सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल

सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल

लेखिका - मनीषा

चित्रपट हे अनेक भावभावना दृक-श्राव्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कलांच्या आविष्कारांचे एक साधन आहे. तसेच अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतीदेखील चित्रपटाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात. चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते एका वेळी खूप मोठ्या जनसमूहासमोर सादर केले जाऊ शकतात. त्यामुळे इतर कलाविष्कारांवर ज्या मर्यादा येऊ शकतात, त्या चित्रपटांसाठी अस्तित्वात नसतात. त्यामुळे या माध्यमाने अनेक दिग्गज कलाकारांनादेखील भुरळ घातली आणि बर्‍याच काळापर्यंत केवळ काही मोजक्या उच्चवर्गीय प्रेक्षकांपुरती मर्यादित असणारी ही मनोरंजनाची दुनिया सर्वसामान्यांसाठी खुली झाली.

भारतीय चित्रपटसृष्टी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अनेक अजरामर साहित्यकृती चित्रपटरूपात सादर केल्या गेल्या आहेत. भारतीय चित्रपटांमधून स्त्री-कलाकारांना म्हणावे तितके महत्त्व दिले गेले नाही असेच मला वाटते. काही सन्माननीय अपवाद वगळता, बहुतेक चित्रपटांची कथा ही नेहमी स्त्री-कलावंतांना दुय्यम स्थान देणारीच असते. स्त्री-कलाकारांची कारकीर्दही खूप कमी काळाची असते. नंतर त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागते, अन्यथा आई किंवा दाईच्या नगण्य भूमिका कराव्या लागतात. खरे म्हणजे कलागुण अथवा योग्यतेच्या दृष्टीने त्या कुठेही कमी नसतात. ही त्या कलाकारांची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

परंतु इंग्रजी चित्रपटांमध्ये मात्र काहीशी वेगळी परिस्थिती आढळते. तिथल्या स्त्री-कलाकारांना अशी सापत्न वागणूक दिलेली दिसत नाही. भव्यदिव्य चित्रपट निर्मितीबरोबरच, प्रामुख्याने एका स्त्रीभोवती रचलेले कथानक असलेले चित्रपट इथे निर्माण झाले आणि त्यांना उदंड लोकप्रियताही लाभली. 'हॉलिवूड क्लासिक्स' म्हणता येतील असे अनेक चित्रपट निर्माण झाले. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे 'द साऊंड ऑफ म्युझिक', 'गॉन विथ द विंड' आणि 'माय फेअर लेडी'. तिन्ही चित्रपटांच्या कथा या मुख्यत: त्यांतील नायिकांच्याभोवतीच फिरत राहतात, हे त्या तीन चित्रपटांतील साम्य. अनुक्रमे ज्युली अँड्र्युज, विविएन ली आणि ऑड्री हेपबर्न या गुणी कलावतींनी त्यांतील मुख्य भूमिका केल्या आहेत. स्त्रीची अनेक गुणवैशिष्ट्ये त्यांनी त्यात सादर केली आहेत. या तिघी जणी स्वतंत्र आहेत. आयुष्यात येणार्‍या संकटांना त्या मोठ्या धीराने सामोर्‍या जातात. एक व्यक्ती म्हणून स्वत:चे आयुष्य कसे जगायचे, ह्याबद्दल त्यांचे विचार, कल्पना सुस्पष्ट आहेत आणि त्या त्यांनुसारच जगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्या कधी तडजोडी स्वीकारतात, तर कधी स्वीकारत नाहीत. पण त्या कधीही हीन-दीन, परावलंबी झालेल्या दिसत नाहीत आणि हीच ह्या तिन्ही चित्रपटांची जमेची बाजू आहे.

परंतु या तीन कथानायिकांमधले साम्य इथेच संपते. त्यांचे स्वभाव, वेषभूषा, भाषा आणि समाजातील स्थान सर्वस्वी भिन्न आहेत. त्यांच्या आशा, आकांक्षा निराळ्या आहेत. इतकेच नाही, तर त्यांच्या नीतिमत्तेच्या कल्पना, सांस्कृतिक मूल्ये हीदेखील वेगळी आहेत. परंतु एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांची जी एक अनोखी प्रतिमा या चित्रपटामधून उमटते, ती विलक्षण मनमोहक आहे. आणि म्हणूनच त्यांच्या वेगळेपणातदेखील एक साम्य सतत जाणवत राहते.

'मेमॉयर ऑफ मरिया व्हॉनट्रॅप' या पुस्तकाच्या कथेवर आधारित चित्रपट 'द साऊंड ऑफ म्युझिक'. या चित्रपटाला दुसर्‍या जागतिक युद्धाची पार्श्वभूमी आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात संगीताला (म्युझिक) महत्त्वाचे स्थान आहे. नन होण्यासाठी ऑस्ट्रियामधील एका चर्चमध्ये दाखल झालेल्या सिस्टर मरिया ह्या एका तरुण मुलीची ही कथा. सारे कथासूत्र सिस्टर मरियाभोवतीच फिरत राहते. ननची भूमिका असल्यामुळे ती कधीही आकर्षक वेषभूषेत दिसत नाही. परंतु ज्युली अँड्र्युजने या भूमिकेचे सोने केले आहे. सिस्टर मरिया ही अ‍ॅबेच्या मदर सुपीरियरची डोकेदुखी बनलेली असते. ही खरोखर नन बनू शकेल का, ह्याबद्दल त्यांना शंका असते. म्हणून त्या तिला कॅप्टन व्हॉनट्रॅपच्या सात मुलांची गव्हर्नेस म्हणून पाठवितात आणि तिथेच मरियाला आपल्या जीवनाचे ईप्सित गवसते. 'सिंपली रिमेंबर माय फेव्हरिट् थिंग्स्', 'आय् अ‍ॅम सिक्स्टीन, गोईंग ऑन सेव्हन्टीन', 'डो रे मी..', 'गुडबाय फेअरवेल', 'क्लाइम्ब एव्हरी माउंटन', अशी अनेक गीते या चित्रपटाचे नाव सार्थ ठरवतात. आधीच्या अनेक गर्व्हनेसना हैराण करून पळवून लावणारी कॅप्टनची सात मुले नंतर सिस्टर मरियाला मात्र स्वीकारतात. त्यांच्यामध्ये घडणारे अनेक गमतीदार आणि हृद्य प्रसंग या चित्रपटाची लज्जत वाढवत राहतात. कळत नकळत प्रेक्षकही व्हॉनट्रॅप कुटुंबाचा सदस्य होऊन त्यांच्या सुखदु:खाशी समरस होतो. सरदार घराण्यातील बॅरोनेस श्रोडर या श्रीमंत विधवेबरोबर दुसरा विवाह करण्याचे ठरवत असताना, कॅप्टन नकळतच या साध्यासुध्या मरियाच्या प्रेमात पडतो. नंतर नात्झी आक्रमण होते आणि त्यांची नोकरी करत पारतंत्र्यात राहण्याऐवजी हे कुटुंब घरदार सोडून परागंदा होते. कथानक इतकेच आहे; परंतु घडणारे प्रसंग, संवाद आणि त्यातील कलाकारांचे अभिनय हे ह्या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात.

महायुद्धाच्या काळातील ऑस्ट्रियाचे अतिशय सुंदर चित्रण यात आहे. तेथील भव्य चर्च, सुबक रस्ते, जुन्या काळातले वैभव दर्शवणारे कॅप्टनचे घर आणि अतिशय सुंदर निसर्गाचे चित्रण यात आहे. या सगळ्या कोंदणातला हिरा म्हणजे सिस्टर मरिया. अ‍ॅबेमधे होणारी तिची घुसमट, गर्व्हनेस म्हणून काम स्वीकारल्यानंतर कुठल्याही विरोधाला न जुमानता आपले काम यशस्वीपणे करण्याची तिची धडपड, कॅप्टनच्या मनात आपल्याबद्दल काही वेगळी भावना निर्माण होते आहे, हे लक्षात आल्यावर तिची झालेली द्विधा मन:स्थिती हे सर्व ज्युली अँड्र्युजने अतिशय समर्थ आणि समर्पक पद्धतीने साकार केले आहे. सुरुवातीला आत्मविश्वासाचा अभाव असणार्‍या, काहीशा वेंधळ्या मरियामध्ये चित्रपटाचा शेवट येत असताना जो बदल घडून येतो, तोदेखील ह्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून प्रभावीपणे दाखवला आहे.

सुरुवातीपासून चित्रपटाची जशी प्रगती होत जाते, तसे मरियाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर अलगदपणे उलगडत जातात – अगदी एखाद्या फुलाची पाकळी पाकळी उमलत जावी तसे. अनेक वेळा पाहूनदेखील, परत नव्याने हा चित्रपट तुम्ही पहिल्याइतक्याच आत्मीयतेने आणि आवडीने पाहाल हे नक्कीच.

मला उल्लेखनीय वाटणारा दुसरा चित्रपट म्हणजे 'गॉन विथ द विंड'. यातील स्कार्लेट ओ'हॅराची मुख्य भूमिका 'विविएन ली' ह्या अभिनेत्रीने साकारली आहे. हिचे व्यक्तिमत्त्व मरियाच्या अगदी विरुद्ध असे आहे. स्वत:च्या रूपाची, व्यक्तिमत्वाची पुरेपूर जाणीव असणारी आणि त्याचा जाणीवपूर्वक वापर करून आपले साध्य साधणारी, अशी ही आत्मविश्वासपूर्ण स्कार्लेट. 'मार्गारेट मिशेल' ह्या लेखिकेच्या 'गॉन विथ द विंड' ह्या पुस्तकाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. असे म्हणतात की, यातील स्कार्लेट म्हणजे वास्तवातील मार्गारेट मिशेलच आहे. अतिभव्य सेट आणि त्यावर चित्रित झालेले अनेक विलक्षण प्रसंग हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. यातील पोशाख आणि कलाकारांच्या वेशभूषा हे त्या काळाला अगदी साजेसे असेच आहेत.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये जे सिव्हिल वॉर झाले होते, त्या काळामध्ये घडणारी ही कथा आहे. त्या युद्धामुळे सारे काही उद्ध्वस्त झाले, अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. सारी जीवनपद्धती, जीवनमूल्ये.. सारे सारे बदलून गेले. म्हणूनच तर सुरुवातीलाच ते म्हणतात --- "Generations... Gone with the wind".

या चित्रपटाची नायिका, स्कार्लेट ओ'हॅरा. तिच्यात रूढार्थाने नायिकेत असावेत असे कोणतेच गुण नाहीत. ती एक हट्टी, संतापी आणि मत्सरी मुलगी आहे. सोशीकपणा, दुसर्‍यांसाठी त्याग करणे वगैरे तिला अजिबात माहिती नाही. गावातील तरुण मुलांमधे जरी ती लोकप्रिय असली तरी इतर मुली आणि मोठी माणसे तिचा तिरस्कारच करतात. परंतु त्याबद्दल तिला जराही दु:ख नाही. तिच्या आईबद्दल तिला आदर आहे आणि वडिलांची ती लाडकी असल्याने त्यांच्याकडून आपल्याला हवे ते कसे मिळवायचे, हे तिला चांगले माहिती आहे. तिचे तिच्या दोन लहान बहिणींबरोबर फारसे पटत नाही. पण तिची मॅमी (कृष्णवर्णीय सेविका) मात्र तिला हरप्रयत्नाने थोडीफार व्यवस्थित राहायला, वागायला भाग पाडते. स्कार्लेटची अशी समजूत आहे की, ती तिथल्याच एका जमीनदाराच्या मुलावर (जॉन विल्क्स) प्रेम करते. परंतु त्याचा विवाह मेलनी हॅमिल्टनबरोबर होणार आहे, हे कळल्यावर ती मुद्दाम मेलनीच्या भावाबरोबर विवाह करते, जो नंतर युद्धात मारला जातो. ह्याच काळात तिला ‌'र्‍हेट बटलर' हा एक श्रीमंत सैन्याधिकारी भेटतो. तो तिला सांगतो की, त्याला ती आवडते, कारण तीसुद्धा त्याच्यासारखीच स्वार्थी, धूर्त आणि बेपर्वा वृत्तीची आहे.

परंतु युद्ध सुरू होते ... आणि सारे काही बदलते. इथूनच स्कार्लेटमधे बदल घडण्यास आरंभ होतो. किंबहुना असे म्हणता येईल की, तिचे अनेक छुपे गुण त्या महाप्रचंड अशा संकटामध्ये नवी झळाळी घेऊन सामोरे येतात. स्कार्लेट्ला आपली आई गमवावी लागते. वडील जाणिवेच्या पलीकडे, भूतकाळातच रमलेले. त्यांना स्मृतिभ्रंश झालेला असतो. जॉनला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती त्याच्या पत्नीला, मेलनीला, अतिशय दुर्धर अशा परिस्थितीत साथ देते, तिला सुखरूप स्वत:च्या घरी आणते. तिचे हे उपकार मेलनी आयुष्यभर स्मरते. तिच्यासाठी स्कार्लेट ही एक देवदूतच असते.

स्कार्लेट ऍटलांटातून जेव्हा आपल्या गावी 'टॅरा'ला (प्लॅन्टेशन) परत येते, तेव्हा तिथे सारे काही उजाड झालेले असते. लुटारूंनी खायला अन्नाचा कणदेखील शिल्लक ठेवलेला नसतो. मेलनी आणि तिच्या नवजात मुलाची कशीबशी सोय लावून स्कार्लेट तिच्या शेतावर येते. एके काळी हिरवेगार असणारे तिचे शेत वाळून गेलेले असते. भुकेने व्याकूळ झालेली, आईच्या मृत्यूचा आघात सहन न झालेली, आणि अचानक तिच्यावर आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेने भांबावलेली स्कार्लेट जेव्हा तेथे एकटी असते, तेव्हा तिचे उसने अवसान गळून पडते. तिथल्या जमिनीत एखादे कंदमूळ दिसते का, ते ती अधीरतेने शोधते आणि जेव्हा तिला आपल्या अश्या परिस्थितीची जाणीव होते, त्या वेळी दु:खासंतापाने तिचा बांध फुटतो. तिथली माती हातात घेत ती शपथ घेते, "I will cheat, lie or steal, but I will never be hungry again!" कुणी हे वाक्य कुठल्याही संदर्भाविना ऐकले, तर तो स्कार्लेटचा तिरस्कारच करेल. परंतु चित्रपटाच्या प्रेक्षकाने या क्षणापर्यंतचा तिचा सर्व प्रवास पाहिलेला असतो, अनुभवलेला असतो. त्यामुळे त्याला मात्र तिच्याबद्दल सहानुभूती आणि काहीसे कौतुकच वाटते.

नंतर आपल्याला दिसते, ती अगदी वेगळीच स्कार्लेट. अतिशय व्यवहारी, मतलबी, दुसर्‍यांवर हुकुमत गाजविणारी आणि आपले साध्य साधण्यासाठी चांगल्या-वाइटाचा मुलाहिजा न बाळगणारी. आपल्या टॅराला ती परत पूर्वीचे वैभव मिळवून देते. व्यवहारी जरी असली, तरी ती अनेकांना मदत देते, आसरा देते. अतिशय गुंतागुंतीचा असा स्त्रीस्वभाव विवियन ली या अभिनेत्रीने समर्थपणे अभिनित केला आहे. आधीची हट्टी, अल्लड मुलगी, नंतर मेलनीच्या भावाबरोबर विवाह करणारी धूर्त स्त्री, अ‍ॅटलांटामध्ये डॉक्टर मीड आणि मेलनीबरोबर जखमी सैनिकांची शुश्रुषा करणारी तत्पर नर्स, मेलनीच्या पुत्रजन्माच्या वेळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारी आणि नंतर उसळलेल्या भयाकारी अग्निकांडातून तिला सुखरूप घरी नेणारी सच्ची मैत्रीण, अशी अनेक स्त्रीरूपे तिने साकारलेली आहेत. काहीशी काळ्या रंगाची छ्टा असलेली स्कार्लेट्ची व्यक्तिरेखा तिच्या आजूबाजूच्या चांगल्या, परंतु प्रभावविहीन व्यक्तिमत्वामध्ये उठून दिसते. स्वत:चा व्यवसाय सांभाळतानाची तिची कठोर व्यवहारी वृत्ती आणि इतर स्त्रिया तिच्याबद्दल वाईट बोलत असताना त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची तिची बेपर्वाई, या दोन्ही गोष्टी आपल्याला तितक्याशा खटकत नाहीत.

स्कार्लेटच्या वर्तणुकीत अनेक वेळा विरोधाभास दिसतो. पूर्वीची अल्लड स्कार्लेट कधीच संपलेली असते, पण ती आपले पहिले प्रेम विसरत नाही. आणि असे असले, तरी एकापाठोपाठ एक तीन वेळा विवाह करते. पण आपल्याला त्याचे नवल वाटत नाही. कारण या वेळेपर्यंत आपण स्कार्लेटला ओळखू लागलेलो असतो. ती परिस्थितीनुसार वागणारी, बदलणारी अशी वास्तववादी स्त्री आहे. त्यामुळे ज्या वेळी जे योग्य असेल ते उघडपणे करायला ती कधीच मागेपुढे बघत नाही. तिच्या बहिणी आणि इतर नातेवाईक स्त्रिया तिला पाहून तिरस्काराने तोंड फिरवितात, तिच्याबद्दल तिच्यामागे वाईटसाईट बोलतात आणि तरीही तिच्याच आश्रयाने आणि आधारावर जगत असतात. स्कार्लेटही त्यांना अंतर देत नाही. हे सर्व काही विलक्षण वाटते. म्हणजे एकाच वेळी त्या तिचा तिरस्कार करतात, परंतु तिचे असणे त्यांच्यासाठी जरुरीचे आणि फायद्याचे असते.

या सार्‍या गदारोळात तिच्यावर मनापासून माया करणारी मॅमी ही एक आगळीच व्यक्तिरेखा आहे. खरेतर ती एक गुलाम, काळी स्त्री. पण स्कार्लेटला चांगल्यावाईट काळात ती निष्ठेने साथ देते. स्कार्लेटच्या आईच्या विवाहानंतर ती ओ'हॅरा कुटुंबात आलेली असते. ती स्कार्लेटच्या आईची दाई असते, स्कार्लेटची आणि नंतर तिच्या मुलीचीदेखील ती दाई होते. स्कार्लेट तिला नेहमी आपल्या आईप्रमाणेच वागवते.

सारे काही स्थिरावते आहे असे वाटेपर्यंत नवीन समस्यांचा प्रवेश होतो. स्कार्लेट आणि तिचा पती र्‍हेट बटलर ह्यांच्यात काही कारणाने दुरावा येतो, एका अपघातात तिच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि स्कार्लेट पुन्हा दुर्दैवाच्या चक्रात अडकते. पण तिचे अतुलनीय मनोधैर्य, कणखर स्वभाव आणि never say die .. मनोवृत्ती याचे प्रत्यंतर पुन्हा येते.

अशी ही अजब, अनोखी कहाणी. 'स्त्री म्हणजे त्याग आणि करुणेची मूर्ती' या समजाला छेद देणारी स्त्री म्हणजे एक सक्षम व्यक्ती आहे, तिलादेखील आशाआकांक्षा आहेत आणि त्या साध्य करताना तिला कोणतेही धागेदोरे बांधून ठेवू शकत नाहीत, हेच तर ही कथा सांगते. स्कार्लेट मदतीच्या अपेक्षेने जॉनकडे जाते, पण तिला मदत करण्यास आपण असमर्थ आहोत, असे तो सांगतो. तेव्हा निराश झालेल्या स्कार्लेटला तो म्हणतो, "तू स्वत:ला जितकी ओळखत नाहीस तितका तुला मी जाणतो. या जगात सर्वात जास्त प्रेम तू कुणावर केलं असशील, तर ते आपल्या जमिनीवर, आपल्या मातीवर – टॅरावर. आणि तुझ्याकडे ती जमीन अजून आहे. म्हणूनच तुला निराश होण्याचे कारण नाही." बुद्धिमान, व्यवहारी अशा स्कार्लेटला तिची जमीनच शेवटपर्यंत आधार देते आणि त्यातूनच ती पुन:पुन्हा आपले भविष्य घडवत राहते.

स्त्रीचे एक वेगळेच रूप इथे आपण बघतो. समाजमान्यतेच्या आणि नीतिमत्तेच्या चौकटीत न बसणारे, परंतु जीवनेच्छेने रसरसलेले असे हे अनोखे रूप आपल्याला आवडते. जीवनाचे एक वास्तव रूप म्हणून आपण स्कार्लेटला स्वीकारतो.

बुद्धिमत्ता आणि सौंदर्य हे सहसा एकत्र येत नाहीत असे म्हणतात. परंतु 'ऑड्री हेपबर्न' ह्याला नक्कीच अपवाद आहे. सर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या 'पिग्मॅलियन' या नाटकाच्या कथेवर आधारित असलेल्या 'माय फेअर लेडी' ह्या चित्रपटातील 'एलायझा डूलिटल्'ची भूमिका तिने साकार केली आहे. त्या भूमिकेशी ती इतकी समरस झालेली दिसते की, ती म्हणजेच एलायझा, असेच वाटत राहते.

मरिया किंवा स्कार्लेटपेक्षा ही अगदी वेगळी व्यक्तिरेखा आहे. त्यांच्याप्रमाणे ती शिक्षित नाही. विचारांची परिपक्वता तिच्याकडे नाही. तिला कसलेही विशिष्ट असे गुण नाहीत, की तिच्या जगण्याला ध्येय नाही. समाजातील अगदी खालच्या थरातील, रोजच्या जगण्यासाठीसुद्धा रोज संघर्ष करणारी, अशी ही मुलगी. पण तिच्यातला प्रेक्षकांना भावणारा गुण म्हणजे, तिची परिस्थितीबद्दल कसलीही तक्रार नाही. तिला कुणाबद्दल असूया नाही आणि द्वेषही नाही.

एका नाट्यगृहाच्या बाहेर फुले विकणारी ती एक साधीसुधी, गरीब, खेडवळ मुलगी आहे. तिची स्वप्ने, अपेक्षा अगदी साधी असतात. "Lots of chocolates for me to eat …. & I would feel lovely", असे ती म्हणते. आपल्या मर्यादित जगात ती सुखी असते. प्रो. हिगीन्स तिच्या आशा-अपेक्षांना पंख देतो. पण त्यामुळे तिच्या आयुष्यात वादळच येते.

एलायझा ही रस्त्यावर फुले विकणारी मुलगी. तिच्या तोंडी अशुद्ध... काहीशी शिवराळ भाषा आहे. तिच्या फुलांचे नुकसान करणार्‍याबरोबर भांडायला ती घाबरत नाही. आणि भांडताना ती एकेक असे शेलके शब्द वापरते की ऐकणारे सभ्य लोक थक्क होतात. त्याच नाट्यगृहामध्ये प्रो. हिगीन्स आलेला असतो. तो एक भाषातज्ज्ञ आहे. स्वभावाने फटकळ आणि स्वत:च्या ज्ञानावर अटळ श्रद्धा असलेला असा आहे. माणसे बोलताना शुद्ध भाषा वापरत नाहीत, ही त्याची मुख्य तक्रार. त्याला तिथे भेटलेला कर्नल पिकरींग म्हणतो, "इथे आलेली इतकी उच्चभ्रू माणसेदेखील चुकीचे बोलतात का?" तेव्हा तो म्हणतो, "ही माणसे जे बोलतात ते खरे इंग्लिश नाहीच. कुणालाही भाषेच्या शुद्धतेबद्दल कसलीही फिकीर नाही. मला जर कुणी विद्यार्थी मिळाला, तर मी त्याला शुद्ध भाषा बोलायला शिकवीन." त्या वेळी तिथे असलेल्या एलायझाकडे निर्देश करत पिकरिंग विचारतो, "हिला शिकवशील का?" तेव्हा मोठ्या आत्मविश्वासाने प्रोफेसर म्हणतो, "नुसती भाषाच नाही, तर तिला मी एक प्रतिष्ठित, राजघराण्यातील व्यक्तीला आवश्यक ते सारे शिक्षण देईन आणि तेही असे, की कुणाला खरेही वाटणार नाही की, ही एखाद्या राजघराण्यातली नाही म्हणून."

इथेच एलायझाच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात होते. दोघांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणारी एलायझा ठरवते की, या संधीचा फायदा घ्यायचाच. तिच्या डोळ्यांमध्ये आता नवे स्वप्न दिसत असते, जे आजपर्यंत तिने कधीच पाहिलेले नसते. ही या चित्रपटाची मूळ कथावस्तू आहे. एलायझाला प्रोफेसरकडे शिक्षणासाठी ठेवण्याकरता मोबदला मागणारा आणि मिळालेल्या पैशातून स्वत:चे लग्न जमविणारा तिचा पिता, अश्वशर्यतीच्या वेळी ओळख झालेला आणि एलायझाच्या घराभोवती चकरा मारणारा तरुण, प्रोफेसरची आई आणि अर्थात कर्नल पिकरिंग अशी काही मोजकी पात्रे या कथानकात रंगत आणतात. परंतु मुख्य कथा ही प्रोफेसर आणि एलायझा यांच्याचभोवती घडत असते.

किरकोळ वस्तू रस्त्यावर विकणारे असंख्य विक्रेते आपण रोज बघतो. पण जेव्हा ऑड्री हेपबर्न एलायझाची भूमिका साकार करते, तेव्हा आपल्या नजरेआड असलेले, त्यांचे वास्तविक विश्व आपल्यासमोर उलगडत जाते. एक अशिक्षित, खेडवळ, कसलेही संस्कार नसलेली एलायझा आणि उच्चभ्रू समाजात आत्मविश्वासाने वावरणारी, स्वत:चे आत्मभान जपणारी एलायझा, या दोन्ही भूमिका हेपबर्न मोठ्या कुशलतेने वठवते. आणि तिच्यातल्या ह्या स्थित्यंतराचा तिचा प्रवासही तितकाच रोचक, वेधक आहे. ती अशिक्षित असली तरी आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी ती प्रोफेसरचे अतिशय अवमानकारक वागणेही सहन करते. काही वेळा त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते पण एकदा ठरवलेली गोष्ट पूर्णत्वाला न्यायचीच, या दृढनिश्चयाने ती माघार मात्र घेत नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू पूर्ण चित्रपटात आपल्याला दिसत राहतो. तसेच तिचा स्वाभिमान, अन्यायाला प्रतिकार करण्याची वृत्ती वेळोवेळी दिसते.

या चित्रपटात अनेक गमतीदार प्रसंग सतत घडत असतात. प्रोफेसरची हुकूमशाही काही वेळा तिला असह्य होते; "Just you wait Henry Higgins, just you wait…", असे म्हणत त्याला शिक्षा करण्याची स्वप्ने ती बघत असते. जेव्हा सर्वप्रथम तिला तिच्या कामात थोडे यश मिळते तेव्हा, "I will spread my wings, and do thousand things, that I never done before..." असे म्हणते. या चित्रपटातील हळवे भावनाशील प्रसंग अतिशय सौम्य पद्धतीने चित्रित केलेले आहेत. त्यात कुठे भडकपणा अथवा नाटकीपणा जणवत नाही. उच्चभ्रू समाजातील परंपरा आणि संस्कारांतील पोकळपणा आणि निरर्थकपणा या चित्रपटात काही प्रसंगांत प्रत्ययाला येतो. परंतु ते दाखवताना कुठेही कडवटपणा जाणवत नाही. माणसे, मग ती कुठल्याही समाजवर्गातील असोत, त्या त्या समाजाच्या नीतिनियमांना बांधील असतात. त्याला त्यांचाही नाईलाजच असतो, हेच ह्यात दर्शवलेले आहे.

एलायझाला शुद्ध भाषा शिकवताना प्रोफेसर अनेक क्लृप्त्यांचा वापर करतो. पण कुठलीच यशस्वी होताना दिसत नसते. तिला शिकवताना प्रोफेसर अनेकदा असंवेदनशील वाटतो. त्याला एलायझा या व्यक्तीबद्दल तिळमात्र सहानुभूती नसते. त्याला फक्त आपले ज्ञान आणि कौशल्य वापरून तिच्यात बदल घडवून आणायचा असतो. कारण तसे आव्हान त्याने स्वीकारलेले असते. कर्नल पिकरिंग त्याला समजावयाचा प्रयत्न करतो की, त्याने एलायझाबरोबर थोडे सामंजस्याने, आदराने वागायला हवे. कारण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिला असे सतत धिक्कारून, तिच्या उणिवा दाखवत वागविले, तर ते योग्य होणार नाही. पण प्रोफेसरला त्याचे महत्त्व वाटत नसते. त्याला फक्त त्याने स्वीकारलेले आव्हान दिसत असते.

पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो निराश होतो. एलायझालासुद्धा अपराधी वाटत असते आणि पिकरिंगने तर आशा सोडून दिलेली असते. त्या वेळी प्रोफेसर एलायझाशी प्रथमच संवाद साधतो. तिला म्हणतो की, ही भाषा तिला शिकवणे हे एक आव्हान म्हणून त्याने स्वीकारले आहे, पण तिनेसुद्धा त्याचा स्वत:हूनच स्वीकार केलेला आहे. जर तिला अपयश आले, तर ते फक्त तिचे अपयश नसून त्याच्या ज्ञानाचा, आजवर त्याने केलेल्या साधनेचा पराभव असेल. त्यानंतर एलायझामधे हळूहळू बदल घडत जातो. इतका की, शेवटी प्रोफेसरचा शिष्य असलेला आणि "जगात बोलली जाणारी प्रत्येक भाषा आणि तिची उच्चारणपद्धती मला माहीत आहे", असे मोठ्या अभिमानाने सांगणारा भाषाशास्त्रीदेखील तिच्या बोलण्यात कसलीही चूक शोधू शकत नाही. तो जाहीर करतो की, त्याने तिच्या सहवासात काही काळ व्यतित केल्यानंतर असा निष्कर्ष काढला आहे की, एलायझा ही युरोपमधील एखाद्या राजघराण्यातील राजकुमारी आहे. तिचे वागणे, बोलणे, तिच्यावरील संस्कार हेच दर्शवतात, की ती एखाद्या शाही खानदानाची वारस आहे.


या कथानकात दुष्टप्रवृत्तीची व्यक्ती नाही, की भांडणतंटे नाहीत. अटीतटीचा संघर्ष नाही, की मोठमोठे संवाद नाहीत. तरीही हे कथानक प्रेक्षकाला शेवटापर्यंत खिळवून ठेवते. एलायझाची व्यक्तिरेखा जरी सर्वसामान्य मुलीची असली, तरी अत्यंत भावनाप्रधान आणि मनस्वी अशी आहे. आणि असे असले तरी स्वत:च्या भावना ती तिच्या आत्मसन्मानाच्या आड ती येऊ देत नाही हे विशेष. तिच्यात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे ती आपल्या आधीच्या जीवनाकडे परत जाऊ शकत नसते आणि नवीन जगात तिला कुणाचाच आधार नसतो. पण तरीही ती कुणापाशी काहीच याचना करत नाही. अतिशय संयमाने - परंतु निश्चयाने - ती कुणाचेही उपकार घ्यायला नकार देते. तिच्या व्यक्तिमत्वातला हा अनोखा पैलू आपल्याला चकित करतो. प्रोफेसर हिगीन्सलादेखील तिचे असे रूप अनपेक्षित असते. आतापर्यंत तिला गृहीत धरणारा, तिला नेहमी दुर्लक्षित करणारा प्रोफेसर, ती निघून गेल्यावर मात्र सैरभैर होतो.

एक सर्वसामान्य मुलगी ते एक प्रतिष्ठित, उच्चभ्रू स्त्री हा प्रवास एलायझा सहजतेने पार करते आणि आपल्यासारखे तिचे सहप्रवासी, तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य पैलूची चमक बघताना आश्चर्यचकित होत राहतात. ऑड्री हेपबर्न ही एलायझाची भूमिका अतिशय समरसतेने करते. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात ती फक्त एलायझाच वाटते.

अशा ह्या तीन व्यक्तिरेखा, तीन नायिका. त्या तिघींच्या स्वभावात, असण्यात अथवा दिसण्यात कसलेच साम्य नाही. परंतु त्याच्यातील समान धागा म्हणजे, स्त्रीविषयक पारंपरिक कल्पनांना त्या छेद देतात. त्या तिघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या कुणाचाही आधार शोधत नाहीत, तर त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांचे आत्मभान अवर्णनीय आहे. स्त्रीसुलभ हळवेपणा त्यांच्याकडेही आहे. पण ह्या स्वभावामुळे त्या स्वत्वाचा त्याग करत नाहीत. तिघीही जरी लेखकांच्या कल्पनेतून उतरलेल्या नायिका असल्या, तरी त्यांच्याशी साधर्म्य असणारी अनेक व्यक्तिमत्वे आपण समाजात बघतोच. त्यांचे गुण-अवगुण, यश-अपयश, सुख-दु:ख या सगळ्यांशी प्रेक्षक एकरूप झालेला असतो आणि म्हणूनच त्यांची कथा ही काल्पनिक असली तरी अवास्तव वाटत नाही.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

तीनही चित्रपटांचा व त्यातील स्त्रीभुमिकांचा आढावा छान घेतला आहे.
साऊंड ऑफ म्युझिम पहिल्यांदा जेव्हा पाहिला तेव्हा प्रचंड आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचनखूण साठवायची आहे.
"पण वाचनखूण साथवा" अथवा "बुकमार्क करा" असं काही सापदातच नाहिये आज.
च्यामारी, अतिकामाचा परिणाम म्हणून डोक्यावर्/डोळ्यावर परिणाम झालाय का खरच वाचनखुनांची सुविधा बंद केलेली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडलाच. सौंड ऑफ म्यूझिक पिच्चर पाहिला होता. त्यातले हिरविणीचे काम लैच जब्राट आवडले होते. हडेलहप्पी (नक्की कोण आणि कधी वापरला हा शब्द कुणास ठाऊक पहिल्यांदा) बाप आणि पोरे यांमधील दुवा होणारी ती फारच सुंदर साकारलीये. पिच्चर बघता बघता पुढे बॉलीवुडी सुखांत शेवट असणारच असे वाटत होते आणि तसेच झाले. पण असेना, कामे बाकी सर्वांनी मस्त साकारलीत. म्यूझिकल फॉरम्याटवर मध्ये 'लेस मिझरेबल्स' (आमचा शुद्ध तुपातला उच्चार असाच आहे. तूर्तास एस्पेलिंग-द-फ्रान्स्वा (लेस लक्तर्स देस फ्रेञ्च) फाट्यावर मारल्या गेले आहे.) पाहिल्यापासून प्रेम जडले होते. ते हा पिच्चर पाहून कायम राहिले. (अवांतरः त्यातले अ‍ॅन हॅथवेचे 'आय हॅड अ ड्रीम' हे गाणे आणि कोसेट यांच्यावर अंमळ जास्तच जीव जडल्या गेला आहे.)

अन गॉन विथ द विंड कादंब्रीत स्कार्लेट ओ हाराच्या व्यक्तिमत्त्वातले बदल मस्त टिपलेत. विशेषतः आधीची खुशालचेंडू म्हणावी अशी स्कार्लेट यादवी युद्धाच्या वेळेस जो खंबीरपणा दाखवते त्याला तोड नाही. र्‍हेट बटलर हेही एक जबरी पात्र. त्यांच्यातल्या बेबनावाचे कारण आता विसरलो, पण स्कार्लेटबरोबर तोही लक्षात राहतो- यँकीज बरोबर व्यापार करून वर कॉन्फेडरेट मुलुखात राजरोस फिरणारा म्हणून. स्कार्लेटची बांधिलकी काय असा प्रश्न पडत राहतो पण नंतर ते क्लीअर होतं- तारा. मस्त.

अन तिसरा प्रकार अजून पाहिला नाही. तोही पाहीन असे हा लेख वाचून वाटू लागलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तीन वेगवेगळ्या परंतु आपापल्या परीने सशक्त स्त्री-पात्रांचा छान आढावा घेतला आहे. अभिनंदन.

"नंतर आपल्याला दिसते ती अगदी वेगळीच स्कार्लेट. अतिशय व्यवहारी, मतलबी, दुसर्‍यांवर हुकुमत गाजविणारी आणि आपले साध्य साधण्यासाठी चांगल्यावाईटाचा मुलाहिजा न बाळगणारी."
चित्रपटाच्या सुरुवातीपासून ती अशीच दाखवलेली आहे. फरक इतकाच आहे की आधी धनराशींवर लोळत असल्यामुळे ती आपले सारे व्यवहारचातुर्य, मतलबी स्वभाव इत्यादी पुरुषांना गळाला लावण्यात व झुलवण्यात वापरत असे. नंतर , त्याच गोष्टींचा वापर तारा जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी, आयुष्याची लढाई लढण्यासाठी, व गतवैभव परत मिळवण्यासाठी वापरते. प्रथमपासूनच ती अल्लड अशी कधी (मला तरी) जाणवतच नाही.

"असं म्हणतात की, यातील स्कार्लेट म्हणजे वास्तवातील मार्गारेट मिशेलच आहे."
- हे कधी ऐकले नव्हते. मार्गरेट मिचेलच्या जीवनाबद्दल जे थोडेसे वाचले आहे त्यावरून असे जाणवले नव्हते. ह्याचे काही रेफरन्सेस?

चांगल्या लेखास तीट लावल्याप्रमाणे तपशिलाच्या काही किरकोळ चुका आहेत. एरवी दुर्लक्ष केले असते, पण माहितीप्रधान लेख असल्यामुळे, व पुढे कोणी तो संदर्भ म्हणून वापरण्याची शक्यता असल्यामुळे मांडतो आहे:

"द साऊन्ड ऒफ म्युझिक"मधील पात्रास सिस्टर मारिया म्हणणे बरोबर नाही. ती सिस्टर (नन) झालेली नसून नोविशिएट असते. म्हणूनच विचार बदलून कॅप्टन फॉन ट्रॅपशी लग्न करू शकते.

"तिथल्याच एका जमीनदाराच्या मुलावर (जॉन विल्क्स) प्रेम करते."
त्या मुलाचे नाव ऍश्ले विल्क्स असून त्याच्या वडिलांचे (जमीनदाराचे) नाव जॉन होते.

"याच काळात तिला ‌ऱ्हेट बटलर हा एक श्रीमंत सैन्यअधिकारी भेटतो."
त्या वेळी र्‍हेट बटलर सैन्यात नसून व्यापारी व ब्लॉकेड रनर असतो, व त्यातून त्याने रग्गड पैसा कमावलेला असतो. त्याच्या संपत्तीबद्दल कळल्यावर आधी त्याला नाकं मुरडणार्‍या स्कार्लेटचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो हे वे.सा.न.ल.यादवी युद्ध संपायला येते तेव्हा र्‍हेट सैन्यात भरती होतो.

"सर जॉर्ज बर्नार्ड शॉ"
शॉ 'सर' नव्हते. त्यांना इंग्रज सरकारने देऊ केलेली नाइटहूड त्यांनी नाकारली होती.

"एका नाट्यगृहाच्या बाहेर फुले विकणारी ती एक साधीसुधी, गरीब, खेडवळ मुलगी आहे."
खेडवळ नव्हे, एलाइझा अट्टल कॉकनी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभार
अ‍ॅशले विल्कस बरोबर
स्कार्लेट चित्रपटाच्या सुरुवाती पासून अशीच दाखवली आहे हे तुमचे म्हणणे तितकेसे योग्य नाही .
तुम्हाला ती तशी वाटली, असे म्हणणे संयुक्तिक होईल. कारण ं मला ती अल्ल्ड, हट्टी अशीच वाटली. ती धनराशींवर लोळ्णारी वगैरे नव्हती. तिचे वडील जमिनदार असले तरी अतिश्रीमंत नव्हते. तसेच तिची आई एक धार्मिक आणि शिस्तीची बाई असते.
त्यामुळे तुमच मत वेगळं असेल पण मी लिहिलेले चूक नाही.
-हेट बट्लर ची ओळख कॅप्ट्न बटलर अशीच दिली जाते अगदी सुरुवातीला सुद्धा . फक्तं त्याची निष्ठा कुणापाशी नसते. जिथे फायदा असेल त्या बाजूने तो लढणार असतो.
गॉन विथ द विंड पुस्तक वाचायचा मी प्रयत्न ़केला होता , पूर्ण वाचले नाही पण सुरुवातीला लेखिकेची महिती दिली आहे . त्यातच असे म्हणले आहे. की स्कार्लेट्चे व्यक्तिमत्व ़खूपसे लेखिकेशी मिळते ़जुळते आहे.

मरिया बद्दल -- तिची ओळख सिस्टर मरिया अशीच दिली जाते. पण हे बरोबर आहे की ति नन झालेली नसते. मला वाटते मी तसा उल्लेख केलेला आहे.

एलायझा बद्दल --
खेडवळ म्हणजे खेड्यात रहाणारी नव्हे .
त्या वाक्यात तुम्हाला 'ती साधीसुधी मुलगी असण्याला आक्षेप आहे का?
तसं असेल तर ते तुमचं मत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

गॉन विथ द विंड पुस्तक वाचायचा मी प्रयत्न ़केला होता , पूर्ण वाचले नाही पण सुरुवातीला लेखिकेची महिती दिली आहे

रोचक
बाकी पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आढावा. चित्रपट पाहीले नाहीत, पण गॉन विथ द विँड वाचलय. स्कार्लेट फार फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! वा! व्यक्तीरेखा अन त्यांच्या स्वभावविशेषांचे पापुद्रे सुरेख सादर केले आहेत.

स्त्रीचे एक वेगळेच रूप इथे आपण बघतो. समाजमान्यतेच्या आणि नीतिमत्तेच्या चौकटीत न बसणारे, परंतु जीवनेच्छेने रसरसलेले असे हे अनोखे रूप आपल्याला आवडते. जीवनाचे एक वास्तव रूप म्हणून आपण स्कार्लेटला स्वीकारतो.

गॉन विथ द विंड अफाट आवडलेला सिनेमा आहे. कादंबरी १० वेळा प्रयत्न करुनही पूर्ण करु शकलेले नाही. फार खंत वाटते. पण ती वाचून तिचा आस्वाद घ्यायचे स्वप्न अबाधित आहे.
र्‍हेट-स्कार्लेट ची जुगलबंदी क्या केहेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लेख आवडला. साउंड ऑफ म्युझिक पाहून खूप वर्षे झाली, पण गॉन विथ विंड पुन्हा गेल्या वर्षीच पाहिला आणि माय फेअर लेडी कोणत्याही प्रसंगापासून मी पाहायला सुरू करू शकते. तिन्ही खूप आवडते चित्रपट आहेत.

बाद्वे, ते गाणं "Wouldn't it be loverly?" असं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

लेख खूप सुंदर !
साउंड..,माय फेअर लेडी हे चित्रपट पाहिलेत. गॉन विथ द विंड मात्र झपाटून वाचलंय. ते बरेच दिवस मानगुटीवर बसलं होतं. त्यामुळे ते तसंच अबाधित ठेवायला सिनेमा बघणार नाही असं ठरवलंय !

तुम्ही तीनही नायिका मस्तच लिहिल्या आहेत.
मला स्कार्लेट जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार दिवसांनी आवडत्या चित्रपटांवीषयी इतका सुंदर लेख वाचला.
आजचा जाल दिवस सफल झाला.
खरोखर सुंदर संग्राह्य लेख
या सुंदर माहीतीपुर्ण लेखासाठी अनेक धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0