'ती'

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

'ती'

- अभिरूची

ज्या दिवशी ती या घरात राहायला आली त्याच रात्री भांडणाच्या आवाजांनी तिला जाग आली. घड्याळात बघितलं तर रात्रीचा एक वाजला होता. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. एक स्त्री कुणाला तरी शिव्या देत होती आणि ते नुस्तं शिव्या देणं नव्हतं, तर ती ओरडत होती. जणू समोरची व्यक्ती तिला काही करत आहे. पण बाकी कुणाचा आवाज येत नव्हता.

तिला मागे ती नाशिकमध्ये असतानाचा प्रसंग आठवला. रात्री कामावरून उशिरा परत येत असताना रिक्षा मिळत नव्हती म्हणून ती चालत घराकडे चालली होती. मध्ये झोपडपट्टी लागायची. ही स्वतःच्याच विचारात असताना समोरून एक बाई अस्ताव्यस्त धावत आली, मोठ्यानं हंबरडा फोडत. त्या बाईला आगीनं वेढलं होतं. एका क्षणी ती हिच्या समोर आली, पण काय करावं काही कळेना. तेव्हा हातातल्या बाटलीतलं पाणी तिच्या अंगावर टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला होता तिनं. तेवढ्यात कुणी पळत आले आणि त्या पेटलेल्या बाईभोवती कांबळं गुंडाळलं.

आत्ता या बाईचा आवाज अगदी तसाच येत होता. पण फ्लॅटमध्ये असं कुणी पेटवणार नाही अशी तिनं स्वतःची समजूत काढली. ती आता पुरती उठून बसली. त्या स्त्रीच्या किंकाळ्या चालूच होत्या, "मार मला, मारून टाक एकदाचं."
तेवढ्यात समोरच्या कोणत्यातरी इमारतीमधून कुणी ओरडलं, "ए गपे, काही काळवेळ आहे की नाही!" आणि त्या स्त्रीचा आवाज अगदी पूर्ण थांबला. कुत्रे भुंकत असताना जोरात 'हाऽड' म्हणलं की ते असेच थांबतात, क्षणात.

रात्री पुढे तिला झोप आली नाही. सकाळ झाली तशी बाकीचं आवरण्यात या विषयाचा काही काळासाठी विसर पडला. सध्या काही दिवस ती कामावर जाणार नव्हती. घर लावायचं होतंच, पण काही दिवस तिला निवांतपणाही पाहिजेच होता.

दुपारपर्यंत तीन खोल्यांपैकी एक लावून झाली. ती दमून खाली बसली. तिथेच जरा आडवं व्हावंसं वाटलं. तिला झोप लागली चक्क. पाच मिनिटं झाली असतील नसतील, ती बेलच्या आवाजानं दचकून जागी झाली. दारात एक वयस्कर बाई होत्या. त्या खालच्या मजल्यावर पण समोरच्या भागात राहतात अशी त्यांनी माहिती दिली. एकीकडे चौफेर बघत आत येत त्या येऊन बसल्या. नवीन कुणी राहायला आलं की बायकांकडून जशी टिपिकल चौकशी होते तशीच त्यांनी केली. तिला एव्हाना सवय झाली होती. त्या बाई इतक्यात जातील असं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. त्यांना या बिल्डिंगमध्ये येऊन पंधरा वर्षं झाली होती. ऐन तरुणपणी नवरा वारल्यावर, परत लग्न न करता कसं मुलींना वाढवलं अशा पद्धतीचं स्वतःचं सांगण्यात त्या रमून गेल्या होत्या. आपण पूर्ण लक्ष देऊन बोलणं ऐकतोय हे भासवण्याचा तिनं प्रयत्न केला आणि तेवढ्यात वरच्या मजल्यावरून जोरात किंचाळण्याचा आवाज झाला. ही चपापून उठली. त्या बाई समोरच्या बाटलीतलं पाणी पीत होत्या. हिला वर काय घडत आहे याबद्दल विचारावंसं वाटत होतं; ती काही विचारणार तोच त्या जायला निघाल्या. त्या जात आहेत म्हणून बरं वाटलंच पण वरच्या मजल्यावर काय प्रकार चालू आहे हे त्यांना न विचारता आल्यामुळे ती नाराजदेखील झाली. मगाशी ऐकू आलेल्या किंकाळीनंतर आता कोणताच आवाज येत नव्हता.

रात्रीचं जेवण तिनं बाहेरून मागवलं. पार्सल घेऊन येणाऱ्यानं कितवा मजला, घर नंबर हे विचारायला फोन केला. खाली वॉचमन होता पण त्याला ही राहायला आलेली माहीत नव्हती, त्यामुळे पार्सल घेऊन आलेल्या मुलाला तो वर जाऊ देईना. मग पार्सल घ्यायला तिला खाली जायला लागलं. रात्रपाळीसाठी जो वॉचमन होता, त्याला तिनं स्वतःची ओळख करून दिली. पाण्याच्या वेळा, कचरेवाल्याची वेळ वगैरे विचारून घेतलं तिनं. तिला राहून राहून वाटत होतं की त्या बाईबद्दल काही विचारावं का? पण हिंमत होत नव्हती तिची. तेव्हाच एक मुलगी आणि तिची आई वाटावी अशी एक बाई बाजूनं जाताना तिनं बघितल्या. वॉचमननं त्यांना थांबवले आणि सांगितले, या ताई तुमच्या खालच्या मजल्यावर काल राहायला आल्या आहेत म्हणून.

तिला जबरदस्त धक्का बसला. कालपासून जो आवाज ऐकू येतोय तो हिचा आहे तर. तिनं मनात नोंद करून घेतली. ती बाई चाळिशीतली असावी. मुलगी लहान होती. बाईनं मुलीला 'हाय कर' म्हणून सांगितलं. कुठून आलात, काय करता वगैरे चौकशीनंतर त्या बाईंनी तिला सकाळी चहासाठी बोलावलं. तिनं बरेच आढेवेढे घेतले पण त्या लहान मुलीनंसुद्धा जेव्हा आग्रह केला, तेव्हा मात्र तिला नाही म्हणता आलं नाही. पार्सल घेऊन ती वर आली. जेवून गच्चीतल्या खुर्चीवर बसून राहिली. समोरच्या बिल्डिंगमधला टीव्ही मोठ्या आवाजात चालू होता. काल 'चूप' म्हणून जो ओरडला असावा तो याच घरातला पुरुष असेल असं उगीचच वाटलं. खुर्चीत रेलून बसताना तिचं लक्ष वर गेलं. वरच्या खिडकीची काच अर्धी फुटली होती. त्या जागी पांढरा प्लास्टिकचा कागद लावला होता. काच कशी फुटली असावी यावर तिनं तर्क करायला सुरुवात केली. त्यात तिचा बराच वेळ गेला. झोप आलीशी वाटून ती आत आली. बाहेरच्या खोलीत खाली गादी टाकून आडवी झाली. वरून काही आवाज येतो का याकडे ती लक्ष देऊन होती. पुढे डोळे कधी मिटले कळलंच नाही.

जाग आली तेव्हा पूर्ण उजाडलं होत. आज चहाला वरती जायचं होतं, तिला आठवलं. चहाला जायचं म्हणजे पहिल्या चहाला जायचं की नाश्त्याच्या वेळच्या या विचारात ती पडली असताना, वरून त्या कालच्या लहान मुलीचा आवाज आला, "मावशी, आई चहाला बोलावतीये." ही गच्चीत गेली. ती मुलगी खिडकीत येऊन बोलत होती. "आलेच," म्हणत ही आत आली. कपडे बदलून जायला हवं, असा विचार करत बॅग उघडली. वर होता तोच ड्रेस घालून ती निघाली. वरचं दार उघडंच होतं. तरी तिनं दारावर नॉक केलं. लहान मुलगी बाहेर येत ओरडली, "आई, मावशी आली."
"आलेच हं, बसा तुम्ही," असा आवाज आतून ऐकू आला. ती समोरच्या मोठ्या खुर्चीवर बसली. तिच्या डावीकडे ती काच तुटलेली खिडकी होती. ती तिथे बघत असतानाच त्या बाई बाहेर आल्या. "सॉरी हं, आज नेमका उठायला उशीर झाला," त्या म्हणाल्या.
"मग कशाला चहाचं उगीच मध्येच," ती म्हणाली.
"त्यात काय, आमच्यासाठी करायला लागणारच होता. चहा आणते," असं म्हणत त्या बाई आत गेल्या.

आमच्यासाठी म्हणजे नवरा असावा, ही मनात बोलली. तेवढ्यात एक पुरुष बाहेर आला. लहान मुलगी बाबा करून उगीचच बिलगली. नमस्कारासोबत चार-दोन शब्दांच्या देवाणघेवाणीत समजलं की हा तिचा नवरा. म्हणजे ती काल याच्यावर ओरडत होती. पण हा तसा काही करेल असं वाटत नाही, अर्थात ती बाई पण कुठे वाटते वेगळी, नॉर्मल तर वाटते. नवरा-बायकोत होतात तशीच भांडणं आहेत, फक्त काल आकस्मिक आवाज आल्यामुळे आपण दचकलो, हे इतकं तिचं परत मनात बोलून झालं.

बाई चहा घेऊन आल्या. त्याच्या हातातून मग घेताना तिचं लक्ष त्या बाईच्या हाताकडे गेलं. मनगटापासून खाली दहा ते बारा टाक्यांच्या खुणा होत्या. तिनं त्या बाईकडे बघत चहावर नजर फिरवली आणि पहिला घोट घेतला. चहा अगदीच बेचव होता. समोरची बिस्किटं घ्यायला ती बाई सांगत होती. पण इतक्या सकाळी काही खायची सवय नाही, असं ती खच्चून खोटं बोलली. नवरा मल्टीनॅशनल कंपनीत होता आणि ही बाई शिकवण्या घेते हे समजलं. मुलगी जवळच्याच शाळेत तिसरीत होती. मग हिनंदेखील स्वतःबद्दल माहिती दिली. घर लावायला मदत लागली तर नक्की सांगा, असं ती बाई म्हणल्यावर ती भानावर आली. तिला आज दुसरी खोली लावायची होती. रिकामा मग त्या बाईच्या हातात देताना तिचं लक्ष परत टाक्यांकडे गेलं. ती खाली तिच्या घरात आली. लगेचच ती आतल्या खोलीत गेली. आज दुपार व्हायच्या आधी ही खोली आवरायची, हे असं तिनं ठरवून ठेवलं. खोलीतून बाहेर आली तेव्हा चार वाजले होते.

आजसुद्धा बाहेरून काही मागवावं असं तिला वाटलं. ती ऑर्डर देणार तेवढ्यात त्या बाईचा आवाज आला. चहा पाठवू का, विचारत होती. हिनं नको सांगितलं पण बाईनं आग्रह चालू ठेवला. ऑर्डर देऊन ती वर गेली. दारात लहान मुलगी होती. परत तसंच आईला आवाज देणं झालं. ती परत त्याच खुर्चीत बसली आणि अगदी समोर तिला एक फ्रेम दिसली. त्या चित्रात घोडे चौखूर उधळले होते. ती बाई चहा घेऊन बाहेर आली. "कुणी काढलं आहे हे चित्र?" तिनं विचारलं.
"ते होय, ते मिस्टरांनी." नवऱ्याला काल तर अरे-तुरे करून शिव्या देत होती, आता अहो-जाहो कशाला? हिचं मनात बोलून झालं. 'सुंदर आहे चित्र,' तिनं पावती दिली. तिला एका क्षणी वाटलं, विचारावं का 'काय झालं होतं रात्री?' पण फारच भोचकपणा ठरेल असं वाटून ती गप्प बसली.

तेवढ्यात पार्सल घेऊन येणाऱ्या माणसाचा फोन आला. आज खाली अडवलं नव्हतं. तो माणूस वरपर्यंत आला होता. या बाईचा निरोप घेऊन ती खाली आली आणि दार उघडून थांबली. पार्सल देणारा समोर आला, ती बघते तर काय, त्याच्या डोक्याला मोठी जखम झालेली. कपड्यांवर रक्त होतं. तो इथे येत असताना कोपऱ्यावर त्याला मोटारीनं धडक दिली होती. अगदीच जवळ हे झाल्यामुळे तो पार्सल द्यायला आला होता. "तुम्ही बसा, माझ्याकडे डेटॉल आहे," ती त्याच्या जखमेकडे बघत म्हणाली. पण तो 'दवाखान्यात जातो' असं म्हणाला, तशी तिनं त्याला उपचारासाठी पैसे देऊ केले; पण तो घेईना, तेव्हा तिनं धिटाईनं त्याच्या हातावर ठेवले. तो गेल्यावर तिनं दार लावून घेतलं. तिला काही आता ते अन्न खावंसं वाटेना. इथे आल्यापासून काय चाललं आहे सगळं, असं म्हणून ती खाली बसली. तिला ती नाशिकला जळताना बघितलेली बाई आठवली, सकाळी त्या वरच्या बाईच्या हातावर बघितलेले टाके आठवले आणि मगाशी त्या माणसाच्या डोक्याला झालेली जखम आठवली. तिला मोठ्यानं रडावसं वाटत होतं पण रडू फुटेना. शेजारी असलेल्या गादीवर ती अंग जवळ घेऊन पडून राहिली.

झोपेतून जाग आली तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. उठून चूळ भरून दुपारचं अन्न गरम केलं. शांत जेवली. पाणी पिऊन गच्चीत आली. डोळे मिटून तिथेच खाली बसली आणि, "अरे, लाज कशी वाटत नाही तुला असं वागताना. १४ वर्षं झाली छळतोयस मला तू, मारून टाक एकदाचं म्हणजे मी सुटेन." वरचीचाच आवाज होता. त्यानंतर त्या पुरुषाचा मोठ्यानं ओरडण्याचा आवाज आला, "अगं, मूर्ख आहेस का? ब्लेड खाली ठेव आधी. आपण बोलत होतो ना, मध्येच काय झालं तुला? हे बघ, तू शांत हो, पियू झोपली आहे. ती होऊ दे का जागी? ब्लेड दे माझ्या हातात, आपण बोलू या, ऐक ऐक तू." आणि त्यानंतर तो मोठ्याने किंचाळला. ही इथे बसल्या जागी थरथर कापायला लागली.. काय झालं असेल वरच्या मजल्यावर. तिच्या हातात ब्लेड होतं, म्हणजे शीर कापून घेतली असले का तिनं? आधीच्या टाक्यांच्या खुणा म्हणजे आधीदेखील तिनं असं काही केलं असावं का? जावं का तिथे? पण दोघांच्या भांडणात आपण का पडायचं? पण त्या बाईचं काही बरंवाईट झालं असेल तर, असा विचार ही करतच होती तेवढ्यात त्या बाईच्या नवऱ्याचा मोठ्यानं रडण्याचा आवाज आला. "अगं काय करून बसलीस तू हे! असे कुणी करतं का? डोकं फिरलं आहे का तुझं? ए, तू डोळे उघडे ठेव तू, हॉस्पिटलमध्ये जातोय आपण, अगं ए..."

नंतर पहाटे पोलिसांची गाडी सोसायटीच्या दारात आली. पोलिसांनी वॉचमनकडे तिच्या फ्लॅटचा नंबर विचारला आणि लिफ्टनं वर आले. दरवाजा तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

पोलीस तिच्या घरात होते आता. कपाटं, बॅगा वगैरेंवरून त्यांनी नजर फिरवली आणि सामान तपासायला घेतलं.

त्या पोलिसांना एक वही सापडली हिच्या सामानात, चित्रं काढलेली होती त्यात. पहिलं चित्र होतं त्यात एक बाई आगीनं संपूर्ण वेढलेली आणि आजूबाजूला हीऽऽ गर्दी, एक तरुणी बाटलीतलं पाणी टाकतीये, एक कुणी कांबळं घेऊन येत आहे. पुढचं चित्र होतं एका घरातलं, घराच्या भिंतीवर चौखूर उधळलेले घोडे आहेत, एक स्त्री चहाचा कप घेऊन उभी आहे, त्या स्त्रीच्या हातावर टाक्यांच्या खुणा आहेत. नंतरचं चित्र होतं ते डिलिव्हरी बॉयचं. त्याच्या डोक्याला मोठी जखम झालीये आणि तो दारात उभा आहे. पुढचं चित्र होतं ते आधीच्याच घरातलं, आधीचीच ती स्त्री, रक्ताच्या थारोळ्यात पडलीये. आधीच्या जखमेच्या ठिकाणी तिनं हात कापून घेतले होते. बाजूला एक पुरूष आहे, तो फुटलेल्या काचेच्या खिडकीतून बाहेर बघतोय.

पोलिसांनी पुढचं चित्र पाहिलं. त्यात एक तरुणी आत्महत्या करतीये, असं वाटावं अशी ती गच्चीच्या कठड्यावर उभी होती.

बाकी सगळी चित्रं रंगवली होती, हे शेवटचं चित्र फक्त, नुस्तं पेन्सिलनं काढून ठेवलं होतं. ते पूर्ण करायचं राहून गेलं होतं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्लासिक! 'सत्यकथे' च्या पठडीतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपर्ब!

- (यापुढे चित्रांची वही न बघण्याचा निर्णय घेतलेल) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खासच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोवा आवडतंच... बहुतेक सगळ्या क्लिशेड कारणांमुळे.
क्लिशेड असली तरी आवडीची झळाळी कमी व्हायचं काही कारण अर्थातच नाही.
पण ही बॅकग्राउंड फारशी माहीत नव्हती सो मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गोष्टीचा गोव्याशी नक्की काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर कथाचित्रण! खरोखरच सत्यकथेची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0