Skip to main content

२०१५च्या दिवाळी अंकासंबधात काही प्रश्न

पिवळा डांबिस ह्यांच्या 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण' ह्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमधून पुढील विचारांना चालना मिळाली.

'ऐसी'च्या २०१५ दिवाळी अंकातील आजपर्यंत प्रकाशित झालेले लेखन पाहिले आणि असे लक्षात आले की काही लेखक येथे केवळ दिवाळी अंकापुरतेच आलेले दिसतात. ह्या लेखकांचा 'ऐसी'मध्ये अन्य कसलाहि सहभाग - उदा. अन्य दिवाळी अंकाबाहेर लेखन, प्रतिसाद इत्यादि. एरवी येथे कधीच न दिसलेले हे लेखक अचानक धूमकेतूसारखे आज येथे कसे उगवले? हा दिवाळी अंक 'ऐसी'च्या सदस्यांच्या लेखनासाठी आहे ना?

ह्याची कमीत कमी दोन उत्तरे मला सुचतात. काहींनी (उदा. मन्या जोशी, पंकज भोसले, शाहू पाटोळे) ह्या लेखकांनी एकतर गेल्या एकदोन दिवसांपूर्वीच आपापले लेख संपादकांकडे पाठवले आणि संपादकांना ते गुणवत्तेने इतके उच्च वाटले की त्यांनी तत्काल दिवाळी अंकात त्यांचा समावेश करून 'ऐसी'च्या सदस्यांना उपकृत करायचे ठरविले. दुसरी शक्यता अशी की संपादकांना ह्या गुणवान लेखकांची उपस्थिति 'ऐसी'च्या दिवाळी अंकात असावी असे मनापासून वाटले आणि त्यांनी ह्या लेखकांच्या मागे लागून त्यांच्याकडून लिखाण मिळविले.

ह्या दोन्ही पर्यायांना माझा आक्षेप आहे. दिवाळी अंकासाठी साहित्याची मागणी करणारा लेख येऊन गेल्यास काही महिने होऊन गेले. त्यात एक कालमर्यादा घालून दिली होती. विशेष गुणवत्तेच्या लेखनाच्या बाबतीत संपादकांनी मोडायलाहि माझी हरकत नाही पण मग अशी अपेक्षा निर्माण होते की अशी सवलत दिलेले लेख त्या गुणवत्तेचे असावेत. हे लेख तसे आहेत का?

दुसरा पर्याय म्हणजे संपादकांनीच कोणाच्या मागे लागून त्यांचे लेखन मिळविले. येथेहि तोच आक्षेप. असे लेखक काही अद्वितीय प्रतिभेचे असले तर एकवेळ चालेल पण तसे येथे आहे का? दुसरे असे की 'अमुक लेखन वाचा' असे 'ऐसी'च्या सदस्यांना आपल्या अधिकारात अनाहूतपणे सांगण्याचा अधिकार संपादकांना कधी मिळाला?

'ऐसी'ला धरून असलेले कैक सदस्य येथे नित्याने मूळ लेखन आणि प्रतिसाद देऊन संस्थळ चालू राहण्यास सहभाग देतात. कोणीतरी बाहेरचा अचानक आणून 'त्याचे लिखाण तुम्ही आता वाचा' हे त्या सदस्यांवर लादणे योग्य वाटत नाही. पूर्वी जाहीर करून एका विवक्षित विषयावरचा लेखसंग्रह (Anthology) काढण्यातहि काही वावगे नाही पण तो इरादा पहिल्यापासून सदस्यांच्या पुढे ठेवला पाहिजे.

हे लिहिण्यापूर्वी अशा काही 'नव्या' लेखकांची मी गोळा केलेली माहिती खाली दर्शवीत आहे.

लेखक - मन्या जोशी
लेख - मन्या जोशीच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’ज्याम मजा’ संग्रह
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ दिवस १३ तास

लेखक - पंकज भोसले
लेख - प्लेबॉयचे साहित्यिक गोमटेपण
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २० तास ४५ मिनिटे

लेखक - शाहू पाटोळे
लेख - बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ हे पुस्तक
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २१ तास ४ मिनिटे

लेखक - मुकुंद कुळे
लेख - नवी गाणी नवा बाज
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - http://aadital.blogspot.com/
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ दिवस २१ तास

लेखक - मुग्धा कर्णिक
लेख - चाळ नावाची गचाळ वस्ती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ वर्ष ३ आठवडे
(येथे थोडे अधिक. ह्या लेखिकेचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे १ वर्षांपूर्वीच्या २०१४ च्या दिवाळी अंकातील ’चळवळ : व्यक्ती आणि समष्टी’ हा १४ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज १ वर्षे ३ आठवडेच झालेले आहेत.)

लेखक - सचिन कुंडलकर
लेख - वॉकमन
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता २००९
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्षे १ आठवडा
(येथे थोडे अधिक. ह्या लेखकाचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे २ वर्षांपूर्वीच्या २०१३ च्या दिवाळी अंकातील ’माझा परिसर, माझा कलाव्यवहार' हा २८ ऑक्टोबर २०१३ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज २ वर्षे १ आठवडाच झालेला आहे. २०१४च्या दिवाळी अंकात ह्या लेखकाने ड्रॉप घेतलेला दिसतो!)

लेखक - सलील वाघ
लेख - सलील वाघच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - 'सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५'
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्ष २७ आठवडे

.शुचि. Fri, 06/11/2015 - 02:06

सी'ला धरून असलेले कैक सदस्य येथे नित्याने मूळ लेखन आणि प्रतिसाद देऊन संस्थळ चालू राहण्यास सहभाग देतात.

खरं तर लिहीलं नाही (प्रतिसाद, उपप्रतिसाद किंवा नवीन धागा) तर चक्क गिल्टी वाटतं मला. :(
कारण एखादा गृप सस्टेन व्हायला त्या गृपच्या सदस्यांची काही नैतिक जबाबदारी असते - हे १००% पटते.
___
मी खरं तर अन्य एका संस्थळावरही गेले होते पण मग लक्षात आले की तिथे मी काहीही सहभाग देऊ शकणार नाही तेव्हा ताबडतोब तिथे लॉगिन व्हायचेही बंद केले कारण जर सहभाग दिला नाही तर, "उपटसुंभ्/फुकटे" असे फीलिंग मला स्वतःला येते :(
.
प्रत्येकाने इतके हळवे असावेच असा आग्रह नाही. पण कोल्हटकर यांना काय म्हणायचे आहे ते माझ्या लक्षात आले आहे. जर आपल्याला एखाद्या कम्युनिटीचे फायदे उपभोगायचे असतील तर आपल्या "यथा शक्तीमती" काहीतरी त्या कम्युनिटीला आपण दिले पाहीजे. हे पटते. Whatever small amount you can, but bring it to the table.
.
तसेच एखादा लेख टाकून गायब/पसार होणार्‍यांचा मलाही राग आहे. असे काही लोक इथे वरचेवर दिसतात.
____
कोल्हटकर सर , असेही असू शकते की सर्व लेखक "टोपणनावाने/आय डी" ने ऐसीवरती वावरत असावेत. प्रतिसाद्/उपप्रतिसाद/लेख टाकत असावेत. फक्त दिवाळी अंकाच्या वेळी त्यांनी मूळ नावाने लिहीले असेल. - ही शक्यता देखील आहेच की.

धनंजय Fri, 06/11/2015 - 02:04

बहुधा असे नसावे : "दिवाळी अंक 'ऐसी'च्या सदस्यांच्या लेखनासाठी".

आमंत्रित लेखकांकरिता संस्थळचालक (अनुमती घेऊन) खाते चालू करत असावेत.

> दुसरा पर्याय म्हणजे संपादकांनीच कोणाच्या मागे लागून त्यांचे लेखन मिळविले.
असेच असावे.

> असे लेखक काही अद्वितीय प्रतिभेचे असले तर एकवेळ चालेल पण तसे येथे आहे का?
(बहुधा उत्तर "नाही" असे अध्याहृत आहे.) रुचिर्भिन्ना वगैरे, वगैरे.

> पूर्वी जाहीर करून एका विवक्षित विषयावरचा लेखसंग्रह (Anthology) काढण्यातहि
> काही वावगे नाही पण तो इरादा पहिल्यापासून सदस्यांच्या पुढे ठेवला पाहिजे.
त्यांनी सांगितले होते बहुधा या धाग्यात :
दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५

विशेष संकल्पना:

प्रत्येकच कालखंड आपापली वैशिष्ट्यं घेऊन येतो. विसाव्या शतकाचा पहिला अर्धा भाग भारताची स्वातंत्र्यप्राप्तीची वाटचाल, शहरीकरणाची सुरुवात, दोन महायुद्धं यांनी भरला होता; तर साधारण दुसऱ्या अर्ध्यासमोर स्वातंत्र्य, फाळणी, नवनिर्माणाची सुरुवात, आणि त्याचबरोबर लोकसंख्यावाढ व भुकेकंगालीला तोंड देण्यासाठीची हरितक्रांती अशी आव्हानं होती.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही काही बदल झालेे आहेत. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले. त्यापुढच्या बदलांमध्ये यातून आलेल्या जागतिकीकरणाचा मोठा हातभार असल्याने बदलांचा आढावा घेण्यासाठी तो एक सोयीचा सुरुवातीचा बिंदू म्हणून पाहता येतो. आजच्या घटकेला हा बसल होऊन सुमारे पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यामुळे काळाचा पुरेसा मोठा आवाकाही झालेला आहे. तर प्रश्न असा आहे की नव्वदोत्तरी काळात भारतात, महाराष्ट्रात नक्की काय बदल झाले? कसे झाले? आणि त्यातून सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदललं?

बदल कुठे कुठे घडले असं विचारण्यापेक्षा कुठे घडले नाहीत, असंच विचारण्यासारखी परिस्थिती आहे, इतका व्यापक फरक आपल्या आसपास दिसतो. पंचवीस वर्षांत सातत्याने वाढलेली सुबत्ता झकपक मॉल्स, आलीशान गाड्या आणि उंची हॉटेलांमधून दिसते. घरांच्या किमती प्रचंड वाढल्या तरी त्याचबरोबर त्या परवडणारेही वाढताना दिसतात. तरीही दारिद्र्यरेषेखाली जगलं जाणारं भयाण आयुष्य शिल्लक आहेच.

तंत्रज्ञानातले बदल डोळे दिपवून टाकणारे आहेत. साठ वर्षं सरकारी टेलिफोन जेमतेम दहा-वीस टक्के लोकांपर्यंत पोचला, तर मोबाईल क्रांतीमुळे अवघ्या दहाबारा वर्षांत संपूर्ण भारत फोनमय झाला. इंटरनेटही आता गावोगावी पोचतं आहे. संवाद वाढला, त्याचबरोबर कोलाहलही. माणसामाणसातले संबंध बदलले. ते सुधारले की बिघडले?

कलाकृतींमध्येदेखील या नव्वदोत्तरी बदलांचं प्रतिबिंब उमटलं असं म्हणायला जागा आहे. मासिकं संपली, दिवाळी अंक शिल्लक राहिले. वर्तमानपत्रं बदलली, टीव्हीचा राबता वाढला. सिनेमांमध्ये आधुनिक सफाईदार तंत्र आलं - याने दर्जा सुधारला किंवा कसं हा मुद्दा वेगळा. फेसबुक आणि स्वस्त कॅमेरांमुळे चित्रांचा प्रसार झाला. फक्त शब्दांऐवजी संवादात चित्रभाषेचा अधिकाधिक शिरकाव झाला.

या सर्व विषयांवर प्रबंध लिहिता येऊ शकेल इतकी त्यांची व्याप्ती आहे. 'ऐसी'च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी थीम म्हणून हा विषय निवडताना आम्हांला याची कल्पना आहे. तरीही आज थोडंसं मागे वळून आणि आसपास नजर फिरवून दिसणारी काही चित्रं वाचकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. तुम्हांला हे चित्र कसं दिसतं, या बदलांचे काय परिणाम घडलेले दिसतात, येत्या काही दशकांत काय घडेल, त्याचं कल्पनाचित्र आशादायक दिसतं का काळजीलायक?

ठळक/अधोरेखित ठसे माझे.

संस्थळचालक खुलासा करतीलच बहुधा.

राजेश घासकडवी Fri, 06/11/2015 - 03:44

वर धनंजयने काही अंदाज मांडलेले आहेतच, ते बहुतांश बरोबर आहेत. पण मी थोडक्यात ऐसीचा दिवाळी अंक तयार करण्याची प्रक्रिया सांगतो.

१. सदस्यांकडून लेखन मागवलं जातं, आणि अनेक सदस्य उत्तमोत्तम काही लिहितात ते अंकासाठी निवडलं जातंच.
२. दिवाळी अंकासाठी ललित, विनोदी, वैचारिक, कविता असे विभाग असतातच. पण त्याहीपलिकडे अंकाला एक कणा मिळावा यासाठी एक विशिष्ट संकल्पना किंवा थीम निवडली जाते. यावेळी ती नव्वदोत्तरी अशी आहे.
३. थीमसाठी जे लिखाण असतं ते देण्याची सर्वच सदस्यांमध्ये मिळून पुरेशी पात्रता असेलच असं नाही. त्या विशिष्ट विषयाशी निगडित क्षेत्रांत काम करणारे, विचार करणारे नामांकित, नवोदित लोक आम्ही निवडतो, आणि त्यांच्याकडून काहीएक वेगळा दृष्टिकोन मिळेल अशी आशा करतो.
४. त्यासाठी त्यांच्याकडून लेख लिहवून घेणं, त्यांचं पूर्वप्रकाशित लेखन परवानगीसहित प्रसिद्ध करणं, आणि मुलाखती घेऊन त्या ऐसीच्या वाचकासमोर मांडणं - असे तीन मार्ग प्रामुख्याने वापरतो.
५. याबाबतीत संपादक मंडळ आपल्या बुद्धीने यथाशक्ती प्रयत्न असा करते काही ताजा दृष्टिकोन मिळावा, काहीतरी भरीव सांगितलं जावं.
६. यासाठी निवडलेले लेखक, त्यांचे विशिष्ट लेख अगर कविता सर्वांना आवडतीलच असा आग्रह नाही. तसं कुठच्याच बाबतीत म्हणता येत नाही.
७. अशा ऐसीबाहेरच्या लोकांना लेख प्रकाशित करण्यासाठी व्यवस्थापन मदत करतं. त्यात त्या लेखकाचा आयडी तयार करून देणं हेही येतं. त्यामुळे जरी कोणीतरी तीन दिवसांपूर्वी सदस्य झाला असं दिसत असलं तरी त्याचं लेखन बऱ्याच आधीपासून आम्ही मिळवलेलं असतं. आणि प्रकाशनाच्या वेळी आयडी काढला जातो.

दुसरे असे की 'अमुक लेखन वाचा' असे 'ऐसी'च्या सदस्यांना आपल्या अधिकारात अनाहूतपणे सांगण्याचा अधिकार संपादकांना कधी मिळाला?

हा गहन प्रश्न आहे आणि त्यावर मोठी चर्चा करता येईल. ऐसी हे माध्यम मासिकांपेक्षा वेगळं, जवळपास विरुद्ध मॉडेल आहे. मासिकांमध्ये हा अधिकार अध्याहृत असतो, आणि वाचक हे वर्गणीदार असतात. त्यांना त्या लेखांवर प्रत्यक्ष चर्चा करण्याचं व्यासपीठ मासिकाकडून मिळत नाही. याउलट ऐसीचं आहे. वाचक हेच लेखक असतात, आणि जवळपास काहीही प्रकाशित करण्याचा त्यांना अधिकार असतो. संपादकांची भूमिका ही निवड करण्यापेक्षा चर्चेचे फॅसिलिटेटर असल्यासारखी असते.

दिवाळी अंक किंवा भारा भागवत विशेषांकासारखे अंक काढताना मात्र मासिकं आणि सर्वसाधारण ऐसी यांची दोन्हींची बलस्थानं वापरण्याचा प्रयत्न होतो. ऐसीच्या सदस्यांचं उत्तम, खास लिखाण तर येतंच. शिवाय संपादकांकडून त्यांच्या आवडीचं इतरांकडूनही मागवलेलं सादर केलं जातं. नेहमीच्या ऐसीची इंटरअॅक्टिव्हिटी असतेच. शिवाय मोठ्या व्यापक लेखकवर्गाकडून साहित्य मागवता येतं.

तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आशा करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/11/2015 - 05:02

In reply to by राजेश घासकडवी

कोणीतरी तीन दिवसांपूर्वी सदस्य झाला असं दिसत असलं तरी त्याचं लेखन बऱ्याच आधीपासून आम्ही मिळवलेलं असतं. आणि प्रकाशनाच्या वेळी आयडी काढला जातो.

हे काम बहुतेकदा मी करते. ते ऐनवेळीच का करते, याला काही उत्तर नाही. तेव्हा केलं नाही तर अडतं म्हणून बहुदा तेव्हा करते. कारण हे काही फार उत्साहवर्धक काम नाही.

लेखक - मुग्धा कर्णिक
लेख - चाळ नावाची गचाळ वस्ती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता

कर्णिकांचा हा लेख आधी फेसबुकवर, काही आठवड्यांपूर्वी आला होता. अंकाच्या संकल्पनेच्या निमित्ताने त्यांनी शेवटी थोडी भर घातली.

बाकी सवडीने. पीडीएफ काढून झाल्यानंतरच बहुदा.

पिवळा डांबिस Fri, 06/11/2015 - 04:51

लाख मोलाचा प्रश्न विचारलांत तुम्ही, कोल्हटकरसाहेब!
तुमच्याइतका नेमकेपणा माझ्यात असता तर बालिष्टर झालो असतो! :)

मी स्वतःला लेखक समजत नाही, पण एक चांगला वाचक समजतो. त्या भूमिकेतून माझे विचार खालीलप्रमाणे...
मुळात अशी थीम निवडायची काही गरज आहे का? जर संचालकांनी थीम निवडलीच तर त्यावर संचालक शब्दप्रभूंना धाडधाड लेख लिहिता का येऊ नयेत? त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याखेरीजच का ते ती थीम निवडतात?

दिवाळी अंकासाठी आमंत्रित लेखक/कवी आणायला माझी तशी हरकत नाही. विशेषतः नव्वदोत्तरी वैग्रे थीम निवडल्यावर हे करावंच लागणार! ;) पण त्या निमंत्रितांकडून साहित्य मागवतांना ते पूर्वप्रकाशित नाहिये ह्याचीतरी खात्री करून घ्यायला हवी.
मोठ्या हौसेनं दिवाळीच्या सणाचं ताट तर सजवायचं पण त्यात शिळे/उष्टे पदार्थ ठेवायचे याला काय अर्थ आहे?
हा ऐसीच्या नियमित सभासदांसाठी अपेक्षाभंग आहे असं मला वाटलं म्हणून मी ती प्रतिक्रिया दिली.

थीमसाठी जे लिखाण असतं ते देण्याची सर्वच सदस्यांमध्ये मिळून पुरेशी पात्रता असेलच असं नाही.

वॉव! हे विधान उद्ध्ट्पणाच्या बरंच जवळ जातंय असं वाटत नाही का? सभासदांची पात्रता आता संचालक मंडळ ठरवणार का?
आणि जर ती वस्तुस्थिती असेल तर मग ह्या वाचकसमुदायासाठी असं थीम निवडणं हेच मुळात अप्रस्तुत नाही का? मागे एकदा फोटोस्पर्धेसाठी असंच काहीतरी थीम निवडून दिलं होतं, लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि फारश्या एन्ट्रीज आल्याच नाहीत.
कुठला तरी सामाजिक/ राजकीय/ सांस्कृतिक अजेंडा राबवण्यासाठी हे असं थीम निवडलं जातं? (असं इथे यावर्षी झालंय असं मला म्हणायचं नाही पण एक शक्यता)

की ह्या दिवाळीत ऐसीच्या नियमित सभासदांना च्यामारी सुसंस्कृत करून सोडायचंच अशी काही जबाबदारी आपल्यावर आहे असं संचालक मंडळाला वाटतं का?
:)

.शुचि. Fri, 06/11/2015 - 10:41

In reply to by पिवळा डांबिस

वॉव! हे विधान उद्ध्ट्पणाच्या बरंच जवळ जातंय असं वाटत नाही का? सभासदांची पात्रता आता संचालक मंडळ ठरवणार का?

विधानाच्या भाषेमुळे तसे वाटले असेल पण बहुतेक राघांना म्हणायचे आहे की सदस्यांकडून पुरेसा रिस्पॉन्स येत नाही/ आला तरी लेख दिवाळीअंकात निवड होणाइतके ग्रेट (साजेसे) नसतात. :(
इन एनी केस, ही मर्यादा वैयक्तिक रीत्या मान्य आहेच.

ऋषिकेश Fri, 06/11/2015 - 08:48

बाकी प्रश्नांना यथायोग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करताही येईल. मात्र त्याआधी

हा दिवाळी अंक 'ऐसी'च्या सदस्यांच्या लेखनासाठी आहे ना?

या अंकात ऐसीच्या सदस्यांच्या लेखनाचे स्वागत आहेच, व सहभागही आहे. मात्र हा अंक केवळ ऐसीच्या सदस्यांपुरताच मर्यादीत आहे असा समज कशामुळे झाला हे समजल्यास पुढील चर्चेला सघनता येईल.

दुसरे असे की, याआधीच्या प्रत्येक अंकात असे "धुमकेतु" होते. या चौथ्या वर्षीच्या अंकातच असे अचानक काय झाले की यावर आक्षेप नोंदवावासा वाटला? हे देखील समजून घ्यायला आवडेल (म्हणजे हाच अंक उंटावरील शेवटची काडी ठरला असे समजले तरी तत्कालिक कारण काही आहे का?)

राजेश घासकडवी Fri, 06/11/2015 - 09:51

In reply to by ऋषिकेश

दुसरे असे की, याआधीच्या प्रत्येक अंकात असे "धुमकेतु" होते. या चौथ्या वर्षीच्या अंकातच असे अचानक काय झाले की यावर आक्षेप नोंदवावासा वाटला?

हा हा हा! हा तर अवॉर्डवापसी करणारांना विचारल्यासारखा प्रश्न झाला! 'त्यावेळी कुठे गेला होता तुझा धर्म राधासुता?' टाइप... मी तर म्हणतो की व्यवस्थापकांनी हा निषेध आत्ताच का होतो हे पाहाण्यापेक्षा का होतो हे पाहिलं पाहिजे.

ऋषिकेश Fri, 06/11/2015 - 14:22

In reply to by राजेश घासकडवी

हे साधर्म्य आधीच लक्षात आलं होतं. त्यामुळेच

(म्हणजे हाच अंक उंटावरील शेवटची काडी ठरला असे समजले तरी तत्कालिक कारण काही आहे का?)

असे अधिकचे स्पष्टीकरण दिले होते.

नितिन थत्ते Fri, 06/11/2015 - 10:09

In reply to by ऋषिकेश

>>दुसरे असे की, याआधीच्या प्रत्येक अंकात असे "धुमकेतु" होते. या चौथ्या वर्षीच्या अंकातच असे अचानक काय झाले की यावर आक्षेप नोंदवावासा वाटला?

आक्षेप नोंदवला होता असे बोलून मी खाली बसतो.

.शुचि. Fri, 06/11/2015 - 10:31

In reply to by ऋषिकेश

ऐसीच्या सदस्यांपुरताच मर्यादीत आहे असा समज कशामुळे झाला

जर दिवाळी अंक ऐसीच्या सदस्यांपुरता मर्यादित नसेल तर अन्य वेळी टाइम टू टाइम, ऐसी बाहेरच्या लेखकांचे लेख का प्रसिद्ध होत नाही ते अनाकलनिय आहे.

राजेश घासकडवी Fri, 06/11/2015 - 10:37

In reply to by .शुचि.

अहो हे असं म्हणण्यासारखं आहे -
"बैलपोळ्याला जर बैलाची पूजा होत असेल तर अन्य वेळी टाइम टू टाइम बैलाची पूजा का होत नाही हे अनाकलनीय आहे."

पिवळा डांबिस Fri, 06/11/2015 - 10:44

In reply to by राजेश घासकडवी

बैलपोळ्याला जर बैलाची पूजा होत असेल तर अन्य वेळी टाइम टू टाइम बैलाची पूजा का होत नाही हे अनाकलनीय आहे."

ओह! म्हणजे ही बाहेरच्या बैलांची पूजा चालू घातलीये का?
नियमित सभासदांच्या पात्रतेबद्दलचे विचार अगोदर कळलेच होते आता आमंत्रितांबद्दलच्या भावनाही समजल्या.

ऋषिकेश Fri, 06/11/2015 - 14:27

In reply to by पिवळा डांबिस

पिडां काका शांत व्हा! :)
उपमा वगैरे जौदेत, पण एक साधा प्रश्न आहे:
सदस्यांना ऐसीवर नेहमीच्या लेखकांसोबतच दिवाळी म्हणून वेगळं कोणाचं तरी काही वाचायला मिळावं असं वाटण्यात नक्की गैर काय आहे? दिवाळीत आपण एरवी कमी केला जाणारा फराळ बनवतो, घरात पाहुणे येतात साधारण तसंच आहे हे. घरात दिवाळीला पाहुण्यांना का बरं बोलावताय, आम्ही काय कमी पडतोय का तुम्हाला असे का बरे वाटावे?

आणि या निमित्ताने येणारे सगळेच लेखक फक्त धुमकेतू नसतात. उदा. गेल्या दिवाळी अंकात ज्याची मुलाखत घेतली होती तो आदित्य जोशी हा ऐसीवर वेळ होईल तसे लिहित असतो. प्रत्येक पाहुण्याला तेवढा वेळ होईल, इच्छा असेल अशी इच्छा जरूर आहे मात्र जबरदस्ती कशी व का करावी? तुम्हीच सांगा.

पिवळा डांबिस Sat, 07/11/2015 - 01:27

In reply to by ऋषिकेश

ऋषि,
माझा या धाग्यावरचा पहिला अभिप्राय मी शांतपणानेच लिहिला होता. वाटल्यास पुन्हा वाचून बघ.
आता तुला उपप्रतिसाद देत असल्याने मला वर जाऊन पुन्हा कॉपी पेस्ट करता येत नाहिये पण तिथे मी दिवाळी (वा अन्य कुठल्या) अंकासाठी बाहेरचे लेखक आणायला विरोध दर्शवला नव्हता.
माझा विरोध हा पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेलं साहित्य इथे दिवाळी अंकात 'विशेष' म्हणून देण्याला आहे. मग ते साहित्य बाहेरच्या लेखकांचं असो वा ऋषिकेशचं असो वा पिडांकाकांच. कळलं?
जेंव्हा आपण एखादी विशेष भेट देतो/घेतो तेंव्हा ती कोरीकरकरीत असावी, अन्यत्र कुठे वापरली गेलेली नसावी अशी अपेक्षा करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. ते जमत नसेल तर मग विशेष अंक काढू नयेत. ती सक्ती का आहे?
पण ह्या माझ्या सवालाचं समाधान न करता 'नियमित सभासदांची पात्रता', 'बैलपोळ्याचा सण' वगैरे उल्लेख होऊ लागले तेंव्हा मला त्याच भाषेत उत्तर देणं भाग आहे.
आणि पूर्वी असं केलं होतं तेंव्हा काही म्हणाला नाही मग आताच काय झालं हा युक्तिवादही गैरलागू आहे. पूर्वी जर इथे दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित साहित्य 'विशेष' म्हणून दिलं गेलं असेल (कुणी लिहिलंय याला माझ्या लेखी महत्व नाही) तर ते ही चूकच आहे.
साहित्य प्रकाशनातले (छापील वा आंतरजालीय) कुठलेही दंडक लावले तरीही ते चूकच आहे. पूर्वी तुमच्या नकळत आम्ही तुम्हाला उष्टे पदार्थ खिलवले ते तर तुम्ही खाल्लेत मग आताच तुम्हाला बोंब मारायला काय झालं असं विचारण्यापैकी ते आहे.

साधी गोष्ट होती, जेंव्हा हे पुनःप्रकाशनाचं निदर्शनाला आणलं गेलं तेंव्हा अशा उत्तराची अपेक्षा होती की 'होय बाबा, असं झालं खरं, आमच्या लक्षात हा आस्पेक्ट आला नाही, सॉरी, यापुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ.' प्रश्न संपला. ऐसी अक्षरे हे एक कुटुंब आहे ना?
पण ते न होता जर नियमित सभासदांची पात्रता, बैलपोळा वगैरे चर्चा होत असेल तर मग सभासद वाकड्यात शिरले तर तो दोष सभासदांचा कसा?

मला वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे आणि मला जे काय सांगायचंय ते ही स्पष्ट केलं आहे.
काही शंका असेल तर जरूर विचार.
-पिडांकाका

राजेश घासकडवी Sat, 07/11/2015 - 07:18

In reply to by पिवळा डांबिस

हे शब्दप्रयोग मी वापरले म्हणून मला उत्तर देणं भाग आहे.

'नियमित सभासदांची पात्रता'

याबद्दल तक्रार करण्याची गरज मला तरी वाटत नाही. ऐसीचे सदस्य कितीही थोर असले तरी त्यांना आजच्या सिनेमाविषयी, आजच्या बदलत्या माध्यमांविषयी, चळवळींच्या इतिहासाविषयी सखोल माहिती असेलच असं नाही. किंबहुना ती नाही म्हणूनच अधिकारी व्यक्तींचं, किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं लिखाण ऐसीच्या सदस्यांसमोर सादर करणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. त्यात वाईट वाटून घेण्याचं कारण मला खरोखरच दिसत नाही.

'बैलपोळ्याचा सण'

काका, तुम्हीसुद्धा उपमेचा मथितार्थ पाहाण्याऐवजी त्यातल्या बैल शब्दावर अडकून बसलात? शुचिताईंचा प्रश्न होता की 'जर दिवाळीलाच विशेष काहीतरी नवीन मिळत असेल तर इतर वेळी का नाही?' त्यावर मला म्हणायचं होतं की विशेष वेळेला मिळतं तेच बाय डेफिनिशन विशेष असतं. 'दसऱ्यालाच का सोनं लुटतात, इतर वेळी का नाही लुटायचं?' 'नागपंचमीलाच का नागाची पूजा, इतर दिवशी का नाही?' कारण ज्या दिवशी नागाची पूजा होते त्या दिवसालाच नागपंचमी म्हणतात. असं काहीसं मला दाखवायचं होतं.

आणि हो, इतर वेळीही अशा विशेष गोष्टी कराव्याच की. आणि लहानमोठ्या प्रमाणावर आम्ही तो प्रयत्न करतोही. आता सुलभा सुब्रह्मण्यम यांच्याकडून 'मानसोपचार तज्ञाकडे कधी जावं, का जावं?' या विषयावर लेख मागवले होतेच. पण शेवटी प्रश्न येतो तो आम्हा व्यवस्थापकांना किती प्रमाणात कष्ट घेता येतात याचा. पण म्हणून जर कोणी सदस्यांनी ऐसीच्या व्यासपीठावर आपला खेळ मांडला तर जमेल तितकं सहाय्य आम्ही देतोच. आता भारा भागवत विशेषांक काढला तेव्हा मेघनाने सीइओचं काम केलं. आणि आम्ही शक्य तितकं पिच इन केलं. जर तुम्हाला एखादा विशेषांक काढायचा असेल, बाहेरच्या लेखकांकडून साहित्य जमवून आणि ऐसीच्या सदस्यांकडून काही लिहवून घ्यायचं असेल तर यू आर मोअर दॅन वेलकम. ऐसीचं व्यासपीठ अशा दर्जेदार, वेगळ्या अभिव्यक्तीसाठी खुलं आहे.

शेवटी प्रश्न राहिला ताजं विरुद्ध शिळं. आम्ही या प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहात नाही. एखाद्या थीमवरचं लिखाण हे अॅंथॉलॉजीसारखं असतं. त्यावर येणारे विचार हे कोणीतरी दोन वर्षांपूर्वीच मांडले म्हणून त्याज्य नाहीत. आधीच्या अंकांतही पुनर्प्रकाशित लिखाण आहे. पण जर थीममध्ये ते चपखल बसत असेल तर त्याला आक्षेप का असावा? पण मला खरंच एक सांगा, गेल्या त वर्षांच्या दिवाळी अंकांत किती वेळा तुम्हाला वाटलं आहे 'अरे, हे तर वाचलेलंच आहे आधी'?

.शुचि. Fri, 06/11/2015 - 10:49

In reply to by राजेश घासकडवी

आक्षेप याकरता होता की अचानक दिवाळीच्या सुमारास, क्लोज्ड्/टाइट कम्युनिटी असल्याचा फील एकदम जातो. बैलपोळा व दिवाळी अंक हे उदाहरण विचित्र वाटते आहे. फराळ फक्त दिवाळीत का उपलब्ध होतो, बारामाही का नाही असा प्रश्न होता.
___
एक कुतूहल - मान्यवर व्यक्तींना अन्य वेळी ऐसीमध्ये सामील व्हावेसे का वाटत नाही? कारण फक्त व्यग्रता आहे की अन्य काही?
___
एकंदर दिवाळीत ऐसी परके वाटते असं काहीसं ..... काहीतरी वाटतं असं.

राजेश घासकडवी Fri, 06/11/2015 - 10:51

In reply to by .शुचि.

माझा मुद्दा असा होता की दिवाळी अंक हा 'विशेष' असतो. त्यामुळे बाहेरच्या लेखकांचं लेखन मागवण्याचा प्रयत्न होतो. इतर वेळी बिझनेस अॅज युज्वल असतो. असे विशेषांक वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. भारा भागवत विशेषांक काढला तेव्हाही बाहेरच्या मान्यवर लोकांचं लेखन मागवलं होतं.

इतर वेळीही, विशेषांक नसताना, आम्ही ऐसीच्या बाहेरच्या कोणाचं चांगलं लेखन दिसलं तर इथे प्रसिद्ध करण्याची परवानगी मागतो, आणि त्याप्रमाणे ते सादर करतो.

.शुचि. Fri, 06/11/2015 - 10:55

In reply to by राजेश घासकडवी

असे उत्तमोत्तम लेख आवडतात खरे . एवढेच वाटते या बाहेरील चमूने, ऐसीवर नियमित येत रहावे. ऐसी समृद्ध व्हावे हीच इच्छा आहे. फक्त परकेपणातून व किंचितशा न्यूनगंडातून माझा तरी आक्षेप आला होता.

चिमणराव Fri, 06/11/2015 - 10:40

नव्वदोत्तरी थीम प्रकरणाची बासुंदी थोडी जडच जाते आहे पचायला.इतर अंकांवर ( छापील )टीका होत नाही असं नाही परंतू ती बंद राहते.तसं आंजावरील लेखनाचं होत नाही.
पिडांनी अगोदर मांडलंच आहे.
आता आम्ही चौरंगी लेख ठोकत नाही पण त्रिकोणी बोचरी टीका करतो हे मान्य आहे एवढं बोलून खाली बसतो.

चिंतातुर जंतू Fri, 06/11/2015 - 15:59

('ऐसी'वरच नव्हे, तर एकंदरीत) मराठी संकेतस्थळांवर वावरण्याचे काही पंक्तिप्रपंच असतील तर मला ते माहीत नाहीत. मात्र, इथे ज्यांचा नियमित वावर आहे त्यांना तर हे माहीतच असेल, की ज्याला जे हवं ते इथे लिहिता येतं. त्याला ज्या मर्यादा आहेत त्या फारच किरकोळ आहेत. त्यामुळे सदस्यखातं निलंबित होणं किंवा धागे / प्रतिसाद उडणं असे प्रकार इथे फारसे होत नाहीत. पण मग ह्या स्वातंत्र्याचीच दुसरी बाजू म्हणजे विशिष्ट विषयापुरतंच इथे येणं आणि धागा टाकून गायब होणं अशा प्रकारच्या वर्तनाचं स्वातंत्र्यही इथे लेखकांना असतंच. ह्याविषयी काही सदस्यांना आक्षेप असू शकतात (आणि ते आहेत हे हा धागा पाहता लक्षात येतंय) परंतु लेखक-प्रतिसादकाच्या स्वातंत्र्याचाच हासुद्धा एक भाग आहे. 'नियमित लिहीत असाल तरच इथे वावरा; अन्यथा चपला घालून चालू लागा' वगैरे भाषा इथे वापरली जाणार नाही. ते इथल्या स्वातंत्र्यवादी वातावरणाशी सुसंगत नसेल.

छापील माध्यमं आणि 'ऐसी'सारखी संस्थळं ह्या दोन माध्यमांमध्ये मात्र अजूनही काही प्रमाणात पंक्तिप्रपंच जाणवतो (भारतात तरी). म्हणजे छापील माध्यमात ज्या लोकांचं लिखाण नियमितपणे छापून येतं त्यांपैकी अनेक जणांसाठी मराठी संस्थळं ही खूप दूरची (किंवा अस्तित्वातच नसलेली) गोष्ट असते आणि त्याउलट संस्थळांवर वावरणाऱ्या अनेकांना छापील माध्यमांमधले (निवडक मिनीसेलेब्रिटी सोडता) अनेक लेखक अपरिचित असतात. अशीच परिस्थिती असणं योग्य आहे असं 'ऐसी'वर मात्र मानलं जात नाही. इथले अनेक लोक फेसबुकवर व्यक्त होत असतात (प्रेक्षणीय स्थळांचे, आपल्या जेवणांचे किंवा कुत्र्यामांजरांचे फोटो वगैरे टाकण्यापलीकडे व्यक्त होणं इथे अभिप्रेत आहे); काही लोक छापील माध्यमांतूनही लिहिते असतात. ह्या दोन्हींची एकमेकांशी गाठभेट घडवून आणणं इथे अगदी 'ऐसी'च्या सुरुवातीपासूनच अभिप्रेत होतं. प्रत्येक माणसाला त्याच्या दैनंदिन रूटिनमधून वेळ काढून इथे येणं नेहमी शक्य होत नाही. पण दिवाळीत आपण वेळ काढून जशा आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतो त्याप्रमाणे काही लोक इथे दिवाळीपुरते येत असतील तर त्यात फार काही आक्षेपार्ह मला तरी दिसत नाही.

पूर्वप्रकाशित लिखाण - अनेक संस्थळांवर तसेही लोक आपापल्या ब्लॉगवरचं किंवा सोशल मीडियावर शेअर केलेलं लिखाण टाकतच असतात. त्यामुळे 'एक्स्क्लुझिव्हिटी' हे काही ऑनलाईन लिखाणाचं वैशिष्ट्यच नाही. त्यातच एकदा एका ठिकाणी लिहून आलं की ते शेअर करणं आताच्या तंत्रज्ञानामुळे इतकं सोपं झालं आहे की अंकात प्रकाशित झाल्या झाल्या ते लिखाण अनेक ठिकाणी फिरू शकतं. त्यामुळे ओरिजिनल लिखाणाचाच आग्रह धरण्याची तितकीशी आवश्यकता भासत नाही. शिवाय, एखादा विशिष्ट लेख कुठे तरी सुटा वाचला असता त्यातून जे कळतं / पोचतं त्यापेक्षा अधिक काही तरी अशा प्रकारच्या संकलनामधून समोर येऊ शकतं. उदाहरणार्थ, वरची यादी पाहता पटकन सुचलेले काही मुद्दे -

'नव्वदोत्तरी कविता' हा मराठी साहित्यात होऊन गेलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु मराठी संस्थळांवर वावरताना असं जाणवतं की अनेकांच्या दृष्टिक्षेपातून तो सुटलेलाच आहे. आजही मराठी आंतरजालावर 'मराठी कविता' म्हटलं की पुन्हापुन्हा निवडक काही जुनीजाणती नावंच समोर येतात. अरुण कोलटकर किंवा दिलीप चित्रे ह्यांसारखी साठोत्तरी प्रवाहातली नावंसुद्धा मराठी संस्थळांवरच्या कविता-चर्चांत क्वचितच दिसतात. कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण कवितेचे किंवा साहित्याचे रसिक समजले जाणारे लोक इथे वावरत असूनही एक अख्खा साहित्यिक प्रवाह नजरेतून आणि पर्यायानं सार्वजनिक संभाषितातूनही (पब्लिक डिसकोर्स) सुटूनच जाणं हे काही योग्य वाटत नाही. ती पोकळी भरण्याचा प्रयत्न ह्या अंकात केला आहे.

'पॉप्युलर कल्चर' म्हटलं की मराठी संस्थळांवर दोन प्रतिसाद साधारणतः आढळतात - त्याकडे नाक मुरडून पाहण्याची किंवा अनुल्लेखानंच त्याला मारण्याची एक पद्धत आहे; नाही तर ज्यांना ते आवडतं ते लोक 'आम्हाला आवडतात ही गाणी; तुम्ही कोण आलात ढुढ्ढाचार्य आम्हाला शिकवणारे?' असा अभिनिवेशी पवित्रा घेत अभिजाततावाद्यांशी भांडतात तरी, नाही तर सरळ दुर्लक्षच करतात. ह्यामुळे एक प्रकारे साइलोज निर्माण होतात. पण मुकुंद कुळे ह्यांचा लेख मात्र त्या दोन्ही प्रकारच्या प्रतिसादांपलीकडे जाऊन त्या लोकप्रिय गाण्यांचं विश्लेषण करू पाहतो. त्यामुळे समकालीनता समजून घेण्यासाठी तो महत्त्वाचा वाटतो. एकंदरीत प्रतिक्रिया पाहता लोकांना तो आवडला आहे असंही दिसतं. 'पॉप्युलर कल्चर'कडे अशा प्रकारे पाहणं ही पाश्चात्य संस्कृतीत एव्हाना रुळलेली गोष्ट आहे (साठच्या दशकापासून). मराठीतही साठोत्तरी काळामध्ये हे झालं. पण मराठी संस्थळांवर मात्र अजूनही हे फारसं होताना दिसत नाही. हे न होणं मराठी संस्थळांसाठी धोकादायक आहे. कारण त्यामधून एक प्रकारचं साचलेपण येण्याचा धोका संभवतो. असे लेख पुनर्प्रकाशित करून ही पोकळी भरण्याचा हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे.

असो. प्रत्येकाला आपलं व्यक्तिगत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार इथे आहेच. त्यामुळे लोकांनी तो बजावण्यात काहीच गैर नाही. अशी मतं समोर आल्यामुळे लोकभावनेचं भान येतंच, पण आम्ही काय करतो आहोत ते लोकांसमोर अधिक स्पष्टपणे मांडण्याची संधीही मिळते आणि त्याविषयी वैचारिक देवाणघेवाणही शक्य होते. त्यामुळे मत प्रदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभारच.

मेघना भुस्कुटे Fri, 06/11/2015 - 17:18

In reply to by चिंतातुर जंतू

पंक्तिप्रपंच टाळण्याचा प्रयत्न, एक्स्क्लूजिविटीचा मुद्दा, नव्वदोत्तरीसारखा महत्त्वाचा विषय - तिन्ही मुद्द्यांशी सहमती.

बाकी - "तुम्ही नेहमी येत नाही. मग दिवाळीतपण येऊ नका." अशा जातीचा जो आक्षेप या धाग्यावर दिसतो आहे, तो मला अनाकलनीय वाटतो आहे. आपल्याला आवडणारा विषय असला, अंक वाचला. नसला, नाही वाचला. आपल्याला काही लिहावं वाटलं लिहिलं. निराळा अंक काढण्याइतका त्याचा जीव असला, संपादकांशी बोलून त्यांच्या मदतीनं आपण अंक काढला... इतकं खुलं वातावरण आणि संधीची मुबलकता असताना - या प्रकारच्या आक्षेपाचं कारणच मला कळत नाहीय. 'आम्ही कायम एका बंदिस्त-प्रेमळ-घट्ट-बांधलेल्या-बाहेरच्यांना-आपल्यात-न-घेणार्‍या गटासारखेच राहणार' अशा प्रकारचा काही दावा त्यामागे आहे का? मला उलट जितके नवीन, इंट्रेष्टिंग लोक येतील तितकी मजा येते. लेखनाच्या नव्या शैली समोर येतात, मतभिन्नता कळतात, थोडक्या दिवसांकरता का होईना - काही नव्या ओळखी होतात, आपल्याला आवश्यक आणि दिलचस्प वाटल्या तर वाढवताही येतात. या सगळ्या 'विन-विन' प्रकारात आक्षेप नक्की कशाला आहे?

माझा गोंधळ उडतो आहे!

दुसरा गोंधळ म्हणजे : 'संपादकांना हा अधिकार कुणी दिला?' हा प्रश्न. यात अधिकाराचा नि लादण्याचा संबंध काय आला? दिवाळी अंकाची संकल्पना हा काय मतदानाच्या चिठ्ठ्या टाकून ठरवण्याचा का विषय आहे? माझी माहिती चूक नसेल, तर यंदाचा विषयही संपादक मंडळाच्या बाहेरून सुचवला गेलेला आहे. तो संपादकांपैकी 'बहुसंख्यां'ना इंट्रेष्टिंग, लिहिण्या-मांडण्याजोगा वाटल्यामुळे त्यावर काम करण्यात आलं आहे. यात कुणी कुणावर काही लादण्याचा काय प्रश्न आला? आपल्याला अमुक एक विषय आवडत असेल, तर तो संपादकांना आधीच सुचवला जावा. त्यावर सहकार्य करायला संपादकांची ना असेल, तर आक्षेप 'एकवेळ' ठीक आहे. 'ऐसी'ची जागा तुमच्या विषयासाठी वापरू देणार नाही, असं संपादक म्हणाले, तरी त्यांच्यावर असहिष्णुतेचा आरोप करता येईल. तसं घडलं आहे का? जर तसं नसेल, तर हा आक्षेप बिनबुडाचा आहे, असं म्हणण्यावाचून पर्याय उरत नाही.

'ऐसी अक्षरे'च्या संपादन मंडळानं मला इथल्या व्यासपीठावरही आणि बाहेरही निराळ्या स्वरूपाचं काम करण्यासाठी कायम मदत देऊ केली आहे. त्यांच्यावर थेट वा आडून केलेल्या या आरोपाचं मला कमालीचं आश्चर्य आणि खेद वाटतो.

.शुचि. Fri, 06/11/2015 - 19:47

In reply to by मेघना भुस्कुटे

'आम्ही कायम एका बंदिस्त-प्रेमळ-घट्ट-बांधलेल्या-बाहेरच्यांना-आपल्यात-न-घेणार्‍या गटासारखेच राहणार' अशा प्रकारचा काही दावा त्यामागे आहे का?

नाही असा दावा नाही मेघना. उलट्पक्षी अशी इच्छ आहे की नवीन चेहर्‍यांनी दिवाळीनंतर गायब होऊ नये. पण अर्थात हा हट्ट लहान मुलासारखाच आहे. असा हट्ट धरता येत नाही, सक्ती करता येत नाही.

धर्मराजमुटके Fri, 06/11/2015 - 16:59

बाहेरचे आणि आतले अशी चर्चा करण्यात काय हशील नाही. जे काही उपलब्ध करुन दिलेले आहे त्याची क्वालीटी चांगली असली म्हणजे झालं. त्यावरील चर्चेला हरकत नसावी.

तिरशिंगराव Fri, 06/11/2015 - 18:12

जोपर्यंत चांगल्या दर्जाचे साहित्य वाचायला मिळत आहे तोपर्यंत तो 'माल' देशी आहे का इंपोर्टेड आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. तसेही, एखादा लेख वाचता वाचता तो सामान्य दर्जाचा आहे असे वाटले, तर तो तिथेच सोडून देण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की!

चिमणराव Fri, 06/11/2015 - 19:29

ब्लॅागवरचे अगोदर लिहिलेले लेख येथे पुन्हा प्रकाशित होणं ठीक आहे कारण ब्लॅाग फार कमी वाचले जातात.लोकसत्ताचा खप पाहता तिकडचा लेख एकदीड वर्षांनी लेखकाने इथे देताना विचार करायला हवा.तसा तो लेख छापील माध्यमाचा भाग असला तरी जालावरही वाचला जातो.याबाबतीत परदेशी न्यूजचानेलवरचे कार्यक्रम आणि त्याचे सादरीकरणाचे उदाहरण म्हणून बघता येईल.अमुक एक विषय मी पुन्हा का चर्चेत आणतो आहे?त्यात काही लक्षणीय घटना नवीन घडल्या आहेत का?.

अरविंद कोल्हटकर Sat, 07/11/2015 - 11:36

Sorry to be a narrow-minded spoilsport पण आताच मी मोजल्याप्रमाणे आजतागायत 'ऐसी'च्या चालू दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये ५ 'ऐसी'च्या नियमित सदस्यांचे दिसतात आणि १७ धूमकेतु 'pro-forma' सदस्यांचे दिसतात. त्यातहि पुष्कळ लेखांचा 'नव्वदोत्तरी'शी काय संबंध आहे ते मला तरी विचार करून सुचत नाही. अशा अंकाला 'ऐसी' दिवाळी अंक म्हणण्यापेक्षा संपादकांच्या दृष्टीने मराठीतील शेकडो-हजारो लेखांपैकी त्यांना काही unfathomable कारणांनी भावलेल्या लेखांची anthology असे नाव अधिक शोभून दिसेल असे मला वाटते. तसेच नाव त्याला द्यावे.

ताक मागायला जायचे तर भांडे कशाला लपवायचे?

अजून एक लक्षणीय गोष्ट. ह्या बहुतेक सर्व 'धूमकेतूं'च्या लेखांखाली पुढील स्वरूपाची एक 'वैधानिक चेतावणी' दिसते जी येथील 'नेटिवां'च्या लेखाखाली नाही. उदाहरणार्थः


संक्षिप्त लेखाच्या स्वरूपात पूर्वप्रसिद्धी – लोकसत्ता (श्री. कुमार केतकर व श्री श्रीकांत बोजेवार) २००९.
सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. लेखाचा मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.>

ह्या लेखकांनी आपापले लेखन येथे प्रसिद्ध करण्याआधी त्याखाली ही 'वैधानिक चेतावणी' असायला हवी अशी मागणी केली होती काय? तसे नसेल तर त्या लेखांखालीच ही चेतावणी आहे, 'नेटिवां'च्या लेखाखाली नाही ह्याचे कारण काय?

ब्रिटिश जमान्यात हिंदुस्तानामध्ये योग्य व्यक्ति उपलब्ध नसल्यामुळे ब्रिटनहून वॉइसरॉय, गवर्नर असे 'चुने हुए' लोक त्यांच्या अटी मान्य करून हिंदुस्तानात उपलब्ध करून दिले जात त्याची आठवण येते. All for the benefit the natives, you know!

चिंतातुर जंतू Sat, 07/11/2015 - 15:54

>> त्यातहि पुष्कळ लेखांचा 'नव्वदोत्तरी'शी काय संबंध आहे ते मला तरी विचार करून सुचत नाही. अशा अंकाला 'ऐसी' दिवाळी अंक म्हणण्यापेक्षा संपादकांच्या दृष्टीने मराठीतील शेकडो-हजारो लेखांपैकी त्यांना काही unfathomable कारणांनी भावलेल्या लेखांची anthology असे नाव अधिक शोभून दिसेल असे मला वाटते. तसेच नाव त्याला द्यावे.

ताक मागायला जायचे तर भांडे कशाला लपवायचे?

कोल्हटकरांना जी unfathomable वाटली ती कारणमीमांसा स्पष्ट करण्यापुरताच हा प्रतिसाद आहे. अंक अद्याप पूर्ण प्रकाशित झालेला नाही हेसुद्धा इथे लक्षात घेण्याची गरज आहे. आतापर्यंत 'संकल्पनाविषयक' सदराखाली प्रकाशित झालेले लेख -

  • नवी गाणी नवा बाज - मुकंद कुळे

ह्याविषयी पुरेसं स्पष्टीकरण मी वरच्या प्रतिसादात दिलेलं आहे.

  • 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण - पंकज भोसले

हा लेखदेखील पॉप्युलर कल्चर आणि नव्वदोत्तरी काळामध्ये त्यात झालेले बदल आणि जगण्यात झालेले बदल ह्याच्याशी संबंधित आहे. एके काळी 'प्लेबॉय' ही आपल्याकडे चोरून वाचण्याची आणि लपवून ठेवण्याची गोष्ट होती. गेल्या काही वर्षांत दोन मोठे बदल झाले. -

  1. पॉर्न पाहण्याविषयीचे लोकांचे गंड कमी झाले. म्हणजे आपण ते पाहतो हे खुल्या दिलानं कबूल करणारे लोक वाढले. इतकंच नव्हे, तर आपापल्या बायका / गर्लफ्रेंडसकट पॉर्न पाहायलाही लोक कचरत नाहीत. म्हणजे हे 'प्लेबॉय'सारख्या घटकांचं मुख्य प्रवाहात येणं म्हणता येईल.
  2. पण त्या मुख्य प्रवाहात येण्याच्या काळातच 'प्लेबॉय'ला धक्केही बसू लागले - आधी व्हिडिओ संस्कृतीनं आणि नंतर इंटरनेटनं पॉर्न चित्रपट उपलब्ध केले. त्यामुळे निव्वळ फोटो पाहण्यात काही विशेष उरलं नाही. शिवाय, पैसेवाला पुरुष प्लेबॉय वाचतो (आणि त्यामुळे महाग उत्पादनांच्या जाहिराती मिळतात) हे गणितसुद्धा ह्या मेनस्ट्रीमिंगमुळे बदललं. त्यामुळे 'प्लेबॉय'ला अखेर हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

'प्लेबॉय' हा 'पॉप्युलर कल्चर'मधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे त्याच्यातला हा स्वरूपबदल नव्वदोत्तरी काळात घडलेला एक लक्षणीय बदल आहे.

  • वॉकमन - सचिन कुंडलकर

'कन्झ्यूमर कल्चर' म्हटलं की ते काही तरी वाईटच, असं मानणारा समाजवादी / डावा / 'साधी राहणी; उच्च विचारसरणी'छाप नव्वदपूर्व मध्यमवर्ग एकीकडे आणि बाजारपेठीय लोंढ्यात वाहून जाणारा आजचा ऑनलाईन 'शॉप टिल यू ड्रॉप' भारतीय दुसरीकडे ही दोन टोकं आजच्या समाजात आहेत. अर्थात, नव्वदोत्तरी काळात एकाची पीछेहाट झाली तर दुसरा कानामागून येऊन तिखट झाला. पण ह्या दोन टोकांमध्ये हरवून जाण्यापेक्षा वस्तूंशी माणसांचं नातं आधी काय होतं, त्यांच्या वापराला कोणते सामाजिक-मानसिक पैलू आधी होते आणि ह्या काळात हे कसं बदललं, ह्या संक्रमणाचं एक चित्र ह्या लेखात उमटतं. ते व्यक्तिगत अनुभवाशी जरी संलग्न असलं तरीही सदाशिव पेठेतून कोथरुडात गेलेल्या पुणेरी ब्राह्मणी मध्यमवर्गाच्या वृत्तीतला थक्क करणारा बदलही ते दाखवतं. १९८०च्या दशकात सदाशिव पेठेतल्या कुणाला ह्या बदलाची चिन्हं दिसली असती का ह्याविषयी मला शंका आहे. आता मागे वळून पाहता मात्र तो निश्चित दिसतो.

  • बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती - शाहू पाटोळे

शाहू पाटोळेंचा लेख तर अधिक व्यापक संक्रमणाचं चित्र उभं करतो. १९७२च्या दुष्काळापासून ते आताच्या टीव्हीमुळे बदललेल्या ग्रामीण खाद्यसंस्कृतीकडे ते लक्ष वेधून घेतात. मराठी संस्थळांवरचा वाचक मुख्यतः नागर अनुभवांविषयी बोलणारा आणि मुख्यतः उच्चवर्णीय असल्यामुळे ह्या लेखाला विशेष महत्त्व आहे. कारण गावात होणारे बदल आणि तेसुद्धा खरोखरच्या सर्वसामान्य लोकांमधले बदल त्यात दाखवले आहेत. 'भारतीय संस्कृती म्हणजे यंव आणि हिंदू संस्कृती म्हणजे त्यंव' अशा कल्लोळात तर त्यातलं संक्रमण अधिकच महत्त्वाचं आणि समकालीन वास्तवाचं भान आणून देणारं आहे.

  • 'ओळख' नावाचा बुडबुडा - अमृता प्रधान

निव्वळ ग्रामीण किंवा निव्वळ शहरी अनुभव न घेता हा लेख दोन्हींच्या सेतूवरचे अनुभव मांडतो. एकीकडे नव्वदोत्तरी काळात मोठ्या प्रमाणात स्त्रिया अनेक व्यवसायांत आणि अनेक ठिकाणी रुळल्या, पण त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची नजर मात्र त्यासोबत बदललीच असं सांगता येत नाही. ह्यामुळे जे गोंधळ होतात त्याचं चित्र अनेकदा 'ऐसी'वरच्या स्त्री-पुरुष वादांमध्येही पडतं. नव्वदोत्तरी काळात हे फक्त स्त्रियांच्याच बाबत झालं असं नाही, तर विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या लोकांची जागतिकीकरण आणि तत्सम घटकांमुळे जी सरमिसळ झाली त्यामुळे 'मल्टिकल्चरलिझम' ह्या शब्दालाच वेगवेगळे धुमारे फुटले आणि 'आपण कोण' किंवा 'आयडेंटिटी'चा मुद्दा ऐरणीवर आला. त्याचं एक टोक युरोपातल्या निर्वासितांकडे युरोपियन लोक कसं पाहतात इथपर्यंत जातं, तर एक टोक आज अमृतासारख्या पुढारलेल्या संस्कृतीतल्या मुलीचा वेगळ्या संस्कृतीतल्या लोकांशी संबंध येतो तेव्हा काय घडतं इथे आहे. अर्थात, निर्वासितांइतका ट्रॉमा तिला अनुभवावा लागत नाही, पण 'आयडेंटिटी'भोवतीचे प्रश्न नव्वदोत्तरी काळात कसे बदलत गेले त्याचं एक चित्र तिच्या अनुभवात आहे.

  • बदलती भाषा - कुठून आणि कुठे? - हेमंत कर्णिक

ह्या लेखाचा संकल्पनेशी संबंध उघड आहे. लोकांची भ्रमणक्षमता वाढणं, इंग्रजीचा वापर केवळ वरच्या सामाजिक स्तरापुरता मर्यादित न राहणं, 'शुद्ध' मराठीचा आग्रह धरणारे उच्चवर्णीयच मराठी सोडून इंग्रजीच्या कुशीत गेल्यामुळे प्रमाण भाषेच्या आग्रहाचं स्वरूप बदलणं, मराठीभाषक माणसानं केलेल्या उद्घोषणा जाऊन यांत्रिक अनाउन्समेंट येणं किंवा लिहिण्याऐवजी कंप्यूटरवर टाईप करणं, असे तंत्रज्ञानामुळे आलेले घटक हे सगळे नव्वदोत्तरीपासूनचे उद्भवलेले सद्यकालातलेच मुद्दे आहेत आणि त्यामुळे बदलत गेलेली भाषाही आत्ताचीच आहे.

  • शार्लीचं काय करायचं? - राजीव नाईक

ह्या लेखाचा तात्कालिक संबंधही उघड आहे. १९८८साली सलमान रश्दीची 'सेटनिक व्हर्सेस' कादंबरी आली तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनं आणि रश्दीच्या बाजूनं बोलणारे उदारमतवादी लोक आणि बंदीचं समर्थन करणारे उदारमतवादी लोक ह्यांच्यात जी फूट पडली त्यात आजच्या 'सिक्युलर', 'विचारजंत' वगैरे विशेषणांची मुळं शोधता येतील. इतकंच नव्हे, तर तेव्हा रश्दीची बाजू भक्कमपणे घेणाऱ्या पाश्चात्य देशांमधल्या उदारमतवाद्यांमध्येच आज संभ्रम आढळतात - 'शार्ली एब्दो'च्या व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तीला समर्थन देणारे लोक इस्लामद्वेष्टे आहेत का, असे प्रश्न आज तिथे उपस्थित केले जात आहेत. ह्या पार्श्वभूमीवर अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी राजीव नाईक ह्यांनी मांडलेले विचार ह्या काळाविषयी काही रोचक मांडणी करत आहेत.

नीट पाहिलं तर हेसुद्धा लक्षात येईल की ह्यातले काही लेख व्यक्तिगत अनुभव मांडत असले तरीही समष्टीविषयी त्यातून काही म्हणता येतं; तर काही लेख एकंदरीत परिस्थितीविषयीची मांडणी करत असल्यामुळे आपण जगतो त्या काळाविषयी त्यातून काहीएक चित्र आपोआप उमटतं. प्रत्येक लेखाचा आपल्या अनुभवाशी संबंध लागला नाही लागला तरीही त्यातून आताच्या जगण्याविषयीच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे, हे स्पष्ट व्हावं अशी अपेक्षा आहे. अंकाचा विषय खूपच व्यापक आहे आणि लेखकांची वानवा तर आहेच. शिवाय, आधी घडून गेलेल्या गोष्टींचं विश्लेषण जितकं शक्य होतं तितकं आत्ता चालू असलेल्या आणि बदलत असलेल्या गोष्टींचं विश्लेषण शक्य होईलच असं नाही. ह्या दोन्ही कारणांमुळे अंकाला काही मर्यादा पडणार हे अपेक्षितच आहे. तरीही, अंकासाठी निवडलेले लेख आणि अंकाचा विषय ह्यांचा परस्परसंबंध अजिबात लागतच नाही असं म्हणणं काहीसं धाडसाचं वाटतं. तो संबंध कसा लागतो ह्याविषयीचे काही लोकांचे संभ्रम तरी आणि काही प्रमाणात तरी दूर झालेले असतील अशी आशा आहे. आणि तरीही मतभिन्नता असू शकतेच; ती असली तर तिचाही आदरच आहे.

राजेश घासकडवी Sat, 07/11/2015 - 19:39

In reply to by चिंतातुर जंतू

या यादीत मीही एक भर घालतो.

- चाळ नावाची गचाळ वस्ती - मुग्धा कर्णिक
शहरीकरणाचे अनेक टप्पे असतात. शहरं म्हणजे उत्पादनांचं, कारखान्यांचं केंद्र ही पहिली पायरी असते. गावाकडून कामगार गोळा होतो आणि चाळींमधून राहून कारखान्यांत काम करून गावी पैसे पाठवतो. गरीब समाजाने बकाल जागी राहून का होईना पण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांचं प्रतीक ही चाळ संस्कृती आहे. साठ-सत्तर-ऐशीच्या दशकात असलेलं चाळीतलं जीवन हे त्या धडपडीने व्यापलेलं आहे. एका पिढीने तीस वर्षं हे केलं. तिची पुढची पिढी शिकली, सुशिक्षित झाली. त्याचबरोबर शहराचं वास्तवही बदललं. प्रामुख्याने ब्लू कॉलर उत्पादन मागे पडून व्हाइट कॉलर नोकऱ्यांचं प्रमाण वाढलं. मॅन्युफॅक्चरिंग/अॅग्रिकल्चर समाज अधिकाधिक सर्व्हिस ओरिएंटेड बनत चाललेला दिसतो. त्याचबरोबर शहरांतली गर्दी वाढते, आणि नव्या पिढीला या चाळींमध्ये राहाण्यापलिकडचे पर्याय परवडू लागतात. ती ते आनंदाने स्वीकारतेही. मात्र आर्थिक संक्रमणाबद्दल हे सांस्कृतिक संक्रमणही ठरतं. आपली जुनी 'उघडी दारं' संस्कृती विसरून बंद, एकलकोंडे होत चाललो आहोत अशी भीती वाटायला लागते. या पार्श्वभूमीवर जे टाकलं ते का टाकलं, आणि नवीन जे स्वीकारलं ते स्वीकारण्यात चंगळवाद नसून, गरजा आहेत हे सांगणारा हा लेख आहे. यात नव्वदोत्तरी, चंगळवाद वगैरे उल्लेख ओझरतेच आलेले असले तरी तो नव्वदोत्तरीच्या मध्यमवर्गीय संक्रमणाचं प्रातिनिधित्व करतो. यात शहरीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचीही चित्रं दिसतात. मॅन्युफॅक्चरिंग शहराबाहेर जाणं, कारखाने आणि चाळी पाडून त्यांच्याजागी अत्याधुनिक टॉवर उभे राहाणं हाही नव्वदोत्तरीचा भाग आहे.

मुळातला मुग्धा कर्णिकांचा लेख हा केवळ चाळींचं वर्णन करून थांबला होता. आम्ही त्यांना पुढचा नव्वदोत्तरी मानसिकता दाखवणारा भाग ऐसीसाठी लिहिण्याची विनंती केली.

नगरीनिरंजन Sat, 07/11/2015 - 16:54

अंक दर्जेदार आहे यात वाद नाही पण बाकी काही असो, ऐसीच्या दिवाळी अंकात लिखाण सिलेक्ट होणार नाही असे वाटल्याने द्यायची हिंमत केली नाही कधी.

.शुचि. Sat, 07/11/2015 - 20:07

In reply to by नगरीनिरंजन

गेल्या वर्षी अदितीने मला विचारले होते म्हणून मी एक फालतू, तद्दन रद्दड लेख पाठविला होता जो की दिवाळीअंक काय कुठेच येण्याच्या लायकीचा नव्हता, अर्थात नंतर आय नेवर हर्ड अनिथिंग अबाऊट दॅट.
.
या वेळेलाही उर्मी जागृत न झाल्याने, काहीच लिहीले नाही.
.
पण ननि तुम्हाला पाठवायला काय हरकत होती? नसता झाला सिलेक्ट तर नसता झाला :) हाकानाका.

adam Sat, 07/11/2015 - 20:49

In reply to by नगरीनिरंजन

सेम हियर.
दिवाळी अंकाच्या विषयाला धरुन ताजा, नवा लेख लिहून देण्याबद्दल मला गेल्यावर्षी विचारणा झाली होती. पण मला चांगला लेख लिहून द्यायला जमलं नाही. सुरुवातीला प्रयत्न केला, पण लेखणी पुढे सरकेचना. मग कसाबसा प्रयत्न करुन जे काही लिहिलं, ते अगदिच कै च्या कै बनलं होतं.(ते पहिल्यांदा एकट्यानं वाचून अर्धा आत्मविश्वास संपला.) जवळच्या एक दोघांना अभिप्रायासाठी विचारलं; त्यांचंही प्रांजळ,थेट,प्रामाणिक मत "ये कुछ जम्या नही" असच आलं.दिलेल्या विषयाला धरुन नेमकं , दर्जेदार लिहिणं महाकठीण काम वाटतं.
मात्र, जिथे पूर्व प्रकाशित लिखाण प्रसिद्ध केलेलं चालतं; असे काही फोरम्स आहेत. तिथल्या दिवाळी अंकात माझं लिखाण घ्याल का, अशी विचारणा मी स्वतःहून करत असतो.(माझे प्रकाशित झालेले काही धागे त्यात बसू शकतात असं मला वाटतं. माझे प्रतिसाद तुटक तुटक असले, तरी धागे मात्र तुटक नसतात, एकसलग असा लेख म्हणून ते ग्राह्य धरता यावेत असं मला वाटतं.)असो.

आदूबाळ Sat, 07/11/2015 - 23:13

In reply to by चिमणराव

किंवा लेखकांची परवानगी ना घेता पूर्वप्रकाशित लेखन छापू आणि चोर दिवाळी अंक काढू. नंतर त्या लेखकांच्या प्रतिक्रिया शिमगा अंकात छापता येतील.

'न'वी बाजू Sun, 08/11/2015 - 00:00

In reply to by आदूबाळ

दिवाळीतसुद्धा 'देवाची आळंदी' आणि 'चोराची आळंदी'-छाप पोटभेद असतात, याची कल्पना नव्हती.

('माहितीपूर्ण' दिली आहे.)

जयदीप चिपलकट्टी Sat, 07/11/2015 - 22:21

In reply to by adam

> दिवाळी अंकाच्या विषयाला धरुन ताजा, नवा लेख लिहून देण्याबद्दल मला गेल्यावर्षी विचारणा झाली होती. पण मला चांगला लेख लिहून द्यायला जमलं नाही.

ते ठीक आहे, पण दिवाळी अंकाच्या थीमला धरूनच लिहिलं पाहिजे, नाहीतर ते स्वीकारलं जाणार नाही असं नसतं. लिखाण चांगलं असेल (मग ते कुठल्याही विषयावर असो) तर त्याला दिवाळी अंकात जागा आहे. उदाहरणार्थ, यावेळच्या कोल्हटकरांच्या लेखाचा नव्वदोत्तरीशी संबंध इतकाच की त्यात वर्णन केलेला काळ इ.स. पूर्व ९० नंतरचा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/11/2015 - 03:42

In reply to by नगरीनिरंजन

दोन सदस्यांना लेख लिहिण्याबद्दल विचारणा केली होती. दोन्ही लेख संकल्पनेसंदर्भात होते. दोघांनी स्वतःच संपादकीय चाळणी लावून आपलं लेखन पाठवलं नाही. (हा क्वालिटी कंट्रोल लावतात म्हणूनच) कोणत्याही विषयावर या दोघांनी लिहिलं तर ते मला वाचायला आवडेल.

---

एरवी 'ऐसी'वर नसणाऱ्या काही सदस्यांकडून मागवलेलं लेखनही फार न आवडल्यामुळे अंकात न छापण्याचा निर्णय घेतला गेला. (अंक पूर्ण प्रकाशित न झाल्यामुळे "छापलेलं नाही" असं अजून म्हणता येत नाही.)

नगरीनिरंजन Sun, 08/11/2015 - 07:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी फक्त वस्तुस्थिती सांगितली; तक्रार अजिबात नाही. दुसर्‍याने क्वालिटी (समजावून) सांगण्यापेक्षा स्वतःच क्वालिटी कंट्रोल करणे चांगलं.

नगरीनिरंजन Sun, 08/11/2015 - 13:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कौतुक करण्या न करण्याचा संबंध नाही. दिवाळी अंकाला ज्या छापाचं लिखाण पाहिजे असतं ते इथे पडीक असलेले देऊ शकतीलच असं नाही हे बर्‍याच जणांना कळत असावं. त्यामुळे धुमकेतू लेखक दिसल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. एवढंच म्हणायचा प्रयत्न होता.

चिमणराव Sat, 07/11/2015 - 20:31

अगोदरच्या खरडीत एक मुद्दा लिहिला-"हा विषय मी आता का घेतो आहे?" प्लेबॅाय च्या लेखात तो मुद्दा येतो.त्यांनी आताच केलेले बदल आणि पॅान साइटवर बंदी आणावी का ही महाराष्ट्रापुरती गाजलेली बातमी.यामुळे लेख समयोचित वाटला.

आणखी एक मुद्दा इथे या चर्चेच्या ओघाने आठवला तो सर्वसामान्य आहे."छापील माध्यमातून आंतरजालावरच्या लेखनाकडे वाचक गेला तरी वाचक हट्टीपणा करत आहेत असे लेखकांना वाटू लागले आहे."लोकसत्ता वगैरेत लेख दिला होता दोन वर्षांपुर्वी आता जरा थोडी झालर मारून दुसरीकडे 'टाकतो' ही प्रवृत्ती लेखकांमध्ये वाढते आहे तसेच (हट्टी ) वाचक खासकरून आंजावरचे दुसय्रा संस्थळांवर जाऊन वाचन करत नाहीत.कित्येकवेळा लेखक एकच लेख चार वेगळ्या ठिकाणी कॅापी - पेस्ट करून टाकतात.

दोन वर्षांपुर्वी आसेतुहिमाचलभारतवर्षाला मिठीत घेणाय्रा वाटसपच्या ढकलंपंचीची आपण जशी सवय लावून घेतली तशी आता लेखांचीही सवय लावून घेऊ.4G LTE square cube वगैरेच्या जमान्यात एका कानाचे दुसय्रा आपल्याच कानाला कदाचित चार सेकंद अगोदर कळले असेल.

प्रकाश घाटपांडे Sun, 08/11/2015 - 12:16

शेवटी प्रश्न राहिला ताजं विरुद्ध शिळं. आम्ही या प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहात नाही. एखाद्या थीमवरचं लिखाण हे अॅंथॉलॉजीसारखं असतं. त्यावर येणारे विचार हे कोणीतरी दोन वर्षांपूर्वीच मांडले म्हणून त्याज्य नाहीत. आधीच्या अंकांतही पुनर्प्रकाशित लिखाण आहे. पण जर थीममध्ये ते चपखल बसत असेल तर त्याला आक्षेप का असावा? पण मला खरंच एक सांगा, गेल्या त वर्षांच्या दिवाळी अंकांत किती वेळा तुम्हाला वाटलं आहे 'अरे, हे तर वाचलेलंच आहे आधी'?

राजेश अगदी सहमत आहे. अनेकदा असेही होते की मूळ लेखन जिथे केले आहे ते आपण वाचले असतेच असे नाही. त्यामुळे ही खर तर 'सोय' आहे.ज्यांनी वाचले असेल त्यापैकी काहीना पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळू शकतो.तसेच प्रबोधन/ विचार प्रसार यात त्याच त्याच गोष्टी पुनःपुनः सांगायच्या असतात. कारण एक वाचक वर्ग असा असतो कि त्यांच्यासाठी ही माहिती नवीनच असते. जुन्या वाचकांच्या कदाचित विस्मृतीत गेलेला असू शकतो किंवा पुनर्वाचनाने आकलनाची नवी दृष्टी त्याला मिळालेली असू शकते. समजा तसे नसेल तर दुर्लक्ष करण्याचा पर्याय खुला असतोच. रेडिओवर तीच तीच गाणी पुनःपुनः लागत असतात. कुणी पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतो तर कुणी स्टेशन बदलतो वा रेडिओ बंद करतो. अनेक लेखकांची तीच तीच पुस्तके पुन:पुन्हा छापली जात असतात. पुस्तके ज्यांना आवडतात ते पुन्हा वाचतात तर काही लोक ती रद्दीत टाकतात. रद्दीतील पुस्तके घेउन पुन्हा ती कुणी तरी वाचतो.
एखादी लेख / पुस्तक थेट पुढ्यात आणी सहज पणे आले तर ते वाचली जाते असा अनुभव आहे