कोंडापूरची दैवते

आंध्र प्रदेश राज्यामधील मेडक जिल्ह्यामध्ये कोंडापूर या नावाचे एक गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला साधारण 1 किमी अंतरावर 35 ते 40 फूट (11 मीटर) उंचीचे एक टेकाड आहे. भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात येथे उत्खनन केले होते. या नंतर 1941-42 मध्ये हैद्राबाद संस्थानाचे निझाम यांच्या संस्थाना मध्ये हा भाग मोडत असल्याने या संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, जी. याझदानी या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या एका पथकाने या जागेवर उत्खनन कार्य केले होते. हे पथक आपल्या उत्खननानंतर या निष्कर्षापर्यंत पोचले होते की या जागी एक स्तूप व इतर बौद्ध अवशेष सापडले असल्याने ही जागा बौद्ध कालातील एक उपासना केंद्र असले पाहिजे. परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या पथकाने केलेले आपले उत्खनन कार्य या टेकाडाच्या कडे कडेनेच फक्त केले होते व टेकाडाचा मध्यवर्ती भाग धक्का न लावता तसाच ठेवला होता.

2009-10 आणि 2010-11 या दोन वर्षांमध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने 81 एकर एवढ्या विस्तृत जमिनीवर पसरलेल्या मध्यवर्ती भागामध्ये नव्याने उत्खनन केल्यावर ते या निष्कर्षावर पोचले की ही उत्खनन केलेली ही जागा, इसवी सनाच्या सुमारे दोन शतके आधीपासून ते 3 शतके नंतर एवढ्या मोठ्या आणि विशिष्ट कालखंडाची एक महत्त्वाची साक्षीदार म्हणून समजली गेली पाहिजे. ही जागा दख्खनच्या पठारावरच असल्याने अर्थातच या कालात राज्य सत्तेवर असलेल्या सातवाहन साम्राज्याचा एक भाग होती. सातवाहन राजे सम्राट अशोकाच्या राज्यकालात त्याचे मांडलिक राजे होते. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वत:ला स्वतंत्र राजे म्हणून घोषित केले होते.

स्वत:ला स्वतंत्र राजे म्हणून घोषित केल्यानंतर सातवाहन राजांनी पहिली दोन किंवा तीन शतके, मराठवाड्यातील प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) येथून राज्य चालवले होते. यानंतर काही अज्ञात कारणासाठी त्यांनी आपली राजधानी पूर्वेकडे हलवली होती. मात्र त्यांची नवी राजधानी कोठे होती याचा खात्रीलायक पुरावा मिळालेला नाही. कदाचित अशीही शक्यता आहे की पैठणहून राज्य करणार्‍या मूळ सातवाहन वंशाच्या एखाद्या नातेवाईकाने आपले विभक्त राज्य पूर्वेकडे प्रस्थापित केले असावे व काही कालानंतर पैठणचा मूळ सातवाहन वंशच नष्ट झाल्याने पूर्वेकडचे हे विभक्त राज्यच फक्त उरले असावे.

इ.स.पूर्वीच्या तिसर्‍या शतकात, तिसरा सातवाहन राजा सातकर्णी याच्या निधनानंतर त्याची पत्नी नयनिका हिने सह्याद्री पर्वतराजी मधल्या नाणेघाटाजवळच्या एका गुंफेत या राजाच्या कर्तुत्वशाली कार्यकालाचे वर्णन करणारा एक विस्तीर्ण शिलालेख खोदवून घेतला होता. या शिलालेखात, बौद्ध धर्म शिखरावर असलेल्या या कालखंडात, ब्राम्हण असलेले सातवाहन राजे मात्र वैदिक धर्माचे पालन करीत होते असा स्पष्ट उल्लेख आढळून येतो. नाणेघाट शिलालेखात, हा राजा किती सत्शील आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता हे दर्शवून देण्यासाठी त्याने कोणकोणते यज्ञयाग पार पाडले होते याची एक जंत्रीच दिलेली आहे.
सातवाहन राजे वैदिक धर्माचे पालन करत असल्याचा हा स्पष्ट पुरावा जरी उपलब्ध असला तरी त्यांचे कुळाचार, ते पूजित असलेली दैवते आणि या पूजेमधील कर्मकांडे याबाबत काहीच माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. याच कालखंडात खोदलेल्या पितळखोरे येथील बौद्ध गुंफांमध्ये सापडलेल्या एका यक्षाच्या शिल्पाच्या अजूनही शाबीत असलेल्या मुठीवर, शिल्पकाराने स्वत:चे नाव खोदलेले आढळून येते. ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले हे नाव “कान्हादास” असे असल्याने अप्रत्यक्ष रितीने का होईना! कृष्ण या दैवताचे समाजात पूजन होत असावे असा निष्कर्ष काढता येतो. हा अगदी किरकोळ असा पुरावा वगळला तर सातवाहन काळात कोणती वैदिक दैवते होती व कोणत्या दैवतांची पूजा होत असे याची काहीच माहिती आतापर्यंत तरी उपलब्ध होत नव्हती.

पुरातत्त्व विषयामधील एक व्यासंगी अभ्यासक, एम.के.ढवळीकर यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात काम करत असताना, सातवाहन कालाच्या सुमारे हजार वर्षे आधी अस्तित्वात असणार्‍या दख्खनमधील मानवी वसाहतींचा सखोल अभ्यास केलेला आहे. जोरवे, इनामगाव आणि दैमाबाद या सारख्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या या मानवी वसाहतीमधील मानव हे मातृदेवतेचे उपासक होते असा स्पष्ट आणि सबळ पुरावा या ठिकाणी केलेल्या उत्खननात आढळून आला आहे असे ते म्हणतात. याबाबत आपल्या “पर्यावरण आणि संस्कृती” (“Environment and Culture,”) या पुस्तकात ढवळीकर लिहितात:

” जोरवे संस्कृतीमधील लोक, भिन्न स्वरूपात कल्पिलेल्या दोन मातृदेवतांचे उपासक होते असा स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. यापैकी एका मातृदेवतेची मूर्ती मस्तकासह असे व दुसरी मस्तकाशिवाय असे. सर्वशक्तीमान मातृदेवतेच्या मूर्ती भाजलेल्या मातीमधून बनवलेल्या आढळतात तर कच्च्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची उपासना काही विशिष्ट वेळा केली जात असावी असे दिसते. धान्य साठवण्याच्या खड्ड्यांमधे ठेवलेल्या मातृदेवतेच्या लहान आकाराच्या मूर्तींचा प्रजननक्षमतेशी संबंध असावा असे दिसते. संपूर्ण अंगावर टोचे मारलेली मूर्ती बहुधा देवीच्या रोगाशी संबंधित असली पाहिजे. परंतु या शिवाय इनामगाव यथे आढळलेली एक मातृदेवतेची मूर्ती सर्वात रोचक म्हणावी लागते. स्त्री स्वरूपातील ही मूर्ती एका मातीच्या कुपीमध्ये ठेवलेली आढळली होती. या कुपीच्या बाहेरील बाजूस मस्तक नसलेली दुसरी एक स्त्री मूर्ती आणि एक वृषभ मूर्ती ठेवलेली आढळली. या सर्व मूर्ती कच्च्या मातीमधेच बनवलेल्या होत्या. या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील वारली अदिवासी अजूनही मस्तक नसलेल्या ज्या एका मूर्तीची उपासना करत असतात त्याचा उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते. वारली भाषेत या मूर्तीला “पालघात” असे संबोधले जाते व वारली भाषेत या शब्दाचा अर्थ ” बालकाला जन्म देत असण्याच्या अवस्थेत असलेली स्त्री” असा केला जातो. ही मूर्ती, सुखरूप प्रसुती आणि प्रजननक्षमता यांची देवी म्हणून मानली जाते.”

“there is very definitive evidence that the Jorwe people worshipped mother Goddesses, one with head and other without head. The all powerful mother is represented by well baked figurines, whereas unbaked ones may have been worshipped on certain occasions only. Small figurines of mother Goddess placed in pit silos were obviously connected with fertility. The one with blind holes over her body was probably connected with smallpox. But far more interesting is the discovery at Inamgaon of a clay box containing a female figure and over the box was yet another but without head and a bull, all unbaked. It is interesting to note that a figurine without head is presently worshipped by the Warlis, a tribe in western India near Bombay. They call it the “Palghat,” which in their language means the position of a woman at the time of child birth. She is connected with child birth and fertility. ”

कोंडापूर येथे मागच्या दोना वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननाकडे परत वळूया. या उत्खननावरून इसवी सनाच्या प्रारंभ कालात दख्खनमध्ये राहणार्‍या लोकांची दैवते कोणती होती व ते कशाची उपासना करत होते यासंबंधीची माहिती प्रथमच उपलब्ध होऊ शकली आहे. हे नवीन उत्खनन, पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, सुपरिंटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट श्री. जी. महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली 15 आर्किऑलॉजिस्ट करत असून 45 मजूर उत्खननाचे प्रत्यक्ष कार्य करत आहेत. या उत्खनन कार्यात सापडलेला सर्वात मोठा शोध म्हणजे मध्यवर्ती टेकाडाच्या अगदी पश्चिम टोकाला असलेले विटांचे बांधकाम असलेले संकुल! अग्नी पूजक समाजाचे हे एक पूजास्थान असावे असे दिसते. हे पूजास्थान बरेच मोठे असून याच्या मध्यभागी एक दक्षिणाभिमुख वर्तुळाकार गर्भगृह असल्याचे आढळून आले. या गर्भगृहाच्या बाजूंना चौरस आकाराचे कक्ष व यज्ञवेदी सापडल्या आहेत. या यज्ञवेदीमधील खड्डा साधारण 9 ते 10 फूट खोल आहे. या शिवाय विटामध्ये बांधकाम केलेल्या कक्षांच्या मागच्या बाजूस, 37 भाजलेल्या विटांचे ढीग सापडले आहेत. यात काही विटा त्रिकोणी आकाराच्या व काही डमरूच्या आकाराच्या सुद्धा आहेत. यज्ञवेदींमध्ये यज्ञयाग केला जात असावेत याचा सबळ पुरावा उत्खननात दिसतो आहे. त्रिशूळाचे चिन्ह उमटवलेली 5 मातीची भांडी या यज्ञवेदीमधे मिळाली आहेत. या सर्व वास्तू संकुलात अनेक प्राण्यांची हाडे सापडली आहेत. यावरून येथे प्राण्यांचे बळी मोठ्या प्रमाणात दिले जात असावेत असे म्हणता येते. बळी देण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जाणारीभांडी, चंचूपात्रे याशिवाय भाले व सुरे या सारखी लोखंडी हत्यारे सुद्धा येथे मिळाली आहेत. तत्कालीन राजे या यज्ञवेदींवर देवतांना सुखी राखण्यासाठी किंवा पुत्रप्राप्ती सारख्या आपल्या इच्छापूर्तीसाठी येथे बहुधा प्राण्यांचे बळी देत असावेत. चुनखडीच्या दगडापासून बनवलेले आणि एक जानवे घातलेला ब्राम्हण धर्मगुरू राजाला आलिंगन देत असल्याचे चित्रण करणारे एक शिल्प येथे सापडले आहे. या शिवाय सोने चांदीचा मुलामा दिलेली नाणी आणि रोमन राजा टिबेरियस याच्यासारखी दिसणारी छबी उमटवलेली मातीची सील्स सुद्धा येथे मिळाली आहेत. या शिल्पावरून त्या काळी ब्राम्हणांना समाजात केवढे मानाचे स्थान होते हे लक्षात येऊ शकते.

सातवाहन राजांना समकालीन असलेल्या समाजामध्ये यज्ञयाग आणि यज्ञवेदीवर दिल्या जाणारे बळी या शिवाय दुसरी कोणती दैवते होती का? या प्रश्नाचे उत्तर कोंडापूर येथील उत्खननातून स्पष्टपणे मिळते आहे. मध्यवर्ती गर्भगृहाच्या वास्तूजवळ भाजलेल्या मातीमधून बनवलेली स्त्री शिल्पे सापडली आहेत. या शिल्पातील सालंकृत स्त्रिया विवस्त्र असून अंगावर अनेक दागिने असल्याचे दिसते. या प्रकारची शिल्पे अजूनही लज्जागौरी या नावाने प्रचलित आहेत व त्यांची पूजा अजूनही काही भारतीय समाजात केली जाते. या शिवाय पूजाविधींची काही लोखंडी उपकरणेही येथे मिळाली आहेत. या शोधांमुळे प्रजननक्षमतेचे स्वरूप असलेल्या देवीचे पूजन या कालात सुद्धा चालू राहिले होते हे स्पष्ट दिसते.

एम.के.ढवळीकर आपल्या पुस्तकात याबाबत लिहितात:

” इ.स. पूर्वीच्या दुसर्‍या शतकापासूनच्या पुढच्या कालामधील, मस्तक नसलेल्या व बालकाला जन्म देण्याच्या अवस्थेमध्ये असलेल्या स्त्री स्वरूपातील देवीच्या मूर्ती दख्खन मध्ये अनेक ठिकाणी सापडल्या आहेत. अजूनही पुत्रप्राप्तीची आकांक्षा असलेल्या स्त्रिया अशा स्वरूपातील देवतांचे पूजन करत असतात. या मूर्तींना शाकंबरी देवीचे स्वरूप म्हणून आता ओळखले जाते. दुर्गा देवीने 100 वर्षे सतत चालू असलेला दुष्काळ हटावा म्हणून शाकंबरी देवीचे स्वरूप धारण केले होते असे मानले जाते.”

“ It may be noted that sculptures of of a nude Goddess without head but with legs spread apart occur in the Deccan from the 2nd Century BCE onwards. They are presently worshipped by barren women with a view to procuring an offspring. They can be identified as reprtesentations of Goddess Shakhambari, a form which Goddess Durga is said to have assumed in order to ward off a 100 year famine.”

इसवी सन सुरू होण्याच्या कालखंडामधील समाजाच्या धार्मिक श्रद्धा आणि परंपरा काय होत्या हे समजण्याच्या दृष्टीने अनेक बाबी प्रकाशात आणणार्‍या कोंडापूर उत्खननाला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील समाज करत असलेले प्रजननक्षमतेच्या देवतेचे पूजन हे दख्खनमध्ये स्थायिक झालेल्या ब्रॉन्झयुगकालीन लोकांनी पुढे चालू ठेवले होते याचे आकलन आपल्याला जोरवे, इनामगाव आणि दैमाबाद येथील उत्खननानंतर झाले होते. मात्र ही रुढी परंपरा इ.स.पहिल्या शतकातील किंवा सातवाहन राजांच्या कालीन समाजातही रूढ होती ही गोष्ट कोंडापूर उत्खननातून परत एकदा स्पष्ट झाली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे काही अदिवासी आणि समाज आज एकविसाव्या शतकातही या रुढींचे पालन करताना दिसत असल्याने प्रजनक्षमतेच्या देवतेचे पूजन ही परंपरा भारतीय समाजात निदान 5000 वर्षे तरी सतत चालू आहे असा विलक्षण निष्कर्ष कोंडापूर उत्खननानंतर काढणे सहज शक्य आहे.

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

17 जून 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण.
आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा! सुंदर चित्रं आहेत त्या दुव्यावर. लेख अतिशय माहीतीपूर्ण वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसांनी आलात. चांगली माहिती आहे. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा अगदी किरकोळ असा पुरावा वगळला तर सातवाहन काळात कोणती वैदिक दैवते होती व कोणत्या दैवतांची पूजा होत असे याची काहीच माहिती आतापर्यंत तरी उपलब्ध होत नव्हती.

नाणेघाटातल्याच लेखात याविषयी स्पष्ट माहिती मिळते.

ह्या लेखाच्या प्रारंभीच इष्टदेवतांना वंदन केले आहे.

ओम्‌ नमो प्रजापति
नो धंमस नमो ईदस संकंसन वासुदेवानं चंदसूतानं
चतुंनं चं लोकपालानं यमवरून कुबेर वासवा

प्रजापतीला नमस्कार असो.
धर्म, इन्द्र, संकर्षण, वासुदेव यांना नमस्कार असो
यम, वरूण, कुबेर, वासव या चार लोकपालांना नमस्कार असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाणेघाटात उल्लेख केलेले देव हे सगळे वेदामधील देव आहेत. यज्ञामध्ये बळी देऊन त्यांचे पूजन केले जात असे. माझ्या लेखाचा विषय थोडा निराळा आहे. सध्या प्रचलित असलेल्या हिंदू धर्मामध्ये जशी पूजा, शंकर, विष्णू, गणपती, किंवा आणि असंख्य अनेक दैवतांची केली जाते त्या प्रकाराने दैवते सातवाहन कालात पुजली जात होती का? व असल्यास ती कोणती होती? हे कोंडापूरमधील उत्खननावरून कळते एवढेच मला म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख... माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीपूर्ण लेख. फोटो रोचक आहेत.
They are presently worshipped by barren women with a view to procuring an offspring. याचे भाषांतर करताना 'अजूनही पुत्रप्राप्तीची आकांक्षा असलेल्या स्त्रिया अशा स्वरूपातील देवतांचे पूजन करत असतात.' या वाक्यात पुत्रप्राप्तीऐवजी अपत्यप्राप्ती हवे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले मत बरोबर आहे पुत्रप्राप्ती ऐवजी अपत्यप्राप्ती असाच शब्द मी वापरायला हवा होता. चु.भू.द्या.घ्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचे भाषांतर करताना 'अजूनही पुत्रप्राप्तीची आकांक्षा असलेल्या स्त्रिया अशा स्वरूपातील देवतांचे पूजन करत असतात.' या वाक्यात पुत्रप्राप्तीऐवजी अपत्यप्राप्ती हवे ना?

टींक्सी मस्त मस्त मस्त!!! अगदी बरोब्बर चूक काढलीस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0