Skip to main content

'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे....

सिनेमा सुरु होतो लंडनमधे. तिथे ओमार झफर (डॅनी) नावाच्या टकल्या व्हिलनला (जो इंटरपोलच्या लिस्टमधला सगळ्यात खूंखार दहशतवादी आहे) एमआय६ ने पकडून ठेवलंय आणि त्याला भेटायला कर्नल वीरेन (की कायतरी) नंदा नावाचा जाँबाज भारतीय मिलिटरी ऑफिसर (जिमी शेरगिल) फुल आर्मी फटिग्स मधे येतो (माझ्या माहितीप्रमाणे हा पोशाख फक्त युद्धभूमीवर वापरतात. एरवी साधा ड्रेस युनिफॉर्म असतो) आणि झफरला सांगतो, की आता आपण अशी एक एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी साईन करणारे की कुठलाही गुन्हेगार कुठूनही ७२ तासांच्या आत भारतात घेऊन जाता येईल त्यामुळे तिहार जेल आणि फासी के फंदे के लिये तयार रहा वगैरे. ही ट्रीटी कोणाबरोबर साईन होणार आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहातं. मधेच त्या कर्नल नंदाला त्याच्या आईचा वगैरे फोन येऊन जातो. 'तू स्वेटर घातलायस ना रे बाळा?' वगैरे चौकशी ती माऊली अगदी आस्थेने करते आणि जिमी शेरगिल त्याला जमेल तितकं ओशाळण्याचा प्रयत्न करुन त्याच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ऑफिसरकडे पाहातो. तितक्यात इमारतीच्या छतावरून काळ्या कपड्यातली ७-८ माणसं दोर्‍या लावून खाली येतात आणि जोरदार लाथांनी इमारतीची जाडजूड काच फोडून एम आय ६ च्या सगळ्यात सुरक्षित (!) इमारतीत प्रवेश करतात (कसलं सोप्पंय ना?). मग धडाधड गोळीबार करून मॉलमधल्या सिक्युरिटी गार्डसारख्या दिसणार्‍या एम आय ६ च्या सगळ्या एजंटांना यमसदनी धाडतात आणि डॅनीला जिथे ठेवलेलं असतं तिथे प्रवेश करतात. मग त्यांचा म्होरक्या हमीद गुल (जावेद जाफरी) तिथे प्रवेश करतो आणि डॅनीला बंदूक देतो. डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. मग जिमी शेरगिलही 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर' छापाचे डायलॉग बोलतो, गोळी खातो आणि मरून जातो. मग डॅनी आणि जावेद जाफरी अंत्यविधीचा खर्च तरी कशाला इंडियन आर्मीवर टाकायचा म्हणून जाता जाता जिमी शेरगिलला पेटवूनही जातात....

मला माहित आहे की हे असलं वाचल्यावर पुढे काय होणार याची कल्पना आली असणार आहे. तरी पण थोडक्यात पुढे काय होतं ते सांगतो म्हणजे डोक्याल शॉट लागण्यापासून लोकांना वाचवण्याचं पुण्य तरी माझ्या गाठीला जमा होईल. बाहेर आल्यावर डॅनी जावेद जाफरीला म्हणतो "ही ट्रीटी साईन झाली तर आपली वाट लागेल. एक काम कर आपण अशी काही तरी वस्तू चोरू की ज्याने भारतीय फुल उदास होतील. फक्त चोर भारतीय असला पाहिजे. तू एक काम कर 'कोहिनूर चोरणे आहे' अशी एक जाहिरात दे. च्यायला १२५ कोटी लोकांमध एक तरी सापडेल जो कोहिनूर चोरेल". मग अपेक्षेप्रमाणे कोहिनूर चोरला जातो. चोराचं चित्र सीसीटीव्हीवर दिसतं. ओळखा पाहू चोर कोण? अर्थात हृतिक. मग तो बर्‍या वेळा डॅनीच्या गुंडांना तुडवतो, गोळ्या घालतो, कतरिना कैफला घेऊन जगभर हिंडतो, पुन्हा गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, नवीन देश, गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, वगैरे वगैरे वगैरे... शेवटी साठा उत्तरांची कहाणी म्हणून एकदाचा डॅनीला मारून टाकतो आणि एकदाचा चित्रपट संपतो. फक्त मारण्याआधी मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तो कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग बोलतो. असो, आपली सुटका होते आणि एवढा सगळा चित्रपट पाहिल्यावर हृतिक हे सगळं का करत असतो याचा विचार करत आपण थेटराबाहेर पडतो.

नाईट अँड दे, ट्रान्स्पोर्टर, बॉर्न ट्रिलॉजी, कसिनो रोयाल, क्वांटम ऑफ सोलेस यासारख्या अनेक इंग्रजी सिनेमातून उचललेले सीन आणि (किंबहुना यामुळेच)कोणतेही लॉजिक नसलेली पटकथा यामुळे हा चित्रपट केवळ छळ आहे. मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत. कतरीना कैफ आणि तिचं पात्र याबद्दल न बोललेलंच बरं. एखादी अभिनेत्री पडद्यावर किती बावळट दिसू शकते याचं उत्तम उदाहरण. बरं अभिनयाचं सोडा, तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!). असो, लोकेशन्स नयनरम्य आणि नृत्ये भन्नाट आहेत. हृतिक रोशन हा माणून लै भारी नाचतो (बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!). तर, कतरीना त्याच्यासोबत नृत्य करताना केवळ बोजड दिसते (त्याला ती तरी काय करणार म्हणा...). गाणी टुकार आहेत. एकुणात चित्रपट केवळ पैश्यांची नासाडी आहे. आमच्या शेजारी दोन कॉलेजयुवती म्हणाव्यात अशा दोघी बसल्या होत्या. त्या सुरुवातीला 'हृतिक... सो सेक्सी' वगैरे म्हणत किंचाळल्या मग जाम बोअर झाल्या आणि मध्यंतरात निघून गेल्या. आम्हीच आशा धरुन बसलो होतो की चित्रपट आता तरी पकड घेईल... असो, जालावरच्या एका फेमस चित्रपट परीक्षणात वाचलेलं (बहुधा मायबोलीवर) वाक्य - कारण आम्ही मूर्ख आहोत!!!

व्यवस्थापकः सविस्तर चर्चेसाठी धागा वेगळा काढत आहोत.

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Mon, 06/10/2014 - 13:44

=))

धम्माल

=======
फक्त कतरीनाला बोजड वगैरे म्हणायला कीबोर्ड रेटतोच कसा म्हणतो मी! (हा 'कुटुंब'संगतीचा परिणाम म्हणायचा का? ;)
त्याबद्दल निषेध!

घाटावरचे भट Mon, 06/10/2014 - 13:54

In reply to by ऋषिकेश

फक्त कतरीनाला बोजड वगैरे म्हणायला कीबोर्ड रेटतोच कसा म्हणतो मी!

अहो, हृतिकसोबत नाचताना हो! हृतिकचं शरीर ठिकठिकाणी एवढ्या कोनातून सहज वळतं की तीच स्टेप करताना कतरीनाला पाहिलं की ती बोजडखेरीज दुसरं काही वाटूच शकत नाही.

बाकी 'कुटुंब' संगतीचा परिणाम वगैरे, हॅ हॅ हॅ.... ;)

मन Mon, 06/10/2014 - 13:49

advance booking करुन kites ह्या थोर्थोर चित्रपटास गेलेली लोकं ठौक होती. आता 'बॅंग बँग' संपूर्ण वेळ थेट्रात पाहू शकणारी जमात सापडली.
गुड.
बादवे, 'बॅंग बँग' हा प्रेक्षकांवर केलेला 'गँग बँग'* आहे हे आम्ही चित्रपटास न जाताच ओळखून आहोत.

*
शब्द ठौक नसल्यास नीलचित्रफितींच्या जालिय शोधाचा अभ्यास वाढवा.

मेघना भुस्कुटे Mon, 06/10/2014 - 13:57

=))

कत्रिनाला बावळट आणि अ-सेक्सी म्हणणारा एक पुरुषोत्तम अखेर भेटला, म्हणून मी अत्यानंदानं तुझं अभिनंदन करीत आहे.

मन Mon, 06/10/2014 - 14:16

In reply to by मेघना भुस्कुटे

दगडाला दगड म्हण्णारे लोक आहेत म्हणायचं अजून पृथ्वीवर.
शिंचं लोकांच्या आवडीचं स्फटिकीकरण झालय.
कोरून खोदलेल्या ओबड धोबड मूर्तीहून जादा भाव गुळगुळीत ग्रॅनाइटला मिळतो.

ऋषिकेश Mon, 06/10/2014 - 14:28

In reply to by मन

मला दोन्ही प्रकारच्या मुर्ती आवडतात...

पण कत्रिना ती कत्रिना! ती या अशा "ठोकळेबाज' सौंदर्यात बसतच नाही! तीचा स्वतःचा क्लास आहे.
तीची तुलना होऊ शकत नाही बास! तुम्ही आम्हाला दगड म्हणा नैतर काहीही!

बॅटमॅन Sat, 11/10/2014 - 12:20

In reply to by ऋषिकेश

बास बास बास. हेच म्हणायचं होतं. स्वतःला गुळाची चव नाही म्हणून "हॅ! गूळ काय खायचा? डायबेटिस होणार" इ.इ. बोलण्यापैकीच हा प्रकार आहे.

ॲमी Mon, 06/10/2014 - 14:15

हा हा हा.
कतरीनाला अभिनय, नृत्य येत नाही, ती सेक्सीदेखील नाही हे मान्य आहे पण तिचा चेहरा सुंदर आहे. हे मंजे मधुबालासारखंच की ;-)

मेघना भुस्कुटे Mon, 06/10/2014 - 14:21

In reply to by ॲमी

मधुबालाला अभिनय येत नाही असं कोण म्हणतं? तिच्या काळात रडारड करण्यालाच अभिनय म्हणायची पद्धत होती, म्हणून तिला अभिनय येत नाही, अशी समजूत झाली असणार.

मधुबाला आणि कत्रिनाची तुलना? "टिंकूचे डोके ठिकाणावर आहे काय?"

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 14:29

In reply to by मेघना भुस्कुटे

मला नर्गिसचा अभिनय आवडतो. अतिशय आवडतो. मधुबालाला नर्गिसच्या नखाची सर नाही. फक्त चेहर्‍याच्या गोडव्यावर मधुबाला जिंकते - असे एक मत आहे. म्हणजे माझेच.

ॲमी Mon, 06/10/2014 - 14:42

In reply to by वामा१००-वाचनमा…

फक्त चेहर्याच्या गोडव्यावर मधुबाला जिंकते - असे एक मत आहे. म्हणजे माझेच.
>> +१. डोळे मोठेमोठे करून पिटपिटणे आणि डावीकडे वाकडे हसू याला अभिनय म्हणायचे असेल तर फार्र्र छान अभिनय येतो हो मधुबालाला ;-)

मेघना भुस्कुटे Mon, 06/10/2014 - 14:50

In reply to by ॲमी

बाकी सिनेमांचं जाऊ दे.

तूर्तास फक्त 'अच्छा जी मैं हारी' या गाण्याबद्दल बोलू. त्या गाण्यात मधुबालाच्या चेहर्‍यावर आर्जव, खट्याळपणा, लाडीक मोहजाल टाकण्याचे प्रयत्न, नंतरचं दुखावणं, रागावणं... यांतलं काहीच दिसत नाही? फक्त गोड चेहरा आणि वाकडं हसू?

अवघड आहे हो...

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 15:02

In reply to by मेघना भुस्कुटे

जाम डोक्यात जाते मधुबाला. का ते सांगता येत नाही :(
समथिंग लॅकिंग इन हर.
मला तर ती "आपकी नजरोने समझा" वाली कोण ती नटी तीही मधुबालापेक्षा आवडते. "समर्पण" नामक सुंदर भावना मधुबालाच्या अभिनयात आढळली नाही.

ॲमी Mon, 06/10/2014 - 15:07

In reply to by वामा१००-वाचनमा…

तिच्या एकंदर एक्सप्रेशन, हसण्यात वगैरे मग्रुरी जाणवते. त्यामुळे ती सुंदर असूनही डोक्यात जाते. ऐश कशी प्लास्टीक आहे तशी मधुबाला गर्विष्ठ आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 06/10/2014 - 15:13

In reply to by ॲमी

'मुघल-ए-आझम'मधे पण? वर लिहिलंय त्या गाण्यातपण?

काही काही सिनेमांत आहे ती तशी, गर्विष्ठ का काय ती. पण मग ती अभिनयाचीच पावती झाली की. कारण सगळीकडे बाय डिफॉल्ट गर्विष्ठ नाही दिसत ती.

या तो गर्विष्ठ बोलो, नही तो माठ बोलो...

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 15:19

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना, नर्गिसच्या डोळ्यातून अन देहबोलीतून राज कपूरबद्दल जे समर्पण अन प्रेम दिसतं, तसं प्रेम मधुबालाला दाखवता येणं शक्य नाही. ती "आपकी आंखोने समझा" वालीही हां माला सिन्हा ती ही ठुमकते छान पण तीही डोळ्यातून, लाजण्यातून समर्पित वाटते. त्या दोघी मला गोड वाटतात.
लोचा येह है के "समर्पण" ही भावना = प्रेमाचा अभिनय असं मी समजत असेन कदाचित. असेलही.

मेघना भुस्कुटे Mon, 06/10/2014 - 15:22

In reply to by वामा१००-वाचनमा…

नर्गिसच्या डोळ्यांत समर्पण दिसतं? आणि मधुबालाच्या दिसत नाही?

आपली अभिनयाची व्याख्याच निरनिराळी आहे म्हणजे बहुतेक.

- हताश मेघना

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 15:46

In reply to by मेघना भुस्कुटे

:) "दम भर जो उधर मुंह फेरे" ओह कातिल!!!! काय सुंदर अभिनय आहे दोघांचा, मी वेडी होते ते गाणं पाहून अन तिची, त्याच्याभोवतीची रुंजी पाहून.
येस्स अन एका क्षणी, त्याने केस धरुन तिला ओढलेलं पाहूनही. जाऊ दे थांबते ;)
ती पॅशन मधुबालेच्या एकाही गाण्यात नाही फॉर दॅट मॅटर ना देवानंदच्या.
___________
"तेरे बिना आग येह चांदनी" - हे एक बायपोलार गाणं अतिशय आवडतं. तो नरकातून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करतोय अन ती त्याची प्रेरणा ही हे गाणं. फार फार आवडतं. अन दोघांचा अभिनय अत्यंत उत्तम!!

ॲमी Mon, 06/10/2014 - 15:43

In reply to by मेघना भुस्कुटे

मधुबालाला माठ नाही म्हणलं मी कुठेही.
मुघले आझम हा 'कंठाळ' सिनेमा पाहायची हिंमत झाली नाहीय अजून :-D.
'अच्छाजी मै हारी' गाण्यात देवानंद असताना मधुबालाकडे बघतय कोण?? तिच्यासाठी दिकु, किकु, प्रेमनाथ वगैरे ठीकय. ओके ओके किडींग ;-). दोघे तोडीस तोड सुंदर आहेत. पण त्यांनी जे एक्सप्रेशन दिलेत त्याला 'अभिनय' म्हणायचे तर तेवढा अभिनय कुठल्याही व्यावसायिक अभिनेता/त्री ला येतो.
'ललिता पवार - मधुबाला' या तुलनेत 'अभिनय - सौंदर्य' यांच्यात गल्लत होतेय.

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 15:52

In reply to by ॲमी

अन ललीता पवार "जिस देश मे गंगा बेहती है" मध्ये छानच दिसते. इन फॅक्ट गोड्ड गोड्ड मिट्ट नसलेली कोणतीही स्त्री मला बरी वाटते.

ॲमी Tue, 07/10/2014 - 07:09

In reply to by वामा१००-वाचनमा…

ललिता पवार अभिनय चांगलाच करते. आणि तिचा तो हाय स्लीटचा स्कर्टवाला फोटो पाहून तरूणपणी सेक्सीदेखील होती असे वाटते. अपघातात जोरात चपकार बसल्याने डोळा तसा झालेला. तरी त्याचाही पॉझिटीव उपयोग करून घेतला तिने.

मी Tue, 07/10/2014 - 09:47

In reply to by ॲमी

मधुबाला-सम/ची नक्कल करणार्‍या पोरींना कॉलेजात भाव मिळायचा त्याची सल काही गेलेली दिसत नाही, मधुबालाच्या समोर ललिता पवार कशी उजवी आहे असं सांगणं म्हणजे श्रीखंड-पुरीच्या जेवणासमोर श्रावण घेवड्याची भाजी कशी भारी आहे असं सांगण्यासारखं आहे.

संबंधीतांनी प्रतिसाद हलकेच घ्यावा. ;)

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 15:19

In reply to by ॲमी

क्या बात बोली, जैसे बंदूककी गोली.
ती ऐश अन मधुबाला एका जातकुळीच्या ... प्लास्टिकी अन नार्सिसिस्ट!!

गब्बर सिंग Wed, 08/10/2014 - 13:26

In reply to by ॲमी

ज्यांना मधुबाला आवडत नाही त्यांना ही म्हैस आवडते ....
.
.
.

.
.
.

गाणं मस्त आहे. पण म्हैस ही फक्त गोठ्यात असावी. म्हैस पियानो जवळ नुसती आली तरी पियानो मोडण्याची भीती असते.

नंदन Mon, 06/10/2014 - 14:39

डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. मग जिमी शेरगिलही 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर' छापाचे डायलॉग बोलतो, गोळी खातो आणि मरून जातो. मग डॅनी आणि जावेद जाफरी अंत्यविधीचा खर्च तरी कशाला इंडियन आर्मीवर टाकायचा म्हणून जाता जाता जिमी शेरगिलला पेटवूनही जातात....

=))
ख प लो!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/10/2014 - 20:28

या सिनेमाच्या ट्रेलरचा एक तुकडा चुकून डोळ्यासमोर आला. त्यात कत्रिना हृतिकच्या पुढ्यात बसत होती, एखाद्या लहान बाळाला आईने भरवण्यासाठी बसवावं तशी. पण हृतिक मोटरसायकल चालवत होता आणि ही बया मोटरसायकलच्या पेट्रोल टँकवर बसत होती. एवढं पुरेसं नाही तर तिने त्यापुढे हृतिकसोबत प्रेमळ चुंबन, आवेगांची देवाणघेवाण केली आणि मग सावकाश एक बंदूक काढली. कुठून वगैरे माहीत नाही. आणि मग गोळ्या झाडायला लागली.

हे सगळं पाहून चक्कर येऊ नये म्हणून मी वासेपूरमधलं 'आय एम अ हंटर' गाणं ऐकायला सुरूवात केली.

हा धागा वाचून 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग यूट्यूबवरून शोधून कोणी देईल तर बरं असं वाटायला लागलंय.

ॲमी Tue, 07/10/2014 - 07:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्रेलर पाहिला नाही. पण बंदुक काढून गोळ्या झाडण्याआधीच वर्णन गुलाममधल्या राणी आमिरचे वाटतय.

राजेश घासकडवी Mon, 06/10/2014 - 20:53

'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!'

या वाक्यावरच फिदा! लेखाची अॅटिट्यूड भयंकर आवडली. अजून येऊ द्यात.

या लेखाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मधुबालाच्या नावाने तक्रार करणारांचं तळपट होवो!

वामा१००-वाचनमा… Mon, 06/10/2014 - 20:55

In reply to by राजेश घासकडवी

आयला फक्त "तक्रार करणार्‍यांचं"??? हे आले अजून एक त्या मधुबालेचे सेल्फ्प्रोक्लेम्ड कैवारी. ;)

गब्बर सिंग Mon, 06/10/2014 - 23:25

In reply to by वामा१००-वाचनमा…

हे आले अजून एक त्या मधुबालेचे सेल्फ्प्रोक्लेम्ड कैवारी.

अहो, आम्ही फक्त मधुबालेचेच नव्हे ... तर नलिनी जयवंत, गीता बाली, शिरिदेवी, गॅब्रिएला सॅबातिनी, अ‍ॅना कुर..., हीना रब्बानी खार .... यांचे ही कैवारी आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/10/2014 - 23:28

In reply to by राजेश घासकडवी

हृतिकच्या (किंवा दिलीप कुमारच्या) खांद्यावर बंदूक ठेवून, डोळे मोठे करत, गोळ्या झाडणारी मधुबाला असं दृश्य का कोण जाणे, डोळ्यासमोर आलं. आजचा दिवस उत्तम जाणार.

रोचना Wed, 08/10/2014 - 15:10

अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि

:-) मस्त. लेख आवडला.
माउलीचा रोल कोणी केलाय? रीमा लागू की फरीदा जलाल आता आज्जीच्या गटात असतील.
जिमी शेरगिलचा "हासिल" बर्‍यापैकी आवडला होता (इर्फान ही होता त्यात). कुंभमेळ्याच्या क्लाइमॅक्स मधे सिनेमाचे कथानक पार गंडले, तेथपर्यंत सिनेमा बरा होता. पण आता त्याला बरीच वर्षं झाली - फटीग्स वगैरेचा रुबाब का असेना, पहिल्याच सिक्वेन्स मधे टाटा गुडबाय म्हणजे शेरगिल वर वाइट दिवस आले म्हणायचे.

ता.क.: आईचा रोल दीप्ती नवल ने केलाय म्हणे! टॉक अबाउट वाइट दिवस. असो.
आणि हा सिनेमा "नाइट अँड डे" चा अधिकृत बॉलिवुड अवतार आहे असे ही विकीवर वाचले.

ॲमी Wed, 08/10/2014 - 16:04

In reply to by रोचना

शेरगिलने वेन्सडे, स्पेशल २६ मधे चांगलं काम केलेलं आणि दोन्हीत बर्यापैकी मोठा रोल होता त्याला. तसेही तो हिंदीत फार पॉप्युलर असा नव्हता कधी. तिकडे पंजाबी चित्रपटसृष्टीत बरेच चित्रपट येतात वाटत त्याचे.

ॲमी Wed, 08/10/2014 - 18:36

In reply to by मेघना भुस्कुटे

हो आणि तनु वेड्स मनु, साहेब, बिवी और गँगस्टर १, २ राहीलेच की :-).
लगे रहोमधे आठवतच नाहीय त्याचा रोल. विकीवर एकूण ४४ हिंदी चित्रपट दिसतायत १८ वर्षात.

रोचना Sat, 11/10/2014 - 11:52

In reply to by ॲमी

आरारारा, मी या सर्वांमधे फक्त मुन्नाभाई बघितला आहे. पण त्यात ही शेरगिल आठवत नाही!
असो. नवीन सिनेमां बद्दलच्या अज्ञानाचे प्रदर्शन इथेच बस्स! :-)

ॲमी Sat, 11/10/2014 - 12:12

In reply to by रोचना

मुन्नाभाईमधे तो कँसर पेशंट असतो. 'किसी लडकीको छुआभी नही' असा काहीतरी डायलॉग मारल्यावर भाई त्याच्यासाठी क्याब्रे डान्सर आणतो दवाखान्यात. 'सीख ले.. आँखोंमे आंखे डाल' गाणं आठवलं का?

सानिया Wed, 08/10/2014 - 18:31
मधेच त्या कर्नल नंदाला त्याच्या आईचा वगैरे फोन येऊन जातो. 'तू स्वेटर घातलायस ना रे बाळा?' वगैरे चौकशी ती माऊली अगदी आस्थेने करते आणि जिमी शेरगिल त्याला जमेल तितकं ओशाळण्याचा प्रयत्न करुन त्याच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ऑफिसरकडे पाहातो

हे वाचल्यावर 'एव्हरीबडी लव्हज रेमंड' या मालिकेतला हा भाग आठवला.
http://www.youtube.com/watch?v=0cThuaPUD_Q

फारएण्ड Fri, 10/10/2014 - 08:26

भन्नाट लिहीले आहे :). ही खालची वाक्ये कहर निरीक्षणे आहेत :)

मग त्यांचा म्होरक्या हमीद गुल (जावेद जाफरी) तिथे प्रवेश करतो आणि डॅनीला बंदूक देतो. डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. >>>
हृतिक रोशन हा माणून लै भारी नाचतो (बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. >>> जबरी!

स्पार्टाकस Sat, 11/10/2014 - 09:38

कत्रीनाला पाहून एकज शब्द सुचतो मला - रांजण!

घाटावरचे भट Sat, 11/10/2014 - 13:36

या सिनेमात कत्रीना बोजड दिसली आहे, म्हणून तसं लिहिलंय. ऋषिकेश यांना दिलेला प्रतिसाद पहा. पडद्यावर बावळट काय अनेक अभिनेत्री दिसतात. तो काही कत्रीनाचा गुणविशेष असा नाही. अभिनेत्री वगैरे सोडा, पण बाई म्हणून कत्रीना आवडतेच... (खातंय आता मार...)

बाकी मधुबालाचे चित्रपट खूपसे पाहिलेनसल्याने त्याबद्दल पास. आम्हाला तिचं ते एक ब्ल्याक अँड व्हाईट पोस्टर तेवढं आवडतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/10/2014 - 10:01

In reply to by घाटावरचे भट

मी बाई असले तरीही मला 'शीला की जवानी' आणि 'चिकनी चमेली'मध्ये कत्रिना आवडली. (गाण्यांचा कंटाळा आला तरीही!) तिचे सिनेमे फार बघितलेले नाहीत म्हणूनही असेल ...

अनुप ढेरे Sun, 12/10/2014 - 10:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शीला की जवानी हा कत्रिनाचा मास्टर पीस आहे. मस्तं दिसते त्यात आणि कमाल नाचली आहे. चिकनी चमेली नाही आवडत एवढं.

बॅटमॅन Sun, 12/10/2014 - 15:11

In reply to by घाटावरचे भट

ओक्के भटसाहेब. तुम्हांला नाही, बाकी अरसिकांना उद्देशून होतं ते. बाकी, 'कश्मीरजस्य कटुतापि नितांत रम्या' या न्यायाने कत्रीनाचा बोजडपणाही मोहक वाटतो हे नमूद करणे अवश्य आहे.