सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ४)

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ३)

न्यूटनला झाडावरून फळ पडताना दिसलं आणि त्यावरून त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला असं म्हणतात. स्थिर असलेलं फळ झाडावरून सरळ खाली पडतं. तेच फळ जमिनीला समांतर, काही वेगाने फेकलं तर लांबवर पडेल. अधिक वेगाने फेकलं तर बरंच लांब जाऊ शकेल. जर हा सुरूवातीचा वेग वाढवत गेलं तर काय होईल? ते जमिनीला जवळपास समांतर बराच काळ फिरून पृथ्वीवर हजारो मैलावर कुठेतरी पडेल. पण त्याहीपेक्षा अधिक वेगाने टाकत गेलं तर एक वेग असा असेल की ते कायमच पृथ्वीला समांतर फिरत राहील. म्हणजे पृथ्वी गोल आहे, आणि पृथ्वीवर कुठेही फळ जमिनीकडेच पडतं यामुळे पृथ्वीभोवती गोल फिरण्यासाठी त्या फळाला एक विशिष्ट वेग असला पाहिजे. हेच जर मोठ्या ग्रह ताऱ्यांना लागू केलं तर सूर्याभोवती पृथ्वी आणि पृथ्वीभोवती चंद्र का फिरतो हे सांगता येतं. ग्रहांच्या निरीक्षणावरून हे नियम लागू होतात हे सहज सिद्ध करता येतं. पण त्याहीपलिकडे जाऊन आपल्याला पृथ्वीवर, नियंत्रित प्रयोग करून दोन लहानशा वस्तूदेखील हा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाळतात हे दाखवून देता येतं. न्यूटनने आपला सिद्धांत मांडल्यावर ११० वर्षांनी कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञाने हा गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक प्रथम मोजला. स्थिर असलेला एक लहान गोळा त्याच्या शेजारी एक मोठा गोळा आल्यावर किती शक्तीने खेचला जातो हे त्याने मोजलं. (हा प्रयोगही त्या काळच्या मानाने खूप अचूक होता - सुमारे ०.०१५ मिलीग्रॅम वजनाइतकं बल त्याने ९९% अचूकपणे मोजलं होतं. त्याविषयी इथे माहिती मिळेल)

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आता सत्य म्हणून मान्यता पावला आहे. त्याला कोणी 'निव्वळ सिद्धांत' 'फक्त थियरी' म्हणून संभावण्याचं धाडस करत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अनेक वेगवेगळे प्रयोग शास्त्रज्ञांना करून बघता येतात. विज्ञानात कुठचीही थियरी सिद्ध करताना निरीक्षणांना अतोनात महत्त्व असतं. प्राथमिक निरीक्षणांतून थिअरी मांडता येते. न्यूटनला फळ जमिनीवर पडताना दिसलं, आणि सर्वत्र पृथ्वीवर तसंच पडतं या दोन निरीक्षणांतून त्याला प्राथमिक थिअरी मांडता आली. मात्र ती भक्कम करण्यासाठी पद्धतशीर निरीक्षणांची आवश्यकता असते. तशी ती गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रातल्या सिद्धांतांसाठी प्रयोग करून नियंत्रित प्रकारे निरीक्षणं करता येतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्रित केले की पाणी तयार होतं हे प्रत्यक्ष करून बघता येतं. तसंच पाण्याचं विघटन करून जे वायू तयार होतात ते ऑक्सिजन व हायड्रोजन आहेत हेही दाखवून देता येतं. एकदाच नाही, तर अनेकदा.

सत्य म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी दुसरी आवश्यकता असते ती म्हणजे तंत्रज्ञानाची. अणूच्या केंद्रकात काय आहे हे सर्वासामान्य माणसाला दिसणं शक्य नाही. त्यामुळे कोणीतरी शास्त्रज्ञ त्याविषयी काहीतरी थिअरी मांडतो, आत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत म्हणतो, ते खरं की खोटं याबाबत सर्वसामान्य माणसाला काहीच निर्णय घेता येत नाही. मात्र अणुबॉंबचा स्फोट झालेला त्याला कळू शकतो. मग अणूच्या पोटात इतकी मोठी शक्ती दडली आहे यावर त्याचा विश्वास बसू शकतो. चंद्रावरची स्वारी, कृत्रिम उपग्रह यामुळे गुरुत्वाकर्षण सिद्धांताला सत्य मानण्याची तयारी होते.

उत्क्रांतीवादाच्या बाबतीत मात्र वैज्ञानिकांकडे कितीही पुरावे असले तरी ते सामान्य माणसाच्या आवाक्यातले नाहीत. कल्पना करा की अणुकेंद्रकात इतकी शक्ती नसती आणि अणुबॉंब, अणुऊर्जा अस्तित्वातच नसते. तर सामान्य माणसाला या शास्त्राबद्दल किती रस निर्माण झाला असता? अणुगर्भाबाबत कितीही प्रयोग करून शास्त्रज्ञांना त्याबाबत कितीही ज्ञान झालं असतं, तरी सामान्य मनुष्य त्याबाबत अनभिज्ञ आणि उदासीनच राहिला असता. अशा परिस्थितीत जर कोणाला विचारलं की अणुशास्त्रज्ञांनी मांडलेल्या थियरीबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला ती सत्य वाटते का? यावर खांदे उडवून 'हो, आहे अशी थियरी असं ऐकलेलं आहे' इतपतच मत देऊ शकला असता. याचं मुख्य कारण म्हणजे ते सत्य हे कोणत्यातरी जर्नलमधल्या पेपरमध्ये मांडलेले क्लिष्ट भाषेतले शब्द आणि अगम्य ग्राफ यापलिकडे जाऊ शकलं नसतं. सत्य सर्वमान्य होण्यासाठी त्याचे काही दृश्य परिणाम दिसावे लागतात.

उत्क्रांतीवादाची अडचण अशी की सजीवांच्या इतिहासातल्या घटना अतिशय संथपणे घडतात. मनुष्याला एखादं स्थित्यंतर दिसण्यासाठी सेकंद ते काही वर्षांत ते घडावं लागतं. मिलीसेकंद, मायक्रोसेकंदाच्या मापात घडणाऱ्या घटना आपल्या जाणीवेपेक्षा फारच वेगाने घडतात. तर शतकानुशतकांनी होणारे बदल हे अतिमंद असल्याने दिसत नाहीत. आपल्या डोळ्याला जशा तानापिहिनिपाजाच्या मर्यादा असतात. डोळ्यांना अतिनील किरण दिसत नाहीत, किंवा अतिरक्त किरण दिसत नाहीत. तशाच आपल्या जाणीवेलादेखील विशिष्ट वेगाच्या स्पेक्ट्रमच्या अलिकडच्या किंवा पलिकडच्या घटना समजावून घेता येत नाहीत. सजीवांची सुरूवात झाली सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी. जमिनीच्या अनेक थरांमध्ये जुने जीव सापडतात. या थरांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी या जिवांमध्ये कसकसे बदल होत गेलेले आहेत याची उत्कृष्ट साखळी मांडलेली आहे. वेगवेगळी कालमापन तंत्रं वापरून प्रत्येक थर किती जुना आहे हे अतिशय अचूकपणे शोधून काढलेलं आहे. या थरांमध्ये सापडणारे प्राणी हे वेगवेगळे आहेत यातूनच देवाने हे जग निर्माण केलं आणि त्याचबरोबर सर्व प्राणीसृष्टी निर्माण केली हे निखालस चूक ठरतं. तरीही ज्यांना त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशांना या निरीक्षणांबाबत अनेक तथाकथित खुसपटं काढता येतात. मग डायनोसॉर हे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नाही, तर काही हजार वर्षांपूर्वी लुप्त झाले, कारण मोजमापनाच्या पद्धतीतच त्रुटी आहेत वगैरे म्हणता येतं.

अणुबॉंबशिवायच्या न्यूक्लिअर फिजिक्सबाबत सर्वसामान्य माणसाचा निरुत्साह दिसेल. मात्र उत्क्रांतीवादाबाबत अनेक लोक कट्टर विरोध करतील, करतात. असं का? कारण उघड आहे. आत्तापर्यंत मानलेल्या देवाच्या शक्तीला उत्क्रांतीवादामुळे सुरुंग लागतो. असा विरोध सतत करत रहाता येतो, याचं कारण म्हणजे उत्क्रांतीवादाने मांडलेल्या विचारांना सत्य म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जे जनसामान्यांच्या डोळ्यादेखत, त्यांच्या कालावधीत घटना घडायला हव्यात त्या घडलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे उत्क्रांतीवादाला 'सर्वमान्य सत्य' या पदावर पोचू न देता 'निव्वळ थियरी' (प्राथमिक निरीक्षणांवर आधारलेली, सिद्ध न झालेली...) म्हणून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो.

लेन्स्कीच्या प्रयोगात उत्क्रांतीवादाच्या तत्वांना अनुसरून जीवांमध्ये बदल होताना प्रयोगशाळेत दिसला. म्हणूनच इंटेलिजेंट डिझाइन चे प्रणेते, कॉंझर्व्हेटिव्ह लोक लेन्स्कीच्या मागे हात धुवून लागले.
(क्रमशः)

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

अप्रतिम मुद्देसूद...
वाचतो आहे उत्सुकतेने..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मास्तरी भाग आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रंजक तरीही उद्बोधक.
सत्य सर्वमान्य होण्यासाठी त्याचे काही दृश्य परिणाम दिसावे लागतात.
हे तर कळीचं वाक्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars