महाभारतात कोरोना

हस्तिनापुरात गेल्या काही दिवसांपासून कमालीची शांतता जाणवत आहे. धृतराष्ट्राने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्यापासून एकंदर आर्यावर्तातल्या प्रत्येक समाजघटकावर याचा विलक्षण परिणाम दिसून येत होता.

आपल्या महालात भीष्म उद्वेगाने येरझाऱ्या घालतोय. साहजिक आहे. कित्येक वर्षानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे हे आपल्यासमोर लहानाचे मोठे झालेल्या परंतु आता पदोपदी आपला उपमर्द करणाऱ्या पोरासोरांना दाखवण्याची नामी संधी त्याच्याकडे चालून आली होती. सरसेनापती म्हणून निवडही झालेली. परंतु कोरोनाने घात केला. शस्त्र चालवण्यासाठी फुरफुरणारे हात सॅनिटायझर लावून चोळत बसण्याशिवाय भीष्माकडे काही पर्यायही नव्हता. वैतागून "Bloody Corona has stolen my thunder" असा मॅसेज त्याने विदुराला पाठवला व विदुराच्या "hmmm" या रिप्लायानंतर कुठेतरी शून्यात नजर लावून बसला.

द्रोणाचार्यांचा प्रॉब्लेम नेहमीसारखाच आर्थिक होता. युद्धापूर्वी तयारीच्या काळात त्याने IDL (इंटर-स्टेट धनुर्विद्या लीग)चा घाट घातलेला. आयुष्यभराची पुंजी त्याने यासाठी पणाला लावली होती. महायुद्धापूर्वी धनुर्धरांची कसून तयारी होईल या हेतूने प्रेरित होऊन आपण हे करतोय असे तो सगळ्यांना भासवत असला तरी खरे कारण युद्धात आपले काही बरेवाईट झाले तर अश्वत्थाम्याच्या भविष्याला अश्व लागू नयेत, तसेच यातून होणाऱ्या कमाईने त्याचे उर्वरित आयुष्य सुकर व्हावे हेच होते. लॉकडाऊनमुळे स्पर्धा रद्द झाली. अश्वत्थामा पीठ मिसळलेले दूध पितोय अशी स्वप्नं त्याला पडू लागली. शेवटी धृतराष्ट्राने 'मी अश्वत्थाम्याला काही कमी पडू देणार नाही' असे आश्वासन दिल्यावर कुठे द्रोणाचा जीव भांड्यात पडला.

धृतराष्ट्राच्या आयुष्यात फारसा फरक पडला नव्हता. उलट आपल्याप्रमाणे इतर सगळ्यांनाही घरातच बसावं लागतंय यामुळे त्याला आसुरी आनंदच होत होता. गांधारीची मात्र प्रचंड चिडचिड होत होती. ती सगळा राग धृतराष्ट्रावर काढत असे. "आधी आईबापांच्या हट्टासाठी आपल्या इच्छा-आकांक्षावर पट्ट्या बांधा.. मग नवरा आंधळा म्हणून डोळे बांधून जगापासून तोडून घ्या..आणि आता हा विषाणू म्हणतोय नाक-तोंडही मास्कने झाकून घ्या..इनफ इज इनफ.. शंभर पोरं जन्माला घातली पण एकालाही पहिलं नाही अजून.. त्यांचे कारनामे ऐकून मेली पाहायच्या लायकीची नाहीत असंच वाटतं म्हणा..!! तुम्ही त्यांच्या दुर्गुणांकडे आयुष्यभर डोळेझाक केलीत म्हणूनच शेफारलीत इतकी... "

स्वतःच केलेल्या प्रॅक्टिकल जोकवर तिला स्वतःलाच खुद्कन हसू आले. धृतराष्ट्र मात्र नेहमीसारखाच. ढिम्म.

इकडे इंद्रप्रस्थात पांडव वेगळ्याच चिंतेत होते. तसे अर्जुन स्वतःच्या धनुर्विद्या प्रवीणतेचे तसेच बृहन्नडा अवतारात शिकलेल्या नृत्यकलेचे आणि भीम फिटनेस रिलेटेड व्हिडीओज सोशल मीडियावर टाकून व नकुल-सहदेव नेटफ्लिक्सवर बिंजवाचिंग करून आपला वेळ घालवत होते. परंतु या सर्वांना युधिष्ठिर लपून शकुनीसोबत ऑनलाईन लुडो खेळतोय याची कुणकुण लागलेली. मोठा भाऊ असल्याने काही म्हणण्यास मर्यादा येत असल्या तरी मनोमन चारही भाऊ 'आता हा अजून कोणता दिवस दाखवणार' या भावनेने भेदरली होती. द्रौपदी घाबरून एका वेळी चार-चार पातळ नेसू लागली. तर कुंतीने वेळ पडली तर धावपळ नको म्हणून अज्ञातवासाची ऑलरेडी पॅकिंग करून ठेवली.

घरात सगळेच असल्यामुळे द्रौपदीवर कामाचा प्रचंड बोजा होता. त्यामुळे कुंती मुलांकडे पाहायची. फार त्रास द्यायला लागले की ती त्यांना धृष्टद्युम्न, युयुत्सु, घटोत्कच इत्यादी शब्दांचे स्पेलिंग्स पाठ करायला लावायची.

भानुमती, दुःशला, वृषाली, द्रौपदी यांचा 'True rulers' नावाचा व्हाट्सअप ग्रुप होता. तिथे त्या आपापले फ्रस्ट्रेशन काढायच्या. पार्लर बंद असणे हा कळीचा मुद्दा होता. न राहवून द्रौपदी एकदा म्हणालीच, "तुमचं तरी बरं आहे.. एकालाच तोंड द्यायचंय.. मला तर पाच पाच जणांकडून टोमणे ऐकावे लागतात. हद्द म्हणजे नकुलचा हात आताशा माझ्याहून नाजूक दिसतोय. I'm so doomed..." तरी कुंती ॲडमिन असल्यामुळे तिला अधिक खोलात जाता आलं नाही.

कर्णालाही वेळ कसा घालवावं कळत नव्हतं. अंगदेशचा हा राजा अंगावर बसणाऱ्या डासांमध्ये विरंगुळा शोधत होता. डास बिचारे किती वेळ प्रयत्न करूनही यांच्या शरीरावरचे कवच भेदता न आल्याने थकून हताश व्हायचे. कित्येकांनी एक्सिस्टेन्शिअल क्रायसिसमुळे कर्णाच्या शरीरावरच आत्महत्या केल्या. पण याचाही कर्णाला कंटाळा येऊ लागला. वृषाली वेगवेगळ्या रेसिपीज तयार करून त्याचं मन रिझवण्याचा प्रयत्न करी पण ते पुरेसं नव्हतं. द्रौपदीने केलेला अपमान, भीष्माने सर्वांदेखत केलेला उपमर्द, परशुरामाने ऐन वेळी ब्रम्हास्त्र ऍक्टिव्हेट करण्याचा पासवर्ड विसरशील असा दिलेला शाप, आयुष्यभर झालेली अवहेलना असं काहीबाही उफाळून येत राहायचं त्याच्या मनात. अगदीच अनावर झालं की कर्ण प्यायला बसायचा आणि दोन पेगनंतर दुर्योधनाला व्हिडीओ कॉल करून त्याच्यासोबत आधी कोरोनाचे आणि नंतर अर्थातच पांडवांचे माता-भगिनी एकीकरण करायचा.

बाकीही खुर्द-बुद्रुक लोकांनी विरंगुळ्याचे आपापले मार्ग शोधले होते. शल्य, शिशुपाल, शकुनी वगैरे शातीर मंडळींनी एक मीम ग्रुप सुरू केलेला. मुख्य हेतू पांडवांचा मानभंग करणे. शल्य मात्र इमानेइतबारे केवळ कर्णावरच मीम टाकायचा.

व्यास रायटर्स ब्लॉकमुळे व्यथित होता. युद्धात भरपूर कंटेन्ट मिळेल आणि लेखणी प्रसवायला लागेल ही शक्यताही लॉकडाऊनमुळे धूसर झालेली. परंतु थोर माणसं संकटाचं रूपांतर संधीत करतातच. तद्वतच, काळाची पावलं ओळखून शेवटी व्यासाने कोरोना हाच विषय घेऊन व्हाट्सअपवर कॉन्स्पिरसी थेरीज लिहायला सुरुवात केली.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

बाकीही खुर्द-बुद्रुक लोकांनी विरंगुळ्याचे आपापले मार्ग शोधले होते. शल्य, शिशुपाल, शकुनी वगैरे शातीर मंडळींनी एक मीम ग्रुप सुरू केलेला. मुख्य हेतू पांडवांचा मानभंग करणे. शल्य मात्र इमानेइतबारे केवळ कर्णावरच मीम टाकायचा.

हे आणि डासांचा एक्सिस्टेन्शिअल क्रायसिस महान आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जबरदस्त लिहिलेले आहे.
लगे रहो प्रविनभाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वाक्यं महान आहेत. खूप आवडल्यामुळे, तुमच्या नांवासकट अनेक आप्तांना पाठवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार रिस्क घेता बुआ यावयातही तुम्ही

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रोणाचा जीव भांड्यात आणि धृतराष्ट्राची डोळेझाक Blum 3 जबरी जमलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0