करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे
डॉ. राजीव ढेरे मुलाखत – (भाग १)

ढेरे सरांचा परिचय : सीरम इन्स्टिट्यूट जेव्हा अतिशय छोटी संस्था होती तेव्हापासून ते इथे काम करत आहेत आणि बहुतेक सर्व व्हॅक्सिन्स तयार करण्यात, आणि पर्यायानं या संस्थेच्या यशामागे त्यांचा मोठा वाटा आहे. डॉक्टर राजीव ढेरे सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. आणि सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मला वाटतं एमएमआर व्हॅक्सिनचे जगातले दोन-तृतीयांश डोस इथे हडपसरमध्ये बनतात.

नमस्कार! सुरुवातीला ढेरे सरांचे आभार मानूयात. त्यांच्या सध्याच्या अतिशय बिझी काळामध्ये रविवार संध्याकाळचा वेळ त्यांनी आपल्यासाठी काढला यासाठी पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. प्रसारमाध्यमांत याआधी तुमच्या ज्या मुलाखती आल्या होत्या त्यात तांत्रिक प्रश्न फारसे विचारले गेले नव्हते, त्यामुळे ‘ऐसी अक्षरे’ने जाणकार वाचकांसाठी तुमची तांत्रिक मुलाखत घ्यायचं ठरवलं.

प्रश्न : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टेक्नॉलॉजीनी आत्ता जी लस तयार केलेली आहे त्याविषयीची पहिली घोषणा मला वाटतं दोन-तीन महिन्यांपूर्वी आदर पूनावाला यांच्या एका मुलाखतीत त्यांनी केली होती. तर त्याबद्दल सुरुवातीला काही माहिती द्याल का?

डॉक्टर ढेरे : सर्वप्रथम मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. मी काही एवढा मोठा नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे एक फार मोठी टीम ह्या गोष्टीवर काम करत असते. एक दोन माणसांकडून एवढी मोठी कामं होत नाहीत. दोन फार मोठे घटक असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे पैशाचं प्रचंड पाठबळ अशा गोष्टींना लागतं. आणि ते उभं केलं ते पूनावाला यांनी. पैशाच्या पाठबळाशिवाय सायन्सचं सोशल ॲप्लिकेशन अशक्य असतं. दुसरी गोष्ट म्हणजे लोक. असंख्य लोक आहेत जे अननोन सोल्जर आहेत आणि ज्यांच्या खांद्यावर हे सगळं उभं आहे. मी फक्त एक पुढे उभा असलेला माणूस आहे, सीनियर म्हणून.

आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीविषयी तांत्रिक माहिती सांगतो. इबोलाची फार मोठी साथ झायर देशात (आता Democratic Republic of Congo) आली होती (२०१४) बरीच वर्षं इबोलाची साथ येत आहे आणि ती खूप धोकादायक असते. त्याचा केस फेटलिटी रेट ४५% ५५% वगैरे असतो (केस फेटलिटी रेट : पॉझिटिव्ह केसेसपैकी किती टक्के लोकांचा मृत्यू झाला, म्हणजेच पॉझिटिव्ह केसेसपैकी मृत्युदर.) तर त्याच्यावर व्हॅक्सिन करण्यासाठी पहिल्यांदा हा प्लॅटफॉर्म / ही टेक्नॉलॉजी वापरली गेली. ती चिंपांझी ॲडिनोव्हायरसवर आधारित आहे (cAd3 – ॲडिनोव्हायरसेस अनेक पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये इन्फेक्शन्स करतात. यात मनुष्यप्राणी तसेच चिंपांझीसारखे एप्स समाविष्ट आहेत. या इथे उल्लेख केलेला चिंप ॲडिनोव्हायरस हा चिंपांझीच्या शरीरात इन्फेक्शन करणारा आहे. माणसाला इन्फेक्ट करणाऱ्या अडिनो व्हायरसशी काही प्रमाणात साम्य असणारा.). हा डबल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे त्यावर जागा भरपूर आहे. माणसामध्ये ॲडिनोव्हायरस इन्फेक्शन्स खूप असतात. त्यामुळे अर्थातच शरीरामध्ये त्याविरुद्ध न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असतात. परंतु हा चिंपांझीच्या शरीरातला व्हायरस असल्यामुळे माणसाच्या शरीरातल्या क्रॉस-न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी त्याला कमी न्यूट्रलाइझ करतील. हा ह्या प्लॅटफॉर्मचा बेसिस आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काय केलं, तर हा व्हायरस जेव्हा पेशींमध्ये जातो तेव्हा बाहेर येण्याकरता, म्हणजे आपली असेंब्ली करण्याकरता त्याला एक प्रोटीन लागतं. ह्यांनी जो चिंपांझी ॲडिनो recombinant केला त्यामध्ये हे प्रोटीन डिलीट केलं. (recombinant करणं – एखाद्या जीवित पेशीतल्या जेनेटिक मटेरियलमध्ये (DNA/RNA) तंत्रज्ञान वापरून कृत्रिमरीत्या बदल करणं) त्यामुळे ते चक्रव्यूहासारखं होतं – म्हणजे हा व्हायरस माणसाच्या पेशींमध्ये आत जातो, पण त्याला असेंबल होऊन बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्याच्या तुकड्या-तुकड्यांचं एक्सप्रेशन होतं.आणि त्यातून तुम्हाला त्याच्याविरोधात अँटीबॉडीज मिळतात. पण व्हॅक्सिन तयार करण्यासाठी तुम्हाला हा व्हायरस मोठ्या प्रमाणात लॅबमध्ये वाढवायला लागतो. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं काय केलं तर HEK293A नावाची पेशी असते. असेंब्ली प्रोटीनचं जे डिलीट केलेलं म्युटेशन आहे ते त्यांनी त्या पेशीमध्ये घातलं. त्यामुळे हा व्हायरस त्या HEK293A पेशीमध्ये भरपूर वाढू शकतो.त्याचं titer (टायटर : द्रावणामधल्या एखाद्या घटकाचं कॉन्सन्ट्रेशन. इथे हे Viral load ह्या अर्थानं वापरलं आहे.) 1011 1012 इथपर्यंत जातं. आणि हा व्हायरस माणसांमध्ये गेला की तो पेशींमध्ये शिरतो पण मगाशी सांगितलं तसं ते चक्रव्यूहासारखं होतं – तो आत जाऊ शकतो पण बाहेर येऊ शकत नाही.

कोरोनाव्हायरसचं जे receptor-binding protein असतं त्यावर जे S1 आणि S2 प्रोटीन असतं हे प्रोटीन त्यांनी त्या ॲडिनोव्हायरसवर क्लोन केलं. (कोरोनाव्हायरसमधल्या प्रोटीन्सची माहिती इथे मिळेल.) वर सांगितलं तसं हा डबल-स्ट्रँडेड व्हायरस आहे त्यावर जागा भरपूर आहे. आणि जिथलं प्रोटीन डिलीट केलं ती जीन तशीच आहे. ह्याच पेशींवर त्याची भरपूर वाढ होते. HEK293A ही suspension cell आहे. tissue cultureमध्ये जर surface-dependent cells असतील तर त्या लॅबमध्ये वाढवायला खूप त्रास होतो आणि मग मोठ्या प्रमाणात त्या वाढवणं अवघड जातं. ह्याउलट suspension cellमध्ये होतं. antibioticचं fermentation जसं केलं जातं, तसं काही लिटरपर्यंत तुम्ही ह्या suspension cellची high-density वाढ करू शकता. त्यामुळे फायदा असा मिळतो की माणसाच्या पेशींमध्ये ह्याची वाढ होण्याचा धोका नाही, पण artificially मोठ्या प्रमाणात वाढवता येतो (म्हणजे scalability मिळते) आणि माणसांमध्ये हा आधी वापरला गेलेला आहे (इबोलाच्या वेळी). त्यावरून त्या तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर आम्ही बरीच वर्षं वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतो आहोत. त्यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे काम चालू आहे हे आम्हाला माहीत होतं. आणि त्यांच्या वैज्ञानिकांबरोबर आम्ही काम करत असल्यामुळे आम्हाला हे तंत्रज्ञानदेखील परिचित होतं. त्यामुळे ते म्हणाले की मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन आम्ही तयार करू शकत नाही, पण तुम्ही ते करू शकता. त्यामुळे हे कॉम्प्लिमेंटरी झालं – जे त्यांच्याकडे नाही ते आमच्याकडे आहे; जे आमच्याकडे नाही ते त्यांच्याकडे आहे. अशाप्रकारे हे सुरू झालं.

प्रश्न : भारतातल्या (किंवा जगातल्याही म्हणायला हरकत नाही) सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न विचारतो. ही लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे? म्हणजे अजून फेज-३ ट्रायल होणं बाकी आहे, आत्ताच्या स्टेजला नक्की तारीख कमिट करणं योग्य नसेल हे सर्व मान्य करूनही, लवकरात लवकर लस कधी बाजारात यायची शक्यता असेल? काही दिवसांपूर्वी श्री. आदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं की सीरम इन्स्टिट्यूट ही लस डिस्ट्रिब्युशनसाठी भारत सरकारला सुपूर्द करणार आहे, या पार्श्वभूमीवर सामान्य माणूस लस आपल्याला कधी मिळेल अशी अपेक्षा करू शकतो?

डॉक्टर ढेरे: इथे बरीच टेक्निकल पार्श्वभूमी असलेली लोकं आहेत त्यामुळे मी आधी तांत्रिक भाग सांगतो. यात दोन गोष्टी समजावून घेण्याच्या आहेत. पहिलं म्हणजे ‘क्लिनिकल ट्रायल’ हा शब्द. ट्रायल म्हणजे हा एक प्रयोगच असतो. त्यामुळे हे एक सायंटिफिक जजमेंट असतं, की ‘हे वर्क व्हायचे खूप चान्सेस आहेत’. (परंतु असंख्य ट्रायल फेलसुद्धा जाऊ शकतात. सर्व ट्रायल्स तुम्हाला हवं तशा वर्क होतातच असं नाही.)

या प्रस्तावित व्हॅक्सिनच्या आत्ताच्या उपलब्ध डेटावरून असं दिसतंय की याला फार काही मोठ्या सेफ्टी कन्सर्न्स नाहीयेत. अर्थात हा अतिशय कमी लोकांवर केला गेलेला एक्सपेरिमेंट आहे – पाचशे लोकांवरचा आहे हा. यांच्यात इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स, म्हणजे अँटीबॉडी जनरेशन चांगलं झालंच, पण त्याबरोबर T cell immunity, म्हणजे साध्या भाषेत मेमरी म्हणा, ती पण दिसली. आता या जजमेंटवर दोन ट्रायल्स चालू आहेत. ऑक्सफर्डची फेज-३ म्हणजे एफिकसी ट्रायल चालू आहे. दहा ते पंधरा हजार लोकांवर ही ट्रायल चालू आहे.

इंग्लडमध्ये असं झालं की ही ट्रायल सुरू व्हायच्या वेळी केसेस कमी व्हायला लागल्या. अर्थात तरीही तिथे ट्रायल चालू आहे आणि त्याचा आकडा खूप मोठा आहे. आमच्याकडे फेज-३साठी आम्हाला जी परवानगी दिली आहे त्याला ‘ब्रिजिंग एफिकसी’ असं नाव दिलंय. ब्रिजिंग एफिकसी म्हणजे काय तर एका प्रॉडक्टची एफिकसी सिद्ध झालीय, त्याची इम्युनोजेनिसीटी (इम्युनोजेनिसीटी म्हणजे काय स्वरूपाचा आणि किती प्रमाणात इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स येत आहे.) पण माहीत आहे तर त्या इम्युनोजेनिसीटीच्या डेटावर आधारित, आम्ही सेफ्टी ट्रायल्स मोठ्या प्रमाणावर करणार आणि ‘ब्रिजिंग विथ एफिकसी थ्रू इम्युनोजेनिसीटी’.

Vaccines

आम्हाला DCGIने (Drugs Controller General of India) अशी अट घातलेली आहे की तुम्ही भारतातल्या ट्रायल्स करताना सेफ्टी आधी बघायची आणि मग इम्युनोजेनिसीटी बघायची, आणि पंधराशे लोकांवर ही ट्रायल करायची (याचं कारण तीन खंडांमध्ये प्रत्येकी दहा-पंधरा हजार लोकांवर ही ट्रायल आधीच झालेली असेल). आता ही ट्रायल पंधराशे लोकांवर करणार असलो तरी सगळे फॅक्टर्स धरून दोन हजारांपेक्षा जास्त ट्रायलचे स्वयंसेवक नोंदणी केले जातात. काही लोक नंतर येत नाहीत, फॉलोअप टेस्टकरता येत नाहीत वगैरे. म्हणजे शेवटी किमान पंधराशे लोकांवर तरी इम्युनोजेनिसीटी ट्रायल करायची, सेफ्टी डेटा गोळा करायचा. आमचा सगळा डेटा DCGIला दिला आहे. सध्या महासाथीच्या परिस्थितीमुळे यावर कारवाई तत्परतेने होत आहे, त्यामुळे सरकार आम्हाला बहुधा ट्रायल्स करण्यासाठी येत्या एकदोन आठवड्यात परवानगी देईल अशी शक्यता आहे. (पाहा : Serum Institute gets DCGI nod for trials of Oxford vaccine ) याची सर्वसामान्य पद्धत अशी असते की सबंध देशात मिळून बारा सेंटर्स यासाठी नक्की केलेली आहेत. त्या सेंटर्सवर चाचणी घेणारे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर्स तिथले असतात. सध्याच्या परिस्थितीत बारा सेंटर्सवर मिळून पंधराशे स्वयंसेवक ट्रायलसाठी जमवायचे हे काही अवघड काम नाहीये. ही ट्रायल अठरा आणि त्यापुढच्या वयोगटाकरता केली जात आहे. इम्युनोजेनिसीटीची भारतातली ट्रायल साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत संपावी. तोपर्यंत किंवा त्याच्या आधीच साऊथ आफ्रिका, ब्राझील आणि ब्रिटन इथल्या ट्रायल्सचे रिझल्ट्स पूर्णपणे हातात आलेले असतील. (सध्या ऑक्सफर्डच्या अंदाजानुसार हा इतरत्र चालू असलेल्या ट्रायल्सचा डेटा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत यावा) म्हणजे त्यांचा एफिकसी डेटा ऑक्टोबरमध्ये, आपला क्लिनिकल डेटा (डेटा अपेक्षेप्रमाणे आला आहे असे गृहीत धरून) नोव्हेंबरमध्ये आम्ही सरकारला देऊ शकलो तर सरकार डिसेंबरपर्यंत परवानगी देऊ शकते.

पूर्वीच्या नियमानुसार कुणालाही व्हॅक्सिन बनवण्याचे लायसन्स मिळाल्यावर मग ते व्हॅक्सिन उत्पादन चालू करू शकत असत. आता हाच नियम धरून ठेवला तर लस तयार करायला डिसेंबरनंतर सहा महिने जातील!
आता महासाथीची गंभीर परिस्थिती असल्याने सरकारने आम्हाला उत्पादन चालू करण्यासाठी कंडिशनल परवानगी दिली आहे. अट अशी, की ऑक्सफर्डच्या देशाबाहेरच्या ट्रायल्सचा डेटा, तसंच भारतातल्या आपल्या ट्रायल्सचा डेटा अपेक्षित आहे तसा आला, आणि आम्ही लिहून दिलेल्या पद्धतीनेच तेव्हापर्यंत उत्पादन केलेलं असेल, आणि आमचं प्रॉडक्ट जर कंट्रोलरच्या तपासणीत पास झालं तर… (आता यात इतके जर आणि तर आहेत… परंतु आत्ता असं वाटत आहे की हे तिन्ही होऊ शकेल) तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये लस तयार होऊ शकेल.

भारतात जर हर्ड इम्युनिटी यायला हवी असेल तर किमान सत्तर कोटी लोकांना ही लस देण्याची जरुरी भासेल. ही लस जनतेपर्यंत पोचवण्याचं काम सरकारला करायचं आहे. त्यातच या लसीचे दोन डोस द्यायला लागतात. म्हणजे मी जानेवारीत एखाद्या व्यक्तीला लस दिली असेल, तर त्याला त्यानंतर तीन आठवडयांनी परत लस द्यायला हवी. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी त्याच्या शरीरात पुरेशी कोरोनाविरोधी रोगप्रतिकारशक्ती तयार होईल.

समजा आम्ही तेव्हापर्यंत पन्नास कोटी किंवा तीस कोटी डोसेस तयार केले तरीही पुढे एक डिस्ट्रिब्युशनची मोठी यंत्रणा लागणार. म्हणजे लसीचे हे डोस तयार झाले की मग ते गावागावात पाठवण्याची व्यवस्था, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, लस देण्यासाठी मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ अरेंज करणे याला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. म्हणजे मी जरी म्हणालो की आम्ही डिसेंबरमध्ये लस तयार केली, तरीही खेडोपाडी सर्वसामान्य जनतेला ती लवकरात लवकर कशी पोचेल यावरही लस कधी मिळणार हे अवलंबून आहे. यावर सरकारी पातळीवर सध्या विचार चालू आहे. आपल्याकडे एक अत्यंत यशस्वी लसीकरण पूर्वी झालेलं आहे, ते म्हणजे पोलिओ लसीकरण. अत्यंत कमी वेळात संपूर्ण देशभर ही लसीकरण मोहीम राबवली गेली होती. आमच्या दृष्टीने आमचं काम कदाचित पूर्ण होईल डिसेंबर महिन्यात. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर फक्त आमच्याकडे लस कधी तयार होणार हे महत्त्वाचं उत्तर ठरेल. ती तयार असेल डिसेंबर-जानेवारीपर्यंत…

प्रश्न : ही फारच चांगली माहिती मिळाली. आता थोडं याच संदर्भात, म्हणजे फक्त सीरम इन्स्टिट्यूटच नाही, तर इतर ठिकाणी व्हॅक्सिनबद्दल जे प्रयत्न चालू आहेत त्याविषयीही हा प्रश्न आहे. महासाथीच्या बाबतीत आत्तापर्यंत जगभरातून जो इम्युनॉलॉजिकल डेटा हाती आलाय, त्यावरून या लसींमुळे लाँग-टर्म इम्युनिटी डेव्हलप होईल असं वाटतंय का? की या बाबतीत अजून लक्ष ठेवायला लागणार आहे?

डॉक्टर ढेरे : पहिली गोष्ट म्हणजे आत्ता ज्या ट्रायल्स चालू आहेत त्या तशाही पुढे चालूच राहणार आहेत. लाँग-टर्म सस्टेनन्स ऑफ इम्युनिटी बघायला ऑक्सफर्डच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलमधे, शेवटचा डेटा पॉईंट असणार आहे ३८५ दिवसांनंतरचा. म्हणजे ट्रायल चालू झाल्यावर (व अर्थातच लसीकरण चालू झाल्यानंतरसुध्दा) सव्वा वर्षानंतरही ट्रायलचा फॉलोअप घेणे चालूच राहणार आहे. लसीकरण जरी झाले असले तरी या ३८५ दिवसांनंतरच्या डेटावरून या बाबतीत आपल्याला अजून माहिती मिळत जाईल. यापूर्वीच्या अनुभवातल्या, म्हणजे इबोलाच्या साथीच्या डेटावरून असं दिसतंय की अशा दोन डोस असलेल्या व्हॅक्सिनमुळे पुरेशी T cell immunity तयार झाली तर किमान दोन तीन वर्षं तरी इम्युनिटी राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे Live attenuated व्हॅक्सिन आहे. (Live attenuated म्हणजे व्हायरसच्या मूळ रचनेला धक्का न लावता, त्याची रोग निर्माण करण्याची क्षमता नष्ट करणं.) सर्वसामान्यपणे अशा Live attenuated व्हॅक्सिनमुळे दहा वर्षाहून जास्त काळ इम्युनिटी टिकते. अर्थात एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स हाती आल्यावरच हे ठरेल. शक्यता आहे का असं विचारलंत तर त्याचं उत्तर नक्की ‘हो’ असंच असेल.

अर्थात, हा व्हायरस म्यूटेट झाला तर मात्र सगळंच गणित बदलेल.

प्रश्न : अरे वा, हे खूपच आश्वासक आहे. आपण मगाशी सांगितलंत की साधारणपणे डिसेंबरपर्यंत लस आपल्या हातात असू शकेल आणि आपल्या सरकारी यंत्रणेकडे देशभर पोलिओ लसीकरणाचा एक यशस्वी पूर्वानुभव पण आहे. परंतु, लस उत्तम आहे तरीही ती लॅबमधून निघून, लोकांपर्यंत पोचून, लोकांचं लसीकरण होऊन त्याचे यशस्वी परिणाम दिसण्यापर्यंत कुठकुठली आव्हाने असतात? म्हणजे ‘लस उत्तम परंतु लसीकरण ७० टक्केच फक्त’ असे कुठकुठले फॅक्टर्स असतात?

डॉक्टर ढेरे : लस लॅबमधून निघाल्यावर टर्मिनल पॉईंटला, म्हणजे गावातल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला पोचेपर्यंत ती योग्य पद्धतीने, योग्य तापमानाला स्टोअर करून (कोल्ड चेन मेंटेन करून) पोचवावी लागते. तिथे तशाच स्टोरेजची व्यवस्था जरुरी असते. हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन आहे. त्यामुळे प्रायमरी हेल्थ सेंटरवर डॉक्टर आणि नर्सेस उपस्थित असणं आवश्यक असेल. लसींचं वितरण करण्यासाठी आधी लस (कोल्ड चेन मेंटेन करून) जिल्ह्याच्या ठिकाणी नेली जाते. तिथून त्या जिल्ह्यातल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला ती पाठवण्यात येते. एकदा लस तिथे पोचली, की गावात दवंडी पिटण्यात येते, की अमुकअमुक दिवशी लसीकरण आहे आणि सर्वानी प्रायमरी हेल्थ सेंटरला यायचं आहे. अशा लसीकरणासाठी एकेक माणूस लस घ्यायला आलेला चालत नाही. कारण लसीच्या एका व्हायलमध्ये लसीचे दहा डोस असतील. (म्हणजे एका वेळी किमान दहा लोक असतील तरच व्हायल फोडून लसीकरण करणं योग्य असतं, नाहीतर थोडी लस वाया जाऊ शकते) दवंडी पिटून किती लोकांपर्यंत ही बातमी पोचतीय आणि त्यातून किती लोक लस घ्यायला येताहेत हे एक आव्हान असतं.

Vaccines

त्याशिवाय हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन असल्याने डॉक्टर्स आणि नर्सेसच्या बरोबरच सिरींजेसची उपलब्धता, वापरून झाल्यावर सिरींजेस सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्याची सेल्फ डिस्ट्रक्ट मशिनरी (लसीमधे Live attenuated व्हायरस असल्याने हे अत्यंत महत्त्वाचं), प्लास्टिक डिस्पोजलची योग्य सुविधा ही तयारी करून ठेवायला लागते. याबरोबरच क्वचित काही लोकांना लस घेतल्यावर रिॲक्शन आलीच तर त्याची काळजी घेण्याची व्यवस्था, त्यासाठी वेगळी औषधं ही सगळी तयारी आवश्यक असते. (पोलिओसारखी) तोंडातून ड्रॉपने घ्यायची लस आणि इंजेक्टेबल लस यात हा फरक असतो. तोंडातून घ्यायच्या लसीकरता थोडी कमी तयारी लागते. ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज आणि लसीकरण हे यंत्रणेसाठी अत्यंत कष्टप्रद आणि अवघड काम. मी फील्डवरचा माणूस नाही, पण मला खात्री आहे की हे कसं करावं, यातल्या अडचणींवर कशी मात करावी याबद्दल जिल्हानिहाय स्तरावर येणारे वेगवेगळे शेकडो प्रश्न याबद्दल सरकारी यंत्रणेकडे तयारी चालू असेल.

अर्थात ही आव्हानं असली तरीही आपला या बाबतीतला पूर्वानुभव अत्यंत चांगला आहे. सहा महिन्यांपूर्वीच आपल्याकडे MR व्हॅक्सिनचा (मीजल्स-रुबेला व्हॅक्सिन) एक मोठा ड्राइव्ह झाला. त्यात एका वेळी सुमारे तीस कोटी शाळकरी मुलांसाठी (असंच इंजेक्टेबल) लसीकरण यशस्वी रीतीने राबवण्यात आलं. गावोगावीच्या शाळांमध्ये जाऊन हे दिलं गेलं. तीस कोटी इतका मोठा आकडा असल्याने आम्हालाही मनात खूप धाकधूक होती, पण सरकारी वैद्यकीय यंत्रणेनं हे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. म्हणजे हे काम खडतर, अत्यंत अवघड असलं तरीही आपण अशा प्रकारची आव्हानं झेलण्यासाठी सक्षम आहोत हे सरकारी वैद्यकीय यंत्रणेनं यापूर्वी दाखवून दिलं आहे.

म्हणजेच, आव्हानं मोठी असली तरी आपल्याकडे सरकारी यंत्रणेने ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याचा सहा महिन्यांपूर्वीचाच एक मोठा अनुभव आहे, आणि हे अत्यंत महत्त्वाचं आणि आश्वासक आहे.

प्रश्न : लस तयार करण्याचे भारतात सीरम आणि भारत बायोटेक या संस्थांमधे प्रयत्न चालू आहेत. तसेच जगात इतर किती ठिकाणी कशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? अजून एक प्रश्न म्हणजे सीरममध्येही या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या (कोरोना) लसीबद्दल काही प्रयत्न चालू आहेत का?

डॉक्टर ढेरे : आमच्याकडे या पहिल्या लसीबद्दल काम सुरू करण्यापूर्वी या बाबतीत शास्त्रीय विचार करण्यात आला. ही लस यशस्वी होईल का? झालीच, तर किती प्रमाणात होईल? यात अडचणी कायकाय येतील? कुठल्या वयोगटात ही जास्त यशस्वी ठरू शकेल? (म्हणजे समजा अठरा वर्षांपुढच्या वयोगटासाठी ही लस यशस्वी झाली, तर एक ते अठरा वयोगटातल्या लोकांनी काय करायचं?) शिवाय, गर्भवती महिलांनी ही लस कशी घ्यावी? (कारण ही Live attenuated व्हायरसची लस आहे) नवजात अर्भकांना कशी द्यावी? या व्यतिरिक्त (ही ॲडिनोव्हायरसवर आधारित लस आहे त्यामुळे) तुमच्या शरीरात जर आधीच या ॲडिनोव्हायरसविरोधी अँटीबॉडीज असतील तर शरीर प्रतिसाद कसा देईल? काही अडचणी येतील का? वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये ॲडिनोव्हायरस विरुद्ध वेगवेगळ्या प्रमाणात अँटीबॉडी सापडण्याची शक्यता असते. ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि भारतात अँटी ॲडिनो अँटीबॉडी सापडण्याचं प्रमाण पार २२ टक्क्यापासून ते ६० टक्क्यापर्यंत बदलू शकतं. या अँटीबॉडीज शरीरात असताना ही लस किती प्रमाणात काम करू शकेल? आत्ताच्या घडीला आमच्या हातात फेज-१चा डेटा आहे. आता दिसतंय की लस इफेक्टीव्हली काम करत आहे. परंतु आम्ही जेव्हा या लसीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा किती उपयोगी होईल या बाबतीत मनात थोडी धाकधुक होतीच. म्हणजे काँगोमध्ये ही लस यशस्वी होणं आणि भारतातही यशस्वी होणं यात फरक असेल का? हा विचार करून आम्ही एकाच वेळी कोरोनाच्याच इतरही तीनचार वेगळ्या लसी तयार करण्यावर काम करत आहोत. आम्ही या ऑक्सफर्ड विद्यापीठाशिवाय ‘कोडाजेनिक्स’ या अमेरिकन कंपनीबरोबरही तंत्रज्ञान करार केला आहे. या कंपनीने जिवंत (रोग निर्माण करणाऱ्या) व्हायरसला attenuate करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यापूर्वी हे करण्यासाठी दहा-वीस वर्षं लागत असत. लॅबमध्ये वेगवेगळ्या वातावरणात या व्हायरसची वाढ करत असताना हळूहळू त्याला (रोग निर्माण करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत) ‘गरीब’ करत जायचं असतं. पोलिओच्या लसीकरणाच्या वेळच्या काही निरीक्षणांवरून काही गोष्टी शास्त्रज्ञांच्या निदर्शनाला आल्या होत्या. त्याचा वापर करून कोडाजेनिक्स कंपनीने या व्हायरसच्या जीनोममध्ये बदल केल्याने व्हायरस बाह्य स्वरूपात काहीही बदल न करता त्याची रोग निर्माण करण्याची क्षमता नष्ट कशी करता येते याचं तंत्रज्ञान निर्माण केलं. याचं त्यांनी पेटंट केलं आहे. त्यांनी हे तंत्रज्ञान इन्फ्लुएंझा व्हायरसच्या बाबतीत, नंतर पोलिओच्या बाबतीत प्राण्यांमध्ये यशस्वी करून दाखवलं आहे. यामुळे आमच्या लक्षात आलं की या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण कोरोनाव्हायरसच्या बाबतीत कदाचित करू शकू. अजून एका गोष्टीचा फायदा असा झाला आहे की या गंभीर महासाथीच्यामुळे रेग्युलेटरी ऑथॉरिटीजही चांगल्या नव्या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात थोड्या मोकळ्या झाल्या आहेत (पूर्वीच्या काळी हे करायलाही अनेक वर्षं गेली असती.)

हे तंत्रज्ञान फार सुंदर आहे आणि मोठ्या प्रमाणावर जलद लसीकरण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप फायदा आहे. याचं कारण असं, की हे लसीकरण इंट्रानेजल ड्रॉप्सद्वारे (म्हणजे इंजेक्शन वगैरे नाही, नाकात लसीचे थेंब टाकून) करता येईल. त्यामुळे इंजेक्टेबल लसीकरण करण्यातल्या बऱ्याच अडचणी या लसीच्या बाबतीत येणार नाहीत आणि उद्या समजा (रोगकारक) कोरोनाव्हायरसमध्ये बदल झाला (Mutation) तरीही या लसीच्या बाबतीत अयशस्वी होण्याच्या शक्यता कमी आहेत, कारण हा कोरोनाव्हायरसचाच जुळा पण गरीब, अपंग भाऊ आहे असं समजा.

आत्तापर्यंत माकडं आणि हॅमस्टर या प्राण्यांमध्ये या लसीच्या ट्रायल्स चालू आहेत. त्याचा डेटा खूप आश्वासक आहे. (सामान्यपणे माणसांमध्ये फेज-१ ट्रायल चालू होण्यापूर्वी काही विशिष्ट प्राण्यांमध्ये प्री-क्लिनिकल ट्रायल्स करून, त्याच्या निष्कर्षांवरून मग माणसामध्ये छोटी सेफ्टी ट्रायल करण्याची शास्त्रीय पद्धत आहे) याच्या माणसांमध्ये फेज-१ ट्रायल्स कदाचित सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये चालू होऊ शकतील असं चित्र आहे. आम्हाला याबाबतीत युके सरकारने फेज-१ ट्रायल्स करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सध्या प्रायमेट्समध्ये (म्हणजे माणसाला त्यातल्या त्यात जवळचे सस्तन प्राणी – माकडं व एप्स वगैरे) ट्रायल्स चालू आहेत. USFDAने आम्हाला हॅमस्टरमधला अभ्यासलेला चांगला डेटा उपलब्ध करून दिला आहे. आमच्याकडे याची टेक्नॉलॉजी फाईन ट्युनिंग करण्याचं काम चालू आहे.

या व्यतिरिक्त नवजात अर्भकांच्यासाठी लसनिर्मितीचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या आम्ही गोवराच्या (मीजल्स) लसीकरता ज्या व्हायरसची स्ट्रेन वापरतोय त्यावरच कोरोनाव्हायरसच्या S1 S2 (स्पाईक) प्रथिनांचं प्रत्यारोपण करण्याचे आमचे प्रयत्न पिट्सबर्ग विद्यापीठाबरोबर चालू आहेत. गोवराच्या लसीकरता व्हायरस कसा वाढवायचा यावर आमची चांगली कमांड आहे,. सध्या आमची मीजल्सची लस तयार करण्याची क्षमता वर्षाला ६० कोटी डोस इतकी मोठी आहे (अवांतर माहिती : जगाच्या गोवर लसीच्या गरजेपैकी /गरज सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीने भागते.)

यामुळे जर हे यशस्वी झालं, तर आमचं काम सोपं होईल. या तिसऱ्या लसीच्या बाबतीतही माकडांवरचे प्रयोग संपत आले आहेत. याचीही फेज-१ ट्रायल बहुधा सप्टेंबरमध्ये चालू होऊ शकेल.

या व्यतिरिक्त गर्भवती महिलांसाठी हिपॅटायटिस-बीप्रमाणे एक लस करण्याचे प्रयत्न आम्ही चालू केले आहेत.

अशा पद्धतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाची सर्वात आधी बाजारात येऊ शकेल अशी, त्यापाठोपाठ नाकातून देण्याची, मोठ्या जनसमूहाला सहज आणि जलद लसीकरण करण्यासाठी सोयीची, नंतर नवजात अर्भकांसाठी वेगळी आणि गर्भवती महिलांसाठी एक, अशा चार लसींवर आमच्याकडे जोरात प्रयत्न चालू आहेत.

प्रश्न : वाह, म्हणजे एकापाठोपाठ एक सेहवाग, द्रविड, तेंडुलकर आणि गांगुली अशी महारथींची फळी तुमच्याकडे तयार होत आहे.

डॉक्टर ढेरे : (हसत) यातला एक तरी तेंडुलकर झाला तरी पुरेसा होईल. असं बघा, हे एका प्रकारचं शास्त्रीय आधारावर तर्क करणं असतं. या विषयातल्या पूर्वानुभवावरून ‘हे असं असं केलं तर हे होण्याची शक्यता आहे’ इथून सुरुवात होते.

प्रश्न : म्हणजे तंत्रज्ञान आणि चाचण्या या दृष्टीने मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हीच दोन व्हॅक्सिन्स सर्वात पुढे आहेत का?

डॉक्टर ढेरे: नाही. मॉडर्नाची लस हीही पुढे आहे. सध्याच्या (गंभीर) परिस्थितीत कोण पहिलं कोण दुसरं अशाला फारसं महत्त्व नाही. कुणाचंही येऊ देत, लवकर येऊ देत. भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान थोडं वेगळ्या प्रकारचं आहे – virulent (म्हणजे रोग निर्माण करण्याची क्षमता असलेला; विनाशकारी) व्हायरस वाढवायचा. तो वाढल्यानंतर inactivate करायचा, त्यात ॲल्युमिनियम जेल टाकायचं आणि इंजेक्टेबल लस तयार करायची. या पद्धतीमध्ये लस अयशस्वी व्हायची शक्यता त्यामानाने फार कमी असते. (म्हणजे सध्या DPT व्हॅक्सिन आहे त्या प्रकारचं हे व्हॅक्सिन असेल) हे यशस्वी व्हायची शक्यता खूप आहे कारण ही पद्धत सर्वात जुनी आहे. अगदी एडवर्ड जेन्नरपासून शास्त्रज्ञांनी या पद्धतीने व्हॅक्सिन्स यशस्वी पद्धतीने तयार केली आहेत. यात एकच अडचण असते की या inactivated व्हायरसचा फार मोठा डोस (लशीमध्ये) द्यायला लागतो. त्यामुळे व्हॅक्सिन्स निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत थोडी अडचण होते. अर्थात प्रत्येक लस तयार करणाऱ्या कंपनीने निर्मिती चालू करण्यापूर्वी आपापले आडाखे बांधलेले असतात, मर्यादांचा विचार केलेला असतोच. मॉडर्नाचंच अजून एक व्हॅक्सिनही येत आहे. अर्थात ही सर्वच व्हॅक्सिन्स दोन डोस द्यायला लागणारी आहेत. सार्वत्रिक लसीकरण करण्यासाठी दोनदा डोस द्यायला लागल्याने थोड्या मर्यादा येतात. सिंगल डोसचं व्हॅक्सिन हे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या दृष्टीने सर्वात उत्तम ठरतं. म्हणजे लस घेऊन एकदा माणूस निघून गेला की त्याने परतपरत लसीकरणासाठी खेटे घालायचे नाहीत. यासाठी मीजल्स व्हायरस-बेस्ड लहान मुलांकरता, आणि कोडाजेनिक्सचं जर परमेश्वरकृपेने व्यवस्थित तयार झालं तर दोन वर्षावरील कुणालाही देण्याचे सर्वोत्तम पर्याय म्हणून भविष्यकाळात पुढे येतील असा अंदाज आहे.

प्रश्न : म्हणजे कोडाजेनिक्सचं व्हॅक्सिन हे तेंडुलकर होणार असं दिसतंय का?

डॉक्टर ढेरे : मी सगळ्यांना तेंडुलकर म्हणेन. जो लवकर बाजारात येईल आणि उत्तम पद्धतीने इम्युनिटी देईल तो आपला तेंडुलकर!!!

प्रश्नः आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. ICMRने २ जुलैला भारत बायोटेकला लिहिलेलं ते पत्र, ज्यामुळे सगळीकडे एकदम खळबळ उडाली, यावरून सर्वसामान्य माणसाला एक नक्की लक्षात आलं की लस बाजारात आणण्यासाठी सरकार आपल्या बाजूने सर्व ब्युरोक्रॅटिक अडथळे दूर करण्याच्या मूडमध्ये आहे. लस लवकरात लवकर बाजारात यावी अशी प्रामाणिक इच्छा सरकारी यंत्रणेत अगदी वरपासून खालपर्यंत सर्वांची असावी. तर याचा फायदा फक्त भारत बायोटेकला होईल की लस तयार करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांना होईल असं वाटतं? आणि हे ब्युरोक्रॅटिक अडथळे दूर केल्याने लस बाजारात येण्यासाठी किती अवधीचा ‘फायदा’ मिळतो, म्हणजे यामुळे लस बाजारात येण्यासाठीच्या टाइम स्पॅनच्या दृष्टीने किती वेळ वाचतो असं म्हणता येईल?

डॉक्टर ढेरे : बरोबर आहे. म्हणजे सध्या पब्लिक प्रेशर इतकं मोठं आहे, की मी फाईल पाठवलीय आणि चार महिने त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही असं उघडकीला आलं तर जनता सरकारला धारेवर धरेल. आणि सरकारी पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न दिसत आहेत. अगदी सात-सात दिवसात फाईल क्लिअर करत आहेत. पंतप्रधानांचे सायंटिफिक ॲडव्हायजर डॉ. विजयराघवन आहेत, त्यांचा मोबाईल हा २४x७ चालू असतो. इतर काही संपर्क झाला नाही तरी त्या नंबरवर मेसेज टाकला की लवकरात लवकर त्यांचं उत्तर येतं. हे नक्की आहे की सरकार सर्व पातळीवर मदत करत आहे. याचा फायदा म्हणाल तर साधारण एक-दीड वर्षाचा फायदा होईल असं दिसत आहे. (हे सरकारी लोकांना सांगितलं तर कदाचित आवडणार नाही.) म्हणजे, नेहमी या विषयावर तीन महिन्यातून एक मीटिंग होत असेल तर आता दर आठवड्यात एक होते. यामुळे फायदा होतोय. या व्यतिरिक्त आता फेज-३ ट्रायल होण्यापूर्वीच तुम्ही उत्पादनाला सुरुवात करू शकता, हा एक नवा बदल आला आहे. पूर्वी फेज-३ ट्रायल झाल्यावर मग लायसन्स मिळे आणि मग तुम्ही उत्पादनाला सुरुवात करू शकायचात. म्हणजे हा नियम त्यांनी शिथिल केला नसता तर कदाचित आम्ही उत्पादनाला सुरुवात जानेवारी महिन्यातच करू शकलो असतो.

अमेरिकेत हा (शिथिल) नियम पूर्वीपासून आहे, इन फॅक्ट, लायसन्स मिळाल्यावर तुम्ही लगेच लस बाजारात आणली नाही तर तुम्हाला सरकार जाब विचारू शकतं. तर या सगळ्या दृष्टीने बघायला गेलं तर साधारण दोनेक वर्षं तरी वाचली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा फायदा फक्त भारत बायोटेकला नाही, तर या क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांना होणार आहे.

प्रश्न : सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीमधे ॲडिनोव्हायरस कॅरियर म्हणून वापरला गेला आहे याविषयी तुम्ही वर उल्लेख केला होता. त्याच संदर्भात एक प्रश्न ‘ऐसी अक्षरे’चे एक सदस्य लेखक मिलिंद पदकी, राहणार न्यू जर्सी, (हे फार्माकॉलॉजी मधे PhD आहेत, फार्मा कंपनीतच पूर्ण करियर केलेले आहेत.) यांच्याकडून आला आहे : सीरमच्या लसीमधे ॲडिनोव्हायरस कॅरियर म्हणून वापरला गेला आहे असं समजतं. हा व्हायरस काही लोकांच्या शरीरात (काही कारणाने) आधीपासून असू शकतो. असं असेल तर (अशा व्यक्तींच्या बाबतीत) अशा लसीच्या परिणामकारकतेत काही अडचणी येऊ शकतात का?

डॉक्टर ढेरे : प्रश्न बरोबर आहे. ॲडिनोमुळे माणसाला सर्दीसुध्दा होते. ॲडिनोव्हायरसमुळे माणसाला होणारी इन्फेक्शन्स बरीच आहेत. काही वेळा डोळ्याची इन्फेक्शन्स या व्हायरसमुळे होतात. पण प्रामुख्याने URT म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्समध्ये हा व्हायरस असतो. आम्ही लस तयार करताना हे गृहीत धरलं आहे की या व्हायरसविरुद्ध सामान्य माणसाच्या शरीरात पूर्वीपासून काही इम्युनिटी असणार आहे. म्हणजे आम्ही हे गृहीत धरलं आहे की तुमच्या शरीरात या ॲडिनोव्हायरसविरुद्ध मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी आहेतच. त्या सगळ्या यातल्या ॲडिनोव्हायरसमुळे न्यूट्रलाइझ होऊन ‘उरलेल्या’ व्हायरसमुळे लसीचा ईप्सित परिणाम साध्य व्हावा, अशा पद्धतीने आम्ही डोस खूप मोठा तयार केला आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन १०१० इतकं जास्त ठेवलं आहे. (नेहमी असा डोस हा साधारणपणे १०च्या पुढे नसतो.) अजून एक गोष्ट – आम्ही वापरत असलेल्या लसीत चिंपांझीच्या शरीरातून घेतलेला ॲडिनोव्हायरस आहे. याचं माणसातल्या ॲडिनोव्हायरसशी साधर्म्य असलं, तरीही काही non-structural भागात काही फरक असतात. त्यामुळे १०० टक्के क्रॉस-न्यूट्रलाझेशन होऊ शकत नाही. कारण जेव्हा अँटीबॉडी निर्माण होतात तेव्हा सर्वसाधारणपणे डॉमिनंट प्रोटीनच्या विरुद्ध जास्त आणि नॉन डॉमिनंट प्रोटीनच्या विरुद्ध कमी अँटीबॉडी तयार होतात. त्यामुळे हे दोन्ही ॲडिनोव्हायरस जरी भाऊभाऊ असले तरीही त्याचे जे कॉमन conserved रीजन असतात त्याच्याविरुद्ध तयार होणाऱ्या अँटीबॉडीजचं प्रमाण त्यामानाने कमी असतं.

प्रश्न : आता मी एक व्हॅक्सिन या विषयाशी संबंधित नसलेला माझा शेवटचा प्रश्न घेतो, तो असा : काही दिवसांपूर्वी दिल्लीतला सीरॉलॉजिकल डेटा प्रकाशित झाला, ज्यात दिल्लीतल्या २१,००० लोकांच्या ब्लड टेस्ट केल्या गेल्या आणि त्यापैकी सुमारे २३ टक्के लोकांच्या शरीरात व्हायरसविरोधी अँटीबॉडीज सापडल्या. आता लोकं मॅथेमॅटिकल मॉडेल्स वापरणार वगैरे मान्य करू, तरीही एक प्रश्न राहतो : लोकांनी या तेवीस टक्क्यांचा संबंध आधी दिल्लीतल्या दोन कोटी जनतेशी आणि नंतर पूर्ण देशातल्या १३६ कोटी जनतेशी जोडून भारतात मोठेमोठे आकडे काढले आहेत की आपल्याकडचे ३०- ४० कोटी लोक आधीच कोरोनाव्हायरसला इम्यून झाले आहेत. ही अशी एक्सट्रापोलेशन्स करणं आपणाला किती योग्य वाटतं?

डॉक्टर ढेरे : मी एक उदाहरण देतो. एखाद्या महिन्यापूर्वी सिंगापूरमध्ये एक मॅथेमॅटिकल मॉडेल पब्लिश झालं होतं. त्यात नेदरलँड्स, युके, जर्मनी आणि यूएसमधल्या डेटाचा आधार घेऊन असं प्रेडिक्शन केलं होतं की साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही महासाथ संपत आलेली असेल. हा पेपर बहुतेक मे महिन्याच्या शेवटी पब्लिश झालेला होता. वस्तुस्थिती काय झाली हे आपण बघत आहोतच. दुसरं असं, की हर्ड इम्युनिटीसाठी R0 महत्त्वाचा असतो. म्हणजे एक इन्फेक्टेड पेशंट किती लोकांना संसर्ग पोचवू शकेल हे तो आकडा सांगतो. तर कम्युनिटी ट्रान्सफर आणि नॉन-कम्युनिटी ट्रान्सफरच्या केसमध्ये या R0मध्ये खूप फरक पडतो. म्हणजे अगदी एका केसमध्ये ती व्हॅल्यू २ असू शकते आणि दुसऱ्यात बारा, इतका मोठा फरक असतो. या फिगर घेतल्या तर हर्ड इम्युनिटी यायला किती आकडा हवा हे मोठया प्रमाणात बदलेल म्हणजे तुम्ही यातली कुठली R0 फिगर घेताय यावर तुमचे निष्कर्ष बदलतील. एकामध्ये ते २३ कोटी आकडा दाखवेल आणि दुसऱ्यात ८० कोटी. अजून एक गोष्ट म्हणजे जी लोकं बाधित आहेत त्यांच्या शरीरात पुरेशा न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आहेत का? आत्ताची उपलब्ध किट्स आहेत त्यामधे फक्त IgG अँटीबॉडीज दिसतात. IgG आहेत म्हणजे त्या सगळ्या न्यूट्रलाजिंग अँटीबॉडी आहेतच असा अर्थ होत नाही. त्या सर्व न्यूट्रलाजिंग अँटीबॉडीज असतील तर ही सर्व लोकं इम्यून झाली आहेत असं समजायला हरकत नाही. पण आत्ताच्या या डेटावरून हे काही स्पष्ट होत नाही.

आणि हे समजा खरं असेलच, तर मात्र फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे जर खरं असेल तर महासाथ डिसेंबरपर्यंत खाली यायला काही हरकत नाही.

ही असली मॉडेल्स खरी ठरली तर मलाही अत्यंत आनंद होईल,पण जर झाली नाहीत तर जनक्षोभ होईल. त्यापेक्षा ‘वाईट होईल असं धरून चालायचं आणि त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायचा’ हा मार्ग खरा.

---

मुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे

(भाग २)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

अतिशय माहितीपूर्ण आणि आशादायी मुलाखत. प्रश्न विचारणारेही तज्ञ मंडळी असल्याने मुलाखतीला नेमकेपणा आला.
कुणाच्याही कोंबड्याने का होईना, एकदाचं उजाडु दे, अशी सामान्य जनतेची अवस्था झाली आहे. मुलाखत देणाऱ्या आणि घेणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सज्जड मुलाखत हो!
---------
प्रश्न योग्य आले की मुलाखत देणाऱ्यालाही हुरूप येतो.
----------
ऐसीसह सर्व सहभागींचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0