मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न

तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:| या धाग्यात मराठी शुद्धलेखनावरून सुरू झालेली चर्चा इथे हलवली आहे. धाग्याचे शीर्षक धनंजय अथवा इतर कोणाला मिसलीडींग वाटल्यास कळवावे/बदलावे.

याबाबतीत डॉ. अशोक केळकरांनी १९६५ साली मत व्यक्त केले होते. (लेख त्यांच्या "वैखरी" संग्रहात आहे.) त्या लेखातील मुद्द्यांचा मी पुढे उल्लेख करेन.

- - -

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांप्रमाणे तत्सम सामान्यनामे अंत्य-दीर्घ लिहावीत. उदाहरणार्थ "दशरथाचा पुत्र" या सामान्य अर्थाने संस्कृतात "दाशरथि" असा शब्द आहे. मराठी वाक्यात पुढीलप्रमाणे वापर असेल तर नियमात काहीच संदिग्धता नाही.
दाशरथी रामाचा विजय असो! "दाशरथी" हे सामान्य अर्थाचे विशेषण आहे, आणि "राम" हे व्यक्तीचे विशेषनाम आहे.

मात्र नियमानुसार विशेषनामांचे काय करावे, ते कळत नाही. उदाहरणार्थ "पणिनोऽपत्यं पुमान्, इति पाणिनि:" येथे सामान्यनाम आहे की विशेषनाम? या व्यक्तीचे हे विशेषनाम म्हणून वापरण्यात येते; खरे तर तो "पणिन्" (पणी) कोण आणि त्याला किती मुले होती, आणि त्याचा पुत्र असण्यात काय विशेष, हे आपल्या मनातही येत नसते. "मराठी व्याकरणाचा अभ्यास" या पुस्तकात परब यांनी दादोबा तर्खडकरांना "मराठी भाषेचा पाणिनी" म्हटले गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी शब्द दीर्घांत वापरलेला आहे. दस्तुरखुद्द मला असा वापर पटतो.

- - -
केळकरांचे मत आहे, की प्राचीन आणि मध्ययुगीन विशेषनामे ही मराठीपर्यंत संस्कृतामार्फत पोचलेली आहेत, आणि ती विशेषनामे संस्कृत लिखाणाप्रमाणे मराठीत वापरावी. तेसुद्धा कोशगत रूप वापरावे, संस्कृत-विभक्ती-प्रत्यय लावलेले रूप मराठी वाक्यात लिहू नये. मराठीत "राम" ("रामः" नव्हे). मात्र जर संस्कृतातले कोशगत रूप ऋकरांत किंवा व्यंजनांत असेल, तर मात्र संस्कृतातील प्रथमा एकवचन रूप मराठीत वापरावे. संस्कृत-कोशगत "सवितृ", त्याचे संस्कृत प्रथमा-एकवचन "सविता", हे रूप मराठीत वापरावे. (त्यांचे "नचिकेतस्" -> नचिकेत हे उदाहरण काही प्रमाणात गोंधळात पाडणारे आहे, कारण "नचिकेत" हे प्रथमा एकवचन नव्हे.)
परंतु केळकरांनी र्‍हस्व इ/उकारांत संस्कृत विशेषनामांबाबत काहीच म्हटलेले नाही. (खरे तर त्यांचे अन्य निबंध वाचून "पाणिनि/पाणिनी" रूप शोधून सापडेल, त्यावरून त्यांचे मत कळू शकेल.
परंतु याच लेखात ते अन्य भारतीय भाषांतली र्‍हस्वांत विशेषनामे मराठीत र्‍हस्वांतच लिहितात. उदाहरणार्थ "तेलुगु". तर संस्कृतातील र्‍हस्वांत विशेषनामाबाबत त्यांचा कल तसाच असावा, असे मला वाटते.

- - -

या बाबतीत "सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने बेधडक जसे भाषण/लेखन तेच प्रमाण" हा कस मला लावता येत नाही. मला स्वतःला मराठीत "पतंजलि" असे लिहिणे असह्य होते, आणि "पतंजली" असे लिहिणेसुद्धा. आणि या ठिकाणी तर सुशिक्षित असून मला काहीच आत्मविश्वास नाही. त्यामुळे मी खुद्द जमेल तितपत वाक्यरचना बदलतो आणि त्या नावांचे सामान्यरूप लिहितो : माझ्या महाभाष्यावरच्या लेखात "पतंजलींचा" असा उल्लेख आहे! अथवा समासरूप लिहितो. "पाणिनि-व्याकरण अमुक-तमुक उल्लेख करते" वगैरे. कारण समासाच्या अंतर्गत रूप र्‍हस्वांतच लिहायचे असते. तरी ही पळवाट भ्याडपणाची आहे. "पाणिनी" शब्द "रवी, मुरारी" या शब्दांसारखा दीर्घांत लिहावा, किंवा "बळ्ळारि, तेलुगु"सारखा मानून र्‍हस्वांत लिहावा, त्याबद्दल काहीतरी ठरवायलाच हवे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

वरील प्रश्नाचे एक उत्तर, "सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने बेधडक जसे भाषण/लेखन तेच प्रमाण" असे वरती धनंजय ह्यांनी सुचविलेले आहे आणि त्यांना ते मान्य नाही असेहि म्हटले आहे.

मला वाटते 'बेधडक' ह्या शब्दाच्या त्यातील वापरामुळे तो नियम 'predetermined to fail' असा आपोआपच ठरतो कारण त्यातून सुशिक्षितांचा elitism आणि 'आम्हाला काय ते सगळे कळते, तुम्ही निमूटपणे आमचे ऐका' असा दर्प ध्वनित होतो. त्यातून पुढे 'सुशिक्षित म्हणजे कोण? कोठे राहणारे? कोठल्या जातीचे?' असले राजकीय फाटे फुटतात. (आपोआप फुटले नाहीत तर ते फोडण्यात काहीजणांना स्वारस्य असते.)

'बेधडक' हा औद्धत्यसूचक शब्द वगळून "सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने जसे भाषण/लेखन तेच प्रमाण" असा नियम सुचविला तर तो स्वीकारायला कोणासहि वावगे वाटू नये असे मला वाटते. माझ्या मते 'शुद्धलेखना'ला ही एकच कसोटी पुरेशी आहे. पण हा साधासरळ मार्ग न चोखाळता शुद्धलेखनाचे नियम, त्यांना उपनियम, त्यांमध्ये शासकीय मान्यता असलेले नियम वा अन्य कोणा विद्वद्गटाची मान्यता असलेले नियम असे जंजाळ उभारून वेगवेगळ्या कारणांसाठी असंतुष्ट असलेले गट-उपगट निर्माण करण्यात काय ते आपण यशस्वी झालो आहोत आणि 'गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं' अशी आपली स्थिति झाली आहे.

आता "सुशिक्षित लोकांचे आत्मविश्वासाने जसे भाषण/लेखन तेच प्रमाण" म्हणजे काय असा प्रश्न तुम्ही विचाराल. त्याचे उत्तर असे की त्यासाठी अन्य प्रगत भाषा काय करतात ते पहा. उदाहरणार्थ इंग्रजीकडे पहा. इंग्रजीत काही शासनपुरस्कृत कोणी अन्य कोणी पुरस्कृत असे 'शुद्धलेखना'चे नियम तुम्ही पाहिले आहेत काय? नाही. तरीहि एखाद्याचे लिखाण शुद्ध आहे की अशुद्ध आहे हा प्रश्न acceptable limits च्या मर्यादेत आपण सोडवू शकतो. कारण गेले दोनअडीचशे वर्षे जवळजवळ आजच्यासारखेच इंग्रजी सुशिक्षितांच्या वापरात राहून मान्यतेच्या पातळीला पोहोचले आहे आणि त्याला सार्वत्रिक मान्यता आहे. कोठे शंका असली तर मान्यताप्राप्त शब्दकोष, Fowler's English Usage सारखी साहाय्यक साधनसामुग्री उपलब्ध आहे. आपले इंग्रजी हे शुद्धच असले पाहिजे असे ज्याला तळमळीने वाटते, किंवा ज्याला उपजीविकेसाठी इत्यादि कारणांनी भाषा शुद्धच ठेवावी लागते तो प्रयत्नपूर्वक अभ्यासाने ते त्याच्या कुवतीनुसार शिकून घेतो. ज्याला तशी तळमळ वा आवश्यकता नसते तो त्या वाटेला जातच नाही आणि त्यामुळेहि काही नुकसान होतांना दिसत नाही. त्याला हवे तसे वा शक्य आहे तितके शुद्ध तो लिहितो वा बोलतो. 'तुझे अमुक तमुक इंग्रजी चूक आहे आणि शासनपुरकृत नियमावलीतील नियम ४(१)(ड) च्या अनुसारे तू ते असेअसे सुधार' असा नियम त्यांच्यासाठी घातलेला दिसत नाही.

आपणहि गोष्ट तेव्हढयावरच सोडून सगळे 'नियम' रद्द करावे आणि 'शुद्धलेखन म्हणजे काय' हा वाद कायमचा मिटवून टाकावा. 'न रहेगा बास, न बजेगी बांसुरी!' सुशिक्षिततेला मान देण्याची इच्छा मात्र हवी. तीच मुळात नसली तर त्या philistine वातावरणात कोठल्याच नियमांना काहीच अर्थ नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या "बेधडक" मधे "मागेपुढे न-बघता", इतपतच अर्थ अपेक्षित होता. येथे आत्मविश्वासाचाच पर्यायी शब्द आहे, परंतु "जणू काही नैसर्गिक असल्यामुळे हिचकिचही मनात न येणे" हा भाव अधिक दाखवायचा होता.

बाकी शुद्धतेचा (साधुतेचा) हा निकष पतंजलीनेच दिला आहे. "मडके वापरण्यापूर्वी आपल्याला कुंभाराकडून ते घडवून घ्यावे लागते. शब्द वापरण्याकरिता मात्र आपल्याला व्याकरणकाराकडे जायची गरज पडत नाही." अशा मथितार्थाचे त्याचे म्हणणे महाभाष्याच्या प्रस्तावनेत आहे. शिवाय हाच निकष आधुनिक भाषावैज्ञानिकही वापरतात.

मला हा निकष पूर्णपणे मान्य आहे Smile

फक्त मराठीमध्ये "पाणिनि/पाणिनी" र्‍हस्वांत लिहावे की दीर्घांत या बाबतीत मला तो निकष लागू करता येत नाही, असे वैयक्तिक निरीक्षण नोंदवले आहे. कारण या प्रयोगाच्या बाबतीत (१) मला मागेपुढे बघावेसे वाटते, आणि (२) मागेपुढे बघून झाल्यानंतरही मला आत्मविश्वास वाटत नाही.

याचे कारणही वैयक्तिक प्रशिक्षणातच आहे. संस्कृत व्याकरणाचे माझे बहुतेक अध्ययन हिंदीमधून झाले आहे, तिथे डोळ्यांना र्‍हस्वांत बघायची सवय झालेली आहे. महाभाष्याचे मराठी भाषांतरही जुन्या लेखनप्रमाणानुसार आहे. त्यामुळेसुद्धा पाणिनि र्‍हस्वांत बघायची सवय झालेली आहे. तरी हिंदी प्रमाणलेखन, तसेच जुन्या वळणाचे लेखन हे आधुनिक मराठीकरिता प्रमाण नव्हे. आधुनिक मराठीकरिता माझ्या आत्मविश्वासाने-बोललेल्या-भाषेचे उच्चारानुसारी लेखन आपोआप बर्‍यापैकी प्रमाण-लेखनासारखेच उमटते. आणि असे लिहायला गेल्यास "पाणिनी" असे लिहावेसे वाटते. त्यामुळे डोळ्यांना हे रूपही पटत नाही, आणि ते रूपही पटत नाही. अशा प्रकारे आत्मविश्वास कमी पडतो. मग मी काय करावे? अर्थात, अन्य आत्मविश्वासाने लिहिणार्‍या लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या वळणाने पर्याय निवडावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्व-संपादित प्रतिसादः

संपादकांनी मागच्या एका चर्चेतील काही प्रतिसाद या नव्या चर्चेत रूपांतरित केल्याबद्दल त्यांचे आभार.
तसेच, धनंजय आणि कोल्हटकर यांचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषय आला आहे तर थोडासा संबंधित तर थोडासा वेगळा प्रश्न आहे, तो विचारतो.

'Union bank of India' चे नाव मराठीत 'युनियन बँक ऑफ इंडिया' असते, तर हिंदीत 'यूनियन बैंक ऑफ इंडिया' लिहिलेले दिसते. कित्येक दिवस मी म्हणायचो, की काय हे हिंदीवाले! 'दुसरा'चे 'दूसरा', 'किडा'चे 'कीडा' करतातच, पण म्हणून 'युनियन'चे 'यूनियन'? कळत कसं नाही? म्हणून बघताना तरी उच्चार 'यूनियन' असा कधी होईल का? आणि नंतर शब्दकोशात बघितल्यावर कळले की तो 'यु' नसून 'यू'च आहे. पण माझ्या जिभेच्या मराठी वळणाला 'यूनियन' वळेना. हिंदीतलाच उच्चार मूळ उच्चाराच्या जास्त जवळ होता. हीच गोष्ट 'युनायटेड', 'सिनिअर', 'ज्युनिअर' वगैरे शब्दांबाबत! आता ही मराठमोळी रूपे वापरायची, की मूळ उच्चाराला जवळ जाणारी 'यूनियन', 'यूनायटेड', 'सीनिअर' अशी रूपे वापरायची? जर पहिला पर्याय निवडला, तर मराठीत दीर्घ स्वर वगैरे फक्त पुजायला ठेवला आहे का? वेगळे उच्चार दाखवायची सोय देवनागरी लिपीमध्ये असताना 'केवळ आपण नेहमी तसे उच्चारत नाही' म्हणून वापरायचीच नाही का? असे प्रश्न उद्भवतात. जर दुसरा पर्याय स्वीकारला, तर उच्चार लिपीमध्ये दाखवता येत असला तरी नेहमी वाचताना तो शब्द 'वेगळा' जाणवत राहणार आणि उच्चार मात्र मराठी पद्धतीनेच होण्याची शक्यता जास्त! तेव्हा तशा प्रकारे लिहून काय फायदा? असे प्रश्न उद्भवतात.

मी अजूनही गोंधळलेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

< संस्कृत व्याकरणाचे माझे बहुतेक अध्ययन हिंदीमधून झाले आहे, तिथे डोळ्यांना र्‍हस्वांत बघायची सवय झालेली आहे.> असे धनंजय म्हणतात आणि आधुनिक मराठीसाठी ते प्रमाण नसावे अशी शंका व्यक्त करतात.

माझे सर्व शाळेपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मराठीतील आहे तरीहि मलाहि पाणिनि, पतंजलि, कवि, गति, गुरु, पटु हे आणि असे शेकडो शब्द असेच पाहायची आणि उच्चारायची सवय झाली आहे. कोणी 'कवी' म्हटले की मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. शिकण्याच्या दिवसात मी हे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ह्याला अर्थातच थोडे प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात पण शिकण्याच्या दिवसात प्रयत्न आणि कष्ट करायचे नाहीत तर केव्हा करायचे?

तेव्हा मला असे वाटते की जे जमत नाही असे वाटते ते सोडून द्या असे उत्तेजन पुढील पिढीला देण्याऐवजी 'जमत नाही तर प्रयत्न करून जमवा' असे आपण त्यांना सांगितले पाहिजे, अन्यथा ही backsliding ची सवय जीवनशैलीच बनते. येणारे दिवस सुशिक्षिततेला अधिक महत्त्व देणारे होत आहेत. Backsliders आणि taking-it-easy types, व्यक्ति काय किंवा देश काय, त्यात मागे पडतील हे स्पष्ट दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा आणि व्याक्रण ह्यांच्या नैसर्गिक जन्मात भाषा आधी जन्मली. एक लोकसमूह बोलू लागतो, ती चिन्हे भाषा ठरली. त्याच्या सामान्य निरिक्षणावरून जी
गृहितके बनली ती व्याकरण नियम. व्याकरण्हे मुळातच भाशेच्या नंतर बनले आहे. आधी व्यकरण मग भाषा असे काही नाही.
तसे असल्यास ज्याला जे सोयीस्कर वाटते ते त्याने वापरावे, फार त्रास क्रुन घेउ नये. कोपर्‍या कापर्‍यातल्या शब्दांमधील र्‍हस्व दीर्घाचा तर अजिबात नाही.
ह्याचा अर्थ सतत भाषा दुरुस्ती,भाषा सात्मीकरणाची प्रक्रिया चालूच नये का? तर अवश्य चालावी. विशेषतः लिपीशुद्धी. पण तिचा फोकस हा मुख्यतः जे स्वर आपल्या भाषेत मुळी नाहितच, किम्वा जी वैशिष्ट्ये नाहितच, ती सहजतेने समाविष्ट करण्यासाठी असावा.
उदा:- अ‍ॅ आणि ऑ हे स्वर दोनेकशी वर्षांपूर्वीच्या मराठित कुठेही दिसणार नाहित साहेबाच्या भाषेच्या प्रभावाने हे दोन स्वर आपण सहज आत्मसात केले.
तसेच इतर काही स्वर जपानी, जर्मन , मेक्सिकन भाषा समूहात असू शकतात, ते घेण्याचा प्रयास करावा.विनाकारण हे चूक की ते बरोबर असा विचार करून त्रास क्रुन घेण्यात काय हसहील आहे ते समजत नाही. एखाद्याने पतन्जली लिहिले काय, पतङ्जली/ पतञ्जली लिहिले काय, जे म्हणायचे आहे ते विनातक्रार पोचल्याशी मतलब मलातरी
पतन्जली पतङ्जली/ पतञ्जली ह्या दोन शब्दांत इतकासा फरक वाटत नाही. अनुनासिक काहीतरी "त " नंतर आहे हे समजल्याशी जनसामान्यास कारण. हरेक जणांस
व्याज्करणाचे सखोल ज्ञान असावे आणि मगच त्याने भाषा वापरावी असा तर आग्रह का करावा.
म्हणूनच वरती कोल्हटकरांनी "कोणते लेखन शुद्ध?" लिहिलय त्याच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विस्कळीत भाषा समुहाला एकत्र बांधण्यासाठी व्याकरण आले का - असा विचार मनात येतो. बोलण्यासाठीचे व्याकरण आणि लिहिण्यासाठीचे व्याकरण यात काही फरक आहेत आणि ते मला नेहमी रंजक वाटत आले आहेत. आणखी एक प्रश्न मनात आला - ज्या बोली भाषांना लिखित व्याकरणाचे नियम नाहीत - तिथं समाजमान्यता बदलत जाते का (बदलणारच तीही) आणि तिचा स्वीकार कसा होतो - यावर कोणी काही अभ्यास केलेला आहे का? (केलेला आहे का - हे बरोबर? की 'केला आहे का" - हे बरोबर?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर एकंदरीतच इतर भाषांमधले शब्द लिहिताना संस्कृतला वेगळी वागणूक का दिलेली आहे हे मला कळत नाही. आपण अरबी, फारसी, कानडी मधूनदेखील शब्द घेतो, आणि आपल्याला हवे तसे लिहितो. विशेषनामं देखील आपल्याला हवी तशी लिहितो. मैथ्री, सविथा सारखी नावं आपण बिनधास्त मैत्री, सविता अशी लिहितो. रशिया हा शब्द राश्श्या असा उच्चारत नाही, लिहीतही नाही. आपल्याला जसा वाटतो तसाच लिहितो. मग पाणिनी की पाणिनि अशी चिंता का करावी? असेल संस्कृत एके काळी आपल्या भाषेची आजी, पण आता मराठी काही आजीच्या आज्ञेत रहायला लहान नाही. आजीशीही तसे संबंध दुरावले आहेतच. इतर सख्या आपल्याला सापडल्या आहेत. त्यांच्याशी देवाणघेवाण चालू असते. मग संस्कृतसाठीच केवळ लिपी समान आहे म्हणून ऱ्हस्व दीर्घ पाळायचे याला काय अर्थ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैथ्री, सविथा सारखी नावं आपण बिनधास्त मैत्री, सविता अशी लिहितो.

असे नसावे. ही नावे मैत्री, सविता अशीच असून त्यांचे रोमनीकरण करतानाच्या वेगळ्या कन्व्हेन्शन्समुळे असे वाटते. दाक्षिणात्यांच्या पद्धतीनुसार 'त' आणि 'थ' दोन्हीसाठी 'th' वापरले जाते. त्यांचा उच्चार मैत्री, सविता असाच केला जातो आणि मराठीत लिहिताना असेच लिहिले जावे असे वाटते.

'डर्टी पिक्चर'वेळी 'सिल्क स्मिता' हे नाव बहुधा अशाच कारणामुळे अनेक ठिकाणी 'स्मिथा' वाचल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मैथ्री" आणि "सविथा" असे तमिळ किंवा मलयाळम शब्द आहेत, हा भ्रम तमिळ आणि मल्याळम माहीत नसून रोमनीकरणामार्फत ते शब्द बघितल्यामुळे होतो. ("थ" किंवा कुठलेच महाप्राण वर्ण ख-घ-छ-झ-ठ-ढ-थ-ध-फ-भ हे प्रमाण तमिळमध्ये वापरात नाहीत.)

केळकरांच्या लेखातील संस्कृत विशेषनामांबाबत भाग (जो लहानच आहे) तो मी उद्धृत केला. मूळ लेख आधुनिक भारतीय भाषांमधील शब्द जमल्यास त्या-त्या भाषेतील प्रमाणानुसार लिहिण्याबाबत अनुरोध आहे. (माझ्या उद्धरणात मी "तेलुगु" शब्द तेलुगु-प्रमाणानुसार र्‍हस्व लिहावा, मराठीकरणानुसार दीर्घांत लिहू नये, हा उल्लेख दिलेलाच आहे.) तमिळ/मलयाळम शब्द मूळ भाषेतील प्रमाण-लिप्यंतरणानुसार मराठीत लिहावे, इंग्रजी लिप्यंतरणाच्या दुहेरी नियमांचा घोटाळा करून चुकीचे लिहू नयेत, हा अनुरोध आहे.

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांत संस्कृताकरिता विशेष सोय आहे, हे खरे आहे. त्याचे कारण असे की मराठीमध्ये संस्कृत-तत्सम शब्दांची संख्या फारच मोठी आहे. तद्भव शब्द मात्र मराठी नियमांप्रमाणेच लिहिले जातात. इतकेच काय काही शब्द मराठीत दोन वेळा अवतरले, एकदा तद्भव म्हणून तर एकदा तत्सम म्हणून. (जळ/जल, निळा/नील, इत्यादि.) या शब्द-जोड्यांच्या अर्थछटा वेगळ्या असल्यामुळे त्यांचा उच्चारही वेगळा होतो आणि अर्थही वेगळा होतो. त्यामुळे मराठमोळे शब्द उगाचच संस्कृत-मुळाकडे ओढून-ताणून लिहायचे प्रमाण नाही.

फारसी-अरबी शब्द हे मराठीत तत्सम क्वचितच दिसतात. साधारणपणे तद्भवच दिसतात. प्रमाण-हिंदीमध्येसुद्धा फारसी-मूलक शब्दांखाली नुक्ते न-लिहिण्याचा प्रघात आहे. कारण हे शब्द आज हिंदीचे स्वतःचे शब्दभांडार मानले जाते. म्हणजे तद्भव.

मराठीत शेजारच्या भाषांतील सामान्य-नाम शब्द (कन्नड, गुजराती, हिंदी, तेलुगु) तद्भव म्हणून नांदत आहेत. ही सरमिसळ सीमाभागात नैसर्गिकरीत्या होत आहे, आणि द्वैभाषिकांच्या वापरातून हे शब्द आता मराठीचे आपले शब्दभांडार आहे. श्री. घासकडवी कन्नडमधून/तेलुगुमधून/हिंदीमधून तत्सम मानावे अशा शब्दांचे उदाहरण सांगू शकतात काय?

अगदी सीमावर्ती विशेषनामे सुद्धा द्वैभाषिकांमुळे नैसर्गिक-रीत्या मराठमोळी वापरात आहेत. त्यामुळे मराठीमध्ये "बेळगाव" (कन्नडमध्ये "बेळगावि"), "निपाणी" (कन्नडमध्ये "निप्पाणि") असे लिहिणे ठीकच आहेत, कारण त्या-त्या गावातील द्वैभाषिक लोक मराठीमध्ये तसा उच्चार करतात, आणि तसे लेखन करतात.त्याच प्रमाणे कन्नडात "सांगलि" (र्‍हस्वांत) हे ठीकच आहे. कारण सांगली गावातील द्वैभाषिक कन्नडात नैसर्गिकरीत्या तसेच र्‍हस्वांत बोलतात/लिहितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मैथ्री" आणि "सविथा" असे तमिळ किंवा मलयाळम शब्द आहेत, हा भ्रम तमिळ आणि मल्याळम माहीत नसून रोमनीकरणामार्फत ते शब्द बघितल्यामुळे होतो.

याने माझा मुद्दा बदलत नाही. किंबहुना हा प्रतिवाद होणार याची कल्पना होती. म्हणूनच मी राश्श्या आणि रशिया हे उदाहरण दिलं होतं. जर मैत्री हे दाक्षिणात्य नाव आपण रोमनीकरणातून गैरसमज करून मैथ्री म्हणू नये असं मत असेल तर तेच राश्श्या साठी देखील लागू पडतं. तरीही आपण बेधडकपणे रशिया असंच लिहितो आणि म्हणतो.

मला असं म्हणायचं आहे की बरेच लोकं एका विशिष्ट पद्धतीने लिहितात म्हणून आपणही बेधडकपणे तसंच लिहिण्याला वाटतात तितकी बंधनं नाहीत. आत्तापर्यंतच्या इतिहासात मराठीत रशिया हा शब्द कायम राश्श्या असा लिहिला गेला असता तरी मराठी भाषेच्या संस्कृतीत, तीतून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता.

संस्कृतबहुल शब्दसंपदेमुळे देखील हा फरक पडू नये. कदाचित एकाच शब्दाचे ऱ्हस्व व दीर्घ मुळे दोन प्रचलित अर्थ होत असतील तेव्हा पडू शकेल. पण विशेषनामांच्या बाबतीत तर हा अर्थवाहकतेचा प्रश्न नसतो. निव्वळ लेखनशुचितेचा प्रश्न येतो. जी एरवी अज्ञानापोटी म्हणा किंवा आडमुठेपणे म्हणा, आपण धाब्यावर बसवतोच.

संस्कृतबाहुल्याचा मुद्दा संस्कृत भाषा आता वापरात नसल्याने आणखीनच कमकुवत झालेला आहे. संस्कृतातून आले की त्यांना तत्सम म्हणून त्याच स्वरूपात जपण्याचा आटापिटा करायचा आणि इतर भाषांतून आले की तद्भव म्हणून आपल्या जिभेच्या सोयीप्रमाणे वळवून घ्यायचे हा भेदभाव पाळण्याची आता गरज नाही. सगळ्याच शब्दांना तद्भव म्हणावं, आणि पुढे जावं. संस्कृत साहित्याचा अभ्यास करणारांनी हे ऱ्हस्व दीर्घ ध्यानात ठेवले की झालं.

तेव्हा पाणिनी की पाणिनि असा प्रश्न आला तर त्यातलं वाटेल ते लिहावं. दोन्ही बरोबर आहेत. एके काळी एकाच रंगात मिळणारं मडकं आता दोन रंगात मिळतं इतकंच. त्यातनं मिळणारं पाणी तेच असलं की झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक आहे Smile तुम्ही वाटेल तसे लिहा.

मुळात सुशिक्षित लोक जसे बोलतात (लिहितात) ते कालांतराने प्रमाण होते. त्यामुळे तुमचे लेखन हा एक आत्तबिंदू ठरेल, आणि अशा आत्तबिंदूंचे बाहुल्य झाले, की तसेच प्रमाण मानले जाईल.



व्;

(वरील चिन्ह-ओळ तिसर्‍या किंवा वेगळ्याच रंगात मिळणारे मडके आहे, आणि त्यातील पाणी तेच आहे. वाटल्यास "पाणिनी" आणि "पाणिनि" यांच्याबरोबर या चिन्हावलीची देखील आत्तबिंदू म्हणून नोंद व्हावी.)

- - -
वरील प्रतिसादात अनेक अति-सत्ये आहेत (अति-सत्य म्हणजे इतके सत्य की त्याचा प्रस्तुत चर्चेत काहीही उपयोग होत नाही). उदाहरणार्थ :

आत्तापर्यंतच्या इतिहासात मराठीत रशिया हा शब्द कायम राश्श्या असा लिहिला गेला असता तरी मराठी भाषेच्या संस्कृतीत, तीतून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता.

लेखन हे चिन्हमात्र आहे आणि ही चिन्हे औपचारिक (क्रिएटेड-बाय-कन्व्हेन्शन, नैसर्गिक नव्हेत) आहेत. हे तर मूलभूत सत्य आहे. या चिन्हांऐवजी वेगळी कुठली चिन्हे असती, इतकेच काय मराठी भाषा वरून खाली जाणार्‍या चित्रलिपीत लिहिली गेली असती, तरी काही फरक पडला नसता. हे धादांत सत्य या ठिकाणी सांगून काय फरक पडतो? कारण येथील चर्चा त्याहून खूपच मर्यादित आहे.

("आज घरात फारच उकाडा भासतो आहे" अशी चर्चा चालू असताना "उष्णतेचा मूळ सत्य सूर्य आहे" हे धादांत सत्य अप्रस्तुत असते. कारण कालही सूर्य उष्णतेचा स्रोत होता, पण काल नव्हती पण आज आहे, अशा उकाड्याबाबत वैशिष्ट्याने चर्चा चालू आहे.)

कमीतकमी समकालीन लेखक-वाचकांमध्ये जर लेखी संवाद घडून यायचा असेल, तर लेखनातील घटक-चिन्हाबाबत लेखक-वाचकांचे आधीपासून एकमत हवे. (घटक असे का अधोरेखित केले. घटकांच्या जोडणीमुळे जे वाक्य बनते, त्यातून जो एकत्रित अर्थ प्रकाशित होते, तो वाचकाला कित्येकदा नवीन असतो, किंवा अमान्य असू शकतो.) हा जो काय लेकक-वाचक दोहोंना मान्य पूर्वसंकेत असतो, तेच (त्या दोहोंसाठी) प्रमाण होय. म्हणजे


व्;

चिन्हांनी काही हजार वर्षांपूर्वीचा एक संस्कृत वैयाकरण चिन्हित होतो, असा पूर्वसंकेत लेखक आणि वाचकामध्ये असला, तर अशा लेखनातून होणाऱ्या सुसंवाद व ज्ञानवर्धनात काडीमात्र फरक पडला नसता. खरेच आहे.

१. असा पूर्वसंकेत जर फक्त दोन नव्हे, तर खूप-खूप लेखक-वाचकांना मान्य असला, तर सोयीस्कर असते. कारण मग लेखकाने लिहिलेला एकच आलेख कित्येक वाचक ग्रहण करू शकतात.
२. असे पूर्वसंकेत पुष्कळदा परंपरेतून मिळवणे सोयीस्कर असते, कारण ज्या पारंपरिक माध्यमातून (शाळांमधून) हे संकेत खूप लोकांपर्यंत पोचलेले असतात, त्याचा आयता फायदा लेखक आणि वाचकांना घेता येतो.

आता ऐतिहासिक प्रवाहामुळे मराठीत देवनागरी लिपी वापरतात, आणि विशेषनामांच्या चिन्हितांचे काही पूर्वसंकेत आहेत. हे बदलतही आहेत, आणि सोय वाढेल असा बदल योग्यही आहे. बदलल्यावर सुद्धा समकालीनांमध्ये कुठलासा ठराविक संकेत असणे सोयीस्कर आहे. तर या चर्चेत "सूर्य हा उष्णतेचा मूळ स्रोत आहे = कुठलीही चिन्हे चालली असती" हा अति-सत्य मुद्दा अप्रस्तुत आहे. सध्या एका चिन्हिताकरिता "पाणिनि" आणि "पाणिनी" ही दोन चिन्हे पूर्वसंकेत म्हणून असणे सोयीस्कर आहे काय? हा मुद्दा आहे. प्रत्येक चिन्हिताकरिता विशेषनाम म्हणून अनेक चिन्हे उपलब्ध असणे माझ्या मते सोयीस्कर नाही. आता माझे नाव धनंजय/धानंजय/धनांजय/धनंजाय/.../धानाञ्जाया यांच्यापैकी कुठलेही चिन्ह ठेवले तरी चालेल. पण तेच पाणी असलेली ही सर्व मडकी असणे मला तरी अतिशय बिगर-काटकसरी वाटते आहे. जमल्यास यापैकी कुठलेतरी एकच चिन्ह वापरले, तर माझीसुद्धा सोय होईल, आणि माझ्याबाबत उल्लेख करणार्‍या लोकांचीदेखील सोय होईल.

आता कदाचित राजेश घासकडवी यांचा मुद्दा असेल, की काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच आणि काही विशिष्ट फरकांपुरतेच चिन्हवैविध्य ठीक आहे. म्हणजे <=४ चिन्हे (पाणिनि, पाणीनि, पाणिनी, पाणीनी), किंवा फक्त र्‍हस्व-दीर्घ-फरक असलेली चिन्हे (पाणिनि, पाणीनि, पाणिनी, पाणीनी) हीच सोयीस्कर-असलेली-अनेक मडकी आहेत. "ओइव्;ए" हे सोयिस्कर मडके नाही, हे ते बहुधा मान्य करतील. पण त्यांनी चर्चेत अशा तर्‍हेने हा मुद्दा मांडलेला नाही. आणि इतपत (पण याहून अधिक नव्हे) चिन्हवैविध्य एकुलत्या-एक पूर्वसंकेतापेक्षा सोयीस्कर आहे असा युक्तिवादही मांडला नाही की सर्वेक्षणही केलेले नाही.

लेखनशुचिता वगैरे त्यांचे मुद्दे सुद्धा ठीक असतील. परंतु सध्या तरी त्यांच्या मर्यादा त्यांनी सांगितलेल्या नाहीत. "ओइव्;ए" हे जर कोणी मान्य केले नाही, तर ती लेखनशुचिता सुयोग्य की फाजील="निव्वळ"?.

सगळ्याच शब्दांना तद्भव म्हणावं, आणि पुढे जावं. ... तेव्हा पाणिनी की पाणिनि असा प्रश्न आला तर त्यातलं वाटेल ते लिहावं. दोन्ही बरोबर आहेत.

विशेषनामांबाबत अमान्य. पाणिनीचे काही का असेना. माझ्या नावाचे लेखन देवनागरीत "धनंजय" असे करावे. उच्चारानुसारी "धनंजय्"/"डनांजे" वगैरे वाटेल तसे वेगवेगळ्या मडक्यांत तेच पाणी भरू नये, अशी विनंती आहे. किती मराठी लोकांना आपले विशेषनाम देवनागरीतच वेगवेगळ्या चिन्हांनी चिन्हित केलेले आवडेल, त्याचे सर्वेक्षण करावे. बहुतांश मराठी लोकांना जर अनेक चिन्हे मान्य असतील, तर अर्थात : मराठीमध्ये विशेषनाम वाटेल तसे वेगवेगळे लिहिण्याची मुभा आहे, हे मी मान्य करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय यांचा सर्वांग पैलूंनी विचार करून दिलेला हा प्रतिसाद खरोखर खूप आवडला. "अति-सत्य" या संकल्पनेची (कन्सेप्ट) ओळख झाली.आता इतक्या सखोल प्रतिसादावर मी काय बोलणार.

पण एक वाटते - नियमांचा अतिरेकही सर्वत्र करता येणार नाही थोडी शिथिलता बाळ्गावी लागेल.आता थोडी म्हणजे किती त्याची चर्चा ...वेल .... पाणिनी/पाणीनी/पाणीनि इतपत ठीक आहे का पाणीणी/पाणिणी ..... वगैरे परत ये रे माझ्या मागल्या!!!

जाऊ दे मला झेपण्यासारखी चर्चा नाही Blum 3 ..... मूळ हे सांगायला आले होते की धनंजय यांचा प्रतिसाद खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओइव्;ए सारखं टोकाचं उदाहरण देऊन काही विशेष साध्य होत नाही. नियमांची बंधनं शिथिल करण्याला अराजकतेची मागणी समजता कामा नये. म्हणजे 'रस्त्याच्या कडेने सायकल चालवण्यासाठी लेन असावी' अशी मागणी केल्यावर 'म्हणजे तुम्हाला फुटपाथच काढून टाकायचे आहेत' असा निष्कर्ष काढण्यासारखं आहे.

तर या चर्चेत "सूर्य हा उष्णतेचा मूळ स्रोत आहे = कुठलीही चिन्हे चालली असती" हा अति-सत्य मुद्दा अप्रस्तुत आहे.

माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायला मी अयशस्वी ठरलो बहुतेक. नाहीतर अतिसत्याच्या अप्रस्तुतेचं अतिसत्य मांडण्याची गरज नव्हती. 'कुठलीही' याची मर्यादा काय वाटतील ती, ओइव्;ए वगैरे इतकी व्यापक नाहीत. रशिया आणि राश्श्या इतपतच फरक - जेणेकरून जेव्हा रशियन मनुष्य माझ्याशी बोलताना राश्श्या म्हणतो तेव्हा मला ते माझ्या माहितीतल्या 'रशिया'विषयी बोलतो हे कळावं इतपत साम्य मी अध्याहृत धरलेलं होतं. एवढ्या मर्यादेत (ज्या मर्यादेत पाणिनी व पाणिनि ही चर्चा चालू आहे) भाषिक आयुष्यात काही फरक पडत नाही असं म्हणणं होतं.

माझा मुख्य मुद्दा होता तो असा:

रशियन भाषिक उच्चार : राश्श्या - रशियन लिपीत लेखन : राश्श्या (मी हे देवनागरीतच दाखवतो आहे)
मराठी भाषिक उच्चार : रशिया - मराठी लिपीत लेखन : रशिया

हे चालून जातं. मग

संस्कृत भाषिक उच्चार: पाणिनि - संस्कृत लिपीत लेखन : पाणिनि
मराठी भाषिक उच्चार: पाणिनी - मराठी लिपीत लेखन : पाणिनी

हे का चालू नये? आता तुम्ही म्हणाल की 'अहो पण संस्कृत व मराठीसाठी एकच लिपी - देवनागरी - वापरली जाते'. माझ्या मते तो मुद्दा इथे निःसंदर्भ आहे. मूळ तत्व विशिष्ट लिपीतलं लेखन हे त्या लिपीत लिहिणाऱ्या त्या भाषेच्या भाषिकांच्या उच्चाराप्रमाणे ठरावं. त्यामुळे संस्कृत लेखनात देवनागरीतच पाणिनि लिहावं, मराठी लेखनात पाणिनी लिहावं. लिपी < भाषा < भाषिक अशी उतरंड आहे. दोन भाषांचं जाऊद्यात, एकाच भाषेतही अशी उदाहरणं सापडतील. स्पेनातले स्पॅनिश आणि मेहिकोतले (की मेक्सिकोतले?) स्पॅनिश जर एकच शब्द वेगवेगळ्य पद्धतीने उच्चारत असतील तर एकाच लिपीत त्यांनी तो वेगवेगळा लिहायला हरकत नसावी. अगदी एखाद्या गावाच्या नावाबाबतीतही. अमेरिकन इंग्लिश आणि इंग्लिश इंग्लिश जर एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारत असतील तर तो एकाच लिपीत वेगवेगळ्या पद्धतीने लिहावा. ज्या गावाच्या नावात burgh येतं त्या गावाचं स्पेलिंग वेगळ्या पद्धतीने झालं अशी उदाहरणं सापडली तर तुम्ही काय म्हणाल? इंग्लिश व फ्रेंच भाषेत येणारा एकाच शब्दाचं उच्चारानुसार त्याच लिपीत वेगळं स्पेलिंग होत नाही का?

थोडक्यात, एखादा शब्द कसा लिहावा हे लिपीनुसार ठरत नाही, तर भाषिकांच्या उच्चारपद्धतीवरून ठरतं. लिपी केवळ माध्यम ठरते. हा मुद्दा आहे. काय वाट्टेल ते लिहावं असा मुद्दा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश घासकडवी लिहितातः

<माझा मुख्य मुद्दा होता तो असा:
रशियन भाषिक उच्चार : राश्श्या - रशियन लिपीत लेखन : राश्श्या (मी हे देवनागरीतच दाखवतो आहे)
मराठी भाषिक उच्चार : रशिया - मराठी लिपीत लेखन : रशिया हे चालून जातं. मग संस्कृत भाषिक उच्चार: पाणिनि - संस्कृत लिपीत लेखन : पाणिनि
मराठी भाषिक उच्चार: पाणिनी - मराठी लिपीत लेखन : पाणिनी
हे का चालू नये?>

मला वाटते की हे उदाहरण अप्रस्तुत आहे. मला बर्‍यापैकी रशियन भाषा येते म्हणून पुढील लिहीत आहे.

'रशिया' ह्याचा रशियन उच्चार राश्श्या असा नाही. रशियाचे रशियन भाषेतील नाव Россия असे आहे आणि तेहि अधिक जुने नाव Русь ह्याचे ग्रीक स्वरूप आहे, ह्यांचे रशियन उच्चार 'रस्सीया' (स्सी वर जोर आणि Ро रो चा ओ हा जवळजवळ अ सारखा) आणि 'रुस' असे होतात. ('रस्सीया' हा उच्चार येथे ऐकायला मिळेल. Byzantine Greek च्या माध्यमातून जुन्या 'रुस'चा अन्य जगाशी १०व्या शतकापासून संपर्क सुरू झाला.)

ग्रीकवरून इंग्रजीने Russia हा शब्द उचलला घेतला आणि penultimate syllable वर accent ह्या इंग्रजीच्या सर्वसाधारण नियमानुसार त्याचा उच्चार र'श्या (र वर जोर) असा करायला सुरुवात केली. पण मराठीचे त्याच 'रशिया' शब्दाचे उच्चारण मूळ रशियनमधील 'रस्सीया' वरून आलेले नाही आणि इंग्रजीतील 'र'श्या' वरूनहि आलेले नाही. ते आलेले आहे Russia हा इंग्रजी शब्द कसा उच्चारला जातो ह्या मराठी भषिकांच्या समजुतीवरून. मराठी भाषिकांची इंग्रजी उच्चारणाची समजूत जवळजवळ पूर्णपणे स्पेलिंगवर आधारित असते. ('इंग्लिश' वा 'अमेरिकन' इंग्रजी ऐकायचा सराव झाला म्हणजे ठणठणीत उच्चारांचे तर्खडकरी 'मराठी' इंग्रजी - ज्याला मी गमतीने 'वरणभात इंग्रजी' म्हणतो - कानाला खडबडीत लागू लागते ते ह्यामुळेच.) (पुलंची लंडनच्या पहिल्या भेटीत कशी त्रेधातिरपीट उडाली होती ते आठवा!)

अशा रीतीने 'रशिया' ह्याच उच्चाराची मराठी भाषिकांना सवय आहे. तो 'चालून जातो' असे म्हणता येणार नाही कारण आपल्या दृष्टीने तोच एकमेव उच्चार आहे. मराठी बोलतांना (मला रशियन येते म्ह्णून) मी तो शब्द मूळ भाषिकांच्या पद्धतीने 'रस्सीया' असा उच्चारला किंवा इंग्रजांच्या पद्धतीने 'र'श्या' असा केला तर ते मुद्दाम देखावा केल्यासारखे वाटेल आणि मी 'झग्यातनं पडलोय का' असा कुत्सित प्रश्न मला काहीजण विचारतील. ह्याउलट रशियन वा इंग्रजी बोलतांना मी 'रशिया' म्हणू लागलो तर ते लोक माझी कुचेष्टा करू लागतील.

थोडक्यात काय तर कोठल्याहि शब्दाचे - मूळच्या येथील वा परदेशातून आयात झालेल्या - शिष्ट संभाषणात मराठीत उच्चारण करतांना ते मराठीला मान्य असणे ही कसोटी एकच लावायला हवी आणि म्हणून 'रशिया' हा एकच उच्चार बरोबर आहे, तो 'चालून जातो' ही दया त्याच्यावर दाखवायची जरूर नाही. 'पाणिनि'च्या जागी 'पाणिनी' सुद्धा चालू शकेल असे सुचवायला तो योग्य आधार नाही.

अशा रीतीने आपण पुनः मूळ पदावर येतो की 'पाणिनि' आणि अन्य विशेषनामे कशी लिहावीत. धनंजय ह्यांच्याप्रमाणेच मलाहि माझे नाव आहे तसे उच्चारले आणि त्याप्रमाणेच लिहिले जाण्याचा अधिकार आहे. अजाणतेपणाने काही लोक त्याचा उच्चार वेगळा करतात म्हणून तेहि मी सहन करावे हे असे मला मान्य नाही. अर्थातच 'पाणिनि' हे नाव 'पाणिनि' असेच लिहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रशिया' ह्याचा रशियन उच्चार राश्श्या असा नाही.

मी रशियन माणसाला तसा उच्चार करताना ऐकलेलं आहे. अर्थात त्यांच्यातही सोव्हिएट यूनियन मधल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे पाठभेद असू शकतील. पण उच्चार काहीही असला तरी तो मराठीत रोमन लिपीच्या उच्चारांवरून आलेला आहे हे पटलं.

थोडक्यात काय तर कोठल्याहि शब्दाचे - मूळच्या येथील वा परदेशातून आयात झालेल्या - शिष्ट संभाषणात मराठीत उच्चारण करतांना ते मराठीला मान्य असणे ही कसोटी एकच लावायला हवी आणि म्हणून 'रशिया' हा एकच उच्चार बरोबर आहे,

मीही हेच म्हटलं आहे. आता फक्त संस्कृत ही पुरेशी परकीय आहे हे सिद्ध केलं की झालं. माझ्या मते, ज्याकाळी संस्कृत व मराठी बोलणारे एकाच समाजात वावरत होते तेव्हा ती परकीय नव्हती. आता ती झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<मीही हेच म्हटलं आहे. आता फक्त संस्कृत ही पुरेशी परकीय आहे हे सिद्ध केलं की झालं. माझ्या मते, ज्याकाळी संस्कृत व मराठी बोलणारे एकाच समाजात वावरत होते तेव्हा ती परकीय नव्हती. आता ती झालेली आहे.> घासकडवींचा वरील प्रतिसाद.

येथेच घासकडवींच्या एका आधीच्या प्रतिसादालाहि उत्तर देतो. २४ जूनला ते लिहितातः <खरं तर एकंदरीतच इतर भाषांमधले शब्द लिहिताना संस्कृतला वेगळी वागणूक का दिलेली आहे हे मला कळत नाही ......असेल संस्कृत एके काळी आपल्या भाषेची आजी, पण आता मराठी काही आजीच्या आज्ञेत रहायला लहान नाही. आजीशीही तसे संबंध दुरावले आहेतच.> असे ते म्हणतात.

संस्कृतपासून मराठी उत्पन्न झाली किंवा संस्कृत भाषा मराठीची आई-आजी आहे असे खरे म्हणता येत नाही. तसेच ती कधी 'बोलण्याची' भाषा होती हेहि खरे नाही. (हे विधान मी पाणिनीच्या 'संस्कृत' संस्कृतबाबत करत आहे). तथापि हे थोडे वेगळे विषय आहेत आणि त्यांना सध्या ह्या चर्चेत मी आणत नाही.

कधीकाळची प्राकृत स्वरूपातील मराठी ही स्वतन्त्र उत्त्पत्ति आहे. पण प्रौढ होण्याच्या प्रक्रियेत तिने (आणि हिंदी-गुजराथी वगैरे उत्तरेकडील भाषांनी, एव्हढेच काय तर तामिळ-तेलुगु अशांनी सुद्धा) मोकळेपणाने संस्कृतच्या शब्दसंपत्तीचा लाभ घेतला आहे आणि अजूनहि घेत आहेत. संस्कृतमधून गरज पडेल तसे नवे शब्द उचलायची किंवा निर्माण करण्याची प्रक्रिया वेगाने चालू आहे. 'संगणक', 'जाल', 'अभियंता', 'अभिभाषण', 'मृत्संधारण', 'मंत्रालय', 'सेन्द्रिय', 'राजदूतावास' असे शेकडो शब्द आपण नव्याने निर्माण करून वापरायला लागलो आहोत आणि ते ते शब्द आता चांगले रुळलेलेहि आहेत. हे शब्द संस्कृतमधून मूळ उचलून आणि त्यांना थोडेसे वाकवून आपण निर्माण केले आहेत. ही संपत्ति आपण मोकळेपणाने वापरत आहोत. ज्या भाषेतून आपण हे शब्द नैसर्गिक अधिकाराने प्रत्यही घेत आहोत ती 'परकीय' झाली आहे असे कसे म्हणता येईल? वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग तर घ्यायचा पण त्या संपत्तीचा पाया ज्या पूर्वजाने घातला त्याच्याविषयी मला काही आत्मीयता वाटत नाही, त्याचा जुना फोटो मुख्य बैठकीच्या खोलीत आजपर्यंत आहे पण आता तो तेथून हलवायची आणि त्याला storage मध्ये ठेवण्याची वेळ आलेली आहे असे म्हणण्यासारखे हे झाले.

संस्कृतला मराठी लिखाणात फारसी-अरेबिकपेक्षा ह्या खर्‍याखुर्‍या परकीय भाषांपेक्षा वेगळी वागणूक हवी अशाचसाठी की नव्या शब्दांच्या उत्पत्तीसाठी आपण संस्कृतकडे वळतो, फारसी-अरेबिक कडे नाही. (भारताचे हे व्यवच्छेदक लक्षण होऊ लागले आहे असेहि वाटते. मुंबई-हल्ल्याच्या पाकिस्तानातील सूत्रधारांपैकी एकजण भारतीयच आहे ह्याचा अंदाज अशावरून आला की त्याच्या बोलण्यात 'प्रशासन' हा शब्द आला, जो पाकिस्तानी सूत्रधाराला माहीत असण्याचे कारण नव्हते.)

भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि अखंडतेचा संस्कृत भाषा हा एक महत्त्वाचा धागा आहे आणि आपण तो शक्य तेव्हढा जिवंत ठेवला पाहिजे. तिच्यापासून दूर पळण्याने लाभ काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"स्टिल टाईड टू मदर्स अ‍ॅप्रन स्ट्रिन्ग्स" असा एक नकारात्मक वाक्प्रचार आहे म्हणजे प्रौढत्वातही आईचा पदर न सोडणे. या विशिष्ठ मनोवृत्तेस नकारात्मक छटा जास्त आहे. थोडी शिथिलता आणणे म्हणजे - मूळ मायबोली (संस्कृत) पासून दूरावणे नव्हे. अर्थात ती शिथीलता किती हा मुद्दा चर्चण्यास मी तरी असमर्थ आहे.

पण अगदी "पाणिनी (मराठी रूप)/पाणिनि (संस्कृत रूप)" इतके मला तरी खटकत नाही. मराठमोळा "पाणिनी" शब्द डोळ्यांना सुसह्य वाटतो. मला खरंतर संस्कृत "पाणिनि" असह्य वाटतो. (पण मग परत विचार करता, विशेषनाम असल्याने स्वीकारणे तितकेसे अवघड वाटत नाही..... परत विशेषनामातील शिथिलता किती वगैरे.... आलेच ...) जसे कोल्हटकर म्हणतात 'कवि" ...... मला स्वतःला "कवी" शब्द लिहायची सवय आहे. वेल .....

अगदी खरं सांगायचं झालं तर आई-वडील शिकवतात ती मूल्ये देखील एके काळानंतर आपण परत एकदा तपासून च स्वीकारू लागतो. मग त्याला परकेपणा म्हणायचा की प्रगल्भता?

अर्थात धनंजय यांनी आधीच म्हटल्याप्रमाणे - गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी प्रमाणलेखनाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे, हे खरे. पण तो तसा का बनला आहे?

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सरकारने एक समिती बनवली - मराठीच्या प्रमाणीकरणाचे नियम बनविण्यासाठी! जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली. काहीही कारण नसताना.

हे नियम बनण्यापूर्वीही मराठीत लेखन होत होते. आणि ते सर्व एकाच अलिखित नियमावलीनुसारे केले जात होते. म्हणजे, दोन समकालीन लेखकांपैकी एक लेखक एखादा श्ब्द र्‍ह्स्व लिहितो तर दुसरा दीर्घ लिहितो, असे होत नव्हते.

अर्थात, हे र्‍हस्व वा दीर्घ तसेच कायम चालत राहिले असते, असे नाही, तशी अपेक्षादेखिल नाही. भाषा ही प्रवाही असते, त्याप्रमाणे त्या त्या शब्दांच्या र्‍हस्व-दीर्घातही फरक पडला असता. आणि संक्रमणावस्थेतील काही काळ वगळता, पुढील पिढीत बहुमान्य असा बदल आपसूकच घडून आला असता. जगातील सगळ्या भाषांत हे असेच चालते.

मराठीत सगळा घोळ झाला आहे तो सरकारने एक "प्रमाण" ठरवून दिल्यामुळे.

भाषेचे स्वरूप कसे असावे, तीचे पुढील वळण कसे असावे, हा सर्वस्वी ती भाषा बोलणार्‍या/लिहिणार्‍या लोकांच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. जे जे बहुमान्य ते ते रूढ होत जाईल. जे जे अल्पमान्य ते ते बाजूस सरत जाईल. सरकारने ती जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती.

अजूनही सरकारने हे नियम रद्द केले आहेत असे जाहीर करावे आणि प्रमाणलेखनाचा प्रश्न मराठी भाषकांवर सोपवावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक बराच प्रतिसाद अवांतरच दिसतोय पण लिहिलाच आहे तर प्रकाशित करतो.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सरकारने एक समिती बनवली - मराठीच्या प्रमाणीकरणाचे नियम बनविण्यासाठी! जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली. काहीही कारण नसताना.

माझ्यामते दोन वेगळ्या बोलीतील लोकांना लिखित संवाद साधता यावा यासाठी प्रमाणीकरण आवश्यक आहे. ते सरकारने करावे का? हा वादाचा मुद्दा मान्य. मात्र सरकारने ते केले नसते तर अजूनही काही कोसांवर नाही पण जिल्हा बदलताना बर्‍याचदा 'दिसायला सारखी पण तरीही वेगळी' अशी भाषा वाचावी लागली असती. सरकारी कामामुळे ते काम लवकर झालेच व बर्‍यापैकी रुळले आहे, ज्यामुळे मला पटकन न समजणारी बोली बोलणारा लेखक जेव्हा प्रमाणमराठीत लिहितो तेव्हा त्याच्या प्रांतातल्या घटना, वातावरण, विचार मला कळतात.

जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण असावे जिथे सरकारने ही लुडबुड केली

बहुदा ही घटना (दोष म्हणायचे की नाही हे ठरवता आलेले नाही) फक्त मराठीत झालेली नाही. हिंदीसुद्धा यात येते असे वाटते. बहुदा संस्कृतमधे पाणिनीने जे नियम घालून-दाखवून दिले तेव्हापासून भाषा 'थोर' होण्यासाठी असे 'ठोस/ठाम' नियम असणे गरजेचे आहे अशी मानसिकता रूढ होऊ लागली असावी. अमेरिकेने ही 'ब्रिटिश शुद्धलेखनाची' जोखडे ज्या जोमाने झुगारली आहेत ते पाहता बहुदा या अप्रवाही नियमांची लागण एकेकाळी इंग्रजीतही झाले असावे असावे असे वाटते. (केवळ अंदाज)

माझे अजून मत पक्के नाही. मात्र, तुर्तास तरी मला सरकारी नियम समितीपेक्षा असे नियम 'फ्लेक्सिबल' नसण्याचा दोष वाटतो.

काहिसे अवांतर:
बहुदा सर्वसामान्यांना या शुद्धलेखनाचे वावडे नाही. मात्र (तथाकथित) अशुद्ध लिहिण्याला कमीपणा चिकटवल्याने शुद्धलेखनाची हेटाळणी सुरू झाली असावी. 'कोणे एके काळी' बनलेल्या अप्रवाही नियमांना कवटाळून तथाकथित शुद्ध लिहिणारे जेव्हा स्वतःला थोर समजु लागले तेव्हा 'तितके' शुद्ध न लिहु शकणारे बहुसंख्य असल्यास ते अश्या नियमांची टवाळी करणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रमाणीकरणाबाबत माझ्या एका लेखाचा दुवा :
भाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे
यात इंग्रजीच्या प्रमाणीकरणाबाबत ऐतिहासिक आढावा आहे.

अमेरिकेने ही 'ब्रिटिश शुद्धलेखनाची' जोखडे ज्या जोमाने झुगारली आहेत ते पाहता बहुदा या अप्रवाही नियमांची लागण एकेकाळी इंग्रजीतही झाले असावे असावे असे वाटते. (केवळ अंदाज)

अमेरिकेत देखील इंग्रजी लेखनासाठी प्रमाण आहे. ब्रिटिश प्रमाणाच्या अंतर्गत आहे, पण अमेरिकन प्रमाणावेगळे आहे, असे लेखन अमेरिकेतील बिगरललित प्रकाशनांत अप्रस्तुत मानले जाते. अमेरिकेने प्रमाणाची जोखडे झुगारलेली नाहीत. म्हणजे "ब्रिटिशांच्या साखळ्या तोडल्या म्हणून अमेरिकन/ब्रिटिश दोहोंपैकी वाटेल तसे लिहा" असे म्हणता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी शुद्धलेखन-नियमावलीतील नियम १४ पाहावा. त्यातील अखेरचे वाक्य असे आहे: कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.

तत्समांची व्याप्ती आणि देवनागरीतील मराठीच्या लेखनातील उच्चारानुसारित्व यांबाबत ऊहापोह इथे करणार आहे.

संस्कृतातून आलेल्या शब्दांनाच मात्र तत्सम म्हणावे की अरबी, फ़ारसी, तुर्की, पोर्तुगीझ, जर्मन, फ्रेंच, उर्दू इत्यादी भाषांतून येणार्‍या शब्दांनाही तत्सम का म्हणू नये असा माझा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, हकीकत हा शब्द घ्या. शेख [(२०१७: ४०६)] नुसार तो हकिकत असा लिहावा. मुळात अरबी-फ़ार्सी-उर्दूत याचे स्पेलिंग حقیقت असे आहे. त्याचे शक्य तितके यथावस्तु लिप्यन्तर करावे तर हकीकत असे मराठी देवनागरीत हाती लागते. अशा परिस्थितीत हकीकत हे लेखन योग्य ठरावे.

परन्तु शेख (२०१७) यांच्या लेखनामागील कारणमीमांसा काय असावी? मला वाटतं त्यांनी या शब्दाला तद्भव मानले असावे. कारण वर म्हंटल्याप्रमाणे शक्य तितके यथावस्तु असे हे लिप्यन्तर होय. मुळातील क़ हा पडजिभेच्या स्पर्शाने उच्चारला जाणारा वर्ण मराठीत नाही त्यामुळे तो शब्द जशास तसा काही मराठीत येणे शक्य नाही, तेव्हा तो कण्ठ्य स्पर्श म्हणून मराठीत येत आहे. मग अशाप्रकारे त्याला तद्भव ठरवलेले असावे. आणि तो अन्त्य, उपान्त्य स्वर नसल्याने त्याला ह्रस्व केले असावे.

यात दोन बाबी आहेत. एक, अशा प्रकारे तत्सम, तद्भवाची व्याप्ती अरबी-फ़ारसी शब्दांना लावावी का? लावल्यास कोणत्या भागात बदल झाल्यास त्यांना तत्सम मानावे. कारण आपण ज्यांना कथित तत्सम शब्द मानतो ते काही त्यांच्या समग्र यथामूल संस्कृत स्वररचनेसोबत मराठीत शिरत नाहीत. ते मराठीच्या ध्वनिव्यवस्थेला न जुमानता काही मराठीत येत नाहीत. ते शब्द हे मराठीच्या स्वनव्यवस्थेला बांधील असतातच. तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील.

पण तत्समांचे लेखनव्यवस्थेत समर्थन करायचे झाल्यास असे करता येईल : स्वनव्यवस्थेत काय होते हा मुद्दा गौण. मराठी आणि संस्कृत यांच्या देवनागरीकरणात जिथे जिथे शक्य तिथे तिथे समानता पाळावी हे खरे तत्समांचे गमक मानावे लागेल. माझा मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये. हे एकदा स्पष्ट केले की संस्कृत तत्समांची संगती लागते.

आता पाळी अरबी-फारसी-तुर्की तत्समांची. या भाषांतून मराठीत भरघोस उसनवारी झालेली आहे, कालौघात अर्थांमध्ये भेदही उत्पन्न झालेले आहेत. मराठीच्या देणार्‍या भाषा म्हणून त्या भाषांचे स्थान निर्विवाद आहेच. (अर्थात कमी शब्दांची उसनवारी ज्या भाषांतून झालेली आहे त्यांच्याबाबतीत काय करावे, त्यांना तत्समत्व द्यावे की कसे हा मुद्दा चर्च्य आहेच!) तेव्हा त्या भाषांतून मराठीत आलेल्या शब्दांचे लेखनही यथामूल किंवा जेवढे शक्य तेवढे मुळानुसार व्हावे, अर्थात तत्समाचा नियम न्याय्यपद्धतीने या भाषांतून येणार्‍या शब्दांनाही लागू करावा.

अर्थातच देवनागरी आणि नस्ख़ व नस्तअ़लिक़ (अरबी-फारसीच्या लिप्या) यांच्यात एकास एक पद्धतीने मेळ नाही. तसा मेळ बह्वंशी संस्कृत-मराठीत गृहीत धरला जातो कारण लिपी थोड्याफार फरकाने एकच - देवनागरी. नस्ख़मधील शब्दांचे मराठी देवनागरीत रूपान्तर कसे करावे, याचे शिस्तीत नियम करणे आवश्यक आहे. तो ऊहापोह इथे न करता काही उदाहरणे देऊन मुद्दा उपस्थित करतो. खुद हा शब्द फ़ारसीत خود असा लिहिला जातो. फ़ारसीत त्याचा उच्चार ख़ोद असा होतो. मात्र तो शब्द उर्दूत ख़ुद असा उच्चारतात. याचे लेखन मराठीत कसे करणार? अर्थात मराठीत खुद्द असा शब्द असल्यान हा प्रश्न तितकासा प्रस्तुत ठरणार नाही, आणि खुद लिहिण्याचा प्रसंग तसा विरळाच यावा. तर, खु़शी हा शब्द फ़ारसी-उर्दूत असा लिहितात - خوشی . ख़ूशी हे माझ्यामते यथामूल लिप्यन्तर ठरावे. पण याला आपण तद्भव ठरवून मराठीच्या नियमानुसार खुशी असे करून घेऊ शकतो. पण काही शब्द असेदेखील आहेत ज्यात स्वनसाधर्म्य आहे, लिप्यन्तर शक्य आहे तरीही त्यांना तद्भव मानलेले आहे. उदा. वकील. याची सामान्यरूप सर्रास वकिलाने, वकिलांची इत्यादी होताना दिसतात. [पाहा शेख (२०१७: ३०८)]. अर्थातच वकील या शब्दाला आपण सरसकट मराठी मानलेले आहे. तर अरबी-फारसी शब्दांना तत्समाचा नियम का न लावावा, लावल्यास वकील आणि तत्सदृश शब्दांना तत्सम मानावे की तद्भव असा प्रश्न आहे. मज़कूर, कबूल, गरीब, रतीब, हुजूर, हुकूम, माहीर [माहिर का नाही? ], जाहीर [जाहिर का नाही?], महसूल इत्यादी शब्दांची सामान्यरूपे आपण ते शब्द तद्भव असल्यागत करतो. याबाबत म्हणजे अरबी-फ़ारसी शब्द हे तत्सम मानावेत की नाही, व का याबाबत काही चर्चा झाली आहे का? कृपया सन्दर्भ द्यावेत.

माझ्या मते मराठीने संस्कृताकडून उसनवारी केलेली आहे, तशीच अरबी-फ़ारसीकडूनही केलेली आहे. तेव्हा तत्समाचा न्याय उभयत्र सारखाच करायला हवा आणि अरबी-फ़ारसी शब्द देखील यथामूल लिहावेत असा न्याय्य नियम हवा होता परंतु संस्कृत शब्दांना एक न्याय आणि संस्कृतेतरांना दुसरा असा परापरभाव लेखनव्यवस्थेत दिसून येतो. अर्थातच धर्म, भाषिक निष्ठा, शुद्धता, मराठीत अरबी-फ़ारसी शब्दांचे रुळलेले असणे इत्यादी कारणे त्यामागे असू शकतात. त्याबाबत सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे.

टीप
१. मूळ अरबी लेखन अनुसरल्यास जाहिर, माहिर ह्रस्व लिहिणे तत्समत्वाला धरून राहील.

सन्दर्भ
शेख, यास्मिन (२०१७) मराठी शुद्धलेखनकोश. पुणे: हर्मिस प्रकाशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अ)….नियम १४ पाहावा. त्यातील अखेरचे वाक्य असे आहे: कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.

(ब) माझा मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये.

(१) इथे विसंगती नाही का? जर उच्चारानुसारित्वाचे दाखले ग्राह्य धरणार नसाल तर चौदावा नियम वापरणार कसा?

(२) चौदाव्या नियमामुळे उद्भवणारी आणखी एक अडचण म्हणजे ‘बोनाफाईड’, ‘प्लासिबो’ हे शब्द लॅटिन उच्चारांनुसार ‘बोना फीडे’, ‘प्लाकेबो’ असे लिहावे लागतील आणि ते डोळ्यांना खुपेलच खुपेल. मग काय करणार? ह्या शव्दांना सर्वमान्य एतद्देशीय पर्याय नाहीत, त्यामुळे ते लिहावे तर लागतीलच.

(३) ’अन्य भाषेतील शब्द’ ही कल्पना तितकीशी सोपी नाही. Restaurant हा शब्द फ्रेंच भाषेतील समजणार की इंग्रजी? त्यामुळे उच्चारात फरक पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मुद्दा क्र. २ व ३ बद्दल: मूळ शब्द ग्रीक किंवा लॅटिन किंवा अन्य कुठल्याही भाषेतला असूदे. तो मराठीत जर इंग्लिशमार्फत आलेला असेल तर त्याचे मराठी स्पेलिंग इंग्लिशधार्जिणे करावे, सिमिलरली अन्य कुठल्याही भाषेतील शब्दाबद्दल हे असेच सांगता यावे.

त्यातही समजा एखादा शब्द मराठीत आल्याला खूप काळ लोटला असेल तर त्यात जुना मराठी अपभ्रंशच ग्राह्य धरण्यात यावा.

असे नियम केले तर हा तिढा सुटेलसे मला वाटते. जाणकारांनी आपले मत द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपणच उत्तर दिलेलं आहे. मुळात इतर भाषांतले उच्चार (होय अगदी संस्कृताचे उच्चारदेखील) पाहून आपण सर्वस्वी लेखन (स्पेलिंग) ठरवत नसतो. उच्चार आणि त्या भाषेच्या लिपीतील घटक (मुद्दाम स्वनीम, अक्षर हे शब्द टाळत आहे कारण चित्रलिपीदेखील आहेतच, त्यांचे लिप्यन्तर किंवा उच्चारानुसारी इत्यादी खूपच किचकट जाणार!) या मेळ आपण मराठी कसे घालतो आणि आपल्या मनात त्या भाषेतील उच्चाराची कोणते प्रतिरुपण उभे राहते व ते अन्ततः आपण आपल्या स्वीकृत देवनागरीत मराठीमध्ये कसे उतरवतो यावर आपले स्पेलिंग अवलंबून असते. तेव्हा सर्वस्वी त्या भाषेतील उच्चार असा सरळ मार्ग खरंतर उपलब्धच नाहीये!

मुळात इंग्रजी शब्दांचे अचूक उच्चार मराठी माणसाला ठाऊक असावेत ही अपेक्षादेखील तशी अवाजवी आहे. अर्थात जाणकराकडून उच्चार समजून जरी घेतला तरी आपल्या देवनागरीच्या चौकटीत तो मांडणे हेदेखीलाअह्वानच आहे. लन्दनचे लंडन आपल्या डोळ्यांदेखत झाले आहे. शिवाय इंग्रजीत टवर्गीय व्यंजने नाहीत, आहेत ती मूर्धन्य नसून दन्तमूलीय आहेत तेव्हा टोमॅटो, टाईम के केवळ यथाशक्य जवळचे लिप्यन्तर होय, ते काही परिपूर्ण उच्चारानुसारी लेखन नाही. त्यामुळे उच्चाराला धरून करण्याच्या आपल्या आग्रहाला तशा मर्यादा आहेतच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> आपणच उत्तर दिलेलं आहे. 

असे मला वाटत नाही. निदान आपण जो घोळदार परिच्छेद लिहिला आहे, त्याचा माझ्या प्रश्नांशी काहीही संबंध दिसत नाही.

> जयदीप चिकलपट्टी यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद….

‘सर्वस्वी त्या भाषेतील उच्चार’ हा मार्ग उपलब्ध नसेलही, पण याचा अर्थ असा नव्हे की ‘चिपलकट्टी’ हा मूळचा कानडी उच्चार मराठीत ‘चिकलपट्टी’ असा लिहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

एक युक्तिवाद समजलेला नाही :

ते मराठीच्या ध्वनिव्यवस्थेला न जुमानता काही मराठीत येत नाहीत. ते शब्द हे मराठीच्या स्वनव्यवस्थेला बांधील असतातच. तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील.
पण तत्समांचे लेखनव्यवस्थेत समर्थन करायचे झाल्यास असे करता येईल ... हे एकदा स्पष्ट केले की संस्कृत तत्समांची संगती लागते.

या विधानक्रमातून असे जाणवते, की "तेव्हा सारेच संस्कृत शब्द हे तद्भव होऊन बसतील." हे स्वयंस्पष्ट अनर्थक (absurd) असल्यासारखे वापरलेले आहे. त्यापुढे "पण... समर्थन करायचे झाल्यास" रचनेमुळे असे वाटू शकेल, की पुढे समर्थन करायचे झाल्यासच्या पर्यायाबद्दलही चिंतन होणार आहे. परंतु ते होत नाही, म्हणजे आदल्या परिच्छेदात त्या पर्यायाची अनर्थक म्हणून वासलात लावली असावी... असाच युक्तिवाद असावा.

---
ही नियमावली लिहिली गेली, तेव्हा वृत्तपत्रीय लेखक किंवा प्रमाणलेखनाबाबत आस्था असलेल्या लोकांपैकी बहुतेकांची शालेय शिक्षणात संस्कृतशी थोडीफार ओळख झालेली असावी. नियमावलीच्या अपेक्षित वाचकवर्गाला एखादा शब्द तत्सम आहे की तद्भव हे ओळखण्याकरिता संस्कृतच्या ज्ञानाचे साहाय्य घेता येत असे. अमुक कुठला शब्द जवळजवळ तसाच संस्कृत साहित्यातही दिसतो का? अशी चाचणी ते करू शकत असत. ही चाचणी करताना विवक्षित दुर्लक्षे करणे त्यांना सवयीचे होते : (१) मराठी स्वनव्यवस्थेत नसलेले उच्चार (ऋ, वगैरे), (२) ऱ्हस्व-दीर्घता (भीति, वगैरे), आणि (३) मराठीत अंत्य-अकार निभृत असला , पण संस्कृतात उच्चारित असला तरी चाचणीसाठी दुर्लक्ष करावे (स्तर, वगैरे).
मी स्वतः शालेय संस्कृतशिक्षणामुळे काहीसा त्या पिढीतला ठरतो, आणि तत्सम वा तद्भव ठरवण्याकरिताचे माझे वैयक्तिक मनोव्यापार सांगत आहे. त्या काळात शिकलेले लोक खरोखरच अशा काही गर्भित मानसिक चाचण्या करतात का? हे निश्चित ठरवण्याकरिता व्यवस्थित सर्वेक्षण करावे लागेल.

माझे असे प्रतिपादन आहे, की आज वर्तमानपत्रात, वा अन्य प्रमाणमाध्यमात लिहू बघणाऱ्यांपैकी जे मराठी स्वभाषक आहेत, मराठीत अभिव्यक्तिकुशल आणि प्रतिष्ठित आहेत, त्यांच्यापैकी कित्येक जणांना संस्कृत साहित्याचा फारसा परिचय नसतो. अशा परिस्थितीत तत्सम कुठले आणि तद्भव कुठले अशा याद्या पाठांतर केल्याशिवाय जमायच्या नाहीत.

>> लेखनाचे नियम हे केवळ लेखनाचे नियम म्हणून पाहावेत, उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा मराठीचे लेखननियम सांगताना देऊ नये. <<
हे सामान्यत्वाने सत्य आहे, तत्समांकरिता आणि तद्भवांकरिता वेगवेगळ्या प्रमाणाने सत्य नव्हे. या अतिव्यापक सत्यामुळे संस्कृत तत्समांची सोय लागते, हे मला पटलेले नाही.

उगाच उच्चारानुसारित्वाचे पोकळ दाखले, कारणमीमांसा न देताच प्रतिष्ठित-मराठीभाषकांचा-भाषाव्यवहार हेच प्रमाण मानून सर्व मराठी शब्दांचे नियम केवळ लेखनाचे नियम म्हणून लागू करावेत. सर्व म्हणजे काय? संस्कृत-अनभिज्ञ मराठीभाषकाला अगम्यसा तत्सम-तद्भव भेद उगीच मध्ये आणू नये.

---
मला असे वाटते, की नियमावलीतील नियम १४मधील अखेरचे वाक्य मराठी-वाचकाला-मराठी-म्हणून-अपरिचित अशा शब्दांकरिता आहे. त्यांनी उदाहरणे दिली असती, तर त्यांचा निर्देश अधिक स्पष्ट झाला असता. (माझ्य मते पेरेस्त्रॉयका, सायोनारा, वगैरे, शब्दांकरिता ते वाक्य लागू आहे. खुशी, हकिकत करिता नव्हे.)

फारसी-अरबी-उद्भव मराठीत रूढ झालेल्या शब्दांबाबत काय करावे, याबाबत नियमावलीत स्पष्ट नियम नाहीत. नियमपाठ्यातील वापरावरून काही उदाहरण-म्हणून-निर्देश मिळतो का, असे बघण्याची पाळी येते! परंतु नियमलेखकांनी फारसी-अरबी-उद्भव शब्द क्वचितच वापरलेले आहेत, त्यामुळे उदाहरणे थोडीच आहेत.
गरीब-गरीबास, वकील, वसूल-वसुलाची, तालीम-तालिमीचा-तालिमेत, हरकत,
(फार, दौरा, दंगा, बेरीज या शब्दांची व्युत्पत्ती मला ठाऊक नाही.)

एक रुळलेला इंग्रजी-उद्भव शब्द उदाहरणांत दिसतो - फाईल-फायलीत

यावरून असे दिसते, की अशा प्रकारचे शब्द तद्भव (खरे तर तत्सम-तद्भव असा कुठलाही फरक न करता, मराठीच) मानण्याकडे नियमलेखकांचा कल दिसतो. आणि तत्सम-तद्भव असे वेगळे नियम न केल्यामुळे कोणाचा गोंधळ झाल्याचे, काही अरिष्ट घडल्याचे, कोणी तक्रार केल्याचे माहीत नाही. म्हणजे तत्सम-तद्भव अशी संकल्पना जिथे वापरली, तिथे वापरल्यामुळे मराठी-स्वभाषकांचा गोंधळ होतो, आणि जिथे वापरली नाही, तिथे न-वापरल्यामुळे काहीच तक्रार नाही, अशी तथ्यातली परिस्थिती आहे. तर मग अनुभवातून सिद्ध होते, की अन्य भाषांशी नाते असलेल्या शब्दांबाबत तत्सम-तद्भव ही संकल्पना बोजड आहे, ती त्यागून आपले नियम सुटसुटीत आणि व्यवहार्य होतील.

अरबी-फारसी-इंग्रजी-व्युत्पन्न शब्दांतही तत्समे कल्पून वेगळे लेखननियम लागू करण्याऐवजी संस्कृत-व्युत्पन्न शब्दांबाबत तत्सम-संकल्पना बाद करणे सोयीचे होईल. If it ain't broke, don't fix it. And if it works, fix something that is broken using its example.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ आणि प्रचलित या द्वंद्वात प्रचलितचंच पारडं जड होणार हे व्यवहारिक सत्य आहे.
फ्रेंचला फ्रेंचमधे फ्रांसे म्हणतात, आणि जर्मनचं जर्मन नाव डॉइच आहे हे कळलं म्हणून आपण लगेच ते शब्द थोडेच आपलेसे करतो ?
आणि दुसरा मुद्दा लिपीच्या मर्यादांचा.
विशेषनामांच्या विशेषतः भौगोलिक नावांच्या बाबतीत मूळ किंवा स्थानिक उच्चार ग्राह्य धरावेत हा आग्रह युनोनेही मान्य केला. त्याची लिंक https://unstats.un.org/unsd/publication/seriesm/seriesm_88e.pdf.
रोमन लिपीत वेगवेगळ्या भाषांतील भूप्रदेश, नैसर्गिक स्त्रोत आणि मानवी वस्तीची – गावापासून ते राजधानीपर्यंत – नावे त्यात्या देशातील अधिकृत समितीने कळवावीत व प्रमाणीकरणाला चालना मिळावी हा उद्देश आहे.
पेकिंग ~ बीजिंग हा बदल रोमन लिपीत ते नाव कसे असावे हे चीनने सांगितल्यामुळे झाला.
ब्रिटिशांनी केलेले कित्येक अपभ्रंश आपण लवकरच सुधारले, तरी पूनाचं अधिकृतपणे पुणे व्हायला १९७४ उजाडलं. Trivendrum चं जेव्हा Thiruvananthapuram झालं, त्याचा उच्चार देवनागरीच्या साहाय्याने व मराठी उच्चाराच्या धाटणीने आपण त्रिवेंद्रम / तिरुअनंतपुरम असा उच्चारू पाहतो. रोमन लिपीत h घालण्याची गरज खरं तर मलय भाषकांना पडू नये कारण त्यांच्या लिपीत देवनागरीसारखीच सर्व व्यंजने आहेत. तमिळमधे जसं क ख घ घ साठी एकच अक्षर अशी स्थिती नाही. पण उच्चारणाचे केरळी वास्तव खूप गुंतागुंतीचे आहे. स्वरांच्या बाबतीत अ चा उच्चार ए च होण्याकडे कल आहे. तिरुअनंतपुरम हे कानाला दिरवैनंदबुरम् असे ऐकू येते. उ कडून ए कडे जाताना अपरिहार्यपणे व हा अर्धस्वर उच्चारला जातो. ज्याप्रमाणे तमिळ लोक स्वतंत्र अक्षराचा उच्चार कठोर न करता मृदु करतात आणि मग शब्दामधे तो कठोर अपेक्षित असेल तर रोमन लिपीत h घालतात त्याचा प्रभाव की काय असे ते स्पेलिंग बनते. मग जो तो आपल्या चष्म्यातून रोमन लिपीचा उच्चार करता होतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेंचला फ्रेंचमधे फ्रांसे म्हणतात, आणि जर्मनचं जर्मन नाव डॉइच आहे हे कळलं म्हणून आपण लगेच ते शब्द थोडेच आपलेसे करतो ?

खुद्द संस्कृतला आपण गीर्वाण म्हणून थोडेच संबोधतो, असे म्हणून दुजोरा देणार होतो, परंतु ते फारच ऑब्व्हियस नि घिसेपिटे उदाहरण झाले असते, म्हणून आवरते घेतले.

मात्र, वरती या प्रतिसादात खुद्द श्री. जयदीप चिपलकट्टी यांनी कन्नडला कानडी असे संबोधून बहार आणली आहे, तथा आपल्या मुद्द्यावर अधिक प्रभावीपणे प्रकाश पाडला आहे.

(अवांतर: उद्या श्री. बाळ ठाकऱ्यांचे भूत येऊन जर (१) मुंबईचा उल्लेख आवर्जून नि अट्टाहासाने 'बाँबे' म्हणून करू लागले, नि (२) मुंबईचा उल्लेख 'बाँबे'व्यतिरिक्त इतर काहीही - आणि विशेषेकरून 'मुंबई' असा - करणाऱ्यास रस्त्यात गाठून (जातीने स्वतः वा शिवसैनिकांमार्फत) बदडू लागले, तरी तेही निर्विकारपणे पाहण्याची मनाची तयारी करून ठेवलेली आहे. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेदार चर्चा आहेत.
आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं प्रमाणिकरण करून तेच वापरायचा पायंडा पडण्याची शक्यता अजिबात नाही.
२) तसे प्रयत्न झाले तर चार राजकीय पक्ष ते प्रयत्न हाणून पाडतात.
३)बॅाम्बे हे नाव इंग्रजांनी पाडलेले नाहीच. पुर्वी सात कोळीवस्तींची बेटं जोडून एक मोठं बेट झालं. पोर्तुगिजांनी सुरत आणि सालसेटनंतर Bom Bem = good harbour म्हणून इंग्रजास आंदण दिले. गुजरात्यांनी त्यास बहुतेक मोंबई ( citation needed) म्हटले.
४)इतर भाषांतील शब्दांचा वाद निरर्थक वाटतो.
५)उगाच हा शब्द ऊगाच असा लिहिला नाही म्हणजे खूप झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0