Skip to main content

ड्राय डे

2 minutes

"उद्या डिनरला बिर्याणी खायची का रे?" मह्यानी मला विचारलं.

"नको रे भेंजो. लास्ट आठवडा आहे. ती नवीन सिप घेतली, तेव्हापासून एप्रिलमध्ये इन्क्रीमेंट मिळेपर्यंत जरा कट्टूकट होणारेय."

"अरे खर्च नाही यार. बाॅसिणीच्या नवीन घरी पार्टी ठेवलीय. एमडीपासून सगळ्यांना बोलवलंय तिनी. मला कार्ड देऊन बोलली, तू नक्की ये आणि हवं तर कोणाला बरोबर आण. पार्टीत काय पिणार हेपण विचारलं पण मला बरोबर नाही वाटलं मग ज्यूसच बोललो."

"तुझी बाॅसीण लिंबू कलरची साडी घालते का रे मह्या?" मी उगाच चावलो; आणि मह्यानी माझ्या पाठीत गुद्दा घातला. "काहीपण बोलू नको भेंजो. ती देवमाणूस - आपलं, देवबाई - नाही, देवबाईमाणूस आहे."

"बरं ते जाऊदे. पण नवीन घरावर पाटी कशी लिहिणार ती? म्हणजे लोक वाघमारेज, नाडकर्णीज वगैरे लिहितात तर घैसासचं अनेकवचन काय असतं? घैसासेस? घैसास्ज?"

मह्या उचकला. "पार्टी मिळतेय तर गप चल की भेंजो! उगाच नसत्या शंका तुला."

मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चांगले कपडे वगैरे करून मह्या आणि मी त्याच्या बाॅसिणीच्या घरी गेलो. घराच्या पाटीवर "सागर, प्रणिता, नील" अशी नावं लिहून बाजूला तिरक्या अक्षरात घैसास लिहिलं होतं.

कोणीतरी दरवाजा उघडला. आत गेलो. मह्या त्याच्या ऑफिसच्या लोकांबरोबर बोलू लागला. मी उगाच इकडेतिकडे फिरत फर्निचर वगैरे बघत होतो. तर अॅक्चुअली लिंबू कलरचा टाॅप आणि जीन्स घातलेली एक बाई मला म्हणाली, "हॅलो. साॅरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही."

"मी महेशबरोबर आलोय. महेश ठाकूरबरोबर," मी बोललो.

"अच्छा, महेशचा प्लस वन. वा वा, वेलकम." ती हसत म्हणाली.

"नाही नाही. म्हणजे फक्त कंपनी म्हणून आलोय," मी पटकन बोललो. तेवढ्यात मह्या आला आणि ओळख वगैरे करून दिली, आणि गिफ्ट म्हणून आणलेला टेबललॅम्प दिला.

आम्ही बोलत होतो तेवढ्यात मह्याच्या बाॅसिणीचा नवरा (म्हणजे सागर किंवा नील) आला आणि एक्स्क्यूज करून तिला बाजूला घेऊन गेला. तो काहीतरी बोलला आणि तिचा चेहरा एकदम पडला. तेवढ्यात कोणीतरी आलं आणि सागर किंवा नील त्याला रिसिव्ह करायला गेला.

मह्याने पुढे जाऊन बाॅसिणीला विचारलं, "ऑल वेल, मॅडम?" "नाही रे, जरा गडबड झालीय. व्हिस्की कमी पडणार असं दिसतंय आणि सागरनं ड्रायव्हरला दुकानात पाठवलं तर कळलं की आज ड्राय डे आहे."

"डोन्ट वरी मॅडम, मी करतो काहीतरी" मह्या म्हणाला; आणि आम्ही दोघे बाहेर पडलो. मी बाईक चालवत होतो आणि मह्या मित्रांना फोन करू लागला. अर्ध्या तासात मित्रांच्या स्टाॅकमधून एक अख्खी ग्लेनफिडिच, अर्धी शिवासरिगल, अर्धी जेडी आणि पाऊण जिमबीम गोळा करून आम्ही परत मह्याच्या बाॅसिणीच्या घरी पोचलो.

बाॅसीण प्रचंडच खूष झाली. सागरनीपण पुन्हापुन्हा थँक्यू म्हटलं. पार्टी चांगली झाली. पण मह्याच्या लाजाळूपणामुळे आम्ही दोघे फक्त ऑरेंज ज्यूस पीत होतो एवढाच प्राॅब्लेम होता भेंजो. मग बिर्याणी खाल्ली आणि बाॅसिणीचा निरोप घेऊन घरी गेलो.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

चिंतातुर जंतू Thu, 13/02/2020 - 14:14

पण मह्याच्या लाजाळूपणामुळे आम्ही दोघे फक्त ऑरेंज ज्यूस पीत होतो एवढाच प्राॅब्लेम होता भेंजो.

एवढाच ??? ग्लेनफिडिच आणि कंपनीचा घोर अपमान आहे हा!
सभ्य यजमानांनी व्हिस्कीची सव्याज परतफेड केली असेल असे गृहीत धरू ना?

गवि Thu, 13/02/2020 - 14:40

In reply to by चिंतातुर जंतू

ज्या मोटिव्हेशनने ही धावपळ आणि जुळणी केली तो मोटिव्ह "व्हिस्की" नक्कीच नव्हता हे स्पष्ट दिसतंय. त्या बाबतीत पुढे काय परतफेडीची शक्यता? सागर नाव असलं तरी इतकी दर्यादिली असेल?

देवदत्त Thu, 13/02/2020 - 14:50

In reply to by गवि

मह्याच्या बॉसिणीने त्याला पुढच्या वर्षी प्रमोशन व्हायची शक्यता आहे असं सांगितल्यापासून तो अधिक सजग झालाय. विदेशी भाषासुद्धा शिकू लागलाय पठ्ठ्या.

देवदत्त Thu, 13/02/2020 - 15:09

In reply to by गवि

मह्या निकिताशी मनोमन एकनिष्ठ आहे. साला तिचं नाव बोलता यावं म्हणून इतिहासाच्या पुस्तकातला ख्रुश्चेव्हचा पॅरा घोकत बसायचा - निकिता ख्रुश्चेव्हनी स्टॅलिनचा पंथ संपवला का कायतरी.

चिंतातुर जंतू Thu, 13/02/2020 - 15:24

In reply to by देवदत्त

मह्याच्या बॉसिणीने त्याला पुढच्या वर्षी प्रमोशन व्हायची शक्यता आहे असं सांगितल्यापासून तो अधिक सजग झालाय.

भांडवलशाही मुर्दाबाद!

ऐसी Fri, 14/02/2020 - 12:40

In reply to by गवि

सागर, दर्यादिल, कथेची एकूण मांडणी आणि लिंबू कलरची साडी यावरून सागर या लोकप्रिय लेखकाच्या कथांची आठवण आली.

अबापट Thu, 13/02/2020 - 16:34

प्रत्यक्षदर्शनात अतिशय शांत आणि मृदुभाषी वाटणाऱ्या देवदत्त यांच्या मस्तिष्कात सिंधुआज्जी आणि मह्या काय मोकाट दंगा करताहेत ?
माझ्या डोक्यात लै गोंधळ उडून राहिलाय ..

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/02/2020 - 20:51

झकास न-गोष्ट आहे! ऑरेंज ज्यूस पिऊन एवढंच सुचणार!!

चिमणराव Sat, 15/02/2020 - 00:05

खरी खोटी बनवलेली कशीही गोष्ट लिहा। मी आताचा वपु समजून वाचेन. माझं एक्सपोजर फारच कमी आहे.
-------
कॉलेज डे, नंतर युनिवर्सिटी डे'चे आयोजन अमच्या खालसा कॉलेजला मिळालेले. पासेस मिळणे कठीण असते. रावडी प्रतिस्पर्धी ग्यांग राडा करतात. त्यासाठी सक्षम वालंटिअरस निवडतात . माझा पार्टनर होता. त्यामुळे पास मिळाला. तो सिगरेट्स खूप प्यायचा. त्याची सिगारेट्स पाकिटे माझ्या मोज्यात ठेवलेली. लागेल तशी सिगरेट द्यायचो.

(( "तू सिगरेट ओढत नाहीस म्हणजे तुझ्याकडे कोणी मागणार नाही, माला मागतील तेव्हा ही एकच मिळाली कशीतरी सांगेन." मला मोजे घालून ये म्हणाला, "चप्पल वापरतोस पण रंगभवन उघडे आहे तिकडे थंडी असते." ))

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/02/2020 - 20:06

In reply to by 'न'वी बाजू

सहमत आहे. नीतीचा धडा वगैरे न देता मजेशीर लिहिणाऱ्या देवदत्तचा अपमान आहे हा.

'न'वी बाजू Sat, 15/02/2020 - 20:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेल, नीतीचा धडा वगैरे कल्पना नाही. आमच्या फनीबोनास टिकलतात, एवढे निश्चित. (आम्हांस तेवढेच कळते. (नि पुरते.))

(नाही म्हणायला, Feral peopleमध्ये काही सटल नीतिपाठ वगैरे अलगद घुसडलेला होता काय? नाही म्हणजे, असल्यास आक्षेप नाही - अखेरीस त्यांची मर्जी आहे! - परंतु खात्री करून घेत आहे, इतकेच.)

चिमणराव Sat, 15/02/2020 - 21:31

In reply to by 'न'वी बाजू

पुलंच्या काळात वपुंनी आपला एक वेगळा वाचक वर्ग तयार केला या अर्थाने 'आताचा वपु' . आताचे वपु म्हणूया.
लेखकाला बहुतेक पटलय.
प्रस्थापित लेखनाला ढुशी देऊन पुढे जाणं वपुंनी जमवलंच.

'न'वी बाजू Sat, 15/02/2020 - 21:43

In reply to by चिमणराव

प्रस्थापित लेखनाला ढुशी देऊन पुढे जाणं वपुंनी जमवलंच.

असेलही. (नो कमेंट्स.) पण कोणत्या दर्जाचे लेखन करून? (लेखणीजुलाब नुसता! या रेटने, फेसबुकी नि व्हॉट्सॅपी फॉर्वर्डांनासुद्धा आपला असा एक वाचकवर्ग असतोच, त्याच्याशीही तुलना कराल!)

'आपला वाचकवर्ग निर्माण केला' हा (बाय इटसेल्फ) क्रायटेरियॉनच होऊ शकत नाही. (तसा तर मग केकता क्कपूरलासुद्धा अमाप फॅनवर्ग आहे.)

चिमणराव Sun, 16/02/2020 - 06:56

In reply to by 'न'वी बाजू

लोकप्रियता/वाचकप्रियतेचा क्वोशंट वेगळा असू शकतो. तो वपुंना आहे हे धरून वपुंची उपमा दिली.
हे लेखन चांगलं आहे हेच म्हणायचं होतं. पण घात झाला.
((वाचनालयात आणि पुस्तक विक्रीतही वपु पुढे होते त्यांच्या काळात. ))

नील Sat, 15/02/2020 - 20:18

आवडींग!

>>
तेवढ्यात मह्याच्या बाॅसिणीचा नवरा (म्हणजे सागर किंवा नील) ..
>>

:)

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 00:11

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)