'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे....
सिनेमा सुरु होतो लंडनमधे. तिथे ओमार झफर (डॅनी) नावाच्या टकल्या व्हिलनला (जो इंटरपोलच्या लिस्टमधला सगळ्यात खूंखार दहशतवादी आहे) एमआय६ ने पकडून ठेवलंय आणि त्याला भेटायला कर्नल वीरेन (की कायतरी) नंदा नावाचा जाँबाज भारतीय मिलिटरी ऑफिसर (जिमी शेरगिल) फुल आर्मी फटिग्स मधे येतो (माझ्या माहितीप्रमाणे हा पोशाख फक्त युद्धभूमीवर वापरतात. एरवी साधा ड्रेस युनिफॉर्म असतो) आणि झफरला सांगतो, की आता आपण अशी एक एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी साईन करणारे की कुठलाही गुन्हेगार कुठूनही ७२ तासांच्या आत भारतात घेऊन जाता येईल त्यामुळे तिहार जेल आणि फासी के फंदे के लिये तयार रहा वगैरे. ही ट्रीटी कोणाबरोबर साईन होणार आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहातं. मधेच त्या कर्नल नंदाला त्याच्या आईचा वगैरे फोन येऊन जातो. 'तू स्वेटर घातलायस ना रे बाळा?' वगैरे चौकशी ती माऊली अगदी आस्थेने करते आणि जिमी शेरगिल त्याला जमेल तितकं ओशाळण्याचा प्रयत्न करुन त्याच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ऑफिसरकडे पाहातो. तितक्यात इमारतीच्या छतावरून काळ्या कपड्यातली ७-८ माणसं दोर्या लावून खाली येतात आणि जोरदार लाथांनी इमारतीची जाडजूड काच फोडून एम आय ६ च्या सगळ्यात सुरक्षित (!) इमारतीत प्रवेश करतात (कसलं सोप्पंय ना?). मग धडाधड गोळीबार करून मॉलमधल्या सिक्युरिटी गार्डसारख्या दिसणार्या एम आय ६ च्या सगळ्या एजंटांना यमसदनी धाडतात आणि डॅनीला जिथे ठेवलेलं असतं तिथे प्रवेश करतात. मग त्यांचा म्होरक्या हमीद गुल (जावेद जाफरी) तिथे प्रवेश करतो आणि डॅनीला बंदूक देतो. डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. मग जिमी शेरगिलही 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर' छापाचे डायलॉग बोलतो, गोळी खातो आणि मरून जातो. मग डॅनी आणि जावेद जाफरी अंत्यविधीचा खर्च तरी कशाला इंडियन आर्मीवर टाकायचा म्हणून जाता जाता जिमी शेरगिलला पेटवूनही जातात....
मला माहित आहे की हे असलं वाचल्यावर पुढे काय होणार याची कल्पना आली असणार आहे. तरी पण थोडक्यात पुढे काय होतं ते सांगतो म्हणजे डोक्याल शॉट लागण्यापासून लोकांना वाचवण्याचं पुण्य तरी माझ्या गाठीला जमा होईल. बाहेर आल्यावर डॅनी जावेद जाफरीला म्हणतो "ही ट्रीटी साईन झाली तर आपली वाट लागेल. एक काम कर आपण अशी काही तरी वस्तू चोरू की ज्याने भारतीय फुल उदास होतील. फक्त चोर भारतीय असला पाहिजे. तू एक काम कर 'कोहिनूर चोरणे आहे' अशी एक जाहिरात दे. च्यायला १२५ कोटी लोकांमध एक तरी सापडेल जो कोहिनूर चोरेल". मग अपेक्षेप्रमाणे कोहिनूर चोरला जातो. चोराचं चित्र सीसीटीव्हीवर दिसतं. ओळखा पाहू चोर कोण? अर्थात हृतिक. मग तो बर्या वेळा डॅनीच्या गुंडांना तुडवतो, गोळ्या घालतो, कतरिना कैफला घेऊन जगभर हिंडतो, पुन्हा गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, नवीन देश, गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, वगैरे वगैरे वगैरे... शेवटी साठा उत्तरांची कहाणी म्हणून एकदाचा डॅनीला मारून टाकतो आणि एकदाचा चित्रपट संपतो. फक्त मारण्याआधी मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तो कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग बोलतो. असो, आपली सुटका होते आणि एवढा सगळा चित्रपट पाहिल्यावर हृतिक हे सगळं का करत असतो याचा विचार करत आपण थेटराबाहेर पडतो.
नाईट अँड दे, ट्रान्स्पोर्टर, बॉर्न ट्रिलॉजी, कसिनो रोयाल, क्वांटम ऑफ सोलेस यासारख्या अनेक इंग्रजी सिनेमातून उचललेले सीन आणि (किंबहुना यामुळेच)कोणतेही लॉजिक नसलेली पटकथा यामुळे हा चित्रपट केवळ छळ आहे. मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत. कतरीना कैफ आणि तिचं पात्र याबद्दल न बोललेलंच बरं. एखादी अभिनेत्री पडद्यावर किती बावळट दिसू शकते याचं उत्तम उदाहरण. बरं अभिनयाचं सोडा, तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!). असो, लोकेशन्स नयनरम्य आणि नृत्ये भन्नाट आहेत. हृतिक रोशन हा माणून लै भारी नाचतो (बिचार्याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!). तर, कतरीना त्याच्यासोबत नृत्य करताना केवळ बोजड दिसते (त्याला ती तरी काय करणार म्हणा...). गाणी टुकार आहेत. एकुणात चित्रपट केवळ पैश्यांची नासाडी आहे. आमच्या शेजारी दोन कॉलेजयुवती म्हणाव्यात अशा दोघी बसल्या होत्या. त्या सुरुवातीला 'हृतिक... सो सेक्सी' वगैरे म्हणत किंचाळल्या मग जाम बोअर झाल्या आणि मध्यंतरात निघून गेल्या. आम्हीच आशा धरुन बसलो होतो की चित्रपट आता तरी पकड घेईल... असो, जालावरच्या एका फेमस चित्रपट परीक्षणात वाचलेलं (बहुधा मायबोलीवर) वाक्य - कारण आम्ही मूर्ख आहोत!!!
व्यवस्थापकः सविस्तर चर्चेसाठी धागा वेगळा काढत आहोत.
समीक्षेचा विषय निवडा
फक्त कतरीनाला बोजड वगैरे
फक्त कतरीनाला बोजड वगैरे म्हणायला कीबोर्ड रेटतोच कसा म्हणतो मी!
अहो, हृतिकसोबत नाचताना हो! हृतिकचं शरीर ठिकठिकाणी एवढ्या कोनातून सहज वळतं की तीच स्टेप करताना कतरीनाला पाहिलं की ती बोजडखेरीज दुसरं काही वाटूच शकत नाही.
बाकी 'कुटुंब' संगतीचा परिणाम वगैरे, हॅ हॅ हॅ.... ;)
kites
advance booking करुन kites ह्या थोर्थोर चित्रपटास गेलेली लोकं ठौक होती. आता 'बॅंग बँग' संपूर्ण वेळ थेट्रात पाहू शकणारी जमात सापडली.
गुड.
बादवे, 'बॅंग बँग' हा प्रेक्षकांवर केलेला 'गँग बँग'* आहे हे आम्ही चित्रपटास न जाताच ओळखून आहोत.
*
शब्द ठौक नसल्यास नीलचित्रफितींच्या जालिय शोधाचा अभ्यास वाढवा.
मेघना, नर्गिसच्या डोळ्यातून
मेघना, नर्गिसच्या डोळ्यातून अन देहबोलीतून राज कपूरबद्दल जे समर्पण अन प्रेम दिसतं, तसं प्रेम मधुबालाला दाखवता येणं शक्य नाही. ती "आपकी आंखोने समझा" वालीही हां माला सिन्हा ती ही ठुमकते छान पण तीही डोळ्यातून, लाजण्यातून समर्पित वाटते. त्या दोघी मला गोड वाटतात.
लोचा येह है के "समर्पण" ही भावना = प्रेमाचा अभिनय असं मी समजत असेन कदाचित. असेलही.
"दम भर जो उधर मुंह फेरे" ओह
:) "दम भर जो उधर मुंह फेरे" ओह कातिल!!!! काय सुंदर अभिनय आहे दोघांचा, मी वेडी होते ते गाणं पाहून अन तिची, त्याच्याभोवतीची रुंजी पाहून.
येस्स अन एका क्षणी, त्याने केस धरुन तिला ओढलेलं पाहूनही. जाऊ दे थांबते ;)
ती पॅशन मधुबालेच्या एकाही गाण्यात नाही फॉर दॅट मॅटर ना देवानंदच्या.
___________
"तेरे बिना आग येह चांदनी" - हे एक बायपोलार गाणं अतिशय आवडतं. तो नरकातून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करतोय अन ती त्याची प्रेरणा ही हे गाणं. फार फार आवडतं. अन दोघांचा अभिनय अत्यंत उत्तम!!
मधुबालाला माठ नाही म्हणलं मी
मधुबालाला माठ नाही म्हणलं मी कुठेही.
मुघले आझम हा 'कंठाळ' सिनेमा पाहायची हिंमत झाली नाहीय अजून :-D.
'अच्छाजी मै हारी' गाण्यात देवानंद असताना मधुबालाकडे बघतय कोण?? तिच्यासाठी दिकु, किकु, प्रेमनाथ वगैरे ठीकय. ओके ओके किडींग ;-). दोघे तोडीस तोड सुंदर आहेत. पण त्यांनी जे एक्सप्रेशन दिलेत त्याला 'अभिनय' म्हणायचे तर तेवढा अभिनय कुठल्याही व्यावसायिक अभिनेता/त्री ला येतो.
'ललिता पवार - मधुबाला' या तुलनेत 'अभिनय - सौंदर्य' यांच्यात गल्लत होतेय.
छ्या!!
मधुबाला-सम/ची नक्कल करणार्या पोरींना कॉलेजात भाव मिळायचा त्याची सल काही गेलेली दिसत नाही, मधुबालाच्या समोर ललिता पवार कशी उजवी आहे असं सांगणं म्हणजे श्रीखंड-पुरीच्या जेवणासमोर श्रावण घेवड्याची भाजी कशी भारी आहे असं सांगण्यासारखं आहे.
संबंधीतांनी प्रतिसाद हलकेच घ्यावा. ;)
अगागागा
डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. मग जिमी शेरगिलही 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर' छापाचे डायलॉग बोलतो, गोळी खातो आणि मरून जातो. मग डॅनी आणि जावेद जाफरी अंत्यविधीचा खर्च तरी कशाला इंडियन आर्मीवर टाकायचा म्हणून जाता जाता जिमी शेरगिलला पेटवूनही जातात....
=))
ख प लो!
या सिनेमाच्या ट्रेलरचा एक
या सिनेमाच्या ट्रेलरचा एक तुकडा चुकून डोळ्यासमोर आला. त्यात कत्रिना हृतिकच्या पुढ्यात बसत होती, एखाद्या लहान बाळाला आईने भरवण्यासाठी बसवावं तशी. पण हृतिक मोटरसायकल चालवत होता आणि ही बया मोटरसायकलच्या पेट्रोल टँकवर बसत होती. एवढं पुरेसं नाही तर तिने त्यापुढे हृतिकसोबत प्रेमळ चुंबन, आवेगांची देवाणघेवाण केली आणि मग सावकाश एक बंदूक काढली. कुठून वगैरे माहीत नाही. आणि मग गोळ्या झाडायला लागली.
हे सगळं पाहून चक्कर येऊ नये म्हणून मी वासेपूरमधलं 'आय एम अ हंटर' गाणं ऐकायला सुरूवात केली.
हा धागा वाचून 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग यूट्यूबवरून शोधून कोणी देईल तर बरं असं वाटायला लागलंय.
अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं
अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि
:-) मस्त. लेख आवडला.
माउलीचा रोल कोणी केलाय? रीमा लागू की फरीदा जलाल आता आज्जीच्या गटात असतील.
जिमी शेरगिलचा "हासिल" बर्यापैकी आवडला होता (इर्फान ही होता त्यात). कुंभमेळ्याच्या क्लाइमॅक्स मधे सिनेमाचे कथानक पार गंडले, तेथपर्यंत सिनेमा बरा होता. पण आता त्याला बरीच वर्षं झाली - फटीग्स वगैरेचा रुबाब का असेना, पहिल्याच सिक्वेन्स मधे टाटा गुडबाय म्हणजे शेरगिल वर वाइट दिवस आले म्हणायचे.
ता.क.: आईचा रोल दीप्ती नवल ने केलाय म्हणे! टॉक अबाउट वाइट दिवस. असो.
आणि हा सिनेमा "नाइट अँड डे" चा अधिकृत बॉलिवुड अवतार आहे असे ही विकीवर वाचले.
मस्त! मजा आली.
मधेच त्या कर्नल नंदाला त्याच्या आईचा वगैरे फोन येऊन जातो. 'तू स्वेटर घातलायस ना रे बाळा?' वगैरे चौकशी ती माऊली अगदी आस्थेने करते आणि जिमी शेरगिल त्याला जमेल तितकं ओशाळण्याचा प्रयत्न करुन त्याच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ऑफिसरकडे पाहातो
हे वाचल्यावर 'एव्हरीबडी लव्हज रेमंड' या मालिकेतला हा भाग आठवला.
http://www.youtube.com/watch?v=0cThuaPUD_Q
भन्नाट!
भन्नाट लिहीले आहे :). ही खालची वाक्ये कहर निरीक्षणे आहेत :)
मग त्यांचा म्होरक्या हमीद गुल (जावेद जाफरी) तिथे प्रवेश करतो आणि डॅनीला बंदूक देतो. डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. >>>
हृतिक रोशन हा माणून लै भारी नाचतो (बिचार्याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. >>> जबरी!
कत्रीना आणि बँग बँग... खुलासा
या सिनेमात कत्रीना बोजड दिसली आहे, म्हणून तसं लिहिलंय. ऋषिकेश यांना दिलेला प्रतिसाद पहा. पडद्यावर बावळट काय अनेक अभिनेत्री दिसतात. तो काही कत्रीनाचा गुणविशेष असा नाही. अभिनेत्री वगैरे सोडा, पण बाई म्हणून कत्रीना आवडतेच... (खातंय आता मार...)
बाकी मधुबालाचे चित्रपट खूपसे पाहिलेनसल्याने त्याबद्दल पास. आम्हाला तिचं ते एक ब्ल्याक अँड व्हाईट पोस्टर तेवढं आवडतं.
धम्माल ======= फक्त कतरीनाला
=))
धम्माल
=======
फक्त कतरीनाला बोजड वगैरे म्हणायला कीबोर्ड रेटतोच कसा म्हणतो मी! (हा 'कुटुंब'संगतीचा परिणाम म्हणायचा का? ;)
त्याबद्दल निषेध!