चिकित्सावृत्ती : श्रद्धा कुंभोजकर

#संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक #२०२०

चिकित्सावृत्ती : श्रद्धा कुंभोजकर

शब्दांकन - राजन बापट

डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांच्याबद्दल

डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी इतिहास आणि संस्कृतभाषेत एम. ए.ची पदवी मिळवली आहे आणि याच विषयांमध्ये त्यांच्याकडे पीएचडीसुद्धा आहे. त्यांनी इतिहास या विषयात डॉक्टरेट – विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे. एकोणिसाव्या शतकातला महाराष्ट्र, ऐतिहासिक लिखाणांचा परामर्श, राष्ट्रवाद, युरोपातली आधुनिकता, इतिहासाच्या संदर्भातलं स्मृतींचं स्थान, वैदिक काळ आणि दलितांबद्दलचं संशोधन असे त्यांचे अभ्यासविषय आहेत. पीएचडीच्या ७ आणि एम. फिल.च्या ६ विद्यार्थ्यांना त्यांनी आजपावेतो मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांपैकी "Nationalism : Litererature and Creation of Memory", "19th Century Maharashtra : A Reassessment (Modernity and Popular Culture in late 19th Century Maharashtra)" ही काही नावं होत. या व्यतिरिक्त त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधनपर निबंध, पेपर्स प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या या व्याख्यानाचं वर्णन "चिकित्सावृत्ती" - "The Spirit of Inquiry" - असं काहीसं करता येईल. हे लिखाण म्हणजे त्यांच्या या व्याख्यानाचं लिखित स्वरूप आहे.

*

भाषण

माझा इतक्या जिव्हाळ्याने माझा परिचय करून दिल्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित माझे मित्रमैत्रिणी - ज्यांमध्ये प्रा. लता छत्रे आहेत, माझ्यासमोर इथे विद्यापीठातले पाली विभागप्रमुख आहेत, प्राध्यापक, ज्येष्ठ विद्यार्थी आणि संशोधक इथे प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या कुतूहलापोटी आणि प्रेमापोटी हे सर्व इथे जमलेले आहेत. बौद्ध तत्त्वज्ञान आणि धर्मचिंतन यांमध्ये खरं तर तुम्हां सर्वांना माझ्यापेक्षा खोलवरची समज आहे, त्यामुळे खरं तर तुमच्यासमोर मी काय बोलणार? त्यामुळे मी आपली मला थोडं कळतं त्या अंगाने - म्हणजे बौद्धविचारांच्या इतिहासाच्या अंगाने - बोलणार आहे. अर्थात बौद्ध तत्त्वज्ञान हा एकंदर तत्त्वज्ञानाच्या आणि वैचारिकतेच्या समग्र प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि या न्यायाने तो इतिहासाच्या अभ्यासाचा भाग बनतोच, हे वेगळं सांगायला नको.

या व्याख्यानमालेचं प्रारंभीचं उद्घाटनाचं व्याख्यान म्हणून मी कशावर बोलावं असं जेव्हा ठरत होतं तेव्हा हा "The Spirit of Inquiry" - म्हणजे ज्याला "चिकित्सावृत्ती" म्हणता येईल असा विषय पुढे आला. या व्याख्यानमालेच्या "धम्म साकच्छा" - म्हणजे "बौद्ध धम्माबद्दल समूहाने एकत्र येऊन केलेली संभाषणं" या विषयाशी सुसंगत असल्याने तो मान्य करण्यात आला.

आंबेडकर

"चिकित्सावृत्ती" या विषयाला हात घालताना सुरुवातीलाच आपण ध्यानात घ्यायला हवं की मानवी जीवनाबद्दल जिज्ञासा बाळगणं, त्याच्या हेतूंबद्दल आणि अर्थाबद्दल चिकित्सा करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून अनेक विचारवंतांनी चालवलेली आहे. आपण घटकाभराकरता युरोपचा विचार करूया. अमर्त्य सेन यांचं "The Argumentative Indian" हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना चिकित्सावृत्ती ही संकल्पना ठाऊकच असेल. इथे आपण हे ध्यानात घ्यायला हवं की भारतीय विचारपरंपरेत अनेक प्रवाह आहेत, भारतीय तत्त्वविचारांमध्ये अनेक दर्शनं आहेत. "भारतीय विचारपद्धतीमध्ये प्रश्न उपस्थित करायला कसलाही वाव नाही" असं एकंदर चित्र पाश्चात्त्यांसमोर रंगवलं जातं. अर्थात असा समज होण्याकरता अनेक दाखले आपल्याकडे आहेतच. कुठल्यातरी निमित्ताने मी बृहदारण्यकाचा अभ्यास करत होते त्यावेळी मला याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्यातला संवाद वाचायला मिळाला. एका अर्थाने ही कथा बळ पुरवणारी, बंधमुक्त करणारी खरी. परंतु त्याचबरोबर परंपरेतून चालत आलेल्या दडपशाहीचे अंश त्यातही दिसतातच. इथे या कथेत याज्ञवल्क्य आणि गार्गीमधला संवाद येतो. याज्ञवल्क्याचं असं प्रतिपादन आहे की यज्ञामध्ये त्याने निभावलेल्या त्याच्या प्रमुख भूमिकेकरता त्याला हजार गायी मिळणं लागू आहे. त्याने तसा जाहीर दावा केलेला आहे आणि - बहुदा तत्कालीन प्रथेप्रमाणे - "यावर कुणाची हरकत असली तर सांगा" असं तो म्हणतो. तेव्हा त्यावर गार्गी तिची प्रश्नमाला सुरू करते. शेवटी अनेक प्रश्नांमागून प्रश्न येत राहतात आणि ती मानवी अस्तित्वाच्या हेतू-प्रयोजनांपर्यंत येऊन पोचते. तेव्हा याज्ञवल्क्य गार्गीला उद्देशून त्याचे कुप्रसिद्ध शब्द उच्चारतो "मा अतिप्राक्ष्यी, गार्गी" - "गार्गी, तुला तुझं मस्तक धडावेगळं होऊ द्यायचं नसलं तर अति प्रश्न विचारणं बंद कर."

आता, यामध्ये सरळसरळ भारतीय परंपरेतल्या दडपशाहीचं आणि स्त्रियांच्या बाबत "पायीची वहाण पायी बरी" या सूत्राचं दर्शन होतं हे वेगळं सांगायला नको. अर्थात याज्ञवल्क्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्यांमध्ये गार्गीबरोबर उद्दालक आणि आरुणीसारखे अन्य लोकही होतेच. ती काही एकटीच नव्हती. पण अति प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया नकोशा असण्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. या पार्श्वभूमीवर इथे धम्म-चिकित्सा करण्याकरता - धम्म-साकच्छा करण्याकरता इतक्या बहुसंख्येने स्त्रिया जमलेल्या मला दिसतात. स्वाभाविकच, आपण त्या, मुस्कटदाबीच्या परंपरांपासून खूप दूर आलेलो आहोत. आणि या प्रवासात बौद्धविचाराचा प्रभाव आपल्यावर आहे हे अगदी नक्की.

अर्थात दडपशाही, मुस्कटदाबी इतकंच काही आपल्या परंपरेत नाही. त्यांचं अस्तित्व नाकारण्यात हशील नाही; पण त्याचबरोबर मोकळीक देणाऱ्या अनेक बाबी आपल्या परंपरेमध्ये आहेत - आणि या नाण्याच्या दोन्ही बाजू भारतीय परंपरेइतक्याच युरोपमधल्या परंपरेलाही लागू होतातच. भारतीय विचारपद्धतीमध्ये आपल्याला (दृढविश्वास ठेवेल त्याला ज्ञान मिळतं) "श्रद्धावान् लभते ज्ञानम्" किंवा (संशय घेणाऱ्याचा नाश होतो) "संशयात्मा विनश्यति" अशी सूत्रं दिसतात. त्या सूत्रांचा अर्थ एकच- "प्रश्न विचारू नका". मात्र त्याच्याच बरोबर एक दुसरी परंपराही निर्माण झाली, जी प्रश्न विचारण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारे शंका व्यक्त करण्याकरता उद्युक्त करणारी होती. आणि बौद्धदर्शनामध्ये या परंपरेची बीजं आहेत हे आपल्याला उघडपणे दिसतं. "शब्दप्रामाण्याला शिरोधार्य मानू नका, केवळ मी म्हणतो आहे म्हणून माझ्या म्हणण्याला नि अधिकाराला स्वीकारू नका" असं आपल्या परंपरेत पहिल्यांदा म्हणणाऱ्यांपैकी गौतम बुद्धांचं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल. एकत्र येऊन चर्चा करून पुढे जात राहण्याच्या याच परंपरेचं वर्णन अमर्त्य सेन "The Argumentative Indian" असं करतात.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की या परस्परविरोधी गोष्टी आपल्या परंपरांमध्ये दिसत असताना, कुठल्या परंपरेला आपण अंगिकारायचं? भारतीय संदर्भात बोलायचं तर, एकेकाळी ज्ञानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्याचा आवाज दडपणाऱ्या आज्ञाधारक परंपरांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता असं दिसतं. मात्र प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा, शंका विचारणाऱ्यांचा चिकित्सक प्रवाहसुद्धा कालपरत्वे मोठा होत गेलेला आपण पाहतो. आणि प्रश्न उपस्थित करू न देणाऱ्यांकडे या सर्व चिकित्सेला पर्याय असतो तो म्हणजे श्रद्धेचा. (माझं स्वत:चं नाव श्रद्धा असल्याबद्दल इथे मला हसू येतंय. ते श्रद्धाच्या ऐवजी श्रुती असतं तर मला आवडलं असतं.)

थोडं अधिक पुढे जाऊन सांगायचं तर प्रश्न विचारणारी परंपरा असंही सांगते की तुम्ही तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा, जमेल ते जाणून घ्या पण शेवटी निर्णय घ्याल ते स्वतःचा विवेक वापरून.

युरोपच्या इतिहासाकडे पाहिलं असता आपल्याला युरोपीय परंपरेतसुद्धा, या मुस्कटदाबीचा, "गप्प बसा" संस्कृतीचा प्रभाव होता असं दिसतं. फार मोठं सरसकट उदाहरण घ्यायचं तर ग्रीको-रोमन परंपरेत हे ठळक प्रमाणात होतं. त्यांच्या काळात स्त्रियांना, गुलामांना कसलेही विशेष अधिकार नव्हतेच. ज्ञानाच्या निर्मितीमध्ये सोडा, ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेत त्यांना कसलंही स्थान नव्हतं. हीच गोष्ट इतर अनेक दुय्यम दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या घटकांना लागू होती. मात्र युरोपमध्ये रेनेसान्स - म्हणजे पुनरुज्जीवन ही एक मोठी घटना घडली. पुनरुज्जीवनाची ही घटना साधारण १४व्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत काही शतकं चालू राहिली. आणि तिथून मग युरोपमध्ये Spirit of Inquiryला - चिकित्सेच्या वृत्तीला - अधिकाधिक चालना मिळाली. सॉक्रेटीस, ॲरिस्टॉटलच्या काळातही तत्त्वज्ञानाने प्रगती नक्कीच केली आणि त्यामध्ये या चिकित्सेचाच प्रमुख हातभार होता. पण ही चिकित्सा करण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य एका अत्यंत मर्यादित वर्गाकडे होतं. याचा अर्थ दुर्बल घटकांचा आवाज बंद करण्याचा मक्ता काही फक्त भारतीय संस्कृतीचा नव्हे. जगभरामध्ये हे पूर्वापार होत आलेलं आहे.

मग या परिस्थितीत प्रश्न असा उपस्थित होतो की समाजशास्त्रज्ञांची, संशोधकांची भूमिका काय असली पाहिजे? तर मला असं वाटतं की संस्कृतीमधल्या, इतिहासामधल्या अशा प्रवाहांचा अभ्यास आपण अधिकाधिक केला पाहिजे ज्यात बंधनातून मुक्तीचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे. अशा परंपरांचा अभ्यास, त्यांना सार्वजनिक संवादप्रक्रियेत आपण अधिकाधिक आणायला हवं. आपल्या परंपरांमधल्या प्रतिगामी, चुकीच्या गोष्टींबद्दलचं दस्तावेजीकरण पुष्कळ झालेलं आहे. त्याचा एक परिणाम असा झालेला आहे की समाजाच्या परिघावर राहणाऱ्या किंवा ज्यांना दुय्यम वागणूक मिळत राहिली अश्या वर्गाची एकसुरी किंवा टोकाची प्रतिमा जनमानसात आणि सार्वजनिक संवादामध्ये रुजलेली आहे.

समाजात उपेक्षित राहिलेला, वंचित राहिलेला वर्ग शतकानुशतकं काही फक्त लोळागोळा होऊन पडलेला वर्ग नव्हता. त्यांनी जिथे-जिथे शक्य तिथे आणि तेव्हा प्रतिकार केला आहे. आवाज उठवलेला आहे. परंपरेच्या जोखडातून त्यांना संपूर्ण मुक्ती अजूनही मिळाली नसेलसुद्धा; परंतु आजच्या संशोधकांनी या अशा स्वरूपाच्या प्रतिकाराच्या, बंडखोरीच्या प्रयत्नांना हुडकून प्रकाशात आणलं पाहिजे. समाजशास्त्राच्या अभ्यासाला एक अर्थपूर्ण दिशा यातून मिळेल असा माझा विश्वास आहे. मुख्य प्रवाहातल्या अन्यायकारक बाबींचं चित्रण, दस्तावेजीकरण , संशोधन प्रचंड प्रमाणात झालेलंच आहे आणि होत राहील. परंतु वंचित मानल्या गेलेल्या वर्गाकडे केवळ एकाच एका चष्म्यातून पाहणं, त्यांचं फक्त एकसाची असं गलितगात्र अस्तित्व मानणं हेही बरोबर नाहीच.

शतकानुशतकं या वर्गातल्या कुणाकडेच कसलाच तरणोपाय कधीच नव्हता, कसलीही साधनं कुणाकडे कधी उपलब्ध नव्हती असं अजिबात नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे आणि तेव्हा विद्रोह झाला. घुसमटतानाही मुठी आवळल्या गेल्या, आक्रोश केला गेला, मनगटं एकत्र आली. त्यातून पूर्णस्वरूपी, चिरस्थायी मुक्ती मिळाली नसेल, पण हे घडलं होतं. मरणाची शिक्षा स्वीकारून गॅलिलिओसुद्धा नाही का म्हणाला होता ? "And yet it moves!" सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी मात्र त्याच्याभोवती फिरते आहे हे त्याचं प्रतिपादन तत्कालीन धार्मिक समजुतींना धक्का देणारं आणि मुख्य म्हणजे पर्यायाने चर्चच्या सामाजिक पगड्याला आव्हान देणारं होतं. त्याच्यावर खटला भरला गेला, त्याच्यावर काहीही लिहिण्याची बंदी घातली गेली. त्याच्या सुनावणीतून तो बाहेर आल्या आल्या अगदी क्षीण आवाजात का होईना, पण तो म्हणालाच "And yet it moves!" म्हणजे शेवटी पृथ्वीच प्रदक्षिणा घालते आहे, ती काही स्थिर नाही हे पालुपद काही त्याने सोडलं नाही! सर्व शिक्षा आणि हालअपेष्टा सोसून त्याची सत्यवचनाची बांधिलकी तुटली नाही.

तद्वतच, भारतीय संदर्भातसुद्धा, ही प्रतिकाराची, हार न मानण्याची वृत्ती होतीच. आणि पाली भाषेमधलं समग्र वाङ्मय जणू या प्रतिकाराच्या आवाजांनी भरून गेलेलं आहे. तर मी पुन्हा म्हणेन की संशोधकांचं हे कर्तव्य आहे की आपल्याकडचे बंद पडण्यास नकार देणारे आवाज, हे विद्रोह यांच्यावर प्रकाश टाकत राहायला पाहिजे.

आणि हे चालू घडीला, एकविसाव्या शतकात आपण का करायला पाहिजे? कारण अगदी आतासुद्धा युरोपात ज्या राजवटीचे वारे वाहताहेत, ते त्या शतकानुशतकांपासूनच्या दडपशाहीच्या, सत्याचा अपलाप करण्याच्या वृत्तींशी नातं सांगणारे आहेत. नाझी राजवटीने ज्यूंचं शिरकाण केलंच नाही असं मानणाऱ्या वर्गाला पूर्वी मिळत होती त्यापेक्षा अधिक मान्यता तिथे मिळते आहे.

आणि नेमकं हेच अगदी आपल्याकडेही होतंय. अशा प्रकारच्या अन्यायाविरोधातल्या बंडाबद्दलचं सत्य दडपू पाहणाऱ्या, आपल्या परंपरेत असलं काही होतं हेच नाकारणाऱ्या, सनातन धर्माशी कडवं इमान दाखवणाऱ्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. भीमा कोरेगावची लढाई झालीच नव्हती असं प्रतिपादन अलीकडे केलेलं वाचनात येतं आहे, हे त्याचंच एक उदाहरण.

दलित संगीत

आपल्याकडे गौतम बुद्ध आणि मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रबोधनाची केवळ प्रेरणाच नाही तर मार्गही दाखवलेला आहे. बौद्धविचारांमध्ये "थेरीगाथा"सारख्या गोष्टी येतात. त्या गाथांमध्ये असं दिसतं की वयाने पिकलेल्या वृद्ध महिलांवर बौद्धविचारसरणीचा परिणाम होतो आणि त्या म्हणतात की आयुष्यभर सगळं सोसल्यानंतर आता मला मुक्तीचा मार्ग दिसतो आहे. शृंखला तुटल्यासारखं वाटतं आहे. आणि त्या परंपरेशी विद्रोहाचा झेंडा उभारतात.

मला वाटतं की अशा स्वरूपाच्या घटनांना आपण प्रकाशात आणायला हवं. नाहीतर मग आदिवासी, दलित, स्त्रिया या सर्वांकडे आपण केवळ शेणामेणाचे पुतळे आणि अन्यायाविरोधात हूं की चूं न करणारे म्हणून पहात राहू. या वर्गातल्या ज्यांनी विचारपूर्वक अन्यायाविरोधात आवाज उठवला त्या त्या सर्वांचं दस्तावेजीकरण आपण करायला हवं. आणि भारतीय संदर्भात इतक्या भाषा, इतक्या संस्कृती आहेत की प्रत्येक भाषेत आपल्याला हे दाखले सापडतील. तुकाराम म्हणतात, "आम्हासी नावडे आमुचे संचित" म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताला ते नाकारू पाहत होते. तीच कथा कबीराची. आणि प्रत्येक भाषेत असं कुणी ना कुणी उभं राहिलंच. युरोपातल्या गॅलिलिओ कोपर्निकस वगैरेंनी बंड केलं म्हणजे काय केलं? पूर्वापारपासून जे चालत आलं तेच फक्त अंतिम ज्ञान हे मानायला त्यांनी नकार दिला.

बुद्ध

मग एक प्रश्न असा येतो की नक्की का अंगिकारायचं हे जिज्ञासेचं सूत्र? गौतम बुद्धांचं सुप्रसिद्ध वचन आठवा : "अत्त दीप भव". म्हणजे आपला दिवा आपणच व्हा. कुणी दुसरा मार्ग दाखवेल या आशेवर राहणं सोडून द्या. डॉ. आंबेडकरांच्या लिखाणात अशा असंख्य जागा येतात ज्या प्रेरणादायक आहेत. स्वतंत्र विचारसरणीचा त्यांनी अनेक ठिकाणी जयजयकार केलेला आहे. विशेष करून प्रस्थापित विचारसरणीच्या विरोधात जाणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या स्वतंत्र विचारसरणीबद्दल ते लिहितात. व्यवस्थेला धक्का बसायला लागल्यावर व्यवस्था तुमच्यावर उलटू शकते. पण त्यामुळे घाबरून आपलं कार्य थांबवू नका. प्रश्न विचारत राहा; स्वतंत्र, स्वायत्त विचारसरणी ठेवा.

तुमच्यापैकी काहींना वाटेल की जिज्ञासेचं हे तत्त्व, ही प्रश्न विचारत ठेवण्याची प्रवृत्ती हे सर्व पुस्तकी आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात याचा काय संबंध? त्यावर माझं उत्तर असं की की ही एक जीवनसरणी आहे. ती एक प्रवृत्ती आहे जी आयुष्यात तुम्हाला कुठेही साथ देईल, मार्ग दाखवेल. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरदार वर्गातले असाल. तुम्हाला हे नक्कीच महत्त्वाचं वाटेल. आणि संशोधनाच्या बाबत तर याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

इथे जमलेल्यापैकी बहुतांश लोक सामाजिक संशोधनातले आहेत. तुमच्या संशोधन मार्गदर्शक, वरिष्ठांनी हे तुम्हाला आधीच सांगितलं असेलच. पण तरी मी परत सांगते : तुमच्या संशोधनातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कुठल्या स्वरूपाचे प्रश्न तुम्ही उपस्थित करता? तुमच्या संशोधनातल्या मध्यवर्ती विषयातल्या प्रश्नांच्या व्याख्येमध्ये कितपत स्पष्टता आहे? ज्या प्रश्नाचा तुम्हाला धांडोळा घ्यायचा आहे त्याच्या सांगोपांगाशी तुमची ओळख आहे का? तो तुम्ही दीर्घकाल आपल्या मनात मुरवलेला आहे का? या बाबी महत्त्वाच्या.

आणि याच्याच बरोबर एका दुसऱ्या तत्त्वाचाही उल्लेख करते. ते म्हणजे विषयाला पूरक असं वाचन. आपल्या अभ्यासविषयावर कुणी-कुणी काम केलं आहे? त्यावर या आधी कुणी-कुणी काय म्हणलं आहे? अभ्यासविषयाच्या लिखाणापुरतंच स्वतःचं वाचन मर्यादित ठेवण्याची प्रवृत्ती हल्ली दिसते. ती अयोग्य आहे. कुठल्याही कामाची चिकित्सक आवृत्ती वाचणं महत्त्वाचं. त्यावर अनेक लोकांनी काम केलेलं असतं. निरखून-पारखून पाहिलेलं असतं. नुसत्या प्रमुख अभ्यासविषयापुरतंच मर्यादित वाचन करून आपापल्या निष्कर्षाप्रत पोचणं अपुरं आणि अयोग्यही आहे. हस्तामलकवत् म्हणजे करतळी आवळा ठेवल्यासारखं अभ्यासविषयाच्या ज्ञानाचं संपादन करावं असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. तद्वतच आपल्या संशोधनविषयाबाबत अनेकानेक दृष्टिकोन जाणून घेणं अत्यावश्यक आहे. मग प्रमुख अभ्यासविषयाच्या जोडीने वेगवेगळे स्रोत त्यात आलेच.

याच्या पुढची पायरी म्हणजे आपल्या संशोधनाच्या परिकल्पना रचण्याची. एका अर्थाने ही पायरी म्हणजे अंदाजबांधणी असते. पण ही अंदाजबांधणी करण्याकरता आपण भरपूर दाखले, भरपूर निरीक्षणं केलेली हवीत. आपल्या गाठीला वेगवेगळ्या अंगाने निरखून-पारखून घेतलेली माहिती हवी. तेव्हा कुठे आपण अभ्यासविषयाबद्दल अंदाज बांधू शकू. आणि ते अंदाज प्रगल्भ स्वरूपाचे असतील. शंबूकाची कथा वाचताना मग आपल्याला अंदाज करता येतो की तत्कालीन व्यवस्थेने शूद्रांना कसं वागवलं, त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन काय होता.

आणि असे अंदाज, तुमच्या संशोधनाच्या परिकल्पना अर्थातच चुकू शकतात. त्यात काही चूक नाही. एखाद्या चुकलेल्या परिकल्पनेतूनही "हे चुकीचं होतं" या स्वरूपाचं ज्ञान होतंच. म्हणजे ज्ञानात भरच पडते. सम्यक् ज्ञानाचं स्वरूप हे असंच असतं.

या पुढची पायरी म्हणजे संशोधनाचा आराखडा. एखाद्या विषयामध्ये व्यक्तींशी संवाद साधून विशिष्ट माहिती गोळा करणं असतं. एखाद्या विषयामध्ये कागदपत्रांचा अभ्यास आणि त्यांचं विश्लेषण असू शकतं. तुमच्या संशोधनपद्धती तुमच्या संशोधनाच्या स्वरूपावर अवलंबून असतात. तुम्हाला कुठली साधनं वापरायची आहेत, वापरता येणार आहेत हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

आणि ही सर्व साधनं वापरून मग तुम्ही विदासंकलन करता. त्यातून काही ठळक प्रवाह दिसतात का ते पाहायला लागता. तुम्ही पुरातत्त्वाचे अभ्यासक असाल तर पुरातन गोष्टींचं उत्खनन कराल. तुम्ही नाणेतज्ञ असाल तर नाण्यांचे नमुने मिळवाल इत्यादी इत्यादी. ही पायरी साधारण संशोधनातली मधली पायरी म्हणून ओळखली जाते. अर्थातच ती मानव्यशाखेबरोबरच नैसर्गिक शास्त्रांच्या संशोधनाला तितकीच लागू आहे.

मला असं बऱ्याचदा दिसतं की जे संशोधन करणारे विद्यार्थी असतात ते आपापल्या मार्गदर्शकांकडे खूप आधीपासूनच "आमचं जे काही वाचायचं, शोधायचं ते सर्व झालेलं आहे" असं सांगत येतात. त्यांना मी नेहमी असा सल्ला देते की घाई करू नका. एखाद्या कागदपत्रामध्ये काही विधान केलं असलं तर लगेच ते विधान ग्राह्य मानणं बरोबर नाही. कुठल्याच एकाच एका स्रोतावर विश्वास टाकणं अयोग्य. चिकित्सावृत्ती ही सतत जागृत हवी. त्याची ज्योत मनात सतत तेवत ठेवायला हवी. केवळ काही मर्यादित स्रोतांकडून, मर्यादित प्रमाणातल्या व्यक्तींकडून, अगदी थोड्याच दस्तावेजावरून निष्कर्ष काढून आपलं संशोधन संपल्याचं जाहीर करणं चुकीचं. सर्वात महत्त्वाचं : तुम्ही सहजासहजी कशावरच विश्वास न ठेवणं. शास्त्रीय स्वरूपाच्या शंका उपस्थित करणं. वेगवेगळ्या अंगांनी प्रश्न विचारणं. वेगवेगळ्या पैलूंचा विचार करणं.

आणि हा अविश्वास म्हणजे कुठल्याही स्रोताचा, व्यक्तीचा, साधनाचा अवमान किंवा त्यांचं अवमूल्यन नव्हे. तर सांगोपांग अभ्यास करताना एकाच एका गोष्टीवर विश्वास न ठेवता अनेक गोष्टींना विचारात घेऊन त्या एकमेकांशी सुसंगत आहेत का, त्यातून काही विशिष्ट प्रकारचं सत्य सामोरास येतंय का हे पाहत राहणे. एखाद्या नाण्यावर तत्कालीन सम्राटाचं वीणा वाजवण्याचं चित्र असेल तर लगेच तो सम्राट कलाप्रेमी होता आणि कलेला आश्रय देणारा होता असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. त्याच्या जोडीला एखादं चित्र मिळतंय का, काही दस्तावेज मिळतो आहे का, ते शोधणं आणि मुख्य म्हणजे अशा विविध साधनांकडून मिळालेल्या माहितीचा ताळमेळ लागतो आहे का ते पाहणे. थोडक्यात विदासंकलन करून झाल्यानंतर मिळालेली माहिती विश्वासार्ह आहे का ते पडताळून पाहाणं ही पुढची पायरी. मिळालेल्या माहितीची चिकित्सा करणं, पृथक्करण करणं ही त्या पुढची पायरी. मिळवलेल्या माहितीचा अर्थ लावणं ही पुढची पायरी. त्यातून काही पॅटर्न दिसतात का, काही ट्रेंड्स दिसतात का ते पाहणं. आणि या ट्रेंड्सवर आधारित निष्कर्षांच्या प्रक्रियेला सुरुवात करणं ही पुढची पायरी. हे ट्रेंड्स तुमच्या संशोधनाच्या सुरुवातीला मांडलेल्या परिकल्पनांना सिद्ध करू शकतात किंवा त्यांना चुकीचंही ठरवू शकतात.

मांडलेल्या सिद्धांतांच्या आणि सर्व संशोधन करून झालेल्या निष्कर्षांच्या नातेसंबंधांबद्दल एक गमतीशीर असं संस्कृत वचन आहे. असं म्हणतात की "गोपुच्छवत्" असं हे प्रकरण आहे. म्हणजे काय तर शेवटी ही प्रक्रिया गाईच्या शेपटीप्रमाणे आहे. म्हणजे गाईच्या शेपटाच्या टोकाला कसे अनेक केस असतात, ते मध्येच छानसे फुगीर असतात, आणि शेवटी परत एकत्र येऊन संपतात. तसं आपला अभ्यास अनेक धाग्यांतून, सूत्रांपासून सुरू होतो. मग आपण आपल्या विचारांना जरा फुलारून त्यांचा विस्तार करतो. आणि अभ्यासाच्या शेवटी परत ते सगळे धागे एकवटून आपले निष्कर्ष मांडतो.

संशोधनप्रक्रियेचा हा असा लेखाजोखा आहे असं एकंदर म्हणता येईल. इथे मी माझ्या या छोट्याशा भाषणाचा शेवट करते आहे. गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांनी जो चिकित्सावृत्तीचा, प्रश्न आणि शंका उपस्थित करत राहण्याचा, कशावरही सहजासहजी विश्वास न ठेवण्याचा जो मार्ग दाखवला आहे, तोच आपल्याला पुढे नेत राहील असा विश्वास मला वाटतो. इथे जमलेल्या सर्वांनी हा मार्ग अंगिकारला असेलच असं मी समजते. संस्कृतीमधल्या अनेक गोष्टी आहेत तशा निव्वळ मांडत राहणे इतकंच आपलं काम नाही. त्यातल्या प्रतिगामी काळोख्या भागातसुद्धा प्रतिकाराचे दिवे कुणी तेवत ठेवले, विद्रोहाचा आवाज कुणी उठवला ते नोंदवत ठेवणं आवश्यक आहे. इतिहास फक्त अन्याय करणाऱ्यांचा आणि तो निमूटपणे सहन करणाऱ्यांचा नाही; तर प्रतिकार करणाऱ्यांचाही आहे याची नोंद आपण ठेवायला हवी. सामाजिक बांधिलकी बाळगणाऱ्या संशोधनाकडून हे कार्य होत राहणं अपेक्षित आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

श्री राजन बापट यांचे आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक अतिशय उत्कृष्ट, संतुलित विचारप्रवर्तक लेख वाचायला मिळाला. त्यांचे हे विचार विज्ञानाच्या अभ्यासकांनीही आचरणात आणण्यासारखे आहेत.
एक चांगला वैज्ञानिक नेहमीच तटस्थपणे आपली निरीक्षणे नोंदवून त्याप्रमाणे जे सिद्ध होईल तोच निष्कर्ष काढतो आणि तेच अपेक्षित असते. पण काही वेळा शास्त्रज्ञ स्वत:च्याच गृहीताच्या इतके प्रेमात असतात की त्याचा त्यांच्या निरीक्षणावरही परिणाम होऊ लागतो. त्यामुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता 21 व्या शतकात फक्त जातीची नाव बदलली आहेत पण स्थिती तीच आहे.
जाग आहे तसेच आहे भेदभाव,आकस अजुन पण आहे.
आणि फक्त भारतात च आहे असे नाही तर हे सर्व जागतिक स्तरावर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कारण त्यांना बदलायचंच नाही किंवा बदलण्याची परवानगीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुरेख लेख आहे. खूप शिकायला मिळाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

'एखाद्या नाण्यावर विणावादक चित्र सापडलं म्हणून राजा कलाप्रेमी होता असा निष्कर्ष लगेच काढू नका' असा jumping to conclusion वृत्तीबद्दल इशारा देऊन केवळ एका ओळीच्या आधारे तुकाराम कर्मवीपाकाला नाकारत होते अस सांगत आपणही तेच केले आहे।

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

तसंही म्हणू शकतो आपण. तुम्ही साधार निष्कर्ष मांडणारा लेख मांडलात तर छानच होईल की- ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया पुढं जाईल. कुठलंही ज्ञान हे कंटिंजंट असतं- म्हणजे संशोधकानं नोंदवलेल्या देशकालपरिस्थितीवर अवलंबून असतं. हवेचा दाब कमी असेल तर पाण्याचा उत्कलनबिंदू बदलतो ना, तसंच. त्यामुळे वेगळ्या डेटावर आधारित वेगळे निष्कर्षही वैज्ञानिक संशोधन पद्धतीनुसार मान्य होऊच शकतात.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अन्वेषण आणि छिद्रान्वेषण - थोडाच फरक आहे. Liked it

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

अतिशय मुद्देसुत व अभ्यासपूर्ण लेख . पण काही निष्कर्षांशी असहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

swati

Dear Shraddha,

I just read your lecture/article in Aisi Akshare. It is great. However, there was one statement that I thought needed to be corrected. The Pali expression attadīpo bhava is often wrongly translated as "Be a lamp/light unto yourself". In the original context, it actually means "Be an island unto yourself." The original phrase is attadīpā viharatha attasaraṇā anaññasaraṇā, dhammadīpā dhammasaraṇā anaññasaraṇā. The idea is that a monk should not depend upon anyone or anything else, but depend solely upon himself and depend upon the Dhamma. The Pali word dīpa in this passage corresponds to the Sanskrit word dvīpa. The corresponding Sanskrit Buddhist texts have: ātmadvīpā bhikṣavo viharatha ananyadvīpā ātmaśaraṇā ananyaśaraṇāḥ dharmadvīpā ananyadvīpā dharmaśaraṇā ananyaśaraṇāḥ. I thought I should mention this to you. With best wishes,

Madhav M. Deshpande
Professor Emeritus, Sanskrit and Linguistics
University of Michigan, Ann Arbor, Michigan, USA
Senior Fellow, Oxford Center for Hindu Studies
Adjunct Professor, National Institute of Advanced Studies, Bangalore, India

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्तदीपा विहरथ अत्तसरणा अनञ्‍ञसरणा - या गौतमबुद्धांच्या मूळ वचनाचा संदर्भ देताना माझी चूक झाली आहे. देशपांडे सरांनी ते लक्षात आणून दिल्यावर मी मूळ संहिता पाहून खातरजमा केली आहे - आणि खरोखरच ते म्हणतात त्याप्रमाणे अत्तदीपा विहरथ याचा अर्थ आपण एखादे बेट - द्वीप - असल्याप्रमाणे अ-लिप्त, न गुंतलेले रहावे असा अभिप्रेत आहे. त्यामुळे ही सुधारणा करायला मला प्रा. माधव देशपांडे सरांमुळे मदत झाली हे इथे आनंदाने नोंदवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातल्या विचारांशी असहमती नव्हे पण एक किंतु मांडतो.

(आपल्या) संस्कृतीमधल्या चिकित्सक किंवा बंधमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या परंपरांचा जास्त अभ्यास व्हायला हवा असं लेखिकेचं मत दिसतं. ठीक आहे. अभ्यास कशाचाही करायला माझी हरकत नाही; आणि एकदा तो करायचा ठरवला की मग त्यासाठी मूळ ग्रंथांच्या आवृत्त्या धुंडाळणं, पालीत ‘दीप’ म्हणजे दिवा की बेट याचा ऊहापोह करत बसणं, यातून निघणारे शोधप्रबंध, असे प्रबंध लिहिणाऱ्यांची जर्नल्सच्या पानांआडून मारामारी हे सगळं ओघाने येतंच. (यात कुचेष्टेचा भाग नाही. पीएच.डी. मलाही आहे.)

पण कशाचीही चिकित्सा करण्यासाठी मुळात अशा कसल्याही परंपरेकडून कुठलीही परवानगी घेण्याची गरज नसते. ‘मला करावीशी वाटली म्हणून मी ती केली. यावर तुमचा आक्षेप असेल तर काशीत जा.’ इतकी स्वत:च स्वत:ला दिलेली परवानगी पुरेशी असते.

इर्शाद मानजी नावाची लेखिका इस्लाममध्ये अशी ‘इज्तिहाद’ नावाची ‘चिकित्सक’ परंपरा शोधू पाहते, आणि तोही मला अनावश्यक खटाटोप वाटतो. इस्लामवर टीका करायची जर जरूर करा. स्वत:ची बुद्धी आणि स्वत:चं कागदपेन इतकं त्यासाठी पुरेसं आहे. सातव्या शतकातलं अरबी शिकण्यात मेंदूतल्या निम्म्या न्यूरॉन्सची कत्तल करून घेऊन मग केव्हातरी क्लान्त मनाने ह्या चिकित्सेला सुरुवात केली पाहिजे असं नाही. कुणालाही विचारत न बसता आत्ताच ती करून टाकणं उत्तम. पण ‘इज्तिहाद’ या विषयावर पीएच. डी. करावीशी वाटली तर तसं करा. हे वायलं अन् ते वायलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)