जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..8

पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग (1769)
- रिचर्ड आर्कराइट (1733-1792)

xxx खरे पाहता उद्योजकाच्या पेटंट हक्कासाठी, यंत्राचा तपशील लिहिलेल्या तीन पानी अहवालाला पुस्तक म्हणावे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल. परंतु चार ओळीची (चारोळया!) कविता असू शकते व चारशे ओळींची पण कविता असू शकते. कवितेला ओळींचे बंधन नाही. त्याच प्रमाणे पुस्तकांना पानांच्या संख्येचे बंधन नसावे.

औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात ‘उद्योजक’ या पिढीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. उद्योजक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करून समाजाच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजाला सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असतात. उद्योजकांच्या पिढीने एकेकाळच्या श्रीमंत जमीनदारांना, वतनदारांना, व्यापारामध्ये भरपूर नफा कमवून गबर झालेल्या भांडवलदारांना उघड उघड आव्हान दिले. समाज ढवळून टाकला. श्रीमंत म्हणजे भरपूर जमीन-जुमला असलेले, शेकडो शेतमजूरांना रात्रं-दिवस राबवून घेत त्यांच्या श्रमातून ऐषारामी जीवन जगणारे, अशी व्याख्या रूढ होती. उद्योजकांनी ही व्याख्या पुसून टाकली.

शेतीभोवती फिरत असलेल्या समाज व्यवस्थेत हजारो वर्षे काहीही बदल झाला नव्हता. परंतु उद्योजकांच्या नवीन पिढीने जमिनीचा एक तुकडाही नसतानासुध्दा केवळ बुध्दी, सर्जनशीलता, दूरदृष्टी व समाजोपयोगी नवीन कल्पनांच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवून आणली. रिचर्ड आर्कराइटच्या यांत्रिक सूतकताई प्रक्रियेमुळे इतर उद्योजकांना प्रोत्साहन मिळू लागले. नवीन दिशा मिळाली. एका नवीन उद्योगव्यवस्थेची सुरुवात अशा पेटंटमुळे झाली. व हे लोण पुढील 60-70 वर्षे जगभर पसरले. ही औद्योगिक क्रांती अमेरिका, फ्रान्स, वा रशियातील क्रांतीपेक्षा जास्त परिणामकारक ठरली. जगाचा चेहरा मोहरा बदलला.

मुळात पेटंट हक्कासाठी संशोधकच सामान्यपणे प्रयत्न करत असतात. परंतु रिचर्ड आर्कराइट कुठल्याही अंगाने संशोधक नव्हता. जेम्स वॅट किंवा मायकेल फॅरडे प्रमाणे त्यानी कुठलेही संशोधन केले नव्हते. परंतु तो एक कल्पक उद्योजक होता. आपल्या उत्पादनाला बाजारपेठेत कितपत प्रतिसाद मिळू शकेल याची त्याला जाण होती. आवती भोवती होत असलेल्या बदलांवर व संशोधनांवर त्याची नजर रोखलेली होती. त्यानी संशोधनाचे महत्त्व ओळखले. त्याच्यासारख्या उद्योजकांनी संशोधनाचा वापर करून घेत ब्रिटनमध्ये उद्योगांचे जाळे उभारले व हजारो मजूरांना काम दिले. कामाच्या मोबदल्यातून मिळालेल्या वेतनातून, एके काळी शेतावर राबराबून शेवटपर्यंत गरीबीतच जीवन जगणाऱ्या मजूरांच्या परिस्थितीत सुधारणा झाली. जीवनमान उंचावला. जेथे शक्य आहे तेथील कामाच्या यांत्रिकीकरणांच्या अशा प्रकारच्या हक्कपत्रामुळे उत्पादनाला वेग आला. मोठया प्रमाणात बाजाराच्या मागणीप्रमाणे उत्पादन वाढविणे शक्य झाले. त्यानी त्याकाळी घालून दिलेल्या मार्गदर्शी तत्त्वाप्रमाणे आजचे उद्योग व्यवस्थापन कमी-जास्तपणे अजूनही कार्यरत आहे.

आर्कराइटचे शिक्षण जेमतेम झाले होते. तो तसा अशिक्षितच. त्याकाळी शिक्षण महाग असल्यामुळे घरातच त्याच्या बहिणींने त्याला शिकविले. त्याचे वडील शिंप्याचा व्यवसाय करत. वयाच्या तेराव्या वर्षापासून एका न्हाव्याच्या दुकानात त्याला उमेदवारी करावी लागली. नंतर त्याने केसांच्या कृत्रिम टोपांचा व्यवसाय सुरु केला. गावोगावी हिंडून कापलेले केस गोळा करून तो टोप बनवून घ्यायचा व विकायचा. याच फिरतीच्या काळात, खेडे ओस पडत आहेत हे त्याच्या लक्षात येऊ लागले. उद्योग व्यवसायामुळे शहरवस्ती वाढत होती. उत्पादनासाठी वापरात असलेले मशिन्स बघून तो आश्चर्यचकित होत होता. मशिन्सनी आर्कराइटला भुरळ घातली.

yyy अशाच एका फिरतीच्या वेळी त्याची गाठ एका हौशी संशोधकाशी पडली. त्या काळी अनेक होतकरूंना नवीन मशिन्स बनवण्याचा छंद जडला होता. त्यातून आपले भाग्य उजळेल या आशेवर रांत्रदिवस ते खपत होते. सुती कापडांच्या कारखान्यांनी ही सुरुवात करून दिली. सुती कपडयांच्या मिल्सनेच औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. शेतातील कापूस स्वच्छ करणे, बिया वेगळे करणे, सूत कातणे, विणणे, रंग भरणे, कापड तलम करणे इत्यादी अनेक प्रकार वस्त्रोद्योगांशी निगडित होत्या. सुती कापडांना फार मोठी बाजारपेठ उपलब्ध होती. छोटे छोटे मशिन्सचा वापर करून घरगुती पातळीवरच उत्पादनाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता. संशोधकांच्या डोक्यात अनेक कल्पना होत्या. परंतु मशिन्स बनवून त्याची चाचणी घेण्यासाठी पैसे नसत. या हौशी संशोधकाला आर्कराइटने मदत करण्याचे ठरवले. सूत कताईसाठी एका नवीन प्रकारच्या चौकटीचा शोध त्यानी लावला होता. मशिनमध्ये अनेक सुधारणा करत त्याची यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. संशोधकाला धंद्यात भागिदारी दिली. त्याच्याजवळील दूरदर्शीपणामुळे त्याच्या या उपक्रमाला बरकत आली. विज्ञानामुळे जग बदलू शकते या न्यूटनच्या विधानाचा प्रत्यंतर वस्त्रोद्योगातील यांत्रिकीकरणातून येवू लागला. यापूर्वी हाताने सूतकताई केली जात होती. आर्कराइटच्या या सर्जनशील उपक्रमामुळे 5000 लोकांना रोजगार मिळू लागला. पेटंट हक्कासाठी विनंती अर्ज करताना आर्कराइटने त्याचे मशिन कापूस-लोकरपासून सूतकताई करू शकते. त्यातून उत्पादनात वाढ होऊ शकते व कित्येक गरीबांना मजूरी मिळते असा उल्लेख केला होता.

उत्पादनाच्या यांत्रिकीकरणामुळे अशिक्षित, अर्धशिक्षित, कामगारसुध्दा मोठया प्रमाणात उत्पादन करू शकतात हे सिध्द झाले. आर्कराइटच्या कारखान्यातच 8-10 वर्षाच्या बालकामगारांची मोठया प्रमाणात भरती होती. 12 ते 14 तास ते काम करत होते. मशिनसाठी वाफेची, पवनचक्कीची, वा पाणचक्कीची ऊर्जासुध्दा चालू शकत होती. त्यामुळे ज्याप्रकारची ऊर्जा उपलब्ध असेल त्याप्रमाणे मशिनमध्ये थोडे फार बदल करून उत्पादन करणे शक्य झाले. आजसुध्दा मशिनच्या लवचिकपणाविषयी उत्पादक जास्त जागरूक असतात.

आर्कराइटला या व्यवसायात प्रचंड प्रमाणात पैसा मिळू लागला. एका प्रकारे आधुनिक कारखानदारी व्यवस्थेची ही सुरुवात होती. समाजाला याचा पुरेपूर फायदा झाला. आर्कराइटची प्रेरणा घेऊन अनेक उद्योजक वेगवेगळया क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणावर भर देऊ लागले. ही औद्योगिक परंपरा अमेरिका, भारत, युरोप, रशिया, जपान, व आता चीनमध्येसुध्दा पसरली आहे. अमेरिकेतील क्रांतीनंतरच्या काळात आर्कराइटच्या यांत्रिकीकरणाची कल्पना अमेरिकेत पोचली. व या संधीचा त्यानी भरपूर फायदा करून घेतला. सर्व देशभर उद्योगाचे जाळे पसरले व अमेरिका श्रीमंत झाली.

वीतभर जमिनीची मालकी नसताना, पिढीजात घरदार, वतन वा इतर कुठलीही मालमत्ता नसताना, किंवा उच्च शिक्षणाचा गंधही नसतानासुध्दा केवळ कल्पकतेच्या जोरावर माणसं श्रीमंत होऊ शकतात, ऐषारामी जीवन जगू शकतात, मोठ मोठया आलिशान घरात राहू शकतात, हेच या औद्योगिक क्रांतीने जगाला दाखवून दिले. भांडवली व्यवस्थेला अत्युच्च शिखरावर पोचवण्याचे काम आर्कराइटसारख्या अनेक उद्योजकांनी केला व अजूनही करत आहेत.

उद्योग व्यवस्थेतील उतावळेपणामुळे, झटपट श्रीमंतीच्या हव्यासामुळे शोषणाला भरपर वावही उद्योजकांना मिळाला. कारखानदारीत अनेक दोष आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. गोरगरीबांचे शोषण होते; आर्थिक विषमता वाढते; मूठभर लोक इतरांच्या जीवावर ऐषाराम करतात; बालकामगारांची संख्या वाढतच आहे; कामाच्या तासांना बंधन नाहीत इ.इ. हे सर्व खरे असले तरी उद्योगव्यवस्थेचे लोण अजूनपर्यंत थांबवता आले नाही, शहरीकरणाचा वेग थांबवता आला नाही, स्त्री कामगार - बालकामगार यांची पिळवणूक थांबवता आली नाही, हेही तितकेच खरे. आर्कराइटने शोधलेल्या यंत्रामुळे वस्त्रोद्योगाला भरभराटी आली हे आपण नाकारू शकत नाही. युरोप, अमेरिका, भारत व आता चीन या देशांने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्थेला पोचवले. याचे सर्व श्रेय आर्कराइटला ध्यायला हवे.

(क्रमशः)
1.....प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2.....ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3.... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4…. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड
5…...ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन
6…...मॅग्नाकार्टा
7…….वेल्थ ऑफ नेशन्स

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आर्कराइटने शोधलेल्या यंत्रामुळे वस्त्रोद्योगाला भरभराटी आली हे आपण नाकारू शकत नाही. युरोप, अमेरिका, भारत व आता चीन या देशांने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्थेला पोचवले. याचे सर्व श्रेय आर्कराइटला ध्यायला हवे.

असे वाटते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन आवडले. अजून येऊद्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0