जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..2

ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज(1859)
- चार्लस् डार्विन (1809-1882)
photo 3

ईश्वरानेच जगाची निर्मिती केली या विधानावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या अजूनही कमी झालेली नाही, उलट ती अजून वाढतच आहे. प्रत्येक धर्मग्रंथात कुठल्याना कुठल्या स्वरूपात हे विधान किंवा या विधानाला पुष्टी देणारे काहीतरी असतेच. त्यामुळे या विधानाविरुध्द तोंड उघडणाऱ्याला जगातील घातक माणूस म्हणून हिणवले जाते. असेच हिणवून घेतलेल्यापैकी चार्लस् डार्विन याचा प्रथम क्रमांक लागेल. धर्मनिष्ठांच्या मते ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक लिहून डार्विनने फार मोठा अपराध केला आहे. या पुस्तकाने तिच्यातील मूलभूत मांडणीतून कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला जबरदस्त धक्का दिला. या पुस्तकात बॅक्टिरिया, जीवाणू, क्रिमी-कीटकांपासून सस्तनी प्राणी, माकड, चिंपांझी व मानव जात यांची उत्पत्ती कशी झाली असेल याचा संपूर्ण आढावाच घेतल्यामुळे बायबलसारख्या धर्मग्रंथांचे पितळ उघडे पडले, त्यातील जगाच्या उत्पत्तीच्या संदर्भातील सर्व विधानं खोठी ठरली.

चार्लस् डार्विनचे वडील रॉबर्ट डार्विन एक यशस्वी डॉक्टर व आजोबा, इरॅस्मस डार्विन विज्ञान विषयात रुची घेणारे श्रीमंत गृहस्थ होते. त्या काळातील ब्रिटिश समाजातील खुशालचेंडू तरुणाप्रमाणे चार्लस् डार्विनही मौज-मजा, खाणे-पिणे यात वेळ घालवणारा व यांचा कंटाळा आल्यानंतर अभ्यासाकडे वळणारा तरुण होता. वैद्यकीय शिक्षणाचा कंटाळा आला म्हणून वयाच्या बाविसाव्या वर्षी धार्मिक शिक्षणाची पदवी त्यानी घेतली. तो धर्मगुरू व्हावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. दुसरे काही करण्यास रुची नव्हती म्हणून 1831मध्ये बिनपगारी निसर्ग निरीक्षक म्हणून बीगल् या जहाजातून जगाच्या सफरीवर तो निघाला. चर्चची जवाबदारी टाळण्यासाठी काहीतरी निमित्त शोधतो म्हणून वडिलांना त्याचा राग आला. परंतु चार्लसच्या काकानी त्याला मदत केली. पाच वर्षाचा हा समुद्रप्रवास अजिबात सुखकर नव्हता. प्रवासात वरचेवर तो आजारी पडत असे. परंतु बोट किनाऱ्यावर आल्यानंतर त्याचे आजारपण पळून जात होते. समुद्रकाठावरील नमूने गोळा करण्याचा छंद त्याला जडला. फुलं, शिंपले, बीटल्स, सरडे, इत्यादींच्या अनेक नमून्यांनी त्याची पिशवी भरू लागली. जहाज गालापागोस या बेटाजवळ नांगर टाकल्यानंतर त्याला आपल्या छंदासाठी भरपूर वेळ मिळाला. एकवीस लहान-मोठया बेटांचा समूह असलेल्या गालापागोस येथे 607 प्रकारचे वनस्पती, 484 प्रकारचे समुद्रमासे, 29 प्रकारचे भूपक्षी, 19 प्रकारचे समुद्रपक्षी, अशी वैविध्यपूर्ण निसर्ग संपत्ती होती. डार्विन या सर्व नमून्यांची तपशीलवार नोंदी ठेऊ लागला. इंग्लंडला परतल्यांतर सफरीच्या काळातील निरीक्षणाचा अहवाल तयार करून 1839मध्ये जर्नल ऑफ रिसर्चेस या संशोधन पत्रिकेला पाठवून दिला. गोळा केलेल्या माहितीचा अन्वयार्थ लावण्यात त्यानी पुढची बरीच वर्ष घालवली. त्यातून निघत असलेल्या निष्कर्षाबद्दल तो स्वत:च आश्चर्यचकित झाला. नमुन्यासंबंधींच्या सर्व नोंदी, निरीक्षण, व निष्कर्ष याबद्दल तो लिहू लागला. व ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक हळू हळू आकार घेऊ लागले. पुस्तक प्रसिध्द होण्यास 20 वर्ष लागली. 155000 शब्दांचा हा शोधनिबंध जग बदलून टाकणारा ठरला. 1859 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 1250 प्रती हातोहात संपल्या.

नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने सजीवांची उत्क्रांती होत गेली हे या पुस्तकातील मुख्य प्रतिपादन होते. यासाठी डार्विनने तीन निरीक्षणांचा आधार घेतला. सजीव प्राणी स्वत:चे वंश टिकवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पिलांना जन्म देतात परंतु त्यातील फारच कमी सजीव जिवंत राहून वंशसातत्याला हातभार लावू शकतात. कॉड माशांच्या लाखो अंडयामधून बाहेर पडलेले सर्व मासे शेवटपर्यंत जिवंत राहिल्यास जगातील सर्व महासागरावर व भूमीवर हेच मासे दिसले असते. परंतु निसर्ग तसे होऊ देत नाही. दुसऱ्या निरीक्षणाप्रमाणे सर्व सजीव आरश्यातील प्रतिबिंबासारखे एकसारखे नसतात. मनुष्यप्राणीचेच उदाहरण घेतल्यास प्रत्येकाच्या बोटाचे ठसेसुध्दा अत्यंत वेगळे आहेत हे लक्षात येईल. ही विविधता आनुवंशिकतेतून आलेली असली तरी प्राणी स्वत:चे क्लोन तयार करत नाहीत. अजून एका निरीक्षणाप्रमाणे गुणसूत्रांच्याद्वारे आपापल्या जातीची विशिष्टता व गुणविशेष वारसाकडे जात असल्या तरी गुणसूत्रांचा कुठेना कुठे तरी उत्परिवर्तन (म्युटेशन) किंवा गुणसूत्रांचा संयोग होऊन नवनवीन रचना होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातून अगदीच वेगळा व अगोदरच्या रचनेचा मागमूसही नसणारा सजीव निर्माण होतो. या तिन्ही निरीक्षणांची गोळाबेरीज करून प्राणी जगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते; नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यानाच वंशसातत्य टिकवता येत; अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव, या निष्कर्षाप्रत डार्विन पोचला.

पुस्तक प्रसिध्द झाल्या झाल्या इंग्लंडमध्ये भूकंपसदृश्य स्थिती झाली. त्याकाळापर्यंत मनुष्यप्राणी हा एकमेव विशिष्ट प्राणी असून त्याच्यामागे दैवी शक्ती आहे असा भ्रम होता. ज्याप्रकारे न्यूटनच्या सिध्दांतामुळे विश्वातील ग्रह-तारे इत्यादी निर्जीव वस्तुसंबंधीच्या कल्पनांना धक्का बसला त्याचप्रकारे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिध्दांतामुळे मानवीजीवनाविषयीच्या अफाट कल्पनांना धक्का बसला. उत्क्रांतीचा हा सिध्दांत केवळ जीवशास्त्रापुरतेच मर्यादित नसून धार्मिक मूल्ये, मानवी मूल्ये, नैतिक मूल्ये, संस्कृती, इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, धर्मविचार इत्यादी अनेक विषयावर दूरगामी परिणाम करणारा ठरला. या पुस्तकामुळे आत्म्याचे अमरत्व आणि माणसाचे ईश्वरसदृश स्वरूप या रम्य कल्पना बाद ठरल्या. परमात्मा, आत्मा, ईश्वर, ईश्वरीन्याय, दैवीप्रकोप, पुनर्जन्म, पाप-पुण्य इत्यादी संकल्पना निरर्थक वाटू लागल्या. आध्यात्मिक कल्पना नामशेष होऊ लागल्या. ऐहिक वास्तव हेच अंतिम सत्य याची जाण डार्विनने करून दिली. अशा पाखंडी विचारांने जो धक्का दिला त्यामुळे दैववादाचे चिरे ढासळू लागले.

माणसाचे वेगळेपण त्याच्या मेंदूमुळे आहे याची कल्पना त्याकाळी होती. मानवी मेंदू ही निसर्गलीला नसून दैवी चमत्कार आहे, असे कित्येक भल्या भल्याना वाटत होते. ईश्वराने माणसाची निर्मिती केली नाही, हे निश्चित झाल्यावर मानवी मेंदू हाही नैसर्गिकरीत्याच निर्माण झाला आहे, असे म्हणावे लागेल. मानवी भावना व मेंदू यांचा जवळचा संबंध आहे हेही मान्य झाल्यामुळे मनोविकार व मेंदू यांचा परस्पर संबंध आहे हे मान्य करावे लागले. यातून मानसशास्त्रीय विश्लेषण आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास यांना दिशा मिळाली.

डार्विनवादाच्या अभ्यासाने अनेक नवीन शास्त्रशाखांना जन्म दिला. आनुवंशिक शास्त्र, जनुकशास्त्र हृा उत्क्रांतीवादाचेच अपत्य आहेत. जनुकांची नेमकी रचना कशी आहे याचा शोध क्रीक व वॅट्सन यांनी घेतला. माणसाच्या शरीरातील एकूण एक जनुकांची रचना कशी आहे याचा शोध घेणारा मानवी जनुक महाप्रकल्पाची प्रेरणा उत्क्रांतीवादातच सापडेल. माणसा-माणसामधील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे कार्ल मार्क्स, विल्बरफोर्स इत्यादींना याच पुस्तकामधून प्रेरणा मिळाली. गुणसूत्रांच्या अभ्यासातून प्रजोत्पादन शास्त्रात भर पडू लागली. निसर्गाची मूलभूत नियामकता स्पष्ट करणाऱ्या जेम्स लव्हलॉकचा गिया सिध्दांताचे मूळ डार्विनवादातच सापडेल.

डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिध्दांताला त्याच्या हयातीतच भरपूर विरोध झाला. माकडाचा सिध्दांत (मंकीज थेअरी) म्हणून त्याची खिल्ली उडवली. अनेक तज्ञांना हा सिध्दांत म्हणजे समाजातील विषमतेला खत-पाणी घालणारे वाटले. 'बळी तो कान पिळी'ला तात्त्वि मुलामा चढवला जात आहे असा आरोप केला. हिट्लरच्या काळात डार्विनवादाचे विकृतीकरण करून सुप्रजननशास्त्राचे (युजेनिक्स) प्रयोग करण्यात आले. वंशश्रेष्ठत्त्व व वर्णविद्वेषांच्या समर्थनासाठी डर्विनवादाचा दुरुपयोग करण्यात आला. शाळेमध्ये उत्क्रांतीवाद शिकवू नये, यासाठी अमेरिकेमध्ये जनमत तयार होऊ पाहत आहे. परंतु गेली 150 वर्षे या सिध्दांताच्या पुष्ट्यर्थ भरपूर पुरावे सापडले आहेत. जीवाष्मांच्या अभ्यासातून, जनुकशास्त्राच्या प्रयोगातून डार्विनचा उत्क्रांतीवाद ताऊन सुलाखून निघाला आहे.
क्रमशः

....1 प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर परिचय!!! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे लेखन वेगळ्या पद्धतीने विचार करायला उद्युक्त करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते एक निरीक्षण आहे.
बाकी उत्पत्ती कशी झाली हे डार्विन सांगत नाहीत.
सजीव उत्क्रांत कसे झाले हे ते निरिक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार सांगत आहेत.
त्यांच्या नजरेतून अनेक गोष्टी सुटल्या आहेत.
ते गृहितक आहे सिद्धांत नाही.
डार्विन ची theory (गृहितक) असाच उल्लेख सर्व ठिकाणी असतो इथे डार्विन चा सिद्धांत हा उल्लेख का गेला आहे ते समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0