Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १३ : विसंगती

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : विसंगती.

.......विसंगती आपल्या भोवती सगळीकडे भरून राहिली आहे. विचारांतून आलेली विसंगती, जरासुद्धा डोकं न खाजवता जाणवलेली विसंगती, निसर्गातली, नात्यातली, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलेतली, साहित्यातली, अगदी 'कबाब में हड्डी' पासून 'कींचड़ में खिला कमल' पर्यंतची सगळी विसंगती.

रोजच्या जीवनात जगण्याचे आपआपले एक तर्कट असते. अचानक असा एक क्षण सामोरा येतो की त्या तर्कटाला छेद जातो. कधी तो छेद नवे काही गवसल्याचा आनंद देतो, कधी त्यातून सल नशिबी येतो, कधी तो क्षण कुठलाच भावनिक ओऱखाडा न काढता केवळ छाप सोडून जातो. या विसंगतीमुळेच आपल्या कळत-नकळत तयार झालेली संगती तपासून पाहण्याची एक संधी मिळते. लेखक/कवी शब्दांतून ती पकडण्याचा प्रयत्न करतात, चित्रकार रेखाटनातून. विसंगतीचा नेमका क्षण कॅमेर्‍यात टिपणे हेदेखील एक आव्हानच आहे.

या आव्हानाचा विजेता निवडताना मला वाटते, मी कल्पनेला अधिक महत्त्व देईन, तांत्रिक बाबींना थोडे कमी; ज्यायोगे 'ऐसी..' च्या कॅमेराभीत सदस्यांनाही प्रोत्साहन मिळेल.

------

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ३१ डिसेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १ जानेवारीच्या मंगळवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. याचा अर्थ तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - नातं.

स्पर्धा का इतर?

ऋषिकेश Mon, 17/12/2012 - 09:33

या स्पर्धेचे विषय अधिक रोचक होत चालले आहेत. विचारशक्तीला चालना (आणि खाद्य) देणारा विषय आहे..
बघुया काही सुचते का.. तोवर इतरांची चित्रे बघण्यास उत्सूक

आबा Mon, 17/12/2012 - 19:54

अर्र... स्पर्धेचा शेवट २६ जानेवारी नंतर होणार असता तर, "सिग्नल वर झेंडे विकणारी पोरं" वगैरे क्लीशे पण टाकता आले असते की !

धनंजय Sat, 22/12/2012 - 21:25

करकोचा आणि घुबड

ऑलिंपस ई-५०० कॅमेरा
केंद्र अंतर : ६० मिमि
आय एस ओ : १००
अनावरण काळ : १/२५० सेकंद
छिद्र : एफ/३.८

धनंजय Sat, 22/12/2012 - 22:06

स्थापत्यकला

ऑलिंपस ई-५०० कॅमेरा
केंद्र अंतर : १८ मिमि
आय एस ओ : १००
अनावरण काळ : १/१६० सेकंद
छिद्र : एफ/८

धनंजय Sat, 22/12/2012 - 22:14

कुंपण

ऑलिंपस ई-५०० कॅमेरा
केंद्र अंतर : ४५ मिमि
आय एस ओ : १००
अनावरण काळ : १/३५० सेकंद
छिद्र : एफ/१०

चित्र "जिंप" प्रणाली वापरून कातरले आणि काळ्या चौकटीत बसवले.

बॅटमॅन Tue, 01/01/2013 - 15:58

In reply to by धनंजय

माफ करा, पण या फोटोत नक्की विसंगती काय आहे ते कळ्ळं नै. कुंपणाच्या अल्याड-पल्याड असे कैतरी आहे का? कृपया सांगावे ही विनंती.

(रसग्रहणातील मुलखाचा ढ) बॅटमॅन.

आबा Tue, 01/01/2013 - 20:33

In reply to by बॅटमॅन

पूल दोन ठिकाणांना जोडतो, आणि कुंपण दोन ठिकाणांचा संबंध तोडते...
या दोन्ही गोष्टी फ्रेममध्ये असण्यामध्ये विसंगती असावी, असं मला वाटतं, फोटोग्राफरच्या डोक्यात वेगळ्या आयडिया असतिल कदाचित

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/01/2013 - 01:34

In reply to by आबा

विसंगतीची दुसरी एक शक्यता दिसते ती म्हणजे प्रचंड मोठा जलाशय आणि त्याच्या समोर दिसणारं छोटंसं कुंपण. पण जोडणे-तोडणे ही शक्यताच अधिक पटली.

रवि Sun, 23/12/2012 - 19:42

निसर्गात नेहमी दिसणारी एक विसंगती

Cactus Flower

Camera Sony DSC-W80
Exposure 0.013 sec (1/80)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 100
Exposure Bias 0 EV

अमुक Tue, 01/01/2013 - 05:32

तांत्रिकतेपेक्षा कल्पनेला प्राधान्य देण्याचे आमिष दाखवूनही एकूण दोन व्यक्तींत मिळून चार चित्रे असा अल्प प्रतिसाद आल्याने विषयाचे आव्हान हे खरोखरच आव्हान ठरले, असा सोयिस्कर ;) समज करून घेऊन निकाल घोषित करीत आहे.

क्रमांक २ : 'रवि' यांचे 'फुल व काटे' :
वाळवंटात उगवलेले झाड / निवडुंगाला आलेले फूल, इ. गोष्टी निसर्ग आणि वनस्पतीशास्त्रानुसार कितीही सुसंगत असल्या आणि तरी असे काही अचानक पाहिल्यावर माणसासाठी ती प्रथमदर्शनी एक विसंगती ठरते. यावरून हेच अधोरेखित होते की माणसाचा निसर्गाविषयीचा समज आणि निसर्गाचा स्वभाव यांत किती तफावत आहे. या विसंगत वाटण्यातूनच माणसाचे कुतुहल जागृत होऊन कार्यकारणभाव शोधण्याची वृत्ती वाढीस लागते.
ही विसंगती टिपल्याबद्दल 'रवि' यांचे अभिनंदन.
पण 'रवि', तुम्ही यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या यापेक्षा बरीच वरच्या दर्जाची चित्रे दिल्याचे आढळले. (म्हणून, आत्ताचे तुमचे चित्र ही एक विसंगतीच ;) !)
त्यामुळे यावेळी थोडा अपेक्षाभंग झाला.

क्रमांक १ : 'धनंजय' यांचे 'स्थापत्यकला' :
रोजच्या पाहणीतल्या गोष्टी : गाडी, रस्ता आणि इमारत. गाडी आणि रस्ता हे इमारतीसापेक्ष तिरकी असणे हेही आपल्या अनुभवाशी सुसंगत.
इथेही खरे तर तोच प्रकार आहे. परंतु, प्रकाशचित्र अश्या खुबीने काढले आहे, की गाडीऐवजी इमारत तिरकी आहे, असेच पाहणार्‍याला वाटावे. तेदेखील, इतक्या कोनातून वाकल्यावर इमारत उभी राहण्याच्या शक्यतेला धक्का देईल, असे.
नेहमीच्या सुसंगतीतून, निव्वळ कॅमेर्‍याचा कोन बदलून केलेला विसंगतीचा हा कल्पनाविष्कार आवडला.

'धनंजय' यांचे अभिनंदन आणि त्यांनी पुढील पाक्षिक आव्हान द्यावे, ही विनंती.
('पोत' या आधीच्या अतिशय सुंदर आव्हानानंतर, तुमच्या पोतडीतून आणखी कोणता विषय निघतो, याविषयी अपार उत्सुकता आहे.)

ऋषिकेश Tue, 01/01/2013 - 08:44

In reply to by अमुक

इथेही खरे तर तोच प्रकार आहे. परंतु, प्रकाशचित्र अश्या खुबीने काढले आहे, की गाडीऐवजी इमारत तिरकी आहे, असेच पाहणार्‍याला वाटावे

ओहो! काय सांगता काय!
मला खरोखरच तशी इमारत आहे असे वाटत होते. (बिलीव्ह इट ऑर नॉट च्या प्रदर्शनात अशी इमारत बघितली होती, त्यातलाच एक प्रकार आहे असे वाटले.)

ॲमी Tue, 01/01/2013 - 09:27

In reply to by ऋषिकेश

हा हा मला देखील ती इमारत तिरकी वाटली :-D
कँप मधे १० १२ वर्षापूर्वी एक तिरकी काचेची इमारत पाहीली तेव्हा फार आश्चर्य वाटलेलं.

ऋषिकेश Tue, 01/01/2013 - 08:42

धनंजयचे अभिनंदन!
'विसंगती' हा विषय खरोखरच आव्हानात्मक होता. काहि कल्पना दोक्यात होत्या पण ख्रिसमस, नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे घरी पाहुण्यांचा राबता असल्याने त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणणे जमले नाहि. आव्हानात्मक विषयासोबत या सुट्ट्यांमुळे कमी प्रतिसाद मिळाला असेल असे वाटते.

आता पुढील विषयही आव्हानात्मक आहेच.