म्हाताऱ्याची गन्नम स्टाईल!

कथा

म्हाताऱ्याची गन्नम स्टाईल!

लेखक - पंकज भोसले

प्राथमिक शिक्षण अर्थात यूबीपणाला सुरुवात

म्हाताऱ्याला ‘म्हातारा’ नाव पडलं तेव्हा तो लख्ख सतरा वर्षांचा होता. दोनदा नापास होऊन नववीतल्या त्याच वर्गात, त्याच वर्गशिक्षिकांचा मार खात, तोच अभ्यास पुन्हा-पुन्हा करूनही नापासाची हॅटट्रिक करण्याची संधी साधण्यासाठी सज्ज झाला होता. म्हाताऱ्यासोबत एक वर्ष वर्गात काढण्याआधी, पूर्वी चाळीत दोन घरं पलीकडे त्याचं घर असल्यामुळे म्हाताऱ्याच्या कुटुंबाविषयी मलाच जास्त माहिती होती. मी सातवीतून त्याच्या वर्गात जाईस्तोवर म्हातारा नववीत होता आणि नववीत गेल्यावर मला आळीतलं कुणीतरी आपल्या वर्गात असल्याचा आनंद झाला होता. म्हातारा दांडगट मुलांसारखा नव्हता, त्यामुळे ‘त्याच्यासोबत राहू नको’ असा सल्ला कुणी मला घरात दिला नव्हता. पण म्हाताऱ्याच्या सुपरवूमन आजीने त्याच्यावर हेरगिरी करण्याचं काम माझ्यावर लादलं आणि आजींच्या माझ्यावरच्या हेरगिरीमुळे माझ्या नववीच्या वर्षाची पुरती कल्हई झाली. पण इथे ते इतकं महत्त्वाचं नाही.

विक्रम शांताराम सकट असं नाव असलेल्या म्हाताऱ्याला ‘विकी’, ‘विक्स’ असं टोपणनाव पडायला हवं होतं. पण तरीही त्याचा बोलबाला पुढे म्हातारा म्हणूनच झाला. त्याचं डोळे सदा झोपेतून उठल्यासारखे दिसायचे, म्हणून त्याला काही काळापुरतं ‘चिन्या’ हे नाव पडलं होतं. पण ते फार टिकलं नाही. त्याची आजी त्याला ‘विकू’ या नावाने हाक मारायची आणि आळीतल्या मुली त्याला ‘यूबी’ म्हणत. कित्येक दिवस या शब्दाचा अर्थ मला कळला नव्हता. पुढे हसऱ्या माणसासाठी ‘एचबी’ आणि सतत रडका चेहरा करणाऱ्यासाठी ‘यूबी’ हा मुलींचा कोडवर्ड आहे, हे कळलं. ‘हसरा बोचा’ व ‘उदास बोचा’ ही त्या इंग्रजी अक्षरांची फोड. तर यूबी असलेला विक्रम सकट ऊर्फ म्हातारा, बोलताना पोक्त माणसासारखा पाठीला पोक आणून बोलायचा. अत्यंत हळू चालायचा. त्यामुळे तो कुठल्याही खेळात घेण्याच्या लायकीचा नव्हता. त्याला दहा पावलांचं अंतर धावल्यावरही दम लागायचा. शाळेत तर त्याचं येणं हमखास दुसऱ्या पिरियडला असायचं. त्याच्या वर्गात गेलो, त्या वर्षी त्याची हजेरी कित्येकदा मीच लावायचो. मी शाळेला निघायचो, त्याच वेळेत तोही निघायचा. पण त्याची चालच इतकी मंद असे, की त्याला शाळेत पोहोचायला दुसराच पिरियड होई. त्यामुळे तो घरातून निघालाय की नाही, याची माहिती आचवल बाई मला विचारून घ्यायच्या. बाईंच्या मराठीच्या त्या पहिल्या तासाला त्याने वर्षभरात फक्त तीनदा हजेरी लावली. तोही पिरियड संपायला आलेला असताना.

ब्राँकायटीस की दमा असं काहीतरी असल्यामुळे त्याचं दमादमानं वर्गात येणं, आचवल बाईंपासून ते आमच्या शाळेच्या शिपायापर्यंत, सगळ्यांनी गृहित धरलं होतं. दोन वर्षं मराठीचं भयावह अवस्थेत असलेलं तेच पुस्तक त्याला अनेकदा वाचून पाठही झालं असल्याने, त्याचा अभ्यास राहील याचं दु:ख आचवल बाईंना नव्हतं. फक्त गणित आणि इंग्लिश या शत्रूंनी त्याला आयुष्यातून उठवलं होतं.

म्हातारा त्याच्या सार्वकालिक थकलेल्या अवतारामुळे आळीतल्या मुलांपासून लांब राहिला नव्हता; तर फुल पँट घालायला लागल्यानंतरही त्याला कुक्कुलं समजणाऱ्या त्याच्या अतिदक्ष आज्जीमुळे आम्ही लहानपणापासूनच त्याला आमच्यापासून लांब ठेवायला सुरुवात केली होती. क्रिकेट खेळायला तो आला की त्याच्यासोबत त्याची आज्जीही मैदानात दाखल होई. पहिल्या बॉलमध्ये तो आऊट झाला तर ‘तो ट्रायल बॉल होता’ हे सांगून म्हाताऱ्याचं समाधान होईस्तोवर त्याला बॅटिंग करायला देण्यास भाग पाडी. फुटबॉल खेळण्यातही आज्जीचं तेच. त्यामुळे भोवरा, गोटय़ा खेळण्यात किंवा पतंग उडवण्यामध्येही आळीतल्या मुलांमध्ये म्हाताऱ्याच्या आज्जीची प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक दहशत बसली होती.

‘आमच्या विकूला खेळू द्या रे. तुम्ही चिडताय खूप.’ ही त्यांची ठरलेली वाक्यं असत. वयाच्या दहा वर्षांपर्यंत म्हाताऱ्यानं आपल्या आज्जीच्या जिवावर खेळाचे सर्वच स्वतंत्र नियम करून मजा केली. नंतर वयानुसार आमचं उंडगेपण वाढल्याने म्हाताऱ्याच्या आज्जीचा जाच टाळण्यासाठी सारी पोरं आळीपासून लांबच्या मैदानात खेळू लागली. तेव्हा म्हाताऱ्याची आज्जी आणि म्हातारा हे दोघं क्रिकेट अथवा भोवरा खेळताना काही काळ आळीत दिसत. मग दूरदर्शनचं तिसरं चॅनल सुरू झालं आणि म्हाताऱ्याच्या सिनेमावेड्या आज्जीनं म्हाताऱ्याला घरात बसवून अतिबोअर आर्ट फिल्म्सपासून ते रोज लागणाऱ्या टीव्ही मालिका पाहायला त्याला भाग पाडलं. म्हाताऱ्याचं मैदानी खेळ तिथेच आटोपले अन् त्याच्या अभ्यासाचीही पुरती चाळण झाली.

म्हाताऱ्याला ‘सेण्ट जॉन बाप्टिस कॉन्व्हेण्ट हायस्कूल’मध्ये टाकलं गेलं, तेव्हा आळीत फक्त दोनच मुलं कॉन्व्हेण्टमध्ये शिकत होती. किराणा मालाचं व्यापारी मनसुखलाल मगनभाई गाला यांची लेक डॉली आणि डॉक्टर ओक यांचा मुलगा कुणाल. अगदी दारासमोर दार असलेल्या ओक कुटुंबीयांबाबत, पालिकेत इलेक्ट्रिसिटी विभागात काम करणारे म्हाताऱ्याचं पिताश्री शांताराम सकट यांना, सर्वच बाबतींत असूया होती. डॉक्टर असल्याने, छोट्या का होईना, पण दवाखान्यामुळे, ओक यांची आर्थिक स्थिती आळीत बऱ्यापैकी होती म्हणून. ते बुटकेले आणि साधारण दिसत असूनही त्यांना सुंदर उंच आणि भक्कम पत्नी होती म्हणून. शिवाय ओक यांच्या पत्नीचा गॅलरीतला कचरा काढण्याचा कार्यक्रम सुरू असताना अनेकदा शांताराम सकट यांनी, ओक यांनी तयार केलेली खरी संपत्ती पाहिली होती म्हणून.

आपल्या घरात एक गोष्ट धड तर दुसरी वाईट, अशी पत्नीबाबत तुलना करताना ते डॉक्टर ओक यांच्याबाबत कायम तुच्छतेने बोलत. डॉक्टर ओक यांच्या इंग्रजी पुस्तक वाचनाचा आणि त्यांच्या आपल्या छोटुकल्या मुलाशी इंग्रजीत बोलण्याचा शिरस्ता ते रोज ऐकत व पाहत. त्यामुळे आपणही मुलाशी असंच इंग्रजीत बोलावं, ही त्यांची फार इच्छा होती. म्हणूनच शांताराम सकट यांनी आपलं पोरगं ‘फाड फाड’ इंग्रजीत लिहू-बोलू शकेल या आशेवर त्याला कॉन्व्हेण्टमध्ये टाकलं. स्वत: इंग्लिश बोलण्यासाठी ‘कोकाटे’पासून सगळ्या ‘फाड फाड इंग्लिश’ पुस्तकांची खरेदी केली. पण त्यातल्या अवघड मराठीतल्या स्पष्टीकरणाच्या आणि चालू वर्तमान, भूत, भविष्यकाळाच्या चक्रव्यूहात शांताराम सकट यांच्या इंग्रजीचं पुनर्शिक्षण संपलं. पुढे म्हाताऱ्याने शाळेत जे दिवे लावले त्याने त्याचंदेखील इंग्रजी सटपटलं.

म्हाताऱ्याने ज्युनियर केजीपासूनच सेंट जॉन बाप्टीस स्कूलमध्ये सगळ्या बाईंना जेरीस आणलं होतं. इतर मुलामुलींचं रबर-पुस्तकंच पळव, दिसेल त्याला धोपटून काढ, मुलींना मिठ्या मार, त्यांना वर्गात लांबलचक धार काढत मुतून दाखव, या त्याच्या लीलांनी तिथल्या टीचर्सपासून मावश्यांचा तो सर्वात दोडका झाला. मराठीव्यतिरिक्त कोणत्याही भाषेचा वापर करायचा नाही, हे त्यानं ठरवलं होतं. अनेकदा सिनियर केजीमधल्या लुटूपुटू परीक्षांमधले पेपर त्यानं फाडून टाकले होते किंवा त्यांचं विमान-बोट करून बाईंजवळ परत केल होतं. फक्त एकदाच शिस्तीत त्यानं स्पेलिंग आणि आकड्यांचं सारे पेपर पूर्ण लिहिले होते, पण ज्या शेजारच्या मुलाला धमकावून त्यानं ते उतरवलं होतं, त्याचंच नाव त्यानं आपल्या पेपरवर लिहिलं होतं. विक्रम सकट या नावाचा पेपरच बाईंना सापडला नव्हता अन् भलत्याच मुलाचे दोन पेपर.

तर अभ्यासाच्या बाबतीत त्याच्या बुद्ध्यांकाची खोली जाणवल्यानंतर सेंट जॉन बाप्टिस स्कूलच्या फादर आणि टीचर्सनी खास मीटिंग घेऊन सकट कुटुंबीयांना बोलावून घेतलं. म्हाताऱ्याला विशेष मुलांच्या शाळेत टाकावा असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा म्हाताऱ्याची आज्जी फादर मेलविन पिंटोशी तावातावाने भांडली आणि टीचर्सना शेकडो शिव्या देऊन काही बोलूच दिलं नाही. म्हाताऱ्याची रवानगी विशेष शाळेत न होता थेट मराठी शाळेतल्या इयत्ता पहिलीत झाली. वास्तविक ज्यूनियर, सीनियर केजीतल्या इंग्रजीने म्हाताऱ्याच्या ज्ञानात काडीचीही भर पडली नव्हती, पण या शाळास्थलांतराच्या घोळामुळे त्याची दोन वर्षं इंग्रजी मुळाक्षरांना समजून घेण्यात गेली; तेवढाही काळ त्याला मराठीची मुळाक्षरं समजून घेण्यास मिळाला नाही. एका वेगळ्याच ग्रहावर आपल्याला टाकल्याची जाणीव त्याला झाली. शांताराम सकट यांच्या ओळखीतल्या नगरसेवकाच्या खटपटींमुळे मराठी शाळेत कोणतीही कुरबूर न करता त्याला दाखल करून घेतलं गेलं आणि म्हाताऱ्याच्या आयुष्यातल्या यूबीपणाची सुरवात झाली.

‘समर्थ विद्यालया’त थेट इयत्ता पहिलीत गेल्यानंतर देवनागरी बागुलबुवा बनून त्याच्यासमोर उभी राहिली. मराठीच्या लिखित आणि बोली भाषेचा गंधही नसल्याने म्हाताऱ्याची पुरती तंतरली. इंग्रजी शाळेची कधीही भीती नसलेला आणि त्या शाळेत दांडगट, मस्तीखोर म्हणून ओळखला जाणारा म्हातारा इथे मांजरीच्या पिल्लासारखा एकाच काटकोनात राहू लागला. फक्त शाळेत जाताना घरात ‘फुल व्हॉल्यूमी’ भोंगा पसरू लागला. ‘ब्रा.शि.मं.चे समर्थ विद्यालय’ ही शाळेच्या इमारतीमधील जाडजूड अक्षरं त्याला दु:स्वप्नांतून त्रास देत होती. शिवाय आधीच्या शाळेतल्या अर्धकच्च्या का होईना, पण येत असलेल्या ‘ट्विंकल ट्विंकल’, ‘जॉनी जॉनी’, ‘बाबा ब्लॉक शीप’ पोएम्स इथे नव्हत्या. बाई जे मराठी शिकवत होत्या त्याचा गंधच त्याला लागत नव्हता. त्याचे शब्द लिहिताना ओळींच्या खाली कर्स्यूमध्ये उतरू लागलं. देवनागरी लिपी कर्स्यूतून लिहिणारा म्हातारा हा पहिला विद्यार्थी असावा.

म्हाताऱ्याच्या शैक्षणिक औदासिन्यामुळे शांताराम सकट, रुक्मिणी सकट आणि त्याची बोलबच्चन आज्जी लक्ष्मीबाई सकट असा त्याच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्याला मराठी शिकवण्यासाठी, त्याची मराठी लिपी सुधारण्यासाठी आणि त्याला मराठी येण्यासाठी झटू लागला. त्यामुळे शांताराम, रुक्मिणी आणि आज्जीचं मराठीचं मूलभूत ज्ञान बरंच सुधारलं. त्यांची व्याकरणाबाबतही काही अंशी प्रगती झाली. पण म्हाताऱ्याचं सर्वज्ञान बिकट झालं. उठता-बसता आणि हागता-मुतता मराठीचं पाठ त्याला गिरवावे लागत. चाळीतल्या संडासात बसलेला असतानाही आज्जी त्याच्याकडून ‘एकी एक, दुरकी दोन’ किंवा ‘हा पतंग की पाखरू, म्हणे मज आभाळी चल फिरू’ ही कविता म्हणवून घेई. त्यामुळे एकदम दोन कामं होत. पहिलं म्हणजे कविता म्हणण्याच्या भीतीने पोटात गोळा आल्याने ते पूर्ण साफ होई व म्हाताऱ्याचं लवकर आटपून जाई. म्हाताऱ्याची संडासात दोनदोनदा होणारी कविता मैफल आख्ख्या आळीला पाठ झाली होती. एकदा कवितेच्या सुरुवातीलाच म्हातारा अडखळला, त्याचं पोटही पूर्ण साफ झालं. पण कविता पूर्ण केल्याशिवाय संडासातून उठायचं नाही, हा नियम आज्जीनं लावलेला असल्यामुळे म्हाताऱ्याची वाट लागली. म्हातारा बाहेर पडण्याची वाट बघत ताटकळत उभ्या असलेल्या नेमाडे काकूंनी मग त्याला कविता पूर्ण करण्यास मदत केली. त्यामुळे त्या दिवसासाठी म्हातारा सुटला आणि नेमाडे काकूही.

तर घरातली शिकवणी आणि एक क्लास यामुळे म्हाताऱ्याचं मराठी शून्यातून यथातथा, सर्वसामान्य लेव्हलपर्यंत आणण्याचं काम सकट कुटुंबानं पूर्ण केलं. म्हाताऱ्याचं बुजरेपण आणि या भीषण शिक्षणकाळातलं त्याचं वाढतं आजारपण मात्र थांबवता आलं नाही. म्हातारा चोवीस तास आज्जीच्या तावडीत असायचा आणि जगातल्या सर्व प्रश्नांवरची उत्तरं तिच्याचकडून समजून घ्यायचा. कुणाल ओक, नक्षी नेमाडे, पिनाक कुरकुरे, डॉली गाला आणि मी चाळीत हैदोस घालायचो. पकडापकडी, लपंडाव आणि कुठल्याही खेळात म्हाताऱ्याला घेतला तर त्याच्यावर राज्य येऊ नये यासाठी आज्जी कायम आम्हांला त्रास देई. नक्षीच्या घरी सुटीमध्ये वाचनाचा कार्यक्रम असायचा. तेव्हाही या आज्जी, म्हाताऱ्याला खूप चित्रांचं पुस्तक मिळावं यासाठी, लहान मुलांच्यात असत. स्वत:च्या वयाच्या सोसायटीतल्या कुठल्याही आजी-आजोबांसोबत न दिसता म्हातारा जाईल तिथे त्या दिसत, म्हणून नक्षीनं या आज्जीला लुडबुड करणारं ‘पक्का लिंबू’ हे नाव दिलं होतं. म्हाताऱ्याची आज्जी दिसायला सर्वसाधारणपणे आमच्या आज्जीसारखीच होती, पण आमच्या आज्जीने घरात आणि घराबाहेर आम्ही काय करतोय याच्याकडे पाहण्यात कधीच स्वारस्य दाखवलं नव्हतं. अन् आम्हीदेखील कुठल्याही गोष्टीवरून मार खाण्यापासून वाचवणारा मध्यस्त यापलीकडे आज्जीला महत्त्व दिलं नव्हतं. म्हाताऱ्याला मात्र संडासातून बाहेर पडल्यानंतर आज्जीला ‘घट्ट’ की ‘पातळ’ याचाही रिपोर्ट द्यावा लागायचा. म्हाताऱ्याच्या आज्जीने केसात घातलेल्या तेलाचा आणि सर्वांगावर कुठे-कुठे थापलेल्या बामाचा दर्प त्या जवळ आल्या की येई. आमच्या समोर जोरात पादताना त्यांना कसलीही लाज वाटत नसे. आम्ही हसलो तर मात्र आमच्या सगळ्या घराण्यातल्या माणसांचा पादण्याचा इतिहास माहिती असल्यागत त्या आम्हांला ओरडत.

दूरदर्शन जेव्हा संध्याकाळव्यतिरिक्त दुपारी आणि काही काळ सकाळीही सुरू झालं, तेव्हा संपूर्ण आळीत आणि चाळीत आमूलाग्र बदल झाला. (उपग्रह वाहिन्यांवरील चकचकीत साड्यांतल्या ‘बायकांच्या, बायकांसाठी, पुरुषांनी केलेल्या डेली सोप्स’आधी अगदीच साध्या वेशांमधील, ज्ञानवर्धक, भावुक कार्यक्रम तेव्हा दूरदर्शनवर लागत.) कुठल्याशा मालिकेतल्या मॅक्सी घालणाऱ्या घरंदाज अभिनेत्रीमुळे या काळात आळीतल्या बायकांमध्ये मॅक्सीची फॉशन प्लेगसारखी पसरली आणि आख्ख्या चाळीच्या वाळत घालायच्या दोऱ्या विविधरंगी मॅक्सीने भरू लागल्या. घराजवळील वाण्याकडे, भाजीवालीकडे, मच्छीवाल्याकडे मॅक्सीतल्या महिलांचा जथ्था जाताना दिसू लागला. आपल्याकडे सामान्य माणसांच्या पोशाख अभ्यासाची अथवा त्यातल्या बदलांची नोंद घेण्याची परंपरा नाही. त्यामुळे हा अल्पकालीन ट्रेण्ड आता काहींच्याच स्मरणात असेल. रंगीबेरंगी फुलांचे, फळांचे मॅक्सी; पाठ थोडी उघडी दिसणारे मॅक्सी; गळ्यापर्यंत घट्ट असलेले मॅक्सी; वाकल्यानंतरही कणभरही संपत्ती न दिसणारे मॅक्सी; उन्हात गेल्यावर आतमधील सर्व काही स्पष्ट दाखवणारे आरपारदर्शक मॅक्सी; उन्हात गेल्यावरही काहीही न दाखवणारे अंगसंरक्षक मॅक्सी; झगर-मगर पसंत नसणाऱ्यांसाठी प्लेन एकरंगी मॅक्सी; एम्ब्रॉयडरी केलेल्या मॅक्सी; जिथे -तिथे स्त्री शरीराला लपेटून टाकल्यागत दिसत होत्या. त्या काळात वादग्रस्त पण तुफान लोकप्रिय ठरलेल्या बोल्ड नाटकाने आपली कॅचलाईनही ‘मॅक्सी’वरून केली होती. यावरून ‘मॅक्सी’ ही मध्यमवर्गामध्ये किती महत्त्वाची बनली होती हे लक्षात येईल. महिलांची विभागणी आळीत उघडपणे मॅक्सी घालणाऱ्या व न घालणाऱ्या अशी झाली होती. यातल्या बाहेर जाताना मॅक्सी न घालणाऱ्या बायका ‘रात्री फक्त’ तत्त्वावर गुपचूप मॅक्सी घालत होत्या. सकाळी संडासाबाहेर रांगेत किंवा दूधाच्या पिशव्या आणण्यासाठी या गुपचूप मॅक्सी घालणाऱ्या बायका आल्या की सर्व नजरांच्या भक्ष्य बनत. काही अतिलाजाळू मॅक्सीसुंदरी त्यामुळे महत्त्वपूर्ण भागावर टॉवेल लावून बाहेर पडत.

या मॅक्सीपर्वात शांताराम सकट यांची ओक कुटुंबावर असलेली असूया आणखी दसपटींनी वाढली. शिवाय त्यांच्या डोळ्यांचं कार्यक्षेत्र चाळीत आणि चाळीबाहेरपर्यंत विस्तारलं. पालिकेच्या नोकरीव्यतिरिक्त घराघरांत इलेक्ट्रिसीटीची छोटी-मोठी कामं ते घेऊ लागले. त्यांच्या डोळ्यांचा व्यायाम वाढल्यामुळे अधून मधून नाक्यावरच्या व्हिडीओ पार्लरमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ‘विशेष सिनेमांना’ जाण्याच्या त्यांच्या फेऱ्या वाढल्या आणि शहरातल्या एकमेव टॉकीजात चालणाऱ्या ‘मॉर्निंग शो’चा खुराक त्यांच्यासाठी अनिवार्य बनला. पण गंमत म्हणजे त्यांच्याही घरातल्या दोऱ्यांवरही दोन मॅक्सी लटकू लागल्या. म्हाताऱ्याची आज्जी आळीतल्या मॅक्सी घालणाऱ्या पहिल्या आज्जी होत्या. नऊवारी साडीमधून थेट मॅक्सीमध्ये त्यांचं रुपांतर पाहिल्यानंतर आम्हा सगळ्या लहान पोरांना कसंसंच वाटायचं. ‘हेच मोकळं वाटतं आणि सर्व शरीरही झाकतं’ म्हणत मॅक्सीचा प्रचार करणारी म्हाताऱ्याची आज्जी काही वर्षांनी टीव्हीवर उपग्रह वाहिन्यांतल्या चमको आणि साडीदिखाऊ मालिका आल्यानंतर पुन्हा नऊवारी घालू लागली. आळीतलं मॅक्सीपर्व ओसरून गेलं. पुढे लोकांच्या डोळ्यांना मॅक्सीवुमन न्याहाळण्यात नवलाई वाटेनाशी झाली. लोक या पर्वाला काहीच दिवसांत विसरले. त्याचं फक्त शांताराम सकट यांना दु:ख झालं.

तर या साऱ्या घरातल्या अन् घराबाहेरील सांस्कृतिक उत्क्रांतीच्या काळात म्हाताऱ्याचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं. त्याला वेग नव्हता की आकर्षकपणा नव्हता. वाचन, पाठांतर, लेखन, गीता परीक्षा, रामायण परीक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टीमव्ही) शिष्यवृत्त्या आणि कसल्याशा चित्रकला स्पर्धांना आज्जीच्या जबरदस्तीने निव्वळ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तो बसत होता. जेमतेम मार्क मिळवत होता आणि पुढच्या वर्गात ढकलला जात होता. कुठल्याही बाईंची तक्रार नव्हती किंवा कुठलीही शाबासकी नव्हती. अतिसामान्य अभ्यासपातळीत म्हातारा समाधानी होता. इंग्रजीतून मराठी शाळेत टाकल्यानंतर खंगलेलं त्याचं रूप मात्र कायम राहिलं.

माध्यमिक शिक्षण अर्थात पराक्रमारंभ!

म्हातारा इयत्ता पाचवीत जाईस्तोवर ज्युनियर केजीमध्ये जे काही त्रोटक इंग्रजी शिकला, ते पूर्ण विसरून गेला होता. एबीसीडी नव्याने, इंग्रजीच्या कविता नव्याने आणि आता इंग्रजीची भीती नव्याने त्याच्या डोक्यावर बसली. कसनुसा चेहरा करून तो त्याचा मराठीचा कठीण अभ्यास करत असे. आता याच काळात आमच्या चाळीचं रूपांतर भव्य टॉवरमध्ये झालं असल्यामुळे त्याच्याविषयीचा मधल्या काही वर्षांचा तपशील माझ्यासमोरून निसटला. फक्त त्याच्याचमागे दोन वर्षं शाळेत असल्यामुळे शाळेत कधी मधल्या सुटीत किंवा शाळा सुटल्यानंतर म्हातारा आज्जीसोबत दिसायचा.

टॉवरमध्ये राहायला आलेली जवळजवळ सगळी कुटुंबं लवकरच फ्लॅट संस्कृतीशी एकरूप झाली होती. आमची घरंही एका इमारतीत वेगवेगळ्या मजल्यांवर आणि वेगवेगळ्या विंग्जमध्ये गेली होती. आता पूर्वीसारखं एकत्र येणं नव्हतं की, कुणाच्या घरी कुणाचं उगीच रेंगाळत बसणं नव्हतं. पण सकट कुटुंब चाळीतल्यासारखंच वागत आणि जगत होतं. त्यांचा दरवाजा रात्रीपर्यंत उघडा असायचा. म्हाताऱ्याच्या आज्जीची बडबड या काळात अखंड सुरू असे व जरा मोठा झालेला म्हातारा बंडखोर अवस्थेत आज्जीला आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी सतत धडपडत असायचा. कधीकधी आज्जीशी भांडण्याच्या त्याच्या आवाजाने आख्खी सोसायटी दणाणून जायची.

तो चार फूट पुढे आणि आजी मागे असा, त्याला शाळेत नेण्याचा वा आणण्याचा आज्जीचा दिनक्रम असे.

‘मी एकटा जाईन, एकटा येत जाईन. तू नको माझ्यासोबत.’
‘मी येणार. गाडय़ा किती असतात रस्त्यावर. वाईट मुलांच्या नादी तू लागू नये म्हणून मी तुझ्यासोबत येते.’
‘तुझ्यामुळे कुणी माझ्याशी मैत्री करीत नाही. तुला शेपूट म्हणतात.’
‘कोण म्हणालं सांग. बरोबर करते त्याची.’
‘तुझ्या भीतीने कुणी माझ्याशी बोलतपण नाय.’

एका भांडणात हा संवाद मी जेव्हा ऐकला तेव्हा मला म्हाताऱ्याची खूप दया आली.

शाळेत, क्लासमध्ये, संध्याकाळी कुठेही जाताना म्हाताऱ्याची साथ आज्जी सोडत नव्हती. आज्जीमुळे आळीतल्या मुलांनी त्याच्यावर बहिष्कार टाकल्यासारखी स्थिती केल्यामुळे त्याला विशिष्ट वयात आमच्यासोबत कधीच राहता आलं नाही. म्हातारा सायकल चालवायला शिकला नाही किंवा त्याला आमच्यासारखं जवळच्याच एका विहिरीत पोहायलाही शिकता आलं नाही. म्हातारा आमच्यासारखा वेगात व्हिडीओ गेम खेळू शकला नाही किंवा कुठल्याही कार्टून मालिकांवर त्याला आमच्याशी चर्चा करता आली नाही.

या सगळ्या काळात घराघरांमध्ये केबल आली होती आणि प्रत्येक जण त्यातून काही ना काहीतरी घेण्यासाठी सिद्ध झाला. रुक्मिणी सकट टीव्हीवरच्या खाद्यपदार्थांच्या शोजमधून नवनव्या पाककृती बनवू लागल्या. म्हाताऱ्याच्या आजीला टीव्हीवर मालिकांची खाणच उपलब्ध झाली. या सगळ्या मालिकांवर चर्चा करण्यासाठी तिला म्हाताराच सापडला. म्हाताऱ्याला या सगळ्या डेली सोप्स पाठ होत्या. शिवाय भरपूर पिक्चर आणि रिश्ते, हम पाँच, जस्ट मुहोब्बतपासून कितीतरी अनंत काळपर्यंत चालणाऱ्या मालिका तो पाहू लागला. शांताराम सकट यांच्या मॉर्निंग शोची जागा टीव्हीवरील नाईट शोने घेतली. रात्री अकरा वाजताची मालिका संपली की म्हातारा आणि त्याच्या आज्जीची रवानगी बेडरूममध्ये केली जाई. शांताराम सकट मग सपत्नीक इंग्रजी मालिका म्यूट करून पाहत.

‘नाहीतरी आवाज ठेवला, तरी ते काय बोलतायत ते कुठं कळणारंय?’ ही त्यांची त्याबाबतची मानसिकता होती. ‘व्हॅली ऑफ द डॉल्स’, ‘सेक्स इन द सिटी’, ‘बेवॉच’ या नावांनीही ते अर्धेअधिक चेकाळत. त्या मालिकांमधील दृश्यांत गोरी-भक्कम बाई आली की काहीतरी घडणार, या आशेवर बराच वेळ काढून मग त्यांचं लोकल चॅनल सर्फिंग चालायचं. एफटीव्हीतला ‘लॉंज्री’ (ज्याचा लिंगरी हाच उच्चार सगळीकडे पाठ झाला होता.) सोडला तर सगळेच शो त्यांना सपाट वाटत असत. अन् ‘लॉंज्री’ तासातून फक्त काहीच मिनिटांसाठी चालायचं. इतर शोज्‌मधील मॉडेल्स त्यांना मुडदे चालत असल्यासारखं वाटायचं. या सुकडय़ा मॉडल्स पाहताना आपल्या बायकोला ते कायम ‘आल्या बघ तुझ्या बहिणी’ म्हणत.

शुक्रवार ते रविवार रात्री १ वाजता लोकल केबलवर लागणाऱ्या ‘विशेष सिनेमां’चे ते सर्वात मोठे फॅन होते. इतके की, त्यांनी एक दिवस रात्री केबलवाल्याला फोन करून चार आठवड्यांपूर्वीचाच विशेष सिनेमा लावला म्हणून भरपूर झापलं आणि नवा सिनेमा लावायला भाग पाडलं.

शांताराम सकट यांच्या या स्वभावाचा अतितपशील यासाठी की, त्यांची अर्धी गु्णसूत्रं घेऊन जन्मलेल्या विक्रम ऊर्फ म्हाताऱ्याची आजीपासून सुटका त्यामुळेच व्हायची होती. म्हातारा त्याच्या पहिल्या नववीत असताना शांताराम सकट यांच्या या लेटनाईट विशेष सिनेमांच्या फैरी झडत होत्या आणि तो दुसऱ्या नववीत आला तेव्हा त्याला छोटुकला भाऊ जन्मला होता.

कदाचित म्हाताऱ्याच्या आईने शुक्रवार ते रविवार प्रात्याक्षिकांसह होणाऱ्या जबरी अन्यायाला कंटाळून शांताराम सकट यांच्यावर सूड उगवला होता. चार ते पाच महिन्यांनंतर, ‘कण्ट्रोल झेड’ अवस्था निघून गेल्यानंतर शांताराम सकट यांना ‘शिळी गूड न्यूज’ समजली होती. लहान असताना म्हातारा आपल्या आई-बापाला मला भाऊ कधी आणणार असं विचारून इतर कुटुंबांसमोर लाज काढायचा. तेव्हा इतकं मनावर न घेणाऱ्या पालकांनी इतक्या वर्षांनी अचानक हे कसं काय करून दाखवलं, हा विचार तेव्हा म्हाताऱ्याच्या मनात आला. शांताराम सकट पत्नीच्या या चालीने पूर्ण थक्क झाले होते आणि आळीत कुणाकडेही इलेक्ट्रिकची कामे करण्यास पुढचे अनेक महिने नकार देऊ लागले होते. ए. आर. रेहमानच्या संगीताने वेड्या झालेल्या याच काळात ‘रुक्मिणी, रुक्मिणी’ या बाबा सेहगलच्या गाण्याला नवा अर्थ लाभला होता. शांताराम सकट यांना सगळे जण आपल्याला चिडविण्यासाठी हे गाणं मुद्दाम सारखं सारखं लावत असल्याचा संशय येत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये सकट कुटुंबाच्या प्रतापाची वैविध्यपूर्ण चर्चा पसरली होती. तब्बल सोळा वर्षांच्या शांततेनंतर सकट यांच्या घरात ‘बाळ रडत होतं’ आणि आज्जीचं म्हाताऱ्यावरचं सारं लक्ष या नव्या कुतूहलावर गेलं होतं. आजूबाजूचे सगळे जण हसत असतानाही म्हाताऱ्याने आज्जीपासून मुक्तीच्या जाणीवेपोटी नव्या भावाच्या जन्मावर भरपूर आनंद व्यक्त केला होता. प्रत्येक जण शांताराम सकट यांचं अभिनंदन करत होता. डॉ. ओक आपल्या कुटुंबासह जेव्हा सकट दाम्पत्याशी सोसायटीच्या लॉनमध्ये बोलत होते तेव्हा मी तिथे असल्यामुळे त्यांच्या संवादाचा काही भाग ऐकला होता.

‘अभिनंदन सकट साहेब. तुम्ही खूप नशीबवान आहात. पाहा, तुमचा हा छोटू पुढे खूप मोठा माणूस होणार.’
‘ते कसं बरं?’ ओक यांच्याकडे आठ्या ताणत पाहून घेत शांताराम सकट यांनी विचारलं.
‘जनरली इतक्या वर्षांच्या गॅपनंतर मुलं ऍबनॉर्मल कंडिशन घेऊन जन्माला येतात अशी हिस्ट्री आहं. पण तुमचा मुलगा पूर्ण फिट ऍण्ड फाईन आहे अगदी तुमच्यासारखाच.
‘मग हे आधी नाय का सांगायचं?’
‘अहो, अगदी कशीही हिस्ट्री असली, तरी इतिहास बदलणारा माणूसच असतो. आपला सचिन तेंडुलकर नाही का दहा वर्षांच्या गॅपनंतरच जन्मला होता? त्याच्यासारखाच तुमचा पोरगाही पराक्रमी होणार पाहा.’

सातत्याने डॉक्टर ओकांची असूया करणाऱ्या शांताराम सकट यांना त्या वेळी ओकांच्या शब्दांनी भरूनच आलं. आपल्या नवबालकाच्या भविष्यातल्या पराक्रमाची भविष्यवाणी कथन करणाऱ्या ओकांना मिठीच मारावी अशी इच्छा त्यांना झाली. अर्थात ओक यांची पत्नी बाजूला असल्यामुळं त्यांनी तसं काही केलं नाही. पण ‘तेंडुलकरने नाही का वयाने मोठ्या बाईशी लग्न केलं?’ अशी तुलना ऐकण्यात सरावलेल्या आमच्या कानांना मास्टर ब्लास्टरबाबतच्या या भलत्याच वक्तव्यानं चक्रावून सोडलं.

नॉर्मल वेगात म्हाताऱ्यासारखा ऍबनॉर्मल शोभावा असा पोरगा काढणारं सकट दाम्पत्य आणि राणी लक्ष्मीबाईपेक्षा कठोर तोरा असलेल्या लक्ष्मीबाई सकट भविष्यातल्या पराक्रमी पुरुषाच्या सेवेत गुंग झाले, तेव्हाच म्हाताऱ्याच्या पराक्रमांना खऱ्या अर्थाने आरंभ झाला.

मी नववीत गेलो आणि म्हातारा आमच्या वर्गात ‘आजीव विद्यार्थी’ असल्यासारखा होता, त्याच वर्षी म्हाताऱ्याला ‘म्हातारा’ हे नाव पडलं. त्या काळात टीव्हीवरील सर्व इंग्रजी सिनेमांच्या वाहिन्यांवर ‘अनकट व्हर्जन’ सिनेमा चालत होता, एफटीव्हीवरील ‘लॉंज्री’ हा कार्यक्रम ‘महिलांनी पार्श्वभाग स्वच्छ आणि सुंदर कसा ठेवावा’ याचे धडे देत होता. पण दुर्दैवाने तो कार्यक्रम देशातल्या जास्तीत जास्त महिला पाहू शकत नव्हत्या किंवा त्यांचे नवरे हे सांगण्याची जबाबदारी पार पाडत नव्हते. त्या काळात वर्गात सर्वात पाठीमागे बसणारा बेबले आणि त्याचा दांडगट मुलांचा जथ्था घोळका करून दररोज मधल्या सुटीत एका हिंदी पुस्तकाचं सामूहिक वाचन करताना दिसत. अभ्यास करण्याच्या त्यांच्या सामूहिक पद्धतीने आचवल बाईही गहिवरून गेल्या असत्या. एक दिवस ते काय वाचतायत हे पाहण्यासाठी गेलो तर सर्व पोरं ‘चुच्ची’ या शब्दाच्या अर्थावरून एकमेकांशी वाद घालत होतं. प्रत्येकाच्या मते त्या शब्दाचा अर्थ वेगळा होता. त्यांनी मला जेव्हा ते पुस्तक दाखवलं, तेव्हा त्यातल्या ब्लॅक ऍण्ड व्हाईट नागड्या चिंत्रांनी ओकारी येईल असं वाटलं. त्या चोळामोळा पुस्तकाला घाणेरडा रॉकेलसारखा वासही येत होता. त्यांनी या शब्दावर बराच खल केला आणि म्हाताऱ्याला जवळ बोलावून त्या शब्दाचा अर्थ हिंदीच्या खैरे मॅडमना विचारायला लावला.

संपूर्ण तासभर आपण कुठल्या बेअक्कल पोरांसमोर बोलतोय या तोऱ्यात आम्हाला पन्नास मार्कांचं हिंदी आणि पन्नास मार्कांचं संस्कृत शिकवणाऱ्या खैरे बाईंना पोरांनी प्रश्न विचारला तर खूप आनंद होई. त्यांचा हिंदीचा संपूर्ण तास नेहमी एकतर्फी होई. कुणाला काहीच शंका नसे. अगदी पहिल्या बेंचवरील मुलीदेखील शांतपणे ऐकत बसत. संस्कृतच्या तासाला मात्र खूपच हुशार असलेल्या मुला-मुलींकडून काही प्रमाणात प्रश्न येत. पण बहुतांश मुलांना संस्कृतचा शून्य गंध असल्यामुळे इंग्रजीइतकाच तो भीतिदायक तास वाटे. बाई प्रश्न ऐकून आपल्याला शाबासकी देतील या जोशात जेव्हा म्हाताऱ्याने ‘चुच्ची’ या शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा बाईंनी त्याला आधी वर्गाच्या बाहेर काढला, त्यानंतर छडीने इतका फोकलून काढला की ‘हा काहीतरी भयंकर अर्थाचा शब्द आहे’ असं मत करून हुशार पोरांनीही आठवडाभर बाईंना कुठलाच प्रश्न विचारला नाही.

म्हातारा दोन वर्षं एकाच वर्गात असल्याने त्याची रवानगी पाठीमागच्या मुलांमध्ये आपोआप झाली होती. फक्त तो त्यांची पुस्तकं ‘घाणेरडी’ असल्याचं ठरवून पाहत आणि वाचत नव्हता. समांतर रांगेत बसणाऱ्या मुलींकडे बघायचीही त्याला भीती वाटे. नववीत आल्यानंतर सर्व मुलं मुलींच्या अचानक बदललेल्या अवयवांच्या अवलोकनात गुंग असत, तेव्हा तो त्यांच्यापासून लांब जाई. तत्कालीन हिंदी सिनेमांमधील द्व्यर्थी गाणी आणि गोविंदा-करिश्मा कपूरच्या चित्रपटांतलं लैंगिक शिक्षण यांच्यापासून म्हातारा वंचित होता. पाठीमागे बसणाऱ्या मुलांनी त्याला ‘सेक्सी, सेक्सी’ या करिश्मा कपूरच्या गाण्याबद्दलचं मत विचारलं, तर त्याने तेही त्याने पाहिलं नसल्याचं सांगितलं. मुलींप्रती त्याच्या या स्थितप्रज्ञ पवित्र्यामुळे त्याला ‘म्हातारा’ हे नाव चिकटलं होतं. अन् त्यानेही ते स्वीकारलं होतं.

पण म्हाताऱ्याची ही स्थितप्रज्ञ अवस्था नसून स्थितप्रज्ञ अवस्थेचा निष्णात अभिनय आहे, याचा शोध मला त्याच्या आजीने त्याच्यावर हेरगिरी करण्याचं काम सोपवलं, तेव्हा लागला. म्हाताऱ्याने आज्जीला आठवीत आल्यापासूनच वॉर्निंग देऊन ठेवली होती की, शाळेत, क्लासला किंवा कुठेही जाताना जर माझ्यासोबत किंवा माझ्या पाठीमागे दिसलीस तर शाळाच सोडून देईन. आधीच वेगवेगळ्या चॅनलवरच्या वाढत चाललेल्या मालिका रीटेलिकास्टमध्येही जेमतेम पाहू शकणाऱ्या आज्जीला त्याच्या मागे राहणं अवघड होऊन बसलं होतं. तरी त्यांची भांडणं आणि कुरबूर कायम असे. म्हाताऱ्याच्या वर्गात मी गेल्याचं कळल्यानंतर त्यांना आता म्हाताऱ्याची सविस्तर माहिती माझ्याकडून हवी होती. शिवाय घरात आलेल्या बाबूच्या देखभालीत म्हाताऱ्याच्या शैक्षणिक प्रगतीत सहभागी होता येत नसल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त होत होती. दोन वर्ष एकाच इयत्तेत म्हाताऱ्याने कसली शैक्षणिक प्रगती केली होती हे विचारण्याचं धाडस मला नव्हतं.

‘तुमच्या इंग्लिश-गणिताच्या बाई बदलायला हव्यात. आमच्या विकूला त्यांनी शिकवलेलं काहीच कळत नाही.’ तसं त्याला क्लासच्या बाईंनी शिक्वलेलंही कळत नव्हतं. कारण दोन वर्ष वेगवेगळ्या क्लासमध्ये जाऊनही तो त्याच विषयांत नापास झाला होता.

‘आमचा विकू वाईट मुलांच्या संगतीत नाही ना रे?’
‘आमचा विकू मुलींच्या पाठी जात नाही ना रे?’ या त्यांच्या प्रश्नांवर मी त्यांच्यासमोर हसलो. ‘तो मुलींच्या पाठी लागला, तर निदान शाळेत तरी वेळेवर येईल.’ असं मी म्हाताऱ्याच्या आज्जीला सांगताच आधी त्या चवताळल्या. मग शांत होत मला म्हातारा ‘लवकर निघूनही शाळेत वेळेवर का पोहोचू शकत नाही’, याचा शोध घ्यायचं काम माझ्यावर सोपवलं.

लवकरच एका सकाळी व्योमकेश बक्षीचा बाप असल्यासारखा म्हाताऱ्याच्या पाठीमागे मी त्याला तो दिसणार नाही इतक्या वेगात चालत होतो, तर अचानक त्याचा वेग वाढलेला दिसला. या वेगात म्हातारा आमच्या शाळेत काय, तर शहरातल्या कोपऱ्यात असलेल्या कुठल्याही शाळेत वेळेआधी पोहोचू शकला असता. म्हाताऱ्याने आळी सोडून दुसऱ्या आळीचा रस्ता पकडला. त्यानंतर शाळेत जायच्या बरोबर विरुद्ध दिशेने दहा मिनिटांचा रस्ता घेतला. आता त्याचा लांबून पाठलाग करताना मलाच धाप लागत होती. पण म्हातारा वेगात जात होता.

‘त्तात्रेय निवास’ अशा विचित्र नावाच्या एका कोपऱ्यातल्या इमारतीमध्ये तो शिरला. या इमारतीमध्ये तो काय करतोय, याचा पत्ताच मला लागत नव्हता. खूप जुन्या झालेल्या त्या इमारतीत कुणी राहत नव्हतं. थोडय़ा वेळाने लक्षात आलं, की ‘दत्तात्रेय’ या मूळ नावातलं ‘द’ हे लोखंडी अक्षर गायब झालं होतं. त्या इमारतीचा एक भागही कोसळला होता. काही गॅलऱ्या आणि घरं उघडीच होती. आमची आळी सोडून दहा मिनिटांवर असलेल्या लोकमान्य आळीत इमारतींची बांधकामं मोठ्या प्रमाणावर होत होती. या इमारतीचाही पुनर्विकास व्हायचा होता. पण बरेच दिवस ती याच अवस्थेत होती.

मीही त्या ‘त्तात्रेय निवासा'त शिरलो. हळूच पहिल्या माळ्यावर आलो. तेथील गॅलरीत लपून म्हातारा समोर रस्त्यापलीकडे दिसणारी एक गोष्ट पाहत होता. या दृश्याने मी भारावूनच गेलो.

समोरच्या नळावर इमारतीच्या बांधकामासाठी आलेल्या मजूर महिलांची उघड्यावरच दिगंबर अवस्थेत अंघोळ चालली होती. त्या चार महिलांचं खूप काम करून सजलेलं कोरीव शरीर बेबले आणणाऱ्या पुस्तकांतल्या बायकांच्या चित्रांपेक्षा देखणं होतं. म्हातारा मी पाठीमागं आलोय याची दखलही न घेता त्या दृश्याचा आस्वाद घेत होता.

एफटीव्ही, एमटीव्ही, एरियातल्या पोर्नसंग्राहक पिनाक कुरकुरे आणि केबलवाल्याकडचे अनंत स्रोत असलेल्या काळात नग्नकुतूहल शमवण्यासाठी म्हाताऱ्याला कराव्या लागणाऱ्या तारेवरच्या कसरतीचं मला आश्चर्य वाटलं. शांताराम सकट यांची गुणसूत्रं आपल्यात असल्याची पावती त्याने दिली होती. म्हातारा हा नॉर्मल असल्याची जाणीव पहिल्यांदाच मला झाली होती. त्याच्या या आनंदाला भंग करण्याची माझी जराही इच्छा नव्हती. आलो त्याप्रमाणेच तिथून गुपचूप निघून जावं यासाठी सरकलो, तर त्याने मला पाहिलं आणि मुलीसारखं रडण्यास सुरुवात केली. त्याला शांत करणं मला कठीण बनू लागलं. आज्जीला किंवा कुणालाच यातले काही न सांगण्याची शपथ त्याने माझ्याकडून घेतली. माझ्यावर त्याचा विश्वास तेव्हाच बसला, जेव्हा मीदेखील तो पाहत असलेल्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी त्याच्या बाजूला बसलो.

आळीत पिनाक कुरकुरेच्या तिन्हीत्रिकाळ रिकाम्या असणाऱ्या घरात इंडियन बीपी पाहिला जाई, तेव्हा त्यातल्या घाणेरड्या, पोट सुटलेल्या आणि बेढब शरीराच्या भारतीय पोर्न अभिनेत्रींच्या वैगुण्यांवर मुक्त चर्चा होई. त्या सिनेमाच्या लो क्वालिटीवरून पुन्हा इंडियन बीपी पाहायचा नाही, यावर एकमत होई. मग ‘आपल्याला फॉरेनच्या मुली मिळणार नाहीत, तेव्हा वास्तव समजून घेण्यासाठी हे अधूनमधून पाहायला हवंच.’ असा विचार करून पुन्हा इकडून तिकडून मिळालेला भारतीय बीपी पिनाकच्या घरी पाहिला जाई. आळीतले सर्वज्ञानी नेमाडे काकाही या कार्यक्रमांना हजर असत. खास करून भारतीय मॉडेल्सची टिंगल उडवण्यासाठी. पण म्हाताऱ्याने शोधून काढलेल्या आंघोळीच्या ‘लाईव्ह शो’तल्या मॉडल्स इंडियन बीपीसारख्या नसून खरंच सुंदर शरीराच्या होत्या. आळीतला फक्त म्हातारा हा असा एकमेव होता, जो पिनाकच्या घरी बीपी पाहण्यासाठी गेला नव्हता. कारण त्याची आजी त्याच्या पाठोपाठ आली, तर काय? या भीतीने पिनाकने त्याला घरी येण्यापासून मज्जाव केला होत. शिवाय शांताराम सकट अनेकदा तिथे जात असल्यानं म्हाताऱ्याला पिनाकच्या घरी न जाण्याची तंबीच त्यांनी देऊन ठेवली होती.

या घटनेनंतर मात्र म्हाताऱ्याला पिनाकच्या घरी नेऊन त्याचं सारं नग्नतेचं आणि त्यापुढचं कुतूहल शमवणं गरजेचं बनलं. पिनाकच्या घरी तेव्हा नुकताच सीडी प्लेअर आला होता. व्हीएचएसपेक्षा उत्तम क्वालिटी असलेल्या एकापेक्षा एक उत्तम सीडींचं अवलोकन पिनाककडे केल्यानंतर म्हाताऱ्यानी शाळेत वेळेवर येण्याचं मला कबूल केलं. तसा तो काही आला नाही. पण त्याच्या देहबोलीत थोडा फरक झाला. पिनाकच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जगातल्या गूढाचं रहस्य उकलल्यासारखा समाधानी त्याचा चेहरा झाला आणि पराक्रमांचा आरंभ त्याने करून टाकला.

ग्रॅज्युएशन अर्थात भलत्याच गोष्टीत

म्हाताऱ्यावर हेरगिरी करण्याचं काम मी चोख बजावलं नसल्याच्या संशयाने म्हाताऱ्याच्या आज्जीने माझ्यावरच हेरगिरी करायला सुरुवात केली. तिच्या सर्वकाळ चालणाऱ्या सास-बहू मालिका आणि छोट्या बाबूला सांभाळण्याच्या कामातून सवड काढत तिने मला कळू न देता एकदा माझा माझ्या क्लासपर्यंत पाठलाग केला. त्या दिवशी मी क्लासला बंक मारून क्लासमधल्या दोन मुलांसोबत उंडारण्याचं काम करत होतो. क्लास सुटण्याच्या वेळेत मित्राची सायकल घेऊन क्लासजवळ दाखल होऊन क्लासमधल्या समीरा भागवतच्या पाठी शायनिंग मारत होतो. जवळजवळ पटण्याच्या काठावर असलेल्या समीराशी वीर सावरकर चौकात बोलत असताना मध्येच म्हाताऱ्याची आज्जी समोर दाखल झाली. समीरा भागवत ती माझीच आज्जी आल्याचं समजून पळाली.

‘काय रे अजित? छान चाललाय हो अभ्यास. मम्मीला सांगते तुझ्या, सायकल किती छान चालवतोस ते. आमच्या विकूला शाळेत पोहोचायला उशीर का होतो हे सांगितलं नाहीस तू.’
‘त्याला दम लागतो चालताना म्हणून. तुम्हांला सांगणारच होतो. पण तुम्ही बऱ्याच दिवसांत दिसल्याच नाही.’
‘मग घरी येऊन सांगायचस ना. ही मुलगी कोण होती रे?’
‘मैत्रीण होती क्लासमधली. कालचा अभ्यास राहिला तो विचारत होतो.’
‘हो का? मी कुठे विचारलं कशाबद्दल बोलत होतास. आमच्या विकूलाही मैत्रीण आहे का?’
‘नाही.’
‘मग सांग त्याला एखादी करायला. सायकलही शिकव बरं का.’

हे म्हाताऱ्याच्या आजीचं मला दिसलेलं वेगळंच रूप होतं. पुढचे तीन दिवस म्हाताऱ्याला आळीत सायकल शिकवण्यात गेले. तो सायकल काही शिकला नाही, पण त्या शिकवणीत म्हाताऱ्याकडून काही नवे किस्से मला माहीत झाले.

घरात बाबू आल्यानंतर शांताराम सकट यांनी लगेचच सपत्नीक रात्री बेडरूममध्ये झोपण्यास सुरुवात केली होती. पत्नीने आणखी एकदा सूड उगवला तर काय? हा विचार त्यामागे असावा. तर या ऐतिहासिक घडामोडीनंतर म्हातारा आणि आज्जी हॉलमध्ये झोपत होते. त्यात आज्जी गोळ्या घेतल्यानंतर तिच्या कानाजवळ सुतळी बॉम्ब वाजवला तरी उठणारी नसल्यानं रात्री अकरानंतर रिमोटचा मानकरी बनलेल्या म्हाताऱ्याला आकाश ठेंगणं झालं. ज्या गोष्टी पाहण्यासाठी इमारतीच्या बांधकामांच्या जागांजवळ निरीक्षण बुरूज शोधण्यात वेळ खर्च होत होता त्या रिमोटच्या एका बटनानिशी दिसत होत्या. ‘लॉंज्री’ या कार्यक्रमाच्या अचूक वेळा त्याला पाठ झाल्या होत्या. त्याच्यामुळे मलाही माझ्या घरी त्या वेळेत एफटीव्ही आवडीने पाहता येत होता आणि ‘होट कुटूरा’, ‘विंटर कलेक्शन’ या बराच वेळ चालणाऱ्या कार्यक्रमांना टाळणं जमत होतं.

सहामाही परिक्षेत बीजगणितात दहा आणि इंग्रजीत शून्य मार्क मिळालेल्या म्हाताऱ्याचं इंग्रजी सुधारण्यासाठी त्याच्या नव्या क्लासमधील बाईंनी आज्जीला भलताच सल्ला दिला.

‘त्याला इंग्रजी सिनेमा पाहू द्या. कानावर सतत इंग्रजी पडल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल. त्याला इंग्रजी पुस्तकंही वाचू द्यात. अर्थ नंतर लागत जाईल. इंग्रजीचं ज्ञान वाढण्यासच मदत होईल.’

या सल्ल्यामुळे ‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो शंभर’ अशी अवस्था म्हाताऱ्याची झाली. दिवसा आणि संध्याकाळी म्हाताऱ्याची आई-आज्जी बाबू आणि टीव्हीला चिटकून असायची, त्यामुळे म्हाताऱ्याला आज्जी दुपारी भरपूर झोपायला सांगू लागली.

‘रात्री अकरा वाजल्यानंतर कर काय तो इंग्रजीचा अभ्यास.’ हे आज्जीने त्याला सांगून टाकलं.

रात्री अकरानंतर म्हाताऱ्याकडून म्यूट होणारा टीव्ही आता हळू आवाजात सुरू झाला. एफटीव्हीवरील आंतरराष्ट्रीय संगीत आणि बीट्स त्याच्या कानावर पडू लागल्या. स्टार मुव्हीज, स्टार वर्ल्ड, एमजीएम ही सारी चॅनल्स म्हाताऱ्याला इंग्रजी शिकवू लागली.

‘होली शिट’, ‘फक यू’, ‘बुलशिट’, ‘मोरॉन’,‘स्कमबॉग’, ‘किस माय अॅस’, ‘अॅसहोल’, ‘मदर फकर’, ‘गेट यूअर अॅस टू मार्स’, ‘यू फकिंग कॉकसकर’, ‘आय ऍम हिअर टू फक’, ‘रिस्पेक्ट द कॉक’ ही नवी वाक्यं त्याने अर्थ जाणून न घेता विविध चित्रपटांमधून स्वत:साठी उचलली. या सगळ्या शिव्या आहेत हे त्याला कुणी सांगितलं नव्हतं. तो ही वाक्यं आज्जीशी भांडताना हवी तशी आणि आठवतील तशी वापरी. त्या इंग्रजी वाक्यांचा अर्थ लक्ष्मीबाई सकट यांनाही माहिती नसल्याने म्हाताऱ्याच्या या इंग्रजी ज्ञानावर त्या फिदाच झाल्या.

‘तुझे आजोबा खूप चांगले इंग्लिश बोलायचे, वाचायचे. बघ जा त्यांच्या पेटाऱ्यात खूप इंग्लिश पुस्तकं आहेत.’

जे आपल्याला येत नाही, ते ढुंकूनही पाहायचं नाही, हा म्हाताऱ्याच्या आज्जीचा नियम होता. पण तरीही आज्जीने आपल्या नवऱ्याची आठवण म्हणून ते खूप जपत असलेल्या इंग्रजी पुस्तकांची बॅग बंदिस्त अवस्थेत ठेवली होती. अनेक दशकं बंद असलेला पेटारा म्हाताऱ्याने उघडला, तेव्हा त्याला ‘प्लेबॉय’ या मासिकाचे 1964 ते 1978 सालापर्यंतचं अंक सापडले. आपल्या घरातली इतकी संपत्ती उशिराने हाती लागली असल्याबद्दल त्याला त्याला दु:ख झालं. त्यानंतर आपल्या आजोबांबाबत आदर निर्माण झाला. मृत्यूच्या आधी दोन वर्षांपर्यत ते प्लेबॉय वाचत होते, ही नवी माहिती त्याला मिळाली.

म्हाताऱ्याला घरातल्या पेटाऱ्यात लागलेल्या या शोधानंतर लवकरच पाठीमागे बसणाऱ्या बेबलेची टारगट गँग म्हाताऱ्याची अनुयायी बनली. अत्यंत घाणेरड्या अवस्थेतल्या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पुस्तकांच्या जागी म्हातारा वर्गात आणत असलेल्या ग्लॉसी प्लेबॉयमुळे वार्षिक परीक्षेत इंग्रजीत सगळे पास होणार अशी स्थिती वर्गात तयार झाली.

मला एकट्याला म्हाताऱ्याने जानेवारी १९७८ सालातला प्लेबॉयचा अंक घरी घेऊन जाण्यासाठी दिला. त्यातल्या डेब्रा जेन्सनच्या फोटोचं अवलोकन बरेच दिवस करून कंटाळा आल्यानंतर तो अंक त्याला सोपवण्यासाठी एके दिवशी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याच्या आज्जीने मी काय घेऊन आलो याची पडताळणी करायला सुरुवात केली. मी आजीला मासिकाचा पत्ता लागून दिला नव्हता. तर त्या वेगळ्याच चौकशीवर उतरल्या.

‘मग काय म्हणते तुझी मैत्रीण?’
‘कोण?’ मी मला काहीच आठवत नाही असा आविर्भाव केला. समीरा भागवत हिच्यासोबत नंतर कधी फिरताना यांनी मला पाहिलं असणार अशी शंका मला यायला लागली.
‘आमच्या विकूला पण एक मैत्रीण मिळवून दे ना.’

हे आजीचं म्हणजे अवघडच होतं. एवढं हवं तर तुम्हीच सांगा ना. मी काय माझी मैत्रीण द्यायची म्हाताऱ्याला?

पुढे काही न बोलता मी त्याच्या घरातून निघालो. जिन्यात म्हातारा भेटला, तेव्हा त्याचा प्लेबॉय सोपवून मी घरी आलो. तर पुढच्या पंधरा मिनिटांनी आमच्या दारात म्हातारा रडवेल्या अवस्थेत आणि त्याची आज्जी आमच्याशी भांडण्याच्या अवस्थेत उभे होतं.

‘पाहा तुमच्या पोराचं प्रताप. सायकलवरून पोरी फिरवतो आणि ही असली घाणेरडी पुस्तकं आमच्या विकूला पुरवतो तुमचा अजित.’

पुढच्या काही क्षणांची मला काहीच धड आठवण नाही, कारण नेमके त्याच वेळी घरात असलेल्या बाबांचा बेशुद्ध पडेस्तोवर मार खाण्यावाचून माझ्याजवळ पर्याय उरला नव्हता. ‘कुठून आणलंस हे?’ या प्रश्नावर माझं उत्तर ऐकण्याआधीच मी इतका बडवला गेलो, की त्यानंतर आठ दिवस घरात एक शब्द बोललो नाही. डेब्रा जेन्सनच्या त्या प्लेबॉयमधली छायाचित्रं यापुढे कधीच पाहता येणार नाही, याचं मला तेव्हा खूप दु:ख झालं. तो अंक फाडला जाताना आणि त्यातली सारीच चित्र जळताना पाहताना माझं रडणं अधिक वाढलं होतं. म्हातारा लटकू नये म्हणून तेव्हा त्याचं नाव मी घेतलं नाही. रस्त्यावर पडलेलं मासिक उचललं यावर घरच्यांचा विश्वास बसला. पण नंतर माझ्यावर मानसोपचारतज्ञांच्या काउन्सलिंगपासून इतक्या गोष्टींचा मारा झाला की, नववीतला माझा अभ्यास बोंबलला. एका साध्या प्लेबॉयवरून जर इतका गजहब झाला तर मग पिनाककडे मी सुपरक्लास सिनेमा पाहताना पकडला गेला असतो, तर काय झालं असतं?

त्या घटनेनंतर आपण काहीतरी भयंकर वाईट गोष्ट करत आहोत अशी जाणीव पहिल्यांदा मला झाली. मी म्हाताऱ्यापासून बऱ्यापैकी अलिप्त राहू लागलो. शाळेच्या वर्षात उरलेल्या मी, माझा अभ्यास आणि समीरा भागवत यांच्यापलीकडचं जग माझ्यासाठी काही काळापुरतं बंद करून घेतलं. पण म्हातारा वर्गात आणि वर्गाबाहेर प्लेबॉयद्वारे नवनवे प्रताप करत होता. फक्त आता घरात इंग्रजीच्या नावावर रात्री त्याचा शरीरअभ्यास सुरू असल्याने शाळेत यायला त्याला नेहमीप्रमाणे उशीर होत होता.

या सर्व घडामोडींत म्हाताऱ्याची पिनाक आणि विन्या खांडेकरशी गट्टी जमली. सापडेल त्या वेळात सापडतील तितके विशेष सिनेमे पाहून म्हातारा यूबी अवस्था तोडण्यास निघाला. ‘माय फर्स्ट टीचर...’ लेबलखाली पिनाकने आणलेल्या शेकडो क्लिप्स पाहून त्याच्यात इतकी डेअरिंग पैदा झाली की त्याने आमच्या शाळेत त्याच वर्षी इतिहास-भूगोल शिकविणासाठी दाखल झालेल्या नेने बाईंना प्रेमपत्र लिहिलं. वर्गातल्या सगळ्याच मुला-मुलींसाठी तो भूकंपीय धक्का होता.

नेने बाईंकडून ते पत्र आचवल बाईंपर्यंत पोहोचलं. बाईंनी त्याच्या कंबरेखालचा सारा भाग छडीने आधी सोलून काढला. नंतर त्याच्या पत्रातल्या अशुद्ध लेखनाचे वाभाडे काढले. पालकांना बोलावून यापुढे असं काही केल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. पण या धमकीचा काही उपयोग झाला नाही. तिसऱ्या वर्षीही नववीत नापास होऊन दाखवत त्याने शाळेतून दाखला काढून घेतला. यानंतर म्हाताऱ्याचा हा ‘बाईंना प्रेमपत्र’ प्रकरणाचा किस्सा शाळेत अजरामर झाला. शाळा सोडून म्हाताऱ्याने १७ नंबरचा फॉर्म भरला आणि तो खासगीरीत्या दहावीची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला. शाळेत जावं लागणार नसल्याने त्याने एक महागडा नावाजलेला क्लास लावला आणि त्याच वर्षी पोर्नमध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा चंग बांधला.

म्युझिकल अर्थात गन्नम स्टाईल!

दहावी झाल्यानंतर माझा डिप्लोमा, कॉलेज-क्लासमधला अभ्यास आणि सोबतीला असलेल्या नव्या मैत्रिणीमध्ये मी अडकलो. घरी फक्त झोपण्यापुरतं येणं व्हायला लागलं. रविवारी कधीतरी नाक्यावर गेलो तर आळीतल्या घडामोडी कळत. म्हाताऱ्याबद्दल भरपूर दिवस काहीच ऐकलं नव्हतं. कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर बंक करत - दंगामस्ती करत केटी सोडवत - दोन-चार पोरींचे नकार पचवत कसंबसं ग्रॅज्युवेट व्हायचं आणि बाबा-काका-मामाच्या वशिल्यावर कुठे तरी चिटकायचं हे पारंपरिक तरुणांसारखं सरधोपट आयुष्य जगायचं म्हाताऱ्याला मान्य नव्हतं म्हणून तो कॉलेजमध्ये गेला नाही. खरं तर कॉलेजला जावं लागूच नये म्हणून त्यानं दहावीही पास केली नाही.

याच काळात एमटीव्ही, व्ही चॅनल तरुणांच्या मूलभूत गरजांपैकी एक बनल्याने भारतात पॉप म्युझिकची क्रेझ निर्माण झाली होती. इंग्लिश गाण्यांसोबत लकी अली, सिल्क रूट, युफोरिया, दलेर मेहंदी या बॅण्ड किंवा पॉपस्टारची गाणी लोकप्रिय होत होती. आठवड्याला एक नवा पॉप स्टार येत होता आणि बाजारात नवनव्या पॉप अल्बमचा पाऊस पडत होता. दोन-चार हिट गाण्यांमागे लोकमान्य आळीत असलेल्या डिसूझा म्युझिक अॅकेडमीमध्ये गिटार, मेंडोलिन शिकायला जाणाऱ्यांची गर्दी वाढत होती. आमच्या सोसायटीमध्ये कुणाल ओक, कौशिक खर्डे यांच्यासोबत म्हाताराही गिटारच्या क्लासला जातो हे मला कुणीतरी नाक्यावरच सांगितलं. ‘शंकर, एहसान, लॉय’ म्हणून त्यांची खिल्ली उडवली जात होती.

माझ्या माहितीप्रमाणे कॉन्व्हेण्टमध्ये शिकणारा कुणाल लहानपणापासून वॉकमन सोबत घेऊन बसलेला दिसे आणि एम. टीव्ही आल्यानंर सगळ्या हिंदी-इंग्रजी गाण्यांचा साठा असणारा कौशिक खर्डे हा सोसायटीच्या वार्षिक कार्यक्रमांत गाणीही म्हणत असे. या दोघांची संगीताची आवड सर्वपरिचित होती. पण म्हाताऱ्याची सांगीतिक चॉइस मलाच माहिती होती. म्हाताऱ्याला कुठलंही गाणं पूर्ण म्हणता येईल, याबाबत मला खात्री नव्हती. शिवाय त्याच्या घरी कोळीगीतं आणि तत्सम संगीताखेरीज मला काही वेगळं ऐकायला मिळालं नव्हतं. ‘कुच कुच होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ ही गाणी देखील त्याला माहिती नव्हती. ढोलक, तबला ठीक होतं पण गिटार म्हणजे म्हाताऱ्याचं अतीच होतं.

एक दिवस त्या तिघांना सोसायटीच्या लॉनमधून गिटार क्लासला जाताना पाहिलं तेव्हा मला म्हातारा ओळखूच येत नव्हता. टी शर्ट-जीन्स आणि गमबूटसदृश जाड शूज घातलेला म्हातारा मी पहिल्यांदाच पाहिला होता. त्याने खांद्यावर सॅकसारखी गिटार अशी धरली होती की एखाद्या पॉप स्टारसारखाच तो दिसत होता. कौशिक आणि कुणालने गिटार वेगळ्या पद्धतीने जमिनीपासून थोडय़ा वर अंतरावर बंदुकीसारखी धरली होती. त्या तिघांमध्ये चमकोपणा ओतप्रोत भरला होता, पण नंबर लावला असता तर म्हाताऱ्याचाच पहिला आला असता. हे तिघे म्युझिक बॅण्ड बनवण्याची स्वप्नं पाहत होते. ‘बॉकस्ट्रीट बॉईज’, ‘बॉयझोन’, ‘इंडस क्रीड’ हे कुणालचे आदर्श होते तर ‘सिल्क रूट’ हा हिंदी बॅण्ड कौशिकला आवडायचा. म्हाताऱ्याला त्याच्या आवडीच्या बॅण्डबद्दल विचारले, तर त्याचं ‘शाटा’ हे उत्तर येई. ‘मला कुणीच आवडत नाही. आपण स्वत:ची स्पेशल स्टाईल काढणार.’ असे तो सांगे. स्पेशल स्टाईल म्हणजे काय, याचं उत्तर त्याच्याकडे नसे.

या तिघांच्या भेटीनंतर तब्बल आणखी दोनेक वर्षे मी माझ्या डीग्रीच्या अभ्यासात आणि इतर कॉलेज इव्हेण्ट्समध्ये आणि कॉलेजजवळच्या दादर-बान्द्र्याच्या फ्रेण्डसर्कलमध्ये जास्तीत जास्त रमल्यामुळे मला या लोकांचा पत्ताच नव्हता. एकाच आळीत अन् एकाच सोसायटीत राहूनही माझं नाक्यावरचं जाणं बंद झाल्याने आळीतल्या घडामोडींचा मला काहीच पत्ता नव्हता. अगदीच सकाळी कॉलेजमध्ये निघायचो, तो क्लास, लायब्ररी आणि इतर गरजू अॅक्टिव्हिटी करून रात्री परतायचो.

एक दिवस कौशिक ट्रेनमध्ये भेटला तेव्हा मला त्याच्याकडून म्हाताऱ्याच्या सांगीतिक प्रगतीची माहिती मिळाली. म्हाताऱ्याला संगीताची जराही आवड नव्हती. शांताराम सकट यांनी पाठवलं म्हणून तो गिटार शिकायला डिसूझा म्यूझिक अॅकेडमीमध्ये जात होता. त्याच्या सुपर ड्यूपर स्लो प्रगतीमुळे बेसिक्स शिकवता शिकवता अॅलेक्स डिसूझा यांनाही कंटाळा यायला लागला. कौशिक, कुणाल अॅडव्हान्सपर्यंत गेले तरी म्हातारा बेसिक्स पूर्ण करू शकला नाही. त्याला नोटेशन वाजवताना एकाग्र होणं जमायचं नाही आणि भलत्याच फ्रेटवर बोट पडायचं. प्लकिंग करतानाही त्याचा हात कायम थरथरत राहायचा. प्रॉक्टिसऐवजी पोर्न पाहण्यात स्वारस्य असल्याने त्याची गिटार सहा-आठ महिन्यांत बोंबलली. वाजवण्यात प्रगती होईना म्हणून म्हाताऱ्याच्या आज्जीने अॅलेक्स डिसूझाला इतक्या शिव्या दिल्या की त्यांनी म्हाताऱ्याची फी परत केली. जगातले सारे बॅण्ड लोकप्रिय होऊन मग तुटतात. म्हाताऱ्याचा बॅण्ड मात्र बनायच्या आधीच तुटला. कुणाल-कौशिक यांचंही कशावरून तरी भांडण झालं होतं आणि दोघं एकमेकांशी बोलतही नव्हती. कुणालच्या मते कौशिक त्याच्याहून अॅडव्हान्स गिटार वाजवत होता. पण त्याची दृष्टी ग्लोबल नाही. कौशिक आता कुठल्याशा नवख्या हिंदी ऍक्रेस्ट्रात लीड गिटारिस्ट बनला होता. म्हातारा एका कराओके आर्टिस्टच्या नादाला लागून त्याच्याकडे हिंदी फिल्मी संगीत गायला शिकत होता. त्यासोबत कुठल्याशा खासगी इन्स्टीट्यूटमध्ये इलेक्ट्रिशियनचा पार्ट टाइम कोर्स करीत होता. त्याची फुल टाईम म्युझिक अन् पोर्नची सेवा सुरू होती.

पण म्हातारा जेव्हा गाणं शिकायचं ठरवू लागला तेव्हा भारतीय पॉप गाण्यांचा काळ ओसरला होता. सिनेमातली गाणी वेड्यांच्या इस्पितळात लिहिली गेली असावीत, अशा प्रकारची बनत होती. रीमिक्सच्या नादात लोक काहीही ऐकू लागले होतं. मग पाकिस्तानच्या सुश्राव्य बॅण्ड्सनी भारतीय गानशौकिनांवर काही काळ राज्य केलं. आंतरराष्ट्रीय म्युझिक ट्रेण्डशी एकरूप होण्याच्या नादात संगीतकारांकडून मूळ भारतीय सिनेसंगीतच विसरलं जाऊ लागलं होतं. हिमेश रेशमिया नामक वादळाने नाकात गायल्या जाणाऱ्या गाण्यांचा विक्रम केला होता. नाकात गाणाऱ्यांचा लोकांकडून मोठा तिरस्कार होत होता. अगदी एके काळी किशोर कुमारचा वारस म्हणून सद्दी चाललेल्या कुमार सानू नावाच्या स्टार गायकाचं नाकानं गाणं सगळ्या बाजूंनी नाकारलं जाऊ लागलं होतं. हिंदी गाणीच इतकी भीषण शब्दांनी बनू लागली होती की, शब्दातल्या मर्यादा लपवण्यासाठी संगीतकारांना म्यूझिक अधिकाधिक कर्कश करावं लागत होतं. हिप-हॉप, अर्बन म्यूझिक हिंदीमध्येही येऊ लागलं होतं. ‘जुनं ते सोनं’चं तुणतुणं वाजवणाऱ्या बुजुर्ग संगीतश्रोत्यांना नव्या गाण्यांवर तोंडसुख घेण्यासाठी छान काळ आला होता. या पिढीचं प्रतिनिधित्व करणारं कुठलंच देशी गाणं आमच्या पिढीकडे नसल्याने आमच्या पिढीला ग्लोबल संगीतात खूप कळतंय असा भ्रम झाला होता. त्यातूनच जगात हिट किंवा व्हायरल होत असलेल्या कसल्याही गोष्टीचं खूळ आम्हांला पहिले लागत होतं. खलीद, इनिग्मा, एमिनेम, केनी जी, एकॉन यांचं संगीत कळत असल्यासारखं गल्लोगल्लीत कुणाकडेही ऐकायला मिळत होतं.

म्हाताऱ्याला भेटून आणखी एक-दोन वर्षं गेली असतील. जिथे तिथे दक्षिण कोरियाचं ‘गन्नम स्टाईल’ गाणं ऐकण्याचा कार्यक्रम सुरू होता. मी कॉलेजच्या लायब्ररीत मैत्रिणीच्या लॉपटॉपवर हेडफोन लावून हे गाणं जेव्हा पाहिलं तेव्हा दोन हात उडालोच. दक्षिण कोरियातल्या कुठल्याशा श्रीमंत भागातल्या अतिश्रीमंत जीवनव्यवहाराची अदृश्य घोड्यावर बसून खिल्ली उडवणारं, पण एका शब्दानेही न कळणारं गाणं मी पुन्हा पुन्हा पाहिलं; ते मला ते गाणं आवडलं म्हणून नाही. मला ते जराही आवडलं नव्हतं, पण त्यातला ‘साय’ नावाचा बोदल्या कोरियन गायक आणि आळीतला म्हातारा यांच्यात चेहरेपट्टीपासून शरीरयष्टीपर्यंत भरभरून साम्य असल्यानं. जर म्हाताऱ्याला कोट चढवला आणि त्याची हेअरस्टाईल बदलली तर तो या सायचा जुळा भाऊच शोभेल याची मला खात्री होती.

त्या आठवड्यात मी बऱ्याच वर्षांनी जाणूनबुजून नाक्यावर गेलो, तर तिथे भरपूर दिवसांपासून म्हातारा जोरदार चर्चेत होता. म्हातारा सुटाबुटात फुल ‘गन्नम स्टाईल’ अवस्थेत आळीत फिरतो, पुढील महिन्यात आळीत होणाऱ्या डान्स कॉम्पिटिशनची तयारी तो ‘शामक डावर’च्या संस्थेशी संलग्न अॅकेडमीत करतोय ही माहिती मिळाली. म्हाताऱ्याला भेटण्यासाठी त्या आठवड्यात तीन वेळा मी त्याच्या घरी गेलो. सकट घरातला भविष्यातला पराक्रमी आता बराच मोठा झाला होता अन् बोबडा बोलत होता. त्याच्या पाठीमागे म्हाताऱ्याची आज्जी होतीच. तिन्ही वेळा मला म्हातारा भेटला नाही. भेटला तो एकदम कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी. डिट्टो कोरियन चेहरेपट्टीच्या माणसाकडून थेट मराठी भाषेत मला हाक आली.

‘काय शेट लोक! दिसत नाय हल्ली आळीत.’
‘कॉलेज आणि अभ्यास.’
‘आणि माल नाय का?’
‘हो, आहे ना.’
‘फायनल की नुसतं शॉटीशॉटी?’
‘अरे, तसलं नाही काही. तू बोल तुझं काय चाललंय.’
‘एकदम फॅण्टॅस्टिक. गन्नम स्टाईल गाण्यामुळे तो कोरियाचा साय जगात हिट झाला आणि इथे आपल्या शहरात मी. अरे, रस्त्यावर फिरताना कोणत्यापण पोरीशी मी हात मिळवू शकतो. कोणत्यापण पोरीला डोळा मारू शकतो. सगळ्या जवळ येतात रे. अन् लहान मुलं तर मला पाहून चेकाळतात. घोळका घालतात.’

म्हाताऱ्याला इतक्या फसफसणाऱ्या आनंदात मी कधीच पाहिला नव्हता. हे गाणं हिट झाल्यापासून दिवसभर या वेशात म्हातारा शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरत होता आणि लोक त्याच्याशी बेधडकपणे येऊन हात मिळवत होते.

गन्नम स्टाईल गाण्यातल्या कोरिओग्राफीनुसार अबलख घोड्यावरील नाच करून दाखवत त्याने मला टाळी मागितली.

‘उद्या आळीतली डान्स कॉम्पिटिशन पाहायला ये. आता नक्षी नेमाडे नसल्याने कॉम्पिटिशन खूप तगडी झालीय. नेहमी नक्षीच जिंकायची, आता दर वर्षी वेगळा विनर असतो. या वर्षी मीच जिंकून दाखवतो का नाय बघ.’

मी त्याला त्याच्या कॉम्पिटिशनसाठी ‘बेस्ट ऑफ लक’ दिलं. पण माझं खरं कुतूहल वेगळंच होतं.

‘म्हाताऱ्या, पोर्न पाहतो का नाय?’
‘पाहतो ना.’ त्याने सात इंची टॅबइतका मोठा मोबाईल काढला आणि त्यातला भला मोठा साठा दाखविला.
‘16 जीबी मेमरी कार्ड हाय. आता नाही कोंगाटी बायका पाहत. माझ्याकडे टॉप क्लास पोर्नस्टार आहेत. तुला दाखवतो. ही पेटा जेन्सन बघ.’
‘नंतर पाहीन रे मी. घरी डाउनलोड करून. तुझा अजून इंट्रेस्ट गेला नाही का यातला?’
‘आमच्याकडे कुठे तुमच्याकडे असतात तसे बेश्ट माल?’
‘पण इतकी वर्षे पाहून कंटाळा नाय आला?’
‘तसा येतो रे. पण ‘अब तो आदतसे मजबूर’ झालंय. पूर्वी पिनाककडून आणून डबल एक्स पाहायचो. आता ते बनणं बंदच झालंय वाटतं. ट्रिपल एक्स पाहताना पोर्नस्टार फक्त कपड्यात, कपडे काढताना आणि कपडे काढल्यानंतरची काही सेकंद सुंदर, आकर्षक वाटतं. नंतर मग सारं पुढं करणं किंवा मागं करणं. एखादा आवडलेला भाग परत परत पाहणं. बायांचं नागडेपण आता इतकं पाहिलंय की सालं हिंदी सिनेमांतल्या कपडे घातलेल्या हिरोईनी चड्डीलाच जास्ती त्रास देतात. तरी मी रात्री झोप येईस्तोवर एक-दोन नवे बीपी पाहतोच. मोबाईलमुळे सारं सोपं झालंय. पण यातली गंमत सांगू? पूर्वी मला हे नागडेपण स्ट्राँग करायचं, आता ते तितकंस महत्त्वाचं राहिलेलं नसल्यानं पूर्ण कपड्यातलं कुठलंही मादक शरीर मला पाहायला चालतं. मला पोर्न पाहिल्याचंच समाधान आता तंग कपडे घालणाऱ्या बायकाही देऊ शकतात. म्हणजे माझी किती मजा आहे बघ. सारं जगच माझ्यासाठी पोर्न बनलंय.’

एखाद्या तत्त्वज्ञाच्या आवेशात म्हाताऱ्याने सांगितलेलं हे शेवटचं वाक्य माझ्या डोक्यात कोरलं गेलं. म्हाताऱ्यानं गाठलेली पोर्नस्थिती भीतिदायकच वाटली. या सगळ्याचं पुढं काय होणार याची त्याला कल्पना नव्हती. अन् तशी मलाही ती कुठे होती?

दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी म्हाताऱ्याच्या डान्स कॉम्पिटिशला पाहण्यासाठी आळीत पोहोचण्याचं ठरवत होतो. पण कॉलेजच्या वेगवेगळ्या सबमिशन्सच्या कामांत आणि ट्रेनच्या नेहमीच्या गोंधळात कार्यक्रम संपण्याच्या आधी कधीतरी पोहोचलो. त्या वर्षीचा डान्स कॉम्पिटिशनचा विनर अर्थातच म्हातारा होता. त्याच्या डान्सला आलेल्या वन्समोअरची प्रेक्षकांची मागणी त्याने तीनदा पूर्ण केली होती. मी पोहोचलो तेव्हा म्हातारा स्टेजवर पुरस्कार घेत असताना सोसायटीतल्या प्रेक्षकांनी प्रचंड आरडाओरडा सुरू केला होता. पुन्हा एकदा गन्नमची रेकॉर्ड सुरू झाली होती आणि प्रेक्षक, स्टेजवरचे लोक आणि म्हातारा गाण्यावर पुन्हा नाचत होता.

माझं लक्ष गेलं तेव्हा स्टेजखाली म्हाताऱ्याची आज्जी तोच डान्स करत असताना दिसत होती. म्हाताऱ्याच्या विजयाच्या आनंदाने डोळ्यात पाणी भरलेलं असताना त्याची आज्जी बेभान होऊन नाचत होती. थोड्याच क्षणांमध्ये गन्नम स्टाईलवर डान्स करणाऱ्या आजीला पाहण्यासाठी स्टेजपासून सोसायटीतला सारा घोळका केंद्रित झाला. सगळ्याच स्मार्ट मोबाईल्सवर आज्जीच्या डान्सला वेगवेगळ्या अँगलने शूट केलं जाऊ लागलं. सारे सकट कुटुंबीयच स्टेजखाली या गाण्यावर नाचत होते. त्यात हौशी लहान मुलांचीही भर पडत होती.

गाण्याची रेकॉर्ड पुन्हा वाजवून आजीच्या डान्सलाही तुडुंब प्रतिसाद मिळत होता. दुसऱ्या दिवशी ती क्लिप सगळ्या सोशल मीडियामध्ये हिट होणार होती. त्यात कुणीच म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरही फोकस न केल्यामुळं म्हाताऱ्याचं आजीशी गन्नम स्टाईल गाण्यावर नाचल्याबद्दल जोरदार भांडणही होणार होतं. म्हाताऱ्याची कुठलीही गोष्ट कधी सुखांतापर्यंत गेली नव्हती. त्याच्या आयुष्यातल्या घडामोडींचा मी साक्षीदार होतो. कोरियन गायक सायच्या या गाण्यावर गणपती, नवरात्रोत्सव आणि पुढल्या साऱ्या उत्सवांमध्ये म्हाताऱ्याचं लोकप्रिय होणं अटळ होतं. कित्येक शाळा, किंडरगार्डन, पर्सनल पार्टीजमध्ये जोमदार कार्यक्रम करून म्हाताऱ्याचं टाळ्या मिळवणंही ठरलं होतं. म्हाताऱ्याचं लोकल सेलिब्रेटी होणंही कुणी अडवू शकणार नव्हतं. पण तरी त्या सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये गन्नम स्टाईल गाण्यावर सकट कुटुंबीय डान्स करीत असलेला आनंददायी क्षण पुढे सरकूच नये असं मला वाटत होतं. ‘सारं जग पोर्न’ असल्याचा म्हाताऱ्याला होणारा भास या गन्नम स्टाईलच्या क्रेझमध्ये कदाचित काही काळासाठी का होईना, संपणार होता. नव्या व्हायरल तडाख्यानं नंतर पुन्हा म्हातारा त्याच्या आभासी जगात जाण्याआधी हा क्षण खूप मोठा होता. म्हणूनच आयुष्यात पहिल्यांदा दिसणारा म्हाताऱ्याचा तो अत्यानंद साजरा करण्यासाठी मीदेखील म्हाताऱ्याच्या बाजूला उभा राहून अबलख घोड्यावरचा डान्स करत होतो.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

__/\__
अफलातून. प्र-ह-चं-ड हसले पण कुठेतरी त्या सकट कुटुंबियांचे व्यवहार इतके थंडगारपणे डिसेक्ट झाले त्याचं वाईटही वाटलं.
"म्हातारा" तर फारच खास पण अन्य पूरक व्यक्तीचित्रे छान जमली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या कथा आवडली एवढंच.

(मध्येच म्हातारा आनंदात राहायला लागल्याचं दिसल्यावर शेवट आनंदी करणार की काय अशी भीती वाटत राहिली. पण ते न झाल्यामुळे कथा आवडलीच आवडली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय जबरदस्त कथा आहे! भारीच.

तुमचं आणखी लेखन वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेखन आवडलंय, सुरुवातीला जरा टिपीकल वाटत होतं, पण नंतर त्यात जरा स्तर आहेत हे जाणवत राहिलं. अंकाच्या थीमलाही ही कथा साजेशी आहे. संपादकांनी ही कथा वसूल केल्याबद्दल त्यांचे आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

"कथा वसूल करण्याबद्दल" या शब्दांसाठी मुद्दाम प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अप्रतिम लिहिलिये गोष्ट! जबरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बापरे.. काय भन्नाट लिखाण आहे!
आवडलंच.
या लेखकाचं अजून कुठे काही प्रकाशित, ऑनलाइन वगैरे आहे का?
आवडेल वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

एकदम सॉलिड लिहिलं आहे.
ह्या दिवाळीतला जब्री फटाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळी व्यक्तिमत्वे नेमकी आणि स्पष्ट उभी केली आहेत - अफलातून कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा. प्लेबॉय फाडला त्या प्रसंगाच्या आसपास कुठेतरी झोप लागली. .
डुलकी संपल्यावर हा प्रतिसाद लिहुन खिडकी बंद केली.

दूर्दर्शन दोनवेळा झालं तेव्हा शाळेत असलेले लोक, तिथून एम्टीव्ही, तिथून टॅब, मधेच चाळीचा टॉवर फ्लॅट अन हे सगळं किती वर्षांत? आजीला आजोबांची पुस्तकं इंग्रजी म्हणून वाचता येत नाहित. ओके. पण प्लेबॉय? अहो चित्रांचं अस्तंय की ते! गोष्ट म्हणून ठिकेय, पण अजिबात हजम होत नाही. त्यामुळेच ग्रिप सुटली अन बोअर झालो.

रच्याकने : उदास बोचा, हसरा बोचा. बोचा म्हणजे चेहरा नव्हे,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

घटनांची जंत्री अंकाच्या विषयाला साजेशीच आहे, मात्र शैली रटाळ/पाल्हाळीक वाटली.
शिवाय तपशील, घटना बर्‍याच 'स्टिरिओटिपिकल' तर प्रसंगी चुकीचे आहेत. त्यामुळे कथा वाचून बर्‍यापैकी कंटाळलो Sad

या कथेला चांगला घाट यायला म्हणा किंवा अशा धर्तीच्या ललित लेखनाला चांगले म्हणायला लेखकाने यावर अजून बरेच काम करायला हवे होते. हा नुसताच पहिला खर्डा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा उल्लेखनीय आहे, शेवटचा परिच्छेद वाचून 'दोन वस्ताद' आठवले 'व्यक्ती आणि वल्ली'तले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0