कोविडची लस संसर्ग टाळेल याची खात्री का दिली जात नाही?

कोविडची लस संसर्ग टाळेल याची खात्री का दिली जात नाही?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

आजचा दिवस तसा सत्कारणी लागला. एका लसविरोधी व्यक्तीसोबत फेसबुकवर चर्चा झाली आणि माझ्या ज्ञानामध्ये बरीच भर पडली.

लसीवर लोकांचा विश्वास नसल्याची काही कारणे त्यांच्या कमेंट्समध्ये होती. “लस घेतल्यावर संसर्ग होणार नाही याची १००% खात्री पुनावालादेखील देत नाहीत” “लस घेऊनदेखील डॉक्टरांना कोविड झाला”, “लसीकरणाने फ्लू गेला नाही, करोना जाणार नाही, मग लस का घ्यायची“ इ.

मात्र मी सांगितलेली सर्व शास्त्रीय माहिती व उदाहरणे हसण्यावारी उडवली गेली आणि ही साथ थांबणे किती अवघड आहे हे मला जाणवले.

असे हजारो लाखो लसविरोधी व्यक्ती अज्ञान, गैरसमज, भीती यामुळे सहकार्य करणार नाहीत आणि परिणाम मात्र आपण सर्व व आपली पुढची पिढी भोगणार आहे. माझी चिंता वाढलीये. ज्यांनी ठाम मते तयार करून ठेवली आहेत त्यांना नवी माहिती समजणे किंवा समजावणे अशक्य आहे.

मात्र तरीही आपण सांगत राहावे आणि ज्यांची मने अजून माहिती समजून घेण्यास सक्षम आहेत, त्यांच्यासाठी लिहावे हे उत्तम.

आता मनोगत बास, प्रश्नाचे उत्तर बघुया!

आजाराविरुद्धच्या लसी मुख्यतः दोन प्रकारे संरक्षण करतात म्हणून त्यांचे दोन प्रकार आहेत.
१. Sterilizing vaccines – या लसी जंतूंचा शरीरातील प्रवेश रोखतात!
२. neutralizing vaccines – या लसी प्रवेश रोखू शकत नाहीत मात्र आजारापासून बचाव करू शकतात.

कोविडविरोधी सर्व लसी या दुसऱ्या प्रकारातल्या आहेत. म्हणजे विषाणू शरीरात प्रवेश करतील मात्र कोविड होऊ नये किंवा झालाच तर सौम्य कोविड होईल ही सुरक्षा या लसी देतात.

त्यामुळे लस घेतली तरी काही प्रमाणामध्ये संसर्गाचा धोका रहातो. त्यामुळे लस घेतली तरीदेखील मास्क लावा आणि नियम पाळा असे सांगितले आहे. लस घेऊन सुरक्षा वाढवायची आणि नियम पाळून संसर्ग टाळायचा हे साधे सोपे गणित आहे.

मग कोविडच्या लसीचा प्रकार वेगळा (दुसरा) असताना पहिल्या लसीप्रमाणे संसर्ग होणारच नाही खात्री द्या असे म्हणणेच चुकीचे नाही का?

हे म्हणजे कसे झाले - समजा आपण घर राखण्यासाठी कुत्रा विकत घ्यायला दुकानात गेलो आणि तो टांगा ओढेल का याची खात्री मागितली तर कोणता दुकानदार देईल? तो "मी खात्री देऊ शकणार नाही" असेच म्हणेल. कारण दोन्ही कामे पूर्ण वेगळी आहेत.

जी लस नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे दिलेली नाही, जी लस जिवंत अर्धमेल्या विषाणूपासून बनलेली नाही ती लस संसर्ग रोखू शकत नाही. आणि सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसी जिवंत विषाणूच्या नाहीत. हे बेसिक शास्त्र आहे.

अजून एक उदाहरण बघुया.

सध्या आपण लहान मुलांना पोलिओच्या दोन प्रकारच्या लसी देत आहोत. एक तोंडावाटे आणि एक इंजेक्शनद्वारे.

भारतामध्ये पोलिओ विषाणू नसला तरी जगामध्ये अजूनही आहे. त्यामुळे त्याचा देशामध्ये पुन्हा शिरकाव होऊ नये यासाठी इम्युनिटीची भक्कम भिंत हवी आहे. तोंडावाटे दिलेली लस जिवंत अर्धमेल्या विषाणूची म्हणजे पहिल्या प्रकारची आहे. तिच्यामुळे संसर्ग होत नाही. मात्र जगातील कोणतीही लस १००% आजार टाळण्याची खात्री देऊ शकत नसते. आजार होईल का हे तो जंतू, ती व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या विविध घटकांवर अवलंबून असते. याला “एपीडिमिओलॉजिकल ट्राएड” (Epidemiological triad) असे शास्त्रीय नाव आहे. आणि म्हणून पोलिओविरुद्ध इंजेक्शनची दुसरी लस चुकून होऊ शकणाऱ्या पोलिओच्या संसर्गाला रोखेल आणि पोलिओ पुन्हा देशात घुसू शकणार नाही. ही दुसऱ्या प्रकारची लस आहे.

एच आय व्हीवर ४० वर्षे लस मिळालेली नाही, पण करोनाविरुद्ध लसी वेळेत उपलब्ध झाल्या यासाठी मी विज्ञानाची आभारी आहे. या लसींना फर्स्ट जनरेशनच्या लसी म्हटले आहे. भविष्यात संसर्ग पूर्णपणे टाळू शकणाऱ्या लसीदेखील उपलब्ध होतील.

अश्या लसी जिवंत विषाणूच्या असल्याने अतिशय काळजीपूर्वक बनवाव्या लागतात. यासाठी वेळ लागतो. आणि त्या कालांतराने उपलब्ध होतील. किंवा काही लसी नाकावाटे दिल्या तर संसर्ग टाळता येईल का यावरदेखील संशोधन सुरू आहे. (फोटो पहा). अर्थात सर्व जिवंत लसीदेखील संसर्ग टाळतील असे नाही. उदाहरण आहे बीसीजी. हीदेखील गंभीर आजार टाळते. गेली अनेक वर्षे अधिक सक्षम लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लसीकरण का करायचे याविषयी पोस्ट लिहिली होती – त्याची लिंक.

आता दुसऱ्या प्रकारच्या लसी संसर्ग टाळत नाहीत हे समजले की दोन डोस घेऊनदेखील कोविड झाला तर आश्चर्य वाटायला नको. मात्र असे प्रमाण कमी असते आणि असा आजार सौम्य असतो म्हणजे चिंतेचे कारण नसते. आणि मास्क व इतर नियम काटेकोर पाळले की संसर्ग टाळता येतो. आपण फक्त लसीवर थोडेच अवलंबून आहोत.

मात्र दोन डोस घेतले म्हणून बिनधास्त फिरायला सुरुवात केली की संसर्ग होण्याचा धोका वाढायला लागतो.

डॉक्टरांची गोष्ट वेगळी आहे. डॉक्टर विषाणूंमध्ये म्हणजे रुग्णांमध्ये काम करतात, त्यांना संसर्गाचा धोका सामान्य जनतेपेक्षा मुळातच अधिक असतो म्हणून त्यांनी प्रतिबंधाचे नियम अधिक काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

लस घेतल्यावर कोविड सौम्य राहण्याची शक्यता वाढते. रुग्णालयाची व ऑक्सिजनची गरज कमी होते. म्हणून लसीवर पैसे खर्च करणे हे ऑक्सिजनवर खर्च करण्यापेक्षा अधिक फायद्याचे ठरते. जीव वाचतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

याखेरीज लसीकरण संपूर्ण जगभरामध्ये वेळेत आणि वेगाने झाले असते तर ओमायक्रोनचा उदय झाला नसता. नवे उप-प्रकार येऊ न देणे हा लसीकरणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. या मुळे सर्वांचे लसीकरण हा साथ थांबवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

साध्या आजाराची साथ देखील जीवघेणी असते हे आपण लाखो जीवांची किंमत चुकवून बघितले आहे. आपली प्रत्येक कृती "ब्रेक द चेन" साठी महत्त्वाची असली पाहिजे. आपला मुख्य शत्रू "वैश्विक साथ" आहे. म्हणून लस घेऊन साथ थांबवायला हातभार लावूया, खारीचा वाटा उचलुया. कारण करोना इथेच राहणार आहे, फक्त साथ थांबायला हवी.

जाता जाता,

बरेच जण लस न घेण्यासाठी के के अग्रवाल सरांचे कारण देत असतात. मात्र त्यांच्याविषयी कोविड गंभीर होण्यासाठी अनेक कारणे होती. त्यांना बऱ्याच सहव्याधी होत्या, ते स्टिरॉईड घेत होते म्हणून जोखीम जास्त होती. कारण त्यांच्या औषधांमुळे त्यांना लसीची सुरक्षा इतरांपेक्षा कमी मिळाली असणार. तसेच उपचारांना प्रतिसाददेखील कमी असणार होता. त्यांना संसर्ग बहुधा त्यांच्या नोकराकडून / साहाय्यकाकडून झाला. म्हणजे नजीक सहवास होता. अश्या वेळी शरीरामध्ये जाणारा विषाणू संख्येने अधिक असतो व गंभीर होण्याची शक्यता अधिक असते.

त्यांनी कोविड गंभीर झाल्यावर ऑक्सिजन लावून व्हिडीओ केले, शरीराला विश्रांती दिली नाही. विषाणूजन्य आजारांमध्ये संसर्गानंतर शरीराला विश्रांती देणे हादेखील एक उपचार असतो.

या अश्या विविध कारणांमुळे दुख:द घटना घडली. त्याचे सरसकटीकरण करणे अयोग्य आहे.

प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि म्हणून लस घेऊन सुरक्षा वाढवणे आपल्या हातात आहे.

त्या लसविरोधी व्यक्तीने मात्र मी सांगितलेली माहिती हसण्यावारी उडवली. आणि काहीच समजून घेतले नाही.

तुम्हालाही तसे वाटते का?

मी काही बदल करायचे असल्यास अवश्य सांगा!

आणि नियम पाळणे मात्र सोडू नका.

(अधिक माहितीसाठी काही माहितीपूर्ण दुवे :
Sterilizing immunity and Covid-19 vaccines
We are asking the impossible of vaccines
Understanding how vaccines work)

--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ , मिरज.
#Fighting_Myths_DrPriya
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे, डिसेंबर १३, २०२१
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #covid_insights_drpriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मानव सहित जगात करोडो जीव आहेत
जीव आहेत म्हणजे त्यांचा आणि मानवाचा संबंध आहे
मानव काही खास निसर्ग नियम ची गरज नसणार प्राणी नाही
तो पण सर्व सामान्य बाकी जीव सारखाच जीव आहे.
बाकी करोडो प्राणी अनेक रोग कारक ,विषाणू,जिवाणू ह्या पासून स्वतचे रक्षण करतात ना?
तर मानव पण तसेच वर्तन करणार .
व्हायरस,जिवाणू,ह्यांचे उत्परीवर्तन वर लेख लीहाले जातात ना?
मग मानवी रोगप्रतिकार शक्ती ही पण नैसर्गिक आहे तिचे उत्परिवर्तन होते.
ह्या वर डिटेल लीहं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

उत्परिवर्तन जनुकीय मटेरियल मध्ये होत असल्याने शरीरातील एखाद्या संस्थेचे उत्परिवर्तन असे घडत नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लसी वर माझा विश्वास आहे
अगोदर लसी चा उपयोग झालेला आहे आणि त्याचा फायदा पण झालेला आहे
काही काळानं होणारे दुष्परिणाम झाले नाहीत.
म्हणून पारंपरिक तंत्रज्ञान वर आधारित covaxin ची लस नी वेळेवर आणि योग्य अंतराने घेतली आहे.
Mrna तत्व वर निर्माण झालेली लस नवीन आहे.
पहिल्याच वेळी तिचा वापर होत आहे.
दीर्घ काळानंतर तिचे काही दुष्परिणाम होतील का हे आज कोणी सांगू शकणार नाही

असे मला वाटते.
म्हणून ती लस घेतली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

mRNA लस भारतामध्ये उपलब्ध नाही.
तेव्हा भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेशीत आलेले कोणतेही एम आर एन ए हे साधारण २४ ते ४८ तासात पूर्ण नष्ट होते. तेंव्हा त्याच्या दीर्घ मुदतीच्या परिणामांची चिंता करणे हास्यास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लसीचे चांगले-वाईट गुणधर्म यावर भरपूर चर्चा होते. पण लसीकरणात एक दुसरे महत्वाचे व्हेरिएबल असते ते म्हणजे लस घेणाऱ्याच्या इम्यून सिस्टीमची सध्याची शक्ती. उदा. म्हाताऱ्या लोकात (किंवा कुपोषित/कॅन्सरग्रस्त/एड्सग्रस्त/ड्रग-यूजर , अल्कोहोलिक/सुप्त लिव्हर किंवा किडनी फेल्युअरवाल्या किंवा जनुकीय-दृष्ट्या दुर्दैवी अशा लोकात) लसीला चांगला रिस्पॉन्स येत नाही - जो तरुण , निरोगी माणसात उत्तम येतो. याला लसीचे अपयश म्हणणे हास्यापद आहे. मात्र यावर मात करण्याचेही उपाय झालेच पाहिजेत. उदा. रॅपामायसिन या औषधाचे लहान डोसेस देऊन , ७५ वयाच्या लोकांमधील लसीला येणारा रिस्पॉन्स वाढलेला दाखविला गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me