Skip to main content

'इन्व्हेस्टमेंट'

१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली. अधिकाधिक कमाईची आणि सुखवस्तू जगण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणं, त्यामागे धावणं आणि त्यासाठी वेळ पडली तर मध्यमवर्गीय मूल्यं फेकून देणं हे ह्या मध्यमवर्गाचं व्यवच्छेदक लक्षण झालं. अर्थात, जुन्या पिढीतले लोक ह्याबद्दल तक्रार करत असतात आणि गेलेल्या रम्य दिवसांच्या आठवणी काढत असतात, पण मध्यमवर्गाचं वास्तव आणि मूल्यं गेल्या वीसेक वर्षांत बदलत गेली आहेत हे आज कुणाला नाकारता येणार नाही.

अशा वातावरणात वाढलेली आजची जी मध्यमवयीन पालकांची पिढी आहे, ती आता आपल्या मुलांना ज्या वातावरणात वाढवते आहे त्यामध्ये 'रॅटरेस' किंवा स्पर्धात्मक वातावरण ही दैनंदिन आयुष्यात गृहित धरण्याची गोष्ट आहे. इतरांवर छाप पाडता यावी ह्यासाठी मुलांना 'स्मार्ट' बनवणं, विविध 'स्किल्स'मध्ये 'एक्स्पोजर' देऊन त्यांना 'अॉलराउंडर' करणं, वगैरे उद्योग आजचे हे सुजाण पालक मनापासून करत असतात. मुलांमध्येही 'परफॉर्मन्स अॅन्क्झायटी' किंवा इतर मानसशास्त्रीय प्रश्न दिसतात. थोडे संवेदनशील पालक तर खाजगीत हे कबूल करतात की त्यांना आपल्या मुलांची थोडी भीतीच वाटते. व्हिडिओ गेम्स, टी.व्ही., इंटरनेट वगैरेंद्वारे मुलांवर जे आदळत असतं त्यातून मुलांमध्ये काही अप्रिय बदल होताहेत, अशा स्वरूपात ही भीती कधी समोर येते. तर लहान वयातच येणारी लैंगिकता, हिंस्र वर्तन ह्यांचं कधी कधी जे ओंगळवाणं दर्शन पालकांना आपल्या किंवा इतर मुलांत होतं ते त्यांच्या भीतीला खतपाणी घालतं. तरीही, आपल्या मुलानं 'श्यामची आई'मधल्या श्यामसारखं सद्गुणी व्हावं अशी महत्त्वाकांक्षा ह्या पालकांमध्ये क्वचितच आढळते. कारण सद्गुण म्हणजे काय, नैतिक आणि अनैतिक वर्तन कशाला म्हणायचं ह्याविषयी पालकांच्याच मनात संदिग्धता, गोंधळ किंवा गैरसमजुती असतात.

आजच्या जगात 'सर्व्हाइव्ह' होण्यासाठी मुलांना 'टफ' करण्याचे पालकांचे प्रयत्न, आणि तरीही त्यातून आपलं मूल नक्की कसं घडेल ह्याबद्दलची भीती हा तिढा एका नाट्यमय कथेतून मांडण्याची रत्नाकर मतकरी ह्यांची आकांक्षा असावी असं 'इन्व्हेस्टमेंट' पाहून वाटतं. अशी आकांक्षा स्तुत्य आहे तितकीच ती प्रत्यक्षात आणणं कठीणही आहे. कारण, आजचं वास्तव गुंतागुंतीचं आहे आणि त्यात रुढ अर्थानं सुष्ट-दुष्ट संघर्ष किंवा एक बाजू न्याय्य आणि एक चुकीची असं ढोबळ समीकरण नाही. पण नेमकी इथेच पटकथा कमी पडते आणि सिनेमा ठोकळेबाज होतो.

(सिनेमाची गोष्ट इथे सांगितलेली नाही, पण ती कुठल्याही वृत्तपत्रीय परिचयात वाचायला मिळेल. जिथे कथानकातली काही महत्त्वाची वळणं उल्लेखली आहेत तिथे तशी सूचना दिली आहे. ज्यांना ती कळून घेण्याची इच्छा नाही असे वाचक लेखातला तेवढा भाग सहज टाळून उरलेला भाग वाचू शकतील.)

सिनेमातली पहिली खटकणारी गोष्ट म्हणजे इथली महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीय आई आपल्या मुलाला एक सफल राजकारणी बनवण्याची आकांक्षा बाळगून आहे. हे आजकालच्या पालकांचं प्रातिनिधिक चित्रण वाटत नाही. आजचा मध्यमवर्ग राजकारणाकडे उलट घृणेनं बघतो. भारतात आज जे काही वाईट आहे त्याचं खापर तो राजकारण्यांवर फोडतो. अण्णा हजारे किंवा नरेंद्र मोदी ह्यांचं आकर्षण त्याला वाटतं तेव्हा त्यामागे त्यांचं अविवाहित असणं, म्हणजे पर्यायानं आपल्या आप्तांच्या गोतावळ्यासाठी भ्रष्टाचार न करता स्वच्छ राहणं त्याला भावतं हा एक घटक असावा. नंदन निलेकणी ह्यांचं राजकारणात उतरणं, किंवा चिदंबरम् वगैरेंचं राजकारणात सक्रीय असणं ह्याबद्दलही मध्यमवर्गाला थोडं बरं वाटतं. त्यांचं आय.आय.टी. किंवा हार्वर्डसारख्या ठिकाणचं शिक्षण आणि तत्सम इतर गोष्टींतून सिद्ध होणारी त्यांची राजकारणाबाहेरची कर्तबगारी हे त्यामागचं एक कारण आहे. त्याउलट सिनेमातली आई आहे. मुलाला कॉलेजच्या निवडणुकांमध्ये उतरवणं, एखाद्या पक्षाच्या यूथ विंगमध्ये सक्रीय करणं वगैरे मुलाच्या उत्कर्षाविषयीच्या तिच्या कल्पना ती सांगते. मध्यमवर्गीय घरातल्या मुलासाठी हे प्लॅनिंग कितपत व्यवहार्य ठरेल हे वेगळंच, पण अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा पाहणारा मध्यमवर्गीय प्रेक्षक कळत नकळत अशा आईच्या व्यक्तिरेखेपासून लांब जातो. समोर जे काही भीषण घडतंय ते काही आपलं वास्तव नाही, आणि त्यामुळे आपण अंतर्मुख होण्याची गरज नाही; हे लोक आपल्याहून वेगळेच आहेत, असा संदेश त्यामुळे सोयीस्कररीत्या घेतला जाऊ शकतो.

आईचं एकंदर चित्रण तिला सिनेमातली खलनायिका करतं. कारण प्रत्येक नाट्यपूर्ण टप्प्यावर मुलाचा बाप (तुषार दळवी) द्विधा मन:स्थितीत आहे; आजी (सुलभा देशपांडे) जुन्या पिढीतली शिक्षिका असल्यामुळे ती जुनी मूल्यं धरून ठेवू पाहते आहे, तर त्या तुलनेत आई ही लेडी मॅकबेथसारखी प्रत्येक वेळी नवऱ्याला आणि मुलाला अनैतिकतेच्या गर्तेत खोल खोल रुतवत राहते. बरं, त्यातही नेमक्या मोक्याच्या ठिकाणी सातत्य नाही. 'झोपडपट्टी टाइप' मुलांपासून ती आपल्या मुलाला दूर ठेवू पाहते हे सुसंगत आहे. त्यामुळे मुलाच्या वाढदिवसाला त्याची निम्न आर्थिक वर्गातली मैत्रीण दीपा आली नाही, तर ते बरंच झालं असं तिला वाटतं. पण दीपाचा दारुडा बाप जेव्हा 'तुमचा मुलगा माझ्या मुलीला कशी चिठ्ठी लिहितो पाहा' असं म्हणत ती चिठ्ठी सोहेलच्या आईवडिलांना दाखवतो तेव्हा 'सोहेलसमोर ह्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही' असं ती नवऱ्याला बजावते. तिला जर खरंच आपल्या मुलाला निम्न आर्थिक गटाच्या मुलांपासून दूर ठेवायचं असेल, तर ती नक्कीच सोहेलला दीपापासून तोडायला पाहील. पण तसं केलं तर कथा नाट्यमय वळणावर येणार नाही. त्यामुळे आईच्या व्यक्तिरेखेच्या विश्वासार्हतेला तडा जातो.

आणि हे नाट्यमय वळण तरी कसं आहे? उदाहरणादाखल, पूर्वी हिंदी सिनेमातली गावकी छोरी एखाद्या शहरी दुष्यंताबरोबर शाकुंतल खेळून झाल्यावर गावात एकटी पडायची, किंवा गरोदर वगैरे राहायची. तेव्हा मग ती आपल्या दुष्यंताला शोधत शहरात यायची. आणि मग तिच्यावर शहरातल्या पुरुषांच्या वाईट नजरा पडणं आणि ती डायरेक्ट वेश्याव्यवसायातच फेकली जाण्याचा धोका निर्माण होणं वगैरे दाखवलेलं असायचं. म्हणजे इथे मुंबईत बाहेरून येणाऱ्या लाखो बायका काबाडकष्ट करतात, मोलमजुरी करून आपल्या कच्च्याबच्च्यांची पोटं भरतात, पण आमच्या हिंदी सिनेमात असं काही चालायचंच नाही. तसंच काहीसं इथे होतं - म्हणजे काय, तर (रहस्यभेद सुरू) शाळकरी मुलाकडून डायरेक्ट मर्डरच होतो! (रहस्यभेद समाप्त), आणि तेवढं नाट्यदेखील पुरेसं नाही म्हणून की काय, (रहस्यभेद सुरू) मुलाची आजी त्या धक्क्यानं हार्ट अॅटॅक येऊन मरतेच (रहस्यभेद समाप्त). पहिल्या अंकाचा पडदा पडेल तेव्हा प्रेक्षकाला काही तरी थरार द्यायचा, आणि पुन्हा दुसरा धक्का अर्थात सिनेमाच्या उत्कर्षबिंदूपाशी द्यायचा ह्या मेलोड्रॅमॅटिक मराठी नाटकांच्या जुन्या परंपरेला पाळणारीच ही रचना आहे. हिंदी सिनेमातल्या मेलोड्रामाला हे नाट्य-व्याकरण पूरक असायचं. बायाबापड्यांचा संताप किंवा अश्रुपात व्हावा, पुरुष एकाच वेळी थोडे चेतवावे आणि त्यांना व्हिलनचा थोडा सात्विक संतापही यावा अशा ढोबळ हिशेबांत पटकथेची अशी नाटकी वळणं बसतात. पण इथे तर तथाकथित 'सुजाण', किंबहुना 'सुजीर' मध्यमवर्गाला आरसा दाखवायचा आहे, त्याला अंतर्मुख करायचं आहे. त्यासाठी असा हिंदी सिनेमाचा ढोबळ मेलोड्रामा अनुसरायचा म्हणजे २१व्या शतकातल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकाला कमी तरी लेखल्यासारखं होतं, किंवा स्वत: दिग्दर्शक टी.व्ही.वरच्या कौटुंबिक 'डेली सोप'च्या पातळीवरच आला आहे की काय, असं होतं.

ह्याला पूरक इतरही चिन्हं इथे आहेत. म्हणजे दाराआडून कुणी तरी कुणाचं तरी बोलणं चोरून ऐकतं, किंवा एखादी व्यक्ती घरी आलेली नेमकी जिला कळायला नको, ती आईच नेम धरून आल्यासारखी घरी पोचते तेव्हा ती व्यक्ती घरातनं बाहेर पडत असते, वगैरे. किंवा 'आता वकील येतीलच' असा डायलॉग झाल्या झाल्या लगेच बेल वाजते, आणि अर्थात वकील साक्षात हजर. थोडक्यात, ढोबळ मेलोड्रामा आणि 'दुर्वांची जुडी' छाप मराठी नाटकातली कृतक रचना ह्यांच्यात अडकल्यामुळे मूळचा रोचक आणि सद्यकाळावर भेदक टिप्पणी करू पाहणारा सिनेमाचा आशय सादरीकरणात मात्र फारशी उंची गाठू शकत नाही.

त्यातच 'धट्टीकट्टी गरीबी आणि वाईट श्रीमंती'सारखी जुनाट मांडणीही इथे दिसते. 'टेकडी वाचवा' अभियानात सहभागी असणारा कार्यकर्ता सच्छील, टेकडीवरचे रहिवासी म्हणजे (मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या) जमिनीवर मूळचा हक्क सांगणारे आदिवासी, पण कॉर्पोरेट जगात वावरणारा मुलाचा बाप मात्र शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या आईच्या मूल्यांना काळं फासणारा. किंवा, गरीब मुलीचा बाप काबाडकष्ट करून घर चालवतो, त्याची बायको टी.बी. किंवा तत्सम आजारानं अंथरुणाला कायमची खिळलेली, वगैरे. ही मांडणी आता जुनाट झाली आहे एवढंच नाही, तर ती ठोकळेबाजही आहे.

मुलाच्या वडलांना नवी नोकरी मिळते त्यातले पर्क्स म्हणजे पेडर रोडला घर, शोफरसह गाडी वगैरे. आधीची नोकरीसुद्धा तशी बरीच असणार. मुलाची आई राष्ट्रीय बॅंकेत नोकरी करते. शिवाय दोघं 'अॅमवे'सारख्या कंपनीसाठी काम करून आणखी पैसा कमवत असतात. घर एकदम टिपटॉप, घरातला कंप्यूटर मॅक वगैरे. मूल ज्या शाळेत जातं त्या शाळेची मुख्याध्यापिका पारशी असावी. इतर शिक्षिकासुद्धा हाय-फाय दिसतात. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अशा शाळेत अशा पालकांची मुलं जात असतील हे ठीकच. मात्र, तिथे निम्न आर्थिक वर्गातली मुलं शिकत असण्याची शक्यता किती? आजचा महानगरीय मध्यमवर्ग पाहिला, तर असं दिसेल की नोकर किंवा सेवादाते म्हणून येणारा, टाळता न येण्याजोगा संपर्क वगळता खालच्या वर्गाशी कुठेही संबंध येऊ देणार नाही असा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे शाळा निवडताना ह्याला प्रचंड प्राधान्य असतं. शिवाय, पश्चिम उपनगरांत तर अशा किती तरी शाळा आहेत. शिक्षणहक्क कायद्यामुळे निम्न स्तरातली काही मुलं घेणं शाळांना भाग पडणार आहे अशी कुणकूण लागताच त्याविषयीची कटकट माझ्या आसपासचे, अशा शाळांत मुलं घालणारे पालक-शिक्षक करू लागले आहेत. सिनेमातल्या मुलाच्या शाळेत निम्न आर्थिक वर्गातली मुलं असतात हे ह्या पार्श्वभूमीवर पेलायला जरा जड जातं.

सिनेमातल्या अनेक रचितांमुळे कृतकनाट्यात भर पडते. मुलगा टी.व्ही.वर परदेशी संगीत आणि त्यातली सेक्सी व्ही.जे. आवडीनं पाहतो आणि बापाला 'पाहा ती कशी मस्त आहे' वगैरे सांगतो. मुलाला वाढदिवसाला पिस्तूलच हवं असतं. (रहस्यभेद सुरू) 'तुम्ही जोवर मला माफ करत नाही तोवर मला शांती लाभणार नाही' असं आजीचं मुलीच्या वडिलांना सांगणं आणि त्यांनी माफ केल्यानंतर लगेचच आजीचा मृत्यू (रहस्यभेद समाप्त) किंवा शेवटच्या प्रसंगात (रहस्यभेद सुरू) आईनं आणून दिलेल्या पिस्तुलानंच मुलानं आजीचं रक्षापात्र फोडणं (रहस्यभेद समाप्त) असे अनेक प्रसंग कथेला बटबटीत करतात.

अशा सर्व कारणांमुळे सिनेमा फारशी उंची गाठू शकत नाही. शिवाय, मध्यमवर्गीय प्रेक्षकाला हे सगळं आपल्याबद्दल चाललंय असं वाटून तो अंतर्मुख होण्याऐवजी ह्या अतिरंजित नाट्याला पाहून 'आपण काही गोष्टी इतक्या थरावर जाऊ देत नाही; त्यामुळे आपली स्थिती काही एवढी चिंताजनक किंवा वाईट नाही' आणि 'हे आईवडील किती घाण माणसं आहेत!' असं त्याला वाटण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे प्रेक्षकाच्या मनात पात्रांविषयी दूरस्थ स्थिती आणि तुच्छता निर्माण होईल आणि सिनेमाचा मूळ हेतूच साध्य व्हायला अडचण येईल अशी शक्यता वाटते. सध्याचा नव्या दमाचा मराठी सिनेमा जुन्या पठडीतला मेलोड्रामा मागे सारून काही तरी वेगळं मांडण्याच्या प्रयत्नात दिसतो. त्या पार्श्वभूमीवर 'इन्व्हेस्टमेंट'मधला हा मेलोड्रामा अपेक्षाभंग करतो असं खेदानं म्हणावं लागतं.

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Mon, 23/09/2013 - 19:57

पहिल्या तीन परिच्छेद वाचले. बाकी घाबरत चाळले
कितीही सुचना दिली तरी राजकारणात सफल बनवण्याच्या इच्छा बाळगणार्‍या आईच्या वर्णन करणार्‍या परिच्छेदाच्या सुरवातीनंतर अधिक वाचले नाही, कारण मतकरींचे नाव वाचून हा चित्रपट डाऊनलोडवून बघायचे ठरवले आहे :प

ऋता Mon, 23/09/2013 - 20:29

मी न पाहिलेल्या आणि कदाचित पहाणारच नाही अशा चित्रपटांवरचे तुमचे टीकात्मक लेख वाचायला आवडत आहेत.
या गोष्टितला मुलाचा असा हट्ट आणि तोही पुरवला गेला हे खरं वाटत नाही. एकवेळ वडिलांनी हौस म्हणून घेतलेल्या वस्तूशी चोरून मुलाने खेळ केला असे जरा पटेल असे वाटते.

सन्जोप राव Tue, 24/09/2013 - 06:32

चित्रपटाचा सांगोपांग धांडोळा आवडला. अण्णा हजारे किंवा नरेंद्र मोदी ह्यांचं आकर्षण त्याला वाटतं तेव्हा त्यामागे त्यांचं अविवाहित असणं, म्हणजे पर्यायानं आपल्या आप्तांच्या गोतावळ्यासाठी भ्रष्टाचार न करता स्वच्छ राहणं त्याला भावतं हा एक घटक असावा यांसारखी स्वीपिंग स्टेटमेंटस असूनही.
रहस्यभेदांमुळे बाकी अंतर्बाह्य हादरलो. सांकेतिकता, मेलोड्रामा या शांताशापांतून (शिव्याशापांतून या धर्तीवर!) मराठी चित्रपट बाहेरच पडू शकत नाही की काय?
एकूण चित्रपट बघू नये असे वाटत आहे. माय-मराठीची आस वगैरेची जी उबळ अधूनमधून येत असते तिच्यावर 'नारबाची वाडी' चे औषध लागू झाले आहे.

राजेश घासकडवी Tue, 24/09/2013 - 07:14

विश्लेषण आवडलं. रत्नाकर मतकरींचं फार लेखन वाचलेलं नाही. मुख्यतः भय/गूढकथा वाचल्या आहेत. लहानपणी आवडल्या होत्या पण त्यावेळीही काहीशा प्रेडिक्टेबल वाटल्या होत्या. सरळसोटपणा हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव वाटतो. म्हणजे गूढकथांचा शेवटही काहीशी ओळखता येणारी ट्विस्ट देऊन होतो हे दोनचार कथा वाचल्यानंतर लक्षात आलं होतं. एक वेगळी वातावरण निर्मिती म्हणूनच त्या वाचणं छान होतं. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या एका एकांकिकेत काम करण्याची पाळी आली होती. 'भुताची गोष्ट' अशा काहीशा नावाची होती. त्यात एका चाळिशीतल्या माणसाला आपल्या तरुणपणातलं स्वतःलाच लिहिलेलं पत्र सापडतं. स्वतःशी एकनिष्ठ राहायचं, तडजोडी करायच्या नाहीत इत्यादी इत्यादी. आणि त्याला आपण या बाबतीत यशस्वी न झाल्यामुळे वाईट वगैरे वाटतं. त्याचा भूतकाळच मनुष्यरूप घेऊन त्याच्यासमोर येतो, म्हणजे तरुणपणीचा तो स्वतः. मग त्याची बायको 'मला त्याच्यापेक्षा तूच आवडतोस, तू जो बदलला आहेस ते स्वाभाविकच आहे, आणि ते योग्यच आहे' वगैरे वगैरे सांगते. तेव्हापासून मी त्यांच्या इतर लेखनाच्या वाटेला गेलो नव्हतो. नाटकाचं चर्चासत्र झालेलं मला व्यक्तिशः आवडत नाही. चांगली चर्चा किंवा विचार-मांडणी वाचायची असेल तर निबंध वाचावा. एका विषयावरचे वेगवेगळे पैलू मुद्दामून बोलून दाखवणारी पात्रं करणं म्हणजे या माध्यमाचा अपव्यय आहे. (मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाबाबत हीच तक्रार होती, तो नथुराम अग्रलेख वाचल्यासारखा बोलतो, करत काही नाही.)

नाटकातून किंवा चित्रपटांतून जे सांगायचं असतं ते प्रत्यक्षात बोलून दाखवण्यापेक्षा प्रेक्षकाला त्या कथेत गुंतवून ठेवून, किंवा विशिष्ट भूमिका घ्यायला भाग पाडून त्याच्या/तिच्या मनात ती चर्चा निर्माण करायची असते ही जाण ज्यांना असते त्यांच्याकडून चांगल्या कलाकृती घडतात. माझ्या मर्यादित अनुभवावरून मतकरींना ती जाण आहे असं मला वाटलेलं नव्हतं, हे परीक्षण वाचून ते अधोरेखित झालं.

राजन बापट Tue, 24/09/2013 - 21:45

In reply to by राजेश घासकडवी

>> (मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाबाबत हीच तक्रार होती, तो नथुराम अग्रलेख वाचल्यासारखा बोलतो, करत काही नाही.)

सखाराम बाईंडरमधेसुद्धा प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे. ते नाटक देखील याच एका कारणामुळे रद्दबातल ठरवावे काय ? (तुम्ही हे नाटक पाहिले नसेल अशी एक शक्यता आहे. तसं असेल आणि त्याबद्दल तुम्ही बोलू शकत नसाल तर माझा प्रश्नही अप्रस्तुत ठरेल. )

राजेश घासकडवी Tue, 24/09/2013 - 23:56

In reply to by राजन बापट

सखाराम बाईंडरमधेसुद्धा प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे.

मी पाहिलेलं नाही, पण वाचलेलं आहे. आक्षेप स्वगतांवर नाही, तो नाटकाच्या तंत्राचा एक भागच आहे. पण किती नाट्य स्वगतात टाकायचं आणि किती प्रत्यक्षात घडवायचं याचा तोल साधणं महत्त्चाचं आहे. बाइंडरचं नाट्य त्या स्वगतामध्ये नाही. तेंडुलकरांच्या अनेक नाटकांमध्ये सुरूवातीला 'मी कोण' हे सांगणारी स्वगतं असतात. शांतता कोर्ट चालू आहे मध्येही बेणारेबाई मी अमुक मी तमुक असं सांगते. अनेक पात्रं घटना सांगतात. पण ते काहीसं नैसर्गिक वाटावं म्हणून आख्ख्या नाटकालाच एका खोट्या खोट्या वाटणाऱ्या पण तरीही खरोखर समाजात चालणाऱ्या कोर्ट केेसचं स्वरूप दिलेलं आहे.

असो. नथुराम गोडसे बोलतोय नाटक मला न आवडण्याच्या अनेक कारणांपैकी ते होतं. याचा अर्थ मोठी स्वगतं असलेली सगळीच नाटकं मला आवडत नाहीत असा होत नाही.

चिंतातुर जंतू Tue, 24/09/2013 - 11:12

>>या गोष्टितला मुलाचा असा हट्ट आणि तोही पुरवला गेला हे खरं वाटत नाही. एकवेळ वडिलांनी हौस म्हणून घेतलेल्या वस्तूशी चोरून मुलाने खेळ केला असे जरा पटेल असे वाटते.

हा प्रतिसाद वाचून माझ्या लिखाणातली एक संदिग्धता लक्षात आली. 'मुलाला वाढदिवसाला पिस्तूलच हवं असतं' असं मी लिहिलेलं आहे ते खेळण्यातलं पिस्तूल आहे. त्याचा सिनेमातल्या प्रमुख नाट्यमय वळणांशी संबंध नाही.

अजो१२३ Tue, 24/09/2013 - 12:13

चिंतातुरजींचे पहिले तीन पॅरा (तिसर्‍या परिच्छेदाची शेवटची ओळ सोडून) फार भावले. त्यात दोन-तीन झाडूवाक्ये आहेत, पण तीच प्रातिनिधिक भावना आहे.
बाय द वे -
व्यवच्छेदक म्हणजे काय?
@ संजोपराव - नारबाची वाडी चे औषध म्हणजे काय?

तिरशिंगराव Tue, 24/09/2013 - 18:51

हा चित्रपट पहावा की नारबाची वाडी बघावा अशा द्विधा मनस्थितीत होतो. पण तुमच्या परीक्षणामुळे आणि संजोपरावांच्या शेर्‍यामुळे उत्तर मिळाले.

तिरशिंगराव Wed, 25/09/2013 - 14:27

अ गुड रोड, या नांवातला खरच 'रोड' आहे की गुज्जुंनी केलेला रॉड चा रोड असा उच्चार आहे ?

चिंतातुर जंतू Wed, 25/09/2013 - 15:49

>> नाटकाचं चर्चासत्र झालेलं मला व्यक्तिशः आवडत नाही. चांगली चर्चा किंवा विचार-मांडणी वाचायची असेल तर निबंध वाचावा. एका विषयावरचे वेगवेगळे पैलू मुद्दामून बोलून दाखवणारी पात्रं करणं म्हणजे या माध्यमाचा अपव्यय आहे.

सहमत. आणि 'इन्व्हेस्टमेंट'मध्ये मतकरींची प्रमुख पात्रं हेच करतात. आयुष्याविषयीचं आपलं तत्त्वज्ञान उलगडून सांगणारी पात्रं प्रेक्षकाला ह्या सिनेमातनं काय घ्यायचं आणि कशाविषयी घृणा बाळगायची ते सुचवत राहतात. एकविसाव्या शतकात तर ते विशेष बाळबोध वाटतं.

>> सखाराम बाईंडरमधेसुद्धा प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे.

बरोबर, पण इथे तेंडुलकर एक गंमत करतात. नाटक पाहिल्यानंतर त्या सुरुवातीच्या स्वगताविषयी विचार केला, तर हे लक्षात येतं की त्या स्वगतात अर्थ नाही. म्हणजे, आपण कसे आहोत ह्याविषयी बाईंडरला जे वाटतं ते वेगळं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका त्याचं जे काही करतात ते वेगळं. आणि हे कुणी समजावून सांगत नाही, तर आपलं आपण समजून घेतो.