Skip to main content

नव्वदोतरी संकल्पनेबद्दल

मुखपृष्ठाविषयी.

नव्वदोत्तरी संकल्पनेबद्दल

लेखक - चिंतातुर जंतू

कल्लोळाला आकळताना

आताच्या काळातलं जगणं हे कल्लोळातलं जगणं आहे. हा कल्लोळ अनेक पातळ्यांवरचा आहे. आताचा आपला अवकाश आणि काळ त्या कल्लोळानं व्यापून टाकला आहे. त्यात मोठमोठ्या होर्डिंग्जचा दृश्य पातळीवरचा कल्लोळ जसा आला तसाच ट्रॅफिकचा कोलाहलही आला. अंधाऱ्या नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात समोर काही तरी गंभीर चालू असताना जेव्हा कुणी तरी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून काही तरी करत असतं तेव्हा त्याच्या आणि आजूबाजूच्या अवकाशालाही एक वेगळाच कल्लोळ व्यापतो. तो आपल्याला सांगत असतो की समोर चाललेलं नाटक किंवा सिनेमा जागतिक दर्जाचा वगैरे काही नाही - तुझ्या समोरचा हा कल्लोळच काय तो खरा आहे. ‘अमुक एका व्यक्तीला मत देशील तरच तुझं भलं होईल’, ‘तमुक स्मार्टफोन घेतलास तरच तू खरा माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा आहेस’ असा कल्लोळ जेव्हा समोर येतो तेव्हा हे लक्षात येतं की आताचा काळ मोठा गमतीशीरही आहे. सगळे आपल्याला येडा समजतायत का? त्यांचा गेम आपल्याला कळला नाही तर आपण त्या कल्लोळात खेचले जाऊ हे खरं आहे. पण, त्यातली गंमत आपल्याला कळली नाही, तर आपण त्या कल्लोळाला शिव्या देऊन कुठल्या तरी जुनाट, किंबहुना कालबाह्यच झालेल्या मूल्यांना धरून बसू - मग ती मूल्यं कुठल्या तरी धर्माची असोत, जातीची असोत, नाही तर जगाला प्रेम अर्पू पाहणाऱ्या साने गुरुजींच्या श्यामच्या आईची असोत. त्यातल्या कशालाच आजची गंमत हातात धरता येणार नाही. पण म्हणून ती गंमत नाहीशी होत नाही. ती व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड्समध्ये असते, ती आलिया भट्टमध्ये असते आणि ती गजेंद्र चौहानमध्येही असते. ती बाहुबलीच्या लचकू पोझमधून शिवलिंग नेणाऱ्या गणपतीच्या देखाव्यात असते आणि ती ऑनलाईन शॉपिंगमधून सेक्स टॉइज खरेदी करणाऱ्या, पण ‘होम डिलिव्हरी द्यायच्या आधी फोन करा हं’ असं बजावणाऱ्या पापभीरू मध्यमवर्गातही असते.

‘ही पोली साजुक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद’ सारखं गाणं लोकप्रिय होण्यात तर गंमत आहेच, पण ‘होम मिनिस्टर’ किंवा ‘चला हवा येऊ द्या’सारखा कार्यक्रम लोकप्रिय होण्यातही गंमत आहे. जे सर्वसामान्य लोक ह्या कार्यक्रमात सहभागी होतात तसे चेहेरे ह्यापूर्वी कधीच टीव्हीवर अशा प्रकारे येत नसत. भारत गणेशपुरे किंवा सागर कारंडेला त्या ऑडियन्सकडून जो रिस्प‍ॉन्स येतो तो अगदी सहज आणि मनापासून असतो - रिअलिटी शोमधला ‘आता हशा, आता टाळ्या’ टाईपचा तो खोटा किंवा बेतीव नसतो. आणि तो रिस्पॉन्स जितका त्यांच्या स्किटमधल्या विनोदाला येतो तितकाच ते चकचकीत चेहेऱ्यांचे नटवे नट नाहीत आणि ह्या सामान्य प्रेक्षकासारखे आहेत ह्यालाही येतो. असाच प्रकार कबड्डीच्या लोकप्रियतेत होताना दिसतो. लहान गावांतून आलेले रांगडे ‘सन्स ऑफ द सॉईल’ तिथे भारतभरातल्या प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. त्यांच्या लोकप्रियतेपोटी बॉलिवूडच्या किंवा क्रिकेटमधल्या तारकासमूहाला आपल्या नभांगणातून उतरून कबड्डीसारख्या रावड्या खेळाच्या सामन्यांना हजेरी लावावी लागते. सामान्य माणसाला हे ग्लॅमर आणि हे महत्त्व लाभणं भारतात अभूतपूर्व आहे. नेमाड्यांचा देशीवाद झिडकारला तरीही हा देशीवाद झिडकारता येण्यासारखा नाही. अभिजनांच्या अभिरुचीला फाट्यावर मारून सामान्य माणसाच्या रुचीचं असं केंद्रस्थानी येणं एकदा आकळलं की मोदींचं पंतप्रधान होणंसुद्धा आकळतं आणि त्याचा फारसा त्रासही होत नाही. (अर्थात, ते मोदींना आकळलं पाहिजे; तरच ह्या सामान्य माणसाला हवा आहे तसा परफॉर्मन्स मोदी देऊ शकतील; पण तो इथे आपला विषय नाही. त्यामुळे ते असोच.)

आणखी एक गंमत अशी, की ही प‍ॉप्युलर रुची केवळ बाजारपेठेनं वाकवण्यातून आलेली नाही. त्यामुळे ती तसले पैशाबियशाचे नियमही पाळत नाही. उलट बाजारपेठेलाच ह्या लोकप्रिय अभिरुचीची दखल घ्यावी लागतेय. ह्यात एक प्रकारचा गावरान तिरपागडेपणा आहे आणि सगळ्याच मूल्यचौकटींना धोबीपछाड देणंसुद्धा आहे. पण हे कुणाच्या लक्षात येतंय का? कुणाला हे दिसतंय का?

कारण, अशा सगळ्या जगात जगत असूनही सोशल मीडियावर काही तरी गंभीर आणि सघन वगैरे शोधणारा आपला मराठी माणूस, मराठी संस्थळांवरचा वाचकवर्ग आणि एकंदरीतच जालावरच्या दिवाळी अंकांचा (आणि कदाचित छापील अंकांचाही) वाचक ह्यापासून दूरच कुठे तरी आहे. जगणं आणि रुची ह्यातली ही गॅप जाणवून देता येईल का? आणि कदाचित सांधताही येईल का? त्यासाठी ‘नव्वदोत्तरी’ हा एक दुवा ठरू शकेल असं वाटलं. कारण ‘पॉप आर्ट’ला कवळणारे अॅन्डी वॉरहॉल किंवा लिकटेनश्टाईन आपल्यापासून दूर आहेत, आणि झिझेकसारखा माणूस क्लिष्ट आहे की खोडसाळ, ह्याविषयीच आपल्याकडे अद्याप निर्णय होत नाही; त्यामुळे तो पोचतही नाही. हे नव्वदोत्तरी लोक मात्र इथे आपल्याच जगात राहून त्याबद्दल काही म्हणू पाहताहेत. त्यांना जे नव्वदोत्तरी जगाविषयी जाणवलं ते सगळं आज लागू असेलनसेल, पण त्यांचा प्रयत्न समजून घ्यायला गेलं तर कदाचित आताचा कल्लोळ आकळायला त्याची मदत होईल. अर्थात, आपला समाज त्यांच्यापासून फटकून असल्यामुळे किंवा काही प्रमाणात ते लोकही तितकेसे समाजाभिमुख नसल्यामुळे त्यात अडथळे येणार हेसुद्धा गृहित आहे. कुणाला त्यांची भाषा रुचणार नाही; कुणाला ती दृश्यव्यवस्था पचणार नाही; कुणाला ते क्लिष्ट वाटेल; तर कुणाला हे सगळे फ्रॉडच वाटतील. तरीही थोडा धोका आपण पत्करूया आणि थोडे गुन्हेसुद्धा करायला लोकांना भाग पाडूया असं आम्ही ठरवलं. ;-) नाही तर, मराठी जनमानसाला नव्वदोत्तरी संवेदनांचा विसर पडणं हाच नियतीनं आपल्यावर उगवलेला एक सूड ठरेल. आताचा काळ आणि नव्वदोत्तरी संवेदना ह्या दोन्हींना सांधण्यासाठी अंकात वेगवेगळे प्रयोग करून पाहिले आहेत. काही जुन्या कविता आम्ही पुन्हा प्रकाशित करतो आहोत. आता त्यांना एक संदर्भमूल्य आहे असा आमचा विश्वास आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत तेव्हा किंवा आता कार्यरत असणाऱ्या आणि सद्यकाळाचा अर्थ लावू पाहणाऱ्या काही लोकांना बोलतं करून त्यांचं वास्तवाचं आकलन आपल्यापर्यंत पोहोचवलं तर काही तरी ताजं हाती लागू शकेल असं वाटलं. म्हणून अशा काही लोकांशी आम्ही संवाद साधला आहे. आणि अर्थात काही जुने नवे लेखकही ह्या विषयाच्या निमित्तानं लिहिते झाले आहेत.

“I had melancholy thoughts . . .
. . . A strangeness in my mind,
A feeling that I was not for that hour,
Nor for that place.”

असं वर्ड्सवर्थ पूर्वी म्हणून गेला. त्यामागे अर्थात त्याचा एकलकोंडा रोमॅन्टिसिझम होता. गुरुदत्तमध्येही तो दिसतो. पण आज जेव्हा ओरहान पामुकच्या कादंबरीचं इंग्रजी शीर्षक ‘A strangeness in my mind’ असतं तेव्हा चमकायला होतं. पामुकला जी melancholy अभिप्रेत आहे ती वेगळी आहे, कारण ती सामुदायिक आहे. तुर्कीत त्याला hüzün असा शब्द आहे. एके काळी इस्तंबूल सुंदर असेल कदाचित, पण आजचं इस्तंबूल मात्र झोपडीवजा वस्त्या, घाण आणि — बरोबर ओळखलंत — कल्लोळानं भरलेलं आहे. तिथला प्रत्येक जण जणू काही त्या कल्लोळातल्या melancholyनं भारलेला आहे. त्यासाठी वर्ड्सवर्थच्या रोमॅन्टिक कवितेतून जर शीर्षक उचलता येतं तर आपण नव्वदोत्तरी संवेदनांकडून का काही उचलू शकणार नाही? ह्याचसाठी हा अट्टहास.

विशेषांक प्रकार

उपाशी बोका Wed, 04/11/2015 - 10:27

नव्वदोत्तरी लोक मात्र इथे आपल्याच जगात राहून त्याबद्दल काही म्हणू पाहताहेत. त्यांना जे नव्वदोत्तरी जगाविषयी जाणवलं ते सगळं आज लागू असेलनसेल, पण त्यांचा प्रयत्न समजून घ्यायला गेलं तर कदाचित आताचा कल्लोळ आकळायला त्याची मदत होईल.

एके काळी इस्तंबूल सुंदर असेल कदाचित, पण आजचं इस्तंबूल मात्र झोपडीवजा वस्त्या, घाण आणि - बरोबर ओळखलंत - कल्लोळानं भरलेलं आहे.

नव्वदोत्तरी लोक म्हणजे कोण? नव्वदोत्तरी म्हणजे काय? १९९० च्या दशकानंतर जन्मलेले लोक का?
कल्लोळ म्हणजे काय?
मराठीत नाही जमले तर इंग्रजीत सांगितलेत तरी हरकत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे, ते कळेल अशी आशा.

.शुचि. Wed, 04/11/2015 - 11:08

In reply to by उपाशी बोका

मलाही नव्वदोत्तरी हा शब्द फार जड गेला होता. नक्की कशाचा (फेसबुक्) सोडून यात अंतर्भाव आहे, हे कळलेच नाही. :(

मेघना भुस्कुटे Wed, 04/11/2015 - 12:13

फारच भारी लेख आहे. या लेखाच्या उंचीला बाकीचा गेला, तर अंक यशस्वी झाला म्हणायचं. :)

अमुक Mon, 09/11/2015 - 10:57

अचूक निरीक्षणांचे अतिशय उद्बोधक विवेचन. अनाकलनीय, असंबद्ध वाटणार्‍या अनेक गोष्टींना एखाद्या विशिष्ट चौकटीतून पाहिल्यावर अनेक गुंत्यांच्या गाठी निरखून पाहता येतात, पोताची वीण ठळक दिसते, तसेच या लेखाने केले आहे. अनेक धन्यवाद.

पण हे कुणाच्या लक्षात येतंय का? कुणाला हे दिसतंय का?
........हाच कळीचा प्रश्न आहे. जे अशा कल्लोळात रममाण आहेत त्यांना हे सारं जगणं एका त्रयस्थ, विशिष्ट दृष्टीकोनातून पाहायची अजूनही निकड नाही, उसंत नाही, असंच दिसतं. हेही एक या काळाचंच वास्तव आहे असं दिसतं.

ग्रेस यांच्या ओळी (संदर्भ वेगळा असला तरी) आठवल्याशिवाय राहत नाहीत.

डोंगरी दिसे कल्लोळ
अलिकडले सर्व निवांत
निजतात कसे हे लोक
सरणाच्या खाली शांत

बोका-ए-आझम Mon, 23/11/2015 - 18:03

नवा दृष्टिकोन आवडला. सतत बाजारामुळे सामान्य माणसावर झालेले परिणाम याविषयीचे कटसैद्धांतिक लेख वाचून कंटाळा आला होता. पण बाजारावरही सामान्य माणसाच्या ग्लॅमरहीनतेचा परिणाम झालेला आहे हे दाखवणारा लेख आवडला!

अरविंद कोल्हटकर Wed, 25/11/2015 - 09:20

स्वातन्त्र्य - नेहरूंचा समाजवाद - त्याचा अतिरेक - नरसिंहराव-मनमोहन सिंग ह्यांनी आणलेला मोकळेपणा - पंचाण्णवनंतरचे संगणक-टीवी चॅनेल्स-मोबाइल फोन असे बदल होत असतांना ते बदल होत आहेत हे मला जाणवत होते. तसे काहीहि मला नव्वद साली वाटलेले नव्हते. नव्वदोत्तरीच का आणि पंच्याऐंश्योत्तरी/ पंचाण्णवोत्तरी/दोनहजारपाचोत्तरी का नाही ह्याचेहि उत्तर मला सुचत नाही.

मला तरी असे वाटत आहे की इकडचे तिकडचे गोलमाल लेख गोळा करून 'हेच ते तुम्हाला न समजलेले नव्वदोत्तरी' असे काही तरी संपादक माझ्या माथी थोपवत आहेत.

'आपले अज्ञान कसे व्यक्त करायचे, त्यापेक्षा काहीच न बोललेले बरे' अशी मिठाची गुळणी तोंडात धरून बसण्याऐवजी स्पष्टच "राजा नागडा आहे" असे माझे मत नोंदवतो.

बिटकॉइनजी बाळा Wed, 25/11/2015 - 09:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

>>स्वातन्त्र्य - नेहरूंचा समाजवाद - त्याचा अतिरेक - नरसिंहराव-मनमोहन सिंग ह्यांनी आणलेला मोकळेपणा - पंचाण्णवनंतरचे संगणक-टीवी चॅनेल्स-मोबाइल फोन असे बदल होत असतांना ते बदल होत आहेत हे मला जाणवत होते.
या बदलांसंदर्भात तर "नवद्दोत्तरी" म्हणतात. ही टर्म पॉप्युलर करण्यात साहित्यिकांचा हातभार आहे. साठोत्तरी इत्यादी हे त्याच अंगाने पाहिलं जातं. अगदीच १९९० सालानंतर असं नाही. तुम्ही शब्दशः अर्थ घेतलेला आहे की काय.

चिंतातुर जंतू Wed, 25/11/2015 - 11:50

In reply to by अरविंद कोल्हटकर

>> नव्वदोत्तरीच का आणि पंच्याऐंश्योत्तरी/ पंचाण्णवोत्तरी/दोनहजारपाचोत्तरी का नाही ह्याचेहि उत्तर मला सुचत नाही.

खरं तर मकरंद साठेंनी दिवाळी अंकासाठीच दिलेल्या मुलाखतीत ह्या मुद्द्याचा उहापोह केलेला आहे. 'हा टप्पा १ जानेवारी १९९० असा सांगता येत नाही. जसं महायुद्धाचं सांगता येतं - १९३९ ते १९४५ असा निश्चित कालखंड सांगता येतो - तसं नव्वदोत्तरीचं नाही.' असं म्हणूनदेखील त्यांनी अखेर काढलेला निष्कर्ष - "नव्वदोत्तरी हा महायुद्ध किंवा स्वातंत्र्यासारखा बदल नसला तरीही आपल्याला इतक्या अनेकविध गोष्टींत बदल होताना दिसत आहेत त्यामुळे नव्वदोत्तरी हा कालखंड अधोरेखित करण्यासारखा निश्चित आहे."

>> मला तरी असे वाटत आहे की इकडचे तिकडचे गोलमाल लेख गोळा करून 'हेच ते तुम्हाला न समजलेले नव्वदोत्तरी' असे काही तरी संपादक माझ्या माथी थोपवत आहेत.
'आपले अज्ञान कसे व्यक्त करायचे, त्यापेक्षा काहीच न बोललेले बरे' अशी मिठाची गुळणी तोंडात धरून बसण्याऐवजी स्पष्टच "राजा नागडा आहे" असे माझे मत नोंदवतो.

आपण ह्यापूर्वी उपस्थित केलेल्या आक्षेपांना इथे आणि इथे प्रतिसाद दिला होता. त्यावर नंतर आपल्याकडून काही प्रतिवाद झालेला दिसला नाही. मग अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा अचानक इथे येऊन 'राजा नागडा आहे' असं म्हणावंसं आपल्याला वाटत असेल, तर तो आपला हक्क आहे आणि आपल्या मताचा आदरही आहे; मात्र, त्याच्याशी सहमत होण्याची किंवा त्याचा प्रतिवाद करण्याची गरज भासत नाही, एवढंच म्हणणं सध्या शक्य आहे.

ऋषिकेश Thu, 26/11/2015 - 08:34

In reply to by चिंतातुर जंतू

आपण ह्यापूर्वी उपस्थित केलेल्या आक्षेपांना इथे आणि इथे प्रतिसाद दिला होता. त्यावर नंतर आपल्याकडून काही प्रतिवाद झालेला दिसला नाही.

आताही या वा खाली असलेल्या राजेशच्या उत्तरावर काहीही नाही. पोचही नाही, सहमती नाही किंवा असहमतीही नाही. :(

मग वरच्या टिपण्णीला केवळ 'पिंक" का म्हणू नये असा प्रश्न पडला.

मेघना भुस्कुटे Wed, 25/11/2015 - 12:24

In reply to by अरविंद कोल्हटकर

मला तरी असे वाटत आहे की इकडचे तिकडचे गोलमाल लेख गोळा करून 'हेच ते तुम्हाला न समजलेले नव्वदोत्तरी' असे काही तरी संपादक माझ्या माथी थोपवत आहेत.

या वाक्याचा सूर फार म्हणजे फारच खटकला. (अगदीच अ-कोल्हटकरी वाटला. पण ते व्यक्तिगत मत.) संपादक कोण काही 'थोपवणारे'? पटलं तर घ्या, नाहीतर सोडा. शिवाय 'गोलमाल' हे विशेषणही जरा भडक वाटत आहे.

राजेश घासकडवी Wed, 25/11/2015 - 14:17

In reply to by अरविंद कोल्हटकर

नव्वदोत्तरीच का आणि पंच्याऐंश्योत्तरी/ पंचाण्णवोत्तरी/दोनहजारपाचोत्तरी का नाही ह्याचेहि उत्तर मला सुचत नाही.

एक सोपं उत्तर सुचतं म्हणजे नव्वदोत्तरी हे म्हणायला सोपं आहे. हे गमतीने नाही म्हणत, मला खरोखरच वाटतं की अशा बाबतीत सुटसुटीत शब्दप्रयोग प्रचलित होतात.

आता काय सोपं आहे यापेक्षा काय योग्य आहे हा विचार करू. एकतर कुठल्याच बदलासाठी बोट दाखवून 'अमुक एक साल - या साली झाली ती क्रांती' असं म्हणता येत नाही. आणि इथे तर अनेक बदल एकत्र आलेले आहेत. फिजिक्समध्ये फेज ट्रांझिशन नावाची संकल्पना असते. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ होणं. हे विशिष्ट तापमानालाच होतं. त्यामुळे शून्य डिग्री सेल्सिअसच्या खाली किंवा वर गेलं तर दिसणारा बदल हा लक्षणीय असतो. इथे तसं नाही. समाजामधले फारच थोडे बदल असे एका झटक्यात होतात. त्यामुळे असं एक वर्ष सांगणं योग्य नाही.

'नव्वदोत्तरी' या शब्दातून मला तरी नव्वद या वर्षाबद्दल बोलत नसून नव्वदच्या दशकाबद्दल बोलत आहोत अशी कल्पना करता येते. त्या दशकात होत असलेल्या बदलांबाबत आणि - त्यांच्या पूर्वीचं आणि त्यांनंतरचं - अशा दोन भिन्न वास्तवांबद्दल बोलता येतं. आता हेही किंचित गोंधळाचं आहे, कारण भारतासारखा देश बघितला तर त्यात एकाच वेळी वेगवेगळ्या दशकांत राहाणारे लोक असतात. याच गोंधळाचा आढावा घेण्यासाठी 'समकालीनता म्हणजे काय?' असा प्रश्न सर्व मुलाखतींमध्ये सुरूवातीलाच विचारला गेला होता.

असो. आम्ही संपादकांनी या विषयाचा आवाका पेलण्यासाठी बरेच कष्ट घेतले. त्यांमागे काही निश्चित वैचारिक भूमिकाही होती. या दोन्हीची तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि माननीय ऐसीकरांकडून 'इकडून तिकडून आणून थापलेले लेख' अशी संभावना झाल्याबद्दल वाईट वाटलं.

घाटावरचे भट Sat, 28/11/2015 - 12:25

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटलेले २-३ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. कोल्हटकरांशी सहमती अथवा असहमती व्यक्त करण्याचा कुठलाही हेतू नाही.

१. 'नव्वदोत्तरी' ही अतिशय नवीन संकल्पना आहे. त्यावर फार लेखन/विवेचन झालेलं पाहाण्यात आलेलं नाही. त्यामुळे नव्वदोत्तरी बदलांकडे बघायचं म्हणजे नक्की कुठल्या क्षेत्रातल्या बदलांकडे (कला, विज्ञान, समाज, अर्थकारण, राजकारण) पाहायचं याबद्दल एकवाक्यता दिसत नाही. पुन्हा या सर्व क्षेत्रांचा सुटा सुटा विचार करून पण चालत नाही, कारण पूर्वीपेक्षा बर्‍याच जास्त प्रमाणात त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडलेला दिसतो. या दॄष्टीने पाहता, संस्थळाने या सर्व क्षेत्रांचा एक स्पेक्ट्रम आपल्यापुढे मांडणाचा प्रयत्न केला आहे आणि तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल संस्थळचालकांचे अभिनंदन आणि त्यांना धन्यवादही.
२. कदाचित वर म्हटलेल्या स्पेक्ट्रम या कारणानेच अंक एकसूत्री वाटत नाही (जसा गेल्या वर्षीचा 'चळवळ' या विषयावरचा अंक वाटला होता. पण अंकातील लेखांवर विचार करता नव्वदोत्तरी या संकल्पनेचा आवाका आणि झालेल्या बदलांचा वेग इतका प्रचंड आहे की ते सर्व कवळायला गेलो तर दिवाळी अंक पुरा पडेल की नाही शंका आहे.
३. कदाचित, आपण जसा बर्ड्स आय व्ह्यू घेतल्यावर पॅटर्न्स लगेच लक्षात येतात तसे अजून काही वर्षे गेल्यावर बदलांचे पॅटर्न्स अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतील. त्यामुळे 'नव्वदोत्तरी' हा विचार सध्या 'बिफोर इट्स टाईम' आहे की काय अशीही शंका येते. पण हे फक्त 'कदाचित' म्हटले आहे कारण बदलांचा वेग पाहता असे पॅटर्न्स स्थिर व्हायला त्यांना तितका अवधी मिळाला/मिळत असेल की नाही याबाबत शंका आहे.

अस्वल Thu, 26/11/2015 - 01:06

प्रश्नच नाही.
म्हणजे सगळं काही पटलं, समजलं किंवा आवडलं असं मु़ळीच म्हणायचं नाहीये,
पण एक प्रयोग म्हणून प्रचंड आवडली आयडीया. असे प्रयोग अजून व्हायला पाहिजेत.