महामारीच्या ऐन तांडवातून ऑक्सफर्ड ते पुणे

महामारीच्या ऐन तांडवातून ऑक्सफर्ड ते पुणे

सूरज ठुबे

निघण्यापूर्वी

साधारणपणे जानेवारी २०२१च्या पहिल्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या नवीन उत्परिवर्तनाच्या प्रकाराने (mutant) युनायटेड किंग्डममध्ये (‘यूके’) डोके काढले. ऑक्टोबर २०१९मध्ये मी पीएचडीसाठी ऑक्सफर्डमध्ये स्थायिक झालो होतो. मार्च २०२०मध्ये यूकेमध्ये पहिला लॉकडाउन लागू झाल्यानंतर घाईघाईने परत भारतात येण्याऐवजी सेंट अँटनी कॉलेजमध्ये असलेल्या माझ्या निवासस्थानीच सुरक्षित राहण्याचे मी ठरविले होते. लॉकडाऊनमुळे एकांतवासातल्या एखाद्या कैद्याचे आयुष्य जगायला लागत होते. सतत सहा महिने हे सहन केल्यावर जानेवारी २०२१च्या सुमारास परत भारतात जाण्याचा विचार करण्यास मी सुरुवात केली. माझ्या संशोधनाच्या कामासाठी भारतातल्या काही अभिलेखागारांना मला भेट द्यावी लागणार होती. त्यासाठी डिसेंबर २०२०पर्यंत भारतात जाण्याची माझी सुरुवातीची योजना लॉकडाऊनमुळे रद्द करावी लागली होती. शिवाय व्हिसाच्या निर्बंधांमुळे यूके आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी झाली होती. त्यातच यूकेमध्ये विषाणूचे नवीन उत्परिवर्तन सापडले तेव्हा परिस्थिती आणखी चिंताजनक बनली. जानेवारी २०२१च्या अखेरपर्यंतची सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली.

परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वीच यूकेला रामराम ठोकायचा विचार काही विद्यार्थ्यांनी केला होता. त्यांच्यात एक अस्वस्थतेची लहर पसरली. बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा फक्त विमानतिकिटांसाठी मोजलेले पैसे वसूल करण्याचा नव्हता. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रवासापूर्वी अनिवार्य आरटी-पीसीआर चाचणी करण्यासाठी लागणारे पैसे आणि वेळ. खाजगी प्रवासासाठी चाचणी करायला सरकारी आरोग्य व्यवस्थेतर्फे उपलब्ध असणाऱ्या चाचणी केंद्रात मज्जाव होता. त्यामुळे अशा कारणासाठी केवळ खाजगी कंपन्यांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या ‘होम-किट’ सेवेवरच भिस्त ठेवण्याशिवाय इतर पर्याय नव्हता. तरीही, मी तसा निवांत होतो, कारण भारताचा प्रवास पुढे ढकलावा हे मी अगोदरच ठरविले होते.

घरच्या घरी (self-administered) आरटी-पीसीआर चाचणी करायच्या संचाची ऑनलाइन ऑर्डर द्यावी लागे. सर्वात स्वस्त चाचणीची किंमत ९० पौंड होती. घशाचे आणि नाकाचे स्वतः घेतलेले स्वॅब काळजीपूर्वक एका प्लास्टिकच्या बाटलीत बंद करावे लागत. नगरपालिकेने ‘आपत्कालीन सेवा’ म्हणून नियुक्त केलेल्या विशिष्ट पोस्टाच्या पेट्यांद्वारे हे पॅकेज काळजीपूर्वक क्लिनिकमध्ये पाठवावे लागे.

मग एक धाकधुकीचा काळ सुरू होई. पहिली धाकधूक म्हणजे आपण पाठवलेले पॅकेज त्या क्लिनिकला वेळेत मिळाले आहे का? पोस्ट सेवा २४ तासात पॅकेज पोचवण्याची हमी घेत असे. पण हे पॅकेज शनिवार-रविवारी पोस्टाच्या पेटीत टाकल्यास ते अर्थातच उशिराने क्लिनिकला पोहोचे. या सर्व अडथळ्यांमुळे निकाल वेळेवर मिळणे हे शंकास्पद होते. नेमक्या याच काळात एअर इंडियाने किती काळापूर्वी केलेली आरटी-पीसीआर चाचणी वैध आहे यासंबंधी अनावश्यक संभ्रम निर्माण केला. सुरुवातीच्या काही आठवड्यांत, विमानाच्या निर्धारित वेळेच्या ९६ तास आगोदर केलेली चाचणी वैध होती. विषाणूचे ‘यूके उत्परिवर्तन’ होण्यानंतर हा कालावधी अचानक कमी करून ७२ तासांवर आणण्यात आला. त्यामुळे पोस्टात दिरंगाई झालीच तर ती प्रवासाच्या मुळावर येण्याची शक्यता अधिक गडद झाली.

यावर उपाय किंवा दुसरा पर्याय म्हणजे पोस्टावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष चाचणीसाठी एखाद्या क्लिनिकमध्ये ऑनलाईन अपॉईंटमेंट बुक करणे. ऑक्सफर्डमधील बर्‍याच भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात जवळचे पर्याय थेट लंडनमध्ये होते. लंडनमधील सिटीडॉक क्लिनिकने एअर इंडियाशी करार केला होता. त्यानुसार लंडनहून एअर इंडियाने उड्डाण करणाऱ्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणीसाठी त्यांच्या २०० पौंड या मूळ चाचणी शुल्कात ८० पौंड सवलत देण्यात आली होती. बहुतेक विद्यार्थ्यांनी एअर इंडियाची तिकिटे काढली होती, म्हणून लंडनला जाणे हा एकमेव व्यवहार्य पर्याय होता. बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी १२० पौंड मोठा खर्च होता. शिवाय ‘ऑक्सफर्ड ते लंडन आणि परत’ या रेल्वे/बस प्रवासामध्ये आपल्याला संसर्ग तर होणार नाही ना?’ ही आणखी एक चिंता वाढली!

उत्परिवर्तित विषाणूचा अहवाल आला त्या आठवड्यानंतर ब्रिटन सरकार पुन्हा एकदा ब्लँकेट लॉकडाउन लादण्याच्या विचारात होते. दोन्ही सरकारांनी परस्पर सहमतीने विमान वाहतूक तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवास लांबणीवर पडले. साहजिकच मूळ प्रवासासाठी केलेल्या चाचण्या निरुपयोगी ठरल्या. अशा चाचण्यांसाठी भरलेले पैसे परत मिळण्याची अर्थातच काहीही सोय नव्हती.

जवळपास दीड महिन्यानंतर एअर इंडियाने अत्यंत मर्यादित प्रमाणावर आपली सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दर आठवड्याला अंदाजे १५ उड्डाणे होत असल्याने प्रवाशांनी आपापल्या तारखा ठरवल्या, आणि परिस्थिती नियंत्रणात रहावी अशी प्रार्थना करायला सुरुवात केली. याच काळात दोन्ही देशांनी आपापल्या लसी विकसित केल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याची योजना अमलात आणली.

मी यावेळी प्रवास करण्याचा निर्णय घेतला, आणि पुन्हा कोविड टेस्ट क्लिनिक शोधण्याची धडपड सुरू केली. ऑक्सफर्डमध्ये प्रत्यक्ष चाचणी केंद्रे सुरू झाल्याचे ऐकले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. अशी दोन केंद्रे होती. त्यातील एक ठिकाण म्हणजे ऑक्सफोर्डमधील शहराच्या मध्यभागी असलेली ‘बूट्स’ नावाची फार्मसी, आणि दुसरे शहराच्या उत्तरेला असलेल्या समरटाउन उपनगरातील ‘मेफिल्ड’ नावाचे खासगी क्लिनिक. ‘बूट्स’चा दर १२० पौंड होता, आणि त्यामुळे पैसे जपून वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हाच पर्याय योग्य होता. शिवाय त्यांनी ४८ ते ७२ तासांमध्ये निकालांची हमी दिली. यामुळे या केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी उडाली होती आणि आपल्या सोयीची अपॉइंटमेंट न मिळण्याची भीतीही कायमच होती.

दुसरीकडे, समरटाउनमधील मेफिल्ड क्लिनिकमध्ये दोन पर्याय होते. ४८ तासांच्या आत निकाल कळवणाऱ्या त्यांच्या चाचणीचे शुल्क २२० पौंड होते. दुसरा पर्याय म्हणजे ज्यांना आपत्कालीन चाचणी करायची असेल त्यांच्यासाठी चोवीस तासाच्या आत निकाल देण्याची सोय (तब्बल) ३४० पौंडात उपलब्ध होती! या काळात भारतातील चाचणीचे दर साधारण १०-१२ पौंडच्या आसपास होते. यूकेच्या आणि भारताच्या जीवनशैलीची तुलना करणे किती निरर्थक आहे याचे उदाहरण कोणाला हवे असेल तर यापेक्षा अधिक चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही!

४८ तासांच्या आत निकालाची हमी दिली म्हणून मी मेफिल्डमध्ये चाचणी करून घेतली. समरटाउनमधल्या एका साध्यासुध्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हे प्रशस्त क्लिनिक आहे. प्रतीक्षाकक्षात माझ्याबरोबर फक्त एक व्यक्ती होती, आणि क्लिनिकमध्ये केवळ ४ लोक काम करत होते. सॅनिटायझरने अनेक वेळा हात चोळून आणि संपूर्ण चेहरा झाकणारा नवीन मुखवटा घालूनही सुरक्षित वाटत नव्हते. माझ्या चाचणीच्या काही आठवड्यांपूर्वी कोविड झालेल्या मित्राच्या अनुभवावरून आपल्या अगदी न कळताही संसर्ग कसा होतो याची मला जाणीव होती. सुदैवाने माझी चाचणी काही मिनिटांतच झाली आणि निकाल ४८ तासात मला पोस्टाने पाठविले जातील असे मला सांगितले. तसे ते आलेही - कोविडमुक्त असल्याचे चाचणीमधून कळल्यानंतर माझ्या मार्गातली मोठी धोंड बाजूला झाल्यासारखे मला वाटले.

मी काही महिन्यांत ऑक्सफर्डला परत यायचे असे ठरवले असल्यामुळे, बहुतेक सामान इथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या काही दिवस आधी मी महाविद्यालय आणि माझ्या विभागाशी संपर्क साधून माझे सामान ठेवण्याची काही सोय आहे का ते विचारले. या दोन्ही ठिकाणांहून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मी खाजगी सेवादात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. साधारण २५० पौंड खर्च करावे लागले तरीही हरकत नाही, पण सामान सहा महिने सुरक्षित राहायला मला हवे होते. विचारांती मी लंडनमधील एका टॅक्सी ड्रायव्हरशी संपर्क साधण्याचे ठरविले. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझ्या कुटुंबासमवेत यूकेला सुट्टीसाठी आलो होतो तेव्हा आम्ही या पंजाबी माणसाची टॅक्सी सेवा वापरली होती. तेव्हापासून आम्ही संपर्कात आहोत आणि जेव्हा लंडन किंवा ऑक्सफर्ड दरम्यान तातडीच्या टॅक्सीसेवेची आवश्यकता भासते तेव्हा आम्ही त्याच्याकडेच जातो. त्याचा सल्ला घ्यावा म्हणून मी फोन केला तेव्हा चक्क त्याने माझे सामान सहा महिने स्वतःकडे ठेवण्याची तयारी दर्शवली. त्याचे घर पुष्कळच मोठे आणि विमानतळाजवळच आहे. मी माझ्या ऑक्सफर्डमधल्या खोलीला जड मनाने निरोप दिला आणि सकाळी सकाळी सहा वाजता टॅक्सीने हीथ्रो विमानतळावर जायला निघालो. विमानाची वेळ १० वाजताची होती.

हीथ्रो विमानतळावर

हीथ्रो विमानतळ नेहमीप्रमाणे सामानाच्या ट्रॉली इकडे तिकडे ढकलणाऱ्या लोकांनी आज गजबजलेला नव्हता. पण नेहमीच्या परिचयाचे एक दृश्य मात्र दिसले: येणारी-जाणारी विमाने दाखवणाऱ्या यांत्रिक फलकासमोर जमलेला भारतीय लोकांचा जत्था! इतक्या संख्येने एकत्र आलेले भारतीय लोक मी जवळजवळ दीड वर्षात बघितले नव्हते. त्यामुळे मला एखाद्या भारतीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर आल्याचा भास झाला. भारतातील परिस्थिती कशी असू शकते याची हे दृष्य एक प्रकारची पूर्वकल्पनाच होती.

विमानतळाच्या आवारात विविध ठिकाणी चेक-इन करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे बसविण्यात आली होती. तरुण लोक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे बोर्डिंग पास मिळविण्यात मदत करताना दिसत होते. सध्याच्या भीतीदायक वातावरणापासून मनाने शेकडो मैल लांब असलेली लहान मुले सामानाच्या ट्रॉली इकडेतिकडे आगगाडीसारख्या ढकलत आनंदाने बागडत होती.

माझा बोर्डिंग पास मिळाल्यानंतर मला सोशल मीडियात आधीपासून सुपरहिट मीम बनलेला अनुभव घ्यायला मिळाला : लोक सामानाच्या तपासणीच्या काउंटरकडे जाणाऱ्या सर्पाकृती रांगेत इमानदारीत दोन मीटर अंतर सोडून उभे होते. पण हेच लोक नंतर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून नऊ तासांचा प्रवास करणार होते!

दुसरीकडे कर्मचारी-नियंत्रित चेक-इन काउंटरवर सुसंस्कृत भारतीय मध्यमवर्गीय वर्तनाचा चिरपरिचित देखावा दिसत होता. जवळजवळ प्रत्येक प्रवाशाने बरोबर आणलेले सामान वजनाच्या मर्यादेपेक्षा जास्त होते. जवळजवळ प्रत्येकाला एअर इंडियाच्या सेवकवर्गाबरोबर आपल्या सामानासाठी - थोडा का होईना - वाद घालायला लागत होता. माझ्याबरोबर मध्यम आकाराच्या फक्त दोन बॅगा असल्यामुळे मी या प्रकारातून अलगद सुटलो. प्रत्येकाने केलेल्या कोविड चाचणीचे निकाल मोबाईलवर होते, आणि विमानतळाच्या अंतर्भागात रेंजअभावी ते पटकन शोधून काढता येत नव्हते. काही जण त्यांच्या ऑनलाइन फाइल्स शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

विमान निघायला अजून एक तास बाकी होता. प्रेटामॉंजे, कोस्टा कॉफी आणि इतर काही कॅफे उघडे पाहून मला आनंद झाला. पण बाकीची बहुतेक दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद होती. ही सकाळची वेळ होती म्हणून ते बंद होते की महामारीमुळे या गोष्टी बंद ठेवण्याचे आदेश होते हे मला कळले नाही. विमानात मास्क बाजूला करून, तोंड उघडून खाण्याची मला भीती वाटत होती. कारण माझ्या आजूबाजूला तोंड उघडून खाणारे इतर लोक बसलेले असण्याची शक्यता होती आणि त्याने संसर्ग पसरू शकेल की काय अशी शक्यता मला वाटत होती. जितके शक्य असेल तितके खाऊन घेण्याचा मी विचार केला. मी सोबत काही एनर्जी बार घेतले आणि गेट क्रमांक ३९च्या दिशेने निघालो.

विमानाआत

रांगेत पुढे जाण्याची तीव्र इच्छा असणारे प्रवासी नेहमीप्रमाणेच बघण्यालायक होते. एअर इंडियाने दोन रांगा लावल्या होत्या. पहिल्या रांगेत - खासकरून ज्येष्ठ नागरिकांना - विनामूल्य मास्क, फेसशील्ड आणि पातळ पांढरा कागदी ओव्हरकोट देत होते. त्या रांगेतून गेल्यावर विमानात जाण्यासाठी मुख्य रांग होती. आतापर्यंत कायम ठेवलेले दोन मीटरचे अंतर आता कोणी पाळत नव्हते. विमानात घुसून स्वतःसाठी आणि स्वतःच्या सामानासाठी पुरेशी जागा शोधणे हेच सगळ्यांचे ध्येय होते आणि त्यासाठीच सगळी धडपड चालू होती. आपल्या बॅगसाठी आपण हेरलेली जागा आधीच कोणी पटकावली तर दिलेले शिव्याशाप हे मास्क आणि फेसशील्डमुळे दबक्या स्वरात बाहेर पडत होते.

मास्क आणि फेसशील्ड दोन्ही लावणे एखाद्या दुःस्वप्नासारखे होते. त्यात मला चष्मा असल्याने बघायला फारच त्रास होत होता. मला समोरच्या पडद्यावर काहीही बघण्याचा नाद सोडून द्यायला लागणार हे माझ्या लवकरच लक्षात आले. आम्हा सर्वांची स्थिती कैद्यांसारखी झाली होती - प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वैशिष्ट्य मिटवून टाकणारा मुखवटा आणि अंगात एकसारखे दिसणारे पांढरे डगले!

शौचालयाचा वापर करण्याव्यतिरिक्त इतर वेळ प्रवाशांनी बसून राहावे अशी विनंती केली गेली. चहा, स्नॅक्स आणि जेवण दोनदा दिले गेले. अर्थातच प्राप्त परिस्थितीत प्रवाशांशी शक्य तितका कमी संपर्क यावा आणि शक्य तितके सामाजिक अंतर राखले जावे हे हेतू यामागे होते. विमानातला वेळ काही चित्रपट पाहून घालवावा असा मी विचार केला. सैफ अली खानचा ‘लाल कप्तान’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरचा चित्रपट माझ्या आसपासचे सात आठ लोक पाहत होते. हा चित्रपट तिकीटबारीवर कमालीचा अपयशी ठरला होता. महामारीच्या या गदारोळात अठराव्या शतकातील नागा साधूबद्दलचा चित्रपट पहावासा वाटणे हे एकाच वेळी विनोदी आणि रोचकही होते. पण मी इतिहासाचा विद्यार्थी असल्याने मला त्या चित्रपटात फारच गुंतून पडायला होईल असे वाटले, आणि कोणतेही बौद्धिक श्रम करण्याची माझी क्षमता आता संपली होती! त्यामुळे मी बॉन्डपटांतला शेवटचा हप्ता ‘स्पेक्टर’ पाहात वेळ काढला. उरलेला अर्धा वेळ मी झोपून काढला. माझ्या मनातली खळबळ शांत होण्यात त्यामुळे निश्चितच मदत झाली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर

मुंबईच्या धावपट्टीवर उतरताच नेहमीप्रमाणे लोकांनी त्यांचे सामान घाईघाईने वरच्या केबीन्समधून खाली उतरवले आणि विमानातून उतरण्यासाठी रांगा लावल्या. यूकेहून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने संस्थागत विलगीकरणाचा (institutional quarantine) नियम केला होता. त्याचा भाग म्हणून विमानतळावर उतरल्यानंतर ७ दिवस हॉटेलमध्ये राहणे भाग होते. त्यानंतर आपापल्या घरी आणखी ७ दिवस अलग राहायचे होते. या नियमाला अनुसरून ऑक्सफर्ड सोडण्यापूर्वीच मी भारत सरकारने जारी केलेली संस्थागत विलगीकरणासाठी निर्देशित केलेल्या हॉटेलांची यादी नजरेखालून घातली होती. त्यात पंचतारांकित हॉटेलांपासून एकतारांकित हॉटेलांपर्यंत सर्व पर्याय होते. एकतारांकित हॉटेलात स्वच्छता कितपत पाळली जाईल याची मला साशंकता वाटत होती. शिवाय, मला सांगण्यात आले की संस्थागत विलगीकरणात आपल्याला कोणत्याही प्रकारचे अन्न बाहेरून मागविण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणून मी चार तारे असलेलं हॉटेल संस्थागत विलगीकरणासाठी निवडलं. ७ दिवसांच्या ‘विलगीकरण पॅकेज’मध्ये या विशिष्ट हॉटेलमध्ये दर दिवशी तीनदा जेवण देणार होते. एकूण किंमत दिवसाला ३००० रुपये अशी होती. विमानातून उतरायची वेळ झाली तशी या सगळ्याची उजळणीही माझ्या मनात सुरु झाली होती, आणि आता लोक हळूहळू विमानाबाहेर जाऊ लागले होते.

मी विमानातून बाहेर येताच मुंबईच्या हवामानाने आपले करडे रंग दाखविले. मी यूकेमध्ये रोज वापरायचा जाड लोकरी कोट घातला होता. केवळ काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्डमधील तापमान उणे २ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तिथून मी थेट ३५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या दमट, चिकट मुंबईत प्रवेश करता झालो होतो.

मी सामानाच्या पट्ट्याकडे जात असताना वाटेत विमानतळाचे कर्मचारी ज्या प्रवाशांकडे पुढच्या प्रवासासाठी कनेक्टिंग फ्लाइटची तिकिटे होती, अशा प्रवाशांना वेगळ्या दिशेने जाण्याच्या सूचना करत होते. इथे त्यांचे हातवारे आणि बोलणे ऐकून पर्यटकांना एका स्थळाकडून दुसऱ्या स्थळाकडे हाकत नेणाऱ्या टूर गाईडची आठवण येणे क्रमप्राप्त होते! सर्व इमिग्रेशन काउंटर्स पूर्ण क्षमतेने चालू असल्याचे पाहून मला आनंद झाला. आजूबाजूला इतर फ्लाइटमधील कोणीही प्रवासी नसल्याने सर्वांनी त्या काउंटर्सकडे धाव घेतली.

तितक्यात मला एका सुरक्षाअधिकाऱ्याने मध्येच थांबवले आणि पुढच्या काही दिवसांत माझ्या प्रवासाच्या योजना काय आहेत याबद्दल विचारण्यास सुरुवात केली. हे संभाषण जरा विचित्र होते, पण त्यामुळे माझ्या लक्षात एक वेगळीच गोष्ट आली. मला माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधणे गरजेचे होते. माझा यूकेचा मोबाईल फोन इथे काही कामाचा नव्हता. विमानतळावर उतरल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांसाठी एक विनामूल्य वायफाय सेवा उपलब्ध होती, परंतु त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर लॉग इन करणे आवश्यक होते. त्याचा ओटीपी कोड थेट माझ्या ब्रिटिश क्रमांकाच्या फोनवर गेला. तेव्हा त्याचा नाद सोडून मी जास्त वेळ न दवडता एक्झिट गेटच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली.

आणि इथे मला मासळीबाजार दिसला! विमानतळाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून भंडावून टाकणार्‍या लोकांचा मोठा जमाव तिथे होता. मुंबई विमानतळावरील एक्झिट गेटच्या आत असलेल्या मोकळ्या जागेला अधिकाऱ्यांनी दोन गटात विभागले होते. त्यापैकी पहिला गट होता जे प्रवासी मुंबईत सात दिवसांचं विलगीकरण करणार होते अशा प्रवाशांचा. दुसरा गट होता उर्वरित महाराष्ट्रात विलगीकरण करणाऱ्या लोकांचा. हा दुसरा गट पहिल्या गटापेक्षा मोठा होता. सरकारने काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना घरातच विलगीकरण (home quarantine) करू देण्याची योजना नुकतीच आणली होती. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात आणखीच भर पडली होती. अधिकाऱ्यांना लाच देऊ पाहणार्‍यांचा किंवा त्यांच्यावर इतर प्रकारे दबाव आणू पाहणाऱ्या अशा लोकांचा एक जथ्थाच इथे जमला होता! “अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न करू नये” असा कोणताही फलक येथे नव्हता, पण असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला असता का, ही शंकाच आहे.

या गोंधळामुळे विचलित न होता मी ज्यांनी मुंबईत आधीच हॉटेल रूम बुक केले आहे अशा प्रवाशांच्या रांगेत सामील झालो. माझा बोर्डिंग पास आणि हॉटेलचे रूम बुकिंग झाल्याची पुष्टी देणारा मोबाइलवरचा संदेश अधिकार्‍यांना दाखवायचा आणि त्यांनी त्याची नोंद करून घ्यायची इतकी सोपी प्रक्रिया होती. पण आधी बुकिंग न केलेले असेही पुष्कळ प्रवासी होते. त्यांना उशिरा जाग येऊन त्यांनी जवळपासच्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक करण्यासाठी जीवाच्या आकांताने कॉल करायला सुरुवात केली होती. प्राप्त परिस्थितीत, नियम माहीत असतानाही, प्रवासाची काहीही पूर्वतयारी न केलेले हे लोक पाहून मला धक्काच बसला पण या लोकांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी शेवटी एक्झिट गेटपाशी पोहोचलो.

इथे आणखी एका गोंधळाला तोंड द्यावे लागले. आलेल्या प्रवाशांना खाजगी टॅक्सी, ऑटो किंवा अगदी बसमध्ये बसण्याचीही परवानगी नव्हती. केवळ सरकारी मिनीबस सेवा उपलब्ध होती. या बसेसना त्यांचा निश्चित मार्ग देण्यात आला होता. आधीच्या प्रवाशांना त्यांच्या हॉटेलपर्यंत सोडायला गेलेली बस परत येईपर्यंत मला थांबावे लागले.

जवळपास २० मिनिटे एक्झिट गेटजवळ थांबल्यानंतर मला ५० रुपयांचे तिकीट काढून बसमध्ये जाण्यास सांगितले. ही पद्धत तशी चांगली चालू होती पण काही बसचालक आपल्या बसमध्ये नियमापेक्षा जास्त लोक भरुन घेत होते. काळजी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे विमानतळासारख्या अतिदक्षतेच्या ठिकाणी अगदी कमी लोक सामाजिक अंतराचे निकष पाळत होते आणि मास्क घालत होते. त्यातून पहाटेचे २ वाजले होते आणि मी तहानलेला आणि दमलेला होतो. सुदैवाने मी ज्या हॉटेलमध्ये राहणार होतो ते ‘लेमन ट्री’ हे ४-स्टार हॉटेल विमानतळापासून जवळच १० मिनिटांच्या अंतरावर अंधेरी-कुर्ला रोडवर होते. आमच्या मिनीबसमध्ये माझ्यासह तीन प्रवासी, आणि सामान ठेवण्या-काढण्यात मदत करण्यासाठी एक व्यक्ती होती. हा पंचविशीचा तरुण सकाळपासून त्या बसमधून प्रवास केलेल्या प्रवाशांच्या संख्येचा कागदाच्या तुकड्यावर रेकॉर्ड ठेवत होता. त्याने माझे सामान खाली उतरविण्यात मदत केली आणि हॉटेलच्या स्वागतकक्षात नेले. त्या वेळी मला समजले की मी हॉटेलमध्ये मुक्काम करतो आहे याची खातरजमा करणे हेही त्याचे काम आहे. त्याने एका कागदाच्या तुकड्यावर स्वाक्षरी केली, आणि रिसेप्शनिस्टची सहीही घेतली. 'टिप' मिळण्याची त्याची अपेक्षा असल्याचे मला जाणवले. मी पन्नास रुपयांची नोट त्याच्या हातात कोंबली आणि ताबडतोब माझ्या खोलीकडे गेलो. हॉटेलमध्ये पोहोचताच मी माझ्या कुटुंबियांना फोन करण्याचा विचार केला.

हॉटेलमध्ये विलगीकरणात

आता पहाटेचे तीन वाजले होते आणि त्यावेळी हॉटेल मला कोणत्याही प्रकारचे भोजन देईल अशी मला अपेक्षा नव्हती. तथापि, त्यांनी ताजे शिजवलेल्या अन्नाचे पॅकेट पाठविण्याची तयारी दाखवली. त्या पॅकेटमध्ये खिचडी आणि सॅलड होते. पुढील ७ दिवस मला सेवा कशी मिळणार आहे हे मला कळायला लागले. दिवसातून तीन वेळा वेटर खोलीची घंटी वाजवत असे आणि जेवण खोलीच्या बाहेर टेबलवर ठेवत असे. संपर्क टाळण्यासाठी माझ्या खोलीत पाण्याच्या २० बाटल्या आधीच ठेवल्या होत्या. हे संस्थात्मक विलगीकरण असल्याने त्यांना दररोज माझी खोली साफ करण्याची परवानगी नव्हती.

पण बेड आणि काम करण्यासाठी एक टेबल खोलीत होते. तेव्हा मी स्वतःशी विचार केला की ‘हेही नसे थोडके’! स्वच्छ, आरामदायक, कार्यक्षम रूम सर्विस असलेली खोली मला मिळाली हे माझे भाग्यच. आता काम आणि झोपेचे एक रुटीन बनवले की झाले - म्हणजे हा सात दिवसांचा काळ सहज गेला असता. हॉटेलने मला आधीच सांगितले होते की पाचव्या दिवशी माझी कोविड चाचणी केली जाईल. तिचा निर्णय नकारात्मक आला तर माझी हॉटेलमधल्या विलगीकरणातून सुटका होईल. प्रवासाच्या दगदगीमुळे मी लगोलग झोपी गेलो. मला जेटलॅगमधून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतील याची मला जाणीव होती. अन्नाची गुणवत्ता आज दिसली तशीच टिकून राहिली तर बरे होईल असे वाटून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या खोलीची एक मोठी खिडकी उघडली - ती हॉटेलच्या मागील बाजूस उघडत होती. खोलीतून दिसणारा एकमेव नजारा म्हणजे शॉपिंग मॉलसारखे दिसत असलेले अपूर्ण बांधकाम. एक लहान मोनोरेलदेखील दूरवरून हळू हळू चालत होती. अपूर्ण आणि अचानक थांबलेले बांधकाम माझ्या पीएचडी थीसिससाठी समर्पक रूपक वाटले! हौसेने सुरु केलेले महत्त्वाचे प्रकल्प कोविडमुळे अचानक बंद पडले आहेत, असे होण्याची वेळ केवळ माझ्या संशोधनावरच आलेली नव्हती.

माझ्या पलंगाच्या अगदी समोर एक विशाल एलईडी टीव्ही होता. भारताबाहेर गेल्यापासून माझ्या आयुष्यातून मी काय गमावले आहे याची एकदम मला जाणीव झाली! दिवसाच्या कोणत्याही वेळेला झोपत, कधी चित्रविचित्र टीव्ही कार्यक्रम पहात, आणि तळलेले स्नॅक्स खात मी ते सातही दिवस तसे आनंदातच घालवले. अन्न माफक मसालेदार, कमी तेलकट होते. वेगवेगळ्या डाळ आणि तांदळाच्या प्रकारासह रोजची वेगळी भाजी असल्याने पुण्यातील घरी पोचण्यापूर्वीच माझा भारतीय खाद्यपदार्थांचा कोटा पूर्ण झाला. तासन्तास झोपणे, चित्रपट पाहणे, खाणे, खिडकीबाहेर टक बघत बसणे, आणि कधीकधी मित्र / सहकाऱ्यांसमवेत फोनवर गप्पा मारणे यात काळ चांगला गेला.

काही दिवसातच खोली सोडण्याची वेळ आली. माझी कोविड टेस्ट ठरल्याप्रमाणे झाली. कोविड किट्ससह मुखवटा घातलेल्या दोन माणसांनी माझे नाक आणि घशातील स्वाब घेतले आणि मला सांगितले की दुसर्‍या दिवशी चाचणीचा निकाल हॉटेलच्या रिसेप्शनकडे देण्यात येईल. अवघ्या ९८० रुपयांत ही चाचणी पार पडली. इंग्लंडमधल्या अनुभवाच्या तुलनेत ही रक्कम आणि हा अनुभवही पूर्णपणे वेगळा होता!

माझी टेस्ट निगेटिव्ह आली, आणि मी पुण्याला जाण्यासाठी निघालो. माझ्या वडिलांनी मित्राची कार आणली होती. सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर मला माझ्या कोविड चाचणीची एक प्रत आणि हॉटेलमध्ये सात दिवसांचे अलगीकरण पूर्ण केल्याचा एक कागद मिळाला.

अशा रीतीने महामारीच्या कहरातून मी सुखरूपपणे घरी पोचलो!

सूरज ठुबे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इंग्लंडमध्ये २०२१मध्ये कोविड चाचणी करणं इतकं दुर्मिळ आणि महागडं आहे/होतं हे वाचून आश्चर्य वाटलं. त्या तुलनेत न्यूयॉर्कमध्ये गेलं किमान वर्षभर महानगरपालिकेच्या कोविड चाचणी केंद्रांत कोणत्याही विशेष कारणाशिवाय फुकटात कोविड चाचणी करता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0