मित्राचा खूप दिवसांनी फोन आला. त्याचा मुलगा इंजिनियर होऊ घातलाय. पुढे काय करावं या विचारात आहे. हा मित्र भारताबाहेर फक्त फिरायला गेला आहे, कधी देशाबाहेर काम केलेले नाही. त्याला त्याच्या मुलाने प्रवेश मिळतोय तर अमेरिकेत MS करायला जावे का असा प्रश्न पडला आहे.

मी अनेक वर्षे भारताबाहेर राहिलो म्हणून त्याला वाटलं की मला बरंच कळतं, पण तेही खरं नाही. मी युरोप आणि आशियात बऱ्याच देशांमध्ये काम केले, पण कधी अमेरिकेत गेलोही नाही. त्यामुळे ऐकीव माहिती वरून त्याला काही सांगू शकत नाही. त्याला माझं मत जाणून घ्यायचं आहे पण मलाच माहिती नाही.

त्या तरूतळी

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!