Skip to main content

दिवाळी अंक आवाहन

रीतीनुसार याही वर्षी ऐसीचा दिवाळी अंक काढण्यासाठी काम सुरू केलं आहे. त्यासाठी साहित्य पाठवण्याचं आवाहन.

अंकासाठी विषय कुठलाही चालेल, मात्र साहित्य कसदार हवं. साहित्य म्हणजे फक्त लेखन नाही; त्यात ऑडिओ, व्हिडिओ, चित्रं, फोटो असं कुठल्याही प्रकारचं साहित्य चालेल. लेखनाबरोबर छापण्यासाठी फोटो, चित्रं, व्हिडिओ, ऑडिओ अशाही पूरक माध्यमांचा विचार जरूर करावा. 

लेखनासाठी शब्दमर्यादा नाही; किमान १२००-१५०० शब्दांचा लेख असल्यास उत्तम. पद्यासाठी किमान वा कमाल शब्दमर्यादा नाही. 

साहित्य ऐसीच्या इमेल पत्त्यावर पाठवा - aisiakshare@gmail.com

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख - ३० सप्टेंबर २०२६

साहित्य गूगल ड्राईव्हवरून पाठवल्यास ऐसी अक्षरेच्या आयडीला संपादनाचे अधिकार द्या.

लेखन पाठवताना ते युनिकोडातच पाठवा. ऐसीवर, फेसबुक, इन्स्टा वगैरेंवर टंकलेला सगळा मजकूर युनिकोडात असतो.


अंकाला या वर्षीही संकल्पना आहे - उजव्यांचं उजवेपण

१४ जुलै १७८९ रोजी फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यानंतरच्या फ्रान्समध्ये राजाला किती अधिकार असावेत याविषयी ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये चर्चा झाली. अध्यक्षांच्या उजव्या बाजूला राजाचे समर्थक होते. त्यांना राजेशाही टिकवून ठेवायची होती. बरेचसे सरदार आणि धर्मगुरू वर्गातले लोक तिथे होते. तर डावीकडच्या लोकांना लोकशाही हवी होती. आजही यावरून माणसांची आणि विचारसरणीची उजवी आणि डावी अशी विभागणी केली जाते. 

 

एकच व्यक्ती काही बाबतींत उजव्या विचारसरणीची असेल, इतर काही बाबतीत डावी. म्हणजे कट्टर धार्मिक असणारे लोक गरिबांच्या भल्याच्या योजनांना पाठिंबा देऊ शकतात; किंवा स्वतःला कट्टर नास्तिक म्हणवणारे नवभांडवलशाहीचेही समर्थक असू शकतात. असे लोक सरसकट उजवे किंवा डावे म्हणता येत नाहीत. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था खुली करणारे पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंग उजवी आर्थिक धोरणं राबवत होते; पण ते धार्मिकदृष्ट्या कट्टर किंवा उजवे नव्हते. आताचं मोदी सरकार धार्मिक बाबतींत उजव्या विचारांचं आहे; मात्र ‘लाडकी बहीण’ आणि नवीन नावानं ‘मनरेगा’ यांसारख्या डाव्या विचारसरणीत बसणाऱ्या आर्थिक योजनाही चालवत आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जवळीक असलेल्या लोकांमध्ये एके काळी डाव्या किंवा कम्युनिस्ट लोकांबद्दल धारणा होती की कम्युनिस्ट लोक खूप अभ्यासू असतात; खूप वाचन करतात. सामाजिकदृष्ट्या गरीब, भूमिहीन लोकांच्या बाजूनं बोलणारे अनेक लोक कोव्हिडकाळात समाजमाध्यमांवर कोव्हिडच्या लशीविरोधात गमतीदार अवैज्ञानिक विधानं करत होते. 

 

उजवे-डावे हे शब्द तयार झाले तेव्हा राजेशाही होती, आता लोकशाही आहे. आपल्या हातात स्मार्टफोन आहेत. डेटिंग साईटवर कुणी व्यक्ती आवडली तर ‘राईट स्वाईप’ आणि आवडली नाही तर ‘लेफ्ट स्वाईप’ करायचं असतं. म्हणजे, उजव्या-डाव्या बाजूंचे सगळे संदर्भ बदलले तरीही आवडी-नावडीसाठी डावे-उजवेपण आहेच.

 

उजवेपणा, उजवे विचार हा प्रकार सरधोपट असा नसतो. त्याला कंगोरे असतात. काळानुसार आणि संदर्भांनुसार उजवे विचार काय हे ठरतं. समाजांच्या धारणांनुसार उजव्यांची तत्त्वं बदलतात. उजव्यांच्या या उजवेपणाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

 

Aisi Akshare Diwali 2026 Appeal