बुलशिट जॉब्स

(‘बुलशिट जॉब्स’ या इंग्रजी मथळ्याऐवजी ‘निरर्थक रोजगार’ किंवा ‘फालतू नोकऱ्या’ वा ‘निरर्थक नोकऱ्यांचा सुळसुळाट’ हा मराठी मथळा या लेखाला दिला असता. परंतु ‘बुलशिट जॉब्स’ हे शीर्षकच चर्चेसाठी समर्पक ठरेल असे वाटले म्हणून हा द्रविडी प्राणायाम.)

xxx20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील वाशिंग मशीन्स, व्हॅक्यूम क्लीनर, मॉडेल टी ऑटोमोबाइल्स, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रिक टोस्टर, बँडेड्स, बुलडोझर, लाउडस्पीकर्स, रेडिओ, ज्युक बॉक्स, असेंब्ली लाइन उत्पादनतंत्र, ब्रेड स्लाइसर, इलेक्ट्रिक रेझर, टेलिग्राफ, ट्रेन्स, कचऱ्याचा निचरा, फ्रोजन् फूड, इत्यादीसारख्या लहान मोठ्या परंतु अभूतपूर्व वाटत असलेल्या सोई-सुविधा व त्यांच्या तंत्रज्ञानांचा आढावा घेत असताना त्या काळातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, जॉन मेनार्ड कीन्स यानी 1930 साली, विसावे शतक संपायच्या आतच अमेरिका, इंग्लंडसारख्या प्रगत देशातील नागरिकांच्या हातांना काम करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बहुतेक नागरिक फार फार तर आठवड्याला फक्त 15 तास काम करून इतर सर्व वेळ कला, साहित्य, छंद इत्यादी गोष्टी करत स्वतःचे जीवन समृद्ध करत जगतील, असे विधान केले होते. कदाचित त्याचा आशावाद अजिबात खोटा नसेल. त्या काळच्या तंत्रज्ञानातील घोडदौडीचा आढावा घेतल्यास समाजाच्या भौतिक गरजा व माफक मनोरंजनासाठी लागणाऱ्या सोई-सुविधा विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत पूर्ण होऊन माणसाला फक्त स्वतःचे छंद जपण्यासाठी हालचाल करावे लागेल, असे वाटणे स्वाभाविक होते. आणि ते शक्यही झाले असते. परंतु तसे काही घडले नाही. त्याऐवजी प्रगत तंत्रज्ञान कामं कमी करण्याऐवजी फार मोठा पसारा उभा करत सर्वांना जिवंत राहण्यासाठी(च) काम करण्याच्या रहाटगाडग्याला जुंपून ठेवले आहे. व हा कामाचा रगाडा अजूनही वाढतच असून त्याला अंत नाही असेच वाटत आहे. भांडवली अर्थव्यवस्थेत अशिक्षित/अर्धशिक्षित यांच्याकडून शारीरिक श्रम करवून घेवून त्यांच्या अतिरिक्त श्रममूल्यावर इतरांचे ऐषआरामी जीवन एक वेळ क्षम्य ठरले असते. परंतु आताच्या तंत्रज्ञानाची भूक सर्व थरातील श्रमिक व बुद्धीजीवींचा बहुतेक वेळ गिळंकृत करत असल्यामुळे आठवड्यातील 70-80 तास कामाला पर्याय नाही असेच वाटू लागले आहे. या कामांच्या वेळानंतर शिल्लक राहिलेल्या अगदी मोजक्या वेळात मन रमविण्याची मुभा हे तंत्रज्ञान देत आहे, हेही नसे थोडके! त्यामुळे आताची समाज व्यवस्था प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतवून तटस्थपणे विचार करण्यास फुरसत देत नाही. समाजाच्या या स्थितीसाठी केवळ तंत्रज्ञानाचाच वाटा आहे असे म्हणण्यात हशील नाही व फक्त तंत्रज्ञानाला दोष देणेही योग्य ठरणार नाही.

काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांना स्वतः करत असलेल्या कामाचा तिटकारा वाटतो. जॉब सॅटिस्फॅक्शनविषयी स्पष्ट बोलल्यामुळे परिस्थितीत फरक पडत नाही याचे भान असल्यामुळे स्वतःचे मन मारून (व स्वतःशी प्रतारणा करत) महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या (गलेलठ्ठ) पगाराकडे डोळे लावून दिलेले काम ते करत राहतात. आपण एक निरर्थक, फालतू काम करत असून त्यात सर्जनशील, रचनात्मक असे काही नाही याची जाण त्यांना असते. परंतु खरे बोलल्यास आपण गर्तेत जावू याची भीती वाटत असल्यामुळे ते तसेच कुढत कुढत दिवस ढकलत असतात. नोकरीचा पूर्ण काळ अशा प्रकारचे नकारात्मक विचार करत घालविल्यामुळे आपले आयुष्य वाया गेले हे शेवटी शेवटी कळू लागते. या नोकरीने (वा व्यवस्थेने) आपल्याला नामोहरम केले अशी भावना सतत टोचत असल्यामुळे स्वतःलासुद्धा ते सांगू शकत नाहीत.

कीन्सचे हे दिवास्वप्न पूर्ण का होऊ शकले नाही?
याचे उत्तर शोधत असताना कीन्सला विसाव्या शतकातील चंगळवाद व टोकाच्या बाजारीकरणाची कल्पना आली नसेल, हेही एक कारण असू शकेल. माणूस हा प्लेजर सीकींग प्राणी असल्यामुळे माणसासमोर
1.गरजा कमी ठेवत कमीत कमी काम करणे व उरलेला वेळ स्वतःचे विनाखर्चिक छंद जोपासण्यात घालवणे
किंवा
2. पोटापाण्यासाठी व नंतरच्या मौजमजेसाठी काम-धदां करत जास्तीत जास्त पैसे कमवणे व उरलेल्या छोट्या कालावधीत जास्तीत जास्त अफाट (व अतीखर्चिक) मौजमजा करणे
असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी आपण दुसरा पर्याय निवडला आहे. नैतिक व व्यावहारिकदृष्ट्या कदाचित ते योग्यही असेल. त्यामुळेच विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हजारो प्रकारच्या रोजगारांची भर पडली. गंमत म्हणजे यातील बहुतेक रोजगार प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित नव्हत्या. उत्पादक व उत्पादनाचा वापर करणारा ग्राहक यांच्यामध्ये रोजगाराची एक प्रचंड साखळी उभारून प्रत्यक्ष उत्पादकाला उपाशी ठेवत ग्राहकांकडून पुरेपूर किंमत वसूल केली जात आहे.

हे नवीन रोजगार कुठले असू शकतील?
एका सर्वेक्षणानुसार विसाव्या शतकात विकसित देशातील स्वयंचलित यंत्रे, तंत्रज्ञानातील नवीन नवीन कल्पना, प्लॅस्टिक, फायबर सारखे नवीन मटीरियल्स, संगणकीकरण इत्यादीमुळे औद्योगिक क्षेत्रातील व कीटकनाशक औषधं, जनुक सुधारित बियाणे, आधुनिक कृषी अवजार इत्यादीमुळे कृषी क्षेत्रातील रोजगारात लक्षणीय प्रमाणात घट झालेली आहे. व त्याच वेळी नवशिक्षित बुद्धीजीवींचीच मक्तेदारी असलेले व्यवस्थापन, संगणक (हार्डवेर व सॉफ्टवेर), मार्केटिंग, जाहिरात, प्रशिक्षण, आर्थिक व्यवस्था, कायदा, करसंकलन, सेवा, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, हेल्थकेर, माध्यमं, डिजिटल व्यवसाय, या प्रकारच्या क्षेत्रात कारकुनी ते सल्लागारापर्यंत मिडल मॅनेजमेंटच्या रोजगाराची एक लांबलचक साखळी तयार होत रोजगारात तिपटीने भर पडली आहे. त्यामुळे शारीरिक श्रमाधारित अन्न पदार्थांचे उत्पादन करणारे कृषीक्षेत्र व माणसांच्या गरजा भागवणारे उद्योगक्षेत्र यापेक्षा इतर रोजगारांनाच नको तितके महत्व येऊ लागले. युरोप व अमेरिकासारख्या अती प्रगत राष्ट्रं नव्हे तर चीन, भारतासारख्या विकसनशील देशातील प्रत्यक्ष यंत्रावर काम करणाऱ्यांची संख्या रोडावत असून स्वयंचलित व मानवसदृश रोबो बलुतेदार कष्टकऱ्यांची हकालपट्टी करत आहेत.

आताची जगण्याची पद्धत एक रॅट रेस झालेली आहे. साधे-सरळ आयुष्य जगण्यापेक्षा काही आभासी उद्दिष्टामागे, मौजमजेच्या भन्नाट कल्पनामागे, तथाकथित बुद्धीजीवी वर्ग धावत आहे. त्यातल्या त्यात सेवा क्षेत्र हे न संपणारे कुरण ठरत आहे. फक्त सेवाक्षेत्राचाच फुगा फुगला नसून प्रशासन, व्यवस्थापन, गुंतवणूक इत्यादी क्षेत्रातही ही साथ पसरत आहे. (कर, कायदा, इ.इ) सल्लागार, विश्लेशक, समन्वयक, विशेषज्ञ, (मानवी संसाधन, शिक्षण, हॉस्पिटल्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स) व्यवस्थापक, इत्यादी नवीन नवीन नावं रोजगारांना देत असंख्य प्रकारच्या पदांची जन्माला घातल्या जात आहेत. प्रत्येकाच्या मनात आपले कुणी तरी हिसकावून घेतील या भीतीमुळे सुरक्षा रक्षक, मार्शल्स व सेक्युरिटी प्रोव्हायडर्स असलेल्या सुरक्षा (सेक्युरिटी) क्षेत्राची भर पडली असून त्यातही लाखो रोजगार निर्माण होत आहेत. एवढेच नव्हे तर पाळलेल्या कुत्र्यांना आंघोळ घालणारे, हॉटेलमधील खाद्यान्न घरी पोचवणारे, गरबा वा फुगडी-झिम्मा शिकविणारे, डोहाळ जेवण, मुलांचे वाढदिवस, अशा समारंभांचे इव्हेंट्स मॅनेज करणारे इत्यादींची रोजगारात भर पडत आहे. त्यामुळे आपल्या प्रधान सेवकांनी चहा-भजी विकण्याला वा भंगार गोळा करण्याला व्यावसायिक पातळीवर नेल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. हे सर्व बघताना या रॅट रेसमध्ये काही तरी करून इतरांच्या खिशातील पैसे काढून स्वतः (व पुढल्या सात पिढ्या) ऐषारामी जीवन जगतील हे एकच लक्ष्य यांच्या समोर असावे अशी दाट शंका येते. यातूनच कदाचित बुलशिट् जॉब्सची साथ पसरली असावी.

हे सर्व प्रकार पाहत असताना एखादी अदृश्य शक्ती यामागे असेल की काय असे वाटू लागते. ही शक्ती एकामागून एक असे निरर्थक रोजगारांची निर्मिती करून आपल्याला जखडून ठेवत आहे की काय असा संशय बळावतो. यातच कुठले तरी रहस्य दडले असावे. कारण भांडवली अर्थव्यवस्था रोजगाराभिमुख कधीच नसते व त्यात असे काही अपेक्षित नसते. अस्तंगत साम्यवादी रशियामध्ये हे एक वेळ चालले असते. कारण सर्व हातांना काही ना काही तरी काम देऊन पोटापाण्यापुरते मोबदला देणे हे त्या व्यवस्थेचे उद्दिष्ट होते. म्हणूनच दुकानातील ब्रेड विकण्यासाठी तेथे तीन मजूर ठेवले जात होते म्हणे.
खरे पाहता अशा प्रकारच्या निरर्थक रोजगारात कुठेही बाजारीकरण वा स्पर्धा नाही. बाजारीकरणात आर्थिक नफा नसल्यास कुठलेही पान हलत नसते. त्यामुळे बाजारीकरणच अशा फालतू रोजगारावर अंकुश ठेऊ शकते. केवळ लाभ कमावण्यासाठी उभारलेला धंदा अतिरिक्त कामगारांना ठेऊन पगार देत पोसत नाही. तरीसुद्धा या शतकातील भांडवलीव्यवस्था बुलशिट जॉब्सची निर्मिती करतच आहे
.
yyyमोठमोठ्या कंपन्या/कार्पोरेट्स अनेक वेळा नोकऱ्यामध्ये कपात करतात. कनिष्ठ कामगारांना घरी बसवून ठेवतात. अनेक वेळा ज्यांच्या जिवावर कंपनी चालत असते तेच या नोकर कपातीचे बळी ठरतात. कंपन्या असे का करतात हे एक न सुटलेले कोडं असून याची बाहेरच्यांना अजिबात कल्पना येत नाही. गंमत म्हणजे या नोकरकपातीत कागदी घोडे नाचविणारे मात्र नेहमीच सुरक्षित राहतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यात भरही पडते. 50-60 तास काम करत असल्याचा दावे ते करत असतात. कीन्सच्या भविष्यवेधाप्रमाणे ते आठवड्यातील फक्त 15-20 तास काम करतात व इतर वेळ कुठल्यातरी शिबिराचे, कार्यशाळेचे व्यवस्थापन करण्यात किंवा तत्सम ठिकाणी हजेरी लावण्यात खर्ची होतो. नाही तर स्वतःची प्रतिमा उजळवणाऱ्या गोष्टीत वाया घालवला जातो
.
असे का घडत असावे?
याची कारणं अर्थशास्त्रात शोधण्यापेक्षा नैतिकतेत व सत्ताकारणात शोधायला हवेत. सत्तेत असलेल्या वर्गाला स्वतंत्रपणे विचार करणारा बुद्धीजीवी वर्ग धोकादायक वाटतो. त्यामुळे या धोकादायक वर्गाला कुठे ना कुठे तरी गुंगवून ठेवल्यास त्यांची सत्ता अबाधित राहू शकते, असे सत्ताधाऱ्यांना वाटते. त्याचप्रमाणे बुद्धीजीवी वर्गाला आपण (देशासाठी) काही तरी करत आहोत याची खुमखुमी असते. परंतु त्यासाठी शेतकऱ्याप्रमाणे उन्हा-तान्हात, धोधो पावसात कष्ट करण्याची तयारी नसते. त्यामुळे मानसिक समाधानासाठी व सत्तेतल्यांचा रोश ओढवून न घेता बुद्धीजीवी वर्ग असल्या बुलशिट् जॉब्समध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो. संगनमताने गले लट्ठ पगार घेतो. व हा पैसा कुणाच्यातरी घामातून आपल्याकडे येत आहे व आपण स्वतःला फसवत आहोत याबद्दलची अपराधी भावना मनात न आणता आल् इज वेल् म्हणत आयुष्य जगतो. अशा प्रकारे या वर्गाची नैतिकता, कार्पोरेटचे धोरण व सत्तेत असलेल्यांची खेळी हे सर्व परस्परांना पूरक ठरतात. त्यामुळे भांडवलशाहीचा उंच मनोरा अजूनही टिकून आहे. त्यामुळे पिढ्यान पिढ्या सुतारकाम केलेल्यांना येथे मासे तळण्याचे काम करावे लागते. या उलट ज्यांना सुतार काम येत नाही व शिकून घेण्याची इच्छा नाही त्यांना फर्नीचर बनविण्याच्या कामाला जुंपलेले असते. त्यामुळे मासेही करपून जातात व फर्नीचरही धड तयार होत नाही. तरीही व्यवस्था तशीच टिकून असते. तळलेली मासे खाल्ले की नाही खाल्ले वा फर्निचर धड असले तरी वा नसले तरी कुणाला त्याचे देणे घेणे नाही.

कदाचित नरकसदृश स्थितीचा अनुभव आताचा हा समाज घेत असावा.
समाजाच्या अशा (दु)स्थितीबद्दल कुणी काही बोलू वा लिहू लागल्यास तथाकथित शहाणे तुम्हाला याच्यातले काय कळते? कुठला रोजगार योग्य व कुठला अयोग्य हे सांगणारे तुम्ही कोण? योग्य म्हणजे नेमके काय? तुम्ही इतरांच्या नैतिकतेत लुडबुड करू नका, आम्हाला शहाणपणा शिकवू नका. समाजाला काय हवे वा काय नको हे सांगणारे तुम्ही कोण? इ.इ. प्रकारची शेरेबाजी करत नामोहरम करतील. खऱ्या समस्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक मूल्य यावर वादविवाद होत राहतील. मूळ समस्येला व उपस्थित केलेल्या प्रश्नांना बगल देण्याचे प्रयत्न होत राहतील. एक मात्र खरे की आताच्या परिस्थितीत श्रम प्रतिष्ठेची व्याख्या पुन्हा एकदा तपासावी लागेल.

खरोखरच श्रमप्रतिष्ठेतून देशाच्या संपत्तीत आम्ही भर घालत आहोत असे ज्यांना मनापासून वाटत असेल त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेणे वा टीका-टिप्पणी करणे योग्य नसेलही. परंतु ज्यांना ते करत असलेल्या निरर्थक कामाबद्दल तिटकारा वाटतो त्यांचे काय? यातले काही ज्यांना शक्य आहे ते कंटाळवाण्या नोकरीचा राजिनामा देऊन आवडीच्या कामाचा शोध घेत आपल्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतीलही. कमी पगार घेत आपले छंद संभाळत आयुष्य काढत असतीलही. साहित्य, कला वा समाजकार्य करत कमी पैशात गुजराण करणाऱ्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. गरीबीचे चटके सहन न झाल्यामुळे पुन्हा एकदा न आवडणारी नोकरी पकडलेल्यांची उदाहरणंसुद्धा आपल्या समोर आहेत. परंतु ते आपल्या आयुष्याच्या निरर्थकतेविषयी प्रांजळपणे कबूली देतात.

मानवी समूह कुठे भरकटत आहे?
अशा प्रकारच्या गोष्टीबद्दल विचार करताना हा मानवी समूह कुठे भरकटत आहे, हा प्रश्न विचारावासा वटतो. स्वतःच्या आवडीचे काम करून आयुष्य जगण्यापेक्षा बलाढ्य बहुराष्ट्रीय कार्पोरेटमध्ये गुलामी करणे कितपत योग्य असेल, हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. गंमत म्हणजे रोजगारांच्या कार्पोरेटीकरणामुळे एक-दोन टक्के लोकांच्या हातात संपत्ती एकवटत असून आपण अजूनही बाजारीकरणाची गोडवे गात आहोत. प्रत्येक देशातील शासन व्यवस्था कार्पोरेट्ससमोर हतबल झालेली आहे, निष्क्रीय होत चालली आहे. कार्पोरेट्सची शरणागती पत्करलेले कुणीही आपण करत असलेली नोकरी निरर्थक होती/आहे असे कधीच कबूल करणार नाहीत. मोठमोठ्या पार्टीमध्ये कार्पोरेट्सचे सुटा-बुटातील गुलाम सुंदर मुखवटे चढवून आपापल्या कामाची तारीफ करत असतात. परंतु एक-दोन पेग पचवल्यानंतर हे मुखवटे गळून खरा चेहरा दिसू लागतो व सत्य काय आहे ते कळू लागते.
खरे पाहता हे एका प्रकारची मानसिक हिंसाच ठरू शकेल. श्रमप्रतिष्ठेचे गुणगान करणाऱ्यांना ते श्रमच निरर्थक वाटत असल्यास ते कुणाला फसवत आहेत? नरकाच्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे मासे तळण्यासारखी न आवडलेली वा न जमणारी कामं करणारे कालांतराने इतरांचा द्वेष करू लागतात किंवा स्वतःच नामशेष होण्याचा विचार करू लागतात. समाजोपयोगी व आवडीने काम करणारे काही जण तुटपुंज्या पैशावर जगतात व इतर त्यांच्या जिवावर मौजमजा करत असतात.

या प्रकारे अनावश्यक कामाच्या रगाड्यात स्वतःला जुंपवून घेण्यात काय धन्यता असते हेच कळत नाही. जर अशा प्रकारची बुलशिट् जॉब्स करणारे जगातून नाहिसे झाल्यास काय होईल? शेतकरी, भाजिपाला विक्रेते, छोटे/मोठे दुकानदार, शिक्षक/शिक्षिका, नर्सेस/डॉक्टर्स, गोदी/माथाडी कामगार, ड्रायव्हर्स, मशीन ऑपरेटर्स, इ.इ. माणसं नष्ट झाल्यास जगाचे व्यवहार ठप्प होतील, याचा आपण अंदाज करू शकतो. शेती व्यवसाय, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, संवाद यंत्रणा, यासारख्या जीवनावश्यक यंत्रणा कोसळल्यास मध्ययुगातील जीवनासारखे आपल्याला जगावे लागेल. कार्पोरेट्स वा कंपन्या मानवी सोई-सुविधांना पूरक उत्पादन करत असल्यास त्यांचे स्वागतच होईल. परंतु एखाद्या कंपनीतील काही अनावश्यक पदं रद्द केल्यास आभाळ कोसळून पडणार नाही. कंपनीतील अतिरिक्त मिडल् मॅनेजर्स, अर्थविषयक/गुंतवणुकीचे सल्लागार, वकीलांची फौज, लॉबिंग करणारे दलाल, हे घ्या, ते घ्या म्हणून फोनवरून त्रास देणारे टेलीमार्कर्स, इ.इ. नसल्यास जगाच्या दैनंदिन व्यवहारांना काही धक्का बसणार नाही. गंमत म्हणजे अशाच लोकांचे हे जग हे या भ्रमात आपण जगत आहोत.

photo 1कदाचित हाच भांडवलशाहीचा गाभा असावा. म्हणूनच भांडवलशाही भरभराटीला येत आहे. आताच्या कामाचे स्वरूप अर्थसत्ता एकवटण्यास पोषक ठरत आहे. विचार करू शकणाऱ्यांना फालतू कामात गुंतवून विचारशक्तीचे खच्चीकरण केले जात आहे. कारण माणसं विचार करू लागल्यास सत्तेला सुरुंग पडण्याची शक्यता जास्त. त्यामुळे कुठल्यातरी बुलशिट् जॉब्समध्ये त्यांना गुंतवून प्रचंड नफा कमवण्याचा उद्देश यात असावा.

शेतकऱ्यांचा मोर्चा शहरात आला की वा किंवा कामगारांनी बंद पुकारल्यास शहरातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमं एकजुटीने शहराचे व्यवहार ठप्प झाले म्हणून आरडाओरडा करत मोर्चा/संपाच्या विरोधात मुद्रित माध्यमात रकानेच्या रकाने भरतात; टीव्हीवर तासन् तास रटाळ चर्चेचे गुऱ्हाळ चालवत गरळ ओकतात. परंतु हेच शेतकरी शेतात काम करण्याचे सोडून दिल्यास काय स्थिती होईल याचा कधीतरी विचार केला जातो का? वाहतूक व्यवस्थेतील कामगार काम करण्यास नकार दिल्यास काय स्थिती होईल याची कल्पना करता येईल का? शिक्षकाने शिकवणे सोडून दिल्यास आपल्या पाल्यांचे काय होईल याचा विचार कधी केला आहे का? कार्पोरेट व्यवस्थेतील मिडल् मॅनेजर्स निर्मिती करत नाहीत, हे लक्षात आल्यास बुलशिट् जॉब्सची संख्या कमी होत जाईल असे वाटते. आपला रोजगार निर्मितीक्षम असावा व त्यात समाधान मिळणारा असावा. कागदी घोडे नाचवणारा वा सायबर कूली टाइप नसावा एवढीच माफक इच्छा. आताची रोजगार यंत्रणा सर्वांचेच हित जपणारी नाही एवढे समजले तरी यात सुधारणा होऊ शकेल अशी आशा धरता येईल. आपल्याला आवडो न आवडो, बऱ्या वाईट तंत्रज्ञानाची भर पडतच राहणार. कुठले तंत्रज्ञान स्वीकारावे व कुठल्या तंत्रज्ञानाला नकार द्यावा हे बाजार ठरवत असल्यामुळे आपल्याला फक्त आपल्यापुरतेच बघण्याची मुभा राहणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव इत्यादीशी संबंधित असणाऱ्या तंत्रज्ञानातील घोडदौडीचा अंदाज घेतल्यास पुढील काळात शेती, बांधकाम, मायनिंगसारख्या अतीश्रमाची कामे यंत्रमानवावर सोपवले जातील व कमीत कमी मानवी सहभाग यात असू शकेल.

युटोपियन स्थिती?
प्रगत तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात मानवी हस्तक्षेपाविना आहारधान्य पिकवेल व जगातील प्रत्येक माणूस रोज पोटभरून जेवू शकेल. त्यामुळे कदाचित पर्ल बकच्या गॉड्स मेन या कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे ज्याप्रकारे हवा, पाण्यासाठी माणसांना कुठलेही कष्ट करावे लागणार नाही. आहार पदार्थासाठीसुद्धा पुढील काळात मानवी समाजाला श्रम करण्याची गरज भासणार नाही. 16व्या शतकातील थॉमस मूर याच्या युटोपिया कादंबरीत अशाच एका आदर्श समाजाचे वर्णन असून त्यात समाजातील प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे काम करून न घेता काही ठराविक रक्कम सरकार देत होते.

या सरकारकडे एवढा पैसा आला कुठून किंवा ते सरकार कुठली संसाधनं विकून पैसे उभी करत होती किंवा ही संसाधने कोण विकत घेत होते किंवा समाजाच्या या नंदनवनसदृश स्थितीसाठी इतर किती समाजांचे शोषण होत असेल हे प्रश्न बाजूला ठेवून विचार केल्यास अशा प्रकारच्या युटोपियन स्थितीबद्दल काही भविष्यवेत्ते विचार करत आहेत. त्यांच्या मते यापुढील बिजिनेस् मॉडेलमध्ये समाजाचे संतुलन संभाळण्यासांठी पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येकाला वैश्विक आधारमूल्याची (Universal Basic Income) सोय करावी लागेल. तंत्रज्ञानामुळे अटळ ठरलेल्या बेरोजगारीवरील उपाय म्हणून याचा स्वीकार करावा लागेल. वैश्विक आधारमूल्य दिल्यास स्वयंचलित (आटोमेशन) तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बेरोजगारीवर मात करता येईल. आताच कमी रोजंदारीवर काम करणाऱ्यापैकी 83 टक्के आटोमेशन तंत्रज्ञानामुळे बेकारी अनुभवत आहेत. कुशल कामे करणाऱ्यांच्यात 31 टक्के बेकार आहेत. त्यामुळे वैश्विक आधारमूल्याला पर्याय नाही, असे तज्ञांचे मत आहे. काहीही काम न करता बेकार भत्ता दिल्यासारखे वैश्विक आधारमूल्य दिल्यामुळे अराजकता माजेल, लोक व्यसनावर पैसे उधळतील, इत्यादी आक्षेप घेतले जातील. परंतु तसे काही होणार नाही असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत. किमानपक्षी आताच्या दृश्यस्वरूपातील उपासमार व विषमता तरी काही प्रमाणात नष्ट होईल, असे त्याना वाटते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानातसुद्धा कुशलतेला भरपूर वाव आहे. प्रभावी अल्गॉरिदम लिहिणे, विशिष्ट तंत्रज्ञानातील बारकावे समजून घेऊन त्यावर भाष्य करणे, प्रचंड स्वरूपात संग्रहित केलेल्या डेटाचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढून उत्पादकता वाढवणे इ.इ. खरोखरच समाधान देणारी कामं आहेत. कदाचित बुलशिट् जॉब्सचा ज्यांना तिटकारा आला आहे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारून अशी कौशल्ययुक्त काम करत असल्यास बाजार व्यवस्थेतील समाजसुद्धा याचे स्वागत करेल.
सदर्भ

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.
वयाची पंचेचाळीशी खुणावत असल्यामुळे ह्यातले बहुतांशी प्रश्न व्यक्तिगत पातळीवरही तितकेच महत्वाचे ठरतायत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाची सत्तरी खुणावत असल्याने मलाही आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील मुद्दे तर खोडता येत नाहीत पण अस्वस्थ तर व्हायला होते - असे झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0