Skip to main content

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १० - अंतिम)

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ३)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ४)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ५)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ६)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ७)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ८)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ९)

इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला.

त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे. युनिव्हर्सिटी, कॉलेजं इत्यादी होती, पण तुरळकच. ज्योर्दानोचे विचार प्रस्थापित विचारांच्या विरोधात होते. त्याचा विश्वास होता की आकाशात दिसणारे तारे हे सूर्याप्रमाणेच आहेत, पण लांबवर आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपल्या ग्रहाप्रमाणेच इतर अनेक अनंत विश्वं आहेत. हे विचार आणि मेरीचं अनाघ्रातपण, जीजस, ट्रिनिटी या व इतर ख्रिश्चन कल्पनांच्या विरोधात मतं व्यक्त करणं आणि विश्वाविषयी असल्या कल्पना बाळगणं यापायी रोमन इन्क्विझिशनने त्याला 'हेरेटिक' (प्रस्थापित कल्पनांपेक्षा वेगळा विचार बाळगणारा) ठरवलं. त्याला त्याचे शब्द जाहीरपणे मागे घेण्याची संधी दिली गेली. पण त्याने ती नाकारली व आपल्या वेगळ्या विचारांवर शिक्कामोर्तब केलं. या गुन्ह्याबद्दल अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूदंडाची सोय होती. पण बर्निंग अॅट स्टेक किंवा खांबाला बांधून जाळणं ही शिक्षा विशेष लोकप्रिय होती. ती त्याला मिळाली.

गॅलिलिओ गॅलिलिइलादेखील 1635 मध्ये याच रोमन इन्क्विझिशनचा असाच अनुभव आला. गॅलिलिओ आणि ज्योर्दानो यांच्यात तशी बरीच साम्यं आहेत. दोघांनाही सुरूवातीला त्यांच्या कर्तृत्वामुळे उच्च स्थानावरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. दोघांनाही अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची हौस होती. गॅलिलिओ त्याच्यापेक्षा थोडा लहान असला तरीही त्यांचा कर्तृत्वाच्या काळात थोडा ओव्हरलॅप आहे. 1591 साली ज्योर्दानोला ज्या गणित विभागाचं चेअरमनपद हवं होतं ते त्याला मिळालं नाही, तर पुढच्या वर्षी गॅलिलिओची त्या पदासाठी निवड झाली. काळ, परिस्थिती आणि विचारपद्धती सारखी असली तरी त्यांच्या स्वभावात फरक होता असं म्हणता येईल. ज्योर्दानो परखड आणि फटकळ म्हणून प्रसिद्ध होता. तर गॅलिलिओ जाहीरपणे तरी विशिष्ट मर्यादा राखून होता. मात्र गॅलिलिओलादेखील पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्याबद्दल इन्क्विझिशनकडून बोलावणं आलं. त्याने मात्र शहाणपणा करून आपली विधानं मागे घेण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणून त्यांनी दयाळूपणा दाखवून फक्त त्याच्या सर्व (आजवरच्या आणि आगामी) पुस्तकांवर बंदी घातली. आणि गॅलिलिओला नजरकैदेची अत्यंत मवाळ शिक्षा दिली.

या इतिहासाचा लेन्स्की आणि श्लाफ्ली यांच्यात घडलेल्या पत्रव्यवहाराशी काय संबंध? गॅलिलिओ आणि ज्योर्दानो दोघेही भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते, लेन्स्की जीवशास्त्राचा. श्लाफ्लीने लेन्स्कीकडे पुरावे मागितले तर रोमन चर्चतर्फे त्या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांना शिक्षा देण्याची शक्ती रोमन इन्क्विझिटर्सकडे होती, तर श्लाफ्लीकडे तसे काही व्यापक अधिकार नव्हते. वरवर बघता फरकच जास्त दिसतात. आणि हे फरकच खरे तर महत्त्वाचे आहेत.

भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र असो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा दावा असो की उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पाहिली असं म्हणणं असो - दोन्हीची जातकुळी काही महत्त्वाच्या पातळींवर सारखी आहे. ज्योर्दानोचे विचार आणि लेन्स्कीचे निष्कर्ष हे दोन्ही, जग कसं चालतं याबाबतच्या निरीक्षणांतून आलेले होते. दोघेही विज्ञानवादी दृष्टिकोनातून जे सत्य गवसलं आहे ते जगापुढे मांडत होते. याउलट विचारसरणी म्हणजे आंधळ्या विश्वासाची. रोमन इन्क्विझिटर्स आणि श्लाफ्लीची. बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ज्ञान आणि बाकीचं सगळं पाखंड ही आंधळी विचारसरणी दोन्हीतही दिसते. एका अर्थाने हा विचारसरणींमधला लढा आहे. श्रद्धा विरुद्ध विज्ञानामधला लढा. निरीक्षणांमधून दिसणारं ते सत्य मानणारे आणि पुराणपुस्तकात लिहिलेलं, ते देवाने सांगितलेलं आहे म्हणून सत्य मानणारे यांच्यातला झगडा. हा शतकानुशतकं चालू आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरूवातीला हा लढा देणाऱ्यातले ज्योर्दानो आणि गॅलिलिओ. त्यांच्यानंतर चारशे वर्षांनी तीच जागा लेन्स्कीने घेतलेली आहे.

या चारशे वर्षांत या लढ्याच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेला दिसतो. ज्योर्दानोच्या काळात बायबलची शक्ती महाकाय होती. नवीन विचार मांडणं हे धोकादायक काम होतं. गॅलिलिओ, ज्योर्दानो या दोघांनाही आपल्या विचारांतून बायबलच्या सत्यांना धक्का लागत नाही असं त्यांच्या विचारांबरोबरच सांगण्याची जबाबदारी होती. पण एका विशिष्ट मर्यादेबाहेर कोणी बायबलविरुद्ध बोललं तर चर्च ते खपवून घेत नसे. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात अशा पाखंड्यांना खेचून त्यांना शिक्षा देत असे. बायबलमध्ये सांगितलेलं 'सत्य' प्रस्थापित होतं. सर्वांचा त्यावर विश्वास असो नसो, विरुद्ध विचार हे तणांप्रमाणे निपटून काढले जायचे. त्यामुळे तेच प्रस्थापित सत्य अजूनही पुढे प्रस्थापित राहील अशी काळजी घेतली जात होती. याचं कारण उघड आहे. या विचारांना उचलून धरण्याचं, जनतेत पसरवण्याचं कार्य करणाऱ्या धर्मसंस्थेला प्रचंड शक्ती प्राप्त होत होती. राज्यसत्तेतला काही हिस्सा धर्मसंस्थेच्या पुढाऱ्यांना मिळायचा. आर्थिक फायदाही प्रचंड होता. या सगळ्याचा पाया होता तो म्हणजे सामान्य जनतेत पसरलेले विशिष्ट विचार - देवाने या विश्वाची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली, प्राण्यांची निर्मिती केली. तो सर्वशक्तिमान आहे. आणि त्याच्याशी बोलायचं असेल तर ते आमच्यामार्फतच बोललं पाहिजे. या बोलण्याच्या अधिकारासाठी जो पैसा लागतो तो जनतेकडून, श्रीमंतांकडून उकळून घेण्याचा अधिकार धर्मसत्तेकडे आला. त्यामुळे हे सगळं खोटं आहे, खरं नाही असं सांगणारांकडून या संस्थेच्या पायावरच हल्ला होत होता. आणि तो धोका निवारण्यासाठी जागोजागी इन्क्विझिशनची क्रूर व्यवस्था निर्माण झाली होती.

याच संस्था अजूनही बदललेल्या स्वरूपात दिसतात. पण त्यांच्या शक्तीत प्रचंड फरक पडलेला आहे. गॅलिलिओच्या काळात धर्मसंस्था ही एखाद्या महाबलाढ्य किल्ल्याप्रमाणे होती. आणि तीवर एखाद दुसरा शास्त्रज्ञ आपल्या विचारांच्या घोड्यावर बसून हल्ला करत असे. त्या किल्ल्याच्या फार जवळ यायला लागला तर तोफा डागून त्याचा खात्मा सहज केला जायचा. किंवा अगदीच ठार मारायचं नसेल तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला नामोहरम केलं जायचं. पण ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. लवकरच पाश्चिमात्य राष्ट्रांत चर्चचा पगडा कमी व्हायला लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं. इन्क्विझिशनचे सर्व अधिकार आपोआप कमी होत जात एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला या संस्था संपुष्टात आल्या. रोमन इन्क्विझिशन ही संस्था तत्वतः जिवंत आहे, पण 'कॉंग्रेगेशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ फेथ' या गुळमुळीत नावाखाली. अर्थातच त्यांना कोणाला चौकशीसाठी बोलवण्याचे अधिकार नसावेत. असल्यास गेल्या कित्येक दशकांमध्ये ते वापरले गेलेले नाहीत. त्यांनी सुनवलेल्या शिक्षा सरकारं अमलात आणतील याची शक्यता शून्य आहे.

आता वैज्ञानिकांना रास्त संरक्षण आहे. जगभर असलेल्या सेक्युलर सरकारांनी कायद्याचा भरभक्कम पाठिंबा वैज्ञानिक पद्धतींना दिलेला आहे. जगभर - किमान जिथे धार्मिक राज्यकर्ते नाहीत तिथे - प्रमाण सत्य म्हणून वैज्ञानिक पद्धतींनी शोधून काढलेलं सत्य शाळांमध्ये शिकवलं जातं. न्यायपद्धतीत वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरले जातात. श्लाफ्लीची इन्क्विझिशन मनोवृत्ती असणाऱ्यांना लेन्स्कीच्या वैज्ञानिक विचारांचं तोंड बंद करण्याची शक्ती नाही. फारतर थोडाफार उपद्रव देण्याची क्षमता आहे. उलट लेन्स्कीसारख्या मान्यवर शास्त्रज्ञांना कायद्याचं संरक्षण आहे. त्याच्या शेवटच्या पत्रात जी अरेरावीची भूमिका लेन्स्कीला घेता आली ती या सुरक्षिततेच्या भावनेतूनच. रोमन इन्क्विझिशनला ज्योर्दानोने अत्यंत कळकळीने 'माझं सत्य बायबलला विसंगत नाही' असं सांगण्याचा प्रयत्न केला, करावा लागला. आजच्या काळात श्लाफ्लीसारख्यांकडून पाखंड्यांना शिक्षा देण्याचा अधिकारच काढून घेतला गेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही, यावर तर आता चर्चाही होत नाही, इतकं ते सत्य प्रस्थापित झालेलं आहे. लेन्स्कीकडे सत्य होतं, आणि बायबलच सत्य मानणाऱ्यांच्या तोंडावर ते फेकून मारून तो त्यांचा पराभव करू शकला. ज्योर्दानो किंवा गॅलिलिओला ते करणं शक्य नव्हतं.

लेन्स्कीच्या सत्याचा विजय हा व्यापक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय आहे. हे युद्ध गेली अनेक शतकं चालू होतं. त्यात अनेकांचे बळी पडले. 1540 ते 1794 या कालखंडात लिस्बन, पोर्टो, कोइंब्रा आणि एव्होरा इथल्या स्पॅनिश इन्क्विझिटर्सनी 1175 लोकांना जाळून मारलं. जाळून मारण्यासाठी अर्थातच जे अपराध कबूल करून घेतले जात ते त्या व्यक्तीने कबूल करावे म्हणून महाभयंकर छळ करणारी सामुग्री मुक्तहस्ताने वापरली. हे फक्त चार शहरांमध्ये. संपूर्ण युरोपभर आणि त्यांच्या वसाहतीत कमी अधिक प्रमाणात त्या काळी असले प्रकार चालू होते. पण तरीही यथावकाश जनसामान्यांमध्ये हे आधुनिक ज्ञानाचे विचार मुरले. ज्ञान पसरलं. आणि ते इतकं फैलावलं की शेवटी पाखंडाला अशी शिक्षा करण्याचा प्रयत्नच सामान्य जनतेला खटकायला लागला. आणि चर्चला हे प्रकार गुंडाळून ठेवावे लागले. चर्चचा ज्ञानावरचा पगडा नष्ट झालेला आहे. बायबलमधलं ज्ञान हेच सर्वोच्च या भूमिकेचा किल्ला ढासळून पडला आहे.

मर्ढेकरांनी म्हटलेलं आहे -

या जगण्यातुन या मरणांतुन
हसण्यातुन अन् रडण्यातुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या

अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल.

बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे. हळूहळू पेटणाऱ्या ठिणग्यांनी, एकमेकांना भेटून पेटणाऱ्या ज्योतींनी अंधाराच्या इतिहासावर मिळवलेला!

(समाप्त)

Node read time
6 minutes
6 minutes

मेघना भुस्कुटे Mon, 13/05/2013 - 11:23

In reply to by ऋषिकेश

असेच म्हणते. शेवट लईच आवडला.

अवांतरः ('मारुती कांबळेचं काय झालं?' या चालीवर हे वाचावं.) बळवंतबुवांचं काय झालं?

मी Mon, 13/05/2013 - 12:04

उत्क्रांतीवादाच्या संदर्भात लेन्स्कीचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयोग आहे यात शंका नाही, त्यानिमित्ताने ही लेखमालाही उत्तम आणि महत्त्वपूर्ण आहे. या सृष्टीमधे लेन्स्कीच्या हस्तक्षेपाशिवाय किंवा लेन्स्कीच्या जाणिवेशिवाय अनेक जीव उत्क्रांत होत आहेत, त्यामुळे हा उत्क्रांतीवाद सिद्ध करण्यासाठी जाणिवपुर्वक केलेला एक प्रयत्न होता हे मान्य आहेच व त्याचे निरिक्षण देखील मान्य आहेच.

पण, ह्या प्रयोगाच्या संदर्भातच एक शंका अशी आहे की इ-कोलाय ह्या बॅक्टेरियाच्या दृष्टीकोनातून लेन्स्की काय असावा? इ-कोलायच्या नियत जगामधे/संपूर्ण घराण्यामधे/अनेक पिढ्यांमधे(आयुष्यात) पाहिजे तो हस्तक्षेप करणारा किंवा न-करणारा लेन्स्की इ-कोलायसाठी काय आहे?

राजेश घासकडवी Mon, 13/05/2013 - 16:17

In reply to by मी

इ-कोलाय ह्या बॅक्टेरियाच्या दृष्टीकोनातून लेन्स्की काय असावा?

इ-कोलायला दृष्टिकोन नाही. आपल्या मानवी दृष्टिकोनातून सर्वच सजीवांना आपण आपल्यासारखे आत्मा, दृष्टिकोन, स्वची जाणीव असलेले गृहित धरतो. पण या स्वच्या जाणीवेतही एक उतरंड आहे. बॅक्टेरिया हे या उतरंडीच्या अगदी पायथ्याशी येतात. म्हणजे त्यांच्याकडे आपल्याला आश्चर्यकारक क्षमता असलेला रेणूसंचय किंवा सूक्ष्मयंत्र म्हणून बघता येतं.

हा जर प्रश्न व्यापक केला तर कुत्रे, गाई वगैरेसारख्या स्वची जाणीव असलेल्या प्राण्यांबाबत अधिक लागू ठरतो. त्यांच्यासाठी गेली कित्येक शतकं हे प्रयोग होत आहेत. ते आक्षेपार्ह वाटतात का? असल्यास ते योग्य की अयोग्य याची चर्चा करता येईल.

ऋषिकेश Mon, 13/05/2013 - 16:23

In reply to by राजेश घासकडवी

माझ्यामते मी यांची शंका वेगळी असावी. (नसेलही पण त्यांचा प्रतिसाद वाचून मला असे वाटले)
इतके वर्ष आपल्यावर प्रयोग होत आहेत हे बघता, असे प्रयोग होण्याची शक्यता गृहित धरून, या जीवात (इथे इ-कोलाय) काहि म्युटेशने निर्माण होण्याची शक्यता असेल का? असा काहिसा प्रश्न असावा. म्हणजे बर्‍याच मोठ्या संख्येवर सतत प्रयोग करणारा त्यांच्या नैसर्गिक बदलांत ढवळाढवळ करत असेल का?

का विश्वातील या जीवांची संख्या इतकी मोठी आहे की कित्येक वर्ष गुणिले प्रयोगातील संख्या हा हिशेब करूनही येणारे उत्तर नगण्य आहे?

राजेश घासकडवी Mon, 13/05/2013 - 16:45

In reply to by ऋषिकेश

लेन्स्कीच्या पत्रातला पहिला ता. क. -

Simple calculations imply that there are something like 10^20 = 100,000,000,000,000,000,000 E. coli alive on our planet at any moment. Even if they divide just once per day, and given a typical mutation rate of 10^-9 or 10^-10 per base-pair per generation, then pretty much every possible double mutation would occur every day or so. That’s a lot of opportunity for evolution.

लेन्स्कीने इतक्या वर्षांत वापरलेले इ-कोलाय हे 10^12 च्या आसपास असावेत. तेव्हा हो, संपूर्ण जगात जे काही आपोआपच चालतं त्या मानाने लेन्स्कीने जे घडवून आणलं ते नगण्य आहे.

धनंजय Mon, 13/05/2013 - 20:02

In reply to by राजेश घासकडवी

कदाचित "मी" यांची शंका अशी असावी :

मनुष्य आणि सर्व जीवजंतू असलेले विश्व म्हणजे कोण्या प्रयोगशाळेतले काचपात्रच आहे, जणू. मनुष्यांच्या मतीला जे नैसर्गिक सिलेक्शन प्रेशर म्हणून भासते, ते खरे तर त्या वैश्विक प्रयोगकर्त्याने ठरवलेले असे आहे. लेन्स्की नसता, तर ई.कोलायना ग्लुकोझऐवजी सायट्रेटचे द्रावण कुठे भेटते. त्याच प्रमाणे वैश्विक प्रयोगकर्ता नसता, तर मनुष्यांसह सर्व जीवजंतूंना गेली लाखो वर्षे पृथ्वीवर दिसली ती परिस्थिती कशी दिसती?

("मेट्रिक्स" चित्रपटांत ही कल्पना छान चितारलेली आहे. मेट्रिक्स-जगातील सर्व लोकांचे अनुभव एका संगणक-प्रणालीतून उद्भवत असतात.)

मी Mon, 13/05/2013 - 22:18

In reply to by धनंजय

मुद्दा नेमका पकडला आहे, पण मांडणी जरा वेगळी करतो.

>>मनुष्य आणि सर्व जीवजंतू असलेले विश्व म्हणजे कोण्या प्रयोगशाळेतले काचपात्रच आहे, जणू.

बरोबर.

>>मनुष्यांच्या मतीला जे नैसर्गिक सिलेक्शन प्रेशर म्हणून भासते, ते खरे तर त्या वैश्विक प्रयोगकर्त्याने ठरवलेले असे आहे.

हे थोडे वेगळ्या पद्धतिने मांडतो, नैसर्गिक सिलेक्शन होत असतानाही त्यात 'कोणाचाच' हस्तक्षेप नाही हे सिद्ध करणे लेन्स्कीच्या प्रयोगात शक्य आहे काय?

>>("मेट्रिक्स" चित्रपटांत ही कल्पना छान चितारलेली आहे. मेट्रिक्स-जगातील सर्व लोकांचे अनुभव एका संगणक-प्रणालीतून उद्भवत असतात.)

काहीसा सहमत.

धनंजय Tue, 14/05/2013 - 01:08

In reply to by मी

> नैसर्गिक सिलेक्शन होत असतानाही त्यात 'कोणाचाच' हस्तक्षेप नाही
प्रश्न तसा संदिग्ध आहे. येथे "कोणा"चाच शब्दातील एकवचन गंभीरपणाने हिशोबात घ्यायचे आहे काय? नाहीतर वेगवेगळ्या वेळी भरपूर जनावरांचे, मनुष्यांचे, वगैरे हस्तक्षेप होतच आहेत. म्हणजे डोडो पक्ष्यांची अंडी खाणारी डुकरे डोडो पक्ष्याच्या उत्क्रांतीत हस्तक्षेप करतच होती. आणखी कुठल्या परिस्थिती आणखी वेगळे कोणी हस्तक्षेप करत होते. हस्तक्षेप करणारे "कोणीतरी" अनेकवचनी असेल, तर सिद्धच आहे.

पण सदासर्वकाळ हस्तक्षेप करणारी तंतोतंत एकच व्यक्ती ("एंटिटी" या अर्थी) आहे हा कल्पनाविलास फारच नेमका झाला. मेट्रिक्स चित्रपटात एक विवक्षित कल्पनाविलास आहे, आणखी कुठल्या चित्रपटात आणखी कुठला. "लाइफ ऑफ पाय" पुस्तका/चित्रपटाचे असे इतिवाक्य आहे, की हा कल्पनाविलास सुंदर आहे, म्हणून करण्यालायक आहे.

मी Tue, 14/05/2013 - 07:55

In reply to by धनंजय

पण सदासर्वकाळ हस्तक्षेप करणारी तंतोतंत एकच व्यक्ती ("एंटिटी" या अर्थी) आहे हा कल्पनाविलास फारच नेमका झाला.

'सदासर्वकाळ हस्तक्षेप' असे मी म्हणत नाही, नियत प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकणारी(हस्तक्षेप करेल अथवा करणारही नाही) एंटिटी असे ठीक राहील. लेन्स्कीच्या प्रयोगातील इ.कोलायला ठरावीक पातळीवर जाणीव असेल असा विचार करून त्या भूमिकेतून विचार केल्यास लेन्स्कीचे किंवा प्रयोग-साथीदारांचे अस्तित्व हा कल्पनाविलास कितपत नेमका असेल?

धनंजय Tue, 14/05/2013 - 17:33

In reply to by मी

अतिनेमकेपणा "एकच"बाबत - जेव्हा-जेव्हा झाला, तेव्हा-तेव्हा एकच एंटिटी, हा फारच नेमकेपणा झाला. एक वा अनेक हस्तक्षेप करणारे... हे सर्व कल्पनाविलास समसमान आहेत.

लेन्स्की रिटायर झाल्यावर ती प्रयोगशाळा नंतर कोणीतरी चालवू शकेल. असे काहीतरी.

पण हे सर्व ललितकलानिर्मितीकरिता ठीक आहे.

Nile Tue, 14/05/2013 - 23:39

In reply to by धनंजय

कल्पनाविलास म्हणून जरी मी यांच्या म्हणण्यावर विचार केला तरी..

बॅक्टेरीया आणि मनुष्य यातील फरक ठळक आहे, बॅक्टेरीयांना त्याच्या काचेच्या पात्रातील 'सृष्टी' नियम काय आहेत हे माहित नाही/शोधता येत नाही. हा फरक दूर केला तर बॅक्टेरीयांना कर्ता-करविता कोण आहे हे कळू का शकणार नाही? (म्हणजे अगदी कर्ता मानव दिसला नाही तरी त्यांच्या सृष्टीत फरक करणारा कोणी आहे हे तरी कळेल)

नितिन थत्ते Wed, 15/05/2013 - 13:47

In reply to by Nile

हा "कोणी"तरी सृष्टीत फरक हेतुपूर्वक करत आहे का?

मानव जन्माला येण्याच्या दिशेने उत्क्रांती व्हावी म्हणून त्या "एकाने" ऑक्सिजन निर्माण करणार्‍या वनस्पती आधी निर्माण केल्या का? वगैरे....

मी Mon, 13/05/2013 - 22:33

In reply to by राजेश घासकडवी

इ-कोलायला दृष्टिकोन नाही.

माइक्रोबायल इन्टेलिजन्सबद्दल दुमत नसावं, तसेच प्राण्यांच्या कॉन्शसनेसबद्दल बरेच वाद-प्रतिवाद आहेत, प्राण्यांना मनुष्यासारखा दृष्टीकोन(कॉन्शसनेस) नसल्याचे मत देकार्तने व्यक्त केले होते पण आज ते थोडेसे शंकास्पद विधान आहे.

असं असल्यास माईक्रोबायल इन्टेलिजन्स/कॉन्शसनेसच्या दृष्टीकोनातुन लेन्स्कीचे काय अस्तित्व आहे, आजपर्यंत उपलब्ध असलेल्या इ.कोलायच्या पिढ्या लेन्स्कीचा हस्तक्षेप जाणवण्याइतपत प्रगत झाल्या नाहीत असे म्हणता येईल काय? त्या पुढे तशा उत्क्रांत होतील काय?

अर्धवट Mon, 13/05/2013 - 12:19

अतीशय सुंदर
कसलाही अभिनिवेश न ठेवता व कसलाही मुलाहिजा न बाळगता असं दोन्ही लिहीणं ही म्हणजे अगदी म्हणजे अगदी कमालच झाली.

मन Tue, 14/05/2013 - 08:41

लेखमाला आवडली असेच नव्हे तर काही शिकवून जाणारी वाटली. प्रिंटआउट्स घेउन ठेवल्या आहेत पुन्हा कधीही प्रवासात वगैरे मोकळा वेळ मिळताच पुन्हा पुन्हा वाचायला.

मन Wed, 15/05/2013 - 13:16

In reply to by मन

ह्या अंकाच्या एकूण टोनवरून "बरे झाले धर्माच्या कचाट्यातून सुटलो ते" असे वाटणे संभव आहे. धर्माच्या नावाखाली मागील हजारो हिंसा झालेल्या आहेतच. पण एक लक्षात घ्या धर्म हे फक्त टूल्/साधन आहे. मूळ समस्या माणसाची इतर माणसांवर "सत्ता" गाजवण्याची प्रवृत्ती आहे. सत्ता उलथण्याच्या भयातून येणारे ते शिक्षेच्या नावाखालचे क्रौर्य आहे.
अशा दिलेल्या शिक्षा ह्या मध्ययुगात इतरही ठिकाणी दिसतात्.राजकिय विरोधकांनाही असेच संपवले जायचे.इंग्लंड-फ्रान्स मधील शंभर वर्षांच्या युद्धाला आधी मार खात असलेल्या फ्रान्सच्या बाजूने निर्णायक वळण देणार्‍या सोळा का अठरा वर्षाच्या कोवळ्या योद्ध्हा पोरीलाही, जोन्-ऑफ्-आर्कलाही असेच जिवंत जाळून मारले गेले. ह्या सर्वच शिक्षा मध्ययुगीन काळाला साजेशा आहेत. तिने धर्माला विरोध केला नव्हता.म्हणण्याचा मुद्दा हाच की क्रौर्य हे धर्माचे आउटकम नाही. क्रौर्य हे सत्ता राखण्याच्या प्रयत्नातून येते.मग लेबले कशी का बदलेनात.
.
अतिअवांतर :-
अत्यंत प्रागतिक विचारांचा,नागरिकांना मोकळ्या हवेत श्वास घेउ देणारा देश म्हणून अमेरिका प्रतिमा उभी करु पाहतो. कित्येकांना ते पूर्ण सत्यही वाटते. पण अमेरिकेचे हे मोकळे विचार्, स्वातंत्र्य हे असलेच तर त्यांच्या नागरिकांपुरतेच आहेत. इराक युद्धात वगैरे ह्यांनी कहर केलेला आहे.लष्कराने लष्कराशी युद्ध करायचे हा नियम बाजूला ठेवून सरळ नागरी शिरकाणही झालेले आहे. मृत नागरिकांची संख्या एक लाखाच्या घरात जाते म्हणतात(१लाख्??!!आपल्;याकडे दंगलीत वगैरे काही हजार लोक गेले तरी आपण अत्यंत गंभीर घटना म्हणतो, त्या स्केलवर हे मोजून पहा.). थोडक्यात, धर्म गेला, म्हणून ही वृत्ती गेली असे होणार नाही. त्यासाठी मानसिक उत्क्रांती आवश्यक आहे.

राजेश घासकडवी Wed, 15/05/2013 - 15:58

In reply to by मन

धर्म हे फक्त टूल्/साधन आहे. मूळ समस्या माणसाची इतर माणसांवर "सत्ता" गाजवण्याची प्रवृत्ती आहे.

बरोबर. ही सत्ता राखण्यासाठी जे साधन वापरलं त्याची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) वैज्ञानिक सत्याला विरोध करण्याची होती. विरोधकांना कापून काढणं, जाळून टाकणं वगैरे सगळेच सत्ताधारी त्याकाळी करत. पण धर्माचं साधन वापरण्यामुळे त्यांबरोबरच सत्याचाही बळी जायचा. त्यामानाने राजसत्ता जपण्यासाठी फक्त 'राजा हरामखोर आहे' हेच सत्य मरायचं. आजच्या काळात सुदैवाने या दोन्ही प्रकारच्या सत्यांना अधिक सुरक्षितता आहे.

स्मिता. Tue, 14/05/2013 - 16:08

लेखमाला अतिशय आवडली. सगळे लेख एकमेकापासून बर्‍याच कालांतराने आल्यामुळे जरा लिंक तुटल्यासारखी वाटत होती. वाचनखूण करून ठेवली आहे. निवांत केव्हातरी सगळे भाग एका पाठोपाठ वाचता येतील.

लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली ही कथा मागच्याच भागात संपली असली तरी हा विवेचनात्मक भाग फार आवडला.

अश्याच माहितीपूर्ण लेखमाला आणखी येवू द्यात.

............सा… Tue, 14/05/2013 - 19:21

म्हणजे होणारे बदल हे पूर्णपणे यादृच्छिक नसून गुरुत्वाकर्षण ज्या अव्याहतपणे चेंडू डोंगरमाथ्यावरून खाली खेचते तशीच शक्ती प्राण्यांच्या शरीरांवर हजारो पिढ्यांमधून हळूवारपणे पण तितक्याच निश्चितपणे बदलण्यासाठी कार्यरत असते, आणि ते बदल घडवून आणते. त्याशिवाय हा बदल बाराही गोत्रांमध्ये दिसणं शक्य नाही. ईश्वराने सर्व प्राणी निर्माण केले आणि ते 'ठेविले अनंते तैसेचि' राहिले या गृहितकाला तर इथेच थेट तडा गेलेला आहे.

घरी जाऊन, नीट वाचणार आहे. ही सांगोपांग लेखमाला फार ,खूप, अत्यंत आवडली आहे.

Nile Wed, 15/05/2013 - 00:00

लेन्स्कीची ओळख आणि या ऐतिहासीक(?) घटनेची माहिती या लेखमालेमुळे झाली. धन्यवाद. श्लाफ्लीला पुर्वी कोलबेअरवर बघीतला होता. कोलबेअरने त्याची चांगलीच घेतली होती, एकंदर व्हिडीओ पाहून श्लाफ्ली फारसा हुशार आहे असे वाटत नाही.

सोनू Sat, 04/06/2016 - 16:51

अतिशय सुंदर लेखमाला. सर्व लेख एकत्रीत वाचता आले. खूप सोप्या पद्धतीने प्रयोग, निष्कर्ष व पत्रोत्तर दिले आहे. एखादी गोष्टं होते यावर बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत. ती कोणीतरी केली वा करवून घेतली हा मानवी निकष लावला जातो. माणूस हा या निसर्गातला एक खूपच लहान भाग आहे व इतर सजीव-निर्जीवांसारखे माणसाच्या बाबतीतही काहीतरी कायम होत असते हे पचायला माणसाला जड जाते.