Power - Audrey Lord

संकीर्ण #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

Power - Audrey Lord

स्वैर भाषांतर - फूलनामशिरोमणी

कविता आणि युक्तिवादातला फरक इतकाच, की,
तयारी असावी लागते घात करून घेण्याची,
पोटच्या पोरांऐवजी,
स्वतःचा!

त्या दुःस्वप्नाच्या वाळवंटात,
एक मेलेलं काळं पोर, खुरडत,
त्याची सोललेली पाठ दाखवतं आहे मला -
त्याच्या टवके उडालेल्या गाल आणि खांद्यातून
वाहतं आहे रक्त, मैलोगणती, पाण्यासारखं.

कल्पनेने
ढवळून निघतं आहे माझं पोट, पण
सुकलेले काळे ओठ उघडतात - बेईमान, आपसूक,
ओलेपणासाठी आसुसलेले.
ते रक्त
झिरपत राहतं पांढऱ्या फक्क वाळवंटात

जिथे मी हरवून वणवणते आहे -
प्रतिमा, आणि कविकल्पनांच्या चमत्काराविना
द्वेष आणि ध्वंसातून - ओज उत्पन्न करण्याचा
प्रयत्न करीत,
माझ्या मरणाऱ्या पोराचे घाव
प्रेमाने भरीत -
पण त्याआधी उन्हानेच ओपतील, पांढरी पडतील
त्याची हाडं.

क्वीन्स, न्यूयॉर्कमध्ये १० वर्षांच्या कृष्ण-बाळाला गोळी घालणारा कंस
त्या कोवळ्या रक्तात, अधिकाराचे चामडी बूट रोवून
म्हणे, "मर साल्या चिरकुटल्या!"
रेकॉर्डेड आहे, तो पुराव्याचा आवाज.
साक्षीनुसार मात्र- "मला दिसला नाही गोळी झाडताना
आरोपीचा छोटे-मोठेपणा - फक्त रंगच पहिला मी, काळा."
हेही ध्वनिमुद्रित झालेलं असतांना…
सोडून दिले त्याला पंचसभेने -
'उजळ' माथ्याने फिरायला.
१३ वर्षांच्या त्याचा 'सेवेसाठी'
ठरवले निष्कलंक.

होय, बसली होती पंचसभा-
त्यात मोजून अकरा गोरे पुरुष आणि
एक कृष्णवर्ण स्त्री
म्हणाली, "झाले मी, त्यांच्या मताशी सहमत."
अर्थात: तिच्या चार फुटी कृष्ण कायेवर
चार शतकांच्या गोऱ्या पितृसत्ताक पद्धतीचा दबाव
पडत राहिला -
शेवटी, सुटलाच तिच्या हातून, न्यायाचा हक्क!

मग, चुना लावून बंद करून टाकल्या तिने
ओटीपोटाच्या भिंती -
त्याच दफनभूमीत पुरायची आहेत आम्हाला लेकरं-बाळं आता.
तरीही, अजूनही, जमत नाही मला-
अंतरातील सर्वनाश जागा करणे,
कारण
कविता आणि युक्तिवादातला फरक
जोवर समजून-उमजून वापरता येत नाही
तोवर

माझ्यातले ओजसुद्धा कुजतच राहील, विषारी बुरशी होऊन
किंवा पडून राहील निरर्थक - एक तुटलेली विजेची तार
आणि एक दिवस माझ्यातला पौगंड विखार
घुसवणार तिला जवळच्या भोकात
करणार एका ८५ वर्षाच्या शुभ्र म्हातारीचा बलात्कार
ती असेलही कोणाची तरी आई पण
मी तिचा चेंदामेंदा करून आग लावणार तिला पलंगावरच

आणि तिकडे ग्रीक रुदाली आक्रोश करत राहील
ह्या सनातन शोकांतिकेवर -
"बिचारी, तिने कोणाचं काय वाईट केलं होतं? निव्वळ पशू आहेत ते-
कृष्णवर्णी!"

मूळ कवितेचा स्वैर अनुवाद.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

बाप रे संसर्ग = इन्फेक्शन Sad फेस्टर होत गेलेले. अंगावर आली ही कविता.

कविता आणि युक्तिवादातला फरक इतकाच, की,
तयारी असावी लागते घात करून घेण्याची,
पोटच्या पोरांऐवजी,
स्वतःचा!

Lorde seems to refer to Yeats’s famous remark “We make out of the quarrels with others, rhetoric, but of the quarrels with ourselves, poetry,” while raising the stakes far above mere quarreling, to a mortal level.
- https://lithub.com/what-poetry-can-teach-us-about-power/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yeatsचं वाक्य इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. हो, अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरच्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी बी.एल.एम. (ब्लॅक लाईव्हज मॅटर) ही चळवळ सुरु झाली, आणि झपाट्याने पसरली...
तरीही, त्यातल्या त्यात मला ही कविता खूप दूरदर्शी वाटते- कारण एका काळ्या स्त्रीच्या भूमिकेतून बघायला गेले, तर कवयित्रीने हिंसेचे उत्तर हिंसेने देणाऱ्या 'पॉवर' चा निषेध केलेला दिसतो. द्वेष आणि ध्वंस उत्त्पन्न करते, ती खरी शक्ती नव्हे, असं तिला सुचवायचं असेल, असं एक मला माझ्या विश्लेषणावरून वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yeatsचं वाक्य इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

यु आर वेलकम. छान जमला आहे अनुवाद. विशेषत: 'चिरकुटल्या' हा शब्दही बरोबर अनुवादित झालेला आहे. आय ॲम शुअर तो शब्द निवडण्यामागे बराच विचार करावा लागलेला असणार. फक्त तो पोलिस ३७ वर्षांचा घोडा बाप्या होता हा उल्लेख का टाळला ते कळले नाही. कदाचित तुम्हाला तो उल्लेख इर-रिलेव्हंट वाटला असावा. पण त्या उल्लेखामुळे माझ्या डोळ्यासमोर त्या पोलिसाची प्रतिमा अधिक नीट साकार झाली. मुर्दाड असा ३७ वयाचा गोरा, क्रूर ऑफिसर माझ्या डोळ्यांसमोर आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंगावर येते तर खरंच... पण खूप खरी आणि महत्त्वाची कविता आहेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरक डोक्यावरून गेला. पोटच्या पोराचा आणि स्वतःचा घात म्हणजे काय कळले नाही.

कवितेचा आर्क आवडला. अनुवाद पण आवडला. अमेरिकन हिस्टरी X नावाचा सिनेमा पण अश्याच आर्कवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ह्रेटरिक' शब्दाच्या अर्थछटा 'युक्तिवादा' ला लावाव्यात की नको, यावर मी थोडा विचार केला. 'पोकळ युक्तिवाद' असे करता आले असते, पण कवयित्रीने तो अन्वय वाचकांसाठी खुला ठेवलाय, म्हणून त्यावर स्वत:चे आरोपण जोडणे नको वाटले. 'rhetoric' मधे अरे-ला-कारे करणे, निष्क्रिय वायफळ बडबड, अशा अर्थछटा निर्माण झाल्याहेत, त्या ग्रीकांना आवडणार नाहीत. ते असो....

माझ्या विश्लेषणानुसार, युक्तिवादाचा संबंध पुन्हा शेवटच्या परिच्छेदात आलाय, तिथे, काळ्यांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतला जातो- एका पांढऱ्या म्हातारीचा बलात्कार करुन....ही घटना खरी का खोटी मला माहिती नाही, पण आपल्याकडे जातीय दंग्यांमधे अशा कित्येक घटना दुर्दैवाने घडल्याच. तेव्हा असल्या राजकीय चिथावणी ला 'rhetoric' म्हणायचे असावे असे वाटते. त्या चिथावणीने तरूण मुलांच्या रोषाला/उर्जे/सामर्थ्याला भलतीच दिशा मिळाली, तर ते अप्रत्यक्षपणे, स्वता:च्याच पोरांचा घात केल्यासारखे होईल ना! एक स्त्री म्हणून, ह्या कवयित्रीचा त्या विषयावरचा विचार मला खूप वेगळा आणि गहन वाटला. सामर्थ्य कशात आहे, सामर्थ्य कशाला म्हणायचे - ते कसे वापरायचे, हा विवेक फार कमी लोकांना उमजतो. हिंसेविरूद्ध हिंसा होते, तेव्हा पुष्कळदा बळी पडतात त्या स्त्रियाच. त्यामुळेच ह्या कवयित्रीचे दु:ख दुधारी आहे, असेही वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0