भाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण

संकल्पना संसर्ग

भाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण

- चार्वी

आपण त्याच त्या नदीत दोनदा पाय टाकू शकत नाही, कारण नदी निरंतर वाहत असते आणि आपणही क्षणोक्षणी बदलत असतो.
हेराक्लायटस (ग्रीक तत्त्वज्ञ)

'अमक्याने तमक्याची मदत केली' हे वाक्य वाचून/ ऐकून काय वाटतं तुम्हांला? 'मी विचार सभेपुढे ठेवितो' हे वाक्य कसं वाटतं वाचायला/ ऐकायला? यातल्या कुठल्या वाक्यावर दुसऱ्या भाषेचा प्रभाव आहे? पहिल्या वाक्यावर हिंदीची छाप आहे हे बऱ्याचशा जणांना ओळखता येईल. दुसरं वाक्य मात्र 'शुद्ध' मराठीच आहे असं वाटतं. इंग्रजी भाषेच्या संसर्गाने मराठीची कशी दुर्दशा झाली आहे, याच्या उदाहरणादाखल हे वाक्य विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेत दिलं आहे. इंग्रजी प्रयोगविशेष (इडियम) तसेच्या तसे मराठीत आणल्याने मराठी 'दूषित' झाल्याची जी उदाहरणं त्यांनी दिली आहेत, ती वाचून त्यात त्यांना नेमकं काय खटकलं आहे, कुठला वाक्प्रयोग विलायती धर्तीवरचा म्हणून त्यांना अप्रशस्त, लज्जास्पद, मूर्खतेचा वाटला, हे मला कळेचना. इतके ते वाक्प्रचार आपल्या अंगवळणी पडले आहेत. म्हणजे, एके काळी 'दूषित' भाषेचा नमुना वाटणारा वाक्प्रचार काही काळाने न्यू नॉर्मल होतो!

वेगवेगळ्या कारणांनी विविध भाषा बोलणारे समूह एकमेकांच्या संपर्कात येतात. कधी शासक - प्रजा म्हणून, कधी शेजारी म्हणून. निर्वासित, भटके, फिरस्ते, स्थानिक, स्थलांतरित, आक्रमणकर्ते, मूळ रहिवासी, आश्रयास आलेले, व्यापारी, प्रवासी - नानाविध माणसं नाना कारणांनी भेटतात, परस्परांशी व्यवहार करतात, संवाद साधतात. एकमेकांच्या भाषा समजून घेतात, शिकतात, शिकवतात, लादतात. माणसांचा वारंवार किंवा दीर्घ काळ संपर्क आला, की त्यांच्या भाषाही एकमेकींशी लगट करू लागतात. नवनवीन तंत्रज्ञान व वस्तूंसाठीचे शब्द (बल्ब, टेबल, खुर्ची, सायकल), शासनव्यवस्थेसंबंधीचे शब्द (जिल्हा, जमीन, हवालदार, पोलीस, दरबार) वेगळ्या संस्था, व्यवसाय, संकल्पनांसाठीचे शब्द (इंजिनियर, दवाखाना), आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते अशा गोष्टींसाठीचे शब्द (टॉयलेट, वाईफ), शास्त्रीय किंवा पारिभाषिक शब्द (ऑक्सिजन, मिनिट), विशिष्ट गटात/ संस्थेत/ संस्कृतीत वापरले जाणारे शब्द (हडेलहप्पी, आलबेल) अशा कितीतरी शब्दांची सरमिसळ होऊ लागते. फक्त शब्दच नव्हे, तर वाक्प्रचार, वाक्यरचनेच्या पद्धती अशा अनेक बाबतीत एका भाषेचा दुसरीवर प्रभाव पडू शकतो. राज्यकर्त्यांची, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक उच्चभ्रूंची भाषा अर्थातच अधिक प्रभावशाली असते. बोलण्यात वजन किंवा ऐट यावी म्हणून उच्च समजल्या जाणाऱ्या भाषेतले शब्द वापरले जातात.

पण ही भाषिक सरमिसळ कधीकधी एखाद्या भाषिक समूहाला अनिष्ट वाटू लागते - 'परक्या' भाषेचा संसर्ग नकोसा वाटायला लागतो आणि त्यावर इलाज करण्याची निकड वाटू लागते. भाषा 'शुद्ध' राहावी किंवा करून घेतली जावी असा आग्रह माणसं धरू लागतात. का आणि कधी होतं असं? का वापरतात माणसं इतर भाषांतले शब्द? का अस्वस्थ होतात परभाषांच्या संसर्गाने? एखादी भाषा परकीय आहे हे कसं ठरतं? का ते स्वयंसिद्धच असतं? दुसऱ्या एखाद्या भाषेतील शब्द वापरणं कधी भूषण ठरतं आणि कधी दूषण ठरतं? भाषा शुद्ध असू शकते का? किती प्रमाणात दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणं चालतं? परभाषेतले शब्द आपलेसे कसे आणि कधी होतात? या लहान लेखात, वेगवेगळ्या भारतीय भाषांनी आधुनिक काळात कुठल्या 'पर'भाषांचा संसर्ग अवांछित मानला त्याची किंचित झलक दाखवून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

'पर'भाषांचा संसर्ग जसा काहींना अप्रिय वाटतो, तसाच आपल्याच भाषेतल्या प्रमाणभाषेतर शैली किंवा बोलींचा संसर्ग अनेकांना आवडत नाही. मराठीतलं मासलेवाईक उदाहरण द्यायचं झालं तर प्रमाण 'आणि'ऐवजी 'आनि' वापरले, तर ती भाषा अशुद्ध मानली जाते. पण भाषाशास्त्रीय दृष्ट्या भाषा शुद्ध-अशुद्ध नसते. सहसा होतं असं, की उच्चभ्रू वर्ग जी बोली बोलतो ती प्रमाणभाषा समजली जाते, त्याच बोलीची व्याकरणं, त्याच बोलीतले कोश रचले जातात; आणि तीच बोली शुद्ध, बाकी बोली अशुद्ध असा ग्रह होतो. असो; भाषांतर्गत संसर्ग/ दूषण/ अशुद्धी हा विषय या लेखापुरता बाजूला ठेवू.

एकोणिसावं शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळात भारतभरात भाषासंसर्ग आणि भाषाशुद्धी या विषयांवर बरंच मंथन झालं. सावरकरांनी सुरू केलेली मराठीभाषाशुद्धी चळवळ बहुतेकांना माहीत आहे. अशा चळवळी, वाद, चर्चा या काळात भारतात सगळीकडे घडत होत्या. पाश्चात्त्य विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, विचार यांची ओळख सामान्य जनतेला करून देण्यासाठी, आधुनिकतेचं लोण सामान्य जनांपर्यंत पोचवण्यासाठी विचारवंत व समाजधुरिणांना मराठी, ओडिया, गुजराती, कन्नड इ. स्थानिक भाषा वापरण्याची गरज वाटत होती. पण या भाषा त्यासाठी पुरेशा विकसित व सुसंस्कारित नाहीत असंही त्यांना वाटत होतं. भाषा विकसित, आधुनिक करण्यासाठी नवीन नवीन शब्द तर हवेत पण दुसऱ्या भाषांतून शब्दांचा भरणा करायचा म्हणजे भाषेचं स्वत्व हरवतं असा पेच त्यांच्यासमोर होता. या संदर्भात कुठल्या भाषा स्वकीय, कुठल्या परकीय, भाषा शुद्ध राखण्यासाठी कुठल्या भाषांचा संसर्ग टाळायचा, कुठल्या भाषांतले शब्द, वाक्प्रचार आपलेसे केले तरी भाषा दूषित होत नाही अशा चर्चा या काळात झडल्या.

अमुक भाषा म्हणजे अमुकच लिपी आणि तमुकच धर्म अशी समीकरणं प्रचलित होत होती तीही याच काळात. एकोणिसाव्या शतकापर्यंत त्या त्या प्रांतात प्रचलित स्थानिक लिपींत संस्कृत लिहिली जाई. उदा. बंगालात बंगाली लिपीत संस्कृत लिहिण्यात येई, दक्षिण भारतात तमिळ व संस्कृत दोन्ही भाषा ग्रंथलिपी नामक लिपीत लिहिल्या जात होत्या. मराठी ही मोडी तसंच बाळबोध (देवनागरी) दोन्ही लिपींत लिहिली जाई. इंग्रजी राजवटीत मात्र एकेका भाषेबरोबर एकेका लिपीची व धर्माची पक्की लग्नं लावून देण्यात आली. उदा. 'पंजाबी भाषा गुरुमुखी लिपीतच लिहिली जावी, ही भाषा व ही लिपी शीख धर्माशी निगडित आहेत' असे काही ग्रह या काळात रूढ झाले.

तर, भारतातील मराठीसह बर्‍याच भाषांना झालेला फारसीचा संसर्ग एकोणिसाव्या शतकापासून काहींना डाचू लागला. उदाहरणार्थ, १८३८ साली बंगालीत प्रसिद्ध झालेला 'पारशीक अभिधान' नावाचा कोश बघा. काय होतं या कोशात? संपादकाच्या शब्दांत सांगायचं झालं, तर जबन (यवन) म्हणजे मुसलमान अंमलाच्या काळात बंगालीत शिरलेल्या फारसी शब्दांना पर्यायवाचक अशा 'स्वदेशीय साधुभाषे'तील शब्दांची या कोशात यादी केलेली होती. फारसी शब्दांची बंगालीतून हकालपट्टी करणं सुकर व्हावं म्हणून हा कोश रचण्यात आला. एखाद-दोन पिढ्यांपूर्वी जी भाषा शिकून धुरिणत्व प्राप्त होत होतं, त्याच भाषेचा संसर्ग आता बंगाली समाजधुरिणांना नकोसा वाटत होता. इंग्रजपूर्व काळात जेव्हा फारसी भारतभर प्रशासनाची भाषा म्हणून वापरात होती तेव्हा 'आरशी आरशी आरशी, आमार स्वामी पोडुक फारशी' (आरश्या रे आरश्या, माझा पती फारसी शिको) असं एक स्त्रीगीत बंगालमध्ये प्रचलित होतं! सामाजिक-राजकीय संदर्भ बदलताच भाषासंसर्गाच्या व्याख्या ताबडतोब बदलल्या. आता स्वामीला अर्थ आणि उच्च स्थान संपादन करण्यासाठी फारसी शिकण्याची तितकीशी निकड राहिली नाही, तशी फारसी विटाळशी ठरली. मुसलमानांची भाषा ठरली.

हिंदी व उर्दू अशा दोन स्पष्टपणे वेगळ्या भाषा इंग्रजपूर्व काळात नव्हत्या. एकच प्रमाणित हिंदीही नव्हती. एवढंच काय, भारतीयांना दोन बोलींमध्ये कुसळाएवढा फरक असला तरी लगेच दिसतो; पण त्यांना (प्रांत-वर्ग इ.नुसार बदलणाऱ्या) बोली व (सर्व बोली जिच्या छत्राखाली नांदतात ती) भाषा अशा वेगळ्या संकल्पनाच कळत नाहीत असा उल्लेख इंग्रज काळातल्या सरकारी प्रकाशनांत सापडतो. एकाच माणसाने वाङ्मय लिहिताना एक बोली, घरात दुसरी, बाजारात आणखी एखादी वापरणं हे सार्वत्रिक होतं. त्यामुळे एखादा माणूस उर्दूभाषी आहे का हिंदीभाषी त्याची व्याख्या करणं अवघड होतं. टोकदार भाषिक अस्मिता उदयाला आल्या नव्हत्या. एकोणिसाव्या शतकात मात्र हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये सीमा आखण्यास व त्या ठळक करण्यास सुरुवात झाली. इंग्रज अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी भाषेची धर्माधारित फाळणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीच; त्याबरोबरच ज्या विचारवंतांना, नेत्यांना नव्याने उदयाला येणारं भारतराष्ट्र धर्माधारित असावं असं वाटत होतं, त्यांनीही या द्वंद्वात भाग घेतला. हिंदी म्हणजे नागरी लिपीत लिहिली जाणारी, संस्कृतप्रचुर, हिंदूंची भाषा आणि त्याविरुद्ध उर्दू म्हणजे अरबी लिपीत लिहिण्यात येणारी, फारसी-अरबी शब्दांचा भरणा असणारी, मुसलमानांची भाषा अशी समीकरणं रूढ झाली. परिणामी हिंदी व उर्दू ह्यांना एकमेकींचा, हिंदीला फारसीचा आणि उर्दूला संस्कृतचा संसर्ग नकोसा झाला. सोहन प्रसाद लिखित 'हिंदी और उर्दू की लड़ाई' या नाटकाने तत्कालीन हिंदीभाषिकांत खळबळ उडवली होती. या नाटकात हिंदी व उर्दू या दोन स्त्रिया झिंज्या ओढण्याची व दात पाडण्याची धमकी, शिव्या देताना दाखवल्या आहेत. या दोन भाषांना स्त्रीभूमिकांत कल्पून त्यांची भांडणं, कोर्टकज्जे यांवर हिंदी साहित्यिकांनी कितीतरी काव्यं, नाटकं, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत उर्दूला अनैतिक स्त्री, गरीब बिचारी, सहनशील हिंदीमातेची दुष्ट मुलगी, अस्वच्छ, खुनी, वेश्या अशा रूपांत रंगवण्यात आलं आहे.

हिंदीतून फारसी-अरबी शब्द नाहीसे व्हावेत व त्यांची जागा संस्कृत शब्दांनी घ्यावी यासाठी हिंदी साहित्यिकांनी प्रयत्न केले. याउलट, १९१८ साली हैदराबादला स्थापन झालेल्या ओस्मानिया विद्यापीठाने जेव्हा पाश्चात्त्य शास्त्रानुकूल, आधुनिक उर्दू भाषा विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला, तेव्हा संस्कृतऐवजी अरबी भाषेलाच प्राधान्य दिलं. या प्रकल्पात ३६० पुस्तकांचा अनुवाद झाला आणि ५५ हजारांहून अधिक शब्द टांकसाळले गेले. हे नवीन शब्द बहुतांशी अरबी भाषेतूनच घेतले गेले.

हिंदी, बंगाली, मराठी आणि इतर काही भाषिकांना फारसीच्या संसर्गाला पर्याय म्हणजे संस्कृत हे स्वाभाविक वाटत होतं. नवीन युग, तंत्रज्ञान, विज्ञान, संकल्पना व्यक्त करण्यासाठी जे नवनवे शब्द हवे होते त्यासाठी संस्कृतचा संसर्ग त्यांना हवा होता. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी असल्याचा समज होता. शिवाय संस्कृतशी संबंध जोडल्याने सोनेरी भूतकाळ, आर्य वारसा, हिंदू संस्कृती या सगळ्यांशी सलगी दाखवता येणं शक्य होतं. याउलट द्रविड कुळातल्या भाषा बोलणाऱ्या समूहांना संस्कृत तितकीशी जवळची वाटत नव्हती; या भाषांत संस्कृत शब्द वैपुल्याने असूनही आणि या भाषा बोलणाऱ्या समूहांत हिंदूंचं प्राबल्य असूनही! संस्कृत हे उत्तर भारतीय-आर्य-ब्राह्मणांच्या वर्चस्वाचं प्रतीक ठरल्याने तिचा संसर्ग त्यांना नकोसा वाटला.

इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळात तमिळ पाठ्यपुस्तकांत इंग्रजीतून बरेच शब्द उसने घेण्यात आले, पण पुढे राष्ट्रवाद आणि प्राच्यविद्या या दोन्हींच्या प्रभावामुळे संस्कृतचा भाव वधारला. मात्र वेलालर जातीच्या विद्वानांना हे रुचलं नाही. त्यांनी ब्राह्मणवर्चस्वाला आणि संस्कृतला आव्हान देऊन स्वतंत्र तमिळ भूतकाळाचा पक्ष उचलून धरला. जुने तमिळ ग्रंथ, जुने तमिळ धातू यांचा धांडोळा घेऊन नवीन शब्द तयार करण्यात आले. तमिळमधून संस्कृत शब्दांचे उच्चाटन करण्यासाठी 'तनित तमिळ इयक्कम' (स्वतंत्र तमिळ चळवळ) सुरू झाली. १९२०च्या सुमाराला ही चळवळ चांगली फोफावली.

तमिळप्रमाणेच मल्याळम् भाषिकांच्या दृष्टीने भाषाशुद्धीचा अर्थ होता संस्कृतप्रचुरतेपासून भाषेची सुटका करणे. मल्याळम् भाषेचं मूळ तमिळ की संस्कृत यावरून बरेच वाद होते, पण आधुनिक मल्याळम् भाषेच्या विकासासाठी द्रविड भाषांचा संसर्ग इष्ट, संस्कृतचा नव्हे, यावर तत्कालीन मल्याळी विचारवंतांचं एकमत होतं.

सोळाव्या शतकात तत्सम (संस्कृत व प्राकृत) शब्दांचा वापर टाळून रचलेल्या काव्याला 'अच्छ तेनुगु' (शुद्ध तेलगू) काव्य म्हणत. या काव्यात फारसी वगैरे शब्दांचा वापर करायला मात्र प्रत्यवाय नव्हता. एकोणिसाव्या शतकात अच्छ शब्दाचा अर्थ काहीसा बदलला. या काळातल्या तेलगू व्याकरणांत शब्दांची तत्सम, तद्भव, देश्य, ग्राम्य अशा चार वर्गांत वाटणी केलेली दिसते. देश्य वर्गाचे आणखी पोटविभाग पाडलेले दिसतात- 'अन्यदेश्यम' (द्रविड, पण तेलगू नाही) आणि'अच्छदेश्यम' (शुद्ध तेलगू). १८५७ साली प्रसिद्ध झालेल्या सी.पी.ब्राऊनच्या कोशात अच्छ तेनुगुचा अर्थ संस्कृतमुक्त तेलगू असा दिला आहे, तर त्याच कोशाच्या १९०३ सालच्या आवृत्तीत परभाषामुक्त तेलगू असा अच्छचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे, अस्सल तेलगूची व्याख्या करताना संस्कृतबरोबर द्रविड कुळातल्या इतर भाषांनाही परकीय मानण्यात आलं.

आसामी भाषिकांनी 'आहोम' भाषेशी आसामी भाषेचा संसर्ग झालाच नव्हता असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आहोम लोक तेराव्या शतकात म्यानमारमधून आसामात आले. तेव्हापासून अठराव्या शतकापर्यंत आहोम घराण्याने आसामावर राज्य केलं. इंग्रजांनी त्यांचा पाडाव केल्यानंतर सयामीशी नातं असलेली त्यांची आहोम भाषा जवळजवळ नामशेष झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा उच्चवर्णीय हिंदू आसामी अभिजन भारतीय हिंदू संस्कृतीशी जवळीक साधू बघत होतें, तेव्हा आहोम जमातीपासून आणि त्यांच्या इतिहासापासून आपण कसे वेगळे आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.आहोम जमात अहिंदू, अनार्य असल्यामुळे त्यांना अशुद्ध म्हणून नावं ठेवली आणि त्यांची भाषा मागास मानली गेली.

पण असामी अभिजनांना आहोमपेक्षाही अनिष्ट संसर्ग वाटत होता तो बंगालीचा. १८७०पर्यंत इंग्रजांनी आसामीकडे बंगालीची एक बोली किंवा बंगालीचा अपभ्रंश अशा नजरेनं पाहिलं. १८७२ साली मात्र आसामी एक स्वतंत्र भाषा आहे असं सरकारी पातळीवर मान्य करण्यात आलं आणि आसाम प्रांताची अधिकृत भाषा असा दर्जाही तिला देण्यात आला. यामुळे जणू बंगाली व आसामी भाषा वेगळ्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारवर आली. परिणामी सरकारी आदेश निघाला, की स्थानिक लोकांच्या भाषेत प्रचलित असलेले पण बंगाली मूळ असल्याचा संशय असलेले शब्द आसामीतून हटवण्यात यावेत. यामुळे 'शुद्ध आसामी' म्हणजे बंगाली प्रभावापासून मुक्त आसामी भाषा असा अर्थ रूढ झाला. बंगाली सुशिक्षित वर्गाचं आसाम प्रांतांत असलेलं सांस्कृतिक वर्चस्व आणि पुढे १९४० च्या दशकात पूर्व बंगालमधून आलेले हिंदू निर्वासितांचे लोंढे यांमुळे हा बंगालीविरोधी सूर आणखी बळकट झाला.

एकोणिसाव्या शतकातील मराठीच्या संदर्भात पाहायचं झालं, तर काही विचारवंतांच्या मते विलायती शिक्क्याच्या शब्दांचा वापर केल्याने, तर काहींच्या मते फारसी शब्दांमुळे मराठी दूषित होत होती. महाराष्ट्रधर्माचा पुरस्कार करणाऱ्या काही विद्वानांनी संस्कृतप्रचुरतेवर टीका केली, तर क्वचित काहींनी द्रविड भाषांचा संसर्ग मराठीला नको अशी भूमिका घेतली. पुरुषांना परभाषासंसर्ग ठीक, पण स्त्रियांना नको (म्हणजे स्त्रियांनी इंग्रजी शिकण्याची गरज नाही) अशी मतंही मांडण्यात आली. अमुक भाषेचा संसर्ग इष्ट का नाही या भूमिकेला जातीधर्माचे आयामही होते.

एकूणात पाहिलं, तर एखाद्या भाषिक समूहाला स्वत:ची सोडून कुठली भाषा आपलीशी करावीशी वाटते आणि कुठली परकीय वाटते, कुठल्या भाषेचा संसर्ग हवासा वाटतो आणि कुठल्या भाषेचा नकोसा, या प्रश्नांची उत्तरं बहुतांशी राजकीय आहेत. इथे राजकीय या शब्दात सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक सत्ताही अभिप्रेत आहे. अर्थात, धर्म, वंश, जात, राष्ट्रवाद, फाळणी, सत्ताधारी कोण, प्रशासनाची भाषा कुठली, व्यापार कुठल्या भाषेतून चालतो, कोण बहुसंख्य, कोण काय खातं, कोण काय वस्त्रं घालतं अशा बऱ्याच भाषाबाह्य कारणांनी भाषादूषण व भाषाशुद्धीच्या व्याख्या घडवल्या जातात. राजकीय, आर्थिक, सामाजिक संदर्भ बदलले, की या व्याख्याही बदलतात. एके काळी दूषण, अनिष्ट संसर्ग ठरलेले इतर भाषांतले शब्द, वाक्प्रचार, ध्वनी काही वेळा असे काही आत्मसात केले जातात, की ते दुसऱ्या एखाद्या भाषेच्या संसर्गामुळे झालेले बदल आहेत हे लक्षातही येत नाही, राहत नाही. काही संसर्ग मिरवले जातात, कधी जुने संसर्ग लपवले जातात, कधी उकरून काढून गंगा उलटी वळवण्याचा प्रयत्न केला जातो. कधी तिसऱ्याच भाषेला शह देण्यासाठी दुसऱ्या भाषेशी लगट केली जाते.

असे संसर्ग पचवून, हाकलून, टाळून, कवटाळून भाषा मार्गक्रमण करत राहते. माणसं बोलत राहतात, लिहीत राहतात, गाणी म्हणत राहतात, विचार 'सभेपुढे ठेवित' राहतात. भाषेत बदल होत राहतात, पण भाषा निरंतर वाहत राहते.

निवडक संदर्भसूची:

१. A. R. Venkatachalapathy, “Coining Words: Language and Politics in Late Colonial Tamilnadu”, Comparative Studies of South Asia, Africa and the Middle East, 15 (2). 1995, pp. 120–129.
२. Asha Sarangi, “Languages as Women: The Feminisation of Linguistic Discourses in Colonial North India”, Gender & History, 21 (2), 2009, pp. 287- 304.
३. G. Arunima, “Imagining communities-differently: Print, language and the (public sphere) in colonial Kerala”, Indian Economic and Social History Review, 43 (1), 2006, pp. 63 - 76.
४. Kavita Datla, “A Worldly Vernacular: Urdu at Osmania University”, Modern Asian Studies, 43 (5), 2009, pp. 1117 - 1148.
५. Lisa Mitchell, Language, Emotion, and Politics in South India: The Making of a Mother Tongue, Bloomington: Indiana University Press, 2009.
६. Madhumita Sengupta, “War on Words: Language and Policies in Nineteenth-century Assam”, Indian Historical Review, 39 (2), 2012, pp. 293 - 315.
७. Poromesh Acharya, “Development of Modern Language Text-Books and the Social Context in 19th Century Bengal”, Economic and Political Weekly, 21 (17), 1986, pp. 745 - 751.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

चांगला लेख.

काही वर्षांपूर्वी, जेव्हा व्यक्ती हा शब्द सदर व्यक्तीच्या लिंगाप्रमाणे बदलून वापरला जात असल्याचे जाणवले, तेव्हा हा भाषेचा अध:पात आहे, असे वाटत असे.

गेल्या एक-दोन वर्षांपासून मात्र, असे वाटेनासे झाले आहे.

भाषा ज्या वेगाने बदलतात त्या वेगाने प्रचलीत व्याकरणाचे नियम बदलत नाहीत. आणि मग प्रिस्क्रीप्टीव विरुद्ध डिस्क्रीप्टीव असा खेळ रंगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख खूप आवडला. निष्कर्ष उद्बोधक वाटला.

धर्म, वंश, जात, राष्ट्रवाद, फाळणी, सत्ताधारी कोण, प्रशासनाची भाषा कुठली, व्यापार कुठल्या भाषेतून चालतो, कोण बहुसंख्य, कोण काय खातं, कोण काय वस्त्रं घालतं अशा बऱ्याच भाषाबाह्य कारणांनी भाषादूषण व भाषाशुद्धीच्या व्याख्या घडवल्या जातात. राजकीय, आर्थिक, सामाजिक संदर्भ बदलले, की या व्याख्याही बदलतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.
शिवाजीराजांनी "राजव्यवहारकोश" तयार केला होता तो कोणत्या प्रेरणेतून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'यवनचवचनांनी' लोपून गेलेल्या राज्यव्यवहारपद्धतीचा 'विबुध' (संस्कृत) भाषेतून प्रसार व्हावा म्हणून शिवाजीराजांनी राजव्यवहारकोश करवून घेतला, असा उल्लेख कोशाच्या अखेरच्या श्लोकांत आहे. पुढे म्हटलं आहे, विद्वानांची मान्यता लाभल्यावर, मूर्खांनी चेष्टा केली म्हणून काही बिघडत नाही, उंटाला गोड केळ्याची चव काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'संसर्ग' या विषयाची व्याप्ती लक्षात किती प्रकारे येउ शकेल, त्याची चुणूक दाखविणारा, अभ्यासपूर्ण लेख आहे. भाषा आणि निरंतर वाहणारी नदी यांची सांगड चपखल वाटली.
'वीकांत' हा शब्द अजुनही अंगावरती काटा आणतो. अरे वीकांत काय वीकांत? वीकेन्ड म्हणा नाहीतर सप्ताहांत.
पण गंमत म्हणजे, तशाच, 'नापास' शब्दाचे काही वाटत नाही. कारण अंगवळणी पडून गेलेला आहे.
______________________

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि कसं आणि कोण करणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रमाणभाषा व्यवहारासाठी आवश्यक असते, पण ती शुद्ध, तीच योग्य असे नव्हे. शुद्धीकरण करतात कधी सामान्य माणसं, कधी सरकार, कधी नेते किंवा प्रतिष्ठित लोक, पण शुद्धी या शब्दातच (संकल्पनेतच) गडबड आहे, राजकारण आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषेचा संसर्ग असू शकतो हे आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

> 'मी विचार सभेपुढे ठेवितो'

(धाकट्या) चिपळूणकरांना कदाचित 'विचार मांडणे’ हा शब्दप्रयोग जास्त बरा वाटत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तूर्तास ही केवळ पोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषासंसर्ग नकोसा कधी होतो हे बघितलं पाहिजे बुवा असा विचार डोक्यात येऊन गेला तर होता, पण मी त्याचा शोध घेतला नव्हता. तयार लेखाबद्दल धन्यवाद! Smile
भारतभरातल्या विविध भाषांच्या सोवळ्याओवळ्याचा छान वेध घेतला आहे!

आता माझा पुढचा प्रश्न: सत्तेच्या उतरंडीत सर्वांत खाली असलेल्या असलेल्या भाषांच्या भाषकांना अशा भाषामेलनाबद्दल काय वाटत असेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मला वाटतं याचं उत्तर लेखात आलेलं आहे. सत्तेच्या उतरंडीत सर्वांत खाली असलेल्या भाषांच्या भाषकांना अनेकदा इष्ट वाटत असतं भाषामेलन. अमुकच्या शब्दात, इंग्रजी शब्द वापरल्याने जंटलमन वाटण्याची भावना वाढते, चारचौघात पत वधारल्यासारखं वाटतं. (लेखाचं संपादन करून कच्च्या खर्ड्याला लेखाचं रूप दिल्याबद्दल अमुकरावांचे अनेकवार आभार.) अस्मिता बिस्मिता निर्माण झाली तर मात्र मिठी मगरमिठी वाटायला लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषिक अस्मितावाद vs उपयुक्ततावाद याचे विवेचन लेखात चांगल्या रीतीने आले आहे. पण भाषेचे सौंदर्यशास्त्र हाही महत्त्वाचा मुद्दा नव्हे काय? उदारमतवादी आणि अभिनिवेशमुक्त लोकांनासुद्धा त्यांच्या भाषेत 'बाहेरून' येऊ पाहणारे काही शब्दप्रयोग चांगलेच खटकतात. पुन्हा अर्थवाहीपणाचा मुद्दा उरतोच. भाषा हे नुसतेच संपर्काचे नव्हे, तर संवादाचे साधन आहे. त्यासाठी 'पर'भाषेतील काही शब्दप्रयोग हे मराठीत आलेच पाहिजेत - उदा. इंग्रजीतील पारिभाषिक शब्द. तिथे मराठीतील प्रतिशब्द ठोकून बसवायचा अट्टाहास केला तर भाषेचे "राजीव साने"करण होते! आणि मग मराठी ही मातृभाषा असलेले लोकही दुरावतात. परभाषेतील शब्दांचे डोळस स्वागत हवे. सोवळेपणही नको आणि सबगोलंकारही नको!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मराठीबाबत हा विषय हमखास मित्रमंडळींत चर्चेत येतो.
एरवी तसाच केर घरोघरी जमत असावा, असे मोघम वाटतही होते.
अन्य भारतीय भाषांमधील या प्रक्रियेचा धांडोळा वाचून सुसंदर्भ माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0