Skip to main content

भारताची प्रगती ५: अवघाची संसार

भारताची प्रगती १: प्रास्ताविक
भारताची प्रगती २: घृतं पीबेत
भारताची प्रगती ३: जीवेत शरदः शतम्
भारताची प्रगती ४: सहस्रेषु च पंडितः

आपण एकाच रस्त्याने रोज जात असतो. एखाद्या बिल्डिंगचं बांधकाम चालू झालेलं दिसतं. पाया खणणं, खांब रचणं, मजले चढवणं, रंगरंगोटी करणं... आपल्याला रोज थोडा थोडा बदल झालेला दिसतो. ती बिल्डिंग आपल्या रस्त्याचा भाग अगदी सहजगत्या बनते. इतकी की तिच्याशिवाय रस्ता होता हे काही वर्षांनी लक्षातही रहात नाही. आपल्या मुलांना फारतर आपण सांगू शकतो की अरे या बिल्डिंगच्या आधी इथे नुसता एक गोठा होता. हे अर्थातच त्यांना कल्पनेच्या पातळीवरच समजून घेता येतं. मात्र त्यांच्या जीवनाचा तो भाग होऊ शकत नाही.

आपल्या आसपासच्या बिल्डिंगीच नव्हेत तर आख्खं जग असंच सतत बदलत असतं. बिल्डिंगीपेक्षाही हळूहळू. आज दिसणाऱ्या जगापेक्षा शंभर वर्षांपूर्वी काहीतरी वेगळं होतं याची आपल्याला निव्वळ कल्पनाच करता येते. तो आधीचा गोठा किती रम्य होता, या बिल्डिंगमधले लोक कसे खडूस आहेत, आणि झालेले बदल कसे वाईटच आहेत असेही विचार मांडले जातात. गोठा आणि बिल्डिंग हे बदलांसाठी निव्वळ रूपक आहे. त्या रूपकापलिकडे जाऊन प्रत्यक्ष प्रश्न विचारता येतो, की आधी जग कसं होतं? आता ते कसं आहे? जो बदल झाला आहे तो चांगला की वाईट? चांगले बदल म्हणजे नक्की कोणते?

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥

संत जनाबाईचं हे स्वप्न होतं. अनेक इतर संतांनीही 'जगाचं कल्याण होवो' ही भावना वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. 'सर्वेपि सुखिनः संतु' असो की 'जो जे वांछिल तो ते लाहो' असो, हीच जग सुखी होण्याची इच्छा दिसून येते. पण सुख म्हणजे नक्की काय? 'जगी सर्वसुखी असा कोण आहे?' पूर्णपणे सुखी कोणीच नसतो. दुःखी मात्र अनेक असतात. ही दुःखं कमी करत जाऊन सुख वाढवण्यासाठी जगभरच सर्व समाज झटत असतात. मला या लेखात व एकंदरीत लेखमालेत दाखवून द्यायचं आहे की गेल्या शतकानुशतकांत त्या प्रयत्नांना यश येत आहे. पण एखादी बिल्डिंग बांधण्याप्रमाणे ही प्रक्रिया अत्यंत हळू चालणारी असल्याने बदल झालेला चटकन जाणवत नाही. लेखमाला भारताविषयी असली तरी या लेखात आपण जगभराचा विचार करणार आहोत. कारण गेली पस्तीस चाळीस वर्षं ही प्रगती मोजण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. त्या आकडेवारीतून दिसणारं चित्र हे थक्क करणारं आहे.

प्रगती म्हणजे काय, आणि ती कशी मोजायची? हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. वर म्हटल्याप्रमाणे 'सर्वसुखी' समाज करणं आत्तातरी शक्य नसलं, तरी सुखी होण्यासाठी काही प्रयत्न करता येतात. गेल्या तीन लेखांत मी सुबत्ता, आयुर्मान (किंवा आरोग्य) आणि शिक्षण हे तीन मानदंड प्रगती मोजण्यासाठी मांडले. यातला नक्की कोणता महत्त्वाचा? प्रत्येक बाबतीतली टोकाची, व्यक्तिगत उदाहरणं देता येतात. गरीब आणि अल्पायुषी असलेले पण आपल्या तेजाने लक्कन काही काळ आसमंत उजळून जाणारे अनेक आहेत. तसंच मठ्ठ पण निव्वळ श्रीमंत असल्यामुळे सुखी असणारेही आहेत. दुर्दैवाने समाजाचा विचार करताना ही अशी वैयक्तिक उदाहरणं कुचकामी ठरतात. अपवादात्मक लोकांवरून नियम बांधणं योग्य नाही. त्यासाठी मानवी गरजांचा अभ्यास करावा लागतो. सुखी होण्यासाठी किंवा दुःखी न होण्यासाठी सर्वसामान्यांना नक्की काय काय लागतं याचा विचार करावा लागतो. सर्वसाधारण समाज सुखी होण्यासाठी समाजात नक्की काय असावं लागतं? थोडक्यात उत्तर असं की सुबत्ता, आयुर्मान, आणि शिक्षण या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. तिन्ही तशा एकमेकांशी संबंधित आहेत.

वरील आलेखात उत्पन्न व बालमृत्यूचं प्रमाण यांचा परस्परसंबंध दाखवला आहे. य अक्षावर उत्पन्न आणि क्ष अक्षावर बालमृत्यूचं प्रमाण आहे. प्रत्येक गोळा म्हणजे एक देश आहे, व गोळ्याचा आकार देशाच्या लोकसंख्येशी समानुपाती आहे. सर्वसाधारणपणे उत्पन्न जितकं अधिक तितकं बालमृत्यूचं प्रमाण कमी असं दिसून येतं. या आलेखाच्या तळातला बाण फिरवून गेल्या तीस वर्षांमधल्या परिस्थितीतला बदल पहाता येतो. दोन्ही अक्ष लॉग स्केलवर असल्यामुळे एका घरात डावीकडे किंवा वर जाणं म्हणजे दहापटीचा फरक हे लक्षात ठेवा. हे चित्र आपल्या अपेक्षांशी मिळतंजुळतं आहे. सुशिक्षित आणि धनवान समाज आपल्या नागरिकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवू शकतो. ज्या समाजात आरोग्य चांगलं आहे, त्यातील व्यक्तींचं व मुलांचं अकाली मृत्यूचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे समाजाची आर्थिक प्रगती करणं अधिक सोपं होतं. मागच्या पिढीचं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोचवण्याची प्रक्रिया अधिक सुरळित होते. त्याचबरोबर या तीनही बाबतीत वैविध्यही दिसून येतं. काही देश तुलनेने गरीब असले तरी शिक्षण व आरोग्य या बाबतीत पुढे असतात. एका अर्थाने या तीन बाबी मानवी संस्कृतीचे आणि प्रगतीचे तीन आधारस्तंभ आहेत. म्हणून या तीनही मानदंडांपैकी एकच कुठचा तरी निवडण्याऐवजी त्यांचा एकत्रितपणे विचार करणं अधिक योग्य ठरतं.

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (युएनडिपी) तर्फे १९७० सालापासून सर्व देशांसाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (एचडीआय) नावाचा एक निर्देशांक मोजला जातो. त्याचं गणित थोडं किचकट असलं तरी त्यामागची कल्पना सोपी आहे. आरोग्यासाठी जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान, सुबत्तेसाठी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वापरून काढलेलं दरडोई उत्पन्न, आणि शिक्षणासाठी सरासरी शैक्षणिक वर्षं वापरली जातात. प्रत्येक निकषासाठी ० ते १.०० मध्ये येईल असा निर्देशांक काढला जातो. आणि त्या तीनची सरासरी (सध्या जीऑमेट्रिक मीन वापरतात) म्हणजे त्या देशाचा एचडीआय. ज्या देशाचा एचडीआय अधिक तो अधिक 'प्रगत'. या प्रगतीच्या पातळीनुसार साधारणपणे जगाचे चार भाग केलेले आहेत अप्रगत, मध्यम प्रगत, प्रगत आणि आत्यंतिक प्रगत. भारत सध्या मध्यम प्रगत देशांमध्ये गणला जातो. चीन, भारत, इंडोनेशिया असे लोकसंख्याबहुल देश मध्यम पातळीवरच असल्यामुळे जगाची सरासरी साधारण भारताच्या आकड्यांपेक्षा थोडीशीच वर आहे.

डावीकडच्या आलेखात जगातल्या १८७ देशांची गेल्या तीस वर्षाची प्रगती दाखवलेली आहे. प्रगतीची पातळी आकड्यांप्रमाणेच रंगानेही दर्शवलेली आहे. भारत पोपटी रंगाने दर्शवला आहे. आलेखाकडे नजर टाकल्यावर ताबडतोब जाणवणारी गोष्ट म्हणजे जवळपास प्रत्येक देशाची प्रगती झालेली आहे. गेल्या तीस वर्षांत हे एचडीआयमध्ये घट झाली असे देश जवळपास नाहीतच. संपूर्ण जगभरच सुबत्ता, आरोग्य आणि शिक्षणाची पातळी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट चटकन जाणवत नाही ती म्हणजे मध्यम प्रगत आणि आत्यंतिक प्रगत यांच्यातली दरी घटत चाललेली आहे. भारत आणि त्यावरच्या देशांकडे बघितलं की हे स्पष्ट होतं.

प्रगतीचा मार्ग स्पष्ट करण्यासाठी मी वरच्या आलेखात या चारही गटांमधले देश एकाशेजारी एक दाखवलेले आहेत. प्रत्येक चौकटीत १९८० ते २०११ चेच एचडीआय दिसत आहेत. मात्र हे शेजारी ठेवल्यामुळे प्रगतीचे टप्पे आणि मार्ग दिसून येतात. पहिल्या गटातले देश दुसऱ्या गटाच्या सुमारे पंचवीस वर्षं मागे आहेत. तसंच दुसऱ्या गटातले देशही तिसऱ्या गटापेक्षा पंचवीस वर्षं मागे आहेत. चौथ्या गटातले सरासरीने तिसऱ्या गटापेक्षा तीस वर्षं पुढे असले तरी त्या गटातल्या अनेक देशांची सुरूवात तीस वर्षांपूर्वी बऱ्याच अलिकडून केली होती हे दिसून येतं. तेव्हा हेच प्रगतीचे ट्रेंड राहिले तर भारत पुढच्या पन्नास वर्षांत सध्याच्या अतिप्रगत देशांइतका प्रगत असेल असा अंदाज करता येतो. दक्षिण आफ्रिकेतले सध्या भयाण परिस्थितीत असणारे देशही सुमारे पंच्याहत्तर वर्षांत सध्याच्या युरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाइतके प्रगत होतील अशी आशा दिसते.

प्रत्यक्षात मी याहीपेक्षा अधिक आशावादी आहे. गेल्या तीस वर्षांत दिसून आलेली प्रगती ही तीस वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानाने मिळवलेली होती. म्हणजे कॉंप्युटर नाहीत, सेलफोन नाहीत, रस्ते-दळणवळण जुनाट या परिस्थितीत. यापुढे होणारी प्रगती अधिकच वेगवान असेल. उदाहरणच द्यायचं तर १९८१ सालापासून मेक्सिकोचा प्रवास ०.५९ पासून ०.७७ पर्यंत झाला आहे. मध्यम प्रगत देशापासून ते प्रगत गटापर्यंत. सध्या भारत ०.५५ वर आहे. पण इथून पुढे जाण्यासाठी जी यंत्रणा आपल्या हाती आहे ती मेक्सिकोकडे तीस वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे भारताचा हाच प्रवास तीसऐवजी वीसेक वर्षांत होईल. पस्तीस-चाळीस वर्षांतच अतिप्रगत राष्ट्रांच्या सध्याच्या स्थितीपर्यंत भारत पोचू शकेल.

या चित्राकडे बघताना जसा अप्रगत किंवा मध्यम प्रगत देशांच्या भविष्याचा विचार करता येतो तसाच अतिप्रगत देशांच्या भूतकाळाचाही विचार करता येतो. सर्वच देशांच्या रेषा या आलेखावर पुरेशी दशकं मागे खेचल्या तर तेव्हा सर्वच देश अप्रगत होते. म्हणजे सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी अमेरिका, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे वगैरे सर्वच मंडळी सध्याच्या अफगाणिस्तान, नेपाळ, झिंबाब्वेप्रमाणे होते. त्यापूर्वीच्या शतकांचा तर विचारच करवत नाही. मग कुठेतरी, केव्हातरी सुवर्णयुग होतं आणि आत्ताच जग रसातळाला चाललं आहे असे विचार जे सर्रासपणे मांडले जातात त्यांच्यातला फोलपणा लक्षात येतो.

या जगाच्या संस्कृतीची, समृद्धतेची बिल्डिंग हळूहळू बांधली जात आहे. या बांधकामाला गेल्या काही दशकात प्रचंड वेग आलेला आहे. काही देशांना चांगले फ्लॅट्स तयार होऊन मिळालेले आहेत. काहींचे जवळपास होत आलेले आहेत. काही तात्पुरत्या छोट्या घरात रहात आहेत. काही अजूनही झोपडीतच आहेत. पण त्यांचाही लवकरच नंबर येईल. ही बिल्डिंग तयार व्हायच्या आधी इथे गोठा होता. त्याआधी उकीरडा होता. त्याहीआधी सापांनी आणि वाघरांनी भरलेलं जहरी जंगल होतं. त्यावेळी सर्वच पशूपातळीवर रहात होते. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या परीने ते जिथे होते तिथे जमेल तसा नेटका संसार मांडण्याचा प्रयत्न केला. परिसर स्वच्छ केला. पुढच्या पिढ्यांसाठी ही जागा अधिक सुंदर होईल असा प्रयत्न केला. त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आता बऱ्याच लोकांना माणसासारखं हक्काच्या घरात रहायची संधी आहे. आपणही तीच परंपरा चालू ठेवतो आहोत. त्यामुळे भविष्यकाळ उज्वल आहे.

Node read time
6 minutes
6 minutes

अशोक पाटील Mon, 13/08/2012 - 18:28

विषय मांडणी आवडली. लेखकाने स्वत:च आपण आशावादी आहोत असे प्रकट केल्यामुळे साहजिकच चारही तक्त्यातील एच.डी.आय. च्या लाटावरील त्यांचे भाष्य त्याच अनुषंगाने लिखाणात उतरणार यात संदेह नाही.

प्रगतीचे ट्रेंड जरी वरीलप्रमाणेच राहतील असे जरी मान्य केले तरी अतिप्रगत, साधारण प्रगत आणि अल्पप्रगत यांच्यातील तफावतीची दरी अरुंद कशी होत जाईल हे समजणे कठीण आहे. कारण कालपरत्वे आज जे अतिप्रगत आहेत त्यांची अगदी या क्षणाला प्रगती खुंटत जाईल वा तिचा वेग मंदावत जाईल असे गृहितक जरी मांडले, मान्य केले तरीही चीन जपान वगळता आशियातील भारतासह बाकीचे देश, तसेच आफ्रिकेतील [भयाण परिस्थितीतील] देश अमेरिका वा युरोपमधील स्वीट्झर्लंड सारख्या हापूस आंब्यांशी कशी काय बरोबरी करू शकतील ? हा प्रश्न संबंधित विवेचन (....एक सर्वसामान्य वाचक,....अभ्यासू नव्हे....) वाचताना पडला.

स्वीट्झर्लंडचे नाव घेतलेच आहे तर त्या देशाची भारत व आफ्रिकेतील एकदोन देशाशी तुलना करण्याचा मोह होत आहे. कारण प्रगतीच्या सार्‍या उड्या ह्या शेवटी ग्रीन डॉलर्सच्या ताकदीवरच घडू शकतात, हे तरी सर्वमान्य आहेच. :
आज स्वीस.चे जीडीपी पर कॅपिटा आहे ८१,१६० डॉलर्स
त्याचवेळी भारताचा दिसतो १,३८९
तर आफ्रिका खंडातील बुरुंडी चा आहे २७९, मादागास्करचा ४५८, तर ज्या दक्षिण आफ्रिका देशाला आपण गोर्‍यांचे राज्य म्हणतो त्याचा जीडीपी आहे ८,०६६
[विकीवरून ही आकडेवारी प्रतिसादाच्या पुष्ठ्यर्थ घेतली आहे....जी २०११ ची आहे]

आकडेवारीवर सहज नजर टाकली तर येत्या ५० च नव्हे तर १०० वर्षातही स्वीसच्या प्रगतीच्या आसपासही आम्ही जाऊ शकत नाही, असे ढोबळमानाने म्हणता येईल. [कारणे काहीही असोत]. शिवाय भारतदेशाने अगदी नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती सर्वच क्षेत्रात केली तरी दुसरीकडे त्याचवेळी स्वीस आणि अन्य युरोपीअन्स देशही आपला वारू त्याच रस्त्यावर मोकळा ठेवत राहणार हेही उघड असल्याने, ज्यावेळी श्री.घासकडवी अंदाज व्यक्त करतात की, "तेव्हा हेच प्रगतीचे ट्रेंड राहिले तर भारत पुढच्या पन्नास वर्षांत सध्याच्या अतिप्रगत देशांइतका प्रगत असेल असा अंदाज करता येतो....." त्यावेळी मनी हेच आले की प्रगतीचा ट्रेंड हा फक्त विकसनशील देशानांच लागू होतो की विकसित देशांनादेखील.

"दक्षिण आफ्रिकेतले सध्या भयाण परिस्थितीत असणारे देशही सुमारे पंच्याहत्तर वर्षांत सध्याच्या युरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाइतके प्रगत होतील अशी आशा दिसते."

~ हा विचार व्यवस्थित समजला नाही. म्हणजे असे की, 'दक्षिण आफ्रिकेतले देश" म्हणजे नेमके कोणते ? की लेखकाला केवळ 'आफ्रिकेतील देश' इतकेच अभिप्रेत आहे ? त्याच अनुषंगाने आफ्रिकेतील जे काही देश लेखाला अनुसरून त्यांच्या नजरेसमोर आहेत, ते प्रगतीच्या ट्रेंड आलेखानुसार 'सध्याच्या' युरोप अमेरिका जपान इ. बरोबर येतील याचा अर्थ आज या प्रगत देशाचा जीडीपीचा जो रेट आहे 'तो' गाठण्यासाठी ७५ वर्षाचा कालावधी लागेल...असे अभिप्रेत आहे का ? मग असे जर असेल तर आजची आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती ७५ वर्षानंतर तशीच राहील असे म्हणावे लागेल.

बाकी समृद्धतेच्या बिल्डिंगबाबत लेखकाने मांडलेला हा आशावाद "पुढच्या पिढ्यांसाठी ही जागा अधिक सुंदर होईल असा प्रयत्न केला. त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आता बऱ्याच लोकांना माणसासारखं हक्काच्या घरात रहायची संधी आहे. आपणही तीच परंपरा चालू ठेवतो आहोत. त्यामुळे भविष्यकाळ उज्वल आहे...." फार भावला.

असेच घडावे.

अशोक पाटील

[इतक्या अभ्यासू, माहितीपूर्ण लेखावर इथल्या सदस्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला आवडेल.]

राजेश घासकडवी Mon, 13/08/2012 - 19:38

In reply to by अशोक पाटील

लेखकाने स्वत:च आपण आशावादी आहोत असे प्रकट केल्यामुळे साहजिकच चारही तक्त्यातील एच.डी.आय. च्या लाटावरील त्यांचे भाष्य त्याच अनुषंगाने लिखाणात उतरणार यात संदेह नाही.

मी आशावादी आहे म्हणून माझं या आलेखाबद्दल चांगलं मत आहे असं नसून या आलेखाकडे बघून मी आशावादी झालेलो आहे. गेल्या तीस वर्षांत आख्ख्या जगाने शिक्षण, आरोग्य व उत्पन्न या बाबीत सर्वांगीण प्रगती केलेली आहे.

कारण प्रगतीच्या सार्‍या उड्या ह्या शेवटी ग्रीन डॉलर्सच्या ताकदीवरच घडू शकतात, हे तरी सर्वमान्य आहेच.

बुरुंडीचं दरडोई उत्पन्न २७९ डॉलर्स आहेत असं दाखवून तेवढ्या पैशात प्रगतीचा पल्ला कसा गाठणार असं तुम्ही विचारता. मात्र हे लक्षात घ्यायला हवं की तीस वर्षांपूर्वी भारताचं दरडोई उत्पन्न सुमारे इतकंच होतं. दुसरी गोष्ट अशी की दरडोई उत्पन्नापेक्षा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी चा विचार करावा लागतो. गरीब देशात आंतर्गत उत्पादन झालेल्या सगळ्याच वस्तु व सेवा डॉलरमध्ये स्वस्त असतात. त्यामुळे स्वित्झर्लंड व बुरुंडी ही तफावत ३०० पटीची नसते, तर सुमारे १००च पटीची असते. जशी समाजातली शिक्षणाची पातळी वाढते तशा आंतर्गत उत्पादनाचा भावही वाढतो. गेल्या तीस वर्षांत भारतात हेच झालेलं आहे.

'दक्षिण आफ्रिकेतले देश" म्हणजे नेमके कोणते ?

आफ्रिकेच्या दक्षिण भागातले असं म्हणायचं होतं. पण एकंदरीत चित्र बघितल्यावर 'आफ्रिकेतले देश' म्हणणं अधिक योग्य ठरेल.

ते प्रगतीच्या ट्रेंड आलेखानुसार 'सध्याच्या' युरोप अमेरिका जपान इ. बरोबर येतील याचा अर्थ आज या प्रगत देशाचा जीडीपीचा जो रेट आहे 'तो' गाठण्यासाठी ७५ वर्षाचा कालावधी लागेल...असे अभिप्रेत आहे का ? मग असे जर असेल तर आजची आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती ७५ वर्षानंतर तशीच राहील असे म्हणावे लागेल.

तुम्ही निव्वळ आर्थिक बाबीचाच विचार करत आहात असं वाटतं. आणि नुसत्या तेवढ्याच बाबतीचा विचार केला तरीही ही दरी गेल्या तीस वर्षांत कमी होताना दिसलेली आहे. उदाहरण द्यायचं तर ६० सालापासून ते आत्तापर्यंत भारताचा जीडीपीचा दर सरासरी ५% ते ६% राहिला आहे. सध्या तो ८% ते १०% च्या आसपास आहे. अमेरिकेचा सुमारे ३% च्या आसपास आहे. त्यामुळे अमेरिका व भारत यांच्यातली आर्थिक दरी कमीच झालेली आहे.

जगाचं दरडोई उत्पन्न गेल्या तीस वर्षांत सुमारे चौपट झालेलं आहे, तर भारताचं ते नऊपट झालेलं आहे. यावरून गरीबीतून सुरूवात करून भारत व इतर जग यांच्यातली आर्थिक दरी कमी करण्यात भारताने यश मिळवलेलं दिसतं.

अतिशहाणा Tue, 04/02/2014 - 08:28

In reply to by राजेश घासकडवी

उदाहरण द्यायचं तर ६० सालापासून ते आत्तापर्यंत भारताचा जीडीपीचा दर सरासरी ५% ते ६% राहिला आहे. सध्या तो ८% ते १०% च्या आसपास आहे.

2012 मधील भारताचा GDP growth rate 4.5% होता असे दिसते.

http://www.livemint.com/Politics/burPSwwZ4JstNqkBGGWXCP/Economy-grows-4…

असो. लेखमालेच्या एकंदर निष्कर्षाशी सहमती आहे.

मी Mon, 13/08/2012 - 19:46

HDI चा बबलचार्ट नेत्रदिपक आहे. विद्याप्रमाणे* लेखाच्या मतितार्थाशी पुर्ण सहमत आहे.

बबलचार्टची टाइमलाईन बघितल्यावर लक्षात आले ते असे - १९८०-२००९ कालखंडात चायनाचा प्रगतीचा वेग भारताच्या वेगाच्या बराच जास्त आहे, त्या अनुषंगाने - प्रगती झाल्यास त्याची फळे सर्वच वर्गांना चाखायला मिळणार हे नैसर्गिक आहे, पण प्रगतीच्या वेगात (गरिबी ते श्रीमंती)तली दरी अरुंदावली नाही तर प्रगती फार काळ टिकेल काय? आजच्या प्रगत देशात ही दरी अरुंदावण्याचा वेग जवळपास प्रगतीच्या वेगाशी समप्रमाणात असावा असे वाटते.

*सामान्य नागरीक म्हणून आज प्रगतीच्या वाटपात विषमता दिसत असल्याने असहमत व्हावे वाटते, पण वरील आलेख फक्त 'आज'पेक्षा, 'आज'ची 'काल'शी तुलना करुन प्रगतीचा मार्ग प्रोजेक्ट करतो, त्या प्रोजेक्शनशी सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 13/08/2012 - 22:27

प्रगतीच्या संदर्भात बालमृत्यु आणि जीडीपीचा आलेख पाहून स्वीडीश प्राध्यापक हान्स रोजलिंग यांचं टेडवरचं हे टॉक आठवलं.
http://www.ted.com/talks/hans_rosling_on_global_population_growth.html
बालमृत्युचं प्रमाण (कमी करणं) आणि सरासरी उत्पन्न, राहणीमान यांचा संबंध हान्स यांनी सोप्या पद्धतीने (simplistic) समजावला आहे. गरीबी आणि श्रीमंतीमधली दरी वाढते आहे हे हान्स अमान्य करत नाहीत, पण त्याचं कारण गरीब आहेत तिथेच रहातात आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत त्यामुळे हे अंतर वाढत जातं असा त्यांचा दावा आहे. यापुढे भविष्यात काय होईल याचा विचार मांडताना हान्स सुचवतात, गरीब लोकांची संख्या नजीकच्या भविष्यात वाढत राहील. मध्यमवर्ग आणि श्रीमंतांची संख्या तेवढीच राहील कारण त्यांच्यात असणारं फॅमिली प्लॅनिंग, प्रत्येक स्त्रीमागे जन्माला येणारं मुलांचं स्थिर प्रमाण इत्यादी. गरीब लोकांमधेमात्र दर स्त्रीमागे जन्माला येणार्‍या मुलांंचं प्रमाण अचानक कमी होऊन स्थिर होणार नाही. त्यांची संख्या वाढेल, पण हळूहळू त्यांच्यातही या गोष्टी फैलावून सर्व जगच अधिकाधिक समृद्धीकडे जाईल असं हान्स यांचं म्हणणं आहे.

आफ्रिकेतली प्रगती मोजणार्‍या या टॉकमधे रोजलिंग लेखात पुढे आलेला मुद्दाही मांडतात. उशीरा सुरूवात करण्याचा फायदा म्हणून प्रगतीचा वेग बराच जास्त असू शकतो. (दुर्दैवाने या लिंकवर टॉकचा बालमृत्यु होतो.)
http://www.ted.com/talks/hans_rosling_the_good_news_of_the_decade.html

मन Mon, 13/08/2012 - 23:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काही मुस्लिम देशांबद्दल हान्स रोजलिंग ह्यांचं काय म्हणणं आहे? सिरिअसली विचारतोय.
मध्यपूर्वेत प्रजननाचा वेग अफाट आहे. लादेन त्याच्या भावंडात सत्तावन्नावा आहे म्हणतात. आणि लादेनकडे तिथे कुणीही
"वेगळेच काहीतरी" म्हणून पहात नाहीत; म्हणजे तितके नाही ,तरी त्याच्या आसपास भटकणारे आकडे तिथे जाता येता दिसत असावेत.
बांग्लादेशचा जो लोकसंख्येचा विस्फोट होतोय, तो कधी थांबेल असं म्हणतोय हा प्रोफेसर?
फक्त पन्नास वर्षापूर्वी रशिया ह्या देशाच्या एक तृतीयांश(३३ टक्क्याच्या आसपास) बांग्लादेशची लोकसंख्या होती; आज ती आख्ख्या रशिया ह्या अवाढव्य देशाच्या सव्वापट आहे! ह्याच वेगाने ते जात राहिले तर काय होणार हे ह्याची भारतीयांनाही जाणीव आहे. असो . अवांतर.
टार्की, काही प्रमाणात मलेशिया सोडला तर मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीच्या एक्ष्पोनेण्शिअल वाढीबद्दल जगभर जी भीती व्यकत केली जाते आहे ( विशेषतः मुस्लिमेतरांकडून); त्याबद्दल काय म्हणणं आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/08/2012 - 00:00

In reply to by मन

बांग्लादेशात प्रत्येक स्त्रीला असणारी सरासरी मुलांची संख्या भारतापेक्षा कमी आहे. आपण त्या बाबतीत बांग्लादेशापेक्षा मागास आहोत. :-)
बांग्लादेश आणि राश्या यांची आकार-लोकसंख्या अशी सरळ तुलना करता येणार नाही. सैबेरिया आणि गंगेचं सुपीक खोरं यांची तुलना करणं योग्य नाही. दुसर्‍या टॉकमधे दुसर्‍याच विषयासंदर्भात एकत्र आफ्रिकेची सरासरी का काढू नये याचं जे स्पष्टीकरण देतो ते मूलतः इथे लागू होतं.

अरब देश अजूनही मागास आहेत. पहिल्या टॉकमधे पाहिलं तर हान्स त्याबद्दलही बोलतो. अजूनही काही देश आहेत जिथे एक स्त्री सरासरी ५ किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देते. त्यांच्यात अधिक सुधारणा कशा करता येतील याबद्दल तो फार बोलत नाही.

मन Tue, 14/08/2012 - 00:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बांग्लादेशात प्रत्येक स्त्रीला असणारी सरासरी मुलांची संख्या बहरतापेक्षा कमी आहे.
हे मी नाहीच्च मानणार.
कै च्या कै हे.
सैबेरिया आणि गंगेचं सुपीक खोरं ह्यांची तुलना कोण करतय? पण पारंपरिक रितीनं आधी किती माणसं रहात होती आनि आधुनिक युगात किती रहावेत ह्याचं काही गुणोत्तर हवं की नको?
अरे गचाळ भाषेत बोलायचं तर "ह्या बांग्लादेशींना बच्चे पैदा कराण्याशिवाय काहीही येत नाही. ह्यांना युनो वगैरेनं (म्हणजे अमेरिकेनं) कसलीही अन्नधान्य मदत न करता मरायला सोडून दिलं पाहिजे इतका ताण ते पृथ्वीवर वाडह्वताहेत." असं एक तीन दशकांपूर्वी प्रसिद्ध अमेरिकन स्ट्रॅटजिस्ट म्हणाला होता. बांग्लादेश हे माल्थस कर्व्हचं आदर्श उदाहरण बनू पहात होतं.
आमचा जननदर अधिक असेल तर सालं आमच्याकडून त्यांच्याकडे घुसखोरी का होत नाही? तिकडून इकडेच का होते तिच्यायला?

धनंजय Tue, 14/08/2012 - 00:06

In reply to by मन

विकिपीडियावर संकलित आकडे ठीक असतील तर (दुवा प्राथमिक स्रोत विश्वासार्ह)
पन्नास वर्षांपूर्वी बांगलादेशाचा "टोटल फर्टिलिटी रेट" (प्रतिस्त्री अपत्यसंख्या) ६.३६ इतकी होती. आता २.३८ इतकी आहे. बांगलादेशात बहुपत्नीत्वाचा दर १०% आहे (विकी दुवा - प्राथमिक दुवा? विश्वासार्ह?). ही टक्केवारी साधारण ठीकठाक असली तर बहुतेक कुटुंबे "जोडपी" असावी, असे दिसते. काही का असेना, जेव्हा स्त्रीला सरासरी ~२.१ अपत्ये होतात, तेव्हा "रिप्लेसमेंट" = जेमतेम भरणारे प्रजोत्पादन होते. भारतातली सध्याची प्रतिस्त्री अपत्यसंख्या २.७१ आहे, ही बाब उलनेकरिता उपयोगी ठरावी.

त्यामुळे बांगलादेशाची लोकसंख्या "एक्स्पोनेन्शियल" वाढत आहे, ही भीती ठीक नाही. आकडे डोळ्यांसमोर नसल्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्तीला अशी भीती वाटू शकेल. पण आकडे बघताच ती भीती नाहिशी व्हावी.

बिन लादिनच्या सुखवस्तू बहुबहुपत्निक कुटुंबात डझनावारी अपत्ये असली, तरी सौदी अरेबिया देशाची प्रतिस्त्री अपत्यसंख्या कमीच होत आहे (विकिपीडिया दुवा प्राथमिक स्रोत विश्वासार्ह). त्यामुळे सौदी अरेबियाबाबतही अतिरेकी भीती बाळगणे वाजवी नाही.

(रशिया अवाढव्य देश आहे, पण अँटार्क्टिका खंड साधारणपणे तितकाच अवाढव्य आहे. चिमुकल्या गोवा राज्याची लोकसंख्या अँटार्क्टिकाच्या हजारोपट आहे. १. सुपीक आणि सुसह्य हवामान असलेल्या [प्र]देशांच्या लोकसंख्येची तुलना रशियाशी करणे ठीक नाही. २. रशियाची लोकसंख्या आज कित्येक वर्षे घटते आहे. या बाबतीत रशियामध्ये चिंताजनक मानली जाते. त्यामुळे कुठ्ल्याही देशातील लोकसंख्येची वाढ रशियाइतकी - म्हणजे उणे - असती तर सुयोग्य नव्हे, अयोग्य मानली गेली असती. शक्यतोवर तुलनेकरिता रशिया हा देश वापरायला नको.)

प्रत्येक मुद्दा मान्य.
रशियातील वैराण बहग सोदून दिल तरी युरोप- आशिया लगतचा बराचसा समशीतोष्ण कटिबंधात येतो, राहण्यागत मानला जातो असे ऐकून आहे.
थोडक्यात झार सत्तेचे प्रमुख केंद्र असलेले मॉस्को व इतर शहरे व त्यालगतचा भाग. गंगाखोर जगातील सर्वोत्तम मानवी वास्तव्यास अनूकुल आहे काही हजारो वर्षे, म्हणूनच इथे पूर्वीपासूनच लोकसंख्येची घनता जास्ती आहे, हे मान्म्य आहे. त्यातही, ही दाटी सामान्यांना वाटते तशी यु पी- बिहार मध्ये सर्वाधिक नाही!
सर्वाधिक दाट वस्ती बंगाल- बांग्लादेश प्रांतात आहे!! ठाउक आहे. मान्य आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/08/2012 - 02:19

In reply to by मन

हान्स रोजलिंगचा त्याबद्दल अंदाज (प्रेडीक्शन) असं आहे की, (सुबत्तेबरोबर) मुलं जगण्याचा दर वाढत जातो (स्त्री-पुरूष सर्वांचंच शिक्षण येतं आणि त्यातून) प्रत्येक स्त्रीला असणार्‍या मुलांच्या सरासरी संख्येत घट होते.

बंगाल-बांग्लादेशातही स्त्रियांचा सरासरी प्रजननदर कमी होतो आहेच. या प्रदेशात आत्ता असंतुलन दिसत आहे, विशेषतः बांग्लादेश हा वेगळा देश आहे त्यामुळे त्यांच्या असंतुलनाचा आपल्याला उपद्रवही होतो. जशी भारताची प्रगती होते आहे तशीच तिथेही होते आहे असं मानण्यास जागा आहे. महंमद युनूस हे महिला सबलीकरण करण्याचं, सुबत्ता वाढणे याचं एक उदाहरण झालं.

लोकसंख्या एक्स्पोनेंशली* वाढण्याची धर्माधारित भीती आकडे दाखवल्यास बहुतांशी निराधार होते. सध्या आफ्रिकेतल्या काही देशांमधे स्त्रियांचा प्रजननदर बराच जास्त आहे, पण तो ही खाली येतो आहेच. तिथे जेवढ्या लवकर सुबत्ता येईल आणि स्त्रियांचे शैक्षणिक, आर्थिक सबलीकरण तेवढ्या चटकन हा दर खाली येईल.

धनंजयः या विशिष्ट संदर्भात, स्त्रियांच्या प्रजननदराचा विचार करताना मुलं वाढवणारी कुटुंबं जोडपी असण्याची शक्यता, स्त्री-पुरूषांचं प्रमाण साधारणतः ५०-५०% असेल तर, लक्षात घेण्याची फार आवश्यकता नाही.

* हा शब्द देवनागरीत लिहीताना फार त्रास होतात. याला मराठी प्रतिशब्द आहे काय?

धनंजय Tue, 14/08/2012 - 02:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या विशिष्ट संदर्भात, स्त्रियांच्या प्रजननदराचा विचार करताना मुलं वाढवणारी कुटुंबं जोडपी असण्याची शक्यता, जन्मताना स्त्री-पुरूषांचं प्रमाण साधारणतः ५०-५०% असेल तर, लक्षात घेण्याची फार आवश्यकता नाही.

बरोबर आहे. (अधोरेखित शब्द वाढवला आहे. अध्याहृत स्पष्ट केलेले आहे, माझ्याकरिताच.)

"एक्स्पोनेन्शियल" म्हणजे "घातवृद्धी" वगैरे काहीसा शब्द असावा.

धनंजय Tue, 14/08/2012 - 04:20

In reply to by राजेश घासकडवी

कम्पाउंड इन्टरेस्ट साठी मी हा शब्द वापरलेला आहे. परंतु ठीक आहे, कम्पाउंड इन्टरेस्ट आणि एक्स्पोनेन्शियल यांचा घनिष्ठ संबंध आहे.

क्रेमर Tue, 14/08/2012 - 18:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या आठवड्यातील 'द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकात आलेल्या लेखातही असेच मत मांडलेले आढळले.

जननदर घटल्याने समृद्धी कशी वाढते? याविषयी लेखाच्या सुरूवातीलाच काही कारणमिमांसा दिलेली आहे.

ECONOMIES benefit when people start having smaller families. As fertility falls, the share of working-age adults in the population creeps up, laying the foundation for the so-called “demographic dividend”. With fewer children, parents invest more in each child’s education, increasing human capital. People tend to save more for their retirement, so more money is available for investment.

मन Tue, 14/08/2012 - 18:40

In reply to by क्रेमर

हे उलट कसं झालं?
पूर्वी, निदान दोनेकशे वर्षापूर्वीपर्यंत ज्याची संख्या अधिक त्याची अर्थव्यवस्था मोठी असं थेट गणित होतं.आता लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात कसं जाउ पाहतय?
पूर्वी प्रत्येक टोळीची मानसिकताही "आपण अधिकाधिक वाढावं"अशीच होती. "आबादी आबाद हो जाइये" ह्यासारखे आशीर्वाद असत. "आबादी", लोकसंख्या असणे ही चांगली गोष्ट मानली जायची.
तुम्ही उल्लेख केलेले फॅक्टर्स तेव्हा लागू होत नव्हते का?

क्रेमर Tue, 14/08/2012 - 18:53

In reply to by मन

दोनेकशे वर्षांपुर्वी शेती किंवा तत्सम उद्योग लेबर इंटेन्सिव होते. त्यामुळे अधिक जननदर असल्याने समृद्धी वाढेल अशी कारणमिमांसा निदान पटण्यासारखी होती. आजकाल सर्वच देशांमध्ये चांगले वेतन मिळण्यासाठी काही कौशल्य असावे लागते. कौशल्य मिळवण्यासाठी गुंतवणूकीची (शिक्षण, वेळ वगैरे) आवश्यकता असते. श्रीमंत तसेच मध्यमवर्गीय लोक अशी गुंतवणूक करू शकतात. गरीब मात्र अशी गुंतवणूक करू शकत नाहीत. मुलांना कौशल्य नसलेला रोजगार सहज मिळाल्याने कुटूंबाच्या एकूण उत्पनात वाढ होते म्हणून गरीबांमध्ये जननदर घटतांना दिसत नाही.

अतिशहाणा Tue, 07/04/2015 - 20:01

In reply to by क्रेमर

या लेखात काही रोचक शक्यता वाचल्या
https://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=27600

घटत्या जननदरामुळे नॉन प्रॉडक्टिव लोकसंख्येचा भार वाढत असल्याने विकसित देशांवरील कर्जे वाढत आहेत. त्यामुळे विकसित देशांमधील गुंतवणूक कमी होऊ शकते. अमेरिकेसारखे देश स्थलांतरितांची आयात करुन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताहेत. कदाचित जर्मनी/जपानसारखे देश क्लोनिंग, रोबोटिक्स किंवा इतर असेक्शुअल रिप्रॉड्क्शनचा विचार करु शकतात.

भारत या सर्व प्रश्नांना खूप उशीरा सामोरा जाईल त्यामुळे भारताला इतरांच्या चुकांवरुन शिकण्याची संधी मिळेल.

मन Mon, 13/08/2012 - 23:50

लेख छान. धाग्याचे शीर्षक आणि लेखाकाचे नाव पाहून जो आशय असण्याचा अंदाज होता; तो तंतोतंत खरा ठरला. तुम्ही आशावादी गाणे गातच आहात; तर मी साथीला निराशावादाचे रडगाणे सुरु करतोय.
मागे अशोक काकांनी उल्लेख केलेली home ही बहुचर्चित डॉक्युमेंट्री आपण पाहिलीत का? तथाकथित प्रगती कुठे घेउन चालली आहे ह्याची कल्पना आहे का?(तिचा शेवट आशावादी असल्यानं मला तो सोडून इतर सगळ्यातच तथ्य वाटलं होतं.)
सध्या प्रगतीच्या नवाखाली चीन आणि भारत ह्यांचं अन्नधान्य, खाद्य्यान्न दर्ज ह्यांची अवस्था ठाउक आहे का?
प्लास्टिकचे काय करणार? पृथ्वी प्लास्टिकमुळे घुसमटते आहे हो.
यादाकदाचित आख्खी पृथ्वी सुजलाम सुफलाम वसुंधरा झालीच; भारतातल्या गुन्हेगारीसारखीच सर्वत्र ती प्रगती दृढमूल झाली; भारतातल्या बेशिस्तीइतकीच नियमितपणे सर्व जगभर समृद्धी आढळू लागली तरी आख्खे जग म्हणजे एक सुंदर काचेचे घर ठरेल; एका कधीही फुटू शकेल अशा अतिप्रचंड, काचेच्या घराच्या शंभरपट आकाराच्या दारुगोळ्याच्या ढिगार्‍यावर बसल्यासारखे. जगभर अण्वस्त्रौपलब्धी वाढते आहे. आजवर कधीच कुणी अणुबॉम्ब (१९४५ नंतर) टाकला नाही म्हणजे याहीपुढे टाक्णार नाहीच असे पब्लिक का समजते ते मला एक कोडेच वाटते. स्वतःला बॉम्ब लावून लोकांचा जीव घेण्याइतपत भावना तीव्र होणे शक्य असेल तर एका अण्वस्त्रधारी शक्तीने दुसर्यावर अण्वस्त्रे टाकणे काय अशक्य आहे?
आता ह्या सगळ्याचा नि प्रगतीचा काय संबंध? तर अर्थाअर्थी काहीही नाही. पण काही दिवसात प्रगती होउन सारे काही सुरळीत होइल; अवघाची संसार सुखाचा होइल; जो जे वांच्छिल तो ते लाहील हे पटत नाही. त्या आशावदाचा उतारा म्हणून मनातील भीती टंकतो आहे.
अशावांद्यांचा शेवट संस्कृत सुभाषिताप्रमाणे होउ नये म्हणजे झाले.(शुद्धलेखनाबद्दल माफी, थेट दहा वर्षांनी संस्कृतला हात घालतोय.)
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वान्नुदेष्यति हसिष्यति चक्रवालम्
इत्येव चिन्तयति कोष गते द्विरेफे
हा हन्त हन्त! .....
नलिनींगजमुज्जहासेत् ||

(भावार्थ :- "रात्र सरेल; अलगद दिवस उजाडेल, मग लगद मी ह्या कोषातून बाहेर पडून प्रथमच ती बाहेरची दुनिया माझ्या इवल्या डोळ्यांनी पाहीन" असे म्हणत
तो कोमल जीव कोष विणत असतानाच्..्आय रे दैवा...घात झाला!!! हत्तीने कोष पायदळी घालून चिरडला....!!!!)

माझ्याकडे रडायची खूप कारणे आहेत. प्रोजेक्ट मध्ये क्लायंटसमोररडाण्यातून फुरसत मिळाली की इथे येउन पुन्हा लगेच रडगाणे कंटिन्यू करेनच.
लेखन छान; पण एकांगी.( "दास कॅपिटल " सारखं. त्यातही सख्कोल विचार आहे; पण एकांगीच. )

राजेश घासकडवी Tue, 14/08/2012 - 00:16

In reply to by मन

अवघाची संसार सुखाचा होइल; जो जे वांच्छिल तो ते लाहील हे पटत नाही.

सुख म्हणजे नक्की काय तुम्हाला अपेक्षित आहे हे माहीत नाही. मार्क्सने म्हटलं होतं की दुःख संपणार नाहीत. पण सध्या मानवाला पशूची दुःखं आहेत. ती संपून मानवाला मानवाची दुःखं असणं हे आदर्श परिस्थितीचं द्योतक आहे. प्रगती त्या दिशेने चालू आहे इतकंच म्हणायचं आहे. गेल्या तीस वर्षांत मोठी पावलं उचलली गेली आहेत यात शंका नाही.

प्लास्टिक, खाद्यान्न दर्जा हे प्रश्न आरोग्य, आयुर्मान, अन्नाची उपलब्धता, रोगराई, गुन्हेगारी, शिक्षण, वगैरे वगैरे मूलभूत प्रश्नांपेक्षा कमी महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे ते अर्थातच नंतर सोडवले जातील. (प्लास्टिकने जितके प्रश्न सुटले आहेत त्यापेक्षा जास्त निर्माण केले आहेत यावर माझा विश्वास नाही. पृथ्वी घुसमटण्याइतकं प्लास्टिक वगैरे तयार होतं हेही मला मान्य नाही. भारतातला सरासरी खाद्यान्न दर्जा बिघडला आहे याबद्दलही मला विदा सापडलेला नाही.)

मला मुख्य प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे भविष्यात सर्व काही वाईटच होणार, किंवा कोणीतरी अज्ञात हत्ती येऊन आख्खं कमळ चेचून टाकणार याबद्दल इतकी खात्री का वाटते? तुम्हालाच नव्हे, अनेकांना तशी वाटते असं मला आजवर दिसून आलेलं आहे. कितीही विदा सादर करून त्या खात्रीच्या कात्रीतून सुटका होत नाही. या अतिरेकी निराशावादामागचं कारण काय हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण इतका विदा देऊनही मला अनेक वेळा माझा आशावादाबद्दल समर्थन करावं लागलेलं आहे.

लेखन छान; पण एकांगी.( "दास कॅपिटल " सारखं. त्यातही सख्कोल विचार आहे; पण एकांगीच. )

या लेखनाला एकांगी का म्हटलं आहे तेही कळलं नाही. मनुष्याच्या मूलभूत गरजांवरून आरोग्य, सुबत्ता आणि शिक्षण यांसारखे सर्व जगाला लागू होतील असे निकष वापरलेले आहेत. यांपलिकडे आणखीन कुठचे निकष वापरणं गरजेचं आहे?

ऋषिकेश Tue, 14/08/2012 - 09:08

In reply to by मन

पृथ्वी प्लास्टिकमुळे घुसमटते आहे हो.

याच्याशी तुर्तास असहमती नोंदवतो.. वेळ मिळताच मुळ लेखावर आणि यावर सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो.
जर पृथ्वी प्लास्टिमुळे घुसमटत असेल तर त्याहून अधिक ती "तेलामुळे" घुसमटते आहे :)

चिंतातुर जंतू Tue, 14/08/2012 - 07:58

लेखन एकांगी वाटलं नाही. निव्वळ जीडीपीवरून एखाद्या देशाबद्दल काही माहिती मिळेल, पण ती पुरेशी नसेल. मानवी विकास निर्देशांक त्यापुढे जाऊन अधिक व्यापक चित्र दाखवतो. तरीही कदाचित काही गोष्टी त्यातूनही दिसत नसतील. पण म्हणून त्याकडे पाहून काही निष्कर्ष काढूच नयेत असं म्हणणं उलट एकारलेलं ठरेल.

भारताच्या संदर्भात 'मानवी विकास निर्देशांक' म्हटला की हमखास केरळ मॉडेल आठवतं. केरळनं या बाबतीत इतर भारतापेक्षा खूप अधिक साध्य केलं आहे. तरीही पुरेसं औद्योगीकरण नसल्यामुळे लोक पैसा कमवायला राज्याच्या बाहेर पडतात. या संदर्भात भारतातल्या राज्यांची तुलना इतर देशांशी करणारं हे पानही रोचक वाटेल.

नगरीनिरंजन Tue, 14/08/2012 - 13:04

लेख आवडला.गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रगती झाली आहे हे निश्चितच कोणालाही मान्य व्हावे.
लेख एकांगी वाटत नसला तरी प्रगतीच्या वाटेवरच्या काही आव्हानांचा उहापोह केला असता तर अधिक संपूर्ण वाटला असता.
या आव्हानांपैकी एक प्रमुख आव्हान म्हणजे शाश्वत प्रगती.
आज मूठभर देश विकसित आहेत आणि काही प्रगती करायच्या प्रयत्नात आहेत तरी पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांवर अभूतपूर्व ताण पडताना दिसत आहे. शिवाय हे स्रोत अक्षय्य नाहीत हे आपण जाणतोच. असे असताना ५०/७५ वर्षांनंतरच्या परिस्थितीबद्दल केवळ ट्रेंड पाहून भाष्य करणे धाडसी वाटते. सगळ्या देशांची प्रगती होण्यासाठी आणि घटलेला जननदर धरूनही पन्नास वर्षांनी असणार्‍या ९ अब्जाच्या आसपास लोकसंख्येला पोसण्यासाठी पुरेशी संसाधने असतील का हा प्रश्नच आहे.
प्रगती बरोबरच जगण्याच्या पद्धतीत आणि आहारात येणार्‍या एकसाचीकरणाचे आणि त्यातून उद्भवणार्‍या मधुमेह, हृद्रोग, कॅन्सर इत्यादी व्याधींचे प्रमाण वाढणार नाही याची काय खात्री? म्हणजे आपण एक प्रश्न सोडवताना त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होणार नाही याची शाश्वती नाही. शिवाय कार्बन उत्सर्जनावरून होणारे वाद, तेलसाठ्यांवरून होणारे वाद हे भविष्यात उग्र होणार नाहीत याची शाश्वती नाही. पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाहीत याची शाश्वती नाही.

मन Tue, 14/08/2012 - 13:55

In reply to by नगरीनिरंजन

+१

माझी भरः-
मुद्दा एकः-
पृथ्वी सान्त आहे. मानवी हाव(की तथाकथित "गरज") अनंत आहे. हे माझे गृहितक आहे.

मुद्दा दोनः-
दोन मानवी विध्वंस्वृत्ती ही अचाट आहे. भूक लागल्यावर शिकार करणार्‍या प्राण्यांपैकी माणूस नाही. पण "थांब ह्याचा फडशाच पाडतो धरून. नेम धरुन गेम करतो सालयाचा." किंवा "ह्या साल्यांना संपवूनच टाकल्ं पाहिजे. तसेही आपण संपणार आहोत; सगळ्म संपवूनच जाउ." असा अद्भुत विचार मानवच करु शकतो. वृत्तीच्या भाषेत बोलायचं तर इतर सर्व प्राणी फार तर "स्वार्थी " असतील पण माणूस "विध्वंसक" आणि "विघ्नसंतोषी" आहे. खरे तर "स्वार्थी" म्हणणे म्हणजे मानवी वृत्तीचा प्राण्यांवर आरोप करणेच होय. पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी नाइलाजाने करावे लागत आहे.
तर अशा ह्या माणसाच्या हातात अधिकाधिक विध्वंसक शक्ती गेल्यानं सृष्टी टिकावी अशी प्रार्थना करणार्‍याची पाचावर धारण न बसल्यासच नवल.

बाकीचे फुरसतीत टंकतो.

राजेश घासकडवी Tue, 14/08/2012 - 18:40

In reply to by नगरीनिरंजन

एचडीआय मध्येच आता हळूहळू इतर बाबींचाही समावेश होत आहे. उदाहरणार्थ समानतेच्या प्रमाणात ऍडजस्टेड एचडीआय गेल्या वर्षापासून काढला जातो. पॉवर्टी इंडेक्स, सस्टेनेबिलिटी इंडेक्स हेही काढले जातात.

नैसर्गिक संसाधनांबाबतही लिहायचं आहे पुढे कधीतरी. थोडक्यात उत्तर असं - नैसर्गिक संसाधनांत मुख्य म्हणजे पेट्रोल येतं - ते संपेलच येत्या काही दशकांत. पण आत्ताच पर्यायी ऊर्जेवर काम चालू आहे. सोलार सेल्सची एफिशियन्सी वाढत आहे. एकदा त्यांचा उत्पादन खर्च आटोक्यात आला की जग पंधरा वीस वर्षांत सौर ऊर्जेवर जाईल. नऊ-दहा अब्ज हा आकडा प्रचंड वाटतो - पण जगाच्या बायोमासच्या तुलनेने आपण नगण्य आहोत. पृथ्वीवर जी सौर ऊर्जा पडते (२ लाख टेरावॉट) त्यामानाने आपण वापरत असलेली ऊर्जा (~२० टेरावॉट) नगण्य आहे. त्यामुळे संसाधनांचा तुटवडा, आणि 'एवढ्या लोकांना कसं सपोर्ट करायचं' या युक्तिवादांत काही दम नाही. अशा माल्थशियन विचारांचा गेली तीन शतकं पाडाव होताना दिसलेला आहे.

खाण्यातून येणारा एकसाचीपणा वगैरे पटत नाही. मला माझ्या आसपासच्या भारतीयांच्या खाण्यात वैविध्यच अधिक आलेलं दिसलेलं आहे. आजीच्या घरी दररोज भात, भाजी, आमटी, पोळी, कोशिंबीर असा साचा असायचा. मावश्यांनी काही चायनीज, काही साउथ इंडियन, कधी अंडी वगैरे पदार्थ खायला सुरूवात केली. माझी मावसभावंडं याहीपलिकडे जाऊन मांस वगैरे खातात.

नगरीनिरंजन Wed, 15/08/2012 - 10:30

In reply to by राजेश घासकडवी

एचडीआय मध्ये बदल होत आहेत, जीडीपीच्या व्याख्येमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत (सप्टेंबर २००९ मध्ये फ्रेंच सरकारने स्टिगलिट्झ आणि सेन यांची समिती स्थापन केली). म्हणजे ज्याने आपण आजवर प्रगती मोजली ते निदर्शक पुरेसे नाहीत हे हळूहळू लक्षात येते आहे. जेव्हा त्या अनुषंगाने प्रगती मोजल्यावर पुरेसा विदा जमा होईल तेव्हा हेच चित्र दिसेल असे नाही. तसंही एचडीआयमध्ये Autonomy, खाजगी अवकाश, जीवनोपयोगी ज्ञान वगैरे अनेक गोष्टी मोजत नाहीत आणि वाढत्या गर्दीत त्यांचा संकोच होतच जातो.

सौरऊर्जेच्या बाबतीतः तंत्रज्ञान इतके प्रगत होणारच हा अतिविश्वास वाटतो, तरीही ते तसे झालेच तर फक्त ऊर्जेच्या बाबतीतलेच तंत्रज्ञान प्रगत होईल असे नाही. ज्या दिवशी सौर ऊर्जा अगदी स्वस्तात मुबलक प्रमाणात मिळू लागेल त्या दिवशी जगातल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचा 'Superfluous' होण्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. तंत्रज्ञान इतके प्रगत झाल्यावर ज्या लोकांना ते समजण्याइतके उच्च शिक्षण मिळाले आहे तेच लोक उपयोगी ठरण्याचा आणि इतर कमी कौशल्याची कामे यंत्रांकडे जाऊन बरेचसे लोक निरुपयोगी होण्याचा धोका आहे. आत्ताच्या काळातही कौशल्ये झपाट्याने बाद ठरत आहेत. लोकांना सतत नवनवीन काहीतरी शिकावं लागतंय आणि तरीही आपली कौशल्ये काही काळाने टाकाऊ ठरतील या भीतीने लोक ग्रस्त होताहेत. एरिक ड्रेक्स्लरच्या "Engines of Creation" या पुस्तकाच्या ११व्या प्रकरणात ("Engines of Destruction") यावर चांगले विवेचन आहे. साधं स्वतःचं अन्न स्वतः शोधण्याचे किंवा तयार करण्याचे कौशल्य हवे असताना लोकांना भलभलती कौशल्ये आत्मसात करावी लागतील. डेट्रॉईट इफेक्ट सगळ्या जगभर पाहायला मिळेल.

खाण्याबद्दलः माझ्या नातेवाईकांमध्ये तीन केसेस अशा पाहिल्या आहेत की बैठ्या राहणीमानामुळे, खाण्या-पिण्यात एका पिढीत बदल झाल्यामुळे कोणतेही व्यसन नसताना हृद्रोगाने पन्नाशीतच मृत्यु ओढवला आणि इतरही काहींना अँजिओग्राफी/प्लास्टी वगैरे करावी लागलेली आहे. लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. (विदा शोधला नाही). मध्यंतरी BBC Knowledge वर एक माहितीपट पाहिला त्यात विकसित देशांमध्ये अतिस्वच्छतेमुळे आणि सतत अंग धुतल्याने दमा आणि अ‍ॅलर्जीचे विकार बळावू लागलेत असे दाखवले होते. (विदा शोधला नाही)
गेल्या वर्षभरात मी स्वतः ज्वारी, बाजरी, करवंदे, जांभळे, फणस, चिंचा, अंजीरं, बोरं इत्यादी गोष्टी ज्या मी लहानपणी सर्रास खायचो त्या खाल्लेल्या नाहीत. उलट उष्ण हवेत राहतानाही सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असलेली फळे पाहिल्यास स्ट्रॉबेरी, प्लम, पीचेस, सफरचंद, द्राक्षे अशी फळे जास्त असतात.
चायनीज, थाई, इंडोनेशियन, इंडियन आणि वेस्टर्न अन्न खातो पण ही बनवण्याच्या पद्धतींची व्हरायटी आहे. खाद्यपदार्थांची नाही. सगळीकडे मैदा, भात, बटाटा आणि मका यांचे प्रामुख्य दिसते.
भाजी,भात, आमटी, पोळी व्यतिरिक्त इतर रानमेवाही पूर्वी मुले खायची तो आता दिसत नाही आणि दिसला तरी शाळा, क्लासेस मध्ये अखंड गुंतलेल्या पोरांना तो तोडून खाण्याइतका वेळ नसतो.

तुलनेसाठी घेतलेल्या कालखंडात वाढलेल्या आयुष्यमानाच्या आणि रोगनिवारणाच्या बाबतीत मात्र खूप प्रगती झाली आहे हे निर्विवाद आहे आणि भविष्यात यात अधिकाधिक प्रगती होऊन चिरंजीवी लोक निर्माण होतील. कृत्रिम अवयवांचे रोपण करून अनेक वर्षं जगणारी माणसं निर्माण होतील हे खरं.

राजेश घासकडवी Wed, 15/08/2012 - 20:09

In reply to by नगरीनिरंजन

म्हणजे ज्याने आपण आजवर प्रगती मोजली ते निदर्शक पुरेसे नाहीत हे हळूहळू लक्षात येते आहे.

हे बरोबर आहे. मात्र 'पुरेसे नाहीत' याचा अर्थ टाकाऊ असा नाही. शेजारी मॅस्लोची हायरार्की ऑफ नीड्सचा पिरॅमिड दाखवलेला आहे. तुम्ही दिलेले निकष Autonomy, खाजगी अवकाश, जीवनोपयोगी ज्ञान हे वरच्या टप्प्यांवर येतात. जोपर्यंत जनतेच्या तळातल्या गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वरच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता निर्माण होत नाही. जर जगातली ९०% जनता खालच्या पातळ्यांवरच अडकलेली असेल तर वरच्या बाबींची मोजमाप करणं फारसं उपयुक्त नसतं. असा वेळी वरचे निकष वापरणं हे 'हो, दुसरीतून तिसरीत गेला हे खरं आहे, पण त्याला सातवीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात का?' असं विचारण्यासारखं आहे. एक वेळ अशी येईल की सर्वच देशांचा एचडीआय ०.८ च्या वर जाईल. तेव्हा आणखीन वरचे इतर निकष लावावे लागतील. असा बार उंचावण्याची वेळ येणं हेच प्रगतीचं मी लक्षण मानतो.

सौरऊर्जेच्या बाबतीतः तंत्रज्ञान इतके प्रगत होणारच हा अतिविश्वास वाटतो

सौर ऊर्जा आत्ताच इतकी स्वस्त आहे की दहाएक वर्षांच्या आत खर्च सहज भरून निघतो. त्यामुळे जर २० वर्षांत तेलाचे साठे संपणार हे लक्षात आलं तर जगाला पुरवावी लागेल इतकी वीज निर्माण करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तितक्या काळात सहज उभं राहू शकेल. त्याचा खर्च सुमारे २० ते ३० ट्रिलियन डॉलर्स येईल. (जगाची २५ टेरावॉटची गरज - २५० वॉट्स/मीटर^२ - १०० ते २०० बिलियन मीटर^२ - २०० डॉलर/मीटर^२) म्हणजे पुढच्या वीस वर्षातल्या जगाच्या जीडीपीच्या सुमारे २ टक्के. तंत्रज्ञानात सुधारणा झाल्या, मास प्रॉडक्शन सुरू झालं, की हा खर्च निम्मादेखील होऊ शकेल. तेल संपायला लागलं आणि अवाच्या सवा महाग झालं की हा खर्च करायला पुरेसं कॅपिटल नक्कीच येईल. हे करायला जर ४० वर्षांचा कालावधी असेल तर वर्षाला ४०० बिलियन खर्च येईल - सुमारे ७ टक्के रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसकट. (या साइटवर १० टक्के म्हटलेलं आहे, पण ते कितपत विश्वासार्ह आहे माहीत नाही)

ज्या दिवशी सौर ऊर्जा अगदी स्वस्तात मुबलक प्रमाणात मिळू लागेल त्या दिवशी जगातल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचा 'Superfluous' होण्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल.

सुपरफ्लुअस म्हणजे काय ते कळलेलं नाही. लोकांचे कष्ट कमी झाले, ऊर्जा व वस्तु मुबलक प्रमाणात मिळायला लागल्या तर जीवनाचा दर्जा घसरेल हे कसं? गेल्या शंभरेक वर्षांत लोकांना ते मिळायला लागलेलं आहेच. कामाचे तास प्रचंड कमी झालेले आहेत. सुबत्ता वाढलेली आहे. तरीही लोकांच्या जीवनाचा दर्जा घसरला आहे असं वाटत नाही (विदा नाही). तुम्ही दिलेलं पुस्तक मी वाचलेलं नाही. या विषयावर तुम्ही स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती.

खाण्याबाबत - चर्चा वैयक्तिक अनुभवांवर घसरली (सुरूवात मी केली) त्यामुळे फार पुढे जाऊ शकत नाही. पण क्वांटिटी आधी, मग क्वालिटी हे तत्त्व कायमच वापरात आहे. त्यामुळे सगळ्यांना भरपूर खायला मिळालं की मग लोक चोखंदळपणे अधिक चांगलं खायला लागतील या विश्वासापलिकडे मला सध्या काही म्हणता येत नाही.

मन Wed, 15/08/2012 - 20:34

In reply to by राजेश घासकडवी

सुपरफ्लुअस म्हणजे काय ते कळलेलं नाही. लोकांचे कष्ट कमी झाले, ऊर्जा व वस्तु मुबलक प्रमाणात मिळायला लागल्या तर जीवनाचा दर्जा घसरेल हे कसं
ह्याबद्दल आंतरजालावरच अदिती का कुणाचा तरी बर्ट्रांड रसेल बद्दलचा लेख होता. त्यातला उल्लेख आठवला. "हळू हळू प्रगती होइल. अधिक लोक साक्षर होतील. अधिक लोक विचार करतील. कामाचे तास कमी होतील.(व्हायला हवे) तर जीवनमान सुधारले असे म्हणता यावे.".
.
.
अवांतरः-
तंत्रज्ञानात सुधारणा झाल्या, मास प्रॉडक्शन सुरू झालं तोच तो. तोच प्रॉब्लेम आहे. त्याऐवजी
पारंपरिक भारतीय विचारसरणी कीम्वा टिपिकल गांधिअन स्कूल ऑफ थॉट्स म्हणते त्याप्रमाणं "प्रॉडक्शन बाय मासेस" झालेलं कधीही उत्तम नाही का.
स्वातंत्र्यपूर्व काळात चरखा बनवून एक चळवळ म्हणून ते उभे करायचा काही अंशी यशस्वी प्रयत्न होता. तसेच काहीतरी, आजच्य काळानुरुप आता काढत येणार नाही का?

नगरीनिरंजन Tue, 07/04/2015 - 21:50

In reply to by मन

superfluous
suːˈpəːflʊəs,sjuː-/
adjective
unnecessary, especially through being more than enough.
"the purchaser should avoid asking for superfluous information"
synonyms: surplus, redundant, unneeded, not required, excess, extra, spare, to spare, remaining, unused, left over; More

कामाचे तास कमी होतील.

केन्सने भाकित केलं होतं की या काळात माणसं आठवड्याला १५ तास काम करतील तसं झालं नाही कारण घरगुती कामाचा वाचलेला वेळ आपण मार्केटच्या कामात लावतो. मार्केटचा वेळ कमी होण्यासाठी मार्केट कामाचेही पुरेसे ऑटोमेशन होणे गरजेचे असेल म्हणजे अनेक मेनिअल जॉब्ज ऑटोमेट करावे लागतील म्हणजे ते करणारे लोक सुपरफ्लुअस होतील. त्यांना अर्थातच भारी स्किल्स मिळवण्याचा पर्याय असेलच पण त्यांनी असे केल्याने ज्यांच्याकडे ती स्किल्स आहेत त्या माणसांची किंमत कमी होईल. थोडक्यात इंडस्ट्रीयल उत्पादनांची साधने ज्यांच्या ताब्यात नाहीत किंवा दुर्मिळ अशी स्किल्स नाहीत त्यांचे हाल होतील. अर्थात अनेक जण म्हणतात तसे माणसं "हायर लेव्हलच्या" गोष्टींवर काम करु शकतील; पण हायर म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी ते मला कळत नाही. ऐसीवर चर्चा करत वेळ घालवणे ही हायर लेव्हलची गोष्ट आहे का?