Skip to main content

भेंडी! सल्ला हवा आहे.

सूचना -
१. थंड हवामानात राहणाऱ्या आणि बागकाम करणाऱ्या आमच्या मैत्रीण रुची ह्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जळवण्यासाठी हा धागा काढलेला नाही.
२. भेंडी कशी लावावी ह्या विषयावर इथे चर्चा होऊन वाचकांना भेंडी लावण्याची इच्छा झाल्यास धागाकर्ती त्याला जबाबदार नाही.
३. भेंडीसारखे बुळबुळीत प्रतिसाद मनावर घेतले जातील. त्यामुळे भलत्या ठिकाणी भेंड्या (होय, भेंड्या) टाकू नयेत. लोकांना घसरायला होईल.

फेब्रुवारी महिन्यात पेरलेल्या, भेंडीच्या १२-१५ बियांमधून शेवटी पाच झाडं उगवली. आणि त्यातली चार झाडं यशस्वीरित्या जगवणं मला जमलं. झाडं लावण्याची कल्पना माझ्या डोक्यात भरवणाऱ्या रुचीने मला ही पूर्वकल्पना दिली नाही की सगळ्या झाडांना एकदमच प्रत्येकी ४-६ भेंड्या लागत नाहीत. ती झाडं आहेत, यंत्रं नाहीत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या संख्येने भेंड्या लागतील. त्यामुळे ह्या अडचणीचं पातक तिच्या नावावर फोडून पुढे जाणं क्रमप्राप्त आहे.

तर ही भेंडी दिसामासी वाढायला लागल्यावर तिची बाळपानं बघून 'आली, कळी आली' असं मी नाचून घेतलं. मग दोन-चार दिवसांतच ही कळी नसून पान आहे हे समजत होतं. पण भेंडीचं झाड असलं तरी ते अध्यात्मिक नसणार, त्यालाही फुलं धरणार आणि ते फूल (म्हणजे फुलाच्या पाकळ्यांच्या आतल्या गोष्टी) गोत्रगमन करणार ही शंका खरी ठरली. भेंडीची भाजी आठवून फुलाची कल्पना करू नका, फूल छान दिसतं. आयरिससारखं वाटतं किंचित. हे पहा -
भेंडीचं फूल

ह्या फुलाच्या पाकळ्या फार उघडल्याच नाहीत. त्या पडद्याआड काहीतरी घडलं (श्‌... तपशील मिळणार नाहीत.) आणि बाळभेंडी धरली. बाकीची झाडं अजूनही वयात आलेली नसल्यामुळे ही एकटीच भेंडी तयार झाली आहे.

घरची भेंडी

आता प्रश्न असा आहे की एका भेंडीचं काय करू? एक उपाय असा सुचतो की भरली भेंडी करून खावी. तसाही आता इथे उन्हाळा आहे, भूक कमी झाली आहे आणि मला वजन कमी करायचं असल्यामुळे आहारनियंत्रणासाठीही भाजी कमी केल्याचा फायदा होईल. मग कोणीतरी असा प्रश्न जरूर विचारेल की आहारनियंत्रण करायचं आहे तर मग खायची तरी कशाला! पण मग भेंडी, करू काय? सल्ले द्या. सल्ले जेवढे जास्त बुळबुळीत तेवढं अधिक सोयीचं. शिवाय भेंडीचं डेख, साल, बिया ह्यांचे निरनिराळे उपयोग सुचवलेत तर सोन्याहून पिवळं. तेव्हा लागा कामाला आणि सल्ले द्या.

.शुचि. Thu, 23/06/2016 - 02:15

मस्त मस्त रंगीत भेंडीप्रिंट काढून इथे चित्रे टाक व नंतर त्या रंगीत भेंडीच्या तुकड्यांची ताकातील भेंडी करुन खा.
http://1.bp.blogspot.com/-1N5uIG5r4FU/TbGHy88qzjI/AAAAAAAAErg/pe-QJ56O634/s1600/012.JPG

ता क - खाण्याचे रंगच वापरावे. नाहीतर अन्य रंगांतील भेंडी खाऊन विषबाधा झाली तर शुचि जबाबदार नाही ;)
____
किंवा ३ बटाटे + १ भेंडी इश्श्य! असे चावट कॉम्बिनेशन घेऊन भाजी करुन खा. =))
____
http://members.whiskaffair.com/wp-content/uploads/2016/04/Masala-Bhindi.jpg
.
आई ग्ग! आय लव्ह भेंडीची भाजी.
___
बाकी आतापर्यंतचा विषण्ण करणारा अनुभव हाच की धागाकर्ता(र्ती) प्रश्न विचारतो जगाला व करतो शेवटी मनाचेच :(
आपला सल्ला फेटाळला की वि-ष-ण्ण ..... वि-ष-ण्ण वाटतं
____
बाकी तू तिर्री पाळलीस तशी बकरीही पाळू शकतेस किंवा गरीब गाय ;) मग तुझ्या कोणत्याही भेंडीचे काय करायचे असे प्रश्नच पडणार नाहीत. ती गाय मुकाट्याने पानात वाढलेली भेंडी खाइल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/06/2016 - 02:42

मूळ धाग्यात लिहायचं राहिलंच, पाककृती लिहिणार असलात तर अंड्यासकट आणि अंड्याशिवाय अशी दोन्ही प्रकरणं लिहा. एवढ्या उन्हात अंडी वगैरे खाणं जीवावर येतं, पण अंडीप्रेमींच्या भावना नको दुखवायला. शिवाय भेंडी आणि अंडी असं यमकही जुळतं.

राजेश घासकडवी Thu, 23/06/2016 - 04:48

बाकीच्या लेखावर सावकाश प्रतिसाद देतो, पण

वजन कमी करायचं असल्यामुळे आहारनियंत्रणासाठीही भाजी कमी केल्याचा फायदा होईल.

हे कोणी सांगितलं? म्हणजे भाजी कमी करायची आणि ती न खाल्ल्याने जी भूक राहील त्याजागी अजून पोळ्या खायच्या? ही वजन वाढवण्याची लक्षणं आहेत हो तै.

मला तर ब्वॉ कोणी रोज भेंडी करून वाढली तर माझं वजन प्रचंड कमी होईल. कारण एकतर ती खाववणार नाही. दुसरं म्हणजे भेंडीची भाजी खाऊन जो बुलिमिया होईल तो वेगळाच. ('हाय कंबख्त तुने तो भेंडी खाईच नही' वगैरे उमाळ्यांना फाट्यावर मारण्यात येईल.)

.शुचि. Thu, 23/06/2016 - 06:18

In reply to by राजेश घासकडवी

दुसरं म्हणजे भेंडीची भाजी खाऊन जो बुलिमिया होईल तो वेगळाच.

=)) हाहाहा भेंडी काय मस्त लागते. तिला आधी मसाला (हळद-हिंग-धणेजीरे पूड म्हणजे कोरडा मसाला) लावुन ठेवला की पाणी शोषलं जातं, अशी कोरडी ठक्क करुन मग किंचित जास्त तेलावर परतून वर चिंच/आमसूल घालायचे. व साखर-गूळ अगदी वर्ज्य. काय मस्त लागते. आणि हां खरपूस मिर्च्या.

राही Thu, 23/06/2016 - 06:55

पारशांचा(अर्थात सगळ्यांचाच) अंडी-भेंडी जोक प्रसिद्ध आहेच, पण तो जोक अपार्ट, आता झाडांवर जसजशा भेंड्या धरतील तसतसे ऐसीकरांनी फेर धरून 'एक भेंडी खुडू बाई दोन भेंड्या खुडू' असा भेंडला ईवेन्ट्/सेलेब्रेशन करणेचे करावे.

'न'वी बाजू Fri, 24/06/2016 - 08:06

In reply to by राही

पारशांचा(अर्थात सगळ्यांचाच) अंडी-भेंडी जोक प्रसिद्ध आहेच...

ज्याअर्थी प्रस्तुत जोक मला ठाऊक नाही, त्याअर्थी तो (तितकासा) प्रसिद्ध नाही.

(असो. हा जोक नेमका काय आहे?)

नितिन थत्ते Thu, 23/06/2016 - 07:04

भेंडीचे पीक पुरेसे न आल्याने शेतकर्‍याने आत्महत्या केली तर एक वैताग टळला म्हणून शेतकर्‍याच्या कुटुंबियांना मदत वगैरे करण्यात येईल.

आडकित्ता Thu, 23/06/2016 - 09:19

In reply to by नितिन थत्ते

भेंडीचे पीक पुरेसे न आल्याने शेतकर्‍याने आत्महत्या केली तर एक वैताग टळला म्हणून शेतकर्‍याच्या कुटुंबियांना मदत वगैरे करण्यात येईल.

कुटुंबियांना मदत जाहीर वगैरे करण्यात येईल असं म्हणायचंय का तुम्हाला? ;)

राही Thu, 23/06/2016 - 07:26

खर्रीखुर्री रेसिपी. एका भेंडीची फक्त हीच रेसिपी होऊ शकते.
साहित्य : आपल्या बागेत उगवलेली आणि नाचत नाचत खुडून आणलेली एकमेव भेंडी.
आता खरी रेसिपी सुरू. साहित्य पुढे चालू. कृती पुढे चालू, .
काठिण्य पायरी एक : तर या भेंडीचे दोन सें मी. पेक्षा हव्या तितक्या जास्त लांबीचे आणि चिमट्यात उचलायला जमेल असे होतील तितके तुकडे करावे.
काठिण्य पायरी दोन : त्यांना मधोमध कौशल्याने चीर द्यावी. आपले बोट कापून घेऊ नये. ही स्वराज्याच्या शपथेची रेसिपी नाही. त्यावर थोडे मीठ चोळावे.
ओले खोबरे हाताशी म्हणजे फ्रिजशी असेल तर आणि तरच पुढे सरकावे. नाही तर हे कापलेले तुकडे एका सुंदर बशीत व्यवस्थित अरेन्ज करून डेकोरेशन म्हणून ठेवावे.
आता सोप्पे. अर्धी मूठ खोबरे, एक हिरवी मिरची (हीदेखील झाडाला लागलेली असेल आणि नाचत नाचत खुडलेली असेल तर फारच उत्तमचव येईल असे म्हणायचे होते. समजून घेणे. आणि लसणाच्या दोन मध्यम पाकळ्या. हे सर्व कसेही कुणाकडूनही बारीक वाटून आणणे/घेणे. आधी मीठ चोळलेले असल्याने चोळल्या मिठाला स्मरून हवे असल्यास मिठाचा खडा टाकावा. रेसिपी बिघडल्यास ह्या मिठाच्या खड्यामुळे बिघडली असे म्हणता येईल. तर हा सगळा घोळ भेंडीत व्यवस्थित भरावा. घोळ की बोळ हे समजता कामा नये इतरांना.
मग तव्यावर थोड्या तेलात काळजीपूर्वक दोनतीनदा परतून तळावे. करपवू नये. करपलेले खोबरे भयाण लागते. नंतर खावे. कसेही खावे किंवा कसेही.
खराखुरा डिस्क्लेमर. धागाकर्तीच्या पाककौशल्याबद्दल काहीही विनोद करायचा हेतू नाही. धागाप्रस्तावाच्या टोनमुळे असे लिहावेसे वाटले.

नितिन थत्ते Thu, 23/06/2016 - 09:22

In reply to by राही

>>आपले बोट कापून घेऊ नये. ही स्वराज्याच्या शपथेची रेसिपी नाही. त्यावर थोडे मीठ चोळावे.

पण बोट कापले नाही तर मीठ चोळून काहीच होणार नाही.

आडकित्ता Thu, 23/06/2016 - 09:20

इकडे तिकडे पाहून कुणी पाहत नाहिये याची खात्री करा, अन ती कच्ची भेंडी चट्कन खाऊन टाका. नुसतीही छान लागते. देठाजवलचे काटे जिभेला टोचू शकतात. तेवढी काळजी घ्या.

तिरशिंगराव Thu, 23/06/2016 - 10:10

त्या भेंडीचा फोटो काढा. त्याचे अनेकवेळा थ्री डी प्रिंट्स काढा, म्हणजे भरपूर भेंड्या होतील. त्यानंतर रीतसर भाजी करा आणि बर्‍या अर्थ्याला खायला घाला. हाकानाका.

बॅटमॅन Thu, 23/06/2016 - 11:45

In reply to by सुमी

फ्राईड भेंडी किंवा कोरडी भाजी ठीक लागते. पण भेंडीची रसभाजी लैच वाईट्ट रे बाबा. विशेषतः त्या भेंडीतून जी पाणचट्ट तार निघते त्याची तुलना फक्त एखाद्या बाळाने तोंडात बोट घालून ते बाहेर काढल्यावर लोंबणार्‍या श्लेष्मल तारेशीच होऊ शकते.

सुमी Thu, 23/06/2016 - 11:53

In reply to by बॅटमॅन

भेंडीची रसभाजी खायचे भोग अजुन नशिबात आलेले नाहीत. आता कधी जर कोणी वाढलीच तर हिच कमेंट आठवेल. यक्सऽऽऽऽ

आदूबाळ Thu, 23/06/2016 - 11:59

In reply to by बॅटमॅन

रसभाजी शिवायही भेंडीची भाजी बिघडवण्याचे अन्य 101 प्रकार आहेत. गुळभेंडी किंवा चिंगु+भेंडी हे त्यातले ष्टार प्लेयर आहेत.

पण तरी भेंडीवर आक्षेप नाही. आपल्या पाककौशल्याला ओव्हरएस्टिमेट करणाऱ्या बल्लवांचा दोष आहे.

बॅटमॅन Thu, 23/06/2016 - 12:03

In reply to by आदूबाळ

गुळभेंडी किंवा चिंगु+भेंडी हे त्यातले ष्टार प्लेयर आहेत.

अतिशय सहमत. चिंगुसपणाचा मी विरोधक आहे तो याही कारणामुळे.

अजून एके ठिकाणी विरोधक आहे ते म्हणजे आमटीत चिंगु टाकले तर नुसती ग्वळ्ळ गोडमिट्ट होऊन जाते आमटी. अरारारा, घरात इतकी वर्षे ती आमटी बनत असे, स्कार्ड फॉर लाईफ.

बोरिंग, फालतू. उत्तर कर्नाटक भागातील कन्नड स्लँग.

मिसळपाव Thu, 23/06/2016 - 18:56

In reply to by .शुचि.

हे अनुमोदन देण्यासाठी लॉगिन केलं! मागे एकदा मेघनाने पण आमटीबद्दल अनुद्गार काढले होते....छ्या...हाय कंबक्त, तूने पीही नही ;-)

नितिन थत्ते Fri, 24/06/2016 - 06:03

In reply to by बॅटमॅन

>>आमटीत चिंगु टाकले तर नुसती ग्वळ्ळ१ गोडमिट्ट होऊन जाते आमटी

आशा बोर्डिंग हाऊसमधील (आताचा आशा डायनिंग हॉल, आपटे रोड, पुणे) आमटी आवडायची मला.

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 12:08

In reply to by नितिन थत्ते

आशामध्ये जेवलोय की मी. तिथली आमटी चांगली असते पण बादशाहीतली आमटी एक नंबर. बाकी काही असो पण तिथले ते ताक, तो कोहळ्याचा रस्सा आणि ती आमटी म्हणजे स्वर्ग.

घनु Fri, 24/06/2016 - 12:47

In reply to by बॅटमॅन

बॅटोबा, नको रे त्या बादशाही बद्दल सांगत जाऊ... बाणेरातलं बादशाही इतकं बाद आहे काय म्हणुन सांगू.... तरीही दुसर्‍यांदा गेलो होतो मागच्या विकांताला कारण नुकतंच सुरु होऊनही मधे ते रेनोवेशनच्या नावाखाली बंद होतं. विचार केला, लोकांनी आक्षेप घेतला असेल चवीबद्दल म्हणुन बंद केलं असेल आणि नव्याने अता सुरू असेल... पण नाहीच, निराशाच खिशी (पदरी) हो माझ्या मेल्याच्या....

बॅटमॅन Fri, 24/06/2016 - 14:10

In reply to by घनु

अबे बाणेरातलं माहिती नाही बे. सदाशिव पेठेतलं टिळक रोडवरचं म्हणतोय बे. कमी क्वांटिटी, जास्ती रेट आणि अ‍ॅटिट्यूडवाले वेटर हे सर्व जमेस धरूनसुद्धा वरील घटकांची क्वालिटी तिथे एक नंबर आहे यात डौटच नाही.

घनु Fri, 01/07/2016 - 14:47

In reply to by बॅटमॅन

हो रे टिळक रोडावरील चांगलंच ठाऊक आहे मला म्हणुनच बाणेरातलं बादशाही जास्त डोक्यात जातं नाहितर खपवूनही घेतलं असतं.

सखी Thu, 23/06/2016 - 12:28

In reply to by आदूबाळ

आमच्या हाफिसातली भेंडी खाऊन दाखवा.. आयुष्यात परत कधी भेंडी खाणार नाही .

भेंडीची रसभाजी आणि दुसरी म्हणजे आख्खी भेंडी आणि अर्धे अर्धे कांदे घालून केलेली भयंकर भाजी .(ज्या लोकांना नॉनव्हेज आवडते त्यांनी मिटक्या मारत खावी. भेंडीच्या आत काही सजीव राहात असतील याच्याशी खानसाम्याला काहीही देणेघेणे नसते . )

बाळ सप्रे Thu, 23/06/2016 - 12:04

झालं .. पहिली भेंडी आली नाही तर लगेच खायची तयारी..

त्या भेंडीच्या बिया परत रुजत घाला. मग आणखी बाळभेंड्या येतील..

त्यापण खाउ नका .. परत बिया रुजत घाला..

अशी २-३ चक्र झाली की पुरेशा भेंड्या जमतील घरगुती खादाडीसाठी.. मग चानचान रेसिप्या करा...

भेंडीबाजार करायचा असेल तर परत बिया रुजत टाका.. धीर धरा.. सकाळमधे भेंडीचे भाव वाढल्याची बातमी येइपर्यंत विकायला न्यायच्या नाहीत भेंड्या..

तिरशिंगराव Thu, 23/06/2016 - 12:14

भेंडीची रसभाजी करताना चिंच-गुळ वापरला तर अजिबात तार येत नाही. भेंडी फ्राय खाल्ली तर पोटांत फार तेल जाते आन वजन वाढते.

अमुक Thu, 23/06/2016 - 12:14

भेन्जी, आप वह अकेली भेंडीको देठके भाग में बारीक लांब दोरी बाँध के दूरसे आपके घुबड्तिर्रीके समोर नाचवो.

लोळगे सायकल कंपनी Thu, 23/06/2016 - 14:15

एक कप दुधात, ही एकटी भेंडी क्र्श करुन घाला. ऑप्श्नली त्यात आईस क्रीम घातल्यास भेंडीमस्तानी पण होईल.

बॅटमॅन Thu, 23/06/2016 - 14:18

In reply to by लोळगे सायकल कंपनी

उद्या भातात चहा, शिर्‍यात कांदा घालायला सांगाल. किंवा गेलाबाजार कारल्याची करंजी.

.शुचि. Thu, 23/06/2016 - 16:41

In reply to by बॅटमॅन

मी मोजते आहे ही दुसरी वेळ तू चहा+भात कॉम्बोचा उल्लेख केलास. उलटी होते रे मला :(

चिंतातुर जंतू Thu, 23/06/2016 - 18:03

सगळ्या जगाचं पॉर्निफिकेशन झालंय हे ऐकून होतो, पण एक हिरवी भेंडी किती अश्लील असू शकते त्याचा प्रत्यय आज आला.
दाखविलीस तू भेंडी बोटभर
सात्विकतेचा खचला पाया
संस्थळास का ऐसीकरां
स्फुरणदायी ती भेंडीजत्रा

राजेश घासकडवी Thu, 23/06/2016 - 20:37

In reply to by चिंतातुर जंतू

पण एक हिरवी भेंडी किती अश्लील असू शकते त्याचा प्रत्यय आज आला.

असंच म्हणतो.

साली एक भेंडी अदितीको इन्सान बना देती. साली एक भेंडी.

किंवा

भेंडीच्या भाजीवर मन अजून झुलते गं
भाजीला काचऱ्या, चीकतार गळते गं

वरुन घाल हळदीचे दोनतीन चिमटे गं,
वरुन चिंगु गो-मसाला फोड्णीला पुरते गं.

भरभरतो घरटी हा तोच वास सारा, गं
थरथरतो तिर्रीचा अजुन देह सारा, गं.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/06/2016 - 20:50

In reply to by राजेश घासकडवी

अमुकच्या सूचनेनुसार तिर्रीला भेंडी दाखवली. तिने भेंडीला एकदा डावली मारली, एकदा तिचा वास घेतला आणि दाराकडे धाव घेतली. तिला ओट्यावर फुटबॉल खेळायला घरचे चेरी टोमॅटो किंवा स्ट्रॉबेऱ्या आवडतात.

लोकांनी फार सूचना देऊन मला फार कन्फ्यूज केलंय. म्हणून मी भेंडी पिशवीत भरून फ्रिजात ढकलली आहे. दुसऱ्याही एका झाडावर आता बाळभेंडी दिसत्ये. ती भेंडीही काढण्यालायक झाली की आख्ख्या गल्लीला घरी बोलावून भेंडीचं गावजेवण घालावं म्हणत्ये. गावजेवणासाठी एका भेंडीला राहींची पाकृ एका भेंडीला शुचिची पाकृ. लोकांनी RSVP केलं नाही तर नाईलच्या म्हणण्यानुसार फार्मर्स मार्केटात स्टॉल काढेन किंवा 'अजब दुनिया' नावाच्या प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला भेंडी चिकटवून पाठवेन किंवा देशस्थी चालढकल करून भेंडी तशीच ठेवेन आणि त्या बिया पुन्हा पेरेन, म्हणजे बाळ सप्रेंचंही समाधान होईल.

Nile Thu, 23/06/2016 - 19:11

१, कोकणस्त नातेवाईक असतील तर मेजवानीचा बेत करता येईल.
२. होल (म्हणजे संपूर्ण रे चावटांनो!) फूड्स मध्ये पाण्याच्या बरणीत घालून विकायला ठेवा.
३. त्या भेंडीच्या झुपडाच्या एकूलत्या एक पोराला आई-बाप वगैरेंपासून असं तोडल्याच्या दुखा:चं प्रायश्चित्त म्हणून एक एनजीओ काढा. त्या द्वारे पैसे जमवून गावोगाव फिरून अशी तोडलेली एकूलती एक फळं-भा़ज्यांना सुपरग्लूने पुन्हा चिकटवा.
४. "ऑर्ग्यानिक्स" टॉईज म्हणून जवळच्या फार्मर्स मार्केट मध्ये विकायला ठेवा. (कोण रे तो सेक्स टॉईज म्हणणारा? (त्यासाठी खंड बदलावा लागेल की त्यांना!))

मस्त कलंदर Thu, 23/06/2016 - 21:06

भेंडी.....एक पॉवर हाऊस

माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.
इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.
या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो ः कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्‍या साखरेचे प्रमाण रोखले जाते. भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो. हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते. या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो....
|| भेंडी खा निरोगी रहा ||
विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.
* मधुमेहींसाठी औषध *
दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.
* भेंडीचे १० फायदे *:-
हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे 10 फायदे,
१. कँसर
भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.
२. हृदय
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
३. डायबिटीज
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
४. अनीमिया
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयरन हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.
५. पचनतंत्र
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.
६. हाडांना मजबुत बनवते
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हीटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.
७. इम्यून सिस्टम
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.
८. डोळ्यांचा प्रकाश
भेंडीमध्ये व्हिट्रमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.
९. गर्भावस्था
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
१०. वजन कमी करण्यात
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/06/2016 - 21:11

In reply to by मस्त कलंदर

सदर प्रतिसाद चिकटोत्तम आहे ह्याबद्दल अजिबात शंका नाही. आता फक्त मस्त कलंदर ह्यांनी हे फॉर‌वर्ड कुठून मिळवलं ह्याचं उत्तर द्यावं.

एकाच परिच्छेदात भेंडी, भेडी आणि भेंजी असे तीन शब्द आहेत. पण "व्हिटामीन सी हे जीवनस्तव" हे सगळ्यात जास्त आवडलंय.

पिवळा डांबिस Thu, 23/06/2016 - 22:03

In reply to by मस्त कलंदर

च्यामारी भेंडी-गवारी!!!
ह्याला म्हणतात प्रोफेसर!! (अन्यथा भेंडीवर इतक्या अंगाने विचार दुसरं कोण करणार?) :)
आमचा शिरसाष्टांग नमस्कार!!

जोजोकाकू: नाहीतरी भेंडीला 'लेडीज फिंगर' म्हणतातच! स्त्रीद्वेष्ट्यांना दाखवायला उपयोगात येईल तुम्हाला!! ;)

मस्त कलंदर Fri, 24/06/2016 - 18:22

In reply to by पिवळा डांबिस

हा प्रोफेसरी प्रताप नाही हो.. भेंडी शब्द दिसल्या-दिसल्या आलेलं फॉरवर्ड इथे चिकटवून दिलंय.
त्या अनाम लेखक/लेखिकेचा श्रेयाव्हेर राहिला घाईत...

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/06/2016 - 18:43

In reply to by मस्त कलंदर

प्रतिमा तयार होत्ये, नाकारू नकोस. आंजा लेखकांनी प्रतिमेला आणि ट्रोलाने नकारात्मक श्रेणीला कधी नाही म्हणू नये.

.शुचि. Thu, 23/06/2016 - 21:09

दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.

ईईईईईईईईईईईईईई!!!!!!!!
उलट्या होऊन, शरीरातील, पाण्याच्या प्रमाणात घट नक्की होइल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 15/08/2016 - 22:42

काल आयुष्यात पहिल्यांदाच वरणभात आणि भेंडीची भाजी खाल्ली. भेंडी घरची; दहा दिवस जमवलेली. पुस्तकांमध्ये वर्णन केलेला भटो मेन्यू आयुष्यात प्रथमच केला आणि त्यातही भाजी घरची म्हणून धागा वर काढला.