मटा – तुम्हीसुद्धा?

मटा – तुम्हीसुद्धा?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

आत्ताच एका परिचितांनी तुम्ही प्रसिद्ध केलेल्या ॲड. गिरीश राऊत यांच्या लेखाची लिंक मला पाठवली (या लेखाच्या खाली लिंक पाहता येईल). तुमच्या या कृतीने किती वाचक चुकीच्या भ्रमामध्ये लोटले जातील या विचाराने मी अतिशय अस्वस्थ आणि अतिशय दु:खी झाले आहे.

साथ नियंत्रित होणार की नाही हे लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचतेय की मिस-इन्फॉर्मेशन यावर ठरते. योग्य माहिती कधीही भीती पसरवत नाही. योग्य माहिती दिलासा देते. योग्य माहिती स्वतःच्या भल्याचे निर्णय घेण्याची क्षमता देते. मात्र चुकीच्या माहितीमुळे आपण निर्णयदेखील चुकीचे घेतो. गेल्या दोन लाटेमधील बहुतांश मृत्यू हे दवाखान्यामध्ये पोचण्यास उशीर केल्याने झाले होते म्हणजेच लोकांच्या मनामध्ये भीती व शंका नसती तर ते नक्कीच वेळेत उपचारासाठी पोचले असते आणि वाचले असते.

ही वैश्विक साथ आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीने बदलते. आणि तुम्ही तर सुप्रसिद्ध वर्तमानपत्र आहात. एकाच वेळी लाखो व्यक्तींच्या मनावर प्रभाव पाडून त्यांची कृती ही - साथ थांबवणे किंवा साथ वाढवणे - अश्या दोन्ही बाजूला नेऊ शकता.

आजची घटना (लेख) दुर्दैवाने साथ लांबवण्याच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे असे वाटते . कारण तुम्ही मिस-इन्फॉर्मेशनला मानाचे स्थान दिले आहे. आजच्या लेखामुळे झालेला नकारात्मक परिणाम दूर करणे अतिशय अवघड गोष्ट आहे.

मिस-इन्फॉर्मेशन अनेक प्रकारची असते. पण मुख्य ७ प्रकार आहेत.

  1. Satire / Parody (व्यंगात्मक टिप्पणी / लिखाण )
  2. False Connection ( मथळा आणि बातमी यांचा संबंध नसणे )
  3. Misleading content ( माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करून भ्रम निर्माण करणे)
  4. False Context ( खरी माहिती चुकीच्या संदर्भामध्ये वापरणे )
  5. Imposter Content ( खऱ्या स्त्रोतामध्ये बदल करणे )
  6. Manipulated Content (खरी माहिती बदलून समोर आणणे)
  7. Fabricated Content (संपूर्णपणे खोटी माहिती तयार करणे )

"मिस-इन्फॉर्मेशनमुळे साथ वाढणे" हे लोकांच्या जीवन मरणाशी निगडित आहे. माझ्या एका पोस्टवर “करोना खोटा आहे आणि बिल गेट्सचे कारस्थान आहे” असे म्हणून वाद घालणारी ४० वर्षीय व्यक्ती काल करोनामुळेच मृत्यू पावल्याची बातमी ऐकली. चुकीची माहिती जीवघेणी असते , त्यामुळे चुकीच्या माहितीला मोठे करणारे देखील अश्या मृत्यूंना तेवढेच जबाबदार असतात.

असे दुर्दैवी मृत्यू टाळण्याच्या हेतूने तुम्ही प्रसिद्ध केलेल्या लेखातील काही ठळक मुद्द्यांचे स्पष्टीकरण देतेय. एक एक वाक्य बघत बसणे शक्य नाही कारण संपूर्ण लेखाचा डोलारा करोना किंवा सार्स कोव्ह-२ अस्तित्वात नाही या चुकीच्या पण ठाम विश्वासावर आधारित आहे.

ठळक दहा बाबी बघुया.

१. WHOने बुस्टर फार्मा कंपन्यांचा कट असल्याचे सांगितले.
(Misleading Content)

WHOने वारंवार सर्व देशांना विनंती केली आहे की आपल्या स्वतःच्या देशामध्ये बुस्टर देण्यापूर्वी जगातील इतर गरीब देश ज्यांना अजून पहिला डोसदेखील मिळालेला नाही त्यांना लस पाठवावी. कारण काही देश बुस्टर घेणारे आणि काही देश पहिल्या डोसविना अशी परिस्थिती असेल तर साथ थांबणार नाही, नवे व्हेरीयंट तयार होतील. ज्यांना अधिक जोखीम आहे अश्या व्यक्तींसाठी बुस्टर द्यायला हवेत असे WHOचे प्रतिपादन आहे.

त्यामुळे आपल्या लेखात माहितीचा गैरअर्थ काढून दिशाभूल केली आहे.

२. rtPCR चाचणी निदानासाठी योग्य नाही.
(Manipulated content)

त्यांचा CDC व rtPCRविषयीचा एक मेसेज ऑक्टोबर पासून whatsappमध्ये सर्वत्र फिरत आहे, त्यामुळे त्याच वेळी त्यांच्या मेसेजमधील सर्व माहिती चुकीची असल्याबद्दल मी मुद्देसूद स्पष्टीकरण दिले होते. त्याची लिंक इथे किंवा इथे.

HIVच्या Quantitative rtPCRविषयी शास्त्रज्ञाने केलेला उल्लेख संदर्भ बदलून करोनाच्या टेस्टसाठी जोडला आहे आणि यातून पुन्हा दिशाभूल केली आहे. (सविस्तर स्पष्टीकरण लिंकमधील लेखात आहे.)

३. rtPCR तपासणीला जानेवारी २०२० मध्ये मान्यता मिळाली
(Fabricated Content, misleading content)

rtPCR हे तंत्रज्ञान गेली अनेक वर्षे HIVसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी वापरले जात आहे. अतिशय खात्रीची अशी ही तपासणी असते.

जानेवारीमध्ये नव्या विषाणूची जनुकीय माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याबरहुकूम तपासणीचे प्रायमर तयार झाले व ती तपासणी सार्स कोव्ह-२चे निदान करू शकते अशी मान्यता मिळाली.

साथ सुरू असताना वेगाने साधने उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे असते. विज्ञानाने अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे आणि हे कमी वेळेमध्ये होणे तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज शक्य आहे.

सबब सदर उल्लेख गैरसमज निर्माण करणारा आहे.

४. करोनाची जनुकीय मांडणी उपलब्ध नाही.
(Fabricated content)

हे अत्यंत खोडसाळपणाने केलेले विधान आहे.

फक्त मूळ वूहान व्हायरसच नाही, तर करोनाच्या प्रत्येक व्हेरीयंटची जनुकीय मांडणी उपलब्ध आहे आणि तेदेखील मुक्त आंतरजालावर आहे. त्यानुसार प्रत्येक देश नव्या व्हेरीयंटचा शोध घेऊ शकतात.

जोपर्यंत आपल्याला मूळ जनुकीय मांडणी माहीत नसेल तोपर्यंत त्यात झालेले बदल कसे बरे समजतील?

करोनाच्या ३०,००० बेसेसपैकी प्रत्येकाचे नाव व त्याचा क्रमांक ठरलेला असतो आणि तो माहीतदेखील आहे. प्रत्येक नव्या व्हेरीयंटमधील प्रत्येक बदल त्याच्या क्रमांकासह नोंदला जातो. आणि असे ४-५ नाही तर शेकडो छोटे छोटे बदल आहेत आणि प्रत्येकाची नोंद आपल्या शास्त्रज्ञांनी ठेवलेली आहे.

ही सपशेल खोटी माहिती भ्रम पसरवण्यासाठी च निर्माण केली आहे.

५. WHOने जानेवारी २०२१मध्ये निदानासाठी rtPCRची गरज नाही असे म्हटले आहे.
(False context , Manipulated Content)

लेखकाचे वैद्यकीय ज्ञानाविषयीचे संपूर्ण अज्ञान या एका वाक्यामध्ये दिसून येते.

प्रत्येक आजारासाठी तीन व्याख्या असतात – संशयित रुग्ण , संभाव्य रुग्ण आणि खात्रीशीर / पुष्टी केलेला रुग्ण.

उदा . २ आठवडे खोकला असेल तर तो टीबीचा संशयित रुग्ण, त्या रुग्णाला संध्याकाळी ताप येत असेल किंवा त्याच्या संपर्कातील कोणाला टीबी असेल तर तो संभाव्य रुग्ण होईल आणि जेव्हा त्याची बेडका (sputum) तपासणी positive येईल अश्या वेळी तो टीबीचा रुग्ण म्हणवला जाईल कारण त्याच्या आजाराबाबत तपासणी करून आपण खात्री केलेली आहे.

ओमायक्रोन ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे काही देशांमध्ये तपासण्यांचा तुटवडा जाणवत आहे. अश्या वेळी कोविडच्या निदानासाठी खात्रीशीरपणे वापरता येतील असे एकाहून अधिक मुद्दे जानेवारी २२मध्ये WHOने प्रसिद्ध केले आहेत.

यामध्ये कोविडचा संशयित रुग्ण कोणाला म्हणावे, इतर कोणत्या बाबी असतील तर त्याला संभाव्य रुग्ण म्हणावे आणि कोणत्या तपासण्या केल्यावर त्याला खात्रीशीर रुग्ण म्हणावे याविषयी माहिती आहे. जेणेकरून तपासणी करता येत नाही म्हणून कोणाचे उपचार थांबू नयेत आणि रुग्णाचे नुकसान होऊ नये.

या माहितीचा उपयोगदेखील rtPCR तपासणी निदानासाठी आवश्यक नाही असा चुकीचा लावून सर्व वाचकांची दिशाभूल केली आहे.

६. CDC परिपत्रकाद्वारे rtPCR चाचणी बंद केली आहे.
(Misleading content , Manipulated Content)

अमेरिकेमध्ये फ्लू सिझन सुरू झाल्याने साध्या कोविडचे निदान करणाऱ्या rtPCRऐवजी एकाच वेळी फ्लू आणि कोविड अश्या दोन्ही आजारांचे निदान करू शकेल अश्या प्रकारची multiplex rtPCR तपासणी वापरावी असे रुग्णहिताचे CDCचे पत्र आहे.

या तपासण्यांविषयी सविस्तर माहिती मी वर दिलेल्या ऑक्टोबरमधील लेखामध्ये दिली आहे. (लिंक वर दिली आहेच)

या मेसेजमुळे कितीतरी डॉक्टरांचादेखील rtPCRवरील विश्वास डळमळीत झाला आहे. गोल्ड standard असलेल्या टेस्टला खोट्या माहितीचा आधार घेऊन जाणूनबुजून बदनाम करून जनतेचा धोका वाढवला आहे.

जनतेला इंग्रजी पत्राचा व वैद्यकीय शब्दांचा अर्थ समजत नाही म्हणून चुकीचा अर्थ काढून गैसमज पसरवणारी ही माहिती आहे.

७. मास्कमुळे विषाणू रोखता येत नाही व कोणत्याही स्टडीज नाहीत.
(Fabricated Content)

मास्क एक नाही तर एकूण ४ प्रकारे विषाणू थांबवू शकतो. त्याविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
तसेच मास्कमधील छिद्रांचा आकार व विषाणूचा आकार यातील संबंध कसा असतो हेही या पोस्टमध्ये सांगितले आहे.

या पोस्टसोबत जो फोटो आहे (खाली पाहा) तो एका metaanalysis प्रकारच्या अभ्यासातील आहे. मास्क कसा आणि किती काळासाठी सुरक्षा देऊ शकतात यावर बरेच अभ्यास झाले असून अश्या सर्व अभ्यासांना एकत्र करून त्यातील माहितीची खात्री करून metaanalysis स्टडी देखील केलेली आहे.

त्यामुळे मास्क सुरक्षा देत नाहीत आणि मास्कविषयी अभ्यास केलेले नाहीत हे म्हणणे धादांत खोटे व गैरसमज पसरवणारे आहे.

८. रेम्डेसिवीर हे औषध उपयुक्त नाही व बंदी आणण्यात आली आहे.
(Manipulated Content , Misleading Content)

माहिती अर्धवटपणे सांगून गैरसमजाला खतपाणी घालण्यासाठी हा उल्लेख केला गेला आहे.

कारण रेम्डेसिवीरला WHOचे conditional approval आहे, म्हणजे काही ठरावीक परिस्थितीमध्ये हे औषध देता येते.

औषधे जीव वाचवू शकतात आणि आजार कमी देखील करू शकतात. उदा. ताप आला की आपण क्रोसिनची गोळी घेतो त्यामुळे त्रास / आजार कमी होतो. जर कोणाला एखाद्या इंजेक्शनची रिएक्शन आली तर एड्रीनलीन नावाचे औषध टोचले जाते जे जीवरक्षक असते. दोन्ही प्रकारची औषधे महत्त्वाचीच असतात.

रेम्डेसिवीर औषध जीवरक्षक या प्रकारचे नाही, मात्र योग्य वेळी दिले तर आजाराचे प्रमाण कमी करू शकते. म्हणून भारतीय उपचार मानकांमध्ये त्याचा समावेश आहे. योग्य वेळी देणे महत्त्वाचे.

माहिती अर्धवटपणे व चुकीच्या अर्थाने सांगून पुन्हा गैरसमजच वाढवले आहेत.

९. mRNA लस जनुकीय बदल घडवते
(Fabricated Content)

एक तर या विधानाला काही पुरावे नाहीत, लसविरोधी व्यक्तींनी त्याबद्दल केलेला दावा आहे हा.

पण ज्या mRNA प्रकारची लस भारतामध्ये उपलब्धच नाही, एकाही भारतीयाला दिलेली नाही, त्या प्रकारच्या लसीविषयी अश्या चुकीच्या माहिती सांगून भारतीय लसींविषयीदेखील शंका उत्पन्न केली गेली आहे.

खोडसाळपणा करून लसीकरणाविषयी सामान्य जनतेला भीती वाटेल असे हे विधान आहे.

१०. फ्लूवर अजून लस उपलब्ध नाही / निर्माण झालेली नाही.
(Fabricated content)

फ्लूवरची लस बऱ्याच वर्षांपासून भारतामध्येदेखील उपलब्ध आहे. गरजेनुसार त्या लसीचे नवे बुस्टर तयार केले जातात. मुलांना व वयस्कर व्यक्तींना त्याचे डोस दिलेदेखील जातात.

हे खोटे विधान भ्रम निर्माण करणारे आहे.

या लेखातील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवला तर सामान्य जनता मास्क वापरणे बंद करेल तसेच लस घेण्यासदेखील तयार होणार नाही. साथ थांबविण्यासाठी व मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी या दोन्ही कृती आवश्यक आहेत. अश्या जोखमीच्या वागण्याने त्यांचा, त्यांच्या प्रिय जनांचा आणि इतर व्यक्तींचा जीव धोक्यात येऊ शकतो.

कोणाचा जीव चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यामुळे जाऊ नये या एकमेव उद्देश्याने मी त्या लेखातील काही चुकीच्या गोष्टी निर्देशित केल्या आहेत.

समाजातील गैरसमज कमी व्हावेत, शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत पोचावी, चुकीची माहिती पसरू नये यासाठी माझ्यासारखी काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी २०२०पासून प्रयत्न करीत आहेत.

मिस-इन्फॉर्मेशन म्हणजे या चुकीच्या माहितीच्या अंधारात महत्प्रयासाने एक एक पणती शास्त्रीय ज्ञानाने पेटवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

पण आपल्यासारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने जर मिस-इन्फॉर्मेशनच्या प्रसाराला आपला platform उपलब्ध करून दिला तर खरी माहिती झाकोळून जाईल. चुकीच्या व खोट्या माहितीचा अंधार अधिक गडद होईल.

या महामारीतून वाट काढण्यासाठी ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे.

योग्य माहिती दिली नाही तरी चालेल पण यापुढे चुकीची माहिती वाचकांपर्यंत पोचणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या , ही हात जोडून कळकळीची विनंती.

"मटा – पत्र नव्हे जिवाभावाचा मित्र" असेच लहानपणापासून ऐकत आले आहे.

मित्राकडून मिस-इन्फॉर्मेशनची अपेक्षा निश्चितच नाही.

करोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये तुम्ही शास्त्रीय माहितीला साथ द्याल ना?

अॅड. गिरीश राऊत यांचा 'महाराष्ट्र टाइम्स'मधील रविवार जानेवारी २३, २०२२ रोजी प्रकाशित लेख इथे वाचता येईल.
--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ, मिरज.
#Fighting_Myths_DrPriya
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे, जानेवारी २३, २०२२
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #Fighting_myths_DrPriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पुन्हा एकदा, उत्तम लेख. लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सतत लिहीत राहण्याला पर्याय नाही. ध्रुवीकरण करणाऱ्या समाजमाध्यमांच्या काळात आणि फार काही विज्ञान न समजणाऱ्या पत्रकारांच्या समाजात हे काम आणखी कठीण आहे. ते करत राहण्याबद्दल आभार, डॉ. प्रभू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला पण मटा हे आता जबाबदार वृत्तपत्र राहिलेले नाहीच आहे. गोविंदरावांनंतरच त्याचं वलय संपलं. आता तर तो तद्दन बाजारु, क्लिकबेटप्रधान, सामनाचा लाऊडस्पीकर वगैरे, काय काय झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि सर्व मत पटली पण.
उलट सुलट मत प्रतिष्ठित प्रसार माध्यम,मासिक,ह्या मधून व्यक्त होतात.
आणि मग लोकांचा गोंधळ उडतो नक्की काय करायचे,कशावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही.
M rna काय आहे हे लोकांना माहीत असण्याचा प्रश्न च नाही तर त्याचे कार्य, उपयोग,दुष्परिणाम. हे तर माहीत असणे अशक्य च.
प्रतिष्ठित विज्ञान विषयक मासिक,प्रसार माध्यम च ती माहिती पुरवत असतात.
आणि ती पण उलट सुलट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घोषवाक्याचा पाठभेद "पत्र नव्हे-कुत्रं" असाही ऐकिवात होता हे आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुत्र्यांची बदनामी थांबवा!!!!!!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मटा हे एक धंदेवाइक, कसलाही विधीनिषेध न बाळगणारे आणि वाचक नावाच्या गिर्हाईकांचे वाट्टेल तसे लाड पुरवणारे लबाड पत्र आहे. त्यांच्याकडे एवढे वाचून समजू शकेल असा एखादा सेल्समन असेल असे वाटत नाही. (टाइम्स ग्रुपमध्ये पत्रकार नसतात, सेल्समेन असतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जवळपास सर्वच मराठी वर्तमानपत्रांची तीच स्थिती नाहीये काय?

(आणि, इंग्रजी वर्तमानपत्रे तरी कोठली मोठी वेगळी आहेत? सगळे एकाच माळेचे मणी!)

असो चालायचेच.

—————

लवकरच या म्हणीवरसुद्धा एका लांबलचक लेखाची अपेक्षा प्रतीक्षा आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक निरक्षर सद्गृहस्थ वर्तमानपत्राचा उल्लेख "कागद" असा करायचे. मलाही अनेकदा त्यांचे याबाबतीत अनुकरण करण्याचा मोह आवरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द हिंदू हा एकमेव सन्माननीय अपवाद वाटतो. मराठी वृत्तपत्रात लोकसत्ता त्यातल्या त्यात बरा म्हणण्याजोगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

संस्थळे तरी काय वेगळी आहेत?

आजच ‘ऐसी’वरील ‘दिनवैशिष्ट्यां’मध्ये पुढील मौक्तिक आढळले:

२५ जानेवारी - जन्मदिवस:
सामाजिक कार्यकर्त्या पं. रमाबाई रानडे (१८६३)

आता बोला! (काय बोलणार, कपाळ!)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एकमेव नाही.अगदी सायन्स वर निघणारी अधिकृत मॅगझिन पण उलट सुलट लिहत असतात.
लोक ती पण वाचतात.
प्रत्येक तज्ञ व्यक्ती चे मत वेगळे असते.
एक सांगते मास्क इफेक्टीवे आहे.
दुसरे लगेच विषाणू ची size सांगतात आणि मास्क मधील छिद्र चा आकार सांगतात.
तो जुळत नाही.
सर्व वर्तमान पत्र,
झाडून सर्व सायन्स वर आधारित प्रसार मध्यम हेच करत असतात.
त्यांची चूक नाही
.
ते प्रत्येकाचे मत मांडत असतात
हेच एकमेव सत्य आहे असा दावा ते करत नाहीत
चॉईस आपली असते .
स्व अनुभव आणि आपल्या बाजूला घडणाऱ्या विविध घटना.मित्र , नातेवाईक ह्यांचे अनुभव
ह्यांच्या कडून मिळणारी माहिती ही खरी माहिती अस्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समस्या च्या मुळात गेले तर लक्षात येईल
लोकांना आरोग्य यंत्रणेचे अनुभव वाईट येतात.
इतके बाजारीकरण झाले आहे ह्या व्यवस्थेचे की पैसे लुटणे शक्य होईल इतके.आणि आजाराचे निदान,उपचार योग्य असेल ह्याची बिलकुल खात्री नाही

अशी अवस्था आहे
लोकांचा जो पहिला विश्वास होता डॉक्टर वर (लोक देव मानायचे) तो आता नाही.
त्याला लोक जबाबदार नाहीत
आणि हे प्रसार माध्यमांना चांगले माहीत आहे

त्या मुळे प्रसार मध्यम चुकीची माहिती देत असतील तरी त्या वर विश्वास ठेवतात
अविश्वास नी तर जन्म घेतलाच आहे.
कोणाशी ही बोलले तरी लोकांच्या मनात अविश्वास आहे हे लक्षात येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला बहुतेक Dunning Kruger effect curve च्या सगळ्यात डाव्या कडेला असलेली व्यक्ती आदर्श डॉक्टर वाटत असावी. Also, दुर्दैवाने, as usual, you seem to know price of everything but value of nothing!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईतील गोष्ट आहे ही. तीच इतर शहरांतही असेलच. आणि त्यांच्या मालकांना काय दिले असेल माहिती बाहेर आलेली नाही. तर त्यांना कशा आणि कोणत्या बातम्या द्याव्यात यावर काय सांगायला हवे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक न्यूज चालवणाऱ्या कंपनीच्या मालकांचा जोड धंदा हा असतोच.
म्हणजे दुसरे उद्योग कंपन्या पण असतात.तिथे त्यांना योग्य ती मदत बदल्यात दिली जात असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामाजिक भान,समाजाचे ज्ञान,समाजाचे प्रश्न,त्यांची मानसिकता,कोणत्या विषयातील बातम्या देताना कोणती भाषा वापरली पाहिजे.
भीती,आनंद ,राग उत्पन्न करणारे शब्द किती प्रमाणात सौम्य किंवा हार्ड वापरले पाहिजेत.
कोणत्या घटनेची बातमी देताना ती घटना समजून घेणे,त्या मागची कारण समजून घेणे,घटना सत्य च आहे ना ह्याची खात्री करूनच योग्य ते शब्द वापरून सत्य च समाजा पुढे येईल अशी बातमी ची रचना करणे.
हे असे अनेक पदर समजणारे पत्रकार आता दुर्मिळ आहेत.
Cost कटिंग है पण कारण असेल किंवा फक्त हाहाकार माजविला की चॅनल,paper चांगला चालतो अशी धारणा असावी
कोणत्याही खास विषयावर लीहणारा हा त्या विषयातील तज्ञ च असला पाहिजे.
ज्यांना त्या विषयातील सखोल ज्ञान नाही त्यांचे लेख प्रसिद्ध माध्यमांनी फक्त कमी पैसे खर्च होतात आणि जागा भरून निघते म्हणून छापले पण नाही पाहिजेत.
पण रिॲलिटी अशी आहे की मीडिया हाऊसेस मध्ये खूप कमी पत्रकार हे परिपक्व आणि सर्व भान असलेले असतात.
बाकी जे असतात त्यांना तितके ज्ञान, समज,भान, नसते.
आणि त्यांची पत्रकारिता करण्याची
योग्यता पण नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0