नैसर्गिक शेती - भाग ७

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे
वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.

...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...
नैसर्गिक शेती म्हणजे नेमके काय? वनस्पतींच्या नैसर्गिक वाढीत सहभागी असलेल्या प्रक्रियांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून त्यांची परिणामकारकता वाढवून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे नैसर्गिक शेती.
यामध्ये मुख्यतः तीन गोष्टी आहेत.
एक म्हणजे मातीतील जीवाणू आणि वनस्पतींमध्ये जे परस्परावलंबित्वाचे नाते आहे (संदर्भ – लेख ४), त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर व्हायला हवा.
दुसरे म्हणजे हा फायदा फक्त आपण लावलेल्या पिकाला मिळायला हवा, त्याचा फायदा घेऊन आगंतुक तण वगैरे वाढता कामा नये.
तिसरे म्हणजे आपण लावलेल्या पिकातून मिळणारे उत्पादन आपल्याला मिळायला हवे, कीटक, पक्षी, वगैरे आयतोबांवर मात करता यायला हवी.
आपल्या परिसंस्थेतील सजीवांच्या अन्नसाखळीचा, त्यांच्या एकमेकांवर असलेल्या अवलंबित्वाचा या तीन दृष्टिकोनांतून विचार करत गेले, की आपल्या शेतीसाठी कोणती नैसर्गिक शेती पध्दती योग्य आहे, याचा आपला आपल्याला शोध लागत जातो. वरील तीन तत्वे डोळ्यापुढे ठेऊन आपल्या शेताच्या निरीक्षणातून प्रत्येक शेतकरी आपली-आपली पध्दत विकसित करू शकतो. पण ज्ञान मोकळेपणाने सर्वांना वाटण्याची आपली परंपरा नसल्यामुळे म्हणा, किंवा स्वतः अवलंबत असलेल्या पध्दती यशस्वी होण्याची नेमकी कारणे काय हे माहित नसल्यामुळे म्हणा, काही लोकांनी नैसर्गिक शेतीभोवती एक गूढतेचे वलय निर्माण केले आहे. स्वतःचे डोके वापरण्यापेक्षा एखाद्या गुरूला शरण जाणे सोपे असल्यामुळे शेतकरीही या सापळ्यात सापडत गेले आहेत. या व पुढील लेखांमध्ये आपण वरील तिन्ही तत्वांची आणि त्याबाबत असणाऱ्या गैरसमजांची चर्चा करू या.
लेख ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जीवाणू जमिनीतील खनिज पोषणद्रव्ये पाण्यात विद्राव्य स्वरूपात उपलब्ध करून देतात, आणि वनस्पती जीवाणूंना कर्बयुक्त अन्न पुरवतात. रासायनिक तसेच सेंद्रीय शेतीतून हे दिसून आले आहे, की पाण्यात विद्राव्य स्वरूपातल्या पोषणद्रव्यांची जमिनीतील मात्रा वाढली, तर वनस्पतींची वाढ अधिक जोमाने होते, आणि त्या पिकाचे उत्पन्नही वाढते. याचाच अर्थ असा, की जमिनीतील जीवाणूंनी अधिक कार्यक्षमतेने आणि वेगाने अविद्राव्य खनिजांचे रूपांतर विद्राव्य पोषणद्रव्यांमध्ये केले, तरी बाहेरून खते घालण्याचा जो अनुकूल परिणाम होतो, तो खते न घालता साध्य होईल. मातीतील जीवाणूंची सुदृढता आणि संख्या वाढली, तर हे घडू शकते. मातीतील जीवाणूंची वाढ किती होणार ह्यामधला नियंत्रक घटक आहे, जीवाणूंना उपलब्ध असलेली कर्बोदके.
आज हे खाद्य कोणकोणत्या माध्यमातून जीवाणूंना मिळते आहे. माझे वडील आनंद कर्वे यांच्या निरीक्षणांमधून आणि संशोधनातून अनेक विस्मयकारक गोष्टी पुढे आल्या आहेत.
सर्व वृक्ष आपली पाने जमिनीवर टाकतात. ही पाने वाळलेल्या पाचोळ्याच्या रूपाने जमिनीवर पडतात आणि ती तिथेच कुजतात. वनस्पतिभक्षक वाळलेला पाचोळा खात नाहीत, कारण गळणा-या पानांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टॅनिन आणि तत्सम पदार्थ साठविलेले असतात की ही गळलेली पाने त्यांना पचवताच येत नाहीत. पानांप्रमाणेच वनस्पतींची फुले व पाकळ्याही जमिनीवर पडतात. पारिजात, बकुळ, पांढरा चाफा, कॉपर पॉड इ, वृक्षांखाली पडलेली फुले आपण पहातो. वाळलेली पाने आणि फुलांच्या पाकळ्या या दोन्ही पदार्थामधील सेल्युलोज या कर्बोदकाचा जीवाणूंना अन्न या नात्याने उपयोग होतो. मोहाच्या पाकळ्यांमध्ये तर शर्कराही असते. फुलांच्या पाकळ्या आणि वाळलेलला पाचोळा यांच्यात खनिज घटकांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे या पदार्थांचा उपयोग केवळ कार्बनचा स्रोत म्हणूनच होतो, आपल्या वाढीसाठी लागणारे खनिज घटक जीवाणूंना मातीतूनच मिळवावे लागतात.
अनेक वनस्पतींच्या पानांमधून रात्रीच्या वेळी जमिनीवर पाणी ठिबकते आणि या पाण्यातही काही कर्बोदके विरघळलेली असतात. उदा. ज्वारीच्या पानांमधून ठिबकणा-या पाण्यात साखर विरघळलेलेली असते तर हरभ-याच्या पानांतून ठिबकणा-या पाण्यात मॅलिक आम्ल हे सेंद्रिय आम्ल असते. हे दोन्ही घटक या वनस्पतींनी प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वतः निर्माण केलेले असतात आणि पानांमधून ठिबकणारे पाणी त्यांनीच जमिनीतून कित्येक डेसिमीटर खोलीवरून खेचून वर आणलेले असते. त्यामुळे इतक्या परिश्रमांनी मिळविलेले हे घटक वनस्पती जमिनीवर का टाकतात हे पाहण्यासाठी आनंद कर्वे यांनी एक प्रयोग केला. त्या प्रयोगात प्रथम एक किलोग्रॅम माती घेऊन तिला निव्वळ पाणी दिले, आणि तिच्यात प्रति ग्रॅम किती जीवाणू आहेत ते पाहिले. मग थोड्याशा पाण्यात केवळ अर्धा ग्रॅम साखर विरघळवून ते पाणी या मातीत मिसळले आणि चोवीस तासांनी त्याच मातीतल्या जीवाणूंची गणना केली. या दुस-या गणनेत जीवाणूंची संख्या पाचशे पटींनी वाढलेली दिसली. या प्रयोगाने कर्बोदकांमुळे मातीतल्या जीवाणूंची वाढ होते हे तर सिद्ध झालेच, पण हे जीवाणू आपल्या वाढीसाठी लागणारे खनिजघटक मातीतून घेऊ शकतात याचाही या प्रयोगाद्वारे पुरावा मिळाला, कारण शुद्ध साखरेत कोणतेच खनिज घटक नसतात.
वनस्पतींनी निर्माण केलेली साखर मातीत मिसळण्यासाठी त्यांना मावा या कीटकाचीही मदत होते. मावा ही कीड लागवडीखालील सर्व वनस्पतींवर तर आढळतेच पण जंगलात वाढणा-या वनस्पतींवरही ती आढळते. अगदी सूचिपर्णी वृक्षांवरही मावा आढळतो. हा कीटक आपली सोंड वनस्पतीच्या अन्नवाहक नलिकेत खुपसून तिच्यातून अन्न शोषून घेतो. वनस्पतींवर आढळणारा मावा हा मादी कीटक असतो. ही मादी वनस्पतींवरच आपले प्रजनन करते. प्रजनन करणा-या सर्व मादी कीटकांना प्रथिनांची अधिक प्रमाणात गरज पडते. त्यानुसार ही मादी वनस्पतींमधून शोषून घेतलेल्या अन्नातून मुख्यतः प्रथिने आपल्या शरिरात ठेवून घेत अतिरिक्त शर्करा आपल्या शरिरातून बाहेर टाकते. ही शर्करा खालच्या पानांवर आणि जमिनीवरही पडते. शेतकरी या शर्करेला चिकटा असे संबोधतात. म्हणजे वनस्पतींवर येणारे सर्व कीटक उपद्रवीच असतात, असे नाही.
आपण जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना संपूर्णपणे दुर्लक्षित करून शेतातल्या वनस्पतींना लागणारी खनिजद्रव्ये ही रासायनिक खते, कंपोस्ट खत, शेणखत किंवा गांडूळ खत या रूपात मोठ्या मात्रेने थेट जमिनीतच घालतो. ही पद्धती खर्चिक तर आहेच पण अनावश्यकही आहे. आपले शेत जर पाणथळ नसेल तर त्यातल्या मातीत नक्कीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजंतू वास करीत असणार. अशा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आपल्याला फक्त या जीवाणूंची संख्या वाढवावयाची आहे आणि त्यासाठी त्यांना उच्च पोषणमूल्य असलेल्या कार्बनयुक्त अन्नाचा पुरवठा करणे आवश्यक आहे. हे अन्न आपण अगदी सहज उपलब्ध असणा-या कर्बोदकांच्या स्वरुपात देऊ शकतो, आणि त्याची मात्रा अन्य खतांच्या मानाने फारच कमी, म्हणजे प्रति हेक्टर आणि प्रति महिना सुमारे दहा किलोग्राम साखर, स्टार्च, कोणत्याही गळित धान्याची पेंड, किंवा सुमारे पन्नास किलोग्रॅम हिरवी पाने (साधारण वीस टक्के भाग कर्बोदक या स्वरूपात असतो, म्हणून) इतकी कमी असली तरी चालते. खरकटया अन्नाचा जर आपण वापर करत असलो, तर तेही याच प्रमाणात घालायला हवे, म्हणजे एक हेक्टर शेताला दर महिन्याला फक्त साधारण पन्नास किलोग्राम खरकटे अन्न मिळायला हवे, कारण शिजवलेल्या अन्नात साधारण नव्वद टक्के पाणी आणि दहा टक्केच कर्बोदके असतात.
या शेतीपद्धतीत आपण मातीत उपलब्ध असणारी नैसर्गिक खनिजेच वनस्पतींच्या पोषणासाठी वापरीत असल्याने (विशेषतः सेंद्रीय शेतीच्या खंद्या समर्थकांकडून) एक प्रश्न असा विचारला जातो, की या कृषिपद्धतीमुळे जमिनीतली खनिजे संपून जाणार नाहीत का? आपल्या शेतात जर मातीचा एक मीटर जाडीचा थर असेल तर आपण सुमारे पंचवीस हजार वर्षे शेती करू शकू इतकी खनिजे त्या मातीत असतात. शिवाय मातीच्या थराखालील खडकातून सतत नवी माती निर्माण होतच असते. त्यामुळे आपल्या शेतातल्या मातीतली खनिजे संपून जातील अशी भिती बाळगण्याची काहीच गरज नाही.
काही वाचकांनी या लेखमालेच्या प्रतिसादात न कुजवलेले खरकटे अन्न कुंड्यामध्ये किंवा बागेत घातल्यावर मुंग्या, झुरळे, उंदीर, इ. चा त्रास होण्याची भीती व्यक्त केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, आपण घालत असलेल्या पदार्थाची मात्रा. हेक्टरला पन्नास किलो यावरून आपण हिशेब काढला, तर प्रत्येक कुंडीत फक्त काही ग्रॅम म्हणजे चमचाभर वगैरे ओल्या कचऱ्याची गरज आहे. सूक्ष्म जीवांना हा खाऊ फस्त करायला एक-दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागत नाही, पण त्यांचे पोट भरल्यावरही कचरा शिल्लक राहिला, तर मात्र तो इतर उपद्रवी पाण्यांना आकर्षित करतो.
नैसर्गिक शेतीत मातीत घालाव्या लागणाऱ्या जैवभाराचे प्रमाण इतके कमी असण्याचे आजच्या घडीला आणखी एक महत्व आहे. पेट्रोलिअम इंधनांवरील आपले अवलंबित्व जर कमी करायचे असेल, तर पर्यायी इंधने देऊ शकेल असा नूतनक्षम ऊर्जा स्रोत म्हणजे जैवभार. आजकाल शेतातल्या काडीकचऱ्यापासून इंधनविटा बनविण्याचा एक नवा व्यवसाय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू झाला आहे. त्यामुळे जो काडीकचरा शेतात पडून कुजायचा किंवा ज्यापासून कंपोस्ट खत निर्माण केले जायचे त्याचा आता औद्योगिक इंधन म्हणून वापर होत आहे. यामुळे आपल्या शेतजमिनीची सुपीकता कमी होईल अशी भीतीही व्यक्त केली जाते, पण ती अनाठायी आहे, कारण वर दिल्याप्रमाणे शेतजमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी अत्यंत कमी जैवभार लागतो. त्यामुळे उपलब्ध जैवभार कुजवून किंवा जाळून त्यातला कार्बन नुसता हवेत परत जाऊ देण्याऐवजी त्याचे पेट्रोलियमला पर्यायी इंधनात रूपांतर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. इंधन जाळले की त्यातला कार्बन हवेत जाणारच आहे, म्हणजे आपण निसर्गातल्या कार्बनचक्रात कोणतीही ढवळाढवळ करत नाही, मात्र त्याद्वारे पेट्रोलिअमचा वापर कमी करून दुहेरी फायदा साधतो आहोत.
जी गोष्ट शेतांची तीच घरांचीही आहे. लहान कुटुंब असेल, कुटुंबात सर्व प्रौढ व्यक्तीच असतील आणि पाहुण्यांचा सतत राबता नसेल, खाण्या-पिण्याचे फार चोचले नसतील, आणि अन्न वाया जाऊ न देण्याचा संस्कार अंगी बाणलेला असेल, तर रोज जेमतेम पन्नास-शंभर ग्रॅम खरकट्या अन्नाचा कचरा तयार होतो. घराभोवती बाग असेल, किंवा बाल्कनीत दहा-बारा कुंड्या असतील, तर त्याची विल्हेवाट सहज लावता येईल. पण जर काही कारणाने रोज साधारण अर्धा किलो किंवा त्यापेक्षा जास्त ओला कचरा तयार होत असेल, तर त्याचा घरच्या घरी बायोगॅस बनवणे जास्त चांगले. अर्थात हा उपाय फक्त उष्ण प्रदेशांतच उपयोगाचा आहे. पण यातून किमान सकाळचा चहा-नाश्ता होण्याइतका गॅस निश्चित मिळतो. आपल्याच कचऱ्याच्या बायोगॅसच्या वापरातून आपण पेट्रोलियम इंधनाचा वापर अंशतः कमी करतो आणि त्यातूनही पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागतो. शहरात बऱ्याच इमारतींमध्ये बाग करता येण्यासारखी व्यवस्था नसते. सर्व रहिवाशांचा ओला कचरा एकत्र करून रोजचा चार-पाच किलो कचरा जमणार असेल, तर त्यातील एक कुटुंब आपला पूर्ण स्वयंपाक बायोगॅसवर करू शकते. यासाठी लागणारे बायोगॅस संयंत्र बाल्कनीतही सहज बसू शकते.
केवळ खरकट्या अन्नावर चालणाऱ्या बायोगॅस संयंत्रातून मळी म्हणून फक्त काळपट रंगाचे पाणी बाहेर पडते, आणि आज बाहेर पडलेले पाणी उद्याच्या कचऱ्याबरोबर परत संयंत्रात घालायचे असते. जर बाग किंवा कुंड्या असतील, तर आठवड्या-पंधरा दिवसांतून एकदा यातले पाणी खताचे पाणी म्हणून देता येईल. म्हणजे यात ऊर्जा आणि खत असा दुहेरी फायदा आहे!
(क्रमशः)
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

या लेखात तुम्ही एकंदरीत जमिनीच्या 'प्रोबायोटिक्स' बद्दल लिहिलंय! तसं असेल तर;
१. आपल्या आहारात यासाठी उत्तम असलेलं दही/ताक न विसरता घ्यावं म्हणतात त्याप्रमाणे जमिनीला असा काय उपाय करता येईल/येतो?
२. जमिनीतली आम्लता, क्षारांचं प्रमाण वगैरेचं मोजमाप करता येतं. त्याप्रमाणे जमिनीतलं सूक्ष्म जीवांचं प्रमाण आणि वैविध्य व्यवस्थित आहे ना याच्या चाचण्या उपलब्ध आहेत का?
३. अर्धा ग्रॅम साखरेने १ किलोग्रॅम जमिनीतले जीवाणू पाचशे पट वाढले त्यामुळे "हे जीवाणू आपल्या वाढीसाठी लागणारे खनिजघटक मातीतून घेऊ शकतात याचाही या प्रयोगाद्वारे पुरावा मिळाला, " लिहीलंय याबद्दल एक प्रश्न. हे 'खनिजघटक' म्हणजे Na, K, Mg, Fe वगैरेंचे पाण्यात विरघळू शकतील असे क्षार का? (अगदी साखरेसारखे नाही तरी मूळाना शोषून घेता येईल ईतपत तरी).
"ही संयुगं ऑक्साईड्स च्या स्वरूपात होती मातीत. पण जिवाणूनी साखर (कींवा अन्य काही आहार) मिळाल्यावर ती क्लोराईड्स/फॉस्फेट्स मधे रुपांतर करून शोषून घेतली आणि जोवाणू मेल्यावर हे घटक आता मुळाना शोषून घेता आले" - is that how it works or is this oversimplification / dead wrong?
४. साखरेबद्दल वाचून मिसळपाव.कॉम या संस्थळावर 'सुरंगी' यांच्या लिखाणात आंब्यांच्या बागेत मध/गूळाच्या पाण्याच्या फवारणीबद्दल उल्लेख आहे त्याची आठवण झाली. यूरिया जसा वापरतात तशीच नियमित 'साखरेच्या' पाण्याचीही फवारणी (योग्य प्रमाणात, योग्य अंतराने वगैरे अर्थात) सरसकट सगळ्या पिकाना फायदेशीर ठरेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

१. आपल्या आहारात यासाठी उत्तम असलेलं दही/ताक न विसरता घ्यावं म्हणतात त्याप्रमाणे जमिनीला असा काय उपाय करता येईल/येतो?

लेखात म्हटल्याप्रमाणे जमिनीला कोणतीही कर्बोदके चालतील.

२. जमिनीतली आम्लता, क्षारांचं प्रमाण वगैरेचं मोजमाप करता येतं. त्याप्रमाणे जमिनीतलं सूक्ष्म जीवांचं प्रमाण आणि वैविध्य व्यवस्थित आहे ना याच्या चाचण्या उपलब्ध आहेत का?

हो आहेत. अगदी महाविद्यालयीन पातळीवरच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळेतही सूक्ष्म जीवांचे मातीतले प्रमाण मोजता येते, तसेच जीवाणू कोणत्या प्रकारचे आहेत, हेही पहाता येते.

३. अर्धा ग्रॅम साखरेने १ किलोग्रॅम जमिनीतले जीवाणू पाचशे पट वाढले त्यामुळे "हे जीवाणू आपल्या वाढीसाठी लागणारे खनिजघटक मातीतून घेऊ शकतात याचाही या प्रयोगाद्वारे पुरावा मिळाला, " लिहीलंय याबद्दल एक प्रश्न. हे 'खनिजघटक' म्हणजे Na, K, Mg, Fe वगैरेंचे पाण्यात विरघळू शकतील असे क्षार का? (अगदी साखरेसारखे नाही तरी मूळाना शोषून घेता येईल ईतपत तरी).
"ही संयुगं ऑक्साईड्स च्या स्वरूपात होती मातीत. पण जिवाणूनी साखर (कींवा अन्य काही आहार) मिळाल्यावर ती क्लोराईड्स/फॉस्फेट्स मधे रुपांतर करून शोषून घेतली आणि जोवाणू मेल्यावर हे घटक आता मुळाना शोषून घेता आले" - is that how it works or is this oversimplification / dead wrong?

कृपया लेख ४ पहावा. त्यात जीवाणू नेमके खनिज घटक किंवा पोषणद्रव्ये कशी मिळवतात, व वनस्पतींना त्यामुळे ती कशी उपलब्ध होतात, हे सविस्तर दिलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर अविद्राव्य स्वरूपात असलेली मातीतली खनिजेही जीवाणू शोषून घेऊ शकतात, आणि त्यांच्या शरीरात या खनिजांचे विद्राव्य स्वरूपाच्या खनिजांत रूपांतर होते. जीवाणूंच्या व जीवाणू खाणाऱ्या इतर सूक्ष्म व लहान सजीवांच्या कलेवरांमधून ही खनिजे मातीतील पाण्यात विरघळतात, व वनस्पतींना मुळांद्वारे शोषून घेता येतात. त्यामुळे तुम्ही दिलेले वर्णन बरोबर आहे.

४. साखरेबद्दल वाचून मिसळपाव.कॉम या संस्थळावर 'सुरंगी' यांच्या लिखाणात आंब्यांच्या बागेत मध/गूळाच्या पाण्याच्या फवारणीबद्दल उल्लेख आहे त्याची आठवण झाली. यूरिया जसा वापरतात तशीच नियमित 'साखरेच्या' पाण्याचीही फवारणी (योग्य प्रमाणात, योग्य अंतराने वगैरे अर्थात) सरसकट सगळ्या पिकाना फायदेशीर ठरेल?

युरियापेक्षाही जास्त फायदेशीर ठरते. मुख्यतः हा खुराक आपण जमिनीतील जीवाणूंना देत आहोत, कोणतेही पीक असेल तरी त्याला त्याचा फायदा मिळणारच आहे, हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.
मातीत ज्या पोषणद्रव्याची कमतरता असेल, त्याची भरपाई करू शकणारेच जीवाणू तिथे तग धरू शकतात. पुरेसे खाद्य मिळाले की त्यांची वाढ होते, त्यामुळे मातीतल्या कमतरतांवरही आपोआपच मात केली जाते. त्यामुळे मातीचे परीक्षण करून, त्याप्रमाणे काही गोष्टी मातीत घालणे वगैरे अशी कोणतीच भानगड करायची गरज नसते. या संपूर्ण प्रक्रियेत मातीत जीवाणू कोणते असावेत यावरही कोणताही निर्बंध नसतो. मातीच्या गुणधर्मांनुसार ते बदलतात. उदाहरणार्थ कोकणातल्या लाल मातीतला फॉस्फरस अविद्राव्य स्परुपात असतो. त्यामुळे अशा मातीत अविद्राव्य फॉस्फरस विरघळवून त्याचे ग्रहण करण्याची क्षमता असणारे जीवाणूच तग धरून राहू शकतात. महाराष्ट्रातल्या काळ्या मातीच्या उच्च आम्लविम्लनिर्देशांकामुळे तिच्यातील लोह आणि जस्त वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नाहीत. पण या मातीतही जीवाणू असतातच आणि त्यांच्यात उच्च आम्लविम्लनिर्देशांकाच्या मातीतून लोह आणि जस्त ग्रहण करण्याची क्षमता असते. जर मातीत नैट्रोजनची कमतरता असेल तर अशा मातीत हवेतील नैट्रोजनचे स्थिरीकरण करणारे जीवाणूच तग घरून राहू शकतील. त्यामुळे यांपैकी कोणत्याही मातीत आपण जर कोणतेही कर्बोदक घातले तर त्या मातीत आधीपासून असणा-या जीवाणूंचीच संख्या वाढते. वनस्पतींना लागणारी सर्व खनिजे जीवाणूंच्या पेशींमध्ये एकदा आली की लेख ४ मध्ये वर्णन केलेल्या अन्नसाखळीद्वारे अंतिमतः मातीत उगवणाऱ्या कोणत्याही वनस्पतीला उपलब्ध होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

अनु रावने म्हंटलंय त्याप्रमाणे माझ्या पहिल्या प्रश्नाचा रोख "मुळात जिवाणू नसले / कमी प्रमाणात असले तर त्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी काय करता येईल / काही करता येतं का?" असा होता. असं दिसतंय की "जिवाणू नाहियेतच असं होत नाही. (साधारण शेतजमिनीचा विचार चाललाय ईथे. वाळवंटाचा नाही) त्याना पुरेसं अन्नं मिळालं (साखर, कर्बोदकं वगैरे स्वरूपात) की त्यांची पुरेशी वाढ होते." बरोबर? मग माझ्या आधीच्या प्रतिसादातल्या दुसर्‍या प्रश्नाचं प्रयोजनच उरत नाही. म्हणजे जिवाणूंचं प्रमाण मोजता येतंय ठीक आहे, पण त्याची गरज नाहीये. ते असतातंच, त्याना योग्य खुराक देउन वाढवायचं.

तुमच्या उत्तरातला शेवटचा परिच्छेद अतिशय महत्वाचा आहे. "कोकणातल्या छान भात पिकवणार्‍या सकस तुकड्यातली माती आणून पुण्यातल्या प्लॉटमधे मिसळली असा प्रकार फायदेशीर ठरणार नाही / इन फॅक्ट करू नये !! त्या त्या ठीकाणच्या मातीतले, त्या मातीतल्या खनिज द्रव्यांचा वापर करू शकण्याची क्षमता असलेले जिवाणू कसे वाढवता येतील (साखर, कर्बोदकं वगैरे वापरून) या कडे लक्ष द्यावं." Did I get it right?

मग आता एक प्रश्न उरतो. समजा अशा जिवाणूंच्या वाढीसाठी आपण नेमाने खुराक देतोय की ज्यामुळे जमिनीतली खनिजद्रव्यं, झाडाना वापरता येईल अशा स्वरूपात रुपांतरीत होतायत. पण मग वर्षाने / पाच वर्षानी मुळात ती खनिजद्रव्यं कमी झाली तर? कारण शेती ही क्लोज्ड सिस्टीम नाहीये. अगदी जरी धाटं कापून जमिनीत पडू दिली तरी कणसं / फळं काढली जातील. म्हणजे कुठल्याही शेतीत कमी/जास्त प्रमाणात खनिजद्रव्यांची गळती सुरू रहाणार.

संपादकः या सुरेख लेखांच्या सुरवातीला ही खालची अनुक्रमणिका जोडाल का? म्हणजे सगळे भाग संकलित रहातील.

नैसर्गिक शेती - भाग १
नैसर्गिक शेती - भाग २
नैसर्गिक शेती - भाग ३
नैसर्गिक शेती - भाग ४
नैसर्गिक शेती - भाग ५
नैसर्गिक शेती - भाग ६
नैसर्गिक शेती - भाग ७

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तयार दुव्यांबद्दल मनःपूर्वक आभार. अनुक्रमणिका या भागात चढवली आहे. लेखमाला पूर्ण झाली की मग आधीच्या भागांत एकदाच पूर्ण लेखमालेचे दुवे चढवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा पध्दतीच्या फोरमचा मी प्रथमच वापर करत असल्यामुळे मला पहिली जी लिखाणाची पध्दत गवसली, त्यानुसार मी लिहित चालले आहे. चूकभूल द्यावी घ्यावी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

चुक अजिबात नाही हो! फक्त अ‍ॅडिशनल सोय आहे.
तुम्ही लिहित रहाच, या सोयी आम्ही करू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

...आणि संपादकाना 'तयार दुवे' देउन यथाशक्ती हातभार आम्ही लाउ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मातीतील खनिजे संपून जातील या शंकेचे उत्तर मी लेखातच दिले आहे, पण इथे पुन्हा एकदा उद्धृत करते -
आपल्या शेतात जर मातीचा एक मीटर जाडीचा थर असेल तर आपण सुमारे पंचवीस हजार वर्षे शेती करू शकू इतकी खनिजे त्या मातीत असतात. शिवाय मातीच्या थराखालील खडकातून सतत नवी माती निर्माण होतच असते. त्यामुळे आपल्या शेतातल्या मातीतली खनिजे संपून जातील अशी भिती बाळगण्याची काहीच गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

सुटलं खरं नजरेतनं! धन्यवाद. तुमचे सगळे भाग लिहून झाले की एकदा शांतपणे सगळे भाग नीट वाचणारे. म्हणजे सलग, पुस्तक स्वरूपात वाचल्याचा फायदा होईल. माझ्या या सगळ्या शंकाना उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद. लख्ख दिलेल्या माहितीबद्दल परत विचारल्यामुळे हे 'कु'शंका वाटली असेल त्याबद्दल दिलगीर आहे!

बाय द वे, लवकरच मिरच्या, टोमॅटो आणि चवळीच्या/तत्सम शेंगा लावायचा विचार आहे. परसात हां, शेताबितात नाही! ईथे तुम्ही देत असलेली माहीती वापरायचा विचार आहे. पॉटींग सॉईल मोठ्ठ्या कुंड्यात भरून त्यात रोपं लावणारे कारण जमीन अतिशय घट्ट चिकणमातीची आहे. पॉटींग सॉईल पोत्यातनं येते यापलीकडे त्याबद्दल माहीती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

कर्वे ताई - कदाचित पहील्या प्रश्नाचा रोख जमिनीत जिवाणु नसले किंवा कमी असले तर ते कसे आणावेत किंवा घालावेत असा असावा. का जमिनीत बाय डीफॉल्ट जिवाणु असतातच.

तुम्ही वर लिहील्या प्रमाणे माझ्या कुंड्यांमधे जास्तीचा जीव कचरा घातल्या मुळे जीवाणूंपेक्षा चिलट वगैरे कीटकांचे जास्त फावले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याही मातीत जीवाणू असतातच. त्यामुळे ही चिंता करावी लागत नाही.
तुम्ही फक्त साखर घालण्याचा प्रयोग करणार होतात, तो केला का? पुष्कळ लोक चहाचा चोथा कुंड्यांमध्ये वाटून टाकतात. भारतीय पध्दतीने पाण्यात साखर आणि चहापत्ती उकळून चहा करत असाल, तर यामध्ये आपोआपच कुंड्यांना अल्प प्रमाणात साखर मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

तो प्रयोग केला ना, त्यात सुद्धा मी गडबड केली कारण प्रत्येक कुंडीत १-१ चमचा साखर म्हणजे खूपच जास्त घातली असावी. आणि त्यामुळे बाकीचे कीडे पण झाले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वनस्पतीला लाभ होईल पण तण वाढणार नाही हे केवळ 'साख्रपेरणी'ने शक्य होणार नाही हा तर्क योग्य ना? मग ते कसे साध्य केले जाते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तर्क बरोबर आहे. तणाचे काय करायचे, याची चर्चा येते आहेच पुढे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

कालच कुंडीतील गुलाबाला अर्धा चमचा साखर विरघवळेलं पाणी घातलं. आठ-दहा दिवसांनंतर बागेतील आणखी काही झाडांवर हा प्रयोग करून बघणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योग्य प्रमाण कसे ठरवलेत? मी टोमॅटोला साखरपाणी घातलं तर अनुराव म्हणतात तसे किडे नाहीत पण खूप मुंग्या झाल्या नि आता ते खाड खुंटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

योग्य प्रमाण ठाऊक नाहीच. तरीही फार प्रमाणात कार्बोहायड्रेट्स नकोत असे लेखातून समजते. तेव्हा अर्धा चमाचा पुरेसा व्हावा.

मुंग्या वैग्रे येऊ नयेत म्हणून थेट साखर न घालता साखरेचे पाणी घातले आणि वर थोडी सुकी माती पसरली.

दोनेक तासांपर्यंततरी मुंग्या आलेल्या नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0