निरीश्वर विचार
निरीश्वर विचार

माझा अत्यंत आवडता विज्ञानकथा लेखक आय़झॅक आसिमॉव याच्या दोन अवतरणांनी सुरुवात करतेय.
एकात तो म्हणतो –
“When Stupidity is considered Patriotism, it is unsafe to be intelligent.”
“जेव्हा मठ्ठपणा म्हणजेच देशभक्ती असं समजलं जातं तेव्हा बुद्धिमत्तेचा वापर करणं असुरक्षित असतं.”
दुसरं त्याचं वाक्य जे त्याच्या फाउंडेशन या कादंबरी मालिकेतील एका नायकाच्या तोंडी आहे ते तर अजरामर आहे –
“Violence is the last refuge of the incompetent.”
“निर्बुद्ध अकुशल लोकांना हिंसा हाच अखेरचा आसरा असतो.”
आपण भारतीय निरीश्वरवादी सध्या ज्या वातावरणात जगतो आहोत त्या वातावरणात बुद्धीचा पराभव सातत्याने होतो आहे हे आपण पाहतोच आहोत. राजकीय पक्षांच्या यशापयशाबद्दल हे बोलत नाही. हे आहे रोजच्या जगण्यातल्या अनुभवांबद्दल. पक्षीय राजकारणापासून दूर असलेल्या आणि निरीश्वरवादी, विवेकी भूमिका घेणाऱ्या भारतीय व्यक्तींनाही आजकाल पंधराव्या किंवा सतराव्या शतकात युरोपात जी वागणूक मिळत होती तशी वागणूक सोशल मिडियावर मिळत चालली आहे. तथाकथित प्राचीन परंपरांचा धर्मपालनाच्या नावाखाली बिनडोकपणे उत्सव करण्यावर टीका केली की लगेच या मागास विचारांच्या झुंडी अंगावर धावून येतात. एकमेकांच्या आधाराने हिंसक शिवीगाळ करतात. कुणी नास्तिक म्हणून रोखठोक बोलले – नव्हे नास्तिक नुसते एकत्र आले तरी भयग्रस्त होऊन शिव्यांचे दळण दळू लागतात हे तर आपण सातत्याने पाहतो आहोत.
भारतीय समाजात नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणारे तत्त्वज्ञान होते तसेच ईश्वर आहे की नाही ही शंका खुलेपणाने व्यक्त करणारी नासदीय सूक्तासारखी सूक्तेही रचली गेली होती. पण संस्कृतीचा झेंडा आपणच काय तो सांभाळतो असे ज्या अविवेकी लोकांना वाटते त्यांना या कशाशी देणेघेणे नाहीच.
देव मानत नाही म्हणजेच देशद्रोही, अमुक एक गीत म्हणत नाही म्हणजे देशद्रोही इथून सुरुवात केल्यानंतर आमची धर्मसंघटना जो देव मानते तो देव मानत नाही, आमची पक्षसंघटना ज्या नेत्याला देव मानते त्याला जे देव मानत नाहीत ते म्हणजे देशद्रोही इथपर्यंत येऊन ठेपले आहे.
आजवर केवळ काही मुस्लीम देशांत देव न मानणाऱ्या व्यक्तींना देहदंडाची शिक्षा होती. पण आता वहाबी – कट्टरातला कट्टर इस्लाम मानणाऱ्या पंथासारखा पंथ हिंदू धर्मातही हेतुपुरस्सर रुजवला जात आहे. युनायटेड नेशन्समधल्या १९३ देशांपैकी बऱ्याचशा देशांत ईशनिंदा हा गंभीर गुन्हा ठरवण्यात येतो. त्यात सर्वाधिक भरणा मुस्लीमबहुल किंवा मुस्लीम राष्ट्रांचा आहे.
भारतीय संस्कृतीचा सर्वात उच्च प्रतीच्या अभिमानाचा विषय होता, वैचारिक मोकळीक. आणि यातून देशाची सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीच झाली. अपप्रचार प्रभावी असला तरीही सत्य बदलत नाही – वैचारिक प्रगती अवश्य झाली. आज हा अभिमानबिंदूच पुसून टाकण्याचा प्रयत्न राजरोस होतो आहे.
इस्लाम हा राज्यधर्म म्हणून स्वीकारलेल्या मध्यपूर्वेतील देशांत ज्या प्रकारे गेल्या शतकापासून वहाबीवादाचा कट्टर इस्लाम अशिक्षित जनतेला प्रभावित करण्यासाठी वापरला गेला त्याचप्रमाणे सध्याच्या भारतातील वातावरणात अर्धशिक्षित बहुसंख्य हिंदू जनतेला कट्टरतावादाकडे ढकलण्यात येत आहे हे सत्य निरीश्वरवाद्यांच्या विवेकी डोळ्यांना दिसते आहे. वहाबींचा प्रभाव वाढू नये म्हणून तेथील राज्यकर्त्यांनी स्वतःच कट्टरता स्वीकारली आणि जनतेने ती शिरावर घेतली. आजच्या वातावरणात भारतात लोकशाही तत्त्वांचा प्रभाव वाढू नये, आपली कालबाह्य धार्मिकता सत्तेत राहावी म्हणून येथील केंद्रीय राज्यकर्ते आक्रमक धार्मिक कट्टरतेचा प्रभाव वाढवत आहेत.
इथे मला सावध करावेसे वाटते ते भारतीय दंड संहितेच्या अनुच्छेद २९५(अ)बद्दल.
रंगीला रसूल नावाची कादंबरी आर्य समाजिस्ट लेखकाने लिहिली आणि पैगंबराचा अवमान केला – ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळात घडून गेली. पण धार्मिक भावना दुखवण्यासंदर्भात काहीही कायदा नव्हता त्यामुळे लेखक-प्रकाशकावर काहीही दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही. मग ब्रिटिशांनी धार्मिक भावना दुखवणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकेल असा कायदा १९२७मध्ये केला. नंतर याचा दुरुपयोग होऊन धर्मावर योग्य टीका करणेही दुरापास्त होईल या विचाराने त्यात काही शब्द बदलले. तो अनुच्छेद असा आहे-
Section 295(A) of the Indian Penal Code (IPC) enacted in 1927 says:
Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of [citizens of India], [by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise], insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to [three years], or with fine, or with both.
यातील विथ डेलिबरेट अँड मालिशिअस इन्टेन्शन हे शब्द सुधारकांना धर्मातील चुकीच्या रूढींवर टीका करणे शक्य व्हावे म्हणून नंतर घातले गेले. पण तरीही केवळ तक्रारी, केसेस टाकून सुधारकांना त्रास देणे हे आजतागायत सुरू आहे. आणि सध्या तर धर्मावर टीका करणाऱ्या सर्वांना सोशल मिडियावर ट्रोल करणारे लोक तुमच्यावर केस करू, खेटे घालायला लावू वगैरे धमक्या देतच आहेत.
पण या ट्रोलिंगपलीकडे जाऊन आपणा सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना एक गुण चिकटवला जातो. की ते स्वतःला फार शहाणे समजतात. प्रथम माझ्या वाटणीला ही कमेंट आली तेव्हा मी सांगितलं होतं – खरंय मी स्वतःला शहाणी समजते कारण आप्तमित्रांचा राग सहन करून सत्य काय ते शोधायचा मी स्वतः प्रयत्न करते. कुणीतरी सांगत आलंय की देव असतो, संत असोत की प्रेषित, किंवा त्याच्यामुळे सारं चराचर चालतं वगैरे गोडगोड गाणीबिणी असतात म्हणून देव मानणार नाही. मला पुरावा हवा – तो मागणंच शहाणपणाचं आहे. म्हणून मी स्वतःला शहाणी समजते. तुम्ही वेडी, अतिशहाणी ठरवल्यामुळे त्या शहाणिवेत काहीही फरक पडत नाही. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची. तेव्हा नाकं वाकडी झाली. पण सोशल मिडिया नसल्यामुळे ट्रोलिंग झालं नाही.
आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत सोशल मिडियाचा सहभाग खूप मोठा झाला आहे. शहाण्यांना वेडं ठरवण्याच्या, वेड्यांना साक्षात्कारी ठरवण्याच्या आणि असत्याला सत्य ठरवण्याच्या प्रचंड फॅक्टऱ्या निघाल्या आहेत. आणि तरीही आपण सारे – बरेचसे – निरीश्वरवादी, नास्तिक ठामपणे आपल्या मतावर अटळ रहातो.
काहीजण जरा मवाळ भूमिका घेतात. आपला ईश्वराची कल्पना, धर्माची कल्पना, धार्मिक संस्कारांच्या कल्पना यांवर विश्वास नाही हे लपवून ठेवत राहतात. याचे कारण समजण्यासारखे आहे. आपण पुन्हा एकदा मी सुरुवातीला वापरलेल्या आसिमॉवच्या उद्धृताकडे येतो – “जेव्हा मठ्ठपणा म्हणजेच देशभक्ती असं समजलं जातं तेव्हा बुद्धिमत्तेचा वापर करणं असुरक्षित असतं.” काहीजण असुरक्षितता झेलू शकतात, काहीजण परिस्थितीमुळे किंवा परिस्थितीतून घडलेल्या स्वभावामुळे नाही झेलू शकत. घरच्यांशी पंगा घेणं – तेही श्रद्धा-परंपरांच्या विषयावरून तर फारच अवघड. भावना दुखवून, रडारड होण्याची, आरडाओरड होण्याची भीती, घरातली शांती नष्ट होण्याची भीती दूर होणे जवळपास दुरापास्तच.
लहानपणापासून सर्वांना धार्मिक, देवभक्त ही विशेषणे म्हणजे काहीतरी थोर असे घरातून, शाळेतून गिरवायला लावलेले असते. धर्म म्हणजेच सत् असे समीकरण बळेच केलेले असते. मी अधार्मिक आहे असं म्हणायला जीभ अडखळते. मी देव मानत नाही हे हळू आवाजात सांगण्याची सक्तीच झाली आहे. आपण एकत्र येतो, कुणाची तरी भाषणे ऐकतो, आपसात विचारविनिमय करतो हे सुद्धा खपत नाही हे पाहिलेय तुम्ही.
अगदी स्वतः निरीश्वरवादी असणारेही अचानक ढुढ्ढाचार्य बनून कशाला हवा नास्तिक मेळावा, काय नवा धर्म स्थापन करताय का असले पोकळ प्रश्न विचारत 'लेखपाडन' कर्मकांड करतात. त्यांची री ओढणारे अनेकजण स्वतः देवावर कसलीही चिकित्सा न करता भक्ती ठेवणारे लोक असतात. पण आपली री बरेच लोक ओढतायत हे गोड वाटत असावं.
हे पाहा, इथे तुम्ही नास्तिक नसलेल्यांनी येऊ नये असं स्पष्ट सांगितलंय. कारण आ बैल मुझे मार करणाऱ्या आस्तिकांना भलतीकडं शिंग लागायची शक्यताच नको. येऊ नका. आपल्या नाजूक कमसिन नादान भोळ्या भावना दुखवून घेऊ नका. आम्ही कुणाचं धर्मांतर करायला बसलेलो नाही. विवेकाचा आणि त्यातूनच जन्म घेणाऱ्या निरीश्वरवादाचा सर्वात महत्त्वाचा पैलू हा आहे की तिथवर ज्याचं त्यालाच पोहोचावं लागतं. पण आपल्यात कुणी अधिक वाचतं, कुणी कमी, कुणी अधिक तर्कनिष्ठ असतं, कुणी धारदार असतं, कुणी सौम्य पण नेमकं असतं. आपण एकत्र येतो ते तार्किक विचारांचे वेगवेगळे पदर गोळीबंदपणे समजावेत म्हणून.
आता कुणी विचारेल – कशाला समजायला हवं. तुमची तुम्हालाच वाट शोधायची आहे ना – मग मेळावे कशाला. त्यांना उलट उत्तर देऊ – आमची वाट शोधताना आम्ही मेळावे घेतो, एकमेकांना भेटतो कारण तुमच्या विचार करणे नाकारणाऱ्या झुंडींच्या दुनियेत हेच एक आम्हाला शक्तिदायक वाटते.
विचार करणे नाकारणाऱ्या झुंडी या आजच्या माझ्या विषयाच्या केंद्रस्थानी आहेत. यात विचार करता येत असूनही आत्मविश्वास नसल्यामुळे गटाराच्या प्रवाहात हातपाय मारून बाहेर येण्याचा प्रयत्न न करणारेही असतात. परिसर ओळखीचा आहे, सोबत डुबक्या मारणारे परिचित आहेत- आपणच कशाला विरुद्ध जा असा विचार करून हतप्रभ होणारे सर्वात दुःखद, करुणाजनक वाटतात मला.
सगळेच स्थापित, प्रस्थापित, संघटित धर्म कालबाह्य झाले आहेत. नैतिकतेसाठी धर्माची गरज नसून व्यक्तिगत नीतिमत्तेची गरज आहे हे पटलेले अनेकजण आहेत हे आपल्याला मनोमन माहीत आहे. अनेकांचा देवावरचा विश्वासही जातीय अस्मितेसारखाच असतो, आणि धर्माची सांगड निदान भारतात तरी जातीय अस्मितेशीच असते. पटत नसलं तरीही वळण पडलेलं बदलायची हिंमत होत नाही किंवा हिंमत नसतेच.
अशा निर्बुद्ध श्रद्धेच्या वातावरणात आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. खरे तर विज्ञान-तंत्रज्ञानाची आणि भौतिक प्रगती वेगाने होत असताना वैचारिक कष्ट घेण्याची अधिक गरज असते.
ज्या काळात जगण्याचीच फारशी शाश्वती नव्हती, अन्न, आरोग्य या साऱ्याचीच वानवा होती त्या काळात असुरक्षित वाटणाऱ्या माणसांनी देवाची कल्पना केली, आधार शोधला. त्या पाठोपाठ त्या त्या प्रदेशात अनुकूल वाटणारे समाजनियम केले गेले. देवाची कल्पना करणारे मानव काही आधार शोधत होते. पण त्यांच्या विकलतेचा आधार घेऊन नंतर धर्मसत्ता आणि राज्यसत्ता फोफावल्या. पण अजूनही त्या असुरक्षिततेच्या काळात जन्माला आलेली देवाची कल्पना काही मानगुटीवरून उतरत नाही. ती समाजाच्या मानगुटीवरून उतरण्यासाठी आपल्याला जमेल तेव्हा जमेल त्यांच्याशी बोलत राहिले पाहिजे. घरात, दारात येणाऱ्या कुणालाही त्यांच्या श्रद्धा का चूक आहेत हे संथपणे समजावत राहिले पाहिजे.
यातील युक्तिवादांत आपला पराभव होतो – याचं कारण आपले मुद्दे ठिसूळ असतात असे नाही. तर ऐकणारे लोक कान बंद करून असतात. आयुष्याची इतकी वर्षे ज्या श्रद्धा सांभाळल्या त्या श्रद्धा निरर्थक होत्या हा फार मोठा धक्का असू शकतो. अशा भयंकर धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठीच तर तर्कहीन श्रद्धांचा आधार घेतला जात असतो.
आजच्या वातावरणात देवाची कल्पना, कल्पनेतल्या देवाचे तथाकथित प्रेषित- त्यांच्या दंतकथा, कल्पनेतल्या देवांचे गब्बर दलाल, त्यांची पीठे – चर्चची पॅपसी, मंदिरांचे पुरोहित-आचार्य, स्वामी, मशीदींचे मुल्ला-इमाम आणि त्यांच्या मागून जाणारी भक्त नावाची कडवी जमात यांच्या प्रभावासमोर विवेक विचाराचे तेज दाखवणे अवघड असेल पण अशक्य नाही.
साधनांची कमतरता सातत्याने भासत असताना साधने काबीज करण्याची स्पर्धा सतत चालते आणि त्यामुळे मानवी समाज हा सतत संघर्षाच्या पवित्र्यात असतो हे सत्य एकदा समजून घेतले की साऱ्या घडामोडींचा अर्थ लावणे सोपे होते.
कोणत्याही सामाजिक राजकीय विचारप्रणालीला राज्यसत्ताच नव्हे तर वैचारिक सत्ताही हवी असेल तर अनुयायी वाढावे लागतात. अनुयायी हे साधन होतात. आणि मग हे साधन वाढवण्यासाठी संघर्ष सुरू रहातो. जे राजकीय पक्षांचे तेच राजकीय विचारांचेही. आणि म्हणून तेच निरीश्वरवादी, धर्मकालबाह्यतावादी, विवेकवादी विचारांचेही होणार. आपला विचार वैचारिक क्षेत्रात मजबूत व्हावा अशी नुसतीच आशा करून, आणि तसे होत नाही यावर गळे काढून हाती काहीच लागणार नाही.
सध्याच्या वातावरणात जे अविवेकाचा असत्याचा प्रचार निर्लज्जपणे करत आहेत त्या सर्व राजकीय वर्तुळातील नेते, अनुयायी आणि असत्यप्रिय अशा जनतेलाही आपल्याला शब्दांनी तीव्र विरोध करायचा आहे.
कशाला कुणाच्या श्रद्धा दुखवायच्या हा साजूकपणा परवडायचे दिवस राहिलेले नाहीत.
छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची.
देवकेंद्री सण असोत की उपासासारखी व्रतं – रोझे, उपवास सारं यात आलं – त्यात आपण नावापुरतेही सहभागी होऊ नये.
घरच्यांच्या समाधानासाठी करावं लागतं हे वरवर पटण्यासारखं कारण कठोरपणे तपासून पाहा. तुमच्या समाधानासाठी ते एखादं कर्मकांड बंद करतात का पाहा. की केवळ तुम्हीच दर वेळी नास्तिक म्हणून आणि एकटे पडता म्हणून पडतं घेता? विचार करा आणि करायला लावा. असले प्रसंग चिकित्सेसाठी घुसळणीसाठी बिनदिक्कत वापरायला लागा.
प्रत्येक कर्मकांडं किंवा सण या मागे काही ना काही कथाकहाण्या असतात. ख्रिश्चॅनिटीतही असतात, हिंदू धर्मातही असतात – सर्वच संघटित धर्मांत असतात. त्या माहीत करून घ्या. दंतकथांचा – मायथॉलॉजीचा परिचय करून घ्या. अनेकदा या आस्तिक लोकांना यातलं काहीही माहीत नसतं. ते तुम्हाला माहीत असलं आणि त्यातले कच्चे मुद्दे, चुकीची तत्त्वं तुम्हाला कळली की त्यावर तुम्ही धडाडू शकता. गप्प राहणं, जाऊ दे आता यांना काय समजावणार म्हणून सोडून देणं हा आपला नाकर्तेपणा आहे. प्रसंगी शिव्या खाऊन, ट्रोलिंग सहन करून, घरच्यांचा रुसवा पत्करून जे आहे ते मांडणे, फोल रूढींवर, नसलेल्या देवाच्या बेगडी कल्पनेवर आघात करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. दहा दणके घालाल तेव्हा कुठेतरी एखादा तडा जाईल, पाणी झिरपेल. किंवा कदाचित दगडाखालचा झरा फुटून बाहेरही निघेल.
अनेक निरीश्वरवादी, विवेकवादी हे कर्तव्य निभावण्याचे टाळतात. हा थोडक्यात भ्याडपणा आहे. जोवर आपण आपल्या निकटच्या परिसरात झाडलोट करत नाही तोवर जागतिक प्रदूषणाबद्दल बोलून उपयोग नाही – हे अगदी तसंच आहे.
या भूमीत एका दंतकथेतील पात्राच्या – रामाच्या मंदिराच्या प्रश्नावरून रण पेटते. हजारो कोटींचे भ्रष्ट संकलन होऊन एक दुही माजवणारा गट बलाढ्य होतो हे निरीश्वरवादाचे अपयश आहे म्हणतात. जे फॅसिस्ट राजकारणाचे यश आहे ते विवेकवादी माणसांचे अपयश असतेच एका अर्थी. पण आपण याकडे देशाच्या बौद्धिक उत्क्रांतीतील एक टप्पा म्हणून पाहिलं पाहिजे. उत्क्रांतीच्या प्रवासात कधीकधी अवक्रांतीही होते.
या देशातील धर्म काही विशिष्ट देवांना प्राधान्य देणारा आहे असा एक अपप्रचार यशस्वीपणे सध्या राज्यकर्ता बनलेला एकचालकानुवर्ती रा.स्व.संघ करीत आहे.
भारतातला मूळ धर्म खरेतर कोणत्याच नावाचा नव्हता. एकाही वेदात या आचारधर्माला हिंदू हे नाव दिलेले नाही. आणि वेदांच्या आधी किमान तीसचाळीस हजार वर्षे आधीपासून सध्या ज्या भूखंडाला भारत म्हणतात त्या भूखंडावर मानव वसत होता. अश्मयुगीन मानववस्तीही इथे होती, खडकांवर चित्रे काढणाऱ्या शिकार करून जागणाऱ्या मानवी टोळ्याही इथे होत्या, इथेच हडप्पा संस्कृती नांदली. मग अचानक एकच धर्म आणि त्याचा अमका सॉल्लिड पॉप्युलर देव ज्याला कोट्यवधी रुपये शरयूच्या पाण्यात घालवून मंदिर बांधायलाच हवे हे कुठून आले?
प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांनी त्यांच्या गॉड डिल्यूजन या पुस्तकात दिलेलं आणि मला नेहमीच फार भावणारं एक उदाहरण मी इथे पुन्हा एकदा देऊ इच्छिते. उत्क्रांती सिद्धांतातील एक उदाहरण आहे. पतंग म्हणजे मॉथ्स हे गेली अनेक सहस्रके चंद्राच्या प्रकाशात, चंद्राची दिशा पकडून रात्री प्रवास करत. पण माणसाला अग्नीचा वापर करता यायला लागल्यापासून, मानवाने लावलेले जळते दिवे, मेणबत्त्या आल्यानंतर त्यांना हा नवा प्रकाशाचा स्रोत आपल्यासाठी घातक आहे हे कळत नाही आणि ते थेट त्यांच्या दिशेने उडून त्यावर आदळून जळून जातात. देवाधर्माच्या कल्पनांबाबत माणसांचे काहीसे असेच होते आहे.
धर्माचे फायदे प्राचीन इतिहासपूर्व काळातील किंवा प्राचीन इतिहासातील माणसांना थोडेफार होत असतील. जग विचार करून जो ताणतणाव सोसावा लागतो त्यापासून मुक्ती मिळत असेल. तेव्हा या दृष्टीने लोक धर्माकडे आकर्षिले जात असतील. धर्माचे फायदे प्राचीन इतिहासपूर्व काळातील किंवा प्राचीन इतिहासातील माणसांना थोडेफार होत असतील. विचार करून जो ताणतणाव सोसावा लागतो त्यापासून मुक्ती मिळत असेल. तेव्हा या दृष्टीने लोक धर्माकडे आकर्षिले जात असतील. आजच्या वातावरणातही लोक असुरक्षित वाटल्यामुळे अध्यात्माकडे तसेच देवाधर्माकडे वळतात असे समाजशास्त्रे म्हणतात. त्यात तथ्यही आहेच. पण असुरक्षित वाटल्यानंतर सुरक्षिततेकडे जाण्याऐवजी जळत्या ज्वाळेकडेच चुकून झेपावणाऱ्या पतंगांसारखीच भाविक माणसांची गत होते आहे. नव्या भारतातील भक्तांचीही तीच गत होते आहे.
देशातील आताचे वातावरण, सध्याची परिस्थिती काही चिरकाल टिकणारी नाही. दीर्घकाल टिकेलही पण चिरकाल तर नाहीच. Nothing lasts forever. त्यामुळे सध्याची परिस्थिती हा अगदी विवेकवादाचा पराभव जरी मानला तरीही – असले पराभव तर गेली काही शतके विज्ञानवादी, विवेकी लोक पचवत आले आहेत. आणि ते पचवून जगाला विचार आणि कृतीने पुढे नेत आले आहेत.
आता प्रश्न आहे तो आत्ता आणि इथे आपण विवेकवादी, निरीश्वरवादी लोकांनी काय करायला पाहिजे.
- एक म्हणजे वैचारिक संघर्ष,
- दोन म्हणजे वैचारिक संघर्ष.
- आणि तीन म्हणजेही वैचारिक संघर्ष.
देव नाही कारण ती सृष्टीसंबंधी अनभिज्ञ असलेल्या प्राचीन मानवांनी स्वतःला सावरण्यासाठी रचलेली कल्पना आहे. आणि ती कालबाह्य झाली आहे. अशी कल्पना करण्याची आता गरज उरली नाही. स्वतःच्या भीतीवर मात करण्यासाठी काल्पनिक काहीतरी उभे करण्याऐवजी ठोस काहीतरी करा. एंक्झायटी होते? मनोविकार तज्ज्ञांची, मानसशास्त्रज्ञांची भेट घ्या. पॅनिक ॲटॅक येतो – कृतीत गुंतवून घ्या. कुठलातरी शिर्डी नाहीतरी प्रशांती नीलयमचा बाबा न शोधता मानसिक रोगांसंबंधी वाचा. आश्रमांत भरती होऊन मनःशांती शोधायची आणि कुठल्यातरी मृतप्राय लबाडाचा सुगंधी शेंबूड हुंगायचा वगैरे गोष्टी करण्यापेक्षा गरज असलेल्या लहान मुलामुलींना शिकायला मदत करा या साध्या गोष्टी आहेत – त्या लोकांना सुचत नसतील तर आपण त्यांना सांगितल्या पाहिजेत. हे कष्ट घ्यावे लागतील. वेळ घालवावा लागेल. लिहावे लागेल, बोलावे लागेल, समजावून सांगत राहावे लागेल. डोक्याला ताप करून घ्यावा लागेल.
ही लहान मुले – किंवा बालबुद्धी तरुणही – प्रतीकांच्या झगमगाटाने दिपून जातात. त्यातल्या सोहळ्याच्या वातावरणाची भूल त्यांना पडते. झेंडे नाचवत रस्त्याने मिरवणूक काढायला मज्जा वाटते. मग तो नाचवला जाणारा झेंडा कुणीतरी लबाडाने हातात दिलेला असला तरीही ती तो नाचवत रहातात. बिल्ले लावतात, टीशर्ट्स घालतात, ढोल वाजवतात, अनवाणी चालत जातात, रस्त्यांवर लोळून कुणा मेलेल्या बाबाचे नाव लिहितात, पालख्या वाहतात, वारीलाही जातात.
आपण यातील मूर्खपणाबद्दल बोलले पाहिजे. समजावून सांगितले पाहिजे. आणि केवळ परंपरा टिकवायची म्हणून वारी ते दीपप्रज्ज्वलनसारख्या अगदीच उद्दिष्टहीन गोष्टींचा बडिवार माजवणाऱ्यांवर टीका करत राहिले पाहिजे.
कारण अखेर ही प्रतीके ज्ञान नसलेल्यांना लोभस वाटली तरीही देवधर्माच्या ‘बुद्धीबंद’ योजनेचाच भाग असतात. प्रतीकांचे निमित्त करून देवधर्माचे खरे रूप दाखवणे शक्य असते.
धार्मिक प्रतीके, स्थळे, चिन्हे, मंत्र-स्तोत्रे, रंग आणि धार्मिक-सांस्कृतिक अस्मिता राजकीय उद्योग करणारे संघ आणि पक्ष वापरून घेतात- त्यात धर्माचा किंवा अध्यात्माचा काडीचाही भाग नसतो, केवळ सामान्य नागरिकांना आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या कार्यक्रमाकडे हाकत नेणे एवढाच भाग असतो. गणपती येण्याआधी पाहिले असेल कित्येक तरुण मुलेमुली झेंड्यांच्या उंचउंच काठ्या नाचवण्याची आणि ढोल वाजवण्याची प्रॅक्टिस अनेक दिवसांपासून करतात. मग ढोल वाजवणाऱ्या मुलामुलींचा ताफा मिरवणुकांनी निघतो. ही केवळ एन्जॉयमेंट आहे असे एक कारण पुढे केले जाते. पण त्या ताफ्यांना पुरस्कृत करणारे, तीर्थयात्रा पुरस्कृत करून आपला हरामाचा पैसा त्यात खर्चणारे मागचे लोक हे बहुधा राजकारणी असतात. धर्माच्या, देवाच्या नावाने त्यांना सामान्यांची बुद्धी अंकित करायची असते. त्यांची विचारशक्ती कुंठित करायची असते.
महाराष्ट्राचा लाडका देव – कानडा विठ्ठल – याच्या संतपरंपरेतून सुरू झालेल्या वारीचे प्रयोजन संपले आहे. तेव्हाची गरज होती बहुजनसमाजाने भटाविना देवाच्या दिलाशापर्यंत पोहोचून त्यांच्या दलाली रोलला आव्हान देण्याची. ती पूर्ण झाली केव्हाच. संतांच्या काळात वाहने आणि गाड्याघोडे सामान्यांना वापरण्याची सोयच नव्हती. त्यामुळे वारी चालत करणे हाच एक पर्याय होता. तेव्हा रस्तेही मातीचे असत- वाटा असत त्या. पंढरीची वाट होती- हायवे नव्हे... झाडेझुडे आजच्यापेक्षा अधिक होती. आणि तरीही टीव्हीवर फोटू येत नसल्यामुळे कमीच लोक वारी करत. आज हे सारे बदलले आहे. वाहने आहेत, परवडत आहेत, पायात चपला आल्या आहेत कशाला अनवाणी जायचं चालत? रस्ते डांबरी झालेत, वाहनांची येजा वाढून अपघातांचा धोका वाढलाय आणि रस्त्यावरची सावलीही कमी झाली आहे तरीही का जायचं चालत? परतीचा प्रवास वाहनांनी करतातच. पण वारी मात्र पायीच. दिवसचे दिवस घालवत...
पण परंपरेच्या निरागस वाटणाऱ्या नावाखाली अनेक फिल्ममेकर्स फोटोग्राफर्स वॉव वॉव ग्रेट म्हणत या मानवी ऊर्जेच्या संपूर्ण अपव्ययाचे उदात्तीकरण करतात आणि आपापल्या व्यवसायात मायलेज वाढवून घेतात. हंगामी कवी, चित्रकार वगैरे मंडळीही यात सहभागी असतात.
विठू मायलेज तू मायलेज माझे
मायलेज मोठे विठ्ठलाचे
विठ्ठलाsss मायलेज राखाsss.
संतांची अभंगवाणी सुंदर चाली दिल्यानंतर कानाला गोडच वाटते – पण मुळातच ती सारी भक्ती कविता त्या काळाचा आरसा होती. उत्तम दर्जाची नीतीतत्त्वेही सांगितली गेली त्यातून. देवापुढे सारे समान हा एक मानवतावादी संदेश त्यातून गेला – पण आता ही समानता देशाच्या संविधानानेच दिली आहे. पण उत्सव सुरू राहायला हवा, दुकाने चालायला हवीत, वेळाचं करायचं तरी काय – जाऊ दे की वाया. आपल्याला कामं करताना वेळ पुरत नाही...
त्यामुळे हे सारे वरवरचे मज्जामज्जा उत्सव वाटत असले तरीही त्यांचे खरे स्वरूप आपण त्यांना जाणवून द्यायला हवे. शंभरांना सांगितले तर दहाजण तरी त्यावर विचार करू लागतील. या साठी आपण जास्तीत जास्त जणांनी आपण लोकप्रिय राहणार नाही की काय याचा विचार बाजूला ठेवून कटू सत्य मांडले पाहिजे. प्रतीकांचा बडिवार म्हणजे धर्माची चाल खेळणारे राजकारणी हे समीकरणच आहे.
दोन हजार किंवा चौदाशे वर्षांपूर्वी संस्थापित झालेले धर्म काय किंवा तीन हजार वर्षांपासून विकसित होत गेलेले धर्म काय, त्यातले देव काय आणि देवाचे पुत्र काय- या सर्वच धर्मांच्या आणि त्यातल्या देव कल्पनांच्या मर्यादा आहेत हे मान्य करण्यासाठी धैर्य दाखवले पाहिजेच. ते ठायीठायी दाखवावे लागेल. अभ्यास वाढवावा लागेल. आपली माहिती अचूक असली पाहिजे याचे भान सतत ठेवावे लागेल. आणि हे आपण सारे नास्तिक करू शकतो. करावे लागेल.
हे करण्यासाठी आपल्याला एकच नैतिक आधार पुरेसा आहे की विवेकबुद्धी जागी ठेवून आपण जेव्हा काहीही करतो तेव्हा ते सत्य असते, त्यातून कुणाचेही कसलेही नुकसान होत नसते. नैतिक कारणे पुढे करून कुणीही अनैतिक काम करू शकत नाही – हे विवेकविचाराचे केंद्रीय सूत्र आहे.
देवाधर्माच्या चौथऱ्यावर स्थापन केलेली नैतिकता – पापपुण्य, स्वर्गातले बक्षीस, नरकातली शिक्षा यावर आधारलेली नैतिकता ही फार वेळा ठिसूळ असते. त्या नैतिकतेच्या आधारे जगणारी माणसं या चौथऱ्याच्या नावाखाली कत्तली करायला मागेपुढे पाहात नाहीत, अपशब्द-अपकृत्यं ही फार छोटी गोष्ट झाली. क्रौर्याचा नंगा नाच-हत्या-बलात्कार-बालहत्या-बालबलात्कार सारेच त्यांच्या नैतिकतेच्या चौकटीत बसवता येते. कुणी दुष्कृत्यांनंतर जन्नतमधल्या हूरच्या आमिषांच्या लालचीने स्वतःला पापमुक्त समजतात, कुणी धर्मरक्षणासाठी मारण्याने-मरण्याने 'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा भोक्ष्यसे महिम्'चा आधार घेऊन स्वतःला दोषमुक्त करतात. देवळात परधर्मीय बालिकेवर बलात्कार करून खून करणारांना तर खुद्द देवीनेच अभय दिलेले असते म्हणे. घराघरात चालणारी बारीकसारीक दुष्कृत्ये मग ती एखाद्या मरियमवर आघात करणारी असोत की शारदाला जाळून टाकणारी असोत, की स्वतःच्या मुलीला पुरेसे अन्न न देता मुलाला चांगलेचुंगले खाऊ घालणारी आई-आजी असो, मुलामुलींना स्वतःची निवड करणे नाकारून त्यांच्या आय़ुष्याची सूत्रे स्वतःच्याच हातून खेळवण्याचे प्रयास करणारे पालक असोत – साऱ्यांचे मूळ घरातील देवधर्मांच्या परंपरापालनातून पसरलेले असते.
विवेकवादी, निरीश्वरवादी अशा आपणा सर्वांचे काम याची जाणीव करून देत राहणे आहे. समाजातल्या अनेक दुष्टाव्याचे मूळ देवधर्म आहेत हे लोकांना सहजी कळणार नाही. ते पचणे तर अधिक कठीण.
बहुसंख्येचा विवेक ही एक गोष्ट अजूनतरी अशक्य आहे. आर्थर कोस्लरने त्याच्या डार्कनेस ऍट नून या कादंबरीत एक संकल्पना मांडलीय – रिलेटिव इमॅच्युरिटी ऑफ द मासेस. म्हणजे विवेकाधारित विचार पुढे जातो तसतसे जनसामान्य त्या मागोमाग पुढे येतात. पण तरीही ते नेहमीच तुलनेने वैचारिक प्रगती कमी साध्य करू शकतात. आणि या सापेक्ष अप्रगल्भतेचा फायदा हितसंबंध गुंतलेले वर्ग, वर्ण, सत्ताधारी उचलत असतात. त्यांचा विवेक अप्रगल्भ रहावा, ते जुन्याच कालबाह्य कल्पनांना चिकटून रहावेत यातच या वर्ग-वर्ण वर्चस्वाचे हित असते. त्यामुळे या बहुसंख्येच्या वैचारिक मागासपणाला टिकवण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले जातात.
आज आपण पाहतो आहोत – अगदी शोषणफ्रेंडली हिंदू धर्माचे गौरवीकरण चालू आहे. मंदिर बांधण्याचा कार्यक्रम म्हणजे सारे काही नव्हे. भूछत्री मठांतून, आश्रमांतून, मेळ्यांमधून कालबाह्य धर्म आणि त्याची कर्मकांडे रुजवली जात आहेत.
आणि वर युक्तिवाद असा असतो, की इतक्या बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे तर तुमचा विरोध कशासाठी. तुम्ही नास्तिक असूच कसे शकता... तुम्ही नास्तिक एकमेकांना का भेटता...
यांना गलिच्छ कुंभमेळा भावतो. पण विचार करणारी, रास्त मागणीसाठी रस्त्यावर तीनशे-साडेतीनशे टाळकी एकत्र आली तर यांना केवढा भयगंड उत्पन्न होतो आपण पाहिलं असेल. अर्थात आपण दुर्लक्ष करू- पण हे साक्षात देव पाठीशी असलेले लोक आपल्यासारख्या सत्ताहीन मूठभरांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. पेटून उठतात-पेटवतात-शिव्या घालतात, त्रास देण्याचे सर्व प्रयत्न करतात. त्यांच्या देवकल्पनेपेक्षा प्रभावी अशी तेजस्वी विवेकनिष्ठा आमच्या मेंदूत आहे हे कदाचित त्यांना माहीत असेल.
बहुसंख्या मानते म्हणून अमुक हे सत्य असू शकत नाही याची जाणीव असलेले आपण अल्पसंख्य लोक आहोत. तरीही पुढल्या काळातील जगासाठी देव आणि धर्म कालबाह्य आहेत, आणि चांगले वाईट, सत् असत् ठरवण्याची क्षमता केवळ निर्भय मानवी बुद्धीत आहे हे आपल्याला सांगत राहावेच लागेल.
सत्य न जाणून घेता कशावरही विश्वास म्हणजेच श्रद्धा – भले स्वतःच्या मानसिक आधारासाठी बाळगलेली असली तरीही त्याला आंधळेपणाच हे मान्य असलेले निरीश्वर विचाराचे लोक जगभर विविध संस्कृतींमध्ये, आपापल्या जन्मदत्त धर्मांच्या कोठड्या नाकारून आज यशस्वीपणे जगू शकतात हाच एक मोठा पल्ला आपल्या जगाने गाठला आहे असे म्हणता येईल.
आपापल्या सांस्कृतिक अवकाशात असलेल्या सर्व गोष्टी जाणून घेणे, त्यांची सत्यता पडताळण्याचा सतत प्रयत्न करणे हा एक ज्ञानार्जनाचा भाग आहे. निरीश्वर विचाराच्या व्यक्तींना हे ज्ञानार्जन करणे अधिकच आवश्यक भासते.
आणखी एक – ज्यांना आपले ग्रह, पूर्वग्रह हेच योग्य वाटतात, विशेषतः ते वर्चस्वाच्या भ्रमांनी ग्रासलेले असतात ते हेकट लोक सोडून द्यावेत. जे ऐकू शकतात, ज्यांची मने अद्याप खुली आहेत त्या लहान मुलांना, तरुण मुलांना विवेक विचार शिकवण्यासाठीच आपला वेळ घालवावा लागेल. काही निरीश्वरवादी म्हणवणारे धर्मवादी लोक तुम्ही पाहिले असणारच. ही कॅटेगरीसुद्धा अजिबात वेळ न घालवण्यासारखी. ज्यांचे कर्मकांड ठरले आहे, अजेंडा ठरलेला आहे अशा हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती बौद्ध-जैन-सिक्ख या कुणाही बनचुक्या लोकांवर वेळ घालवायचा नाही. कारण खरोखरच सत्याधारित जग अस्तित्वात कदाचित अनेक शतकांनंतर येईल त्यासाठी आपल्याला हा विचार जगवत ठेवायचा आहे.
एखादा कालखंड असा येतोच प्रत्येक देशात वा प्रदेशात- की जनता अविवेकाच्या मागे जाते. स्वतःचा नाश ओढवून घेते. पण म्हटलं तसं – नथिंग इज फॉरेवर एक्सेप्ट चेंज. परिवर्तनाची शक्यताच तेवढी शाश्वत असते. बाकी काही नाही.
त्यामुळे अविवेकाचा हा काळ एक पासिंग फेज आहे…
हजारो लाखोंनी मान्य केलेलं असलं तरीही असत्य हे असत्यच रहातं. सत्य शांतपणे स्वतःचं अस्तित्व राखत रहातं.
कधीतरी अनेक शतकांनंतर किंवा सहस्रकांनंतरचे मानव या दोन सहस्रकांतील देवधर्माच्या प्रादुर्भावाबद्दल आश्चर्य व्यक्त करतील. इतक्या वेडगळ आणि विनाशकारी कल्पना बाळगणारे आपले पूर्वज होते हा इतिहास पाहतील आणि यातच काही पूर्वज बाकीच्या सर्वांच्या विरोधात केवळ सत्याचा, विवेकाचा आणि या ग्रहावरील मानवजातीसहित जीवसृष्टीच्याही कल्याणाचा विचार करत होते हे पाहून सुखावतील.
बस्स, पुस्तकं – डिजिटल पुस्तकं, ऑडिओ पुस्तकं, सायबर अवकाशात टिकून राहायला हवीत. कागदावरची पुस्तकं जाळणं कुणाही मठ्ठ अधिकारशहाच्या सैन्याला जमतं.
जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक प्रसिद्ध उद्धृत आहे.
“The reasonable man adapts himself to the world: the unreasonable one persists in trying to adapt the world to himself. Therefore, all progress depends on the unreasonable man.”
“व्यवहारी माणसं जगाच्या मतांशी जुळवून घेतात, अव्यवहारी माणसं स्वतःच्या मताशी जगाचं मत जुळवण्याचा प्रयत्न करत रहातात. आणि म्हणूनच, जगाची सारी प्रगती या अव्यवहारी माणसांवर अवलंबून असते.”
२०१२ मध्ये नास्तिक प्रजासत्ताक – एथीस्ट रिपब्लिक या ब्लॉगची सुरुवात झाली होती. कॅनडातून सुरू होऊन जगभर पोहोचलेल्या या विचारमंचाने स्वतःची ओळख फार नेमक्या शब्दांत करून दिली आहे.
“हे आहे नास्तिक प्रजासत्ताक. आम्ही स्वतःची ओळख अशीच करून देण्यास घाबरत नाही. आम्ही नास्तिक आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही जे काही करतो आणि ज्या वर आमचा विश्वास नाही त्याबद्दल कुणाचीही क्षमायाचना करण्याची गरजच नाही. द्वेषापासून स्वसंरक्षण करण्यासाठी आम्ही लपून राहणार नाही किंवा स्वतःचे नाव बदलणार नाही. आणि एकत्र आलो म्हणून आम्हाला दूषणे देतील याची भीती बाळगून आम्ही एकेकटेही राहणार नाही. क्रौर्य आणि अन्याय यांचे मूक साक्षीदार होणे नाकारतो आम्ही, कारण आम्ही काही केवळ नास्तिक नाही, तर आम्ही इतर माणसांबद्दल सहानुभूती असलेले, चिंता वाहणारे नास्तिक आहोत.”
थोडक्यात, आपण विवेकवादी निरीश्वरवादी आहोत म्हणजेच अव्यवहारी लोक आहोत. खूप काम करू या. जगाचं मत बदलण्याचे लहानमोठे प्रयत्न सातत्याने करत राहू या.
निरीश्वरवादी विचारांचा अंतिम विजय होणारच आहे – आपण असू वा नसू.
- मुग्धा धनंजय
(कॉपीपेस्ट करायला, शेअर करायला,तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर वापरायला पूर्ण परवानगी आहे.)
.
समाज माध्यमे आणि न्यूज चॅनल्सचा एक मोठा दुर्गुण असा आहे की काही घटना अनावश्यकपणे अॅम्प्लिफाय होतात. त्यामुळे आजूबाजूला जे घडते आहे ते फार विनाशकारी दिशेने चालले आहे अशी भावना सहज निर्माण होते. ज्या बातम्या वर्तमानपत्रात येण्याच्या लायकीच्याही नाहीत, त्यांवर दिवसभर चर्वितचरण चालू राहते. अलिकडे एका मराठी अभिनेत्याने मुस्लिम लोकांशी कोणताही व्यवहार करू नका असे वक्तव्य केल्याचे वाचले. समाजमाध्यमे अशा घटनांवर रिअॅक्ट होण्याला आणि सात्त्विक संताप येण्याला कारणीभूत ठरतात. समाज बदलाच्या दृष्टीने काय शक्य आहे आणि काय शक्य नाही याचाही विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण समाज निरिश्वरवादी होणे, तेही शंभर टक्के, येत्या कित्येक शतकांतही अशक्य वाटते. विज्ञान प्रसाराने लोकांच्या अंधश्रद्धा पूर्णपणे नाहिश्या होत नाहीत. अर्थात सध्याची स्थिती वाईट आहे यात दुमत नाही, पण तशी ती प्रत्येक शतकात असते.
पुढच्या वर्षी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होतील. इतिहास वाचला तर कळते की अस्पृश्यता ही बहुसंख्यांची श्रद्धा होती. तिच्या निर्मूलनासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. समाजमन बदलायला दशके गेली. आजही काही ठिकाणी परिस्थिती बदललेली नसली तरी अनेक ठिकाणी नक्कीच बदललेली आहे. हा संघर्ष रस्त्यावरही झाला आणि न्यायालयातही झाला. हा लढा निवडकांनी दिला. संपूर्ण समाज निरिश्वरवादी बनविण्यापेक्षा छोटे छोटे सामाजिक प्रश्न निवडून त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक वास्तववादी आहे. समाजातील ज्या श्रद्धा अन्यायकारक असतात, अशा निवडक सामाजिक समस्यांसाठी एकत्र येणे, कार्यक्रम आखणे आणि लढा देणे हे नेतृत्व आणि त्याने उभारलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे काम आहे असे मला वाटते. बाकीचे तुमच्याशी सहमत असले तरी ते बहुतेक वेळा अप्रत्यक्षच मदत करू शकतात. सगळेच लोक आपला कामधंदा सोडून रस्त्यावर उतरायला किंवा न्यायालयीन लढाई लढायला तयार नसतात. शंभर भोळी लोकं शाखेत जाणारी असली तरी हजार बेरकी लोकं शाखेत न जाताही छुपी मदत करत असतात. थोडक्यात, नेतृत्व, संघटना, निस्पृह कार्यकर्ते आणि निवडक कार्यक्रम याला पर्याय नाही. दाभोलकरांना निदान ही जाणीव होती. म्हणूनच त्यांनी एक संघटना उभारली. वैयक्तिक श्रद्धांच्या आड ते कधी आले नाहीत. जिथे अन्याय किंवा लुबाडणूक होत होती, त्याच प्रश्नांवर त्यांनी भर दिला. तसे काही कोणाला करता आले तर शुभेच्छा!
(संकीर्ण)
(लेख खूपच लांबलचक आहे. तूर्तास पूर्ण वाचलेला नाही. (कदाचित वाचणारही नाही.) परंतु, वरवर चाळीत असताना काही मुद्दे जे डोळ्यांवर धावून आले, त्यांचा परामर्श-वजा प्रतिक्रिया.)
आपण भारतीय निरीश्वरवादी सध्या ज्या वातावरणात जगतो आहोत...
आपण भारतीय निरीश्वरवादी??? स्वतःपुरते बोला! Please count me out of it.
(माझ्यापुरतेच बोलायचे झाले, तर, (इतरत्र म्हटल्याप्रमाणे) मी (एका टोकास) निरीश्वरवादी ते (दुसर्या टोकास) साक्षात परमेश्वर या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये (माझ्या तात्कालिक मूडप्रमाणे) लीलया वावरतो. त्यामुळे, तुमच्यासारख्यांबद्दल क्वचित तात्कालिक सहानुभूती जरी वाटत असली — आणि, सहमती (तथा सहानुभूती) असो, वा नसो, परंतु, तुमची मते मांडण्याचा तुमचा अधिकार मला मान्य जरी असला, तरीसुद्धा — मला आपल्यातून वगळाच!)
(शिवाय, तूर्तास मी भारतीयसुद्धा नाही. अर्थात, हा त्यातल्या त्यात तुलनेने गौण मुद्दा आहे, परंतु तरीही.)
भारतीय संस्कृतीचा सर्वात उच्च प्रतीच्या अभिमानाचा विषय होता, वैचारिक मोकळीक.
नक्की कधीपासून, म्हणे? उलट मी तर म्हणतो की भारतीय संस्कृतीसारखी विचारद्वेष्टी संस्कृती दुसरी नसावी! आणि, भारतात जर चुकून कधी काही नवीन विचार वगैरे रुजले असतीलच, तर ते भारतीय संस्कृतीमुळे वगैरे नसून, भारतीय संस्कृतीच्या बावजूद — भारतीय संस्कृतीच्या नाकावर टिच्चून — आहेत.
भारतीय संस्कृतीसारखी/इतकी दुसरी झुंडवादी संस्कृती त्रिभुवनात शोधून कोठे सापडणार नाही!
(आणि, हे भारतात तथाकथित 'हिंदुत्ववाद' वगैरे बोकाळू लागल्यापासूनच वगैरे नसून, पूर्वापार हे असेच आहे. किंबहुना, वाढता (राजकीय) हिंदुत्ववाद ही जर यामागची कारणमीमांसा देण्याचा हा प्रयत्न असेल, तर मी तर म्हणेन की तुमचा कार्यकारणभाव साफ गंडलेला आहे. वाढता (राजकीय) हिंदुत्ववाद हा भारतीय झुंडशाहीस कारणीभूत नसून, भारतीय झुंडशाही ही वाढत्या (राजकीय) हिंदुत्ववादास कारणीभूत आहे!)
पण या ट्रोलिंगपलीकडे जाऊन आपणा सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना एक गुण चिकटवला जातो. की ते स्वतःला फार शहाणे समजतात.
यात काही खोटे आहे काय?
उलटपक्षी, भारतवर्षात कोण स्वतःला शहाणा समजत नाही? (अन्यथा, उदाहरणादाखल, मराठी संकेतस्थळे चालू शकली असती काय?)
तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता, यात इतरांहून वेगळे असे तुम्ही काहीच करत नाही. सबब, (निदान भारतवर्षात तरी) हा गुन्हा असू नये.
(खरे तर कोठेच असू नये. परंतु, विशेषेकरून भारतवर्षात तर असू नयेच नये.)
पण लक्षात कोण घेतो?
(एक लक्षात घ्या. स्वतःला शहाणे समजण्याचा 'वैचारिक बैठकी'शी (किंवा, 'वैचारिक बैठक' वगैरे असण्यानसण्याशी) काहीही संबंध नाही. दोन पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत त्या!)
हे पाहा, इथे तुम्ही नास्तिक नसलेल्यांनी येऊ नये असं स्पष्ट सांगितलंय.
हा सार्वजनिक मंच आहे, हो! (शिवाय, तुमच्या मालकीचासुद्धा नाही.) इथे कोणी यावे, नि कोणी येऊ नये, हे तुम्ही कोण ठरविणार?
आम्ही कुणाचं धर्मांतर करायला बसलेलो नाही.
तुम्ही जर तुमच्या खाजगी निरीश्वरवादी क्लबांतून निरीश्वरवादाचे चिंतन, चिकित्सा, चर्चा वगैरे केवळ आपापसात करीत असतात, तर तुमच्या या दाव्याला काही अर्थ असता. (आणि, त्या परिस्थितीत, तुम्हाला त्रास द्यायला तर सोडाच, परंतु तुम्हाला त्याबद्दल विचारायलासुद्धा कुत्रे आले नसते, याबद्दल मला खात्री आहे.) परंतु, तुमच्यातल्याच अनेकांना ('विवेकवादा'च्या नावाखाली) सार्वजनिक मंचांवर टपकून, परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे हे कसे गाढवपणाचे आहे, यावर लेक्चरवजा/प्रचारवजा लेख टाकण्याची खोड असते. (खुद्द मआंजावर असले प्रकार मुबलक झालेले आहेत.) भले त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करूनसुद्धा, हा परिवर्तनाचा प्रयत्न नाही, तर दुसरे काय आहे?
(किंबहुना, माझे तर म्हणणे आहे, की तुमचे प्रचारक हे ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या किंवा रा.स्व. संघाच्या प्रचारकांच्या तोडीस तोड असतात. (खरे तर, अनेकदा त्यांच्याहूनही rabid असतात.) परंतु, ते माझे वैयक्तिक मत असल्याकारणाने, ते एक असोच.)
(हं, ('धारयति इति धर्मः' या निकषाप्रमाणे) निरीश्वरवाद हा एका प्रकारे तुमचा धर्म म्हणता येईल (आणि, ते ठीकच आहे.), आणि, त्या अनुषंगाने, भारतीय घटनेने तुम्हाला तुमचा धर्म केवळ पाळण्याचाच नव्हे, तर त्याच्या प्रसाराचा/प्रचाराचाही अधिकार दिलेला आहे, हेही ठीकच आहे. परंतु, सार्वजनिक मंचावर जर तुम्ही प्रचार करू लागलात (जे पूर्णपणे तुमच्या अधिकारात आहे), तर त्याला बरीवाईट प्रतिक्रिया न येण्याची अपेक्षा तुम्ही कशी काय बरे करू शकता? तुमचा प्रचार करण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे, तसाच, तुमच्याबद्दल बरीवाईट मते बनवून ती व्यक्त करण्याचा अधिकार, प्रकरणाची परिणती जोवर तुमच्याविरुद्ध शारीरिक हिंसेत होत नाही, तोवर, इतरांस नाही काय? खरे तर हे कोणत्याही एका विशिष्ट मताच्या गटाने (भले ते हिंदू असोत, ख्रिश्चन असोत, मुसलमान असोत, नास्तिक असोत, अथवा कम्युनिस्ट) दुसर्या गटासमोर आपला प्रचार केल्यास घडणे अनपेक्षित नसावे; मग तुमच्याच मताच्या गटात असे काय विशेष आहे बुवा, की तुमच्या गटास हे लागू होणे हे काही जगावेगळे ठरावे? तेथेच तेवढा 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'चा कावा कशाला?)
सांगण्याचा मतलब, तुमचे विचार काय आहेत (आणि/किंवा असावेत), झालेच तर ईश्वराच्या असण्यानसण्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, हा सर्वस्वी तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ती तुम्ही तुमच्या व्यक्तिगत मगदुराप्रमाणे काहीही ठरवावी; मला (किंवा, खरे तर कोणालाच) त्याच्याशी घेणेदेणे असण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही ती केवळ आपापसात मनसोक्तपणे मांडलीत, नव्हे, अगदी त्यावर खाजगीत परिसंवाद जरी झोडलेत, तरी तो सर्वस्वी तुमचा मामला अत एव अधिकार आहे. त्याउपर, सार्वजनिकरीत्या ती भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार तुम्हाला आहेच; फक्त, त्यावरून प्रतिव्यक्ती होऊच नये, ही अपेक्षा वाजवी नव्हे. तशी अपेक्षा करायला तुम्ही कोणीही जगावेगळे लागून गेलेला नाहीत.
बाकी चालू द्या.
.
गेल्या काही वर्षांत वाचलेल्या काही पुस्तकांतून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. बहुधा, जोनाथन हैट याच्या एका पुस्तकात तो म्हणतो ही धर्म जसा लोकांना एकत्र आणतो तसं दुसरं काही एकत्र आणू शकत नाही. मी नास्तिक आहे आणि हे मला पटतं.
100 वर्षांपूर्वी र.धो कर्वे रिझन नावाचं एक इंग्रजी मासिक चालवत. त्यामध्ये अनेक भारतीय आणि पाश्चात्य लोकांकडून त्यांनी लिहून घेतलं होतं. त्यात अगदी मुसलमान, हिंदू, पारसी सगळ्या धर्मांचा दांभिकपणा त्यांनी दाखवून दिला आहे. त्यात तेही वारंवार म्हणतात की काही वर्षांत लोक अधिक बुद्धिवादी होतील. आणि या अंधश्रद्धा संपतील. त्याला आता १०३ वर्षं झाली.
पण
नास्तिक लोकांनी एकत्र येणं सोपं नाही. कारण एकदा तुम्ही एखाद्या गटाच्या सुरक्षिततेविना राहायला शिकलात की तुम्ही पुन्हा गटात जाण्यास विशेष उत्सुक नसता. शिवाय, नास्तिकांनी देवाचा नाद सोडून जे जे काही इतर नाद लावून घेतलेले असतात त्या गटांमध्ये ते रमताना दिसतात.
पण तरीही धर्म आणि देव जसा लोकांना (अजूनही) एकत्र आणतो तसं नास्तिक्य आणत नाही. आणि तसे गट केले तर त्यांचीही थट्टा होते.
लोक निर्बुद्ध आहेत म्हणून देव मानतात हे सरसकटीकरण आहे आणि एखाद्याला निर्बुद्ध म्हणून सुरुवात केली तर तो आपलं म्हणणं का ऐकून घेईल?
लोकांना जनरली नॉर्मल डिस्ट्रिबयुशनखाली राहायला आवडतं. It is a human thing to avoid ostracization of any kind. मग त्या बेल कर्वखाली जे जे काही सांगितलं जातं ते त्यांना पटत जातं किंवा ते तसा अभिनय करत असतील.
अलीकडे तिऱ्याईतला भेटल्यावर हळूच आपण मोदीच्या बाजूचे आहोत हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने सुचवणे अगदी सर्वसामान्य झाले आहे. कारण सध्या वातावरण तसं करण्यास पोषक आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्याच गोष्टी अंगिकारल्या जात आहेत. १० वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी केवळ आणि केवळ कामासाठी भेटणारे लोक कधी "आता डेव्हलपमेंटही चांगली चालली आहे. अमुकतमुक महामार्ग होतोय." करत करत अयोध्येला मंदिर बांधलं ते किती चांगलं झालं असं म्हणत नसत (कारण तेव्हा मंदिरही नव्हतं! ते सोडून द्या). पण अलीकडे वारंवार "आम्ही त्यांचे तुम्ही कुणाचे?" अशा धर्तीचे प्रश्न जे लोक विचारतात. इथे शांत राहण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. आणि आपण काही बोलत नाही म्हणजे आपण त्यांचे नाही हे समजण्याइतके निर्बुद्ध "ते" नक्कीच नसतात.
हे बदलायला फार काळ जावा लागणार आहे. आजच्या लहान पिढीला याचा वीट आला तरच हे शक्य आहे.
अवांतर: मला संपूर्णपणे नास्तिक्यात ढकलून देण्याचे श्रेय माझ्या पीएचडी गाईडला जातं. तो अत्यंत भांडखोर आणि तत्त्वाचा असल्याने त्याला नोकरीच्या ठिकाणी अनेक अडचणी यायच्या. त्याची आई आस्तिक होती. जेव्हा जेव्हा तो अडचणीत असायचा तेव्हा ती त्याला सांगायची "बघ तुझा देवावर विश्वास नाही म्हणूनच हे सगळं होतंय तुझ्या आयुष्यात". ख्रिसमसची सुट्टी असली आणि तो घरी बसला की त्याला म्हणायची "ही आमची धार्मिक सुट्टी आहे. तू याचा उपभोग का घेतोस?"
यावर तो अनेक विनोद करायचा. पण आमच्या तेव्हा लक्षात आलं की देवावर श्रद्धा असेल तर अडचणीत प्रार्थना तरी करता येते. आपल्याला काहीच करता येत नाही!
.
तेही वारंवार म्हणतात की काही वर्षांत लोक अधिक बुद्धिवादी होतील.
‘बुद्धिवादी’ म्हणजे कोण? जो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो, तोच ना?
(त्या स्वतःच्या बुद्धीच्या वापरातून, ईश्वर वगैरे काही नसते, उगाच ईश्वरावर अवलंबून राहण्यात हशील नाही, वगैरे निष्कर्षांप्रत तो येईलही कदाचित. Fair enough. I don’t have a problem with that.)
पण मग हा वरचा लेख जो ‘नास्तिक्स ऑफ द वर्ल्ड, युनाइट! ऑल यू हॅव टू लूज़ इज़ युअर देव!’-छाप झुंडवादी टोन घेऊन बोंबलून राहिलाय, त्याची वासलात कशी लावायची? हे कसले बुद्धिवादी? फॉर्दॅट्मॅटर, हे कसले नास्तिक? नास्तिक्याच्या नावाखाली चालवलेला कल्ट आहे नुसता!
मी जर बुद्धिवादी असेन, माझ्या स्वतःच्या बुद्धीवर जर अवलंबून राहात असेन, आणि माझ्या स्वतःच्या बुद्धीच्या वापरातून जर मला वाटले, की देवबिव सगळे झूट आहे, नि त्यातून (माझ्या स्वतःच्या convictionमधून) जर मी झालो नास्तिक, तर ते ठीक आहे. परंतु, हे लोक म्हणतात म्हणून मी नास्तिक का व्हावे? (Or, worse still, मी जर स्वतःला नास्तिक म्हणवू लागलो नाही, तर हे लोक मला मूर्ख म्हणतील, म्हणून मी नास्तिक काय म्हणून व्हावे? Who the hell are these people to tell me what to believe and what not to believe? And why can’t they mind their own business? हे म्हणजे, मी जर हिंदू देवतांवर विश्वास ठेवला, तर ख्रिस्ती प्रचारक मला पापी म्हणतात, म्हणून मी ख्रिस्ती बनण्यासारखे झाले! त्यात आणि यात नक्की काय फरक आहे? आणि, for all you know, I might already be an atheist out of my own convictions. But why would I want to identify with, to associate with, these cultists, or to admit the fact of my atheism to them? It is none of their business, in any case! आणि, समजा, जर मी नसलो नास्तिक, तर यांच्या बापाचे काय जाते?)
In any case, isn’t intellectualism all about some sort of a rugged individualism? How is surrendering your own intellect to some kind of a group-think “intellectualism” in any way?
नास्तिक लोकांनी एकत्र येणं सोपं नाही. कारण एकदा तुम्ही एखाद्या गटाच्या सुरक्षिततेविना राहायला शिकलात की तुम्ही पुन्हा गटात जाण्यास विशेष उत्सुक नसता.
नेमके! तुम्ही जर बुद्धिवादी असलात, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहात असलात (आणि, incidentally, त्या स्वतःच्या बुद्धीच्या वापरातून जर नास्तिक्याप्रत पोहोचला असलात), तर तुम्हाला गटात (अगदी नास्तिकांच्या म्हणवणाऱ्या गटातसुद्धा!) जायला आवडणार नाही. किंबहुना, गटांशी तुमचे जमणार नाही; you would always be suspicious of groups and the group-think that must inevitably go with them.
आणि म्हणूनच, हे वरच्यासारखे बुद्धिवादाचा, नास्तिक्याचा प्रचार करणारे झुंडवादी हे प्रचंड फ्रॉड आहेत, असे मला वाटते. आणि, लेख वरवर चाळतानासुद्धा (लेखकांना उद्देशून) “तुमच्या बैलाला घो!” म्हणून जोरात ओरडण्याची ऊर्मी प्रबळ का होत होती, ते आता कळले. (त्याबद्दल तुमचे आभार.)
(बादवे, ‘नास्तिक लोकांनी एकत्र येणे सोपे नाही’पेक्षासुद्धा, ‘नास्तिक लोकांना एकत्र येण्याची गरज नाही’ हा मुद्दा नव्हे काय?)
असो.
ख्रिसमसची सुट्टी असली आणि तो घरी बसला की त्याला म्हणायची "ही आमची धार्मिक सुट्टी आहे. तू याचा उपभोग का घेतोस?"
यालाही समर्पक उत्तरे (not necessarily as an atheist, but as a non-Christian, in general) आहेत. परंतु, तूर्तास विषयांतर नको. पुन्हा कधीतरी.
आणखी एक मुद्दा
हे लोक मला मूर्ख म्हणतील, म्हणून म्हणा, किंवा कानांवर आदळत राहणाऱ्या यांच्या संततप्रचाराच्या कटकटीला कंटाळून म्हणा, मी यांच्यासमोर तोंडदेखले जर स्वतःला ‘नास्तिक’ म्हणवू लागलो (भले माझा देवावरचा विश्वास उडालेला नसला, तरीही), तर मग मी खरोखरच नास्तिक झालो का?
A man convinced against his will
Is of the same opinion still.
.
(बादवे, ‘नास्तिक लोकांनी एकत्र येणे सोपे नाही’पेक्षासुद्धा, ‘नास्तिक लोकांना एकत्र येण्याची गरज नाही’ हा मुद्दा नव्हे काय?)
माझं वैयक्तिक निरीक्षण असं आहे की तुम्ही भारतात राहत असलात आणि त्यातही स्त्री असलात तर तुम्हाला किमान बायकांच्या गटात स्वतःला सामावून घेण्यासाठी काही प्रमाणात परंपरावादी असावं लागतं. आता आमच्या सोसायटीत बायका कधी कधी एकत्र येतात? एक अतिशय लार्ज स्केल संक्रांत हळदीकुंकू असतं. आणि "तुम्ही कधीच येत नाही" म्हणून मला ४-५ ठिकाणाहून फोन येतात. मग मला झक मारत मंगळसूत्र घालून जावं लागतं. हे मला आवडत नाही पण ही दुनियादारी आहे.
समजा व्यायामाच्या निमित्ताने काही मैत्रिणी झाल्या तर काही दिवसांतच त्यातही अशा काहीतरी कार्यक्रमाची भेसळ होते. नास्तिक म्हणून असं एकत्र येणं नाही. पण नास्तिक लोकांनाही मैत्रीची गरज असते..आणि गटात राहावं वाटतं. ती एक मानवी गरज आहे. पण असे गट म्हणजे सिनेमा क्लब, बुक क्लब अशाच धाटणीचे असतात. आणि ते अभावाने सापडतात. मला अशी काही ठिकाणं सापडली आहेत. पण परदेशी असताना असं काहीतरी सापडणं अधिक सोपं होतं असं मला वाटतं.
शिवाय ४ तथाकथित बुद्धिवादी एकत्र आले की त्यांच्यात लगेच काही वैचारिक मतभेदांमुळे फूट पडते. त्यामुळे याचं थोडं extrapolation केल्यास लक्षात येतं की लिबरल धारणा असलेल्या लोकांना एका छताखाली एकत्र आणून एखाद्या गोष्टीला विरोध करायला लावणंदेखील तितकंच अवघड आहे. डाव्या विचारसरणीत इंद्रधनुष्यपेक्षा अनेक पटीने जास्त छटा आहेत. त्यामुळे एक धर्म एक देव एक नेता अशा झापड लावून जाण्याच्या उपक्रमात ते झापड लावून जात नाहीत.
मोदींनी आयत्यावेळी पक्ष फोडले, कुठेही कुणाशीही युती केली तरी त्यांचे अनुयायी "राजकारणात अशी चाणक्यनिती वापरावीच लागते" असं म्हणतात. पण राहुल गांधी अख्खा देश चालून आला, पण लिबरल लोकांमध्ये कुणीही हिरीरीने त्याच्या मागे गेले असं दिसत नाही. Nitpicking is a feature of the left. खुसपट काढल्याशिवाय समाधान मिळत नाही.
शिवाय, बुद्धिवादी असणे म्हणजे काय? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वतःच्या बुद्धीला जे पटेल ते करणं. येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्याला जो योग्य वाटतो तो निर्णय घेणं. आस्तिक लोकांकडे अशा परिस्थितीत तगून राहण्यासाठी श्रद्धा असते. It is a psychological placebo. त्यांना धीर देणारे अनेक आस्तिक त्यांच्या आजुबाजूला असतात. पण जेव्हा "मी" म्हणजेच "individual" हेच समाजाचं एकक आहे असं आपण समजतो तेव्हा आपलं बरं वाईट आपल्याच हातात आहे याचा एक ताण येतो.
म्हणून नास्तिकांनाही गट हवे असं मला वाटतं. पण नास्तिकतेचा प्रचार करणं व्यर्थ आहे.
+१
दीड वर्षांपूर्वी नवरात्रीच्या वेळेस माझ्या समोरच्या बाईनं मला 'चँटिंग'ला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. "मी फक्त गप्पा मारण्यापुरती येईन", हेही तिनं उदार मनानं मान्य केलं. मात्र "चांगले कपडे घालून ये", हे मी उदार मनानं मान्य केलं नाही आणि तिकडे गेले नाही. (माझ्यासमोर तसाही दिवाळी अंकाच्या कामाचा रगाडा होता ही बाब निराळी.)
मी एका बुक क्लबात जात होते. तिथे इतालो काल्व्हिनोची 'द ब्लॅक शीप' नावाची कथा लोकांना गंमत म्हणून वाचायला दिली. चोरी करणं सगळ्या समाजाला मान्य आहे, हे एकीला पटलं नाही; तिला म्हणाले, त्या जागी सगळे धर्मोपदेश करतात, किंवा धर्मांतर घडवतात असं म्हण. त्यानं काही फरक पडत नाही. ती बाई चांगलीच धार्मिक होती; आणि ती वैतागली. माझ्यासाठी ती शेवटची काडी ठरली आणि मी तो बुक-क्लब सोडला.
कुठलाही गट पुरेसा यशस्वी ठरायचा, तर पुरेसा मोठा असावा लागतो. तसा मोठा असायचा तर सगळ्यांचे नखरे खपवून घ्यायला लागतात - जे अशक्य असतं. मग बहुमताचे नखरे - ज्याला बहुमत एवढंच म्हणतात - मान्य करावं लागतं. बुकक्लबाच्या नावाखाली लोक वरवरची चर्चा करायचे आणि चखणा खात, दारू पित आपल्या कुटुंबकबिल्याच्या चर्चा करत बसायचे. यात देवाचा काहीही संबंध नाही.
ऑस्टिनमधल्या एका नास्तिकांच्या गटात जाणं मी सोडलं कारण ते लोक सारखे ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन धार्मिकांची निंदा करत बसायचे. माझा मुळात ख्रिश्चन धर्मावर रागच नाही; काय असायचा तो हिंदू धर्मावर असेल. मुदा तो नाही. किती सारखी कटकट, किरकिर, तक्रारखोरी करत बसायचं!
आणखी एक उदाहरण. मी एका स्वयंसेवी पद्धतीनं चालणाऱ्या कॉन्फरन्ससाठी काम करते. सायपाय असं तिचं नाव. पायथन या भाषेत विज्ञान आणि इतर विषयांमधल्या कामाबद्दल ही परिषद असते. तिथे DEI ही बाब महत्त्वाची आहे. बहुतेक लवकरच मला माझ्या एका गोऱ्या, स्ट्रेट, पुरुषाला तिथे स्वयंसेवक म्हणून आणण्यासाठी काही कांड करावं लागेलसं दिसतंय. (तो माझा मित्र आहे; आणि भरवशाचा आहे, चांगलं काम करेल याची मला खात्री आहे म्हणून.)
देव, धर्म, कर्मकांडं कसलीही होतात. पुरेसा मोठा गट तेवढा पाहिजे!
(काहीसे अवांतर)
कुठलाही गट पुरेसा यशस्वी ठरायचा, तर पुरेसा मोठा असावा लागतो.
मुळात नास्तिक हे एक गट म्हणून यशस्वी झालेच पाहिजेत, हा आग्रह कशासाठी?
ऑस्टिनमधल्या एका नास्तिकांच्या गटात जाणं मी सोडलं कारण ते लोक सारखे ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन धार्मिकांची निंदा करत बसायचे. माझा मुळात ख्रिश्चन धर्मावर रागच नाही; काय असायचा तो हिंदू धर्मावर असेल. मुदा तो नाही. किती सारखी कटकट, किरकिर, तक्रारखोरी करत बसायचं!
पाकिस्तानचे raison d’etre ‘आम्ही हिंदुस्थान नाही’ हे आहे. तशातलाच प्रकार आहे हा.
मुळात ते ख्रिश्चन धर्माची किंवा ख्रिश्चन धार्मिकांची निंदा करतात, याचे कारण ते ख्रिश्चन धर्मातून फुटून निघून स्वतःस नास्तिक म्हणवू लागले आहेत, म्हणून. हिंदू धर्मातून फुटून निघून जर स्वतःस नास्तिक म्हणवू लागले असते, तर हिंदू धर्माची नि हिंदू धार्मिकांची निंदा केली असती, आहे काय नि नाही काय! येथे मुद्दा ‘आम्ही नास्तिक आहोत’ हा नसून, ‘आम्ही ख्रिस्ती नाही! (आता नास्तिक झालो आहोत, बरे का?)’ हा आहे.
(मीदेखील अनेकदा भारतीयांना शिव्या घालतो. याचे कारण, मी स्वतः कधीतरी भारतीय होतो (नि आता भारतीयत्व सोडून अमेरिकन झालो आहे), हे आहे, नव्हे काय? आता, वास्तविक, (उदाहरणादाखल) कोरियन लोक हेदेखील (कोणास ठाऊक, कदाचित) भारतीय लोकांइतकेच (किंवा त्याहूनही अधिक) नालायक असू शकतीलही; परंतु, मला त्यांचे सोयरसुतक ते काय (आणि का) असावे बरे?)
देव, धर्म, कर्मकांडं कसलीही होतात. पुरेसा मोठा गट तेवढा पाहिजे!
अगदी! (नास्तिकांच्या झुंडीसही हे लागू व्हावे, नव्हे काय?)
असो चालायचेच.
कोरियन लोकांना नावं ठेवणं!
वास्तविक, (उदाहरणादाखल) कोरियन लोक हेदेखील (कोणास ठाऊक, कदाचित) भारतीय लोकांइतकेच (किंवा त्याहूनही अधिक) नालायक असू शकतीलही; परंतु, मला त्यांचे सोयरसुतक ते काय (आणि का) असावे बरे?)
माझा एक तरुण कोरियन मित्र आहे. तो कोरियन लोकांना नावं ठेवत होता की कसे हे लोक (तो आमचे लोक म्हणत होता) वरवरच्या सौंदर्याच्या मागे लागलेले असतात. (कोरियात प्लास्टिक सर्जरीचं मोठं प्रस्थ आहे.) आणि मी त्याचा काही अंशी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला - असते कुणाकुणाची हौस म्हणून.
मुळात नास्तिक हे एक गट म्हणून यशस्वी झालेच पाहिजेत, हा आग्रह कशासाठी?
माझा नाही असा आग्रह. किंबहुना नास्तिक फार यशस्वी झाले तर मी घराबाहेर कदाचित धार्मिक म्हणवून घेईन स्वतःला. (हे किमान माझ्या आयुष्यात कधी होणार नाहीये, हे माहीत आहे म्हणून बोलायला काय जातंय माझं!)
…
पण जेव्हा "मी" म्हणजेच "individual" हेच समाजाचं एकक आहे असं आपण समजतो तेव्हा आपलं बरं वाईट आपल्याच हातात आहे याचा एक ताण येतो.
ताण येणे स्वाभाविक आहे. तर मग त्या ताणास स्वबळावर सामोरे जायला, त्याच्याशी डील करायला शिका!
म्हणून नास्तिकांनाही गट हवे असं मला वाटतं.
हे त्याला उत्तर नव्हे! On the contrary, it is counterproductive; totally defeats the purpose.
(येथे तुम्ही बुद्धिवादी नास्तिक आहात, स्वतःच्या बुद्धीच्या वापरातून नास्तिक्याप्रत पोहोचला आहात, हे गृहीत धरलेले आहे. तुम्ही जर निर्बुद्ध, झुंडवादी नास्तिक असलात, तर गोष्ट वेगळी. त्या परिस्थितीत, मुळात तुमची नास्तिक्यामागची प्रेरणा शंकास्पद आहे. म्हणजे, कोठल्यातरी गटात सामील व्हायचेच आहे, ही मूळ प्रेरणा आहे, आणि मग कोठल्यातरी गटात सामील व्हायचेच जर आहे, तर, चला, नास्तिकांचा हा गट कूल वाटतोय, तर आजपासून आपण नास्तिक, अशी शक्यता अधिक वाटते. परंतु, ते असो. तुम्हाला हे लागू नाही, असे आगाऊ गृहीत धरलेले आहे.)
आता, तुम्ही बुद्धिवादी नास्तिक आहात, म्हटल्यावर तुमच्यासारख्या नास्तिकांचा गट असणे हे counterproductive कसे? तर असे पाहा. कोठल्याही समूहाचा/गटाचा/झुंडीचा बुद्ध्यंक हा त्या समूहातील/गटातील/झुंडीतील सर्वात कमी बुद्ध्यंक असलेल्या व्यक्तीच्या बुद्ध्यंकाइतका असतो, हे सामान्य तत्त्व कदाचित तुम्ही ऐकून असाल. त्यामुळे, (प्रस्तावित गटातील सर्वात कमी बुद्ध्यंक तुमचाच असल्याखेरीज) अशा एखाद्या गटात सामील होऊन परिणामी तुम्ही तुमचा बुद्ध्यंक जाणूनबुजून खाली आणीत आहात, नव्हे काय? आणि, असे करणे हे तुमच्या बुद्धिवादास मारक नव्हे काय?
आणि, समजा, प्रस्तावित गटातील सर्वात कमी बुद्ध्यंक तुमचा जरी निघाला, तरीसुद्धा, अशा गटात सामील होणे (किंवा, मुळात असा गट बनवणे) हे तुमच्याकरिता कदाचित जरी नाही, तरी गटातील उर्वरित सर्व सदस्यांकरिता counterproductive ठरू नये काय?
सांगण्याचा मतलब, ‘बुद्धिवाद्यांचा गट’ हे वदतो व्याघाताचे (मराठीत: oxymoron. किंवा, contradiction in terms.) उत्तम उदाहरण आहे, अशी माझी धारणा आहे. Quod Erat Demonstrandum.
असो चालायचेच.
.
हे एव्हाना मला पटलं आहे. कारण भारतात परत आल्यापासून, म्हणजे साधारण तिशी ओलांडल्यानंतर मला कोणत्याही गटात राहता आलेलं नाही. आधी याचं खापर मी स्वतःवर फोडून घ्यायचे. मला मैत्री टिकवता येत नाही. किंवा मी खुसपट-काढू आहे. किंवा मी अडियल आहे वगैरे वगैरे. हे सर्व तर मी आहेच. पण ज्या गटांमध्ये मी वावरत होते ते गटही काही फार शुद्ध नव्हते. कोणत्याही एका गटात पुरेसा वेळ घालवला की त्यांच्यातले परस्पर हितसंबंध लक्षात येतात आणि मग घुसमट होऊ लागते. त्यापेक्षा आपण एकटेच बरे असा निर्णय मी अनेकदा घेऊन पुन्हा कोणत्यातरी गटात अडकलेले आहे. आता मी त्यातले बरेचसे सोडून दिले आहेत. पण मग असं काही रिसर्च प्रसिद्ध होतं की सर्वात चांगलं आयुष्य जगणाऱ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्यांचं खूप मोठं मित्रवर्तुळ आहे. मग पुन्हा आपलाही एक गट असावा असं वाटू लागतं. पण प्रौढ वयात मैत्री करणं अवघड असतं. आणि आपल्या रोजच्या व्यवधानांतून त्या गटांसाठी वेळ काढणं तर त्याहूनही अवघड. नास्तिकांचा असा गट नव्हे पण असा गट ज्यात धार्मिक गोष्टींची भेसळ नसेल.
…
पण मग असं काही रिसर्च प्रसिद्ध होतं की सर्वात चांगलं आयुष्य जगणाऱ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्यांचं खूप मोठं मित्रवर्तुळ आहे.
- एखादा मनुष्य ‘सर्वात चांगले’ आयुष्य जगला, हे नक्की कोणी आणि नक्की कशावरून ठरवायचे?
- ‘खूप मोठे’ मित्रवर्तुळ म्हणजे नक्की किती? (‘कावळ्याला आमंत्रण’-छाप प्रश्न आहे, हे आगाऊ मान्य आहे.)
(बाकी, मित्रांबद्दलच बोलायचे, तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व असू नये काय?)
नास्तिकांचा असा गट नव्हे पण असा गट ज्यात धार्मिक गोष्टींची भेसळ नसेल.
म्हणजे थोडक्यात, (वरच्यासारखे) झुंडवादी नास्तिक नकोत. (कारण, झुंडीचे नास्तिक्य हा एका प्रकारचा धर्मच आहे. धारयति इति धर्मः। येथे नास्तिक्य हे झुंडीस धरून ठेवते. तस्मात्, नास्तिक्य हा प्रस्तुत झुंडीचा धर्म आहे.)
The irony is, लेखात शेवटीशेवटी कोठेतरी ‘निरीश्वरवादी म्हणवणाऱ्या धर्मवादी’ लोकांनाही शिव्या घातलेल्या आहेत; एवढेच नव्हे, तर त्यांची वासलात ‘अजिबात वेळ न घालवण्यासारख्या कॅटेगरी’त लावून दिलेली आहे. हे self-deprecatory खचितच नसावे, अशी शंका, का, कोण जाणे, परंतु, राहूनराहून येते. असो चालायचेच.
एखादा मनुष्य ‘सर्वात चांगले’…
- एखादा मनुष्य ‘सर्वात चांगले’ आयुष्य जगला, हे नक्की कोणी आणि नक्की कशावरून ठरवायचे?
- ‘खूप मोठे’ मित्रवर्तुळ म्हणजे नक्की किती? (‘कावळ्याला आमंत्रण’-छाप प्रश्न आहे, हे आगाऊ मान्य आहे.)
(बाकी, मित्रांबद्दलच बोलायचे, तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व असू नये काय?)
Mr. Rehbock and Mr. Steinman are both considered “super-agers,” people 80 and up who have the same memory ability as someone 20 to 30 years younger. Scientists at Northwestern University have been studying this remarkable group since 2000, in the hopes of discovering how they’ve avoided typical age-related cognitive decline, as well as more serious memory disorders like Alzheimer’s disease. A new review paper published Thursday summarizes a quarter century of their findings.
Super-agers are a diverse bunch; they don’t share a magic diet, exercise regimen or medication. But the one thing that does unite them is “how they view the importance of social relationships,” said Sandra Weintraub, a professor of psychiatry and behavioral sciences at the Northwestern Feinberg School of Medicine, who has been involved in the research since the start. “And personality wise, they tend to be on the extroverted side.”
थोडक्यात, काळजी घ्या नबा, आणि पुण्यात आलात तर अबापट यांना नक्की भेटून जा.
(बादवे…)
(…’कोरिलेशन इज़ नॉट कॉज़ेशन’ की कायसेसे म्हणण्याची फॅशन तुमच्यातच असते ना?)
डेंग शाओपिंग ९२ वर्षे जगला. आयुष्यभर मजबूत सिगारेटी फुंकीत आला. (अखेरीस वयाच्या ८६व्या वर्षी त्याने सिगारेटी फुंकणे कायमचे सोडून दिले, ही बाब अलाहिदा.) किंबहुना, आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आपल्या मजबूत सिगारेटी फुंकण्यात आहे, असा त्याचा दावा होता.
बरे मग?
असो. मुद्दा तोही नाही. भरपूर मित्रवर्तुळ असल्यामुळे वयोमानपरत्वे होणाऱ्या मानसिक ऱ्हासास आळा बसतो, असे जरी मानले, तरीसुद्धा, पुढेमागे कदाचित आपण जर तितके लांबपर्यंत जगलोच, तर कदाचित त्या वेळेस आपला मानसिक ऱ्हास जर होणारच असेल, तर त्याला कदाचित आळा बसू शकेल, केवळ म्हणून झुंडीकडे आपली अक्कल (आत्तापासूनच) गहाण टाकण्याची किंमत अंमळ जास्त होत नाही काय?
झालेच तर, पुढे म्हातारपणी आपला (व्हायचा असेल तर) मानसिक ऱ्हास होऊ नये, म्हणून (आतापासून) टनावारी ‘मित्र’ गोळा करून ठेवणे, हा (to put it in extremely mild terms) त्या (तथाकथित) मित्रांचा (केवळ) आपल्या स्वार्थासाठी निव्वळ वापर नव्हे काय?
ही कसली ‘मैत्री’?
राहता राहिली गोष्ट…
थोडक्यात, काळजी घ्या नबा, आणि पुण्यात आलात तर अबापट यांना नक्की भेटून जा.
…या मुद्द्याची. माझ्या म्हातारपणी माझा मानसिक ऱ्हास होऊ नये, एतदर्थ इथे या मंचावर येऊन, ज्यांना मी ओळखीतदेखील नाही, अशा (अबापटांसहित) अनेकांबरोबर (बादवे, यात तुम्हीसुद्धा आलात.) मी हॅहॅहॅहॅहूहूहूहू करीत नाही काय? (दुगाण्यासुद्धा झाडतो, परंतु तोदेखील हॅहॅहॅहॅहूहूहूहूचाच भाग समजावा. असो.) त्या दृष्टीने माझे ‘सोशल सर्कल’ (माझ्या अतिवृद्धापकाळीचा माझा संभाव्य मानसिक ऱ्हास रोखण्यासाठी) पुरेसे मोठे आहे, नव्हे काय? मग त्याकरिता प्रत्येक वेळेस जेव्हाजेव्हा मी पुण्यात टपकेन, तेव्हातेव्हा (जस्ट फॉर द सेक ऑफ द एक्झांपल) अबापटांना (किंवा फॉर्दॅट्मॅटर आणखीही कोणाकोणाला) जाऊन जातीने सलाम ठोकणे हे अनिवार्य असणे का अपेक्षिण्यात यावे, यामागील तर्क अथवा कारणमीमांसा माझ्या लक्षात येत नाही. (नाही म्हणजे, (उदाहरणादाखल) अबापटांविरुद्ध (किंवा फॉर्दॅट्मॅटर येथील कोणाच्याही विरुद्ध) माझ्या मनात कोठलाही आकस नाही; किंबहुना, (असलाच तर) त्यांच्याप्रति (पक्षी: अबापटांप्रति) अतीव आदरच आहे. परंतु म्हणून त्यांना (किंवा, येथील कोणालाही) ‘घाटातल्या शिंगरोबा’मध्ये reduce करण्यात नक्की काय हशील आहे, हे मला (ironically, त्या आदरापोटी) समजत नाही. असो. कदाचित ही माझ्या आकलनाची मर्यादा असू शकेल; चालायचेच.)
दुसरी गोष्ट म्हणजे, पुण्यात वावरत असताना मला ‘ऐसी’बाहेरचे (जे काही बरेवाईट असेल, तसे) खाजगी आयुष्य नाही काय? असू नये काय? (पुन्हा: यात येथील कोणाबद्दलही कोठल्याही प्रकारचा काहीही आकस नाही. असो.)
चालायचेच.
Robert Waldinger
https://youtu.be/8KkKuTCFvzI?si=Yqj2P4ntN2X00_5K
Robert Waldinger
हा एक हार्वर्डने केलेला ७५ वर्षांचा अभ्यास आहे. हार्वर्डमध्ये शिकलेला एक गट आणि दुसरा बॉस्टनच्या गरीब वस्तीतल्या मुलांचा गट. ७०० पासून सुरुवात करून शेवटी काहीतरी ३० वगैरे लोक शिल्लक राहिले.
यात चांगलं आयुष्य (म्हणजे समाधानी आयुष्य जगून ९० वर्षांचे जे झाले ते) ठरवण्याचे ३ निकष काढले आहेत.
१. मित्रवर्तुळ
२. जवळची नाती (मुख्यतः लग्न किंवा तशासारखं एक स्टेबल नातं)
३. त्या नात्यांचं स्वरूप. म्हणजे समाधानी लग्नांत असलेले लोक आयुष्याबद्दलच अधिक समाधानी होते. जरी वरवर नोकझोक असली तरी दोघांची ध्येय एक असतील तर ते चांगलं लग्नच म्हणायचं. स्थिर आणि प्रेमाच्या नात्यांत असलेल्या लोकांचं आयुष्य अधिक समाधानी होतं. मग त्यांनी retrospective अभ्यास करून असं शोधून काढलं की ५० व्या वर्षी तुमचं कोलेस्टेरॉल किती यापेक्षा तुमचं लग्न किंवा नातं स्थिर आहे का यावरून तुम्ही ८० गाठणार किंवा नाही ते कळतं. वगैरे वगैरे.
पण यामध्ये अनेक गोष्टी नाहीत
१. स्त्रियांचा अभ्यास नाही.
२. तंत्रद्न्यान वापर आणि त्याचा मनावर होणारा परिणाम नाही
३. अन्न उद्योगाचा झालेला राक्षस नाही.
नवीन लोकांशी मैत्री करण्यापेक्षा जुन्या मित्रांच्या संपर्कात राहण्याने अधिक चांगलं वाटतं असं माझ्या लक्षात आलं. आणि राजकीय विचारधारा वेगळी म्हणून मैत्री कमी करायची असं करण्यापेक्षा मैत्रीमध्ये राजकारण आणायचं नाही असं मी आणि माझ्या काही शाळा मैत्रिणींनी ठरवलं. त्यामुळे आम्हाला जेव्हा एकमेकींच्या सल्ल्याची, सोबतीची गरज असते तेव्हा आम्ही धर्म, देव, राजकारण, मोदी वगैरे बाजूला ठेवून गप्पा मारतो.
शेवटी प्रामाणिक उजवा किंवा प्रामाणिक धार्मिक माणूस कधीही अप्रामाणिक उजव्या डाव्या उभ्या आडव्या माणसापेक्षा अधिक चांगला मित्र होऊ शकतो कारण चांगली मैत्री होण्यासाठी प्रामाणिक असणं पुरेसं असतं या निष्कर्षावर मी आले आहे..
हे म्हणजे…
…डायबेटिक असण्यासाठी रक्तात कमीत कमी किती साखर असली पाहिजे, असे विचारण्यासारखे झाले!
(किंवा, कावळ्याला आमंत्रण देण्यासाठी आणखी कशात तरी कमीत कमी किती आणखी काहीतरी असले पाहिजे, याचा दाखला देणार होतो; परंतु मग ते जरा जास्तच अस्थानी झाले असते, म्हणून सोडून दिले, झाले.)
बोले तो, याचे शास्त्रशुद्ध परिमाण कदाचित मिळू शकेलही; परंतु, उपयोग काय?
(निघालेत (ठरवून) बुद्धिवादी बनायला! (/डायबेटिक बनायला! (/कावळ्याला आमंत्रण द्यायला!)))
असो चालायचेच.
(अतिअवांतर कुतूहल: ‘**त नाही *, आणि कावळ्याला आमंत्रण!’ या म्हणीची नक्की अर्थमीमांसा काय? कावळ्याला नक्की कशासाठी आमंत्रण द्यायचे? आणि, त्याकरिता **त * असण्याची नक्की काय आवश्यकता? असो.)
सहमत
सई केसकर यांनी मांडलेल्या मतांशी पूर्ण सहमत आहे. विशेषतः, कुठल्याही भाविकाला जर तुम्ही निर्बुद्ध म्हटले, तर तो तुमचे म्हणणे ऐकुनच घेणार नाही. त्याशिवाय, तो भाविक आहे म्हणजेच निर्बुद्ध आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः अतिशहाणे असल्याचे कबुल करण्यासारखे आहे.
…
त्याशिवाय, तो भाविक आहे म्हणजेच निर्बुद्ध आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः अतिशहाणे असल्याचे कबुल करण्यासारखे आहे.
केवळ अतिशहाणपणा असला, तर तो एक वेळ परवडला. मला यात छुप्या हुकूमशाहीचा, छुप्या dominationचा वास येतो.
काफ़िर हैं वे, जो बंदे नहीं इस कुफ़्र के!
(ज्या anecdoteवरून प्रेरणा घेतली, त्या anecdoteच्या संदर्भाकरिता याहून बरा, याहून विश्वासार्ह दुवा शोधूनदेखील सापडू शकला नाही, याबद्दल क्षमस्व.)
लोकांनी हे चांगले ओळखले आहे
भारतात असणारे अंध भक्त आणि स्वतः च स्वतः ला पुढरलेले समजणारे फक्त भारतीय नास्तिक एका पेक्षा एक वरचढ असे मूर्ख लोक आहेत. प्रश्न फक्त एक च आहे जास्त मूर्ख कोन आहे. आणि हे ठरवणे पन कठीण होत आहे.
अशी तीव्र प्रतिक्रिया देणे गरजेची होती म्हणून अगदी दुःखी मनाने देत आहे
पर्सनल जीजस
मध्यंतरी कुठल्याशा संवादात 'देपेश मोड' नावाच्या बँडच्या 'पर्सनल जीजस' गाण्याचा विषय निघाला. मी ते गाणं विसेक वर्षांपूर्वी, इंग्लंडात असताना ऐकलं होतं. लग्गेच स्मरणरंजित होऊन मी ते गाणं बऱ्या अर्ध्याला ऐकवलं.
तो किंचित स्कँडलाईज झाला. सुरुवातीला त्याला फक्त 'जीजस' एवढाच शब्द ऐकायला येत होता. एके काळी, त्याच्याच म्हणण्यानुसार (तुझ्याशी लग्न करण्याचं कारण) "गॉडवर बिलीव्ह न करणारी मुलगी मला हवी होती." मध्येच एकदम मी हे काय ऐकवत्ये या विचारानं तो दचकला.
तर त्या गाण्याचे शब्द असे -
Reach out touch base
Your own personal Jesus
Someone to hear your prayers
Someone who cares
Your own personal Jesus
Someone to hear your prayers
Someone who's there
हे शब्द ऐकून तो जसा पुन्हा कामाला लागला, तसेच तुम्हीही हे गाणं ऐकून आपापल्या कामाला लागाल, अशी कामना करते.
असाच चॉकलेट जीजस
Well, I don't go to church on Sunday
Don't get on my knees to pray
Don't memorize the books of the Bible
I got my own special way
I know Jesus loves me
Maybe just a little bit more
I fall on down on my knees every Sunday
At Zerelda Lee's candy store
Well, it's got to be a chocolate Jesus
Makes me feel good inside
Got to be a chocolate Jesus
Keep me satisfied
Well, I don't want no Abba Zabba
Don't want no Almond Joy
There ain't nothing better
Suitable for this boy
Well, it's the only thing that can pick me up
Better than a cup of gold
See only a chocolate Jesus
Can satisfy my soul
(सवांतर प्रश्न)
(पूर्वीही विचारून झालेला आहे, परंतु उत्तर मिळू शकले नाही, म्हणून परत विचारतोय.)
मानवांमध्ये जशी ईश्वरसंकल्पना आहे (मग भले ईश्वर प्रत्यक्षात आहे, किंवा नाही, हा पूर्णपणे वेगळा प्रश्न. परंतु, संकल्पना आहे. भले सर्व मानव मानोत, वा ना मानोत.), तशी ती इतर प्राण्यांत आहे काय?
- मानवाच्या लगेचच्या (immediate) पूर्वजांत (जसे, निअँडरथॉल, क्रो-मॅग्नॉन, डेनिसोवन, वगैरे) किंवा कदाचित त्याही अगोदरच्या पूर्वजांत (जसे, ऑस्ट्रेलोपिथेकस, झिंझॅन्थ्रोपस, होमो इरेक्टस, रामा पिथेकस वगैरे) कोणत्या ना कोणत्या (rudimentary का होईना, परंतु) स्वरूपात ईश्वरसंकल्पना होती काय?
- माकडांमध्ये कोणत्या ना कोणत्या (rudimentary का होईना, परंतु) स्वरूपात ईश्वरसंकल्पना असते काय?
- इतर प्राण्यांमध्ये (कुत्र्यांमध्ये, मांजरांमध्ये, डुकरांमध्ये, गाढवांमध्ये, झेब्र्यांमध्ये, जिराफांमध्ये, कांगारूंमध्ये, उंटांमध्ये, हत्तींमध्ये, झालेच तर उंदरांमध्ये, झुरळांमध्ये) कोणत्या ना कोणत्या (rudimentary का होईना, परंतु) स्वरूपात ईश्वरसंकल्पना असते काय?
(प्रश्नाचा रोख हा आहे: Is the God concept, irrespective of whether God actually exists or not, a product or manifestation of our own unique imagination (as a function of our own unique, developed intelligence) as a species?१ थोडक्यात, भले भाकडकल्पना वा कविकल्पनाच का असेना, परंतु, ‘ईश्वर’ नावाच्या कशाची तरी कल्पना (बहुधा शून्यातून (चूभूद्याघ्या.)) निर्माण करता येणे, हे वाढत्या बुद्धिमत्तेचे, वाढत्या प्रतिभेचे, कदाचित वाढत्या प्रगल्भतेचे लक्षण अथवा द्योतक असावे काय? या (म्हणजे मानववंशशास्त्रीय अथवा उत्क्रांतिवादी) दृष्टिकोनातून ईश्वरसंकल्पनेच्या developmentचा काही अभ्यास झालेला आहे काय? मला माहीत नाही, म्हणून विचारतोय.)
१ In other words, is (a) belief in (some kind of a) God human? (As in, is it a uniquely human trait? Which is not in any way to imply, of course, that atheists are inhuman. So Help Me God!)
(अतिअवांतर)
चिचुंद्रीच्या अथवा पालीच्या (असल्यास) ईश्वराची१ भक्ती करायला आवडेल. (तेवढेच काहीतरी वेगळे, exotic!)
(परंतु, तिथेही साले ते चिचुंद्र्यांमधले नाहीतर पालींमधले (असले तर२) नास्तिक आड येतील, अशी भीती वाटते.)
असो चालायचेच.
१ म्हणजे, चिचुंद्रीच्या अथवा पालीच्या रूपातल्या एखाद्या देवतेची नव्हे. तर, चिचुंद्र्यांमध्ये अथवा पालींमध्ये ज्याला कशाला (म्हणजे, मानीत असले, तर) देवता मानीत असतील, त्याची.
२ जेथे ईशसंकल्पना आहे, तेथे नास्तिक हे असायचेच. एकमेकांना पूरक गोष्टी आहेत या. (Conversely, ईशसंकल्पनेवाचून नास्तिकांना अस्तित्व नाही. (जेथे ईशसंकल्पनाच नाही, तेथे तुम्ही negate काय करणार, कपाळ! निदान त्याकरिता तरी ती निर्माण करावी लागेल.) त्यामुळे, ईशसंकल्पना नष्ट होण्यातून नास्तिकांच्या अस्तित्वाला मूलभूत धोका आहे. नास्तिकांनी याचा अवश्य विचार करावा.)
+/-
देव ही संकल्पना तयार करणे हे बुद्धीचे लक्षण आहे हे मान्य. पण माणसाला विशेषत: नास्तिकांना बुद्धी आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं वाटतं. जो बुद्धिवादी असतो तो भावनांच्या नादी लागत नाही. This assumption is severely flawed. कारण माणसाच्या सुंदर मोठ्या मेंदूमध्ये बुद्धी आणि भावना दोन्हींची कार्यस्थळं आहेत. Prefrontal cortex बहुतेक तर्काच्या आधारे घेण्यात येणाऱ्या निर्णयाचे कार्यस्थळ आहे. त्यामुळे जेव्हा देव ही संकल्पना म्हणून उत्क्रांत झाली तेव्हा या दोन्ही स्थळांचा वापर झाला असावा. आगीची भीती वाटते. किंवा पाऊस पडला नाही तर पिकांचं नुकसान होतं. किंवा आपला इलाका इतर कळपांपासून सुरक्षित ठेवायला म्हणून तिथं एखादा म्हसोबा बसवणे वगैरे. तर इथे मूळ रुजलेली भीती आणि त्यावर तत्कालीन तर्क वापरून काढलेला उपाय या दोन्ही गोष्टी आहेत.
आजही हिंदुत्ववाद्यांना पेटवायला काय कारण वापरलं जातं?
- मुसलमान खूप क्रूर असतात. ते जास्त मुलं पैदा करतात आणि लवकरच सगळं जग मुसलमान होणार आहे.
त्यामुळे अजूनही भीतीला हात घालूनच राजकारण केलं जातं.
अग्नी माणसाच्या हातात आला तसा हायड्रोजनही आला. त्याचा त्यानं तर्काच्या आधारे वापरही केला. तेव्हा त्याच मेंदूत असलेल्या भावनेच्या केंद्राकडे दुर्लक्ष केलं. आज पाऊस पडणार किंवा नाही हे माणसाला से
सॅटेलाइट चित्रांतून दिसतं. मग पाऊस पडणार नाही हे तर आता उघड आहे. मग कशाला देवाची प्रार्थना करायची?
झुंडवडी नास्तिकांची सर्वात मोठी चूक म्हणजे मानवी भावनांना तुच्छ लेखणे. आणि इथे भावना म्हणजे तरल तुरल प्रेमविलाप नाही (तोही जोवर धक्का लागत नाही तोवर मान्यच करावा) पण survival emotions. भीती, चिंता, आक्रमकता - या सगळ्या भावनाच आहेत. या भावना कशा हाताळायच्या हे लहान वयात न शिकल्याने अनेकदा त्यांचं तर्क या एकाच छत्राखाली repression होतं. म्हणून असे silos तयार होतात.
आता प्रश्न प्राण्यांचा. प्राण्यांकडे तर्क नसावा. पण त्यांच्याकडे आपल्यासारख्या survival emotions नक्कीच आहेत. काही प्राणी अतिशय sentient असतात. मला माझ्या गाईडनेच सांगितलं होतं. अमेरिकेत जेव्हा प्राण्यांना घाऊक संख्येने खाण्यासाठी मारतात, तेव्हा एक कन्व्हेयर बेल्ट असतो ज्यावर प्राणी उभे केले जातात. आणि सगळ्यात समोर असलेल्या प्राण्याच्या डोक्यात गोळी घातली जाते. या पद्धतीने जेव्हा गाई रचल्या जातात तेव्हा समोरची गाय मेली तरी मागच्या गाईला आपण पळून जावं असं वाटत नाही. पण डुकरांच्या बाबतीत मात्र पहिल्या नंबरचे डुक्कर मेले की मागची सबंध लाईन आक्रोश करू लागते (अडचणीत सापडलेलं डुक्कर ओरडताना ऐकलं असेल तर हा किती डेसिबलचा आक्रोश असेल ते लक्षात येईल). सांगायचा मुद्दा असा की प्राणी अगदीच निर्बुद्ध नसतात. त्यांच्याकडेही आपला वंश टिकेल, पुढे जाईल आणि अडचणीत सापडल्यावर जीव वाचवणे, घरटी तयार करणे, मादीला नाचून दाखवणे वगैरे बुद्धी असतेच. केवळ त्यांच्याकडे भावना आणि बुद्धी यांना एकत्रितपणे हाताळायचा तर्क नसतो किंवा कमी असतो.
पण म्हणूनच प्राण्यांमध्ये कुणी मनुस्मृती लिहित नाही. किंवा मादीवर दादागिरी करून तिला कायमचं घरट्यात बसवून घरटं हवं असेल तर मी तुझा मालक असं कुणी करत नाही. हेदेखील सगळे बुद्धीचे खेळ आहेत. आणि बुद्धीपेक्षादेखील हे भावनेचे (असुरक्षिततेचे) खेळ आहेत.
बुद्धी वापरून कशाचेही समर्थन करता येते. आणि ते तसे प्रेझेंट केले की झुंडींना लगेच पटते.
आत्ताच बघा ना. भरतमंडपात "प्लांट बेस्ड डाएट" वर एक समिट आहे. प्लांट बेस्ड डाएट ही खरेतर पोलान वगैरे लोकांनी लोकप्रिय केलेली संकल्पना. पण आता त्याचं मार्केटिंग "आपली संस्कृती जे सांगत होती तेच योग्य होतं" असं करण्यात येत आहे. हा बुद्धीचाच खेळ आहे. पण त्यामागे "मांसाहार करणारे माणूस म्हणून कमी असतात" असाही एक प्रचार आहे. म्हणजे तर्काच्या आणि बुद्धीच्या आधारे काही करून जात आणि धर्म व्यवस्था टिकवणे अजूनही सुरूच आहे..पण त्यामागे द्वेष ही भावना आहे.
वरील लेखातही ती डोकावते आहे. मुळात एकमेकांचा द्वेष करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी बुद्धीचा वापर करणे ही मानवी खासियत आहे.
त्यामुळे जेव्हा भीती वाटते, एखाद्याचा द्वेष वाटतो तेव्हा खरंतर उत्तर आत बघून शोधायचं असतं. ते अधिक अवघड आहे म्हणून एखाद्या झुंडीत सामील होणं सोपं.
दाभोलकर
मांडणी आणि नास्तिकवादी किंवा विवेकवादी लोकांकडून केलेल्या अपेक्षा खूपच टोकदार आहेत. मी सोशल मिडियावर नसलो तरी ट्रोलींग कसे असते याची मला कल्पना आहे. सोशल मिडिया सोडणे हा यावर एक चांगला पर्याय ठरू शकतो.
माझ्या बाबतीत तरी हेच कारण लागू होते. आपल्या आजारपणात आपल्या उशाशी बसून राहणार्यांच्या अंधश्रद्ध किंवा अविवेकी वाटणार्या विचारांमुळे त्यांच्या भावना दुखावणे मला योग्य वाटत नाही. याबाबत दाभोलकरांनी "सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा" या व्याख्यानात केलेली मांडणी मला समतोल आणि व्यवहार्य वाटते. ते व्याख्यान मला खूप आवडले होते. त्यांच्या मांडणीचा सारांश मी माझ्या नोटस मध्ये लिहून ठेवला आहे. वेळ मिळाला तर शोधून इथे टाकेन.
त्यांनी अंधश्रद्धा किंवा अविवेकाची वैयक्तिक कारणे स्पष्ट केली आहेत. त्यात अज्ञान, अदृष्टाची भीती (मृत्यूची किंवा इतर), अगतिकता (वाढती महागाई, रात्री उशिरा येणार्या मुलीची सुरक्षा), अस्थिरता (नोकरीची अनिश्चितता) अशा गोष्टींचा समावेश आहे. तरीही त्यांनी म्हटले आहे की अंधश्रद्धांचा आधार घेणे योग्य नाही, पण काही प्रमाणात क्षम्य आहे. पण सामाजिक कारणे अधिक गंभीर आहेत. उदाहरणार्थ, आरोग्य सेवेची अनास्था (बजेट खर्च), वर्ग संघर्षामुळे टोकदार झालेल्या धार्मिक अस्मिता, उघड सांस्कृतिक राष्ट्रवाद, राजसत्तेने सोडून दिलेली समाजपरिवर्तनाची भूमिका (बुवाबाजीला विरोध करण्याऐवजी नेतेच बुवांना जवळ करतात कारण ती एक मतदारसंघाची गणिते असतात), प्रसारमाध्यमांचे करंटेपण (संमोहनासारख्या अवैज्ञानिक गोष्टींवर शोज करणे) अशा घसरणीवर बोलण्यात काही अर्थ राहत नाही.
सामाजिक परिवर्तन हा व्यापक राजकारणाचा भाग आहे. हा एक मोठा राजकीय लढा आहे. ही त्यांची भूमिका मला पटते. भारतातला कोणताही राजकीय पक्ष अशी ठाम भूमिका घेत नाही. कारण कृतीशील निर्भयता ही त्या आधीची पायरी आहे. दाभोलकरांनी ती निर्भयता दाखवली. सौम्य आणि मृदू बोलणाऱ्या त्या माणसाला आपले प्राण गमवावे लागले. त्यांचे कार्य नवीन शूर विरांनी पुढे न्यावे. युरोपमध्ये विज्ञानयुग अवतरल्यानंतर प्रबोधनाची जी घुसळण झाली, तशी घुसळण भारतात झालेली नाही. अशी घुसळण इथेही होत राहील. युरोपाप्रमाणे भारतातही ही प्रक्रिया चार-पाच शतके चालू शकते. ज्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही ते पाठच्या दाराने मदत करत राहतील. आणि तोच असिमोव्हने सांगितलेला शहाणपणा आहे. समाज जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल. समाज सुधारला की राजकीय पक्ष भूमिका घेतील.