<आइस्क्रीमवाले गंजे अंकल..>


प्रेरणा

आमच्या हाउसिंग कॉंप्लेक्सच्या बाहेरचं एक छोटंसं हॉटेल.

हॉटेलात मराठी मध्यमवर्गाला आवडणाऱ्या सर्व शाकाहारी गोष्टी मिळतात. म्हणजे इडली, वडे, डोसे सारखे दाक्षिणात्य; पनीर मटर, रोटी सारखे उत्तरेकडचे; गोबी मांचुरियन, व्हेज फ्राइड राईससारखे तथाकथित पौर्वात्य आणि पावभाजी, भेळ सारखे दिशाहीन पदार्थ. अर्थात थालिपीठ, साबुदाण्याची खिचडी, पोहे वगैरे मिळत नाही, पण बहुधा मराठी मध्यमवर्गाचं त्यावाचून अडत नसावं, कारण कधीही गेलं तरी भरपूर गर्दी असते.

मी एकटाच हाटेलात हादडून आलो असं सांगितलं तर अर्धांग उगाच पिडत बसेल. म्हणून फोन लावला. 'आत्ता भलत्या वेळी खाऊन घ्यायचं आणि मग नीट जेवायचं नाही. डॉक्टरांनी पथ्य सांगितलं आहे ते पाळायला नको' वगैरे अपेक्षित तक्रारी मुकाट्याने ऐकून झाल्यावर विचारलं

"तुझ्यासाठी काय घेऊन येऊ?"
"चला आठवण तरी झाली. नशीब माझं."
"एवढं प्रेमाने विचारतोय तर तिरक्यात का शिरत्येस?" बोलून गेलो आणि चूक लक्षात आली. मग थोडा वेळ 'घरी येऊन आपण दोघं गेलो असतो तर काय भोकं पडली असती का? की मी बरोबर असल्यामुळे तरुण पोरींवर इंप्रेशन वाईट झालं असतं का?' वगैरे बोलणं ऐकून घ्यावं लागलणार हे लक्षात आलं. मी फोन लांब ठेवला. आवाज संपल्यावर म्हणालो
"बरं, घेऊन येतो माझ्या मनाप्रमाणे काहीतरी"

इतका जुनाट संसार असला की सगळे तिढे सुकून घट्ट झालेले असतात. एखाद्या कोवळ्या रोपट्याला वाकवून ठेवलं, तर पुढे त्याचं खोड वेडंवाकडं व्हावं तसंच. ते पिळले तरी ढिम्म फरक पडणार नव्हता. मग मी वयोपरत्वे आलेल्या विसरभोळेपणाचं नाटक करण्याचं ठरवून खुशाल तिच्यासाठी वडा सांबार पॅक करून मागवला. कदाचित तिला तो आवडतही असेल. कोण जाणे.

माझ्यासाठी मस्त एसबिडिपी मागवली. माझ्यासारख्या कष्टमरासाठी मालक स्वतः गल्ल्यावरून उठून येतो. कारण हे हॉटेल काढलंय ते माझ्याच पैशावर. त्याचं आधी छोटंस केमिस्टचं दुकान होतं. अजूनही आहे, पण पोरगा चालवतो. गेली अठरा वर्षं मी भरलेल्या बिलांचा हिशोब केला तर हॉटेल आणि त्याचं नुकतंच केलेलं रिनोव्हेशन सगळं माझ्या खात्यातूनच सहज आलं असावं. नवीन डेकोर म्हणजे काय, तर भर लख्ख उन्हातही अंधारलेले मंद दिवे. हॉटेलच्या आधुनिक डेकोरेशनसाठी जागोजागी ठेवलेली बाभळीची झाडं. खुर्चीवर बसताना डोक्याला काटे लागतील असं सारखं टेन्शन.

"हॅ हॅ हॅ. कसा काय शेट? मजामा?"

मराठी लोकांना शेट म्हणत म्हणत या गुजरात्यांनी इमले उठवले. पण ऐकून कुठेतरी आत बरं वाटतं हे मात्र खरं.

"हा. काही विशेष नाही"
"डायबिटिस, ब्लड प्रेसर कंट्रोलमधी हाय ना?" त्याचा आवाज पूर्वीप्रमाणेच खणखणीत. आसपासच्या टेबलांनी कान टवकारल्यासारखं मला उगीचच वाटलं.
"हम्म्म" मी तोंडातल्या तोंडात म्हटलं. आणखीन कशाकशाविषयी त्याला असलेली माझी खाजगी माहिती जाहीर करतोय या भीतीने माझं कंट्रोलमध्ये असलेलं ब्लडप्रेशर साट्कन वाढलं. काही क्षण थोड्याशा अनकंफर्टेबल शांततेत गेल्यावर त्याने उगाच पोऱ्याला ओरडून बोलवून स्वच्छ दिसणाऱ्या टेबलावर एक गलिच्छ फडका मारायला लावला. तेवढ्यात एसबिडिपी आली, आणि तो मला माझ्या समोरच्या पूर्णब्रह्माबरोबर एकटं सोडून गेला. पहिली पुरी तोंडात कोंबली. पूर्णब्रह्म अंतरात्म्यात विलीन झालं. डायबिटिस, ब्लडप्रेशरच्या आठवणीने मनात आलेली सगळी गिल्ट वाऱ्यासवे उडाली.

चौथ्या पुरीच्या आसपास ती दिसली. आणि माझ्या मनात पंधरा वर्षांपूर्वीचं वादळ पुन्हा उभं राहिलं.

मला आठवला तो फ्रीझरमध्ये घुसणारा इवलासा हात. चॉकोबार उलटसुलट करून न्याहाळणारा. तिच्या स्वप्नांना गवसणी घालायला अपुरे असलेली तिच्या हातातली दहा रुपयाची नोट. किंचित चुरगळलेली. जीभ फिरवून फिरवून सुकलेले ओठ. आणि 'बीस से स्टार्ट' ऐकून खट्टू झालेला चेहरा.

चौथी एसबिडिपी घशात अडकल्यामुळे आवंढा आल्यासारखं झालं. पण तेवढंच कारण नव्हतं...

'अमुक की याद आती है, तमुक की याद आती है,
जिक्र होते ही नौजवानी का, कुछ खयालों की याद आती है'

हा शेर मला अर्धवट का होईना, पण आठवला. त्यावेळी काय झालं होतं? घटना तशी मामूलीच. तिला आइस्क्रीम हवं होतं, मी ते देऊ धजलो नाही, इतकंच. मनात इच्छा होती - पैसे दिले असते तर मला आनंद झाला असता आणि तिलाही. ती त्यावेळी सहा वर्षाची आणि मी तिचा अंकल शोभावा असा, माझाही मुलगा तिच्याच वयाचा. त्यामुळे आठवणी आहेत त्या फक्त खयालांच्या. न जमलेल्या कृतीच्या. आणि ते खयाल मांडल्यावर संस्थळांवर झालेल्या जोशपूर्ण चर्चांच्या.

अनेकांचं मत होतं की मी जे केलं ते बरोबरच होतं. अनोळखी मुलीला कितीही चांगूलपणाने आइस्क्रीम ऑफर केलं तरी त्यामुळे तुमची प्रतिमा अकारण डागाळण्याची शक्यता असते. इतकंच नव्हे तुमच्या चांगूलपणावर विश्वास ठेवून ती इतरांवरही अशी विसंबली तर धोका होण्याची शक्यता आहे. काय करणार. कलयुग म्हणायचं, एक सुस्कारा सोडायचा आणि सोडून द्यायचं.

पण काहींनी असंही म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही उत्स्फूर्ततेनं जगता तेव्हा विचार करण्याची जरूर भासत नाही. फक्त हेतू शुद्ध लागतो. पटलंही होतं आणि नव्हतंही. माझं नेहमीच असंच होतं. सर्वच गोष्टींचा मी सांगोपांग विचार करतो. आणि मग धड ना या काठाला धड ना त्या काठाला असा प्रवाहपतीतासारखा वाहतो. दिलसे मला वाटत होतं की आइस्क्रिम द्यावं पण दिमागसे निर्णय घेतल्यानं मी मागे फिरलो.

मी पुन्हा तिच्याकडे बघितलं. माझ्यापासून वायव्येला बसली होती. आमच्या मध्ये एक टेबल. रिकामं. देखणी होती. चुणचुणीतही वाटत होती. वयाने माझ्याच मुलाएवढी. म्हणजे एकवीसच्या आसपास. तिने अजून कॉफीपलिकडे काही मागवलं नव्हतं. किंवा मागवलं असलं तरी ते अजून आलं नव्हतं. पण ती आपल्या फोनवर काहीतरी टकटक करण्यात गर्क झाली होती. अंगावर टाइट टॉप... छान दिसत होता. अर्धपारदर्शक...

"और कुछ लावू साब?" वेटरच्या पृच्छेने माझी तंद्री भंगली.

"आं? नही नही. बिल लाव" मी काहीसं भांबावून म्हटलं.

त्याने माझी प्लेट उचलली आणि गेला. मग त्याच्यापाठोपाठ तो पोऱ्या आला आणि पुन्हा ते कळकट फडकं फिरवून ते टेबल एव्हाना स्वच्छ वाटत असलं तरी घाणेरडंच आहे याची आठवण करून दिली. पण कलयुगात असं व्हायचंच असं स्वीकारून मी लक्ष पुन्हा त्या मुलीकडे वळवलं. तसंही टेबलाकडे बघायचं का तिच्याकडे यात तिच्याकडे बघण्याचा पर्याय जास्त आकर्षक होता. मग पुन्हा माझ्या मनातली विचारांची वादळं सुरू झाली.

जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं. साधा रस्ता देखील गर्दीच्या वेळी क्रॉस करू की नको असं वाटलं तर थांबणं सोयीचं होतं. खरेदीच्या वेळी देखील घेऊ की नको असं वाटलं तर सरळ 'न घेणं' उपयोगी होतं. याच एक साधं कारण आहे, तुम्ही मनाच्या चकव्यात सापडत नाही कारण मनच तुम्हाला एखादी गोष्ट करायला भरीला घालतं आणि मग पश्चाताप करायला लावतं. द बेस्ट सोल्युशन इन कन्फ्युजन इज टू ड्रॉप द डिसीजन. हेच गेल्यावेळी केलं होतं. आणि मग एका अनोळखी नात्याचा गळा घोटत असल्याचं फीलिंग आलं त्याचं काय?

आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला दोन पर्याय दिसतात. एक सोपा एक कठीण. दर वेळी सोपे निर्णय घेण्याची आपली प्रवृत्ती असते. पण त्या सोपेपणात त्या 'रोड नॉट टेकन' बद्दल स्वतःलाच दोष देण्याची किंमत गृहित धरलेली नसते. ते काही नाही. इतकी वर्षं दिमागसे निर्णय घेऊन कुठच्याही गुंत्यात अडकू नये अशी व्यवस्था केली. आज निर्णय दिलसे घ्यायचा.

"आपका बिल" वेटरला मी काहीतरी गहन विचारात पडल्याचं जाणवलं असावं. तो क्षणभर थांबला. माझ्या नजरेच्या रेषेत पाहिलं. आणि पुन्हा माझ्याकडे पाहिलं. काहीतरी उमजल्यासारखा त्याचा चेहरा खरोखरच झाला की मला तसा भास झाला? मी पैसे ठेवायला हात पुढे केला आणि थांबलो. हाच तो क्षण. साक्षात्काराचा. सिद्धार्थाला कुठल्यातरी वृक्षाखाली साक्षात्कार झाला, मला बाभळीच्या झाडाखाली. पण जातकुळी तीच. मागच्यावेळी मी पैसे देण्यासाठी पुढे केलेला हात मागे घेतला. आता ती चूक दुरुस्त करण्यासाठी हात मागे घेतला.

"सुनो. आइस्क्रीम है?"

"हां. कौनसा चाहिये?"

"चॉकोबार." माझ्या तोंडून ताबडतोब शब्द निघाले. "और सुनो. दो लेके आना. एक मेरे लिये, और एक उस टेबल पे बैठे हुए लडकी के लिये. और उससे कहो, की मै बहुत दिन से उसे आइस्क्रीम देना चाहता हू" आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर चमत्कारिक भाव उमटण्याबद्दल भास होण्याचा प्रश्नच नव्हता. पण टु हेल विथ इट. दिलसे निर्णय घेणारांकडे जग असंच चमत्कारिक नजरेने बघतं. तशा नजरा येऊ नयेत यासाठी इतकी वर्षं धडपडलो. ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीत, समाजात, वेटरांमध्ये... हेल विथ इट ऑल. इतक्या वर्षांनंतर आता तरी मला दिलसे जगायला मिळायला हवं.

हा निर्णय घेतल्यावर मला खूप हलकं हलकं वाटायला लागलं. अरेच्च्या हे वाटलं होतं तितकं अवघड नव्हतं तर. आतापासून ठरवलं. बास! असंच मोकळं जगायचं. बायकोच्या पिरपिरीचा त्रास होतो तेव्हा खुशाल सांगायचं की गप्प बस नाहीतर मी बाहेर जातो मित्रांच्यात पत्ते कुटायला. खरं तर त्यांनाच बोलवून घ्यायचं. बायको कटकट करते म्हणून आपण तेही स्वातंत्र्य मारलं. सुरूवातीला मित्रांकडे बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणून चिडवलो गेलो. आता करुणेपोटी ते काहीच बोलत नाहीत, ते आणखीनच टोचतं. हे सगळं बदलून टाकायचं. आपल्या आयुष्याची ही नवीन इनिंग. आजच्या दिवसाचा पहिला बॉल बाउन्सर. एरवी सराइताप्रमाणे डक केला असता. पण नाही. आज खंबीरपणे उभा राहिलो आणि हुक करायचं ठरवलं. भले शाबास.

विचार चालू असताना वेटर आइस्क्रीम घेऊन आला. मी रॅपर उघडून आइस्क्रीम चोखायला सुरूवात केली. अहाहा. किती दिवसांनी खात होतो चॉकोबार. त्या थंड गोठलेल्या चॉकोलेटवरून जीभ फिरवताना आनंदाच्या लहरी शरीरभर पसरल्या. डायाबिटिस गेला खड्ड्यात. बाउन्सरला ताठ उभं राहून हुक.

वेटर तिच्या टेबलाकडे गेला. एव्हाना तिची कॉफी पिऊन झालेली होती. बहुधा निघायच्या तयारीत असावी. कारण नाइलाज झाल्याप्रमाणे फोन पर्समध्ये ठेवत होती. वेटरने प्लेट समोर ठेवली. तिने प्रश्नार्थक बघितलं. त्याने हलकेच काहीतरी सांगितलं. त्यातलं माझ्याकडे मान वळवतानाचं 'गंजे अंकलने भेजा...' इतकंच ऐकू आलं. अजूनही काहीतरी बोलला. तिने माझ्याकडे एक चमत्कारिक कटाक्ष टाकला. मी तिला चॉकोबार चाटत चाटत एक स्माइल दिलं. हात वर करून हाय म्हटलं. तिच्या चेहऱ्यावरचे चमत्कारिक भाव अजूनच वाढले. काही पर्वा नाही. मी माझ्या दिलसे निर्णय घेतला होता. लोकमताचा विचार न करता, आपल्याला वाटलं, आपला हेतू शुद्ध होता, आपण आइस्क्रीम दिलं, प्रश्न संपला. पुढे काय होईल ते तेव्हा बघू.

तिने काहीही न बोलता टेबलावर पैसे टाकले आणि ताडकन उठून निघून गेली. मीही नोट टाकली. वडासांबारचं पॅकेज विसरून तिच्यामागे गेलो. बाहेर बघतो तर ती एका तरुणाबरोबर उभी होती. त्याचीच वाट बघत कॉफी पीत थांबली असावी. त्याला काहीतरी तावातावाने सांगत होती. त्यातलं फक्त "यक्क... सो क्रीपी" एवढं ऐकू आलं. तेवढ्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती थबकली. ते पाहून त्या तरुणानेही माझ्याकडे वळून बघितलं. आमची दृष्टादृष्ट झाली.
_____

एकंदरीत काय दिलसे घेतलेला निर्णय दिलालाच भारी पडला. माझ्यासाठी अक्षरश:. आता मी नुकताच आयसीयूतून बाहेर पडलो आहे. जगण्यासाठी ज्या गोळ्या लागायच्या त्यात बरीच भर पडलेली आहे. तेव्हा लवकरच केमिस्ट पोरगाही आपलं नवीन हॉटेल काढणार याची खात्री आहे. कॉंप्लेक्समधल्या लोकांच्याही चेहऱ्यावर ते विचित्र भाव दिसायला लागलेले आहेत. त्याची हळूहळू सवय होते आहे. सवयीपेक्षा ते टाळण्यात मी तरबेज होत चाललेलो आहे. नातेवाइकांमध्ये हे प्रकरण षट्कर्णी झाल्यामुळे त्यांच्यात फार मिसळत नाही. ऑफिसमधूनही व्हीआरेसचं पॅकेज जरा गरजेपेक्षा लवकरच स्वीकारलं. कॉंप्लेक्समध्ये दिवसाढवळ्या फार बाहेर पडत नाही. मराठी संस्थळावर पडीक असतो. इथे कोणीच क्रीपी नाही.

बायकोही 'कुठल्यातरी पोरीवर भाळलात आणि माझा वडासांबार विसरलात' हे ओठांवर बाळगून आहे, पण बोलत नाही. त्यावेळचा माइल्ड होता, पण अजून मोठा हार्ट अॅटॅक येईल की काय या भीतीने बहुतेक. पण माझ्या मुलाच्या दिलाला खरंच हा निर्णय भोवला. आपली हातातोंडाशी आलेली गर्लफ्रेंड हातची गेली म्हणून तो खचून गेलेला आहे. सगळ्या कॉंप्लेक्सभर आणि पंचक्रोशीतल्या कॉलेजातल्या पोरींमध्ये उगाच त्यालाही "क्रीपी" हा शब्द चिकटला आहे. फेसबुकावरही काहीतरी टोमणे मिळाले त्याला म्हणे.

एक नवीन नातं फुलवण्यापायी आयुष्यभर कष्ट करून जपलेली नाती चमत्कारिक झाली. तिशीच्या शेवटीशेवटी जे 'बिकट वाट वहिवाट नसावी' हे शिकलो होतो ते पन्नाशीत विसरून गेलो. म्हणून म्हणतो बाबांनो, तो रोड नॉट टेकन घेताना जरा विचार करा.

असो. मी भेटतच राहीन तुम्हाला इथे, तिथे आणि इतरत्रही. तसा मला आता काहीच उद्योग नाही.

(श्रेयअव्हेर - मिपावर व मनोगतवर प्रसिद्ध झालेल्या काही प्रतिसादांचे अंश लेखात वापरलेले आहेत.)

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (10 votes)

प्रतिक्रिया

अपवाद फक्त गेल्या संक्रांतीला गच्चीवर जाऊन बसली होती. म्हणे की तीला पतंग उडताना बघायला खूपच आवडतं.

चढाओढीनं चढवित होते,
ग बाई मी पतंग उडवीत होते
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बबन्या, काल काय कॅसेट झाली कळ्ळं का? नाय? काढ येक बिडी काढ. भें**, तुला सांगतो, ह्ये झंटलमन लोकं पन लई इपितर अस्तात बे! त्या समोरच्या सोसायटीतल्या म्हातार्‍यानी लई मोठी काशी केली काल हाटेलात. अरं त्यो नाई काऽऽ, त्या रावडी रब्दानाच्या बरुबर थाप लागलेल्या टुकलीवानी फिरत असतोऽऽ. अर्रे, आपल्या करिनाच्या छाव्याचा बाऽऽप. Wink हांऽऽ आता बरोबर कळ्ळं तुला साल्या. तुला सांगतोऽऽ, शप्पत यवढं बाराचं बेनं असंल असं वाटलं नव्हतं कधी. आपली करिना बसली व्हती छाव्याची वाट बघत काफी पीत अन त्येवाच हे आलं बेनं. मला वाट्लं आज लफडं पकडनार पोराचं. शेट्नी पन लगीच मला उगंच फडकं मारायला लावलं अन त्यानं मागवली एसबीडीपी न्हेमीसारखी. न्हेमी आलं तर कधी मान वर करून बघत नाई पन आज दोन-चार पुर्‍या खाल्ल्यावर काय चळ लागला त्याला यकदम कोन जाने? अंगात कलिच शिर्ला जनू. आपल्या करिनाकडंच बगून लागलं ना लाईन मारायला! भें** स्वताच्याच पोराच्या छावीवर लाईन मारतंय बगून मला तं रडावं का हसावं समजंना झालं. हे लोकं साले मन मारून जगतात आयुष्यभर अन मंग उताराला लागले की नको त्या इच्छा नको तशा भायेर यायला लागतात यान्च्या तुम्बलेल्या गटारीवानी. च्यायला ह्यान्च्या पेक्षा आपन बरे, का रे भो?
त्याचं खाऊन झाल्यावर म्हशानी त्याची पिलेट उचलून नेली तरी ह्याची नजर तिकडंच लागलेली. मी फडकं मारायला गेल्तो तवा माज्याकडं रागानी बगायला लागला. मनात म्हन्लं, "भाड्याऽऽ, पोरीकडं बगून लाळ गाळतोयस म्हनून ट्येबल पुसावा लागतोय सारखा". नंतर तं लई जोर चढला त्याला. म्हशाला म्हन्ला चोकोबार हाय का? आन मागवले दोन चोकोबार. येक घेतला स्वताला आनि दुसरा म्हशाला सांगितला करिनाला निऊन द्यायला. म्हशा येकदम चाट! दोन मिन्टं बगतच बसला म्हातार्‍याकडं. मंग शेवटी गेला आनि चोकोबार करिनाकडं दिऊन म्हन्ला,"हे सायबांनी दिलंय चोखायला." ख्या: ख्या: ख्या: ख्या:. म्हशा पन ना.... अशी भनकली ती तुला सांगतोऽऽ. कोनी दिला म्हनाली. म्हशानी बोट दाखवलं. तिनी तिकडं पाह्यलं तवा म्हातारा आपला अर्धा चोकोबार तोंडात घालून ट्येबलावर लाळ गाळत चोखतोय. ती बघ्तिय बघून वर तिला हात करतोय. अशी रागानी लाल्लाल झाली.. मला वाटलं आता धुनार म्हातार्‍याला तिथंच. पन नाई..ताडताड चालंत गेली भायेर. म्हातारं पन निवांत काही झालं नाई असा आव आनत बिल दिऊन गेलं भायेर. मला वाट्लं आता तमाशा व्हनार म्हनून मी बी गेलो त्याच्या मागून भायेर. भायेर जाऊन बघ्तो तं म्हातारं आडवं पडलेलं अन त्याचा पोर्गा डोक्याला हात लाऊन त्याच्याबाजूला बस्लेला. ख्या: ख्या: ख्या: ख्या: आख्ख्या सोसायटीत चव घातली म्हातार्‍यानी. करिनानी छाव्याला थर्ड मारला म्हने. मारनारच व्हती. इत्के दिवस निस्ता फिरवला त्याला. कदी हात बी लाऊ नाय दिला आनि त्याची बी कदी हिंमत नाय झाली. असलं पोरगं अन असला बाप. ख्या: ख्या: ख्या: ख्या: काढ आजूक येक बिडी काढ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"भाड्याऽऽ, पोरीकडं बगून लाळ गाळतोयस म्हनून ट्येबल पुसावा लागतोय सारखा"

हे तर भारीच. एकंदरीतच फडकेवाला पोऱ्याचा बाज भारी आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालेजातले दिवस आठवले राव! एकदम ब्येष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कडक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार हसले ROFL

नको त्या इच्छा नको तशा भायेर यायला लागतात यान्च्या तुम्बलेल्या गटारीवानी.

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा कामतांच्या शामशी बोलत जरा उभी होते. नजर हलत नव्हती त्याची माझ्या चेहर्‍यावरुन अन ... शिव शिव शिव! आता चाळीशीतही मी दिलखेचक दिसते यात त्याची तरी काय चूक म्हणा .... वयच आहे त्याचं.

गप्पांना जरा कुठे रंग भरत होता, अन ही ढालगज भवानी नेमकी तेव्हाच कडमडली अन शामला इम्प्रेस करायला चीप जोक मारु लागली. अस्सा राग येतो ना तिचा. पार्श्वभागावर सणसणीत लत्तप्रहार करावासा वाटतो. माझ्या सुलुच्याच वयाची पण एकेक नखरे बघा फक्त. तंग कपडे काय, मेकअप काय ते पापण्या फडफडवणं काय ....चीप हो चीप असं वागणं. आम्ही नाही असली थेरं केलीत ते. संधीच कुठे होत्या म्हणा ..... सगळं सप्रेस्ड! Sad

मात्र नंतर जो प्रसंग घडला तो केवळ विलक्षण होता. ही आल्यावर मी अनिच्छेनेच काढता पाय घेतला अन आत हॉटेलात गेले तो कामत हादडत बसले होते. शोभतं का या वयात चमचमीत खाणं? येडं मला पाहून आधी बावचळलं मग सावरलं मग काही बोलणार तोच ...... शाम काय आत आला , आपल्याच वडलांना लाफे काय लावले, पाडलं काय काही विचारु नका. काय तूफान डॅशींग दिसला. त्या दिवशी कीर्तनात लक्षच लागलं नाही. राहून राहून द्रोपदीचे अन तिचे पाच .... असो!!

हं तर कुठे होते मी - नंतर कळलं हा नतद्रष्ट म्हातारा त्या भवानीवर लाइन मारत होता. तुझ्या पीढीतल्या बायका मेल्या का रे आँ? या वयात पुरुष असे बहीसटतात अन स्वतःच्या सोन्यासारख्या बायकोकडे दुर्लक्ष करतात म्हणून हो म्हणून आम्ही भजन-कीर्तनाच्या नादी लागतो अन देव देव करतो. तसंही चाळीशी ओलांडल्यावर आमच्या ह्यांचं मेलं लक्षच उडालय माझ्यावरुन. हांआता मी धरलय थोडं बाळसं पण हे काय कारण झालं का पेप्रात तोंड खुपसून बसायचं? Sad एखादा रसिक म्हणाला असता "नाऊ आय हॅव्ह मोअर दॅन अ हँडफुल" Wink पण या बावळटांच्या तोंडून कधी एक कौतुकाचा शब्द बाहेर पडेल तर शप्पत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांनी काय कल्पनाविलास केला आहे वा!!!! अफाट मजा येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं म्हंजे कैच नै आवडलेलं. कधी एकदा संपतंय असं वाचताना झालवतं. पण आता ९५ ९५ लोकांनी डोक्यावर घेतलं उचलून तर आपणच कशाला मोडता घालायचा. म्हणून लिहून टाकलं मीपण !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एवढ्या सगळ्या लोकांचा गदारोळ बघून धाग्याचं रेटींग वाढवून पाच-तारे केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भरपूर मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गंजे अंकलने भेजा...' इतकंच ऐकू आलं. ---हा क्लायमॅक्स मस्त जमला आहे.
पुढे प्रतिसादांत 'जपमाळकथा' टाईप लिहिलेलंही चाळलं....उस्फूर्तपणे पुढे आलेली पात्र आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ पतंगाला एवढ्या शेपट्या लावणार्‍या सर्व कुशल कारागिरांना साष्टांग नमस्कार. सगळे पतंग उडवण्यात दंग असताना आम्ही मात्र,काकूंकडेच पहात होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आम्ही मात्र,काकूंकडेच पहात होतो.

कोणाच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तरांच्या 'श्यामचे मनोगत' मधल्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ धागा मी लिहिलेला आहे म्हणून नाही, तर बाकीच्या लोकांनी दंगा करून जे काही चारपाचशे चॉंद लावले आहेत त्यासाठी हा धागा वर काढतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी संस्थळावर पडीक असतो. इथे कोणीच क्रीपी नाही.

हाहाहा हे कशाला हो राघा Wink इतका वात्रटपणा केलाय ना त्या लेखात ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वर काढल्यामुळे आजची संध्याकाळ फार चांगली गेली. नाहीतर कोपर्‍यावरच्या हॉटेलात जावं लागलं असतं,............. टाईमपास करायला!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने