कोरोनाची बारी

आज्जीची किस्से सांगण्याची तऱ्हा भन्नाट आहे. एखादी गोष्ट लहानात लहान तपशिलासह सांगण्यात तिचा मोठाच हातखंडा.. म्हणजे रझाकाराच्या बारीतली दहशत सांगताना 'कासीम भाड्याचं नाव ऐकताच गावचा पाटील कसा बायकोच्या पदराआड लपून बसला, अन दारावर येसकराची थाप पडताच त्याने कसे डोळे पांढरे अन धोतर ओले केले' हे विलक्षण मुद्राभिनयाने ती आमच्यासमोर जिवंत करत असे. चाळीस वर्षांपूर्वीच्या किश्श्यातही आजोबांनी रागावून उंचावलेली डावी भुवई, सासूने नापसंतीने मुरडलेलं नाक, चुलीवर उतू जाण्याच्या बेतात असलेलं दूध, जावेची तपकीर ओढण्याची तऱ्हा असे तिच्या लेखी महत्वाचे संदर्भ मुबलकपणे येत असत. तिच्या तोंडून गतकाळातल्या गोष्टी ऐकणं ही खरंच पर्वणी असते. महत्वाचं म्हणजे तिने काल्पनिक अथवा पुराणातल्या कथा कधी फारशा सांगितल्या नाहीत. मुळात तिच्या भरताड आयुष्यातच इतकं काही सांगण्यासारखं आहे की आम्हालाही त्यातल्या विलक्षण नाट्यामुळे ते ऐकण्यातच मौज वाटे.

स्वातंत्र्यानंतर लातूर-उस्मानाबाद या भागात रझाकारांमुळे अराजक माजलं होतं. आजीच्या तत्कालीन बालमनावर ते कायमचं कोरलं गेलंय. तेव्हाची कुठलीही आठवण या कडवट anecdote शिवाय पूर्णच होत नाही. या गोष्टीशिवाय बहात्तर चा दुष्काळ ही एक तिची दुखरी नस. परंतु हे सांगताना ती क्वचितच भावूक व्हायची. तिचा तो कोरडेपणा अंगावर यायचा माझ्या. इतकी अलिप्तपणे, त्रयस्थपणे ती स्वतःच्याच अपेष्टा कशा सांगत असेल याचं मला कुतूहल वाटायचं. 'भरल्या खटल्याच्या घरात पंधरा तोंड कसंबसं सजगुऱ्याच्या कन्या खाऊन किंवा हाब्रेट च्या भाकरी मीठासोबत पोटात ढकलून आर्ध्या पोटानं उठायची तेव्हा आपल्या लेकराच्या पोटात चार आगावचे घास जावे मनून भाकर कुपाटीत, खिळपटात लपवून ठेवायचे मी' हे सांगताना कुठेतरी शून्यात हरवून जायची ती..

माझ्या पिढीवर असा मूलभूत परिणाम करणारा प्रसंग म्हणजे 1993 सालचा किल्लारी भूकंप..! पाच वर्षांचा होतो मी तेव्हां. पण आजही लहानपणीची पहिली आठवण म्हटली कि मला 30 सप्टेंबरची ती रात्रच आठवते. त्या सगळ्या प्रतिमा इतक्या ठाशीवरीत्या कोरल्या गेल्यात मनावर की कधीच पुसल्या जाणार नाहीत. तो पत्र्याच्या छताचा होणारा धडधडाट अजूनही जसाच्या तसा स्मरतो. त्याक्षणी तो आवाज ऐकून अर्धवट झोपेत अर्धवट जागे झालेल्या माझ्या बालमनात दोन शक्यता उमटलेल्या. एकतर आपल्या छतावरून आठदहा मोकाट कुत्री धावत जात आहेत किंवा आपल्या दाराबाहेरच्या अरुंद रस्त्यावरून धडधडत एखादी ट्रेन जातेय. तो आवाज बंद व्हावा असं खूप प्रकर्षाने वाटत होतं मला. आईवडील आम्हा भावंडांना कवेत घेऊन घराबाहेर पळत होती, तेव्हा फारसं आकलन नसलं तरी हे काही तरी भयंकर आहे याची मनोमन जाणीव होत होती. या भूकंपाचा त्या भागांतील लोकांवर प्रचंड मानसिक परिणाम झालाय. त्या रात्रीनंतर आम्हांला स्वतःच्याच घराची भीती वाटायला लागली होती. रोज किल्लारीच्या बातम्या, आकडे, अफ़वा कळत, पसरत होत्या. मुख्य धक्क्यानंतर छोटे मोठे ट्रेमर्स बरेच दिवस चालू होते. रात्रीतून घर आपल्याला उदरात घेऊन गडप करेल या भीतीने आम्ही सगळे कितीतरी दिवस झोपायला शेतात जात असू..

आम्हां लहान मुलांवर चहुबाजूंनी अनेक गोष्टींचा जाणते अजाणतेपणी भडिमार होत होता. भूकंप या संकल्पनेबद्दल जो तो आपल्या आकलन आणि कुवतीनुसार जमेल त्या खऱ्या खोट्या गोष्टी सांगत असे. मला नेमक्या शब्दांत सांगता न येणारी प्रचंड भीती वाटायची. "मोठा भूकंप झाला की जमीन फाटते आणि आपण त्यात ओढले जातो" असं कुणीतरी सांगितलेलं. या गोष्टीनं माझ्या मनात इतकं घर केलं होतं की कित्येक रात्री आपल्या घरासमोरची जमीन दुभंगली आहे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यात असंख्य साप वळवळत आहेत असं स्वप्न पडायचं आणि दचकून रडत मी जागा व्हायचो. काही दिवसातच आलेली दिवाळी कुणालाच गोड लागणे शक्य नव्हते. दिवाळीसाठी आजोळी जाताना एसटीचा रूट किल्लारीवरून होता. तिथे गाडी पोचली तेव्हा सगळे प्रवासी उठून खिडक्यांतून बाहेर बघू लागले. मी मात्र पूर्णवेळ आईच्या कुशीत मान खुपसून बसलेलो.. इतकं काही ऐकलं होतं की माझी हिम्मतच झाली नाही बाहेर बघण्याची.. आजोळच्या घराची पडझड झाली होती परंतु सुदैवाने तेवढ्यावरच निभावलं होतं. माझ्या मामावर किल्लारीतल्या मृतदेहांची सामूहिक अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत वाहतूक करण्याची जबाबदारी होती. त्या काळात तो अत्यंत विमनस्क अवस्थेत घरी यायचा. अन्नावरची वासनाच उडालेली त्याची. एकदा डम्परमध्ये मागे डेडबॉडीज भरलेल्या होत्या आणि त्या एका ठिकाणी पुरण्यासाठी घेऊन जात असताना त्या परिसरात धरण फुटल्याची आवई उठली. संभ्रमित अवस्थेत तो मुख्य रस्ता सोडून कितीतरी वेळ मृतदेहांनी भरलेली गाडी शेताशेतातून दामटीत होता. त्याच्या बोलण्यातून रोज कितीतरी हृदय पिळवटणाऱ्या गोष्टी कळायच्या. कित्येक कुटुंबं अख्खीच्या अख्खी ढिगाऱ्याखाली गाडली गेली.. कुठे केवळ अंगणात खाटेवर झोपलेला म्हातारा आणि त्याच्या जवळ झोपलेला नातू वाचलाय आणि बाकी सगळे खतम.. कुणी दुर्दैवाने कसा गेला.. कुणी सुदैवाने कसा वाचला.. अशा प्रसंगीही मृतांच्या अंगावरचं सोनं ओरबाडून नेणाऱ्या प्रवृत्ती.. पुनर्वसनातल्या खाचाखोचा, त्रुटी, मदतीचे ओघ.. एक ना अनेक किस्से.. मुलं लहान आहेत त्यांना फारसं कळणार नाही या गैरसमजातून आमच्यासमोर परिस्थितीचं नागडं सत्य त्यांच्याकडून अजाणतेपणी मांडलं जायचं. पण आम्ही तेव्हा जीवाचं कान करून ऐकायचो. कुवतीप्रमाणे त्याचे अर्थ लावायचो. मनातल्या मनात भेदरून जायचो...

या भूकंपाने लातूरच्या जनमानसावर किती खोल परिणाम केलाय याचं उदाहरण म्हणजे त्या घटनेनंतर बराच काळ एक वर्षाआड पसरणारी भूकंप होणार अशी अफ़वा.. एखाद्या रात्री कुण्यातरी नातलगाचा घरी फोन यायचा, "आज झोपू नका भूकंप होण्याची शक्यता आहे..." याला कुठलाही आधार नसला तरी ही फोनाफोनी होत राहायची. रिस्क कशाला म्हणून एकमेकांना सावध केलं जायचं. रात्र जागून काढली जायची. अर्थातच, सुदैवाने पुन्हा असं काही घडलं नाही. आता आताशा या अफवा कमी झाल्यात.

स्थलांतरित मजूर मुलं

अस्मानी संकटांचं वैशिष्ट्य हेच, की ते घडून गेलं आणि विषय संपला असं होत नाही. ते बराच काळ वेगवेगळ्या प्रकारे टोल वसूल करत राहतं. जीविताची, मालमत्तेची, भौतिक अंगाने झालेल्या नुकसानीची प्रामाणिकपणे किंवा पूर्णांशाने नसली तरी मोजदाद होते, करता येते.. परंतु त्याचे दीर्घकाळ टिकणारे मानसशास्त्रीय परिणाम, आप्तांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी, स्वावलंबनावर, स्वाभिमानावर उठलेले कोरडे, भौतिक नुकसानीमुळे ऐहिक प्रगतीची झालेली उलटी वाटचाल व त्यायोगे उद्भवलेला न्यूनगंड याची कुठेच नोंद होत नाही.. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वर्गा-वर्गांमधल्या सीमारेषा अजूनच गडद होतात. संकट कोणतंही असो, सर्वाधिक फटका निम्न आर्थिक-सामाजिक गटालाच अधिक बसतो. आजही तेच होतंय. रझाकाराच्या बारीत शत्रू त्या प्रश्नाच्या समाप्तीसोबतच एकप्रकारे नामशेष झाला आणि निजामाला हटवून त्या तुलनेत बऱ्यापैकी सकारात्मक व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. त्र्याण्णवचा भूकंप ही तत्कालीन व्यवस्थेच्या नियंत्रण तसेच आवाक्याबाहेरची नैसर्गिक आपत्ती होती. कोरोनाबद्द्ल मात्र असं म्हणता येत नाही. पहिल्या जगातून आलेल्या या संकटाची सर्वाधिक किंमत मोजतोय, तो या देशातला असंघटित क्षेत्रातील मजूर... मे च्या रणरणत्या उन्हांत डांबरी सडकांवर अन्न पाण्याविना, बऱ्याचदा अनवाणी, तुटपुंजा संसार आणि कुटुंबकबिला घेऊन शेकडो किलोमीटर पायपीट करत जाणाऱ्या स्थलांतरितांच्या या अत्यंत हिडीस अवहेलनेचे कॉज इफेक्ट ऍनालिसिस करून कोरोनाआधी भूक आणि पायपिटीने त्यांचे जीव जाऊ नयेत यासाठीची किमान संवेदनाही व्यवस्था दाखवत नसेल तर त्यांनी तिला या परिस्थितीत क्रमांक एकचा शत्रू मानणं यात मला काहीच गैर वाटत नाही.. कित्येक घटना.. कित्येक हेलावणारी उदाहरणं.. कुठलाही अशा स्थलांतरितांचा फोटो अथवा व्हिडीओ पाहत असताना माझी नजर आधी त्यातल्या लहान मुलांवर पडते. त्यांचे मनोव्यापार काय असतील सध्या? ते या परिस्थितीतलं नेमकं काय टिपत असतील? सुदैवाने यातून निभावून नेलंच तर एकंदर या कल्याणकारी लोकशाही व्यवस्थेबद्दल त्यांच्या भावना कितपत टोकदार असतील? यातला एखादा शिकून स्वतंत्र संवेदनशील विचार करू लागला तर तो हे वास्तव किती यथार्थ आणि जळजळीतपणे मांडेल? की तोही आपल्या स्मृती माझ्या आजीसारखं निर्विकारपणे, शून्यात बघत सांगेल? एक ना अनेक प्रश्न... एक मात्र खरं.. प्रत्येकातील माणूसपणावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या 'कोरोनाच्या बारीतल्या' असंख्य कथांसाठी आपण आत्तापासूनच मनाची तयारी करायला हवी...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील वाक्य विशेष करून मनाला भिडले

अस्मानी संकटांचं वैशिष्ट्य हेच, की ते घडून गेलं आणि विषय संपला असं होत नाही. ते बराच काळ वेगवेगळ्या प्रकारे टोल वसूल करत राहतं. जीविताची, मालमत्तेची, भौतिक अंगाने झालेल्या नुकसानीची प्रामाणिकपणे किंवा पूर्णांशाने नसली तरी मोजदाद होते, करता येते.. परंतु त्याचे दीर्घकाळ टिकणारे मानसशास्त्रीय परिणाम, आप्तांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी, स्वावलंबनावर, स्वाभिमानावर उठलेले कोरडे, भौतिक नुकसानीमुळे ऐहिक प्रगतीची झालेली उलटी वाटचाल व त्यायोगे उद्भवलेला न्यूनगंड याची कुठेच नोंद होत नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपघातानंतरील post-event trauma वर लोकसत्ता वरील हा ग्रंथ वरील लेख वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवेदनशील लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठलाही अशा स्थलांतरितांचा फोटो अथवा व्हिडीओ पाहत असताना माझी नजर आधी त्यातल्या लहान मुलांवर पडते. त्यांचे मनोव्यापार काय असतील सध्या? ते या परिस्थितीतलं नेमकं काय टिपत असतील?

अगदी हेच विचार त्यांचे चिमुकले चेहेरे बघून येतात. सिरियन बालकांचे फोटोही फार अस्वस्थ करायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा एकदा ,जबरदस्त !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संशोधक लोकांचे अंदाज साफ चुकले आहेत(उदा तापमान वाढले की व्हायरस कार्यरत राहणार नाही निष्क्रिय होईल) त्या मुळे निती आयोग च्या एका सदस्याचा अंदाज चुकला म्हणजे काही भयंकर घडले आहे असा react होण्याची गरज नाही.
कॅन्सर रोग्याला सुद्धा तू बरा होशील असे डॉक्टर सांगतात कारण तसे सांगणे गरजेचं असते त्याचा धीर वाढतो .
म्हणून डॉक्टर नी कोणती नशा केलीय असा प्रश्न विचारला जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

पटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0