Skip to main content

भारताची प्रगती ४: सहस्रेषु च पंडितः

भारताची प्रगती १: प्रास्ताविक
भारताची प्रगती २: घृतं पीबेत
भारताची प्रगती ३: जीवेत शरदः शतम्

संत ज्ञानेश्वर. खूप वर्षांपूर्वी बघितला होता, शेजाऱ्यांकडच्या टीव्हीवर. तरी त्यातलं गाणं आठवतं आहे.

एक दोन तीन चार
भैया बनो होशियार
सबका है कहना
अनपढ ना रहना
जाओ गुरुजी के द्वार

(संपूर्ण गाणं इथे बघायला मिळेल)
छोट्याशा निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपानांना छोटीशी मुक्ताबाई - मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून गोडपणाचा वर्षाव करणारी डेझी इरानी - उत्साहाने गाणं म्हणून सांगत असते. जा, पाठशाळेत जा. गुरुजींकडे जा. शिकणं महत्त्वाचं आहे. गाणं म्हणताना ती त्यांची तयारी करून देत असते. तिघे भाऊ आनंदाने शाळेत जातात. आणि अर्थातच शाळेत गेल्यावर त्या तिघांनाही 'सन्याशाची पोरं' म्हणून अपमान करून गुरुजी हाकलून देतात.

तत्वतः ब्राह्मण असूनही त्या गोंडस मुलांचा शिक्षणाचा अधिकार नाकारल्याबद्दल प्रेक्षकांना अर्थातच राग येतो. तो अन्याय अधोरेखित करण्यासाठीच खरं तर ते गोड गाणं आहे. आधी कोवळ्या मुलांची शिक्षणाची आतुरता दाखवली की मग त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे कठोर शब्द अधिक झोंबतात. पाठशाळेच्या वर्गात आपला वर्णसिद्ध अधिकार बजावत पाटीवर अक्षरं गिरवणाऱ्या इतर ब्राह्मण पोरांच्या चेहऱ्यावरही 'हे कोण उपरे आले इथे?' असा प्रश्न दिसतो.

बिचारे ज्ञानदेव. ब्राह्मण असूनही त्यांचा शिक्षणाचा जन्मजात हक्क नाकारला गेला म्हणून प्रेक्षकांचं हृदय हेलावतं. गरीब बिचाऱ्या ब्राह्मण मुलांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला. का? तर त्याच्या वडिलांनी आधीच सन्यासाश्रम स्वीकारला होता. नंतर विचार बदलून संसार पुन्हा सुरू केल्यावर मग ही मुलं झाली. किती क्रूर आणि कर्मठ ही वर्णव्यवस्था! आणि चित्रपट योग्य दिशेला पुढे सरकतो. जन्मजात हक्क डावलला जाणवण्याबाबतची आपल्याला दुसरी कथा माहीत असते ती कर्णाची. कर्णालाही त्याचं क्षात्रतेज जाहीर करण्याची मुभा नव्हती. त्याला कायमच सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं. महाभारताच्या वाचकाला कर्णाची जन्मकथा माहीत असल्याने तो अधिकार डावलला जाण्यातली शोकांतिका जाणवते. निवृत्ती-सोपान-ज्ञानदेव यांच्या शोकांतिकेची जातकुळीही तीच. प्रतिकूल परिस्थितीतूनही वर येण्याची - कर्णाने अंगदेशचा राजा बनून आणि ज्ञानदेवांनी ज्ञानियाचा राजा होऊन आपला अधिकार प्राप्त करण्याची - तेजस्वी कथाही तीच.

पण त्याच ब्राह्मण/सन्याशाच्या पोटी जन्म घेतलेल्या मुक्ताबाईचा मात्र कोणीच विचार करत नाही. तिने आपल्या भावांची तयारी करून देण्याचं काम करायचं हे गृहितच असतं. त्या पाठशाळेत न दाखवलेल्या ९५% ब्राह्मणेतरांविषयी तुलना करण्याची सोयही ठेवलेली नाही. ब्राह्मणाच्यांतही सन्यासी झालेल्याच्या मुलांनी शिकायचं नाही हे इतक्या ठामपणे बजावलं आहे, की ब्राह्मण नसलेल्यांबाबत बोलण्याची काय बिशाद! मुलींविषयी तर कोणीच बोलत नाही.

ही कथा आहे तेराव्या शतकातली. पाच टक्क्यांपेक्षा कमी ब्राह्मण, त्यांतल्या निम्म्यांना - स्त्रियांना - शिकण्याचा अधिकार नाही. तेव्हा हजार पोरांमधली पंचवीस शिकणार तेही प्रत्येक ब्राह्मण शिकला तर. घटकाभर मानू की सगळी पंचवीसच्या पंचवीस पोरं किमान पाठशाळेत तरी जायची. त्यातलं एखादं चमकणार. त्यालाच पंडित म्हणायचं. सहस्रेषु च पंडितः!

तेराव्या शतकापासून फास्ट फॉरवर्ड करून आपण विसाव्या शतकात येऊ. त्यादरम्यानच्या काळात इतिहासात बऱ्याच उलथापालथी झाल्या. अल्लाउद्दीन खिलजीपासून मुस्लीम राजवटीला सुरूवात झाली. त्यानंतर शिवाजीने स्वतंत्र राज्य स्थापन केलं. नंतर पेशव्यांनी विस्तार केला. एक काळ असा होता की दिल्लीच्या तख्ताच्या नाड्या पुण्याच्या हाती होत्या. ब्रिटिशांच्या काळात तेही लोप पावलं. पण एवढ्या उलाढालीत शिक्षणाची परिस्थिती ढिम्मही सुधारली नाही. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतातलं साक्षरतेचं प्रमाण होतं पाच टक्के. म्हणजे दहा टक्के पुरुष साक्षर होते. स्त्रियांच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास शून्य होतं. म्हणजे सात शतकांत प्रगती अडीच टक्क्यांची काही नाही. माझ्याकडे आकडेवारी नाही, पण अडीच टक्क्यावरून पाच टक्क्यांपर्यंतच्या प्रवासही एकोणिसाव्या शतकात घडला असावा. श्रेय - ब्रिटिशांची साम्राज्य सांभाळण्यासाठीची कारकुनांची गरज. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीपर्यंत हे प्रमाण सुमारे तिप्पट झालं. स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाणही सुमारे आठ टक्क्यांपर्यंत गेलं. स्वतंत्र भारताने शिक्षणावर भर दिला आणि पुढच्या दशकांमध्ये हे प्रमाण वाढत जात दर दशकाला टक्केवारीने सुमारे सहाने वाढलं. नव्वदच्या दशकात सुमारे बावीस टक्क्यांची प्रचंड झेप दिसते. त्यानंतर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ही वाढ मंदावून 'फक्त' नऊ टक्क्यांची वाढ दिसते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतीय प्रौढ (वय वर्षे १५ च्या वरचे) साक्षरतेचं प्रमाण ७४% आहे.

एकंदरीत जगात परिस्थिती काय आहे? साक्षरतेचं प्रमाण सर्वत्रच वाढलेलं आहे. त्यातही विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धात जन्मलेली, बहुतांशी अशिक्षित लोकसंख्या जसजशी काळाच्या पडद्याआड जाते, तसतसं हे प्रमाण सुधारत जात आहे. याचं कारण भारत व इतर विकसनशील देशांमध्ये शिक्षणाचं महत्त्व ओळखलं गेलेलं आहे. गेल्या वीस वर्षांत जन्मलेली पिढी ही बहुतांश शिक्षित आहे - किमान साक्षर तरी आहे. खालच्या तक्त्यातून हे चित्र स्पष्ट होतं. पहिला कॉलम प्रौढ साक्षरतेचं प्रमाण दाखवतो. तर दुसऱ्या कॉलममध्ये त्यातल्या १५ ते २४ वयोगटाचे आकडे दाखवले आहेत. सर्वत्रच युवा साक्षरता ही प्रौढ साक्षरतेपेक्षा जास्त दिसून येते.

Country ........Adult Literacy Rate . Youth Literacy Rate
चीन 95.9% (2009) [13] 99.4% (2009) [14]
श्रीलंका 90.8 (2007) 98.0
ब्रह्मदेश 89.9% (2007) [15] 94.4% (2004)[16]
इराण 82.4% (2007) [17] 95% (2002)[18]
जग सरासरी 84% (1998)[4] 88% (2001)[19]
भारत 74.04% (2011)[20] 82% (2001)[3]
नेपाळ 56.5 (2007) 62.7
पाकिस्तान 62.2 (2007)[21] 83.9(2010)
बांग्लादेश 53.5 (2007) 74

शतकानुशतकं दोन-अडीच टक्के असलेली साक्षरता आता ७५ टक्क्यांच्या घरात पोचली आहे. आणि हे घडलं आहे गेल्या शतकभरात.

कोणी म्हणेल की ठीक आहे, साक्षर लोक वाढले. पण नुसतं लिहा-वाचायला आलं म्हणजे विद्वत्ता नव्हे. मान्य. म्हणूनच आपण उच्चशिक्षितांच्या (बॅचलर्स, मास्टर्स, इंजिनियर, डॉक्टर, डिप्लोमा इ.) आकडेवारीकडे पाहू. (उच्चशिक्षणाचा विदा इथून घेतला आहे.) खाली एकच आलेख दोन वेगवेगळ्या पद्धतींनी मांडला आहे. दोन्हीमध्ये वर्षानुसार त्या त्या वेळी उच्चशिक्षणासाठी युनिव्हर्सिटी वा कॉलेजांमध्ये भरती केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मांडलेली आहे. पहिल्या आलेखात विदा लिनियर स्केलवर दाखवला आहे. १९८० ते २००४ मध्ये किती प्रचंड बदल झाला आहे हे दाखवण्यासाठी. दुसऱ्या आलेखात तोच विदा लॉगॅरिथमिक स्केलवर मांडला आहे. यातून सर्वच प्रकारचं उच्चशिक्षण साधारण समप्रमाणात वाढलं आहे हे दिसून येतं.

कशाही प्रकारे पाहिलं तरी हे आकडे दडपून टाकणारे आहेत. या चोवीस वर्षांच्या काळात एकंदरीत नोंदणीकृत विद्यार्थ्यांचं प्रमाण सुमारे चौपट झालेलं दिसून येतं. २००४ मध्ये १ कोटी १२ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते. प्रत्येक कोर्स सरासरी सव्वातीन वर्षांचा धरला तर याचा अर्थ २००४ च्या आसपासच्या काळात सुमारे ३५ लाख विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत होते. ८०-८२ साली जन्मलेल्यातल्या १५ ते २० टक्के मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं! २००४ नंतरही हाच वाढीचा क्रम राहिलेला असेल, तर २०१४ साली सुमारे २ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतील. याचा अर्थ ९०-९२ साली जन्मलेल्यांपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के मुलं उच्च शिक्षण पूर्ण करतील. सहस्रेषु च पंडितः या शैक्षणिक दारिद्र्याच्या परिस्थितीतून इतक्या ज्ञानप्रसाराच्या इतक्या श्रीमंतीपर्यंतची मजल .

ऐशीच्या आसपास 'मुलगी झाली हो' हे पथनाट्य आलं होतं. त्यात स्त्रीमुक्तीचा संदेश देताना स्त्रियांना शिक्षणापासून कसं वंचित ठेवलं गेलं याचं वर्णन होतं. 'शिक्षणाची गाडी धाड् धाड् पुढे गेली' (मुलींना न घेता) हे गाणं आठवतंय. त्यातला धाड् धाड् विशेष करून. त्या काळी शिक्षणाची महती हळूहळू पटत होती. त्यावेळच्या अनेक आया पहिल्या पिढीतल्या नवसुशिक्षित होत्या. त्यांनी तर आपल्या पोरींना शिकवलंच. पण त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून इतरांनीही शिकवलं. त्याची फळं आता दिसत आहेत.

उच्च शिक्षणात सध्या तरी पुरुष पुढे आहेत. सुमारे ६०% मुलं तर ४०% मुली आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्यापर्यंत उच्चशिक्षित स्त्रियांचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. त्यामानाने गेल्या साठ वर्षांतली प्रगती नेत्रदीपक आहे. न स्त्री स्वातंत्र्यमर्हति, हुंडा, मुलगी शिकली की जास्त महागाचा वर निवडावा लागतो, पायातली चप्पल पायातच... वगैरे उक्तींपासून जन्माला आलेल्या १०% मुलींना उच्चशिक्षण देण्यापर्यंत मजल जाणं, तेही काही मोजक्या दशकांत - ही क्रांतीच म्हणायला हवी.

गेल्या शंभर वर्षांत भारतीय समाज अधिक सुशिक्षित झाला आहे याबद्दल काहीच वाद नसावा. याला प्रगती म्हणावं का? अर्थात. शिक्षणाने ज्ञान वाढतं, पैसा वाढतो, आरोग्य चांगलं ठेवायला मदत होते. नव्या जगात रहाण्याची, तगून धरण्याची क्षमता येते. आपल्या अधिकारांची जाणीव होते. काही सामायिक संस्कारही होतात. पण त्याहीपलिकडे समाज एकसंध व्हायला आणि माणसांमध्ये समानता निर्माण व्हायला मदत होते. ज्ञानेश्वरांना एके काळी ब्राह्मणाचं मूल असूनही शिक्षण नाकारल्याचा आपल्याला राग येतो. तसाच राग आता कोणत्याही मुलाला शिक्षण नाकारल्याचा होईल. मुलींना नाकारल्याचाही होईल. कारण प्राथमिक शिक्षण हा सर्वच मुलामुलींचा जन्मजात हक्क मानला गेलेला आहे. ब्राह्मण असो वा नसो, मुलगा असो वा नसो. असा विचार करणारा व त्यानुसार शिक्षण पुरवणारा समाज शंभर वर्षांपूर्वीच्या किंवा नऊशे वर्षांपूर्वीच्या समाजापेक्षा प्रगतच म्हणावा लागेल.

Node read time
6 minutes
6 minutes

ऋषिकेश Tue, 29/05/2012 - 08:55

आपण साक्षरतेमधे उत्तम प्रगती केली आहे हे निर्विवाद असावे. साक्षरते कडून 'शिक्षित'होण्याकाच्या प्रवासात आपण नक्की कुठे आहोत हे मोजायला परिमाण नसले तरी पन्नास-साठ वर्षांपेक्षा नक्कीच प्रगती केली आहे.

अर्थात हे शिक्षण काही ठराविक क्षेत्रातच दिलं-घेतलं जातंय. शिक्षणातही जातीव्यवस्था आहे (इंजिनियर, डॉक्टर झाला म्हंजे ग्रेट, शेतकी, कुभारकला (किंवा कोणतीही कला), सुवेज कंट्रोल (म्हंजे भंगीच* की व्हो! असं प्रत्यक्षात ऐकलेलं आहे) शिकला म्हणजे कमी ग्रेट असं काहिसं). तेव्हा शिक्षण घेऊनही वर्ण्यव्यवस्था नाहिशी झाली आहे असे म्हणायला धजावत नाही. फारतर स्वरूप बदललंय आणि काहिसं सौम्य झालंय असं वाटतं

* अर्थ जातीवाचक न घेता व्यवसायदर्शक घ्यावा.

विसुनाना Tue, 29/05/2012 - 11:46

शिक्षणाने ज्ञान वाढतं, पैसा वाढतो, आरोग्य चांगलं ठेवायला मदत होते. नव्या जगात रहाण्याची, तगून धरण्याची क्षमता येते. आपल्या अधिकारांची जाणीव होते. काही सामायिक संस्कारही होतात. पण त्याहीपलिकडे समाज एकसंध व्हायला आणि माणसांमध्ये समानता निर्माण व्हायला मदत होते.

हे आदर्श शिक्षणाबाबत म्हणता येईल. पण सध्या जे शिक्षण(?) शाळांमधून मिळत आहे ते कितपत आदर्श आहे? हा प्रश्न उभा राहतो.
उदा.
१. आठवीपर्यंत परीक्षा नाही. दहावीला गुण नाहीत.(अनेक राज्यात!) - गुणवत्ता कशी ठरवणार?
२. हजेरीपटावरचे विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात नसतात.
३. राज्यात ७५००० रँक मिळालेला विद्यार्थीही बी.ई. होतो. (पर्यायाने आता डिप्लोमा/ आयटीआय करणार्‍यांची संख्या कमी होत आहे.)
४. आय आय टी च्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याची तक्रार (ओरड?) मोठ्या उद्योगपतींनी (नारायण मूर्ती इ. ) केलेली आहे.
५. भारतातल्या काही नामवंत संस्था सोडल्या तर येथे दिल्या जाणार्‍या पी. एचडी शोधनिबंधांच्या गुणवत्तेबद्दल शंका घेतली जाते.
वगैरे...

बाकी साक्षरता म्हणाल तर लोक साक्षर झाले आणि आंगठ्याऐवजी सही करू लागले हे खरे आहे. तीही एका दृष्टीने प्रगतीच आहे. (तो ग्लासचा भरलेला भाग आहे.)
पण शिक्षणाने लोक सुसंस्कृत झाले का ? या प्रश्नाचे उत्तर संदिग्ध आहे.

अर्थात, एकदा परदेशातील अनेक नामवंत शिक्षण संस्थांनी भारतात शाखा उघडल्या की मग भारतातील शिक्षणाची गुणवत्ता खर्‍या अर्थाने वाढीला लागेल आणि भारताचे नागरीक सुसंस्कृत होतील असे वाटते.

राजेश घासकडवी Tue, 29/05/2012 - 23:06

In reply to by विसुनाना

पण शिक्षणाने लोक सुसंस्कृत झाले का ? या प्रश्नाचे उत्तर संदिग्ध आहे.

हे तितकंसं बरोबर नाही. प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती ही सुसंस्कृत असतेच असं नाही हे मान्य. मात्र समाजाचा विचार केला तर एका विशिष्ट समाजातले अधिक शिक्षित लोक सरासरी अधिक सुसंस्कृत आहेत हे सिद्ध करता यावं. उदाहरणार्थ खालील लिंक पहा.

http://apps.unitedway.org/forecaster/

इथे अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यातली शिक्षणाची पातळी व तिच्याशी संलग्न असलेला खुनांचा दर वापरून एक मॉडेल तयार केलेलं आहे. कुठलंही राज्य निवडलं तरी सगळी लोकसंख्या अधिक शिक्षित झाली की खुनांचा दर कमी झालेला दिसतो. मला खात्री आहे की भारतातही सर्वसाधारण गुन्हेगारीचं प्रमाण शिक्षणाच्या पातळीबरोबर कमी होताना दिसेल. भारतात शिक्षणाचं प्रमाण व गुन्हेगारीचं प्रमाण याचा कोणी अभ्यास केला आहे की नाही कल्पना नाही.

सामाजिक सुसंस्कृतपणाचा मी एक मोजमाप करून तपासून बघण्याजोगा निकष सांगितला. तुम्हाला इतर काही सुचले तर सांगा.

अर्थात, एकदा परदेशातील अनेक नामवंत शिक्षण संस्थांनी भारतात शाखा उघडल्या की मग भारतातील शिक्षणाची गुणवत्ता खर्‍या अर्थाने वाढीला लागेल आणि भारताचे नागरीक सुसंस्कृत होतील असे वाटते.

यातल्या तिरकसपणाचा रोख कळला नाही. वरील लेखात तरी भारताने कशी प्रगती केली आहे हे सांगण्यावर भर आहे. तुम्हाला प्रगती झालीच नाही असं वाटत असेल तर त्यावर वाद घालता येईल, पण अशा विधानांचं काय करावं कळत नाही.

विसुनाना Wed, 30/05/2012 - 17:02

In reply to by राजेश घासकडवी

शिक्षणाची पातळी व तिच्याशी संलग्न असलेला खुनांचा दर

- हे कदाचित बरोबर आहे. पण खून, दरोडे, मारामार्‍या, बलात्कार यांसारखे प्रत्यक्ष शारिरीक गुन्हे जरी कमी झाले तरी अप्रत्यक्ष गुन्हेगारी प्रवृत्ती (लाचलुचपत, भ्रष्टाचार, पिळवणूक, खोटी प्रमाणपत्रे बनवणे, परीक्षेत कॉपी करणे, फसवणूक इ.इ. 'व्हाईट कॉलर्ड क्राईम्स') वाढत्या शिक्षणामुळे कमी होते आहे का? याबद्दल बर्‍याच वेळेला प्रत्यक्ष पुरावा नसल्याने गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे त्यांची खरी आकडेवारी मिळणे अवघड आहे.

यातल्या तिरकसपणाचा रोख कळला नाही.

- सध्या प्राथमिक आणि माध्यमिक 'सरकारी शिक्षण' हे रसातळाला गेले आहे. खासगी, विना-अनुदानित शिक्षण संस्थांचे पेव फुटलेले आहे. कधी नाईलाजाने तर कधी स्वेच्छेने या खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे भाग पडते. आता उच्च शिक्षणाबाबतीतही (प्रवेश प्रक्रियेत) धोरणात्मक बदल केला जात आहे. त्यामागचे उद्देश चांगले आहेत असे सरकारचे म्हणणे असले तरी सरकार-अनुदानित उच्च शिक्षण संस्था (आय आय टी) त्याला विरोध करत आहेत. या बदलांमुळे सरकारी उच्चशिक्षण संस्थांचा दर्जा खालावेल असे या संस्थेतील अनुभवी शिक्षक समित्या (सिनेट्स) म्हणतात. या प्रतिष्ठीत संस्थांचा दर्जा खालावला तर परदेशी संस्थांना भारतात शाखा उघडायला सोपे जाईल. या आरोपात तथ्य वाटावे अशी परिस्थिती आहे. भारतातील शिक्षणाची बाजारपेठ खूप मोठी आहे , इतकाच या तिरकसपणाचा रोख आहे.

राजेश घासकडवी Wed, 30/05/2012 - 22:04

In reply to by विसुनाना

(लाचलुचपत, भ्रष्टाचार, पिळवणूक, खोटी प्रमाणपत्रे बनवणे, परीक्षेत कॉपी करणे, फसवणूक इ.इ. 'व्हाईट कॉलर्ड क्राईम्स') वाढत्या शिक्षणामुळे कमी होते आहे का? याबद्दल बर्‍याच वेळेला प्रत्यक्ष पुरावा नसल्याने गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे त्यांची खरी आकडेवारी मिळणे अवघड आहे.

अप्रत्यक्ष आकडेवारी मिळवता येते. http://en.wikipedia.org/wiki/Index_of_perception_of_corruption इथे ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने गोळा केलेला प्रत्येक देशाचा परसिव्ह्ड करप्शन इंडेक्स पहाता येईल. त्यातल्या १,११, २१... अशा रॅंकच्या १५ देशांसाठी मी २०११ चे आकडे घेतले. तसंच त्याच देशांसाठी युएनडिपी ने प्रसिद्ध केलेले शैक्षणिक प्रगतीचे निर्देशांक घेतले. खालच्या आलेखात त्यांची तुलना दाखवलेली आहे. प्रत्येक बिंदू म्हणजे एक देश आहे.

या आलेखात मी १५ च देश घेतले असले तरी इतरही देश याच परिसरात कुठेतरी पडतील हे तुम्हाला पडताळून पहाता येईल. आलेखावरून स्पष्ट दिसून येतं की समाजाची एकंदरीत सरासरी शैक्षणिक पातळी व त्या समाजातला भ्रष्टाचार यांच्यात निश्चित नातं आहे. अर्थातच या विद्यावरून शिक्षणामुळे भ्रष्टाचार कमी होतो की भ्रष्टाचार कमी असल्यामुळे शिक्षणाची परिस्थिती सुधारते हे सांगता येत नाही. पण माझा अंदाज असा आहे की या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. तेव्हा शिक्षण, सुबत्ता, आरोग्य यांबाबतीत जसजशी प्रगती होईल तसतसा भ्रष्टाचार कमी होईल अशी मला आशा आहे.

विसुनाना Thu, 31/05/2012 - 11:24

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या दुर्दम्य आशावादाला सलाम.

वरच्या आलेखासाठी घेतलेल्या विद्यात कदाचित ज्याला नैतिक दृष्टीने भ्रष्टाचार म्हणतात त्याची संकल्पनाच वेगळी असेल. उदा. अमेरिकेत व अन्य 'पुढारलेल्या' देशांमध्ये लॉबियींगला कायदेशीर मान्यता आहे.

असो. तसे नाही असे मानून चालू.

भारतीय जमिनीवर मात्र वरील आलेखाला पुष्टी देणारे वर्तन बहुसंख्य शिक्षित नागरिकांकडून घडत नसल्याचे दिसते. नागरिकांच्या नैतिक वर्तनाची ती वरची पातळी भारताला तरी सध्या लागू होत नाही. प्रस्तुत संक्रमण कालात जागल्यांनी 'प्रतिकूल तेच घडेल' अशी निराशावादी भूमिका घेऊनच पावले टाकायला हवीत. अन्यथा सध्या सुबत्तेबरोबर येणारी जी पैशाची मस्ती (पैसा है तो सब चलता है) पदोपदी जाणवते आहे तिचा परिपाक भ्रष्टाचाराचा कडेलोट होण्याकडे होईल. हा निराशावाद केवळ आकड्यांवर अथवा ढोबळ (माध्यमछाप) बातम्यांवर आधारलेला नसून प्रत्यक्ष जीवनात येणार्‍या अनुभवावर आधारित आहे. या उलट चित्र प्रत्यक्षात दिसत असते तर असे लिहीण्याची गरजच पडली नसती. (यात तिरकसपणा नाही.)

नितिन थत्ते Thu, 31/05/2012 - 12:29

In reply to by विसुनाना

>>वरच्या आलेखासाठी घेतलेल्या विद्यात कदाचित ज्याला नैतिक दृष्टीने भ्रष्टाचार म्हणतात त्याची संकल्पनाच वेगळी असेल.

सहमत आहे. म्हणजे अमेरिकेत "तुम्हाला भ्रष्टाचार आहे असे वाटते का?" याचे उत्तर "नाही" असे येत असावे कारण लॉबिंग म्हणजे भ्रष्टाचार नाही अशी तिथली संकल्पना आहे. उलट पौर्वात्य देशांत त्याच गोष्टीला भ्रष्टाचार म्हटले जाते*.

मला नेहमी पडणारा हा प्रश्न आहे. देशोदेशीचे काळेधन साठवण्याची सोय करून देणारा स्विट्झर्लंड भ्रष्टाचाराच्या परसेप्शन मध्ये उच्च स्थानी कसा दिसतो.

*भारतात अलिकडे पॉलिसी मॅटर सुद्धा भ्रष्टाचार समजण्याची फ्याशन आली आहे.

विसुनाना Thu, 31/05/2012 - 14:06

In reply to by नितिन थत्ते

भारतात अलिकडे पॉलिसी मॅटर सुद्धा भ्रष्टाचार समजण्याची फ्याशन आली आहे.

खरे आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे खिरापती वाटप होऊ नये म्हणून काही पॉलिसी डिसिजन्स घ्यायला अनेक कारणांनी (उदा. मित्रपक्षांना विश्वासात घेणे इ.) सरकारला वेळ लागतो. त्या वेळात जर काही निर्णय सरकारला घेणे भाग पडले तर ते 'भ्रष्टाचार' म्हणून गणणे चुकीचे आहे. पण कॅगसारख्या संस्था अशा योग्य पॉलिसी न ठरवता घेतलेल्या निर्णयांवर टिप्पणी करतात, काही चुकीचे निष्कर्ष काढतात. अवाढव्य आकडे मांडतात आणि विरोधी पक्षांच्या हातात आयतेच कोलित मिळते. तसेच प्रसिद्धी माध्यमांनाही 'सरकार लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करते' असे ढोल बडवण्याची संधी मिळते. अर्थात जर न्यायालयांनी न्याय्य प्रक्रियेने असे हे मध्यंतरातले निर्णय रद्दबातल ठरवले तर मात्र बर्‍याच वेळा सरकारची पंचाईत झालेली दिसते. असे निर्णय कायद्याच्या कचाट्यातून सुटावे म्हणून मग सरकारला काही मूळ कायद्यांतच (पूर्वलक्षी : रेट्रोस्पेक्टीव्ह) बदल करावा लागतो. पण म्हणून असे निर्णय घेताना काही भ्रष्टाचार झालाच असेल असे म्हणणे सरकारवर अन्याय करणारे आहे.

नगरीनिरंजन Fri, 01/06/2012 - 13:18

In reply to by विसुनाना

क्षमस्व, पण परकीय शिक्षणसंस्था भारतात आल्या तर काय धोका आहे हे जरा समजावून सांगता आले तर माहितीत भर पडेल.

पॉलिसी मॅटरला भ्रष्टाचार समजण्याबद्दल थोडेसे:
पॉलिसी बदलणे आणि पूर्वलक्ष्यी प्रभावाचे कायदे करणे यावरून नुकतीच दोन प्रकरणे वाचनात आली आहेत. एक म्हणजे व्होडाफोन कंपनीचे. सरकारने केलेल्या कराच्या मागणीविरुद्ध या कंपनीने भारतीय न्यायालयात दावा जिंकूनही सरकारने नवीन नियम आणून या कंपनीला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नाही असे माहित असल्याने त्यांना हा कर भरावाच लागेल असा समज त्यामागे असावा. आता हा भ्रष्टाचाराच्या सर्वमान्य व्याख्येनुसार भ्रष्टाचार नसला तरी खुद्द सरकारने आपली आधीची पॉलिसी चुकीची होती किंवा पूर्णविचाराअंती बनवलेली नव्हती असे मान्य करणे आणि त्याप्रमाणे कृती करणे यातून दिल्या जाणार्‍या संदेशातून पुढे होणार्‍या गुंतवणुकीवर परिणाम होतो आणि जे नुकसान होते त्याला जबाबदार सरकारला नाही धरायचे तर कोणाला? 2G मध्ये झालेल्या धरसोडीमुळे 3G च्या लिलावात २० हजार कोटींचे प्रस्ताव काढून घेतले गेले, याला भ्रष्टाचार म्हणता आले नाही तरी त्याची जबाबदारी सरकारचीच आहे आणि सरकारच्या मूल्यमापनात ती एक नकारात्मक बाब म्हणूनच येणार.
महाराष्ट्र सरकारनेही असेच उद्योगांना सवलत देण्याचे धोरण जाहीर केले आणि त्याप्रमाणे उद्योग महाराष्ट्रात आलेही. परंतु नंतर महसूल बुडतोय आणि ताळेबंद जमवण्यात अडचण येतेय असे दिसताच सरकारने या सवलती देण्याचे नाकारले. त्यातून असलेले उद्योग बाहेर जाणे आणि नवे उद्योग न येणे अशा प्रकारांनी झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण?
म्हणजे सरकार जनतेच्या हितसंबंधांची योग्यती काळजी घेण्यास असमर्थ आहे हे दिसत असूनही त्याला तो भ्रष्टाचार नाही असे म्हणून सोडून द्यायचे का?
आता यावर कोणी म्हणेल की अशा सरकारला अशा कामगिरीची भरपाई म्हणून निवडणुकीत पराभव स्विकारायला लागेल वगैरे पण निवडणुका कशा लढवल्या जातात हे सगळ्यांनाच माहित आहे. किंबहुना म्हणूनच काहीही उत्तरदायित्व नसल्यासारखे निर्णय घेतले जातात.

विसुनाना Fri, 01/06/2012 - 13:46

In reply to by नगरीनिरंजन

परकीय शिक्षणसंस्था भारतात आल्या तर काय धोका आहे ...

-योग्य पद्धतीने येऊ देत, योग्य कायदा बनवल्यानंतर येऊ देत. काही काळाने येऊ देत.
सामान्य माणसाला न परवडेल आणि काही उच्चवर्गीयांचीच (आर्थिक आणि सामाजिक दोन्ही) मक्तेदारी बनेल असे उच्च शिक्षण येथे येऊ नये.
त्या अगोदर इथल्या सध्याच्या शिक्षणाचा दर्जा/पातळी आणखी सुधारली पाहिजे. अन्यथा धोका हा आहे की एतद्देशीय संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा कमीच राहील आणि त्यातून बाहेर पडणार्‍या सर्वसामान्य पदवीधारकांवर बेकार राहण्याची वेळ येईल. या परकीय संस्थांमधून नर्सरी ते डिग्री शिकलेल्या विशेष सामान्यांनाच जिकडेतिकडे महत्त्व येईल आणि सामाजिक वर्गभेदाची दरी वाढत जाईल.

राजेश घासकडवी Thu, 31/05/2012 - 17:31

In reply to by विसुनाना

थत्त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा निर्देशांक 'या देशात भ्रष्टाचार आहे का? तुम्हाला जाणवतो का?' असा प्रश्न विचारूनच काढला जातो. त्यासाठी त्या देशातले व त्या देशाबाहेरचे ऍनालिस्ट, व्यावसायिक, तज्ञ यांना विचारलं जातं. या निर्देशांकात अर्थातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऍब्सोल्यूट भ्रष्टाचारापेक्षा रोजच्या व्यवहारात कितपत भ्रष्टाचार करावा लागतो याचं मोजमाप होतं. ही निश्चितच त्रुटी आहे. मात्र एका विशिष्ट प्रमाणात या निर्देशांकात तथ्य असावं असा माझा विश्वास आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत प्रत्यक्षापेक्षा परसेप्शन महत्त्वाची ठरते. गाडी चालवताना पोलिसाने थांबवलं की मुकाट्याने तिकीट फाडून घेऊन तो दंड भरायचा की पोलिसाला 'मिटवून घ्या ना राव' म्हणायचं हा परसेप्शनचाही भाग असतो.

उदाहरण घ्यायचं तर देशात झाडं किती आहेत याचं उत्तर काढायचं असेल तर काही सामान्य लोक, काही गिर्यारोहक, काही नकाशे बनवणारे यांना विचारायचं, की काय हो तुम्हाला या देशात झाडं दिसली आहेत का? मोठ्या प्रमाणावर आहेत का? त्याचं उत्तर अर्थातच अचूक येणार नाही. शहरात, बहुतेक लोकांच्या राहाण्याच्या आसपास कितपत झाडी आहे याचं चांगलं मोजमाप होईल. तर दूर कुठच्यातरी जंगलात असलेल्या झाडांबाबत उत्तर कमी अचूक येईल. पण जर लोकांना झाडांच्या पर्यावरणावरच्या परिणामाइतकाच नजरेसमोर हिरवळ असणं महत्त्वाचं असेल तर अशा प्रकारे गोळा केलेली माहिती वापरणं योग्य ठरेल.

प्रस्तुत संक्रमण कालात जागल्यांनी 'प्रतिकूल तेच घडेल' अशी निराशावादी भूमिका घेऊनच पावले टाकायला हवीत.

या बाबतीत बराचसा असहमत. होप फॉर द बेस्ट ऍंड प्रिपेअर फॉर द वर्स्ट यात उक्तीतून जितपत सावधता बाळगावी तितपत अर्थातच कुठेही योग्य आहेच. मात्र दुर्दम्य निराशावाद हा हानिकारकच ठरतो. हा सामाजिक आत्मप्रतिमेचा प्रश्न आहे - म्हणजे परसेप्शनचाच प्रश्न आहे. ती जितकी अचूक असेल तितकी चांगली.

आपल्या डोळ्यासमोरच गेल्या काही दशकांत प्रच्छन्न भ्रष्टाचार कमी झालेला आहे. सत्तर व ऐशीच्याही दशकात निवडणुकांत बूथ कॅप्चर करणं सर्रास ऐकू यायचं. आता येत नाही. म्हणजे आता सगळं काही सुरळित आहे असं म्हणायचं नाही, पण सुधारणा आहे यात वाद नसावा.

माझा आशावाद आहे तो म्हणजे आत्ता जरी परिस्थिती वाईट असली तरी आत्तापर्यंत अशाच वाईट परिस्थितीतल्या देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, स्थैर्य, माध्यमांची वाढ, या व अशा अनेक परस्परावलंबी कारणांनी परिस्थिती सुधारली आहे. ती प्रक्रिया भारतात वेगाने चालू आहे. आपण आदर्शाच्या खूप जवळ नसलो तरी गेल्या दशकांत बरीच मजल मारलेली आहे. आणि म्हणून आपण पुढे जाऊ असा डोळस आत्मविश्वास ठेवायला हवा.

विसुनाना Fri, 01/06/2012 - 11:36

In reply to by राजेश घासकडवी

'प्रिपेअर फॉर द वर्स्ट' हेच भारताच्या बाबतीत खरे आहे असे दिसते :
१.http://www.thehindu.com/news/national/article3477233.ece - सो प्रेडिक्टेबल. माझा 'तिरकस' बाण इतका लगेच बैलाच्या डोळ्यावर लागेल असे वाटले नव्हते. ;)
२.http://www.thehindu.com/business/Economy/article3476035.ece

तिरशिंगराव Fri, 01/06/2012 - 21:02

In reply to by विसुनाना

विसुनानांशी सहमत. संख्येकडे जास्त लक्ष दिले की गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते.
उदा.- एखाद्या थोर गायकाने गुणवत्ता हेरुन फक्त अशाच शिष्यांना गाणे शिकवले तर त्याची कला पुढे जाईल. पण केवळ पैसे मिळत आहेत म्हणून सूरज्ञान उपजत नसलेले शिष्य स्वीकारले तर त्याची कला त्याच्याबरोबरच संपेल आणि त्याच्या पश्चात उरेल ती केवळ त्याची भ्रष्ट नक्कल.

चिंतातुर जंतू Tue, 29/05/2012 - 18:25

शिक्षितांचं प्रमाण वाढतंय ही गोष्ट चांगलीच आहे, पण दर्जात मात्र फार तफावत आढळते. प्रगत युरोपियन देशांतला साधारण पदवीधर आणि आपल्याकडचा साधारण पदवीधर यांची तुलना होऊ शकते असं वाटत नाही. प्राध्यापक होण्यासाठी पीएचडी आवश्यक वगैरे नियम केल्यापासून तर पीएचडीधारकांची संख्याही वाढते आहे. पुणे विद्यापीठातल्या पीएचडी मानकर्‍यांचे फोटो 'सकाळ'मध्ये अनेकदा झळकतात. त्यासोबत प्रबंधाचा विषय दिलेला असतो. तो पाहताच कळतं की एखादा स्थानिक पातळीवरचा सर्व्हे घेऊन तो प्रबंध म्हणून सादर केलेला आहे. जर पुण्यात ही परिस्थिती असेल तर इतरत्र काय असेल याची कल्पनादेखील करवत नाही.

राजेश घासकडवी Tue, 29/05/2012 - 20:02

In reply to by चिंतातुर जंतू

प्रगत युरोपियन देशांतला साधारण पदवीधर आणि आपल्याकडचा साधारण पदवीधर यांची तुलना होऊ शकते असं वाटत नाही.

हे मान्यच आहे. किंबहुना खालील दुव्यावरची माहिती डोळे उघडणारी आहे.
http://prayatna.typepad.com/education/

पण म्हणूनच लेखात आजच्या भारतीय समाजाच्या शैक्षणिक पातळीची तुलना पन्नास, शंभर, नउशे वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजाशी केलेली आहे. प्रगत देशांशी तुलना करणं हे थोडं जिकीरीचं काम आहे. कारण यात सापेक्ष प्रगती कालानुरुप बघावी लागते. त्या अर्थाने आपण 'मागे' आहोत. या लेखमालेचा मुख्य उद्देश हा सापेक्ष मागेपुढेपणा बाजूला ठेवून भारतीय समाजाचा एकंदरीत प्रवास प्रगतीच्या दिशेने आहे की नाही हे तपासून बघण्याचा आहे. पुढे काही लेखांत या 'आहेरे व नाहीरे' मधील दरीकडेही लक्ष देण्याचा विचार आहे.

आतिवास Tue, 29/05/2012 - 20:23

माहितीपूर्ण लेख आहे. अन्नाच्या बाबतीत जसं आधी दोन वेळा खायला मिळणं महत्त्वाचं - त्याचं पोषणमूल्य किंवा त्याची चव हा मुद्दा पुढे येतो; तसंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत आहे. आधी शिकायची संधी मिळणं महत्त्वाचं. ज्या घरात/समाजात पहिली-दुसरी पिढी शाळेत जाऊ शकलेली आहे, त्यांच्यावर शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्याचा आणि वाढवण्याचा भार लगेच टाकू नये - ती जबाबदारी अधिक पिढया शिकायची संधी मिळालेल्या समाजाने, त्यातील गटांनी घ्यावी असं मला वाटत.

मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून विविध व्यक्ती, संस्था आणि काही अंशी राज्य आणि केंद्र शासनाने जे प्रयत्न केले आहेत (त्या सर्वांना मर्यादा आहे हे मान्य करुनही) त्याची फळं काही प्रमाणात दिसत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणाच्या खाजगीकरणाने गरीब (आणि त्यातही मुली) पुन्हा एकदा शिक्षणापासून वंचित राहणार का भविष्यकाळात अशी चिंताही आहे.

जयदीप चिपलकट्टी Wed, 30/05/2012 - 09:01

In reply to by आतिवास

ज्या घरात/समाजात पहिली-दुसरी पिढी शाळेत जाऊ शकलेली आहे, त्यांच्यावर शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्याचा आणि वाढवण्याचा भार लगेच टाकू नये - ती जबाबदारी अधिक पिढया शिकायची संधी मिळालेल्या समाजाने, त्यातील गटांनी घ्यावी असं मला वाटत.

हा विचार तितकासा पटला नाही. समजा मी चांभाराच्या घरात जन्मलेलो अाहे. माझे बापजादे शाळेत कधी गेले नाहीत, अाणि परिणामी लहानपणापासून माझ्या अाजूबाजूला शिक्षणाचं वातावरण नव्हतं. असं असताना समजा मी दहावीनंतर शाळा सोडली तर ते समजण्यासारखं अाहे. पण मला पीएच. डी. करायचीच असेल तर ती चांगलीच करायला हवी, कारण त्यात माझाच फायदा अाहे. तिथे 'मी काहीतरी खरडून देतो तरी मला पास करा' असं म्हणून चालणार नाही. गुणवत्ता टिकवणं किंवा वाढवणं ह्याला 'भार' समजणं योग्य नव्हे. चांभाराच्या पोरानं पीएच. डी. केली तर त्याचं प्राध्यापकाच्या पोरापेक्षा जास्त कौतुक करायला माझा पाठिंबा अाहे. पण जोपर्यंत पदवी अजून मिळालेली नाही, तोपर्यंत त्या दोघांना सारखेच निकष लावायला हवेत.

गुणवत्ता घसरण्याचे परिणाम हे systemic असतात. बेतासबात प्रबंध लिहिणारा माणूस पुढे इतरांचा गाईड झाला की अापल्या विद्यार्थ्यांकडून कमीच अपेक्षा ठेवतो. असं अनेकांनी करत गेलं की हळूहळू कमी गुणवत्ता चालवून घेणं ही गोष्ट त्या यंत्रणेत मुरते, अाणि मग नंतर दर्जा वाढवणं अवघड होत जातं.

अशोक पाटील Tue, 29/05/2012 - 22:40

सर्वार्थाने अभ्यासपूर्ण आणि तितकाच सकारात्मक दृष्टिकोण ठेवून मांडणी केलेला हा लेख, त्याबद्दल श्री.राजेश घासकडवी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. "शासन आणि शिक्षण" संदर्भातील आकडेवारीशी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नित्यदिनी संपर्कात असतात. सर्वसामान्यांमध्ये या विषयाच्या व्याप्तीबाबत मिडिया आणि विरोधी पक्षातून होणारी बेताल वक्तव्ये विचारात घेतली तरीही कोणत्याही दशकातील, कोणत्याही पक्षाचे, आघाडीचे सरकार, एकूणच शिक्षण या घटकाशी अत्यंत प्रामाणिक आणि गंभीरतेने पाहते. त्यातही गेल्या काही दशकापासून "स्त्री-शिक्षण" हाही हळवा विषय बनल्यामुळे त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केन्द्र आणि राज्य शासन अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करीत असून [हे मी त्या खात्याशीच संबंधित असल्याने अधिकृतरित्या विधान करीत आहे] त्याच्या "आऊटपुट" विषयी कितीही टोकाची विरूद्ध मते समोर येत असली तरी अर्थखातेही शिक्षणखात्याला त्याबाबत दोष देत नाही, देवूही शकत नाही.

साक्षरता ही प्राथमिक शिक्षणाची सुरुवात आहे. १९५१ मध्ये या देशात साक्षरतेचे प्रमाण १८.३ टक्के होते तर २००१ मध्ये ते ६४ टक्के झाले. ५० वर्षात ४६.५ टक्के वाढ. म्हणजेच दरवर्षी फक्त ०.९३ टक्के वाढ झाली. तसे पाहिले तर ही कूर्मगती मानली पाहिजे. कारण या वेगाने सारा भारत साक्षर व्हायचा झाल्यास आपल्याला सन २०४५ ची वाट पाहावी लागेल. (चीनमध्ये २००१ मध्येच संपूर्ण साक्षरता आली हे इथे या निमित्ताने नमूद करणे गरजेचे आहे.)

'स्त्री शिक्षणा'ची परिस्थिती तर भारतात अधिकच वाईट आहे. सरकारी माहितीप्रमाणे २००१ मध्ये स्त्री-साक्षरता ५४ टक्के होती.... म्हणजेच वेगाचा दर ०.९३. गळतीचा विषय बाजूला ठेऊनही विचार केल्यास स्त्रीसाक्षरतेची शंभरी गाठण्यास आपल्याला अजून २०५३ पर्यंत थांबावे लागेल. सरकार जरूर या उद्दिष्टासाठी प्रयत्नशील आहे, आर्थिक तरतूद आहे, पण म्हणावे ते यश प्राप्त होत नाही, त्याला कारणीभूत आहे ते इथली सामाजिक विषमता.

मुलींच्या शिक्षणातील सर्वात मोठा अडचणीचा धोंडा असेल तर तो आहे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील 'गळतीचे प्रमाण'. किमान दहावी होण्याआधीच मुलामुलींनी शाळा सोडून शिक्षण बंद करणे हा आपल्या शिक्षण व्यवस्थेला असणारा गंभीर रोग होय. भारत सरकारच्या 'मानव संसाधन मंत्रालया'ने (याच खात्यात 'शिक्षण खाते' अंतर्भूत असते) जुलै २००५ मध्ये एक अखिल भारतीय सर्व्हेक्षण केले होते. त्यातून अतिशय उद्बोधक आणि तितकीच गळतीविषयीची खेदजनक माहिती समोर आली. या सर्व्हेनुसार २००५ मध्ये भारतात ६ ते १३ वर्षे या वयोगटातील मुलांची एकूण संख्या १९ कोटी ४० लाख एवढी होती. या संख्येपैकी साधारण ७ टक्के मुले ( = १ कोटी ३६ लाख) अशी होती की ती कधीही शाळेला गेली नाहेत किंवा त्यानी कमीत कमी चौथीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच शाळा सोडली. यातही मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे ८ टक्के होते. गळतीचे प्रमाण इयत्तेप्रमाणे बदलत गेलेले दिसते. उदा. गळालेल्या प्रत्येक १०० मुलांपैकी ३८ टक्के इ.पाचवीपूर्वी, ५० टक्के आठवीपूर्वी तर ६८ टक्के इ.नववीपूर्वीच शाळा सोडल्याचे आढळले. मुलींमध्ये हे प्रमाण (अर्थातच) जास्त आहे. गळालेल्या प्रत्येक १०० मुलींपैकी ४१ टक्के पाचवीपूर्वी, ५१ टक्के आठवीपूर्वी तर ७३ टक्के मुलींनी नववीपूर्वीच शाळा सोडून कायमचे शिक्षण बंद केल्याचे आढळले. ही आकडेवारी सरकार आणि शिक्षणतज्ज्ञ या दोन्ही घटकांसाठी धक्कादायकच होती.

"सर्व शिक्षा अभियान" ह्या २००१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाला मधुर फळे आल्याचे दिसले नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट अजून तरी दृष्टिपथात आल्याचे दिसत नाही. तसेच 'मध्यान्ह भोजन' सारखी खर्‍या अर्थाने उपयुक्त योजना राबवूनही पालक मुलींना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत ही बाब खिन्न करणारी आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेतून झालेल्या अभ्यासात एक बाब प्रकर्षाने समोर आली आहे ती म्हणजे कुटुंबातील दारिद्र्य हे शैक्षणिक गळतीचे (किमान मुलींच्या दृष्टीने) सर्वात महत्वाचे कारण आहे. एकूण गळतीपैकी ६५% गळती केवळ याच कारणामुळे झाल्याचे आढळले आहे. अन्य कारणात घरगुती कामे, भावंडांना सांभाळणे, (योग्य तो कपडालत्ता नाही असे कारण सांगणार्‍यांची संख्याही ३% होती) शिवाय मुलीने पाचवीत असतानाच 'वयात' येणे म्हणून शाळा सोडायला सांगितले असेही एक कारण पुढे आले.

झोपडपट्टी आणि कामगार चाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य करणारे काही तडफदार युवा नेते मला माहीत आहेत. जिल्हाधिकारी कचेरीत अशाच एका शिबिराप्रसंगी त्याना या गळतीबद्दल छेडले असता त्यानीही याबाबत आपली हतबलता प्रकटली, कारण त्या संदर्भात केलेल्या कार्याच्यावेळी त्या भागातील कुटुंबप्रमुकांकडून तो नित्याचा सामाजिक बागुलबोवा पुढे आल्याचे त्याने सांगितले - "मुलींनी कशाला शिकायचे ? शेवटी भाकरीच भाजायच्या आहेत ना?" हा आजच्या गतीमान युगात अत्यंत प्रतिगामी ठरू शकणारा विचारसुद्धा मुलींच्या गळतीस जबाबदार आहे.

श्री.घासकडवी यानी लेखात जो आशावाद प्रगटला आहे ("त्याहीपलिकडे समाज एकसंध व्हायला आणि माणसांमध्ये समानता निर्माण व्हायला मदत होते.") त्याच्याशी इथले सारेच सदस्य सहमत होतील. फक्त ते होईल त्यावेळी ज्यावेळी 'स्त्री' ही उच्च-शिक्षणाने संपन्न होईल....ही आशा नक्कीच आहे, तशी परिस्थिती याक्षणी जरी धूसर वाटत असली तरी.

अशोक पाटील

धनंजय Tue, 29/05/2012 - 23:46

छान. पटण्यासारखे.

आकृती क्रमांक २ व ३. एक्स्पोनेन्शियल बदल लक्षणीय. म्हणून दर-दक्षलक्ष-डोई आकडा बघितला.

(स्रोत : वर दिलेलाच, शिवाय त्या-त्या वर्षातली भारताची लोकसंख्या)

स्नातकांच्या आकड्यातला एक्स्पोनेन्शियल बदल हा काही प्रमाणात लोकसंख्येच्या एक्पोनेन्शियल वाढीमुळे होत आहे. परंतु ही बाब क्षुल्लक नाही. लोकसंख्या ज्या दराने वाढत आहे, त्याच दराने (किंबहुना त्याहून थोइड्या अधिक दराने) शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढत आहेत, असे दिसते आहे. हे चांगले आहे.

सध्या "पीएच्डी दशसहस्रेषु" आणि "प्रस्नातकः* सहस्रेषु" असे साधारणपणे म्हणता येईल.
प्रस्नातकः = पोस्टग्रॅज्युएट असा शब्द घडवलेला आहे

राजेश घासकडवी Wed, 30/05/2012 - 02:29

In reply to by धनंजय

वरील आलेखातला आकडेही एक्स्पोनेन्शियल बदलानेच पुढे जात आहेत. अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर लोकसंख्या २ टक्क्यांनी वाढत आहे तर उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ टक्क्यांनी वाढत आहे.

सध्या "पीएच्डी दशसहस्रेषु" आणि "प्रस्नातकः* सहस्रेषु" असे साधारणपणे म्हणता येईल.

हे थोडं दिशाभूल करणारं आहे. ही आकडेवारी एकूण उच्चशिक्षितांची नसून, त्या त्या पदवीसाठी 'सध्या' शिकत असलेल्यांची आहे. २००४ साली दर दशलक्षातले सुमारे आठशे प्रस्नातक होण्याच्या मार्गावर होते. ८१ साली हीच संख्या दशलक्षात सुमारे सहाशे होती. याचा अर्थ या तेवीस वर्षांत बाहेर पडणाऱ्या प्रस्नातकांचं प्रमाण सुमारे दर दशलक्षामागे सुमारे ७०० * २३/२ इतकं आहे. त्याही आधीचे बरेच प्रस्नातक जिवंत आहेत असं धरलं तर हा आकडा सुमारे शंभरात एक असा येतो. तेव्हा हे विधान खालीलप्रमाणे बदलावं.

सध्या "पीएच्डी सहस्रेषु" आणि "प्रस्नातकः शतेषु" असे साधारणपणे म्हणता येईल.

सुनील Wed, 30/05/2012 - 00:16

माहितीपूर्ण आणि आशावादी लेख. अनेक प्रतिसाददेखिल उत्तम.

गेल्या एका शतकातील प्रगती थक्क करणारी आहे यात शंका नाही.

नगरीनिरंजन Wed, 30/05/2012 - 12:45

अभ्यासपूर्ण लेख. लेखाच्या निष्कर्षांशी पूर्ण सहमत आहे.
शिक्षणाची पहिली क्रांती झालेली आहे. दर्जाच्या बाबतीतली क्रांतीही लवकरच होवो ही सदिच्छा.

Nile Wed, 30/05/2012 - 20:28

लेख आवडला, प्रस्तावना कल्पक. निष्कर्षाशी सहमत आहे.