श्री कोरोनाविजय कथामृत (२) - फेब्रुवारी २०२१
(जानेवारी महिन्याचे निरुपण इथे)
तर असं झालं महाराजा, की फेब्रुवारी महिना आला आणि आमच्याकडच्या दररोज नवीन बाधितांच्या केसेस अजून कमी होऊ लागल्या.
२०२० गपगार काढलं होतं पब्लिकने. मोठमोठ्या गोष्टी झाल्या नव्हत्या. ७०० वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारी बंद होती. पुण्यातला ढिंगचॅक आणि मुंबईतील भव्य का कसा तो गणेशोत्सव मनावर दगड ठेऊन बंद ठेवला होता.
ऑगस्ट-सप्टेंबरमधली जोरदार पहिली लाट आणि त्याची दहशत गेली तरीही दिवाळीही थंड थंड पार पडली होती.
आता सगळं ठीकठाक होतंय म्हणल्यावर आम्ही झालो निवांत, मोकळे!! हजारी उपस्थितीचे लग्न व इतर समारंभ जोरात सुरू केले आम्ही.
त्यात ग्रामपंचायत इलेक्शनचे वारे वाहू लागले महाराष्ट्रात, आणि आम्ही उत्साहात आलो.
थंड तरी किती महिने बसणार हो ?
नेहमीचं चलनवलन सुरू झालं.
प्रवास जोरात सुरू झाले. नाही म्हणायला मीही अकरा महिन्यांच्या गॅपनंतर कामानिमित्त (टेस्ट करून) तामिळनाडूत जाऊन आलो.
सगळं कसं नीट चालू झालं.
तिकडे बाहेर बोरीसकुमार जॉन्सन लॉकडाऊन धरून बसले, मोकळा करेनात.
बायडेनमामा आल्याआल्या जोरात कोरोना कन्ट्रोलला भिडले. मास्क लावायला लागले सगळ्यांना. लसीकरण वेगात करून ऱ्हायले.
मिलिट्रीच्या लोकांनाही म्हणे लसीकरणाच्या मदतीला बोलवायचं म्हणले आणि काय काय आणि काय काय. आकडे खाली आणायला लागले तिथले. एकंदरीत साथ आटोक्यात आणायचा जोरात प्रयत्न करून ऱ्हायले.
आणि काय सांगू म्हाराजा, उतरू लागले की आकडे बायडेनमामा आणि बोरीसकुमारांच्याकडे!!!
आमचंही लसीकरण सुरू होतं पण आम पब्लिकला सुरू नव्हतं अजून.
फेब्रुवारी संपत आला, कमी झालेल्या केसेस ८,०००वरून हळूच परत १६,०००ला पोचल्या.
पण आम्ही निवांत होतो.
पुढच्या महिन्याच्या अखेरीला पाच राज्यांच्या निवडणूका सुरू होत आहेत!!!! त्यात बंगालातील निवडणूक आठ टप्प्यांची, महिन्याहून जास्त काळ चालणारी.
आम्ही तयारीला लागलो जोरात.
शेवटी लोकशाही महत्त्वाची नै का? लोकांच्या आधी लोकशाहीला वाचवायला पाहिजे!!!
शिवाय बारा वर्षांनंतर येणारा महत्त्वाचा, पवित्र कुंभमेळा सुरू होणार पुढच्या महिन्यात, पहिले शाही स्नान आहे महाशिवरात्रीला!!!
ते कसे थांबवणार?
शेवटी आपली महान परंपरा आणि संस्कृती जपायला पाहिजे आपणच.
कोरोना फिरोना... महासाथ वगैरे काय दर शतकात येतेच एकदा, त्याचे काही विशेष नाही एव्हढे.
तेवढ्यात लक्षात आलं की बोरीसकुमारांच्या ब्रिटनला दैनिक नवीन बाधितांच्या संख्येत आम्ही हळूच मागे टाकलंय.
आता एकच लक्ष, बायडेनमामांना मागे टाकायचं!!!
शुभस्य शीघ्रम!!
(पुढचा भाग - मार्च)
कुंभमेळा
कुंभमेळा खरेतर २०२२ मध्ये होणार होता, तो कोणत्यातरी ग्रहगोलांच्या आधारे २०२१मध्ये करायचा घाट घातला असं ऐकून आहे. बायडेनमामांना मागे टाकायचं मनावर घेतलं असणार आखाड्यांच्या महंतांनी.
ते ठीकच*, परंतु...
...मग त्या तबलीगी जमातवाल्यांच्या नावाने तो जो इतका गदारोळ केला, तो नक्की कोणत्या न्यायाने?
सड्डा कुत्ता कुत्ता...?
----------
* वेल, ते ठीक नाही, परंतु...
माणसं आहेत मेंढर नाहीत
नेत्यांना निवडणुका जिंकायच्या असतात सत्ता हेच त्यांचे ध्येय असते.त्यांचा तो प्रोफेशन च आहे.
धार्मिक उस्तव धर्म मार्तंड लोकांचे अस्तित्व टिकवून ठेवतात .
पण जी लोक ह्यांच्या पाठी बिनडोक पने धावत असतात ती खरी दोषी आहेत..
सर्व प्रकारची माहिती लोकांना मिळत होती,ईश्वर कृपेने विचार करण्यास सक्षम मेंदू पण दिला आहे तरी अत्यंत निष्काळजी लोकांनी दाखवली त्याचाच हा परिणाम आहे.
लोक शहाणी नाहीत.मूर्ख आहेत.